कुंभमेळा क्रांती · Fri, 10/25/2019 - 06:00 · दिवाळी अंक मिपा दिवाळी अंक २०१९ अनुक्रमणिका कुंभमेळा अरुण परतता की चंद्र मंदावलेला इथुनतिथुन साऱ्या सारख्या दु:खवेळा जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे, चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा कलकलकल वाहे द्वेषगंगा विखारी दुरुन निघुन जाता पावले खेचणारी नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही खळबळत उराशी पातके येति सारी घणघणघण घंटा वाजती यातनांच्या ठणकठणक झांजा पाशवी वासनांच्या कलकलत पिशाच्चे वेढती जीवनाला किरकिरत सभोती सावल्या भावनांच्या अनवरत मनाला आस खंतावण्याची प्रखर तमतळाशी जात मंदावण्याची भिजुन विझुन गेली चेतना, जिद्द मेली अबल क्षत परांनी उंच झेपावण्याची विटत सुकत गेला निश्चयाचा तजेला अगणित तमछाया घेरती जाणिवेला जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे, चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा अनुक्रमणिका वाचन 5239 प्रतिक्रिया 0