कळतं मला पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय,
पहिलं पाऊल टाकायचं, दोघांकडून राहून गेलंय.
कळतं आता तुझंमाझं उरलं नाही वेडं वय.
येताजाता उचकी लागेल अशी आता कुठली सय?
कळतं की भरतीनंतर ओहोटी ही येणारच,
किती कुणी जवळ येवो दूर तर जाणारच..
तरीही,
उठता उठताच आधी पहिला फोनकडे जातो हात,
तुझ्या मेसेजशिवाय होते दिवसाची सुरुवात.
स्टेटस, डीपी, पोस्ट, फोटो कुठंतरी तर भेटशील खरं?
पण डिलिटलेल्या नंबरवर कसं कुणी दिसणार बरं?
कधीतरी तर वाजेल रिंग समजावतं एक मन
चोवीस तास उगाचंच हाताजवळ असतो फोन!
...
सोडायचं म्हटलं तरी सवयी सुटता सुटत नाहीत;
जीर्ण शीर्ण झाल्या तरी काही गाठी तुटत नाहीत..
प्रतिक्रिया
7 Feb 2023 - 12:39 pm | आंद्रे वडापाव
अरे अरे .. अशी लॉन्ग-डिस्टन्स रिलेशनशिपवरील कवितेवर ..
मन उदास झालं असेल कवयित्रीचे....
तर कवयित्रीने हा व्हिडीओ पहावा ...
https://www.youtube.com/watch?v=Jcu2AcGx01Q
8 Feb 2023 - 5:42 pm | Bhakti
हा हा .. खुप हसले :) भारी.
7 Feb 2023 - 1:50 pm | सरिता बांदेकर
छान लिहीलं आहे.
16 Feb 2023 - 1:48 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!
7 Feb 2023 - 1:56 pm | अनंतफंदी
"डिलिटलेल्या" शब्द विशेष आवडला
16 Feb 2023 - 1:48 pm | प्राची अश्विनी
धन्यवाद!:)
7 Feb 2023 - 11:38 pm | प्रसाद गोडबोले
म्हणुनच म्हणतो , बिनधास्त बोलुन टाकायचं , मनात ठेवायचं नाही . कोणी आवडलं की स्पष्ट सांगायचं जास्त आढेवेढे न घेता ! तुम्ही जर डीसेंटली विचारलेत तर , जास्तीत जास्त वाईट काय होइल , नकार येईल , त्यापेक्शा तर जास्त काही होणार नाही ना , मग ठीक आहे की ! तो नकार तुम्हाला किंव्वा तुमच्या पर्सनॅलिटीला नसुन सर व्यक्तिच्या स्वतःविषयीच्या परिस्थीतीला आहे , बस्स !
आणि तसेही , विचारले असते तर कदाचित काहीतरी वेगळे होऊ शकले असते ह्या कल्पनेत जळत रहाण्यापेक्षा , ठीक आहे , नाही तर नाही , मुव्ह ऑन . हे म्हणणे जास्त सोप्पे असते :)
हे मोबाईल अन व्हॉत्सॅप्प मेसेजेस अन सोशळ मीडीयाच्या नादात लोकं स्पष्ट बोलायलाच विसरली आहेत .
बोला रे बोला... मनातलं बोला , उगाच बाष्कळ गफ्फा मारत बसु नका , स्पष्ट मनातलं बोला . बोलुन रिकामे व्हा .
#वॉर_ऑन_लोनलीनेस
16 Feb 2023 - 1:47 pm | प्राची अश्विनी
जय गुरुदेव!;)
8 Feb 2023 - 11:33 am | कर्नलतपस्वी
वय झालं तरी सय सुटत नाही
तुला विसरावे हेच मुळी पटत नाही.
शालजोडीला चिंधी लावतोय, कशी वाटते सांगा.
पुला खालून बरचं पाणी वाहून गेलं आहे.
तरीही आठवणींचा ओलावा अजून टिकून आहे
दगड गोट्यावरचे हिरवे शेवाळ सुकत आहे
जुन्या जखमेतून रक्त लाल गळत आहे
काळे मेघ अजुन विरलेले नाहीत
गुलाबी स्वप्नांचे दिवस सरलेले नाहीत
दिवसा मागून दिवस पळत आहेत
उरलेल्या आसवांना बांध घालत आजुनही वाट बघत आहे.
-कसरत
8 Feb 2023 - 11:45 am | प्रसाद गोडबोले
अहो चिंधी म्हणता म्हणता पार गोधडी करुन टाकलीत तुम्ही तीही रंगीबेरंगी =))))

हिरवे शेवाळ, रक्त लाल, गुलाबी स्वप्न , काळे मेघ =))))
गोधडी जड असेल पण प्रतिसाद हलक्यात घ्या =))))
8 Feb 2023 - 11:56 am | कर्नलतपस्वी
प्रतिसाद आवडला.
काहीतरी उधडायचं
काहीतरी बुनायचं
विसाव्याचे दिवस आता
असचं काहीतरी करायचं
😀
8 Feb 2023 - 12:47 pm | राजेंद्र मेहेंदळे
विसाव्याच्या दिवसात प्रतिभा एव्हढी उफाळुन आलेय तर उमेदीच्या दिवसात काय असेल?
8 Feb 2023 - 1:57 pm | आंद्रे वडापाव
उमेदीच्या दिवसात, कदाचित .. त्यांच्या बाईकच्या, मागच्या अर्धी सीटवर, कधीच धूळ जमत नसेल ...
16 Feb 2023 - 1:46 pm | प्राची अश्विनी
वाह!