✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मुंग्या साखरेचे दाणे फेकून का मारत नाहीत? भाग ३/३ (आकारमानाने पडणारे फरक)

प
पुष्कर यांनी
Fri, 01/25/2019 - 19:36  ·  लेख
लेख
पूर्वपीठिका सध्या मी राहतो तिथे उन्हाळा चालू आहे. दक्षिण गोलार्धात असल्यामुळे इथले ऋतू आपल्यापेक्षा उलटे चालतात. त्यामुळे सध्या जिकडे तिकडे भसाभस मुंग्या अन्नाच्या शोधार्थ बाहेर पडत आहेत. लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या मुंग्यांची मजा बघत बसणे हा एक आवडता छंद झाला होता. घरात कुठे मुंग्या लागल्या असतील तर त्यांची रांग बघत बघत मूळ स्रोत शोधायचा प्रयत्न करणं, रांगेच्या मध्येच बोटाने पुसून त्यांची रांग अस्ताव्यस्त करणं, मुंग्यांच्या भोवती पाणी शिंपडून त्याचं वर्तुळ करणं आणि मुंग्यांना हा भवसागर पार करून जाता येतं का ते पाहणं - असले अनेक उद्योग तेव्हा केलेत! अन्नाची तजवीज म्हणून मुंग्या डोक्यावर साखरेचे कण घेऊन जाताना पाहिलं आहे. त्यांना एकमेकीशी भांडताना सुद्धा पाहिलं आहे. पण कधीतरी प्रश्न पडायचा की ह्या एकमेकींना साखर फेकून का मारत नाहीत? तसा तेव्हा फार काही सखोल विचार केला नव्हता! तसं कधी वाघ - सिंह वगैरे मंडळी पण एकमेकांना काही फेकून मारत असल्याचं ऐकलं नाहीये. पण मुळात त्यांना हाताने (किंवा पायाने) काही जड वस्तू अशी उचलतानाच पाहिलेलं नाहिये, त्यामुळे फेकायचा प्रश्नच नाहिये. मुंग्या मात्र त्यांच्या स्वतःच्या वजनापेक्षा जास्त वजनाचा साखरेचा कण लीलया उचलतात, त्यामुळे त्यांच्याकडे हे पोटेन्शियल असलं पाहिजे, असं कधीतरी डोक्यात चमकून गेलं असेल. नंतर इंजीनियरिंग करत असताना हा विचार पुन्हा चालू झाला आणि थोडंफार वाचन केल्यावर काही उत्तरं सापडत गेली. त्या उत्तराचा प्रवास मी इथे ३ भागांमध्ये देत आहे. पैकी पहिला भाग हा लहान आणि मोठे जीव ह्यात काही आकारामुळे फरक असतो का, ह्या मूळ प्रश्नाशी निगडित आहे. त्यातल्या काही गमती जमतींमधून कळलेल्या आणखी काही गोष्टी भाग २ मध्ये आणि ह्या दोन्हींमधून कळलेल्या विज्ञानाचा परिपाक म्हणून कळालेलं उत्तर शेवटच्या भागात आहे. हा लेख २०१५-१६ मध्ये महाराष्ट्रातील काही शाळांमध्ये एका वाचन-प्रकल्पाचा भाग म्हणून वापरण्यात आला आहे. या भागापूर्वी पार्श्वभूमीकरिता कृपया भाग १ आणि २ वाचणे. भाग ३ - अंतिम मागच्या भागांमध्ये आपण पाहिलं की प्राणी हे वेगवेगळ्या आकाराचे (size) असताना निसर्गाने त्यांना वेगवेगळं रूप (shape) कसं दिलं आहे, किंवा त्यांना वेगवेगळ्या रूपांची का आवश्यकता आहे. पण आपल्याला कधी असा प्रश्न पडतो का, की या वेगवेगळ्या आकारांच्या प्राण्यांना आजुबाजूचं विश्व हे आपल्याला दिसतं तसंच दिसतं का? त्यांना हालचालीसाठी तेवढेच कष्ट पडतात का जेवढे आपल्याला पडतात? अगदी सगळ्या गोष्टींची उत्तरं मलाही माहित नाहीत, पण यातल्या काही विषयांवर आपण गप्पा मारू. कदाचित त्यातून काही उत्तरं समजतील, काही सुचेल! या भागात जरा size आणि shape बद्दल लिहिलेलं आहे. पंचाईत अशी की मी नुसतं 'आकार' म्हटलं तर मराठीत हा शब्द size आणि shape दोन्हीसाठी वापरतात. म्हणजे लहान/मोठा आकार असंही म्हणतात आणि वर्तुळाकार - असंही म्हणतात. shape साठी काहीवेळा आकृती हा शब्द वापरतात, पण मी 'प्राण्याची आकृती' म्हटलं तर तो shape न वाटता figure या अर्थाने घेतला जाईल. त्यामुळे मी संपूर्ण लेखात आकार हा शब्द size साठी आणि रूप हा शब्द shape साठी वापरला आहे, हे कृपया ध्यानात असू द्या. तर मागच्या भागात ज्या हॅल्डेन काकांबद्दल आपण वाचलं, त्यांनी प्राण्यांचे आकार आणि रूप यांचा भरपूर अभ्यास केला होता. त्यांच्याप्रमाणे 'स्टीवन व्होगल' हा असाच एक संशोधक. सध्या तो ड्युक विद्यापीठ (अमेरिका) येथे जीवशास्त्राचा प्राध्यापक आहे. त्याने लिहिलेली काही पुस्तकं खूप मस्त आहेत. त्यातलं 'Life's devices - The physical world of animals and plants' हे पुस्तक तर वर लिहिलेल्या काही प्रश्नांवर अफलातून उहापोह करतं. म्हणजे मोठ्या प्राण्यांमध्ये हाडांचं प्रमाण जास्त का असतं, मुंग्या चावू शकतात पण मारू का शकत नाहीत, पेशींची रचना ठराविक प्रकारची असूनही प्राण्या-प्राण्यांमध्ये एवढे फरक का वगैरे वगैरे. व्होगलने पुस्तकाची सुरुवातच प्राण्यांच्या आकारापासून केली आहे. तुम्ही जगातल्या एकूण प्राण्यांचा आकार पाहत गेलात तर असं दिसून येईल की छोट्यातला छोटा प्राणी म्हणजे काही एकपेशीय जीव किंवा सूक्ष्मजीव हे साधारण ०.३ मायक्रॉन आकाराचे असतात. इथे लक्षात घ्या, की एक मायक्रॉन म्हणजे एका मिलीमीटरचा १००० वा भाग! त्यापेक्षाही हा प्राणी लहान. त्यापेक्षा थोडे मोठे जीव म्हणजे ते सुद्धा काही मायक्रॉन आकाराचे! त्यापेक्षा आणखी आणखी मोठे म्हणजे मिलीमीटर मध्ये मोजण्यासारखे जीव म्हणजे मुंग्या, ढेकुण, माश्या वगैरे. त्यापेक्षा मोठे सेंटीमीटर मधले म्हणजे फुलपाखरं, भुंगा, काही छोटे मासे, त्यापेक्षा साधारण दहा पट मोठे म्हणजे मोठे मासे, उंदीर, घूस, ससा, खार, कुत्रा वगैरे. त्याच्या आणखी दहा पट मोठे म्हणजे मीटरमध्ये मोजता येण्यासारखे माणूस, घोडा, बैल, वाघ, साप वगैरे आणि त्याच्यापेक्षा मोठे म्हणजे जिराफासारखे उंच प्राणी आणि सगळ्यात मोठा प्राणी (झाडं तूर्तास बाजूला ठेऊया) म्हणजे व्हेल किंवा देवमासा, ज्याची लांबी ३० मीटर पर्यंत असू शकते. बघा, म्हणजे ही लांबी सर्वात छोट्या प्राण्याच्या साधारण १०,००,००,००० पट आहे!!! सगळ्या प्राण्यांची त्यांच्या आकारानुसार वर्गवारी केली तर लक्षात येईल की माणूस हा तसा आकाराने फारच मोठा प्राणी आहे! सोयीकरिता माणसाची उंची ५ फूट, म्हणजे १५० सेंटीमीटर धरली तरी ती लहानातल्या लहान प्राण्याच्या ५०,००,००० पट होईल. अगदी त्या झीरो सिनेमातील बुटक्या दाखवलेल्या हिरोची उंची लहानातल्या लहान प्राण्याच्या ३०,००,००० पट भरेल! (आता सांगा नक्की झीरो कोण?) आपण प्राण्यांची ही वर्गवारी १०-१० च्या पटीने करू. म्हणजे लक्षात येईल. थोडक्यात, १ मायक्रॉनपेक्षा लहान - पहिला वर्ग, १ ते १० मायक्रॉन - दुसरा वर्ग, १० ते १०० - तिसरा वर्ग, १०० मायक्रॉन ते १ मिमी - चौथा, १ मिमी ते १ सेंमी - पाचवा, १ सेंमी ते १० सेंमी - सहावा, १० सेंमी ते १ मीटर - सातवा, १ ते १० मीटर - आठवा, १० ते १०० मीटर नववा. ह्यात माणूस आठव्या वर्गात येतो. लहान बाळं (आणि झीरो) सातव्या वर्गाच्या शेवटी-शेवटी येतात. म्हणजे आपण खूपच अवाढव्य आहोत! पृथ्वीवर प्राण्यांच्या आकाराची सरासरी साधारण काही मिलीमीटरमध्ये येईल. म्हणजे सरासरी प्राण्यांना आपण माणसं फारच मोठे वाटत असू, नाही का? मग या आकारानुसार त्यांच्या शरीराच्या बांधणीत फरक पडत तर असणारच, कारण मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे मोठ्या प्राण्यांना हाडं जास्त असावी लागतात. हा जसा फरक त्यांच्या शरीराच्या आतल्या रचनेबद्दल आहे, तसं शरीराच्या बाहेर वातावरणाचे परिणाम पण वेगवेगळे असतील का? याबद्दल हॅल्डेनने खूप मस्त उदाहरण दिलं आहे, जे व्होगलने त्याच्या पुस्तकात आणखी रंजक तऱ्हेने मांडलं आहे. sizes चित्र १: वेगवेगळ्या आकाराचे प्राणी/जीव (विकीपिडीयाच्या सौजन्याने) व्होगल काय म्हणतो? तर आपण जर वेगवेगळ्या आकाराचे प्राणी घेतले आणि त्यांना वेगवेगळ्या उंचीवरून खाली जमिनीवर पाडलं तर काय होईल? आता प्रत्येक प्राण्याचा आकारही (size) वेगळा आणि पाडण्याची उंचीही वेगळी ठेवली तर आपल्याला त्या निरीक्षणांचा अर्थ लावणं अवघड जाईल, त्यामुळे आपण असं करू, की प्राण्यांना ज्या उंचीवरून पाडू, त्या उंचीला त्या प्राण्याच्या आकाराने (किंवा उंचीने) भागायचं. म्हणजे काय? तर १.५ फूट उंचीचा एखादा कुत्रा जर ६ फूट उंचीवरून खाली सोडला, तर तो त्याच्या स्वत:च्या उंचीच्या साधारण ४ पट उंचीवरून पडला असं म्हणता येईल. ५ सेंमी उंचीचा उंदीर जर २० सेंमीवरून पडला तर तो सुद्धा स्वत:च्या उंचीच्या साधारण ४ पट उंचीवरून पडला असं म्हणता येईल. म्हणजे इथे प्राण्यांची पडण्याची उंची वेगवेगळी असली तरी त्यांच्या स्वतःच्या उंचीच्या पटीत ती सारखी आहे. म्हणजे इथे आपल्याला तुलनेला जास्त वाव आहे. आता पुढची निरीक्षणं ही ह्या उंची-पटीच्या दृष्टीने लक्षात घ्या. हत्ती हा अवाढव्य प्राणी अगदी कमी उंचीवरून जरी पडला तरी त्याची हाडं मोडतात. त्यापेक्षा लहान घोडा, हा स्वत:च्या उंचीएवढ्या उंचावरून सुरक्षितरित्या पडू शकतो, पण फार जास्त नाही, नाही तर तो पण मोडेल. 'मोडेन पण वाकणार नाही' म्हणणारा माणूस हा साधारणपणे स्वत:पेक्षा दुप्पट/तिप्पट उंचीवरून न मोडता पडू शकतो (जमिनीवर हा, नाहीतर म्हणाल आम्ही पाण्यात उंचावरून सूर मारतो). कुत्रा आणखीन जास्त पट उंचीवरून पडू शकतो. उंदीर तर कित्येक पट, म्हणजे अगदी दुमजली इमारतीच्या गच्चीवरून जरी पडला, तरी त्याला छोटासा शॉक बसल्यासारखा वाटतो, पण बाकी तो अगदी व्यवस्थित असतो. मुंगी तर हवेवर कुठेही अलगद तरंगत पडू शकते आणि त्यापेक्षा लहान प्राणी तर आपल्या हवेत पडतच नाहीत, वाहत वाहत कुठे तरी जातात. आता इथे तुमच्या डोक्यात नक्कीच मांजराचं उंचावरून पडणं आलं असणार. पण ते उदाहरण मुद्दाम घेतलं नाही, कारण मांजराची वैशिष्ट्यपूर्ण शरीररचना आणि त्यामुळे उंचावरून पडल्यावर हाडांवर येणारा तुलनेने कमी दाब किंवा इम्पॅक्ट - हे जरा वेगळं प्रकरण आहे. आता प्रश्न असा पडतो, की जरी हे मुंगीसारखे लहान प्राणी अगदी म्हणजे अगदीच हलके असले, तरी ते खाली हळूहळू का पडतात? गुरुत्वाकर्षण तर सर्वांना समान आहे आणि ते वजनाशी निगडीत नसतं. दोन भिन्न वजनांच्या वस्तूंवर असलेलं त्वरण (acceleration=g) जर सारखंच असेल, तर त्या हवेत सोडल्यावर सारखाच वेग गाठतील (किंवा सारख्याच तर्‍हेने वाढवत नेतील) आणि एकाच वेळात ठराविक अंतर गाठतील. गॅलिलिओने म्हणे पिसाच्या मनोऱ्यावरून दोन वेगळ्या वजनाच्या वस्तू एकाच वेळात कश्या जमिनीवर पडतात हे सप्रमाण सिद्ध केलं होतं. हाच प्रयोग नुकताच नासानेही करून दाखवला आहे. मग इथे आपल्या निरीक्षणात काय चुकतंय? इथे महत्त्वाचं आहे ते वातावरण. वातावरणात हवा आहे आणि ती कुठल्याही हालचालीला विरोध करते. जसं कुठल्याही पृष्ठभागावर एखादी वस्तू सरकवताना त्यातलं घर्षण हे त्या सरकवण्याला विरोध करतं तसंच. आपणसुद्धा जेव्हा इकडे तिकडे हालचाल करतो, तेव्हा आपल्या आजूबाजूच्या हवेच्या कणांशी आपलं घर्षणच होत असतं आणि त्यामुळे आपल्याला जास्तीचा जोर लावावा लागतो. या हवेच्या कणांनी केलेला अवरोध हा वस्तू/प्राण्याचा आकार, त्याचा गुळगुळीतपणा, त्याचं रूप अश्या अनेक बाबींवर बदलतो. केवळ आकाराच्या दृष्टीने बघायचं झालं तर तो पृष्ठफळावर अवलंबून असतो. आपण मागच्या भागात पाहिल्याप्रमाणे मोठ्या प्राण्यांचे आकार घन-पटीने (scaled with the cube of a side) वाढले तरी त्यांचं पृष्ठफळ वर्ग-पटीने (scaled with the square of a side) वाढतं. त्यामुळे पृष्ठफळ/वजन हे गुणोत्तर मोठ्या प्राण्यांमध्ये फार कमी असतं. त्यामुळे आपल्यासारख्या मोठ्या प्राण्यांसाठी हवेचं घर्षण वजनापेक्षा इतकं छोटं आहे, की तो जास्तीचा जोर आपल्याला जाणवत पण नाही. पण तेच जेव्हा आपण पाण्यामध्ये जातो तेव्हा फरक जाणवतो. पाण्यात कधी चालला असाल तर तुमच्या लक्षात येईल की तिथे जास्त जोर लावावा लागतो. तेच जर आपण तेलात चाललात तर आणखी जास्त जोर लावावा लागेल. आता याचा त्या द्रवपदार्थाच्या 'जडपणाशी' संबंध नाही बर का. तेल हे पाण्यापेक्षा हलकं असतं तरी त्यात हालचाल करायला जास्त जोर लावावा लागतो. एखादा चमचा पाण्यात हलवायला जेवढा जोर लागतो त्यापेक्षा जास्त जोर गोडेतेल ढवळायला लागतो. ह्याचा संबंध त्या द्रवाच्या कणांच्या होणार्‍या घर्षणाशी आहे आणि त्या गुणधर्माला म्हणतात 'Viscosity' (मराठीत स्निग्धता म्हणता येईल का?). आता होतं काय, की आपण हालचाल करतो तेव्हा आपण शरीराचा वेग वाढवण्यासाठी जो जोर लावतो त्याला म्हणतात inertial force. आपण विश्रामस्थिती मध्ये किंवा कुठलीही हालचाल नसताना आपला वेग शून्य असतो, तो आपल्याला वाढवून हालचाल सुरु करायची असते, त्यासाठी लागतो तोच तो जोर - inertia. आणि ह्या हालचालीला आजुबाजूचा द्रव किंवा वायू जे viscosity मुळे विरोध करतं तो लावलेला उलटा जोर किंवा अवरोध म्हणजे viscous force. आता हा inertial force आपल्या वजनावर किंवा वस्तुमानावर आणि त्वरण (acceleration) वर अवलंबून असतो. न्युटनचं सुप्रसिद्ध सूत्र आहे, "F=m.a". प्राण्याचं वस्तुमान (m=mass) जास्त तर त्याचा inertial force देखील जास्त. viscous force हा प्राण्याच्या पृष्ठफळावर अवलंबून आहे. लक्षात घ्या, की लहान प्राण्यांचं पृष्ठफळ सुद्धा कमी असलं तरी त्यांचं पृष्ठफळ/वजन हे गुणोत्तर खूप जास्त आहे. म्हणजेच ते प्राणी जितपत inertial force लावू शकतील त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात त्यांच्यावर viscous force अवरोध लागतो. सांगायची गोष्ट, की मोठ्या प्राण्यांचा inertial force हा इतका जास्त असतो की त्यांना आजूबाजूच्या हवेचा viscous force जाणवतसुद्धा नाही. पण आकाराने लहान जीवांना बिचाऱ्यांना काही inertial force जास्त लावता येत नाही. तिथे viscous force फार जाणवतो. आपल्याला पाण्यातून चालताना जसे कष्ट पडतात तसे कष्ट छोट्या जीवांना साध्या हवेत सुद्धा पडतात. म्हणून मग त्यांच्या शरीराची हालचालीची यंत्रणासुद्धा वेगळीच असते. ते असो. आता लक्षात घ्या, की हे प्राणी जेव्हा एखाद्या उंचीवरून पडतात, तेव्हा त्यांच्यावर खालच्या दिशेने लागू होणारं गुरुत्वीय त्वरण सारखंच आहे. परंतु त्यांच्या आकारावर अवलंबून त्या त्वरणाला होणारा viscous अवरोध वेगवेगळा आहे. म्हणजे वरून खाली वजन = mg हा inertial force आणि खालून वर viscous force असे दोन परस्पर विरोधी बल लागतात. आता वर म्हटल्याप्रमाणे हत्तीसारख्या प्राण्यांसाठी viscous force हा वजनापेक्षा फारच कमी आहे, त्यामुळे ते खाली पडतात. तेच मुंगीच्या बाबतीत viscous force जवळपास तिच्या वजना-इतकाच असतो, त्यामुळे हवेत एखाद्या उंचीवर त्या तरंगतात. हवेचा झोत कमी झाला तर viscous force सुद्धा थोडासा कमी होतो आणि त्या कधीतरी खाली पडू शकतात. ह्या inertia force मुळे मोठ्या प्राण्यांना एखादी गोष्ट फेकून मारणं पण शक्य होतं. आपण दगड फेकताना एक ठराविक वस्तुमानाचा दगड उचलतो आणि त्यावर त्वरण लावतो म्हणजे त्याचा वेग शून्यापासून वाढून एक ठराविक वेग गाठला जाईल. म्हणजेच आपण त्या दगडाचा m गुणिले त्याचं त्वरण a = inertial force लावतो. त्या मानाने हवेचा viscous force फार लहान असतो. इथे आपण दगडावर किती त्वरण लावू शकू हे आपल्या स्नायूंच्या ताकदीवर आणि मुख्यतः त्यांच्या आकारावर अवलंबून आहे. पण लहान प्राणी त्या आजूबाजूच्या viscous force ला तोडीस तोड तेवढा inertial force एखाद्या वस्तूवर लावू शकत नाहीत, त्यामुळेच मुंग्या एकमेकींशी कितीही भांडू लागल्या तरी एकमेकींना कधी साखरेचे दाणे फेकून मारत नाहीत. त्यांना शक्यच नाही ते! ants stoneput
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
विज्ञान
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
13276 वाचन

💬 प्रतिसाद (25)

प्रतिक्रिया

तीनही भाग एकसलग वाचून काढले,

यशोधरा
Sat, 01/26/2019 - 08:08 नवीन
तीनही भाग एकसलग वाचून काढले, अतिशय आवडले. तुमची लिहायची पद्धत देखील छान आहे. एक वेगळाच विषय घेऊन केलेल्या सुरेख लेखनासाठी आभार.
  • Log in or register to post comments

मनापासून आभार

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:26 नवीन
मनापासून आभार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सुरेख लेखन पद्धत. तीनही भाग

वकील साहेब
Sat, 01/26/2019 - 10:12 नवीन
सुरेख लेखन पद्धत. तीनही भाग वाचनीय. वाचनखून साठवली आहे
  • Log in or register to post comments

मनापासून आभार

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:27 नवीन
मनापासून आभार वकील साहेब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वकील साहेब

तिनही भाग मस्त झाले आहेत.

ज्ञानोबाचे पैजार
Sat, 01/26/2019 - 11:14 नवीन
तिनही भाग मस्त झाले आहेत. मुंग्यांना काही फेकून का मारु शकत नाहीत हे कळले पण हत्ती किंवा जिराफ ही काही फेकताना दिसत नाहित. फेकण्याची प्रवॄती फक्त माणूस, गोरीला किंवा इतर माकडांमधे दिसते. असे का? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:04 नवीन
तसं पाहिलं तर हत्ती काही प्रसंगी वस्तू, प्राणी (माणसे देखिल) उचलवून भिरकावून देऊ शकतो याची उदाहरणे आहेत. बाकी वाघ-सिंह, जिराफ वगैरे प्राणी काही फेकताना दिसत नाहीत त्याची काही कारणे खाली डॉ. म्हात्रे यांनी दिलेल्या प्रतिसादात आली आहेत. वाघ-सिंहादि प्राणी वेगाने पळू शकतात. अन्न आणि बचाव यासाठी त्यांची नखे, दात, स्नायूंची ताकद, वेग - हे सर्व उपयोगात येतात. त्यामुळे त्यांना गरज नसल्यामुळे फेकून मारण्यासाठी शारिरिक अवयव तसे विकसित झाले नसावेत. जिराफाचा बचावात्मक पवित्रा काय असतो याचा माझा अभ्यास नाही. आता फेकून मारण्यासाठी शरीररचना कशी हवी ते बघू. फेकून मारताना आपण त्या वस्तूचा वेग शून्यापासून ठराविक वेगापर्यंत वाढवतो. हे त्वरण लावण्यासाठी आपण हाताचा मूमेंट-आर्म सारखा वापर करतो. मूमेंट = फोर्स गुणिले मूमेंट आर्मची लांबी. वस्तू हातातून सुटताना त्यावर जेवढी मूमेंट असेल त्या प्रमाणात तिचा वेग कमी/जास्त असेल. (मूमेंट चं रूपांतर लिनियर मूमेंटम = वस्तुमान गुणिले वेग असं होतं). आता लक्षात येईल की, जेवढी मूमेंट आर्मची लांबी जास्त, तेवढा मूमेंट जास्त आणि तेवढा वेग जास्त. जर हा वेग फारच कमी असेल तर फेकलेली वस्तू सरळ न जाता गुरुत्वाकर्षणाने खालच्या दिशेने लवकर जाईल. आता वाघ - सिंहादि प्राण्यांचे हात-पाय (पायच) किती कमी लांबीचे असतात लक्षात घ्या. जिराफ एका पायाने त्वरण लावेल असा त्याला तो वाकवता येतो का ते पहा. कदाचित तो लाथेने एखादी वस्तू उडवून लावू शकत असला पाहिजे, असा माझा अंदाज आहे, त्या अर्थाने ते फेकणे झाले (अर्थात आपल्या 'वस्तू धरून' फेकण्याची तुलना याच्याशी होऊ शकत नाही). माणूस आणि माकडांचे हात त्यांच्या एकूण उंचीच्या तुलनेने साधारण १/३, म्हणजे बरेच लांब असतात. अवांतरः आता या वर्णनावरून हात कोपर्‍यात वाकलेला ठेऊन बॉलिंग करणे आणि सरळ हात खांद्यातून गोल फिरवून ओव्हर-आर्म बॉलिंग करणे यात दुसरी पद्धत का जास्त वेगकारक आहे हे लक्षात येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

आणखी

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:06 नवीन
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हत्ती देखिल वस्तू भिरकावताना सोंडेने, म्हणजे त्याच्या सगळ्यात लांब मूमेंट आर्मने भिरकावतो. पायाने नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर

सुंदर लेखमाला. भौतिक-जीव

डॉ सुहास म्हात्रे
Sat, 01/26/2019 - 11:55 नवीन
सुंदर लेखमाला. भौतिक-जीव-शास्त्रातील काही तत्वे सोप्या शब्दांत सांगण्याची हातोटी तुमच्याकडे आहे. मुंग्या किंवा आणि इतर बरेच प्राणी साखरेचे कण, दगड किंवा इतर कोणतीही गोष्ट फेकून मारत नाहीत. ते करता येण्यासाठी तुम्ही सांगितलेल्या भौतीक कारणाबरोबरच इतर दोन क्षमताही आवश्यक आहेत... १. शरीररचना : एखादी वस्तू फेकून मारण्यासाठी ती वस्तू उचलून भिरकावण्यासाठी आवश्यक असणारी शारिरीक क्षमता असणारी शरीररचना (मुख्यतः अवयवांची रचना व स्नायूंची ताकद). ही क्षमता नसल्यामुळेच वाघ-सिंह कितीही ताकदवान असले तरी दगड उचलून फेकू शकत नाहीत. मात्र, हत्ती सोंडेने एखादी वस्तू उचलून फेकू शकतो. २. बुद्धीचा विकास : एखाद्या वस्तूचा साधन (tool) म्हणून उपयोग करण्याची क्षमता असलेला मेंदू. ही क्षमता मानवात फार विलक्षण प्रमाणात विकसित झाली आहे; इतकी की केवळ निसर्गात उपलब्ध असलेली (दगड, झाडांच्या फांद्या, इ) साधनेच नव्हे तर तो नैसर्गिक व अनैसर्गिक वस्तू वापरून स्वतः बनवलेली बनवलेली साधनेही उपयोगात आणतो. इतर काही प्राण्यांतही नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या वस्तूंना साधनांच्या स्वरूपात वापरण्याची क्षमता मूलभूत/छोट्या प्रमाणात दिसते. थोडक्यात, वरील सर्व तीन गोष्टींबद्दलची क्षमता ज्या प्राण्यांत जितकी विकसित झालेली आहे, तेच प्राणीच तितक्या प्रमाणात वस्तू फेकू शकतात / फेकून मारू शकतात.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:08 नवीन
अतिशय समर्पक उत्तर आणि प्रतिसाद! तुम्ही लिहिलिल्या मुद्दा १ मधली शरीररचना म्हणजे नक्की काय आणि तिचा फेकणे या कृतीवर कसा फरक पडतो, हे मी आता वरच्या प्रतिसादात सविस्तर करून लिहिले आहे. तुमचा आणि माझा हे दोन्ही प्रतिसाद एकमेकांस पूरक व्हावेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर झाली लेखमाला.

अर्धवटराव
Mon, 01/28/2019 - 08:46 नवीन
मुंग्या आपल्या शारीरीक वजनाच्या कित्येकपट जास्त वजन वाहुन नेऊ शकतात. त्यामुळे प्रॉब्लेम शक्तीचा नसुन, वर म्हात्रेसाहेब म्हणतात तसं, फेकुन मारायला आवश्यक शरीररचनेचा आहे असं वाटतं.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:19 नवीन
दोन्ही प्रश्न शक्तीचेच आहेत. फक्त या शक्तिची रूपे वेगवेगळी आहेत. भार वाहून नेताना तेवढी स्थितिज ऊर्जा लागते. मुंगीच्या शरीरावर दबावात्मक भार (कॉम्प्रेसिव फोर्स) येतो. तो सहन करायची ताकद ही वेगळी आहे. फेकून मारताना गतिज ऊर्जा द्यावी लागते, ती ताकद वेगळी आहे. आपण देखिल ज्या वस्तू फेकतो, त्याचं वजन आपल्या वजनाच्या तुलनेत काहीच नाही, पण आपण खूप जास्त जड वस्तू उचलून धरू शकतो. आता आपल्या दृष्टिने हलकी वस्तू हवेच्या दृष्टिने जड आहे, त्यामुळे फरक पडत नाही, पण मुंगी जर तिच्यापेक्षा हलकी वस्तू फेकू लागली तर हवेपेक्षा हलकी असून तिला हवेचा अवरोध देखिल फेकण्यापासून रोखेल - हे आणखी एक कारण झाले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अर्धवटराव

शस्त्र किंवा साधन वापरणारे

कंजूस
Mon, 01/28/2019 - 10:00 नवीन
शस्त्र किंवा साधन वापरणारे प्राणी फारच कमी आहेत. ते फेकून मारणारे कमीच. एक पक्षी लिंबाएवढा दगड चोचीने उचलून आकाशाकडे तोंड करून खाली अंड्यावर ( दुसऱ्या पक्षाच्या)जोरात आदळून फोडतो. त्याची मान तशी भरकन वळते.
  • Log in or register to post comments

भारी!

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:11 नवीन
हे इंटरेस्टिंग आहे! ह्यात तो पक्षी आडव्या दिशेने काही फेकत नसून गुरुत्वाकर्षणाने मिळणार्‍या नैसर्गिक त्वरणाचा उपयोग उभ्या (खालच्या) दिशेने सोडायच्या शस्त्रासाठी करतो आहे. (म्हणजे हा 'थ्रो' नसून 'ड्रॉप' आहे). तो हे कसे शिकला असेल हे बघणे रोचक असावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अरेच्चा, नाही

पुष्कर
Mon, 01/28/2019 - 10:22 नवीन
तुमचं बरोबर आहे. तो मान जर भर्र्कन वळवत असेल, तर तो मानेचा मूमेंट आर्म सारखा वापर करतो. म्हणजे तो स्वतः देखिल काही प्रमाणात त्वरण लावतो. जोडीला गुरुत्वाची मदत होते. मला हे उदाहरण फारच आवडलं आहे. लगेच माहिती शोधतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पुष्कर

माहिती

पुष्कर
Tue, 01/29/2019 - 11:32 नवीन
आत्ता थोडी माहिती वाचली. काही पक्षी, विशेषतः ऑस्ट्रेलियातले, उपकरणे/साधने वापरत असल्याचे आढळून आले आहे. चिझोम नावाच्या संशोधकाचा १९५४ सालचा आइबीस मधला लेख वाचनीय असावा. मला फक्त पहिले पानच मिळाले. पूर्ण लेख मिळाल्यास पाहतो. 'ब्लॅक ब्रेस्टेड बझर्ड' आणि 'इजिप्शियन वल्चर' हे पक्षी इमू किंवा इतर पक्ष्यांची अंडी दगड/खडा फेकून तोडण्यात वाकबगार असल्याचे आढळून येते असे अनेकांचे निरिक्षण आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

तुमची विषय सोप्पा करून

अनिंद्य
Tue, 01/29/2019 - 11:18 नवीन
तुमची विषय सोप्पा करून सांगायची हातोटी विलक्षण आहे. प्रणाम गुरुदेव _/\_ प्रतिसादांतूनही विचारांना चालना मिळते आहे, ही मालिका उत्तम होणार !
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
Wed, 01/30/2019 - 07:00 नवीन
उलट मीच तुमच्या 'डामाडुमा' सिरीझचा फॅन आहे. पुढचे भाग कधी येतायत याची वाट बघतोय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

न्यूजनेशन चानेलवर रोज दोनदा (

कंजूस
Tue, 01/29/2019 - 12:38 नवीन
न्यूजनेशन चानेलवर रोज दोनदा ( ११:३०; १६:३०) 'परिंदे' कार्यक्रम अर्धा तास असतो त्यामध्ये असतात मजेदार विडिओ. युट्युबवर असतं तर लिंक दिली असती.
  • Log in or register to post comments

अच्छा!

पुष्कर
गुरुवार, 01/31/2019 - 05:39 नवीन
बघतो कुठे आंतरजालावर मिळतोय का.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

अगदी पॅरॅडाईम शिफ्ट सारखं वाटलं.

चामुंडराय
Wed, 01/30/2019 - 08:50 नवीन
भारीये हि लेख मालिका. या आधी असा विचारच केला नव्हता ! अगदी पॅरॅडाईम शिफ्ट सारखं वाटलं.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

पुष्कर
गुरुवार, 01/31/2019 - 05:40 नवीन
धन्यवाद प्रतिसादाबद्दल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चामुंडराय

छान लेखमालिका

मित्रहो
Wed, 01/30/2019 - 10:11 नवीन
तीनही लेख एकत्र वाचले, सुंदर प्रकारे समजावून सांगितले.
  • Log in or register to post comments

धन्यवाद मित्रहो!

पुष्कर
गुरुवार, 01/31/2019 - 05:41 नवीन
धन्यवाद मित्रहो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मित्रहो

छान लेखन.. एखादा विषय

बाप्पू
Wed, 01/30/2019 - 19:39 नवीन
छान लेखन.. एखादा विषय समजावून सांगण्याची तुमची पद्धत आवडली..
  • Log in or register to post comments

मनापासून आभार

पुष्कर
गुरुवार, 01/31/2019 - 05:42 नवीन
सर्वांच्या प्रतिक्रियांनी हुरूप आला. आता एखादा असाच विषया घेऊन पुढचा लेख लिहायला घेईन म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाप्पू

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा