Skip to main content

कुंभमेळा

लेखक क्रांती यांनी शुक्रवार, 25/10/2019 06:00 या दिवशी प्रकाशित केले.

मिपा दिवाळी अंक  २०१९

अनुक्रमणिका


कुंभमेळा




अरुण परतता की चंद्र मंदावलेला इथुनतिथुन साऱ्या सारख्या दु:खवेळा जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे, चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा
कलकलकल वाहे द्वेषगंगा विखारी दुरुन निघुन जाता पावले खेचणारी नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही खळबळत उराशी पातके येति सारी
घणघणघण घंटा वाजती यातनांच्या ठणकठणक झांजा पाशवी वासनांच्या कलकलत पिशाच्चे वेढती जीवनाला किरकिरत सभोती सावल्या भावनांच्या
अनवरत मनाला आस खंतावण्याची प्रखर तमतळाशी जात मंदावण्याची भिजुन विझुन गेली चेतना, जिद्द मेली अबल क्षत परांनी उंच झेपावण्याची
विटत सुकत गेला निश्चयाचा तजेला अगणित तमछाया घेरती जाणिवेला जिथुन हरवले मी आणि अस्तित्व माझे, चिरविव्हल व्यथांचा जन्म हा कुंभमेळा

20191016-122815
अनुक्रमणिका

वाचने 5250
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

नितळ निखळ पाणी शोधता ठाव नाही खळबळत उराशी पातके येति सारी खुप सुरेख!

वृत्तबद्ध कविता हल्ली फार कमी वाचायला मिळतात. अप्रतिम रचना झालेली आहे. हे अगदी ओळखीचे वृत्त आहे (वदनि कवळ घेता... किंवा .... कलकलकल हंसे फार केले सुटाया...) परंतु त्याचे नाव विसरलो आहे. कृपया कळवावे.