यंत्र (भाग ३)

गतीशील's picture
गतीशील in जनातलं, मनातलं
9 Oct 2018 - 10:55 pm

यंत्र (भाग १)
https://www.misalpav.com/node/43400

यंत्र (भाग २)
https://www.misalpav.com/node/43408

परीक्षितने मागे वळून बघितले तर एक ३५शी च्या आसपासचा पण रगेल दिसणारा असा एक माणूस त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत होता..
"बोला सावंत, काय म्हणताय?"
"कोण तुम्ही?" परीक्षितने उसने अवसान आणून विचारले..
"चला जरा..आमच्या साहेबांना बोलायचं तुमच्याशी"
"कोण साहेब? अन कुठे चला? मी येत नाही.ज्याला बोलायचं त्याला इकडे ये म्हणावं"
"चल लौकर. वेळ नाहीये जास्ती आमच्याकडे" असं म्हणत त्या माणसाने परीक्षितला जवळ जवळ ओढतच नेले. ५०मी असं त्याच्यासोबत गेल्यावर रस्त्याच्या डाव्या बाजूला एक गडद निळी जीप उभी होती तिथे जाऊन दोघे थांबले. आत एक हसतमुख माणूस बसला होता. परीक्षितला बघताच तो खाली उतरला...
"हॅलो परीक्षित. कसा आहेस?"
"कोण तुम्ही? माझ्याकडे काय काम आहे?अन हि कसली जबरदस्ती?"
"जबरदस्ती नाहीये, secrecy आहे. म्हणून असं भेटतोय आपण"
"....."
"उद्या कंपनीमध्ये जाऊ नकोस. रोजच्या सारखाच घरातून बाहेर पड, पण कंपनी मध्ये न जाता औंधच्या परिहार चौकात ये. तिथे हा निलेश असेल तो तुला घेऊन येईल पुढे. Don't worry" असे म्हणून त्या माणसाने एक I-Card बाहेर काढले अन परीक्षितपुढे धरले.

फक्त Govt. of India ची राजमुद्रा, एक छोटा फोटो आणि खाली नाव होते..प्रसाद पी चव्हाण..

असले I-Card परीक्षितने आयुष्यात बघितले नव्हते.त्याने काही न बोलता फक्त मान डोलावली.
त्या माणसाने निलेशकडे -जो परीक्षितला इथंपर्यंत घेऊन आला होता तो- बघून इशारा केला अन दोघे गाडीत बसून निघून गेले.

परीक्षित थोडा वेळ तिथे तसाच उभा होता. जे झालं ते समजून घेण्याचा प्रयत्न करत तो घरी कधी पोचला हे त्यालासुद्धा कळले नाही.
रात्री परीक्षित बराच वेळ विचार करत होता कि नक्की काय चालू आहे? त्याने त्याच्या एका जवळच्या मित्राला फोन लावला...
" बोल पर्या"
"स्वप्न्या, काय करतोयस?"
"शेवग्याच्या शेंगा आणायला चाललो आहे. तुला पाहिजेत का?..."
"भंपकपणा करू नको रे. ऐक जरा महत्वाचं बोलायचं आहे"
"बोल"
परीक्षितने मग स्वप्नीलला अथ पासून इति पर्यंत सगळं सांगितलं....
"आता काय करू कळत नाहीये."
"ह्हम्म. असं कर, जा तू उद्या औंधला. तुझ्या मागे मी पण येतो. तो माणूस काय म्हणतोय ते बघ, अन काही धोका वाटला तर मला इशारा कर. मी येतो तिथे लगेच."
"तू काय स्वतःला हिरो समजतोस का? तो कालचा माणूस बघितलास ना, तर २ दिवस सुट्टी टाकून घरी बसशील"
"मग एक काम कर, धुमाळ काकाना सांगून ठेव. असंही परिहार चौकातच त्यांचं ऑफिस आहे ना?"
"हो. हे होऊ शकेल"
"पण मी सुद्धा येतोच. तू निघताना मला सांग. जाताना माझ्याच घरावरून जावं लागेल तुला. तुझ्या मागे मी पण येतो हळूहळू. तुला जर त्यांनी धुवून काढलं तर मला तेवढीच मजा बघायला मिळेल"
"ठेव फोन. चेष्टा सुचतीये ***च्याला "
"बाय"
परीक्षितने धुमाळ काकांना whats app वर सांगितलं. काका म्हणाले ठीक आहे. बघ काय होतंय. अन काहीही लागलं तर मला लगेच सांग. अन तुझ्या त्या मित्राला पण माझा नंबर देऊन ठेव, समजा तुला फोन करायला नाही जमलं तर तो तरी मला करेल लगेच.

सकाळी परीक्षित नेहमीप्रमाणे घरातून निघाला. जाताना त्याने स्वप्नीलला सांगितले होतेच. तोही त्याच्या मागे निघाला.
काळेवाडी फाट्यामार्गे परीक्षित औंध ला आला आणि परिहार चौकात एक छोट्या हॉटेल समोर त्याने त्याची गाडी पार्क केली. स्वप्नीलने पण साधारण १००मी मागे गाडी पार्क केली. स्वप्निलच्या बरोबर समोर औंध पोलीस स्टेशन चे Wireless डिपार्टमेंट होते. स्वप्नीलला जरा बरं वाटलं कि काही झालं तर मदत जवळच आहे.

जसा परीक्षित परिहार चौकात येऊन उभा राहिला, पाठीमागून अचानक निलेश आला व परीक्षितच्या खांद्यावर हलकी चापट मारून म्हणाला..
"माझ्या मागे चल"

परिहार चौक ओलांडून ITI रोड च्या दिशेने दोघे निघाले. समोरच पेशवा हॉटेल होते. तिथे निलेश आत गेला, पाठोपाठ परीक्षित पण आत आला.
स्वप्नील आता परीक्षितच्या गाडीवर येऊन, पेशवा हॉटेल कडे बघत बसला.

हॉटेल पूर्ण रिकामे होते, फक्त एका टेबलवर तो कालचा माणूस-प्रसाद चव्हाण-बसला होता. निलेश त्याच्याजवळ गेला व त्याने त्याच्या कानात काहीतरी सांगितले. त्या माणसाने OK एवढंच म्हंटलं व निलेशला सांगितलं कि तू जा.
"गुड मॉर्निंग. काय घेणार? चहा का कॉफी?" परिक्षीतकडे बघत तो म्हणाला..
"चहा"...परीक्षितने आपण अगदी सहजपणे बोलतोय असं दाखवलं, पण मनातून तो घाबरला होता.
त्या माणसाने वेटर कडे बघून फक्त हाताने २ असं सांगितलं
"काय प्रकार आहे हा? मला का बोलावलं आहे इथं?
"सांगतो. अजून एक जण येणार आहे. निलेश त्यालाच आणायला गेलाय.तो आला कि आपण बोलू. तू तुझ्या मित्राला आत बोलावणार नाहीयेस ना?"
परीक्षित गप्प राहिला. त्याला कळून चुकले होते कि निलेशने स्वप्नीलला बघितले असणार.
थोडंसं हसत तो माणूस त्याच्या मोबाइलला मध्ये व्यस्त झाला.
परीक्षितने पण त्याचा मोबाईल काढला, unlock केला अन हातातच ठेवला.
"सर, चहा" वेटर ने दोघांच्या समोर चहा ठेवला.
हॉटेलच्या दरवाज्याकडे बघत चव्हाण म्हणाले,
"अजून एक घेऊन ये रे."
परीक्षितने मागे वळून बघितले

निलेश सोबत अजय रैना आत येत होता.....

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

शित्रेउमेश's picture

11 Oct 2018 - 9:08 am | शित्रेउमेश

तीनही भाग वाचले. जबरदस्त.... पुलेशु.

गतीशील's picture

11 Oct 2018 - 9:17 pm | गतीशील

आभारी आहे.

ज्योति अळवणी's picture

11 Oct 2018 - 9:35 am | ज्योति अळवणी

मस्त पकड घेते आहे कथा

गतीशील's picture

11 Oct 2018 - 9:17 pm | गतीशील

धन्यवाद ज्योती (ताई, माई, अक्का तुम्ही लावून घ्या जे योग्य असेल ते) :) :)

king_of_net's picture

11 Oct 2018 - 12:36 pm | king_of_net

छान चालु आहे... पु.ले.शु.

गतीशील's picture

11 Oct 2018 - 9:26 pm | गतीशील

आभारी आहे

Shrirang Kulkarni's picture

11 Oct 2018 - 6:31 pm | Shrirang Kulkarni

आता आतुरता थांबवू नका लवकरात लवकर पुढील भाग प्रकाशित करा

गतीशील's picture

11 Oct 2018 - 9:16 pm | गतीशील

आज लिहीत आहे पुढचा भाग. रात्री उशिरा पूर्ण होईल. काल कोणाची प्रतिक्रिया आली नाही, मला वाटलं कंटाळवाणं झालं असेल म्हणून मी काल काही लिहिलंच नाही. पण आज नक्की पुढचा भाग टाकेन