Cold Blooded - ९

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
12 Nov 2018 - 8:56 pm

रोहित अतिशय शांतपणे आपल्या आयपॅडवर काहीतरी वाचत होता.

कोलंबियातून बॅट्रॅकटॉक्सिन आणणार्‍या डॉ. मालशेंच्या असिस्टंटची सखोल चौकशी केल्यावर त्याने थेट एअरपोर्ट गाठला होता आणि मिळालेली पहिली फ्लाईट पकडून रात्री अकराच्या सुमाराला तो मुंबईत उतरला होता. फ्लाईटच्या प्रतिक्षेत असताना त्याने डॉ. रेड्डींना फोन करुन डीएनए टेस्टच्या रिपोर्ट्सची चौकशी केली तेव्हा अद्यापही काही टेस्ट्स बाकी असून दुसर्‍या दिवशी सकाळी किंवा जास्तीत जास्तं दुपारपर्यंत त्याला रिपोर्ट इमेल करण्याचं डॉ. रेड्डींनी कबूल केलं होतं. संपूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंतच्या तपासात पुढे आलेल्या माहितीची तो डॉ. मालशेंच्या असिस्टंटकडून बॅट्रॅकटॉक्सिनबद्दल मिळालेल्या माहितीशी सांगड घालण्याचा प्रयत्नं करत होता!

दुसर्‍या दिवशी सकाळी क्राईम ब्रँचमध्ये पोहोचताच रोहितने कमिशनर मेहेंदळेंची भेट घेत थोडक्यात त्यांना सगळी कल्पना दिली आणि तो आपल्या ऑफीसमध्ये आला. आपल्या ऑर्डर्लीला त्याने कदम, देशपांडे आणि नाईकना बोलावून आणण्याची सूचना दिली. त्याला सॅल्यूट ठोकून ऑर्डर्ली बाहेर पडतो तोच त्याचा मोबाईल वाजला. डॉ. रेड्डींचा फोन! त्यांच्या सर्व टेस्ट्स आटपल्या होत्या आणि रिपोर्ट त्यांनी रोहितला पाठवला होता. कदम, देशपांडे आणि नाईक घाईघाईने त्याच्या ऑफीसमध्ये आले तेव्हा तो आयपॅडवर तो रिपोर्टच पाहत होता.

"संजय, श्रद्धा, नाईक, मी सुरवातीलाच म्हणालो होतो त्याप्रमाणे हे सगळं प्रकरण विलक्षण गुंतागुंतीचं आहे!" तिघांना समोर बसण्याची खूण करत रोहितने एकदम एकेरीवर येत बोलण्यास सुरवात केली. तिघं एकदम अ‍ॅलर्ट झाले. मामला चांगलाच गंभीर होता!

रोहितने मुंबई सोडल्यापासून दिल्ली, सिमला, मंडी, कलकत्ता, अजमेर इथे केलेल्या सर्व तपासाची त्यांना तपशीलवार माहिती दिली. केसच्या दृष्टीने ते आवश्यक होतंच आणि दुसरं म्हणजे त्याच्या नजरेतून एखादा मुद्दा सुटलेला असला तर तिघांपैकी कोणीतरी तो अचूक पकडला असता! हैद्राबाद इथे डॉ. रेड्डींच्या लॅबमध्ये डीएनए टेस्टसाठी काही सँपल्स पाठवल्याचंही त्यांना सांगण्यास तो विसरला नाही, पण डॉ. मालशेंच्या असिस्टंटकडून मिळालेली माहिती सांगण्याची मात्रं त्याने घाई केली नव्हती!

"आपल्याकडे ही केस रोशनी उर्फ श्वेताची डेडबॉडी सापडल्यावर - ९ ऑक्टोबरला - आली. प्रत्यक्षात या प्रकरणाची सुरवात किमान सहा - सात महिने आधी झालेली आहे! माझ्या अंदाजाप्रमाणे महेंद्रप्रताप द्विवेदींची पत्नी मेघनाच्या मृत्यूपूर्वीच - फेब्रुवारी महिन्यापासूनच - या सगळ्या खेळाला रंग भरला असावा! मेघनाला कॅन्सर झालेला होता आणि अगदी फायनल स्टेजला होता. ती यातून वाचत नाही हे क्लिअर झाल्यावर जवाहर कौलने अखिलेश आणि श्वेता यांच्याबरोबर रोशनीच्या खुनाचा प्लॅन बनवला असावा! २५ फेब्रुवारीला मेघनाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूची बातमी रोशनीपासून लपविण्यात आली हे जवाहरचं स्टेटमेंट खरं आहे यात डाऊट नाही! एकतर मेघनाच्या मृत्यूनंतरही रोशनी सिमला सोडून दिल्लीला आलेली नाही, आणि दुसरं म्हणजे तिला सर्वात जवळच्या असलेल्या रेक्टर बहुगुणांना ही बातमी सांगितल्यावाचून ती राहिलीच नसती! अखिलेश आणि श्वेताने द्विवेदींचा पुतण्या शेखर आणि त्याची बायको प्रेरणा बनून सिमला गाठलं आणि रोशनीची भेट घेतली. तरबेज फोर्जर असलेल्या अखिलेशला त्यांच्या नावाचं पॅन कार्ड आणि लायसन्स बनवण्यात काहीच अडचण आली नसणार! आपण खरोखरच द्विवेदींचा पुतण्या असल्याबद्दल खात्री पटवण्यासाठी त्याने मेघनाला फोन करण्याचं नाटकही केलं. मेघना अर्थातच मरण पावली होती, पण प्रचंड खोकला झाल्यामुळे डॉक्टरांनी तिला बोलण्यास मनाई केली आहे अशी जवाहरने सबब सांगितल्यावर अखिलेशने खुद्दं जवाहरचीच साक्षं काढली. आता रोशनीने मेघनाबरोबर व्हिडीओ कॉल करण्याचा आग्रह का धरला नाही हा दुसरा मुद्दा, पण वर्षभरातून जेमतेम दहा - पंधरा दिवस येणार्‍या मेघनाविषयी रोशनीलाही कितपत अ‍ॅटॅचमेंट उरली होती याबद्दल मला शंकाच आहे! जवाहरनेच अखिलेशची ओळख पटवल्यावर रोशनीचा त्याच्यावर विश्वास बसला यात काहीच आश्चर्य नव्हतं! सिमल्याच्या या ट्रीपमध्येच श्वेताने रोशनी द्विवेदी या नावाने बिपिनचंद्र खेत्रपालच्या हॉस्टेलमध्ये रुमची चौकशी केली होती हे उघड आहे, पण खेत्रपालकडे तेव्हा रुम अ‍ॅव्हेलेबल नव्हती. १५ मार्चला खेत्रपालकडची रुम रिकामी झाल्यावर ती रुम ताब्यात घेण्यासाठी श्वेता पुन्हा सिमल्याला आली. रुम ताब्यात मिळाल्यावर तिने सिमला सोडलं असावं, कारण त्यानंतर ती परत आली ती थेट २४ मार्चला! दुसर्‍या दिवशी सकाळी ती पुन्हा रुमवरुन बाहेर पडली. कदाचित अखिलेश २५ तारखेला सिमल्याला पोहोचला असावा किंवा मुद्दामच एक रात्रं ते दोघं वेगळे राहिले असावेत!

२६ मार्चला अखिलेश आणि श्वेता यांनी रोशनीला हॉस्टेलमधून पिकअप केलं. त्या रात्री ते बहुधा सिमल्यातच राहिले असावे. रोशनीची हत्या करण्याचा प्लॅन पक्का झालेला असला तरी सिमल्यात तसं करणं धोक्याचं होतं. रोशनी पंधरा वर्षांपासून सिमल्यात राहत होती. तिला ओळखणारे तिथे अनेक लोक होते. अशा परिस्थितीत तिचा खून करुन बॉडी डिस्पोज ऑफ करणं आणि ती ओळखली न जाणं केवळ अशक्यं होतं! रोशनीला कोणताही संशय येण्यापूर्वी तिचा काटा काढणं आवश्यक होतं, त्यामुळे दुसर्‍या दिवशी - २७ मार्चला - दोघांनी रोशनीला मंडीला आणलं. त्याच रात्री तिचा खून करण्याचा त्यांचा प्लॅन असावा, पण काही कारणाने - बहुतेक बॉडी डिस्पोज ऑफ करण्यासाठी सोईस्कर जागा शोधण्यासाठी वेळ हवा असल्याने त्यांनी तो बेत दुसर्‍या दिवसावर ढकलला. हॉटेलमधल्या मुक्कामाला कारण म्हणून श्वेताने आपली तब्येत बिघडल्याचं नाटक केलं असावं. दुसर्‍या दिवशी २८ तारखेच्या रात्री डिनरच्या निमित्ताने त्यांनी रोशनीला हॉटेलमधून बाहेर काढलं आणि तिचा खून करुन तिची डेडबॉडी त्या घळीत टाकून दिली. त्यानंतर दोघं हॉटेलवर परतले आणि दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर त्यांनी मंडीमधून पळ काढला. मॅनेजरने चौकशी केली तेव्हा अर्जंट काम निघाल्यामुळे रोशनी दिल्लीला गेल्याची थाप मारण्यात आली."

रोहितचं बोलणं इतकं तर्कसंगत आणि तपशीलवार होतं की कदम, देशपांडे आणि नाईक तिघांच्याही डोळ्यासमोर सगळा घटनाक्रम उभा राहत होता. कदमांच्या मनात एक प्रश्नं उभा राहिला होता, पण त्याची लिंक तोडण्याची त्यांची तयारी नव्हती. सगळं ऐकून घेतल्यावर तो प्रश्नं विचारण्याचं त्यांनी स्वत:शीच ठरवलं होतं.

"मंडीहून निसटल्यावर श्वेता सिमल्याला खेत्रपालच्या रुमवर परतली आणि तिने तिथेच मुक्काम ठोकला. अखिलेशकडून रोशनीचा पत्ता कट झाल्याची पक्की खात्री झाल्यानंतरच जवाहरने 'रोशनी'चा सिमल्यातला पत्ता द्विवेदींना दिला हे अगदी उघड आहे, कारण रोशनीचा खून करुन मंडीहून निसटून २९ मार्चच्या संध्याकाळी श्वेता सिमल्याला आली आणि २ दिवसांनी, १ एप्रिलला द्विवेदी तिला भेटण्यासाठी तिथे पोहोचले होते!"

"त्या जवाहर, अखिलेश आणि श्वेताने द्विवेदींना चांगलंच एप्रिल फूल केलेलं दिसतंय साहेब!" नाईक न राहवून म्हणाले.

"द्विवेदी सिमल्याला येवून श्वेताला भेटले खरे, पण तिने त्यांच्याबरोबर मुंबईला जाण्याचं साफ नाकारलं! अर्थात हा सगळा जवाहरच्या प्लॅनचाच भाग असणार यात शंका नाही! द्विवेदींनी तिच्या बर्‍याच मिनतवार्‍या करुनही श्वेता बधली नाही. अखेर जवाहरने तिची 'समजूत' काढल्यावर ती मुंबईला जाण्यास एकदाची राजी झाली आणि द्विवेदी तिला घेवून मुंबईला परतले! मुंबईला पोहोचताच पंधरा दिवसांच्या आत श्वेताने वडाळ्याच्या त्या गोडाऊनमध्ये स्टोरेज रुम हायर केली आणि त्यानंतरच अखिलेश रुपेश सिंघानीया हे नाव धारण करुन मुंबईला पोहोचला....

मुंबईला आल्यानंतर श्वेता रेग्युलरली जवाहरच्या कॉन्टॅक्टमध्ये होती असं स्वत: जवाहरनेच कबूल केलं आहे. बहुतेक द्विवेदी आणि रेशमी यांच्यापासून फटकून राहण्याचा हा काळ असावा. जवाहरच्या दाव्यानुसार नंतर श्वेताने त्याच्याशी सगळा संपर्क तोडला असला तरी तो खोटं बोलत होता हे उघड आहे. मी जवाहरचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले आहेत. जॉन पिंटो आणि टीना पिंटो या मुंबईतल्या दोन नंबर्सवरुन त्याला रेग्युलर फोन येत होते! हे दोन नंबर्स अर्थातच अखिलेश आणि श्वेताचे होते हे उघड आहे! रेशमी आणि द्विवेदी यांचा विश्वास संपादन करण्यासाठी श्वेताने पश्चात्तापाचं आणि रेशमीशी मैत्रीचं नाटक केलं यात काहीच शंका नाही! आय हॅव अ फिलींग, फूड पॉयझनिंगमुळे रेशमीच्या आजारी पडण्यामागेही श्वेताचा हात असावा!"

"सर SS ?" तिघांनीही आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं.

"आय मिन इट! रेशमीच्या आजारपणात तिच्याशी आणखीन जवळीक साधण्याच्या हेतूने श्वेताने तिला मुद्दाम माईल्ड पॉयझन दिलं असावं, किंवा..... आय मे बी थिंकींग फार फेच्ड, पण हा कदाचित रेशमीच्या खुनाचा फसलेला प्रयत्नही असू शकतो!"

"माय गॉड सर!" देशपांडेंना त्या कल्पनेनेच धडकी भरली.

"रोशनीच्या खुनामागे उद्देश काय असेल सर?" कदमनी आपल्या डोक्यात आलेला प्रश्नं विचारला.

"द्विवेदींची प्रॉपर्टी संजय! रोशनीच्या जागी श्वेताला प्लांट करुन तिच्यामार्फत द्विवेदींची प्रॉपर्टी गिळंकृत करण्याचा जवाहरचा प्लॅन असू शकतो! मी रेशमीचा अटेम्टेड मर्डर म्हणालो ते याच कारणामुळे! रेशमीचा काटा काढल्यावर योग्य वेळ पाहून 'रोशनी' आणि 'रुपेश' यांच्या लग्नाचं नाटक वठवण्यात यावं आणि त्यानंतर शक्यं तितक्या लवकर खुद्दं द्विवेदींचा काटा काढावा अशी स्कीम असू शकते!"

"पण मग सर, श्वेताचा मृत्यू कसा झाला? तिचा खून झाला की....."

"तिचा खूनच झाला आहे श्रद्धा!" रोहित देशपांडेंचं वाक्यं मध्येच तोडत म्हणाला, "श्वेता, जवाहर आणि अखिलेश तिघांचाही खून करण्यात आला आहे. अखिलेशच्या गळ्यात घुसलेल्या या सुईवर डॉ. सोळंकींना बॅट्रॅकटॉक्सिनचे ट्रेसेस सापडले आहेत. या विषामुळेच कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट झाल्याने मिनिटभरात तो खलास झाला आहे! अखिलेश आणि जवाहर दोघांच्याही ऑटॉप्सीचा रिपोर्ट अगदी सारखा आहे, त्यामुळे जवाहरचा मृत्यूही त्या पॉयझननेच झाला असणार यात शंका नाही! इंट्रेस्टींगली श्वेताचा ऑटॉप्सी रिपोर्टही त्यांच्याशी परफेक्टली मॅच होतो आहे! तिच्या खुनातही तेच पॉयझन वापरलं गेलं आहे हे मी सेंट पर्सेंट सांगू शकतो! अल्ताफने जवाहर आणि अखिलेशच्या खुनाची कबूली दिली असली, तरी आपण श्वेताचा खून केला नाही याबद्दल तो फर्म आहे! नाऊ द क्वेश्चन इज श्वेताचा खून कोणी केला आणि तिच्या खुन्याला ते पॉयझ्न कसं मिळालं?"

थोडावेळ कोणीच काही बोललं नाही. सर्वजण आपापल्या विचारात गढून गेलेले होते

"सर..." कदमनी शांततेचा भंग करत विचारलं, "श्वेताचा मृत्यू झाला त्या रात्री ती त्या गोडाऊनवर परत आली होती आणि त्यानंतर तिथून बाहेर पडलेली नाही असं तिथल्या अटेंडंटचं स्टेटमेंट आहे. अल्ताफने श्वेताचा खून केला नसेल तर स्टोरेज रुममध्ये तिचा खून करुन वरळीला तिची बॉडी टाकणारा माणूस कोण? पाठक अ‍ॅन्ड सन्सच्या रुममध्ये असलेल्या त्या सूटकेसमधूनच श्वेताचा मृतदेह बाहेर काढला असेल सर?"

"एनिथिंग इज पॉसिबल संजय! एक मात्रं नक्की, श्वेताचा खून ते पॉयझन वापरुनच झालेला असला तरी जवाहर आणि अखिलेशप्रमाणे रिव्हॉल्वरमधून नीडल मारून नक्कीच केलेला नाही, कारण श्वेताचा मृत्यू ८ - ९ ऑक्टोबरच्या रात्री झाला आहे तर शाकीब जमालला रिव्हॉल्वर्स बनवण्याची ऑर्डर १४ ऑक्टोबरला देण्यात आली आहे! याचा अर्थ दुसर्‍या कोणत्या तरी मार्गाने तिच्या शरीरात ते पॉयझन गेलं आहे!"

"या तिघांनाही - श्वेता, अखिलेश आणि जवाहर - मारण्यामागचा मोटीव्ह काय असेल सर?" देशपांडेनी प्रश्न केला, "अल्ताफला जवाहर आणि अखिलेशची सुपारी देण्यात आली होती आणि त्याप्रमाणे त्याने त्या दोघांचा खून केला, पण श्वेताचा खून कोणी केला? तिचा खून करणारी आणि अल्ताफला सुपारी देणारी व्यक्तीच या सगळ्या प्रकरणामागे असणार, पण ती व्यक्ती कोण असेल सर?"

"अ‍ॅट द मोमेंट, माझ्यादृष्टीने या केसशी संबंधीत असलेली प्रत्येक व्यक्ती सस्पेक्ट आहे श्रद्धा! बट बिफोर वी गेट टू दॅट, सर्वात महत्वाचा प्रश्नं आहे तो म्हणजे श्वेताचा खून झाला तो श्वेता म्हणून झाला का रोशनी द्विवेदी म्हणून?"

तिघंजण त्याच्याकडे पाहतच राहिले.

"श्वेताचा खून श्वेता म्हणूनच झाला असेल," रोहित खुलासा करत म्हणाला, "तर त्यामागचा मोटीव्ह आणि सस्पेक्ट्स वेगळे ठरतील आणि जर रोशनी द्विवेदी समजून तिला मारण्यात आलं असेल, तर मोटीव्ह आणि सस्पेक्ट्स वेगळे! श्वेता म्हणूनच तिचा खून करण्यात आला असेल तर तिचे साथीदार म्हणून जवाहर आणि अखिलेश दोघांचाही काटा काढण्यात आला हे लॉजिकल आहे, पण रोशनी म्हणूनच तिचा खून झाला असेल तर जवाहर आणि अखिलेशचा खून का करण्यात आला? मोस्ट इमॉर्टंटली, श्वेता, जवाहर आणि अखिलेश यांच्या खुनाशी मंडी इथे झालेल्या केसमधल्या चौथ्या... रादर आय शुड से पहिल्या खुनाचा काय संबंध आहे किंवा अजिबात संबंध नाही यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत! सध्या आपण श्वेताचा खून रोशनी द्विवेदी म्हणूनच झाला असं गृहीत धरुन विचार करुया! गो अहेड संजय?"

"सर, श्वेताचा खून रोशनी द्विवेदी म्हणून करण्यात आला आहे असं मानलं तर माझ्यामते सस्पेक्ट म्हणून तीन लोक समोर येतात." कदम विचार करत म्हणाले, "रेशमी, शेखर आणि चारुलता! रोशनीच्या मृत्यूचा या तिघांना सर्वात जास्तं फायदा आहे! कारण अगदी उघड आहे ते म्हणजे रोशनीच्या मृत्यूमुळे द्विवेदींच्या प्रॉपर्टीतला एक हिस्सेदार आपोआपच कमी झालेला आहे! श्वेताचा मृत्यू झाला तेव्हा रेशमी मढ आयलंडला होती आणि शेखर - चारुलता एअरपोर्टजवळच्या हॉटेलमध्ये होते अशी त्यांच्याकडे सॉलीड अ‍ॅलिबी आहे. जवाहर - अखिलेशच्या खुनासाठी अल्ताफला सुपारी दिली तशीच श्वेताच्या खुनासाठीही दुसर्‍या कोणाला सुपारी देणं अशक्यं नाही, आणि तसं असल्यास श्वेताच्या मृत्यूच्या वेळेस आपण तिथे नव्हतो याची अ‍ॅलिबी तयार करणं त्यांच्यादृष्टीने आवश्यक ठरतं! दुसरी गोष्टं म्हणजे शाकीब जमालने ऑर्डरप्रमाणे बनवलेली रिव्हॉल्वर्स डमडम स्टेशनवर एका बंगाली भाषिक तरुणीला दिली आहेत! रेशमी आणि चारुलता दोघीही यात फिट बसतात सर, कारण बंगाली ही दोघींची मातृभाषा आहे! ज्या दिवशी या रिव्हॉल्वर्सची डिलेव्हरी घेण्यात आली, त्या दिवशी - १८ ऑक्टोबरला दोघीही कलकत्त्यात होत्या आणि त्याच दिवशी दुपारनंतर दिल्लीला पोहोचल्या आहेत! त्या दोघींपैकी ती रिव्हॉल्वर्स कलेक्ट करुन कुरीयरने दिल्लीला पाठवणं किंवा आपल्या बॅगेजमधून नेणं शक्यं आहे! आता अगदी चेक - इन बॅगेजमधूनही रिव्हॉल्वर्स ट्रान्सपोर्ट कशी केली जाऊ शकतात हा प्रश्नं येतो, पण टॉय गनच्या बॉक्समध्ये टाकून नेली असतील तर अगदीच अशक्यं नाही! सर्वात महत्वाचं रेशमी आणि चारुलता दोघींनाही बॅट्रॅकटॉक्सिनबद्दल माहिती असणं शक्यं आहे! एक केमिकल इंजिनियर आहे तर दुसरी फार्मसिस्ट!

"गुड! श्रद्धा?"

"रोशनी म्हणूनच श्वेताचा खून झाला असेल तर कदमसाहेब म्हणाले तसं शेखर, चारुलता आणि रेशमी यांच्याइतकाच आणखीन एक माणूस माझ्या दृष्टीने संशयित ठरतो तो म्हणजे रोशनीचा मामा सुरेंद्र वर्मा! रोशनी लहान असतानाच वर्मांनी मेघनाशी सगळे संबंध तोडून टाकलेले आहेत. रोशनी सिमल्याला शिकत होती हे वर्मांना माहित आहे, पण लहानपणानंतर रोशनीला पाहिलेलं नसल्याने ते आता तिला ओळखण्याची अजिबात शक्यता नाही! वर्मांनी कितीही आव आणला तरी अर्ध्या प्रॉपर्टीवर सुखासुखी पाणी सोडणं कितीही नाही म्हटलं तरी तसं कठीणच! जवाहरने रोशनी म्हणून श्वेताला पुढे करुन तिच्या हिश्श्याची मागणी करताच रोशनीचाच काटा काढून हा प्रश्नं कायमचा निकालात काढण्याचा वर्मांनी विचार केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही सर! रोशनी म्हणून श्वेताने वर्मांशी संपर्क साधल्यावर आणि ती त्यांना भेटायला दिल्लीला येण्याचं नक्की झाल्यानंतरच तिचा खून झाला आहे!"

"नाईक?"

"रोशनी समजूनच श्वेताचा खून झाला असेल, तर आणखीन एक माणूस सस्पेक्ट ठरु शकतो साहेब, तो म्हणजे रेशमीचा मामा बिभूतीभूषण मुखर्जी!" नाईकनी वेगळाच मुद्दा मांडला, "द्विवेदी आणि मुखर्जी यांच्यात प्रॉपर्टीवरुन वाद आहे आणि कोर्टात केसही सुरु आहे. मुखर्जी केस हारण्याची दाट शक्यता आहे! या केसशी रोशनीचा काहीच संबंध नाही आणि मुखर्जींना खूनच करायचा असेल तर रेशमीचा करणं जास्तं संयुक्तीक ठरतं, कारण तिचा खून झाला तर या केसचं मूळ कारणच नष्टं होतं! पण, द्विवेदींना मानसिक त्रास देण्याच्या हेतूने रोशनी समजून मुखर्जीनी श्चेताचा खून करवला हे अशक्यं नाही! कदाचित या कटामध्ये त्यांच्याबरोबर त्या शेखरची बायको चारुलताही सामिल असू शकेल! ती मूळची कलकत्त्याचीच आहे आणि मुखर्जींची आणि तिची आधीपासूनची ओळखही आहे. हा म्हणजे अगदीच बादरायण संबंध झाला, पण हे सगळं त्या दोघांनीही घडवून आणणं शक्यं आहे साहेब!"

"आणि रोशनी म्हणून नाही तर श्वेता म्हणूनच तिचा खून झाला असेल तर?" रोहितने तिघांना प्रश्नं केला, "संजय?"

"श्वेता म्हणून खून झाला असेल तरीही रेशमी, शेखर आणि चारुलता सस्पेक्ट ठरू शकतात सर!" कदम म्हणाले, "शक्यं आहे की मंडीला रोशनीला मारुन श्वेताला प्लान्ट करण्याच्या जवाहरच्या प्लॅनमध्ये हे तिघंही किंवा तिघांपैकी कोणी सामिल असू शकेल आणि रोशनीचा खून केल्यावर श्वेता, जवाहर आणि अखिलेश तिघांनाही पद्धतशीरपणे संपवण्यात आलं असेल!"

"शक्यं आहे!" रोहित विचार करत म्हणाला, "श्रद्धा?"

"रोशनी म्हणून नव्हे तर श्वेता म्हणूनच खून झाला असेल तरीही यात वर्माचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही सर!" देशपांडेंनी मुद्दा मांडला, "रोशनीला प्रॉपर्टीचा हिस्सा देणं टाळण्यासाठी तिच्या खुनाच्या कटात जवाहरबरोबर वर्माही सामिल असू शकतो! रोशनीने आपल्याला प्रॉपर्टीच्या संदर्भात फोन केला होता आणि जवाहर आपल्याला भेटायला आला होता असा वर्माचा दावा असला तरी ती रोशनी नसून श्वेता आहे हे त्याला पक्कं माहीत होतं. रोशनीचा खून केल्यानंतरही जवाहर श्वेताला रोशनी म्हणून पुढे करुन प्रॉपर्टीचा हिस्सा मागतो आहे हे लक्षात आल्यावर भड्कलेल्या वर्मानी श्वेता, जवाहर आणि अखिलेश तिघांचाही काटा काढला असावा!"

"व्हेरी मच पॉसिबल! नाईक?"

"साहेब, श्वेता ही द्विवेदींची मुलगी रोशनी नाही हे कळल्यावर तिचा खून करण्याचं मुखर्जींना काही कारणच उरत नाही! द्विवेदींच्या केसच्या संदर्भात त्यांनी जवाहरशी संपर्क साधलेला असला तरी त्याचा आणि अखिलेशचा खून करण्याचं त्यांना स्वत:ला काय कारण असेल हे लक्षात येत नाही. पण त्याचबरोबर शाकीबचा रिव्हॉल्वर्स आणि बंदूका बनवण्याचा कारखाना ज्या नजत गावात आहे, तिथून जेमतेम १० - १२ किमी अंतरावर असलेल्या गावात मुखर्जींची जमिन आहे! कदाचित हा सगळा चारुलताचा प्लॅन असावा आणि मुखर्जींनी त्या बंदुकी बनवून घेण्यासाठी आणि सुपारी देण्यापुरती तिला मदत केली असावी!"

"तुम्हाला काय वाटतं सर?" कदमनी विचारलं.

"संजय, श्वेताचा खून श्वेता म्हणूनच झाला असेल तर जवाहर आणि अखिलेशही सस्पेक्ट ठरू शकतील ना? या दोघांपैकी एकाने किंवा दोघांनी संगनमताने तिचा खून केलेला असू शकतो! रोशनीचा खून करुन तिच्याजागी श्वेताला प्लान्ट करण्याचा जवाहरचा प्लॅन होता हे उघड आहे, पण रोशनी म्हणून मुंबईला आल्यावर आणि द्विवेदींच्या श्रीमंतीची कल्पना आल्यावर जवाहर आणि अखिलेश दोघांनाही डबलक्रॉस करुन एकटीनेच सगळ्या प्रॉपर्टीवर डल्ला मारण्याचा विचार श्वेताच्या डोक्यात आला असला तर? इन दॅट केस, जवाहर आणि अखिलेश दोघांकडेही श्वेताच्या खुनासाठी मोटीव्ह असू शकतो! दुसरं म्हणजे श्वेता प्रेग्नंट होती! तिचा काटा काढल्यास या भानगडीतून अखिलेशची आपोआपच सुटका होणार होती!

जवाहर किंवा अखिलेश यांनी श्वेताचा खून केला नसेल तर सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तिचा खून का करण्यात आला? एक मुखर्जींचा अपवाद वगळला तर रेशमी, शेखर, चारु किंवा वर्मा यांच्यापैकी कोणी श्वेताचं खरं स्वरुप ओळखलं आणि रोशनीचा खून करुन तिच्या जागी तिला प्लांट करण्याचा जवाहरचा प्लॅन तिच्या तोंडून वदवून घेतला असं क्षणभर मानलं तर श्वेता, जवाहर आणि अखिलेश या तिघांचाही खून करण्यापेक्षा त्यांना द्विवेदींसमोर एक्सपोज करुन पोलीसांच्या ताब्यात देणं हे तीन - तीन खून करुन पचवण्यापेक्षा जास्तं सोपं नाही का? बरं त्यातूनही त्यांनी ही रिस्क घेतलीच तर या चौघांपैकी त्यात कोण-कोण गुंतलेलं आहे? शक्यं आहे हा सगळा प्लॅन शेखर आणि चारुचा असेल आणि मुखर्जींनी चारुला साथ दिली असेल! दुसरी शक्यता म्हणजे शेखर, चारु आणि रेशमी तिघंही यात सामिल आहेत! तिसरी शक्यता म्हणजे या तिघांचा काहीच संबंध नाही आणि हा सगळा खेळ वर्मांनी रचलेला आहे! लास्ट बट नॉट द लिस्ट.... श्वेता म्हणूनच तिचा खून झाला असेल, तर हाऊ अबाऊट द्विवेदी हिमसेल्फ अ‍ॅज अ सस्पेक्ट?"

रोहितचा प्रश्नं इतका अनपेक्षित होता की तिघंही एकदम दचकलेच!

"सिमल्याहून आपण ज्या मुलीला रोशनी म्हणून मुंबईला आणलं, ती आपली मुलगी नसून तिची जागा घेणारी बहुरुपी आहे हे द्विवेदींना समजलं असलं तर? इन दॅट केस, द्विवेदींच्या संतापाची कल्पनाही करणं अशक्यं आहे! त्यांनी श्वेताकडून सर्वकाही वदवून घेतलं असेल तर? श्वेता आणि अखिलेश यांनी रोशनीचा खून केला आहे आणि हा सगळा प्लॅन जवाहरचा आहे हे कळल्यावर द्विवेदींनी सूड म्हणून या तिघांचाही खून करणं अगदी सहज शक्यं आहे! शाकीबला रिव्हॉल्वर्सची ऑर्डर देणारे आणि अल्ताफला सुपारी देणारे कदाचित द्विवेदीच असू शकतील! अर्थात डमडम स्टेशनवर रिव्हॉल्वर्सची डिलेव्हरी घेणारी तरुणी कोण हा प्रश्नं उरतोच, पण थोड्याफार पैशाच्या मोबदल्यात एखादी बंगाली मुलगी हे काम करण्यास तयार झाली असण्याची शक्यता नाकारता येत नाही! पण त्यापेक्षाही एक महत्वाचा प्रश्नं म्हणजे.....

दुर्मिळ आणि अत्यंत घातक असलेलं बॅट्रॅकटॉक्सिनसारखं विष नेमकं कोणाच्या हाती लागलं?
रेशमी? शेखर? चारु? द्विवेदी? वर्मा? मुखर्जी?
की आणखीनच कोणीतरी?
अ‍ॅन्ड मोअर इम्पॉर्टंटली, ते त्यांच्या हाती कसं लागलं?
डॉ. मालशेंच्या लॅबमधून? का आणखीन कोणत्या मार्गाने?"

बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. प्रत्येकजण आपापल्या विचारांत हरवलेला होता. केस अशा काही वळणावर आली होती की प्रत्येकजण खुनी ठरु शकत होता आणि निर्दोषही! श्वेताचा खून रोशनी म्हणूनच झाला असेल तर रेशमी, शेखर, चारु, वर्मा आणि द्विवेदी या चौघांपैकी कोणीही खुनी असू शकत होता, दुसर्‍या बाजूने विचार केल्यास श्वेताचं बिंग फुटलं असं मानलं तर द्विवेदी सर्वात मोठे संशयित ठरत होते. मुलीच्या खुनाचा सूड घेण्यासाठी त्यांनी श्वेता, जवाहर आणि अखिलेशचा खून करवणं अगदी सहज शक्यं होतं!

"या सगळ्या प्रकरणात आणखीही एका व्यक्तीचा हात असण्याची दाट शक्यता आहे, पण अनफॉर्च्युनेटली, तुमच्यापैकी कोणीही तिचा खुनी म्हणून विचारच केलेला नाही!"

रोहित शांतपणे म्हणाला तसं तिघांनीही चमकून त्याच्याकडे पाहिलं.

"त्या व्यक्तीकडेही श्वेता, अखिलेश आणि जवाहर या तिघांच्याही खुनाचा मोटीव्ह असू शकतो, इनफॅक्ट असण्याची सर्वात जास्तं शक्यता आहे! मोअर इम्पॉर्टंटली, त्या व्यक्तीला बॅट्रॅकटॉक्सिनबद्दल माहिती असणंही अगदी सहज शक्यं आहे! राहिला प्रश्नं बंगाली भाषेचा, पण द्विवेदी जर एखाद्या बंगाली तरुणीकडून पैशाच्या मोबदल्यात काम करुन घेवू शकतात तर ते त्या व्यक्तीलाही अशक्यं नाही!"

"कोण व्यक्ती सर?" कदमनी उत्सुकतेने विचारलं.

"रोशनी द्विवेदी!"

कदम, देशपांडे आणि नाईक वेड्यासारखे त्याच्याकडे पाहतच राहिले!
काय बोलावं कोणालाच कळत नव्हतं!

"पण सर, रोशनीचा तर खून झाला आहे ना?" देशपांडेनी गोंधळून जात विचारलं, "अखिलेश आणि श्वेता यांनी तिला सिमल्याच्या त्या हॉस्टेलमधून पिकअप केलं आणि मंडीला नेल्यावर.... माय गॉड सर! म्हणजे.... "

"एक्झॅक्टली श्रद्धा!" रोहित शांतपणे म्हणाला, "अखिलेश आणि श्वेतानेच रोशनीला सिमल्याहून मंडीला आणलं आणि रोशनी तिथून नाहीशी झाली यात कोणतीही शंका नाही. पण, सर्कमस्टेन्शियल एव्हीडन्स जरी तसं इंडीकेट करत असला तरीही रोशनीचा खून झाला आहे हे सिद्धं झालेलं नाही! इनफॅक्ट, अ‍ॅज पर द डीएनए टेस्ट्स रिपोर्ट, मंडीला सापडलेला स्केलेटन रोशनीचा नाही हे निर्विवादपणे सिद्धं झालेलं आहे! ती जर मंडीहून सुरक्षीतपणे निसटली असेल तर? इन दॅट केस, पडद्याआड राहून सगळी सूत्रं तीच हलवत असण्याची शक्यता नाकारता येत नाही! दुसरं म्हणजे, रोशनीने केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स केलं आहे, त्यामुळे तिला बॅट्रॅकटॉक्सिनबद्दल माहिती असणं अशक्यं नाही!"

"पण सर, रोशनी जिवंत असेल तर ती समोर का येत नाही? आणि मंडीहून ती अखिलेश आणि श्वेताच्या तावडीतून कशी निसटली? मंडीला मिळालेला तो स्केलेटन कोणाचा आहे? त्या मुलीचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला आहे, तिचा खून कोणी केला? आणि का?" कदमनी एकापाठोपाठ एक प्रश्नांची सरबत्ती केली.

"जरा विचार कर संजय.... अखिलेश आणि श्वेताने खून करण्याच्या इराद्याने रोशनीला मंडी इथे आणलं पण तिला त्यांच्या बेताची आधीच कल्पना आली! आपला काटा काढून द्विवेदींची प्रॉपर्टी हडपण्याचा प्लॅन कळल्यावर रोशनीने त्या दोघांना काऊंटर ऑफर देत जवाहरलाच डबलक्रॉस करण्याचा प्लॅन केला. अखिलेश आणि श्वेताला फक्तं पैशाशीच मतलब असल्याकारणाने त्यांनी ती ऑफर अ‍ॅक्सेप्ट केली. रोशनी मंडीहून निसटली आणि एखाद्या सेफ ठिकाणी लपून राहिली, आणि अ‍ॅज पर ओरीजनल प्लॅन श्वेता द्विवेदींबरोबर मुंबईला गेली! मी आधीच म्हटल्याप्रमाणे मुंबईला गेल्यावर आणि द्विवेदींच्या आर्थिक संपन्नतेची खरी कल्पना आल्यावर श्वेताचे डोळेच फिरले. तिने एकटीनेच किंवा अखिलेशच्या मदतीने रोशनी आणि जवाहर दोघांनाही डबलक्रॉस करण्यास सुरवात केली! भडकलेल्या रोशनीने श्वेताचा पत्ता साफ केला आणि ती गायब झाली. वडाळ्याच्या गोडाऊनमधून ती सूटकेस नेणारा माणूस रोशनीचा साथीदार असू शकतो! श्वेताचा काटा काढल्यावर ती जवाहरच्या मागे लागली. त्याला मारण्यामागे तिच्या खुनाचा प्लॅन करणं, मेघनाच्या मृत्यूची बातमी लपवणं अशी अनेक कारणं असू शकतात! श्वेताला उडवल्यावर अखिलेश गप्पं बसणार नाही याचीही रोशनीला कल्पना आली असावी! तो आपल्या मागे लागण्याची आणि सर्वात वर्स्ट म्हणजे जवाहरला सामिल होण्याची तिला भीती होती! त्यामुळे त्या दोघांचाही पत्ता साफ करण्यासाठी आपल्या एखाद्या साथीदारामार्फत तिने शाकीबकडून रिव्हॉल्वर्स बनवून घेतली आणि अल्ताफला सुपारी दिली! अखिलेश आणि जवाहरला मार्गातून दूर केल्यानंतर एकदा हे प्रकरण थंडावलं की ती आरामात द्विवेदींकडे कायमची राहण्यास येवू शकते! आपण स्वत: रोशनी द्विवेदी आहोत हे सिद्धं करणं तिला अगदी सहजच शक्यं होतं!"

"पण सर.... " कदम गोंधळले होते, "खुद्दं रोशनीच या प्रकरणात असेल तर तिचे साथीदार कोण?"

"कोणीही असू शकेल संजय! रेशमी, शेखर, चारु, वर्मा.... या प्रकरणात मदत केल्यास द्विवेदींना केस मागे घेण्यास राजी करण्याचं तिने प्रॉमिस केलं असल्यास अगदी मुखर्जी देखिल! आय विल नॉट रुल आऊट रेक्टर बहुगुणा आयदर! कदाचित आतापर्यंत आपल्याला संपूर्णपणे अज्ञात असलेली एखादी व्यक्तीदेखिल असू शकते! बहुगुणाबाईंनी कितीही ठामपणे नाकारलं तरी रोशनीचा बॉयफ्रेंडही असण्याची शक्यता नाकारता येत नाही! कदाचित स्वत: द्विवेदीसुद्धा असू शकतील! अ‍ॅब्सोल्यूटली एनीवन इज पॉसिबल!"

"आणि मंडीला मिळालेल्या त्या स्केलेटनचं काय सर? तो स्केलेटन रोशनीचा नाही तर कोणाचा आहे?"

"दोन शक्यता आहेत! एक म्हणजे जवाहरला डबलक्रॉस करणारी रोशनीची ऑफर अ‍ॅक्सेप्ट केल्यावर अखिलेश आणि श्वेताने स्केपगोट म्हणून त्या मुलीचा खून करुन तिची डेडबॉडी तिथे टाकली असावी, किंवा या प्रकरणाशी अजिबात संबंध नसलेली ती एक सर्वस्वी वेगळी मर्डर केस असावी! अर्थात रोशनीची डेडबॉडी दुसरीकडे कुठे डिस्पोज ऑफ करणं अगदी सहज शक्यं आहे हे मान्यं केलं, तरी जोपर्यंत तिची डेडबॉडी सापडत नाही आणि ती रोशनीच आहे हे सिद्धं होत नाही तोपर्यंत ती जिवंत आहे हे गृहीत धरणं भाग आहे, अ‍ॅन्ड इन दॅट केस, शी इज अ प्राईम सस्पेक्ट!"

थोडावेळ कोणीच काही बोललं नाही.

"पाठक अ‍ॅन्ड सन्सचा माणूस गेलेल्या त्या रेड कलरच्या कारचा पत्ता लागला?"

"येस सर! श्वेताचा खून झाला त्या रात्री ती कार ईस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या मुलुंड चेकनाक्यावरुन पहाटे तीनच्या सुमाराला पास झाली आहे! कारच्या नंबरप्लेटवरुन शोध घेतल्यावर ती कार रेंट करण्यात आली होती असं समोर आलं आहे! कार रेंट करणार्‍या माणसाचा अ‍ॅड्रेस शोधून आम्ही त्याला गाठलं. तो एक मामुली टॅक्सी ड्रायव्हर आहे. त्याची टॅक्सी एंगेज करणार्‍या माणसाने त्याला भरपूर पैशाचं आमिष दाखवून त्याच्याकडून कार रेंट करुन घेतली आणि कार ताब्यात मिळाल्यावर टॅक्सी ड्रायव्हरला पैसे देवून तो निघून गेला!"

"इंट्रेस्टींग! त्या पॅसेंजरचं नाव कळलं?"

"नाव कळलं नाही, पण ती कार कुठून रेन्ट करण्यात आली होती हे मात्रं कळलं!"

कदमनी त्या ठिकाणाचं नाव सांगताच रोहितच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा चमकून गेली!

"सर, तुम्ही डीएनए टेस्ट्स करण्यासाठी पाठवलेल्या सँपल्सचं काय झालं?" देशपांडेनी उत्सुकतेने विचारलं.

"रिपोर्ट्स आर अ‍ॅज आय एक्सपेक्टेड!" रोहित गूढ स्मित करत म्हणाला, "आय विल कम टू दोज रिपोर्ट्स लेटर, बट बिफोर दॅट, सगळ्यांनी जरा हे फोटो बघा!"

एका पाठोपाठ एक तीन फोटो आयपॅडवर उमटले.....
चौथा फोटो त्या तीन फोटोंचं एकत्रं कोलाज होतं....
कदम, देशपांडे आणि नाईक आ SS वासून त्या फोटोंकडे पाहत होते....

"सर हे.... बापरे!" कदम इतके चकीत झाले होते की काय बोलावं त्यांना समजत नव्हतं!

रोहित काही बोलणार त्यापूर्वीच त्याचा मोबाईल वाजला. डॉ. सोळंकी!

"गुड मॉर्निंग सर!"

"रोहित, गुड न्यूज फॉर यू! त्या दोन्ही डेडबॉडीजमध्ये मला बॅट्रॅकटॉक्सिनचे ट्रेसेस आढळले आहेत! त्या दोघांचाही मृत्यू बॅट्रॅकटॉक्सिन पॉयझनिंगमुळेच झाला आहे हे सायंटीफिकली प्रूव्ह झालं आहे! आय विल सेंड ऑल रिपोर्ट्स टू भरुचा! तू त्याच्याकडून कलेक्ट कर! त्या व्हिसेरा सँपल्सवर मला आणखीन काही टेस्ट्स कराव्या लागतील, सो यू नीड टू वेट फॉर सम टाईम!"

"थँक्यू सो मच सर!"

*******

इन्स्पे. खत्री गंभीरपणे फोनवर बोलत होते.

"सरजी, तुमच्या सूचनेप्रमाणे आम्ही मंडीची सगळी हॉटेल्स पुन्हा चेक केली! तुमचा अंदाज अगदी बरोबर निघाला सरजी! २७ आणि २८ मार्चच्या रात्री त्या माणसाच्या नावाची एक हॉटेलच्या रजिस्टरमध्ये एन्ट्री आहे! २९ मार्चच्या सकाळी त्याने हॉटेल चेक-आऊट केलं आहे..... बिलकूल सरजी.... माझ्याकडे रजिस्टरची कॉपी आहे.... ओके सरजी!"

रोहितने समाधानाने फोन बंद केला! या केसमधला शेवटचा धागा त्याच्या हातात आला होता!

*******

कमिशनर मेहेंदळे अतिशय गंभीरपणे समोर बसलेल्या रोहितचं बोलणं ऐकत होते.

"रोहित, आपल्याकडे सर्कम्स्टेन्शियल एव्हीडन्स भरपूर आहे हे खरं, पण हे सगळं कोर्टात सिद्धं करता येईल? ऑल्सो, एका महत्वाच्या की इव्हेंटचे डिटेल्स मिसिंग आहेत! त्याबद्दल आणखीन एव्हीडन्स मिळवण्यासाठी तुला डिटेल कन्फेशन मिळवावं लागेल! कन्सिडरींग द पीपल इन्व्हॉल्व्ड, तसं कन्फेशन मिळवणं सोपं आहे असं तुला वाटतं?"

"देअर विल बी अ कन्फेशन सर......."

"ऑलराईट! गो अहेड!"

*******

क्राईम ब्रँचमधल्या एका प्रशस्त हॉलमध्ये एक महत्वाची मिटींग भरली होती.

सिनीयर इन्स्पे. रोहित प्रधानच्या समोर एका बाजूला महेंद्रप्रताप द्विवेदी, रेशमी, शेखर, चारुलता बसले होते. दुसर्‍या बाजूला बिभूतीभूषण मुखर्जी, सुरेंद्र वर्मा होते. त्यांच्याव्यतिरिक्तं फिंगर प्रिंट्स एक्सपर्ट सुळे, डॉ. भरुचा या दोघांचाही उपस्थितांमध्ये समावेश होता. हे दोघं कोण आहेत याची बाकीच्यांना काहीच कल्पना नव्हती आणि रोहितनेही त्यांची ओळख करुन देण्याची तसदी घेतली नव्हती. इन्स्पे. कोहली, घटक, खत्री, कदम, देशपांडे हे देखिल तिथे हजर होते. नाईक इन्क्वायरी रुमच्या दारापाशी उभे होते. इन्क्वायरी रुमच्या बाजूला असलेल्या रुममध्येही काही मंडळी बसलेली होती. रोहितने बोलावल्याखेरीज त्यांच्यापैकी कोणीही इन्क्वायरी रुममध्ये येणार नाही याची काळजी घेण्याची जबाबदारी एका सब् इन्स्पेक्टरवर सोपवण्यात आलेली होती. क्राईम ब्रँचच्या ऑफीसमध्ये असूनही मुखर्जी अधून-मधून द्विवेदींकडे तिरस्काराने भरलेले कृद्धं कटाक्ष टाकत होते.

"मि. द्विवेदी, तुमच्या मुलीबद्दल - रोशनीबद्दल - आणि खासकरुन तिच्या मृत्यूबद्दल आम्हाला थोडी इन्फॉर्मेशन मिळाली आहे." तिथे हजर असलेल्या प्रत्येकावरुन नजर फिरवत रोहितने बोलण्यास सुरवात केली, "या इन्फॉर्मेशनमुळे काही गोष्टी क्लीअर झाल्या असल्या तरी त्यातून काही नवीन प्रश्नंही निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी मी तुम्हाला सर्वांना इथे बोलावलं आहे!"

द्विवेदी काहीच बोलले नाहीत.

"मि. द्विवेदी, रोशनीला मुंबईला घेवून येण्यापूर्वी तुम्ही तिला सिमल्याला भेटलात, राईट?"

"येस! जवाहरने तिचा सिमल्याचा पत्ता मला दिल्यावर मी तिला भेटायला सिमल्याला गेलो होतो."

"रेशमी, ९ ऑक्टोबरच्या सकाळी वरळी सी-फेसवर आम्हाला रोशनीची डेडबॉडी सापडली त्याच दिवशी पहाटे ती रुपेशबरोबर सेल्वासला जात असल्याचा मेसेज आला होता, करेक्ट?"

"येस सर! आणि मी तो मेसेज तुम्हाला दाखवलाही होता!" रेशमी शांतपणे म्हणाली.

"ऑफकोर्स, आय रिमेंबर इट! त्यानंतर रुपेशने कधी तुला किंवा तुझ्या इतर मैत्रिणींना कॉन्टॅक्ट केला होता?"

"नो सर! नॉट टिल धिस मोमेंट! मी आधीच सांगितल्याप्रमाणे तो रोशनीच्या फ्यूनरललाही आला नाही!"

रोहितने हॉलमध्ये असलेला प्रोजेक्टर ऑन केला. काही क्षणांतच समोरच असलेल्या स्क्रीनवर एक फोटो झळकला.

"तुमच्यापैकी कोणी या माणसाला ओळखतं?"

द्विवेदी, शेखर आणि चारु यांनी तो फोटो पाहून नकारार्थी मान हलवली, पण रेशमी मात्रं तो फोटो पाहून एकदम चकीत झाली. आपल्या मोबाईलमधला एक फोटो ओपन करुन तिने त्या फोटोशी ताडून पाहिला. बारकाईने दोन्ही फोटो निरखून पाहिल्यावर तिची खात्री पटली असावी...

"सर, हा रुपेश आहे! पण.... इथे हा अगदी एखाद्या लोफरसारखा दिसतो आहे!"

"आर यू शुअर रेशमी?"

"डेफीनेटली सर! हा रुपेशच आहे, नो डाऊट!"

"या माणसाचं नाव अखिलेश तिवारी आहे! हा दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेला क्रिमीनल आहे. सिनेमाची तिकीटं ब्लॅक करणं, लहान-मोठ्या चोर्‍या करणं, शॉपलिफ्टींग, हाऊसब्रेकींग अशा अनेक केसेस त्याच्या नावावर आहेत. गोड बोलून एखाद्याचा विश्वास संपादन करणं आणि त्याला हातोहात बनवणं यामध्ये तो माहीर आहे. त्याचबरोबर हा एक तरबेज फोर्जर आहे. कोणतंही नकली आणि डुप्लिकेट डॉक्युमेंट बनवण्यात तो एक्सपर्ट आहे. हा अखिलेश तिवारीच मुंबईत रुपेश सिंघानिया या नावाने वावरत होता."

"हा.... हा अखिलेश असेल तर.... माय गॉड!" रेशमी नखशिखांत हादरली, "पण सर, रोशनी तर त्याला सिमल्यापासून ओळखत होती. दोघं कॉलेजमध्ये एकत्रं शिकत होते तेव्हापासून! पण हा असा लोफर आहे.... हाऊ इज इट पॉसिबल?"

"फॉर अ व्हेरी सिंपल रिझन! अनफॉर्च्युनेटली, रोशनीने तुम्हाला सिमल्याबद्दल आणि स्वत:बद्दल सांगितलेल्या सर्व गोष्टी खोट्या होत्या! आम्हाला तिची डेडबॉडी सापडली तेव्हा नेहमीच्या प्रोसिजरचा भाग म्हणून आम्ही तिचे फिंगर प्रिंट्स घेतले होते. हे फिंगर प्रिंट्स मुंबई पोलिसांच्या रेकॉर्डला नव्हते, पण दिल्ली पोलीसांच्या रेकॉर्डवर एक पिक पॉकेटर आणि चोर म्हणून रोशनीच्या नावाची नोंद आहे असं आम्हाला आढळून आलं आहे!"

द्विवेदी, रेशमी, शेखर आणि चारु वेड्यासारखे रोहितकडे पाहत होते! आपण ऐकलं ते खरं की तो एक निव्वळ भास होता?
रोशनी ही दिल्लीची पिक पॉकेटर आणि चोर आहे? हे कसं शक्यं आहे?
आपली मुलगी आणि चोर?

"नॉन्सेन्स मि. प्रधान!" द्विवेदी रागीट स्वरात म्हणाले, "माझी मुलगी आणि पिकपॉकेटर आणि चोर? इम्पॉसिबल! तुमच्या या फिंगर प्रिंट्समध्ये काहीतरी गडबड असेल. रोशनीसारखेच फिंगर प्रिंट्स असलेली ती दुसरी कोणीतरी मुलगी असेल. अनफॉर्च्युनेटली ती एक्सपायर झालेली असल्यामुळे ती स्वत:ला डिफेंड करु शकत नाही, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिच्यावर काहीही आरोप करावा."

"मि. द्विवेदी, फिंगर प्रिंट्स हे जगभरात मान्यता पावलेलं शास्त्रं आहे." सुळे तीक्ष्ण स्वरात उद्गारले, "अ‍ॅज अ फिंगर प्रिंट्स एक्स्पर्ट, कोणत्याही दोन माणसांच्या फिंगरप्रिंट्स सारख्या असूच शकत नाहीत हे मी अगदी नि:संदीग्धपणे सांगू शकतो! अगदी जुळ्या भावंडांचे फिंगर प्रिंट्सही एकमेकांपेक्षा वेगळे असतात! तुमची मुलगी रोशनी हिचे प्रिंट्स दिल्ली पोलिसांच्या रेकॉर्डवर आहेत हे सिद्धं झालेलं आहे!"

द्विवेदींना काय बोलावं हे कळेना. सुळे इतक्या ठामपणे बोलत आहेत त्या अर्थी त्यात तथ्यं असणार हे त्यांना समजत होतं, पण तरीही ते मान्यं करण्यास मनाची तयारी होत नव्हती.

"वेल! इफ यू से सो, आय हॅव टू बिलिव्ह इट." बर्‍याच वेळाने द्विवेदी अगदी हताश स्वरात म्हणाले.

समोरच्या पड्द्यावर आणखीन एक फोटो झळकला. द्विवेदी, रेशमी, शेखर आणि चारु डोळे विस्फारुन तो फोटो पाहत होते.

"हा दिल्ली पोलीसांच्या रेकॉर्डवर असलेला रोशनीचा फोटो आहे!" रोहित शांतपणे म्हणाला, "मि. द्विवेदी, तिला मुंबईला आणण्यापूर्वी तुम्ही तिच्या पूर्वेतिहासाची खात्री केली होती?"

"मि. प्रधान, तुम्ही एक पोलिस ऑफीसर आहात, अ‍ॅन्ड आय अ‍ॅग्री, प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं हा तुमचा जॉब आहे, पण म्हणून प्रत्येकाने प्रत्येक गोष्टीवर संशय घ्यावा ही अपेक्षा तुम्ही कशी काय करता? मी आधीच म्हणालो त्याप्रमाणे रोशनीचा सिमल्याचा पत्ता मला जवाहरने दिला होता. त्या पत्त्यावर ती मला भेटली. तिच्याजवळ तिच्या कॉलेजचं आयकार्ड होतं. सर्टीफिकेट्स होती. लहानपणापासूनचे फोटो होते. त्यामुळे विश्वास न ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं! आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर, रोशनीने मला स्वत:च्या क्रिमिनल रेकॉर्डबद्दल खरं सांगितलं असतं तरी मी तिचे सगळे अपराध पोटात घातले असते. आफ्टर ऑल, काहीही झालं तरी ती माझी मुलगी होती."

"रेशमी, रोशनी आणि रुपेश या दोघांच अफेयर होतं याबद्दल तुला काही माहीत आहे?"

"नो सर! त्यांचं अफेयर असावं असा मला संशय आला होता, पण मी रोशनीला कधी विचारलं नाही आणि तिनेही त्याबद्दल कधीच स्पष्टपणे काही सांगितलं नाही."

"वेल.... " रोहित सावकाशपणे म्हणाला, "मि. द्विवेदी, मी आता जे काही सांगणार आहे ते तुमच्यासाठी शॉकींग आणि त्रासदायक असेल याची मला कल्पना आहे, बट इट्स माय ड्यूटी, सो आय हॅव टू से धिस..... रोशनीचा मृत्यू झाला, तेव्हा ती सहा ते सात वीक्स प्रेग्नंट होती!"

द्विवेदी आणि रेशमी दोघंही अविश्वासने त्याच्याकडे पाहत राहिले. शेखर आणि चारुलाही तो अनपेक्षीत हादरा होता. द्विवेदींच्या चेहर्‍यावर संताप दाटून आला होता. पण काही क्षणांतच त्यांच्या संतापाचं रुपांतर वेदना आणि हतबलतेत झालं. एक पोलीस अधिकारी इतक्या ठामपणे सर्वांसमोर हे विधान करतो आहे याचा अर्थ..... असहाय्यपणे त्यांनी रोहितकडे पाहिलं. रोशनीची गुन्हेगारी पार्श्वभूमी अचानक समोर आल्यामुळे आधीच त्यांना धक्का बसला होता आणि आता तर तिच्या चारित्र्याचीही लक्तरं निघाली होती!

"सत्य हे नेहमीच कटू असतं मि. द्विवेदी!" रोहित शांत सुरात म्हणाला, "हे डॉ. भरुचा आहेत. रोशनीच्या डेडबॉडीची ऑटॉप्सी यांनीच केली होती. ती प्रेग्नंट असल्याचं आम्हाला ऑटॉप्सीमध्येच कळलं होतं, पण त्यावेळेस आमचं इन्व्हेस्टीगेशन पूर्ण झालेलं नसल्याने आम्ही ते तुम्हाला सांगायचं टाळलं! अ‍ॅज पर अवर इन्फॉर्मेशन, रोशनी आणि रुपेश उर्फ अखिलेश हे केवळ मित्रं नव्हते! मुंबईला येण्यापूर्वीपासूनच त्या दोघाचं अफेयर सुरु होतं. नॉट ओन्ली दॅट, दोघांमध्ये फिजिकल रिलेशन्सही होते! ते दोघं रेग्युलरली वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जात होते असं रोशनीच्या क्रेडीट कार्डच्या डिटेल्सवरुन स्पष्टं झालं आहे. नॉट ओन्ली दॅट, ते दोघं निरनिराळ्या हॉटेल्समध्ये जात असले तरी इमर्जन्सीसाठी म्हणून वडाळ्याला असलेल्या एका गोडाऊन कम क्लोकरुममध्ये रोशनीने एक स्टोरेज रुम मंथली बेसीसवर भाड्याने घेतली होती. रुपेशबरोबर ती अधून-मधून इथे येत असे! इनफॅक्ट रोशनीचा मृत्यू झाला त्या रात्रीदेखिल ती रुपेशबरोबर तिथे गेली होती असं आढळलं आहे!"

"आय डोन्ट नो व्हॉट टू से.... रोशनी आणि रुपेशच्या संबंधांबद्दल मला काहीही कल्पना नव्हती! आणि कल्पना असती तरी मी काय करु शकलो असतो?" द्विवेदी खिन्नपणे म्हणाले.

"रोशनी आणि रुपेशचे संबंध होते, रोशनी त्याच्यापासून प्रेग्नंट राहिली होती, त्या रात्री ती रुपेशबरोबरच त्या गोडाऊनवर आली होती, दुसर्‍या दिवशी सकाळी वरळी सी फेसवर तिची डेडबॉडी सापडली होती आणि तिला रोज भेटणारा आणि तिच्याशी तासन् तास फोनवर बोलणारा रुपेश तिच्या मृत्यूनंतर हवेत विरुन गेल्यासारखा गायब झाला! ऑल धिस अ‍ॅडस अप टू ओन्ली वन कन्क्लूजन...."

रोहितने आपलं वाक्यं अर्धवटच सोडलं. त्याची नजर पाळीपाळीने द्विवेदी कुटुंबियांवरुन फिरत होती.

"यू मिन सर.... " रेशमीने थरथरत्या आवाजात विचारलं, "रुपेशनेच रोशनीला.... ओह गॉड!....."

"इट्स जस्ट अ पॉसिबलीटी! रोशनीचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झालेला आहे असं ऑटॉप्सीमध्ये स्पष्टं झालेलं आहे, फक्तं यासाठी रुपेश उर्फ अखिलेशच जबाबदार होता का आणखीन कोणी?"

काहीवेळ तिथे शांतता पसरली. द्विवेदी कुटुंबिय अद्यापही रोशनीबद्दलच्या त्या धक्क्यातून सावरलेले नव्हते.

"मि. द्विवेदी, जवाहर कौल यांचा मृत्यू झाल्याचं तुम्हाला कळलंच असेल?"

"येस! मी पेपरमध्ये वाचलं. हार्ट अ‍ॅटॅकमुळे त्याला मृत्यू आला असं पेपरमध्ये वाचलं होतं." द्विवेदी तिरस्काराने म्हणाले, "आता गेलेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये असं म्हणतात, पण जवाहर वॉज अ यूसलेस बास्टर्ड! वास्तविक त्याच्यासारख्या माणसाला वेदनेने तडफडत आणि झिजून झिजून मृत्यू यावा अशी माझी इच्छा होती. हार्ट अ‍ॅटॅकने एका झटक्यात सुटून गेला!"

द्विवेदींच्या या वक्तव्यावर काही तरी बोलण्यास मुखर्जींनी तोंड उघडलं होतं, पण रोहितकडे लक्षं जाताच ते एकदम गप्प झाले.

"जवाहरचा मृत्यूही रोशनीप्रमाणेच कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे झाला आहे. मृत्यूपूर्वी जवाहरला जबरदस्तं मारहाण करण्यात आली होती असं इन्व्हेस्टीगेशनमध्ये समोर आलं आहे. या मारहाणीमुळेच त्याला कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट झाला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला!"

"व्हेरी मच पॉसिबल!" द्विवेदी म्हणाले, "जवाहरसारख्या माणसाच्या बाबतीत काहीही शक्यं आहे! त्याच्या हजार भानगडी होत्या. कितीतरी जणांना त्याने हातोहात फसवून लुबाडलं असेल. त्याच्यासारख्या माणसाला अनेक शत्रू असतील याची मला खात्री आहे. त्यापैकीच कोणीतरी त्याला मारहाण केली असणं अगदी सहज शक्यं आहे!"

"जवाहरने फसवलेल्या लोकांपैकी एक तुम्हीदेखिल होतात मि. द्विवेदी!" रोहित मिस्कीलपणे म्हणाला तसे द्विवेदी एकदम गार झाले, "बाय द वे, जवाहरचा मृत्यू झाला, त्या रात्री अखिलेश त्याच्या घरी गेलेला होता आणि त्यानंतरच जवाहरची डेडबॉडी दिल्ली पोलीसांना सापडली! राईट कोहली?"

"बिलकूल ठीक सरजी!" कोहली मान डोलवत म्हणाले."

"रोशनी आणि जवाहर दोघांचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने झाला होता. त्यांच्या मृत्यूच्या संदर्भात दिल्ली पोलीस अखिलेश तिवारीचा शोध घेत होते आनि जवाहरच्या मृत्यूनंतर आठवड्याभरातच गाझियाबाद रेल्वे स्टेशनवर अखिलेशचाही मृत्यू झाला, आणि त्याच्या मृत्यूचं कारण होतं कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट! व्हॉट अ कोइन्सिडन्स! एकमेकांशी संबंधित अशा तीन व्यक्तींचा वीस - पंचवीस दिवसांत एकापाठोपाठ मृत्यू व्हावा आणि तो देखिल एकाच पद्धतीने..... इज इट रिअली अ कोइन्सिडन्स ऑर समथिंग एल्स?"

रोहितने अशा काही स्वरात प्रश्नं केला की इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्या सर्वांच्याच अंगावर काटा आला! त्याची नजर आळीपाळीने द्विवेदी आणि रेशमीच्या चेहर्‍यावरुन फिरत होती. द्विवेदी काहीच बोलले नाहीत, पण रुपेशचाही मृत्यू झालेला कळल्यावर ते अधिकच अस्वस्थं झाले होते. रेशमी इतकी हादरली होती की तिला काय बोलावं हेच कळत नव्हतं. रोहितने अगदी सहजच सुरेंद्र वर्मांकडे कटाक्ष टाकला. ते देखिल या सगळ्या प्रकरणामुळे गोंधळलेले दिसत होते. रोशनी आणि जवाहरच्या मृत्यूला रुपेश जबाबदार असावा असं रोहितच्या बोलण्यातून सूचित होत होतं, पण स्वत: रुपेशचाही त्याच पद्धतीने मृत्यू झाल्याचं कळल्यावर सगळेच गोंधळले होते.

"सर, रोशनी, जवाहर आणि अखिलेश तिघंही एकमेकाशी संबंधीत होते आणि तिघांचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे झालेला आहे ही वस्तुस्थिती असली, तरी त्या तिघांच्या मृत्यूमागे काय लिंक आहे?" कदमनी मुद्दामच विचारलं.

रोहितच्या चेहर्‍यावर हलकीशी स्मितरेषा चमकून गेली. कदमनी सगळ्यांच्याच - खासकरुन द्विवेदी आणि रेशमी यांच्या डोक्यात उभा राहिलेला प्रश्नच नेमका विचारला होता!

"जवाहर आणि अखिलेश या दोघांमधली लिंक होती ती म्हणजे रोशनी! रोशनीची आई मेघना द्विवेदी जवाहरबरोबर राहत होती तर दिल्लीच्या अंडरवर्ल्डमध्ये वावरत असल्यापासूनच रोशनी आणि अखिलेश यांचं अफेयर होतं! आणि तिघांच्या मृत्यूमधली लिंक.... वेल, धिस इज केस ऑफ एक्स्ट्रीमली वेल प्लॅन्ड अ‍ॅन्ड एक्झिक्यूटेड मर्डर! ट्रिपल मर्डर!"

इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्या प्रत्येकाच्या अंगावर काटा आला! द्विवेदी स्वत:वर ताबा ठेवण्याचा प्रयत्नं करत होते. शेखरने त्यांचा हात घट्ट धरून ठेवला होता. रेशमी आणि चारु तर सुन्न झालेल्या होत्या. रोशनीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि तिच्या अनैतिक संबंधाच्या धक्क्यातूनच अद्याप त्या पुरत्या सावरल्या नव्हत्या आणि आता तर तिचा खून झाल्याचं समोर आलं होतं. सुरेंद्र वर्माही पार गोंधळले होते. दुसर्‍या बाजूला बसलेल्या मुखर्जींना मात्रं द्विवेदींची अवस्था पाहून आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या!

"रोहितबाबू, त्या तिघांना कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टने मृत्यू आला ना?" इन्स्पे. घटकनी गोंधळून विचारलं, "मग ट्रिपल मर्डर?"

"ऑफकोर्स घटकबाबू! त्या तिघांचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे झाला हे सत्यं आहे तितकंच त्या तिघांचा खून करण्यात आला हे देखिल निर्विवाद सत्यं आहे!"

"कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट आणून खून करण्यात आला?" कोहलींनी आश्चर्याने विचारलं, "लेकीन कैसे सरजी?"

"द कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट वॉज इंड्यूस्ड! एक दुर्मिळ आणि अत्यंत घातक असं पॉयझन त्यासाठी वापरण्यात आलं. अर्थात इतकं घातक आणि परिणामकारक असूनही ऑटोप्सीमधे याचे कोणतेही ट्रेसेस आढळत नाहीत आणि त्यामुळे कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळेच मृत्यू आला आहे असंच निष्पन्न होतं! राईट डॉ. भरुचा?"

"करेक्ट!" डॉ. भरुचांनी होकारार्थी मान डोलवली.

"सरजी, पोस्टमॉर्टेममध्येही न सापडणारं हे पॉयझन आहे तरी कोणतं?" कोहलींनी अधीरतेने विचारलं.

"रिलॅक्स कोहली! थोडा पेशन्स ठेवा! रोशनी, जवाहर आणि अखिलेश यांची हत्या कोणी केली आणि नेमक्या कोणत्या पद्धतीने केली हा सगळा पुढचा भाग, बट फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट वॉज् द मोटीव्ह बिहाईंड द मर्डर्स? त्या तिघांच्या हत्येमागचा नेमका हेतू काय? जवाहरच्या बाबतीत विचार केला तर त्याला अनेक शत्रू होते! कित्येक लोकांना त्याने आयुष्यातून उठवलेलं होतं. त्यांच्यापैकी कोणीही त्याच्या जीवावर उठण्याची शक्यता नाकारता येत नाही! फॉर दॅट मॅटर, अगदी मि. द्विवेदींनाही त्याच्या मृत्यूमुळे आनंदच झाला असेल.... राईट मि. द्विवेदी?"

"जवाहरच्या मृत्यूने मला आनंद झाला, आय अ‍ॅग्री! पण म्हणून मी त्याचा खून केला असा अर्थ काढून नका मि. प्रधान!"

"मी कुठे तसा अर्थ काढला आहे मि. द्विवेदी? अखिलेश दिल्ली पोलीसांच्या रेकॉर्डवरचा क्रिमिनल होता. दिल्लीच्या अंडरवर्ल्डमध्ये त्यालाही अनेक शत्रू असू शकतील. त्यांच्यापैकीच कोणीतरी त्याचा काटा काढला असणं अगदी सहज शक्यं आहे! कदाचित त्याच्या मृत्यूनेही कोणाचा तरी फायदा होत असावा, निदान मानसिक समाधान तरी मिळालं असावं!"

"पण... पण सर, रोशनीच्या मृत्यूमुळे कोणाला फायदा होणार होता?" रेशमीने विचारलं.

रोहितच्या चेहर्‍यावर हलकीच स्मितरेषा उमटली. नेमका हाच प्रश्नं त्याला अपेक्षित होता!

"तुझा नक्कीच फायदा झालेला आहे!" रोहितचा स्वर अगदी शांत होता, "आणि शेखरचा पण! कारण मि. द्विवेदींच्या प्रॉपर्टी आणि बिझनेसचे आता तुम्ही दोघंच वारस उरले आहात! थर्ड पर्सन टू बेनिफीट इज मि. वर्मा! रोशनीच्या मृत्यूमुळे तिला प्रॉपर्टीचा शेअर देण्याचा आता प्रश्नच येत नाही!"

रेशमी उडालीच! पोलीसांचा संशय एकदम आपल्यावर येईल याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता! शेखरचीही अवस्था फारशी वेगळी नव्हती. रोहितने त्याचं नाव घेतल्यामुळे तो चांगलाच अस्वस्थं झाला होता. सुरेंद्र वर्मांना तर कहीच सुचत नव्हतं! रोहितबरोबर बोलताना रोशनीने आपल्याकडे आपल्या संपत्तीचा हिस्सा मागितल्याचा त्यांनी उल्लेख केला होत, पण त्याचा तो असा उपयोग करेल हे त्यांच्या डोक्यातही आलं नसतं!"

"धिस इज टू मच मि. प्रधान!" द्विवेदी रागाने धुसफुसत म्हणाले, "तुम्ही रेशमीवर संशय घेत आहात? ज्या मुलीने...."

"रिलॅक्स मि. द्विवेदी!" त्यांचं वाक्य अर्ध्यातच तोडत रोहित म्हणाला, "इन्व्हेस्टीगेशनमध्ये आम्हाला सर्व शक्यतांचा विचार करावाच लागतो. एस्पेशली खुनासारख्या केसमध्ये तर अनेक शक्यता विचारात घ्याव्या लागतात. एखाद्या माणसाच्या मृत्यूपासून दुसर्‍या कोणाला फायदा होत असेल तर नॅचरली त्याच्याकडे खुनासाठी मोटीव्ह असू शकतो! ऑन द काँटररी, कोणताही आर्थिक फायदा नसताना केवळ सुडाच्या भावनेनेही अनेक हत्या झालेल्या मी पाहिल्या आहेत! सो वी कॅन नॉट लिव्ह एनी स्टोन अनटर्न्ड!"

द्विवेदी काहीच बोलले नाहीत.

"रोशनी, जवाहर आणि अखिलेश तिघांचाही अत्यंत सिस्टीमॅटीकली प्लॅन करुन खून करण्यात आला आहे यात कोणतही डाऊट नाही! सध्या आपण रोशनीच्या खुनाचा विचार करु.....

८ ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजता रोशनी आणि अखिलेश गोडाऊनमधून बाहेर पडले, तेव्हा एक माणूस त्यांच्या पाळतीवर होता! ते दोघं निघून गेल्यावर गोडाऊनबाहेर असलेल्या पब्लीक फोनवरुन त्या माणसाने रोशनीला फोन केला. दिल्लीतल्या तिच्या गुन्हेगारी कारकिर्दीबद्दल आपल्याला सारं काही समजलं आहे असं सांगून मि. द्विवेदींसमोर तिला एक्सपोज करण्याची धमकी देत त्याने रोशनीला ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली! एक्स्पोज होणं टाळायचं असेल तर ताबडतोब एकटीने गोडाऊनला परत यावं असं त्याने धमकावल्यावर तिच्यासमोर दुसरा पर्यायच उरला नाही! अर्ध्या - पाऊण तासाने - रात्री पावणेबाराच्या सुमाराला रोशनी पुन्हा गोडाऊनमध्ये परतली. तो तिची वाटच पाहत होता! तिच्यावर नजर ठेवण्यासाठी म्हणून तिच्या शेजारचीच स्टोरेज रुम त्याने बोगस नाव आणि कागदपत्रं देत हायर केलेली होती! अर्थात याची रोशनीला काही कल्पना असणं शक्यंच नव्हतं!

रोशनी गोडाऊनला परतली खरी, पण आपल्याला ब्लॅकमेल करणारा हा माणूस कोण असेल याबद्दल विचार करुनही तिला काही उत्तर सापडत नव्हतं! आपल्या गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल या माणसाला किती माहिती मिळाली आहे आणि आपल्याकडून त्याला नेमकं काय अपेक्षित आहे याचा तिला काहीच अंदाज येत नव्हता! तिच्या दुर्दैवाने तिला गोडाऊनवर बोलावणार्‍या त्या माणसाने तिचा खून करण्याच्या इराद्यानेच तिला तिथे येण्यास भाग पाडलं होतं! रात्री एक ते दोनच्या दरम्यान अचानकपणे त्याने तिच्यावर हल्ला केला आणि त्या डेडली पॉयझनचा तिच्यावर प्रयोग केला! प्रतिकार करण्याची कोणतीही संधी मिळण्यापूर्वीच जेमतेम मिनिटभरात रोशनीचा खेळ आटपला! आपल्या स्टोरेज रुममध्ये असलेल्या सूट्केसमध्ये त्याने तिची डेडबॉडी भरली आणि तो गोडाऊनमधून बाहेर पडला! त्याच्याजवळ सूटकेसची रिसीट असल्यामुळे गोडाऊनच्या क्लार्कने त्याला कोणतीच आडकाठी केली नाही! तो गोडाऊनमधून बाहेर पडला तेव्हा त्याचा एक साथीदार कारमध्ये त्याची वाटच पाहत होता! दोघं तिथून वरळी सी फेसवर आले आणि इथे रोशनीची डेडबॉडी टाकून सी-लिंकवरुन बांद्र्याच्या दिशेने निघून गेले!"

रोहितची नजर आळीपाळीने सर्वांवरुन फिरली. रोशनीच्या मृत्यूचा घटनाक्रम ऐकून द्विवेदी कुटुंबिय आणि वर्मा चांगलेच अस्वस्थं झालेले होते. मुखर्जींचा चेहरा मात्रं अगदीच निर्विकार होता.

"रोशनीचा मृत्यू आपल्याला सहजच पचेल या कल्पनेत ते दोघे होते, पण त्यांना एका गोष्टीची अजिबात कल्पना नव्हती! अखिलेशने दोघांना गोडाऊनमधून बाहेर पडताना पाहिलं होतं आणि नुसतं पाहिलंच नाही तर ओळखलंही होतं! काहीतरी गडबड असल्याचा संशय आल्याने त्याने दोघांना वरळी सी फेसपर्यंत फॉलो केलं आणि डेडबॉडी डिस्पोज ऑफ करताना ते त्याच्या नजरेस पडले! ते दोघे निघून गेल्यावर जवळ जावून निरखून पाहिल्यावरच ती रोशनी आहे हे त्याच्या ध्यानात आलं! वास्तविक, ती त्याची गर्लफ्रेंड होती, दोघांचे संबंधही होते, त्या दृष्टीने विचार केल्यास त्याने त्याचवेळेस पोलीसांना इन्फॉर्म करणं लॉजिकल ठरलं असतं, पण त्याचा विचार वेगळाच होता! त्याच्या दृष्टीने ही पैसे कमावण्याची सुवर्णसंधी होती! दुसर्‍याच दिवशी अखिलेशने मुंबई सोडली आणि तो दिल्लीला येवून पोहोचला आणि त्याने थेट जवाहर कौलला गाठलं! रोशनी द्विवेदींची मुलगी असली आणि जवाहरशी सगळे संबंध तोडून टाकण्याचं तिने नाटक केलं असलं तरीही ती त्याच्या इशार्‍यानुसारच वागत होती! तिच्यामार्फत द्विवेदींचा पैसा आणि प्रॉपर्टी लुबाडण्याचा जवाहरचा प्लॅन होता, पण तिच्यावर पूर्ण विश्वास टाकण्याचीही त्याची तयारी नव्हती! कितीही झालं तरी शेवटी रोशनी द्विवेदींचीच मुलगी असल्याने ती कौलवर उलटण्याची शक्यता नाकारता येत नव्हती! तसं झाल्यास त्याच्या प्लॅनचे पार बारा वाजले असते! नेमकं हेच टाळण्यासाठी आणि रोशनीवर नजर ठेवण्याच्या हेतूने जवाहरने तिच्याबरोबर अखिलेशलाही मुंबईला पाठवलं होतं.

रोशनीचा खून झाल्याचं कळल्यावर जवाहरने कपाळावर हात मारुन घेतला! पण अखिलेश हा तिच्या खुनाचा आयविटनेस आहे हे कळल्यावर त्याने अखिलेशमार्फत त्या दोघांना ब्लॅकमेल करण्यास सुरवात केली! त्या दोघांना हा अगदीच अनेक्सपेक्टेड शॉक होता! अखिलेशच्या आडून ब्लॅकमेलिंगचा हा खेळ जवाहरने रचला आहे हे ओळखण्यास त्यांना फारसा वेळ लागला नाही. त्यांच्यापुढे एकच उपाय होता तो म्हणजे जवाहर आणि अखिलेशचा काटा काढणं! पण दिल्लीसारख्या ठिकाणी स्वत: हालचाली करण्याच्या भानगडीत न पडत त्यांनी एका सुपारी किलरला गाठून या दोघांची सुपारी दिली आणि त्याप्रमाणे त्याने जवाहर आणि अखिलेश दोघांचाही खून केला!"

"सरजी, रोशनीचा खून करणारे आणि सुपारी देणारे ते दोघं कोण आहेत?" खत्रींनी उत्सुकतेने विचारलं.

"थोडी कळ काढा खत्री!" रोहित शांतपणे म्हणाला, "जवाहर आणि अखिलेशची सुपारी देण्याचं ठरल्यावर या दोघांच्या खुनासाठीही ते पॉयझन वापरण्याचा निर्णय घेण्यात आला! रोशनीचा मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळे झाल्याचं ऑटॉप्सीमध्ये निष्पन्न झाल्याने डॉ. भरुचा आणि आम्ही सगळेच बुचकळ्यात पडलो होतो, त्यामुळे ते पॉयझन वापरल्यास जवाहर आणि अखिलेशच्या मृत्यूमागचं कारण शोधणं अशक्यंच ठरेल याबद्द्ल त्यांची पक्की खात्री होती! त्यांच्यासमोर एकमेव अडचण उभी होती ती म्हणजे सुपारी किलरकडून ते पॉयझन वापरुन खून कसा घडवून आणता येईल?"

"याचा अर्थ रोहितबाबू, ते विष वापरण्यासाठी म्हणूनच...."

"ऑफकोर्स घटकबाबू!" रोहित त्यांचं वाक्यं अर्ध्यातच तोडत म्हणाला, "ते पॉयझन वापरण्याच्या दृष्टीने आवश्यक ती साधनं बनवून घेण्यात आल्यावर मग जवाहर आणि अखिलेशचे फोटो आणि अ‍ॅडव्हान्स पैसे त्या सुपारी किलरपर्यंत पोहोचले! त्या दोघांच्या फोटोंबरोबरच काही खास इन्स्ट्रक्शन्सही देण्यात आल्या होत्या! व्हेरी मेटीक्युलसली प्लॅन्ड!

आता जवाहरच्या खुनाची हकीकत पाहू! दिल्ली पोलीस रोशनीच्या खुनाच्या संदर्भात अखिलेशचा शोध घेत होते. तो पोलीसांपासून लपूनछपून फिरत होता. त्याला पैशांची आवश्यकता होती. जवाहरचा मृत्यू झाला त्या रात्री अखिलेश पैसे मागणासाठी त्याच्या घरी गेला होता. बंगल्यावर पोलीसांची पाळत असलयने मागच्या बाजूला असलेलं दार फोडून तो आत शिरला. त्याचं आणि जवाहरचं पैशांवरुन जोरदार भांडण झालं. भांडणाचं पर्यावसन मारामारीत झालं आणि अखिलेशने जवाहरची चांगलीच धुलाई केली. जवाहरने कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली आणि ड्रॉवरमध्ये असलेलं आपलं रिव्हॉल्वर त्याच्यावर रोखलं. त्याच्या हातात रिव्हॉल्वर पाहताच तो आपल्याला गोळी मारेल या भीतीने अखिलेशने धूम ठोकली आणि पुढचं दार उघडून तो बाहेर पडून पसार झाला. जवाहर त्याच्यामागोमाग धावत दारापर्यंत गेला, पण अखिलेश बाहेर पळालेला पाहून तो मागे फिरला. अखिलेश आणि जवाहरची मारामारी सुरु असतानाच अखिलेशने उघडलेल्या पाठच्या दारातून तो सुपारी किलर आत शिरला होता. अखिलेश पळून गेला तेव्हा तो अंधारात जिन्याखाली लपलेला होता. जवाहरही अखिलेशच्या पाठोपाठ धावलेला पाहून तो बाहेर आला. अखिलेश पळून गेलेला पाहून जवाहर मागे वळला आणि नेमका त्याच्या समोरच आला! त्या सुपारी किलरने मारलेली आणि ते डेडली पॉयझन लावलेली नीडल गळ्यात घुसताच तो खाली कोसळला आणि मिनिटभरात मरण पावला! जवाहर मरण पावल्यावर त्याच्या मानेतली नीडल काढून खुनी शांतपणे निघून गेला! जवाहरच्या ऑटॉप्सीमध्ये त्याच्या मृत्यूचं कारण समोर आलं ते म्हणजे कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्ट!"

रोहित बोलताबोलता मध्येच थांबला आणि त्याने इन्क्वायरी रुममधल्या सर्वांवरुन नजर फिरवली. सर्वजण गंभीरपणे त्याचं बोलणं ऐकत होते. रोशनी आणि जवाहरच्या मृत्यूची कहाणी ऐकून सर्वांच्याच अंगावर शहारा आला होता.

"मिसेस द्विवेदी, तुमची मातृभाषा बंगाली आहे, राईट?"

"अं.... पार्डन मी? " चारू एकदम गोंधळली. आपल्या मातृभाषेचा विषय मध्येच का निघाला तिला समजेना!

"तुमची मातृभाषा बंगाली आहे ना?" रोहितने शांतपणे विचारलं.

"येस!"

"अ‍ॅन्ड सेम फॉर यू टू, राईट रेशमी?"

"येस सर! बट जस्ट फॉर सेक ऑफ इट! ममा गेल्यावर माझा बंगालीशी फार कमी संबंध आला. इनफॅक्ट मी जवळजवळ विसरुनच गेले होते! पण शेखरदाच्या लग्नानंतर मी चारुदीकडून पुन्हा बंगाली शिकले! आता मी व्यवस्थित बोलू शकते!"

"व्हेरी गुड!" रोहित स्मितं करत म्हणाला, "लेट्स कंटीन्यू अवर स्टोरी ऑफ द ट्रिपल मर्डर्स! अखिलेशने रोशनीचा खून केलेला नसला तरी तिच्या मृत्यूनंतर तो मुंबईतून पसार झाल्याने पोलीसांच्या दृष्टीने तो सस्पेक्ट ठरत होता. जवाहरच्या डेडबॉडीवर त्याला बरीच मारहाण करण्यात आल्याचे ट्रेसेस आढळले होते. त्याच्या घरात अखिलेशच्या फिंगरप्रिंट्स सापडल्यामुळे जवाहरच्या मृत्यूलाही तोच जबाबदार आहे असा संशय येणार हे उघड होतं, आणि नेमकं तेच झालं! दिल्ली पोलीस हात धुवून त्याच्या मागे लागले होते! दिल्लीतून पळ काढण्यापलीकडे आपल्यासमोर दुसरा पर्याय नाही याची अखिलेशला कल्पना आली होती, पण त्याच्यासमोर मुख्य अडचण होती ती पैशाची! अर्थात अखिलेशसारख्या माणसाला घरफोडी करुन पैसे मिळवणं अजिबात अशक्यं नव्हतं! थोडेफार पैसे जमा केल्यावर पोलीसांपासून आपली ओळख लपवण्याच्या हेतूने पठाणाचा वेश करुन पळून जाण्याच्या इराद्याने तो गाझियाबाद स्टेशनवर आला खरा, पण त्याच्या दुर्दैवाने ट्रेन लेट झाली आणि तो आयताच त्या खुन्याच्या तावडीत सापडला! प्लॅटफॉर्मच्या टोकाला असलेल्या पब्लिक टॉयलेटकडे जाताना त्याने अखिलेशला पॉयझन लावलेली नीडल मारली. अखिलेश जागच्या जागी कोसळला आणि मरण पावला! श्वेता आणि जवाहरप्रमाणेच अखिलेशचा मृत्यूही कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळेच झाला असंच ऑटॉप्सीमध्ये समोर यावं असा प्लॅन होता! पण....."

रोहितने आपलं वाक्यं अर्धवट सोडलं. इन्क्वायरी रुममधल्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावरच खिळल्या होत्या. रोशनी, जवाहर आणि अखिलेश - तिघांवरही विषप्रयोग करण्यात आला होता हे स्पष्टच होतं, फक्तं त्यांना कोणतं विष घालून मारण्यात आलं आणि नेमकं कोणत्या पद्धतीने याचीच उत्सुकता होती.

".... अखिलेशचाही मृत्यू कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळेच झाला असंच ऑटॉप्सीमध्ये समोर यावं असा प्लॅन होता!" रोहित एकेक शब्दं सावकाशीने उच्चारत म्हणाला, "पण अनफॉर्च्युनेटली फॉर द किलर, तसं झालं नाही! पॉयझन लावलेल्या ज्या नीडलमुळे अखिलेशचा मृत्यू झाला होता, ती नीडल त्याच्या गळ्यतून काढून घेण्यापूर्वीच प्लॅटफॉर्मवर असलेल्या टी-स्टॉलवरचा माणूस धावत येताना दिसल्यामुळे त्या सुपारी किलरला पळ काढावा लागला! अखिलेशच्या डेडबॉडीची तपासणी करताना त्याच्या गळ्यात घुसलेली नीडल आम्हाला सापडली आणि त्या नीडलवरुनच या केसमध्ये कोणतं पॉयझन वापरण्यात आलं हे डॉ. सोळंकींनी शोधून काढलं!"

इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्यांपैकी कोणीतरी मनातल्या मनात अल्ताफ कुरेशीला शिव्यांची लाखोली वाहत होतं!

"सरजी, " कोहलींनी न राहवून विचारलं, "त्या नीडलवर आढळलेलं इतक्या झटक्यात.... जेमतेम एक - दोन मिनिटांता झटक्यासरशी माणसाला मारणारं ते पॉयझन आहे तरी कोणतं?"

"कोहली, ते पॉयझन न्यूरोटॉक्सिक आहे! अगदी अत्यल्प प्रमाणात वापरलं गेलं तरीही ते कमालीचं धोकादायक आहे आणि फार जलद गतीने त्याचा परिणाम घडून येतो! टू बी प्रिसाईज, फक्तं १५० मायक्रोग्रॅम पॉयझन ६५ ते ७० किलो वजन असलेल्या माणसाचा जीव घेण्यास पुरेसं ठरतं! मिठाच्या दोन - तीन दाण्यांइतकं! या पॉयझनवर कोणताही अँटीडोट अ‍ॅव्हेलेबल नाही, त्यामुळे कोणीही वाचण्यचा चान्सच नाही! रोशनी, जवाहर आणि अखिलेश या तिघांवर प्रयोग करण्यात आलेल्या पॉयझनची डेन्सीटी एवढी जास्तं होती की ते फारतर एक ते दोन मिनिटंच जिवंत राहू शकले असते!"

इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्यांपैकी एक व्यक्ती आ SS वासून रोहितकडे पाहत होती. तिला फार मोठा हादरा बसला होता. त्या व्यक्तीशी नजरानजर होताच रोहितच्या चेहर्‍यावर क्षणभरच स्मितरेषा चमकून गेली.

"रोहितबाबू, ते पॉयझन कोणतं आहे?" घटकनी उत्सुकतेने विचारलं, "त्याचं नाव काय आहे?"

"बॅट्रॅकटॉक्सिन!!"

*******

क्रमश:

(पुढील भाग अंतिम)

कथालेख

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

12 Nov 2018 - 9:53 pm | सामान्य वाचक

कोण कोण कोण

भाऊ टाका आजच शेवटचा भाग

मास्टरमाईन्ड's picture

13 Nov 2018 - 1:08 am | मास्टरमाईन्ड

पुढचा भाग.

रुपी's picture

13 Nov 2018 - 7:06 am | रुपी

मस्त!
कथा खूपच छान रंगवली आहे. कालपासून सगळे भाग वाचून काढले.
पुढचा भागाबद्दल खूप उत्सुकता आहे

तुषार काळभोर's picture

13 Nov 2018 - 7:38 am | तुषार काळभोर

श्वेता-मेघना-रोशनी

शाम भागवत's picture

13 Nov 2018 - 9:11 am | शाम भागवत

इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्यांपैकी कोणीतरी मनातल्या मनात अल्ताफ कुरेशीला शिव्यांची लाखोली वाहत होतं!

असिस्टंट ... रोशनी द्विवेदी

सतिश म्हेत्रे's picture

13 Nov 2018 - 12:17 pm | सतिश म्हेत्रे

....

“तिला फार मोठा हादरा बसला होता.”, म्हणजे ती स्त्री आहे, रेश्मी गोंधळली आहे म्हणजे ती नाही. चारु आणि रोशनी? पोण चारु जवाहर ला मारण्याच्या फंदात पडणार नाही. आता फक्त रोशनी राहिली.

सतिश म्हेत्रे's picture

13 Nov 2018 - 8:02 pm | सतिश म्हेत्रे

इन्क्वायरी रुममध्ये हजर असलेल्यांपैकी एक व्यक्ती आ SS वासून रोहितकडे पाहत होती. तिला फार मोठा हादरा बसला होता. त्या व्यक्तीशी नजरानजर होताच रोहितच्या चेहर्‍यावर क्षणभरच स्मितरेषा चमकून गेली "ती" हे व्यक्तीसाठी वापरलं आहे स्त्री साठी नाही. आणि रोशनी मुळात तिथे हजर कुठे आहे?

जेडी's picture

13 Nov 2018 - 8:33 pm | जेडी

असेल असेल , माझं थोडे व्याकरण कच्चे . ती "व्यक्ती " च्या ऐवजी ती "मुलगी " समजून बसले . पाहू...

स्मिता श्रीपाद's picture

13 Nov 2018 - 11:24 am | स्मिता श्रीपाद

अरे यार...क्रमशः कशाला आता.. ?
आजच टाका ना पुढचा भाग...

लई भारी's picture

13 Nov 2018 - 4:57 pm | लई भारी

लवकर टाका पुढचा भाग :)

अनिवासि's picture

13 Nov 2018 - 6:58 pm | अनिवासि

५०/६० वर्षापूर्वी अर्नाळकर बंधूच्या कादंबऱ्या वाचण्यासाठी महिनाभर थांबावे लागायचे त्याची आठवण झाली. आत्ता एका दिवसासाठी पण थांबवत नाही.
कथा मस्तच रंगली आहे.
असेच लिखाण चालू ठेवा. शुभेच्छा

शॉटही शॉट बसून झालेत , पुढचा टकीला म्हंटल्यावर कुठे जीवात जीव आला भौ ..

स्मिता चौगुले's picture

14 Nov 2018 - 9:57 am | स्मिता चौगुले

मस्त सुरु आहे कथा सुरुवातीपासून सगळे भाग वाचते आहे
शेवटच्या भागाची वाट पहाटे आहे लवकर टाका

एक विसंगती दिसते आहे ती नम्रपणे सुचवते

खून झालेली ती रोशनी नसून श्वेता होती जी रोशनी च्या जागी Mumbai ला आली होती हे रोहितने अजून सर्वाना (या भागाच्या शेवटच्या टप्प्यात ) सांगितले नाहीये पण एका वाक्यात श्वेता चा चुकून उल्लेख आलेला दिसतो.

"श्वेता आणि जवाहरप्रमाणेच अखिलेशचा मृत्यूही कार्डीअ‍ॅक अ‍ॅरेस्टमुळेच झाला असंच ऑटॉप्सीमध्ये समोर यावं असा प्लॅन होता! पण....."

स्पार्टाकस's picture

14 Nov 2018 - 10:28 am | स्पार्टाकस

मनापासून आभार! मूळ ड्राफ्टमधल्या काही प्रसंगांची पुढे-मागे मांडणी करताना ही चूक राहून गेलेली दिसते आहे.

स्मिता चौगुले's picture

14 Nov 2018 - 2:09 pm | स्मिता चौगुले

:) तुम्ही पॉसिटीव्हली घेतले त्याबद्दल धन्यवाद

पुढचा भाग कधी टाकत आहात ?
प्लीज लवकर टाका

स्मिता श्रीपाद's picture

14 Nov 2018 - 10:48 am | स्मिता श्रीपाद

पुढचा भाग कधी ?

संजय पाटिल's picture

14 Nov 2018 - 11:34 am | संजय पाटिल

लवकर टाका....

साबु's picture

14 Nov 2018 - 5:14 pm | साबु

टाका...टाका...टाका...टाका...

स्पार्टाकस's picture

14 Nov 2018 - 8:41 pm | स्पार्टाकस

एलीमेंट्री माय डियर वॉटसन!
कम ऑन! डॉ. मालशेंचा असिस्टंट कोण आहे हे ओळखणं अगदी सोपं आहे! सुरवातीपासूनचे सगळे भाग वाचून तर्कसंगत विचार करा.
सध्या भारतवारीच्या गडबडीत असल्याने शेवटचा भाग टाकायला एखाद-दुसरा दिवस उशीर होण्याची शक्यता आहे.

diggi12's picture

15 Nov 2018 - 12:26 am | diggi12

Bhau jaga hai ajun

प्रीत-मोहर's picture

15 Nov 2018 - 11:50 am | प्रीत-मोहर

ओळखलय बहुतेक मी!!

स्पार्टाकस मस्त मालिका झालीय ही. कन्ट वेट फॉर थे लास्ट एपिसोड नाव!!