पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग ५

आदित्य कोरडे's picture
आदित्य कोरडे in जनातलं, मनातलं
29 Aug 2018 - 10:45 pm

आधीच्या भागांची लिंक
https://www.misalpav.com/node/43088
https://www.misalpav.com/node/43118
https://www.misalpav.com/node/43144
https://www.misalpav.com/node/43170
मागील प्रकरणात आपण म्हटल्याप्रमाणे आता ह्या भागात आपण फ्रांझ फर्डिनांडच्या खुनानंतरच्या घटना कशा कशा घडत गेल्या, आणि त्यांचे पर्यवसान युद्ध भडकण्यात कसे झाले त्याचा इतिहास पाहणार आहोत. पण हा भाग अतिशय क्लिष्ट, गुंतागुंतीचा आणि तरीही महत्वाचा असल्याने तो एका भागात पूर्णपणे संपवणे शक्य होणार नाही आणखी कमीत कमी दोन भाग तरी त्याला लागतील ...

पहिले महायुद्ध!
प्रकरण १ भाग ५
२० वर्षाच्या कारावासाची शिक्षा झालेला प्रिन्सीप २८ एप्रिल १९१८ रोजी तेरेझीन येथील तुरुंगात ३ वर्षे १० महिने शिक्षा भोगून वयाच्या २३व्या वर्षी वारला. आपण डोळे मिटून झाडलेल्या दोन गोळ्यापासून भडकलेला महायुद्धाचा वन्हि त्याने नक्कीच पहिला असेल. तुरुंगात असला तरी त्याला काही बातम्या समजल्या असतीलच, काय वाटले असेल त्याला! पश्चात्ताप, संताप, दु:ख कि निराशा, कि हे सगळेच! १९१७ साली एका पत्रकाराने तुरुंगात त्याची भेट घेतली आणि नेमका हाच प्रश्न विचारला होता तेव्हा महायुद्ध अगदी जोरात होते आणि त्याचा प्राणप्रिय सर्बियाची वाताहत होत होती पण तो म्हणाला मुळीच नाही . युरोपातले सत्ताधारी लोक आणि जनताही युद्धाला इतके उतावीळ झालेले होते कि मी नाहीतर इतर कुणामुळे हे युद्ध नक्की पेटले असते.
.हिंसाचार, हत्याकांड, रक्तपात ह्यांनी प्रश्न सुटत नाहीत उलट अधिक जटील तरी होतात किंवा नवेच प्रश्न त्यातून उद्भवतात हा इतिहासदत्त धडा त्यातून पुन्हा एकदा मिळाला (अर्थात तो घेतला कुणी नाहीच)
नियतीचा खेळ म्हणा, विचित्र योगायोग म्हणा किंवा ईश्वराची इच्छा म्हणा पण कधी कधी घटना अशा घडतात किंवा अशा घडत नाहीत कि त्याचे आश्चर्य वाटल्या शिवाय राहत नाही. आता एकंदर युरोपातली तेव्हाची परिस्थिती पाहता जसे प्रिन्सिप म्हणाला त्याप्रमाणे जरी फ्रांझ फर्डिनांड त्या दिवशी मारला गेला नसता तरी इतर कुठल्या तरी कारणाने युद्ध पेटलेच असते पण ह्या निर्णायक ठरलेल्या खुनाच्या घटनेच्या साधारण ५१ वर्षे आधी म्हणजे ७ मे १८६६ रोजी असाच एक खुनाचा प्रयत्न झाला जो अयशस्वी ठरला होता. तो जर यशस्वी झाला असता तर मात्र युरोपचा १९ व्या शतकाच्या उत्तरार्धातला आणि मग अर्थात २० व्या शतकाचा , पहिल्या महायुद्धाचा इतिहास खूपच वेगळा असता असे आपण खात्रीशीर पणे म्हणू शकतो. ह्या अत्यंत महत्वाच्या पण साधारण पणे दुर्लक्षित अशा घटनेची माहिती थोडा विषयांतराचा दोष पत्करून सांगितलीच पाहिजे.
१८६६ साली ऑस्ट्रिया आणि प्रशिया मध्ये तणाव वाढलेला होता कारण होते नुकतेच प्रशियाने डेन्मार्क कडून होल्स्टीन आणि श्लेस्वीग प्रांत जिंकून घेतले होते. त्यामुळे प्रशियाचा दबदबा वाढला होता. हे ऑस्ट्रियाला सहन होत नव्हते. त्यामुळे त्यानी प्रशियाकडे होल्स्टीन प्रांताचा ताबा मागितला. जो द्यायला अर्थातच चान्सेलर बिस्मार्क ने नकार दिला. ह्यावरून तणाव वाढत जाऊन दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. प्रशियात तरी अनेकाना ऑस्ट्रियाशी युद्ध नको होते. ऑस्ट्रिया हा जर्मन बहुसंख्य असलेला देश म्हणजे दोन जर्मन भाऊ एकमेकांत एका जर्मन भाषक प्रांतावरून लढणार ही कल्पना अनेकांना सहन होता नव्हती. अनेक जण ह्या करता काउंट बिस्मार्कला जबाबदार धरत होते. (अजून तो प्रिन्स बिस्मार्क व्हायचा होता. तो प्रिन्स बिस्मार्क झाला १८७१ साली फ्रान्सला हरवल्यावर )

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

त्यातलाच एक होता बाडेन ह्या छोट्याशा जर्मनराज्यात जन्मलेला २२ वर्षीय जर्मन ज्यू फर्डिनांड कोहेन ब्लाइंड. त्याने ह्या प्रश्नावर आपल्या कुवती प्रमाणे नेहमीचाच उपाय शोधला. बिस्मार्काचा खून करण्याचा.७ मे१८६६ ला दुपारी बर्लिन मध्ये सम्राटाला भेटून परतत असताना राजवाड्या समोरच्या रस्त्यात गाठून त्याने बिस्माकवर दोन गोळ्या झाडल्या. दोन्ही चुकल्या. गोळ्यांचे आवाज ऐकून पळापळ झाली पण बिस्मार्क न डगमगता सरळ कोहेनला जाऊन भिडला. तो ५१ वर्षांचा होता तर कोहेन २२ वर्षांचा. झटापटीत आणखीन ३ गोळ्या सुटल्या. तोपर्यंत पोलीस तिथे आले. आणि त्यानी कोहेनाला ताब्यात घेतले. बिस्मार्कला काहीहे झाले नव्हते. पाच पैकी एकाही गोळी त्याला लागली नाही. नंतर त्याचे कपडे तपासले तेव्हा तीन गोळ्या त्याच्या कोटातून शर्टातून आरपार निघून गेल्याचे सापडले, कोहेनशी झटापट करताना जे काही थोडेफार ओरखडे त्याच्या अंगावर उमटले असतील तेवढेच काय ते. त्यापलीकडे बिस्मार्कला काहे सुद्धा इजा झाली नाही. कोहेननेनंतर तुरुंगात असताना आत्महत्या केली.
जर्मन एकीकरणाच्या ध्येयाने झपाटलेला बिस्मार्क जर त्यावेळी मारला गेला असता तर जर्मन एकीकरण नक्कीच झाले नसते किंवा बरेच लांबले तरी असते. एकीकृत जर्मानीबद्दल शंका संशय अन विरोध असणारे अनेक जण होते आणि त्याना पुरून उरेल असा राजकारणी/ मुत्सद्दी तेव्हा तरी जर्मनीच्या क्षितिजावर इतर कुणी नव्हता. इतक्या जवळून ५ गोळ्या झाडल्या तरी त्याने साधा ओरखडा ही उठला नाही, जर्मन एकीकरणाचे काम पूर्ण व्हावे ही नियतीची इच्छा आहे. ते काम नियतीने आपल्यावर सोपवले असून त्यामुळेच आपण अशा जीवघेण्या हल्ल्यातून बचावलो असे बिस्मार्कला नक्की वाटले असणार. तो अधिक जोमाने कामाला लागला. असे म्हणतात कि पोलिसांनी कोहेनाला जेरबंद केले आणि त्याला घेऊन जाताना त्याची आणि बिस्मार्काची परत एकदा दृष्टादृष्ट झाली तेव्हा मान ताठ करत बिस्मार्क त्याला म्हणाला, “मला लोहपुरूष उगाच म्हणत नाहीत!(They call me The Iron Chancellor!)”
असो तर पुन्हा एकदा ऑस्ट्रियाकडे, फ्रान्झच्या खुनाने लगेच काही युरोपात किंवा उर्वरीत जगात खळबळ माजली नाही.अनेक लोकाना देशाना हि युरोपातल्या दूरवरच्या त्या बाल्कन भागातली नेहमीचीच खून मारामारीची घटना वाटली.
वर संगीताल्याप्रमाणे फ्रांझ स्वत: ऑस्ट्रियन शासनात फारसा कुणाचा आवडता नसल्याने त्याच्या मृत्यूचे दु:खही फारसेकुणाला वाटले नाही. त्याची शवयात्रा १५-२० मिनिटे फक्त चालली आणि श्रद्धांजली वाहायला तिथे फार मोठे नेते कुणी आलेही नाहीत.अगदी फ्रांझ चा काका आणि ऑस्ट्रियाचा सम्राट फांझ जोसेफ सुद्धा शवयात्रेला आला नाही कि युरोपातल्या राष्ट्रांचे कुणी नेतेही नाही. त्याना तसे आमंत्रणच दिले गेले नाही. इतकेच नाही तर फ्रांझ च्या मुलाना देखील मातापित्याचे अंतिम दर्शन घ्यायला हजर राहू दिले गेले नाही.राजधानी विएन्ना पासून दूर आर्टस्टेटन इथल्या गढीत त्यांना दफन केले गेले. एका अर्थी तो गेला ह्याचे हायसे ऑस्ट्रीयाताल्या राजापारीवाराला वाटले. फ्रांझ जोसेफ तर म्हणाला देखील कि “खरेतर माझी(एकतरी) मोठी चिंता कमीच झाली आहे. जे मी थांबवू शकलो नव्हतो ते नियतीनेच हस्तक्षेप करून केले आहे. हा दैवी संकेत आणि इच्छाच दिसते कि जुनी व्यवस्थाच ऑस्ट्रियात कायम व्हावी.” म्हणजे बघा, अर्थात त्याच्या मृत्यूचे भांडवल करून ऑस्ट्रियाने आपले इप्सित साध्य केलेच. तिथे त्यांचे फर्डिनांड विषयीचे प्रतिकूल मत/ तिरस्कार आड आले नाही. ऑस्ट्रियन सेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फ ह्याने लगेचच ह्यात सर्बियाचा हात असून सर्बियाला ह्याचा धडा शिकवला पाहिजे असे मत व्यक्त केले.२९ जून पासूनच त्याने सर्बियावर लष्करी कारवाई करण्यासाठी आणि सैन्याची तयारी/जमवाजमव करण्यासाठी ऑस्ट्रियन सरकारकडे लकडा लावला.काउंट लिओपोल्ड बर्खटोल्ड हा ऑस्ट्रियाचा परराष्ट्र मंत्री ऑस्ट्रियाचा चॅन्सेलर कार्ल फॉन स्टूर्ख आणि सम्राट जोसेफ ला भेटला आणि सेनापती कोनराडची मागणी त्याने सम्राटाच्या कानावर घातली. पण ऑस्ट्रियाची संयुक्त राजेशाही हंगेरी बरोबर होती. त्यांचे मत घेतल्या शिवाय असा एखादा मोठा निर्णय घेणे जोसेफला शक्य नव्हते आणि हंगेरीचा पंतप्रधान इस्पाहन तिशा हा सर्बियावर हल्ला करायच्या विरोधात होता. ह्याच अर्थ असा नाही कि तो सर्बियाचा हितैषी आणि चाहता होता, उलट तो त्यांचा तिरस्कारच करत असे पण ऑस्ट्रियाचा बोस्निया वेळचा अनुभव लक्षात घेता सर्बियावर हल्ला करून त्यांचा काही प्रांत किंवा अख्खा सर्बियाच, ऑस्ट्रिया गिळंकृत करायचा प्रयत्न करेल अशी त्याला भीती वाटली. तसे झाले असते तर ऑस्ट्रो हंगेरियन साम्राज्यात स्लाव लोकसंख्या वाढून हंगेरियन लोक अल्पसंख्य झाले असते. पुढे ह्याचा प्रतिकूल परिणाम आपल्यावर होऊ शकतो हे जाणून त्याने सम्राट जोसेफ ला शक्यतो वाटाघाटी करून सामोपचाराने काही मार्ग निघतो का बघणे जास्त योग्य राहील असा सल्ला दिला( म्हणजे लष्करी कारवाई नको असेच आडून आडून सांगितले.)तरीही जर सर्बिया बधला नाही तर लष्करी कारवाई करावी पण सर्बियाचा मुलुख तोडून घेऊ नये फक्त युद्धात पराभव करून धडा शिकवावा असे मत मांडले.
फक्त हंगेरीच नाही तर ऑस्ट्रियाला जर्मनीकडे ही पाठीम्ब्यासाठी पाहणे भाग होते. मागे बोस्नियन पेचाच्या वेळी जर्मनीला विश्वासात न घेऊन त्यानी कैसरची खप्पामर्जी ओढवून घेतली होती आता पुन्हा तसे करता उपयोगी नव्हते.त्यामुळे स्वत: सम्राट जोसेफने कैसरला पत्र लिहून आपला मनोदय जाहीर केला. बर्खटोल्डने दुसरे पत्र लिहिले ज्यात ऑस्ट्रिया सर्बियावर कारवाई कशी करेल आणि पुढे नंतर सर्बियाचे काय करायचे ह्याची ऑस्ट्रियन योजना अगदी तपशीलवार लिहिली. बर्लिन मधला ऑस्ट्रियाचा राजदूत आलेक्झाडर होयास ह्याने दोन्ही खलिते कैसरला सोपवले. तारीख होती ५ जुलै १९१४. इथून ते २८ जुलै १९१४ रोजी ऑस्ट्रियाने सर्बियावर युद्ध घोषित करण्याच्या दिवसापर्यन्तच्या कालखंडाला जुलै संकट म्हणून ओळखले जाते. काय आणि कसे घडले हे अगदी तपशीलवार नाही तरी थोडक्यात पाहणे मोठे उद्बोधक आहे. ह्यात विशेषत: ऑस्ट्रियासारख्या आकाराने मोठ्या पण अनेक देश, वांशिक गटांचे कडबोळे असलेल्या साम्राज्याचा भोंगळ कारभार,उतावळेपणा, निर्णय घेणे आणि त्वरेने त्याची अंमलबजावणी करणे ह्यातली दिरंगाई हे ही दिसून येते. (अनेक (इतिहासकार हे प्रकरण १-२ परिच्छेदात गुंडाळतात पण तसे केल्याने नक्की काय आणि का घडले त्याचे चित्र डोळ्यांसमोर येत नाही असो...)
खरेतर कैसर विल्हेल्म हा फ्रांझ च्या खुनाने संतापला होता पण त्याच्या एकट्याच्या हातात काही नव्हते, जर्मन मंत्री मंडळाची समजूत काढणे आणि पाठींबा मिळवणे महत्वाचे होते.त्यामुळे बर्खटोल्डचे खलिते घेऊन जेव्हा होयास गेला तेव्हा मंत्री मंडळाशी बोलून काय ते सांगतो असे सांगून कैसरने त्याला वाट पाहायला लावले. त्याच दिवशी दुपारी होयास आर्थर झिमरमन ह्या जर्मन पराष्ट्र मंत्र्याला भेटला आणि त्याने सर्बियावर हल्ला करून त्याच्या भूभागाचे तुकडे करून ते बल्गेरिया आणि रोमानिया बरोबर वाटून खायचे असा ऑस्ट्रियाचा मनोदय जाहीर केला. दोघेजण संध्याकाळी चान्सेलर आल्फ्रेड फॉन बेथमान- होल्वेग ह्याला भेटले. तेथे होयोसने ऑस्ट्रिया सर्बियावर लष्करी कारवाई करणार असून त्यामुळे रशिया सर्बियाला पाठीशी घालू शकतो अशा प्रसंगी जर्मनी ऑस्ट्रियाच्या पाठीशी उभा राहणार का? अशी विचारणा केली. त्यावर कैसर आणि चान्सेलर बेथमान-होल्वेग दोघानी आश्वासन दिले कि ते पूर्णपणे ऑस्ट्रियाच्या पाठीशी उभे असून सर्बियाविरीद्ध जी काही कारवाई करतील त्याला जर्मनीचा पाठींबा आणि सक्रीय मदत दोन्ही असेल. तसेच काळजी करू नका, रशिया मध्ये पडला तर आम्ही देखील ऑस्ट्रियाच्या बरोबर उभे राहू असे सांगितले.
ह्यालाच जर्मनीचा कोरा चेक(विनाशर्त पाठींबा) असे इतिहासात म्हटले जाते. ह्या आश्वासनानंतर ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला करण्याची तयारी सुरु केली त्याना रशियाचे वाटणारे भय कमी झाले आणि एकंदरीत महायुद्धाचा भडका उडायाला हा जर्मनीचा कोरा चेक काही प्रमाणात कारणीभूत झाला असे म्हणायला वाव आहे.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

का दिला असेल जर्मनीने हा कोरा चेक त्याना? नक्की सांगता येणे कठीण आहे परंतु मागील ५ घटनांकडे पाहता जर ऑस्ट्रियाने तातडीने सर्बियावर हल्ला केला तर रशिया,फ्रांस ला त्यांच्या मदतीला इतक्या त्वरेने येता येणार नाही विशेषत: जर्मनी ऑस्ट्रियाच्या पाठीशी असताना, आणि दरम्यानच्या काळात सर्बियाची खोड चांगली मोडून झाल्यावर, त्यांचा पुरेसा वचपा काढून झाल्यावर नेहमीप्रमाणे आंतरारष्ट्रीय परिषद बोलावून प्रश्नावर आपल्याला सोयीस्कर असा समझोता करता येईल म्हणजे थोडक्यात कोरा चेक दिला असला तरी तो बँकेत वटवायची वेळच येणार नाही असे त्यांना वाटले असावे. पण ऑस्ट्रियाचा भोंगळ कारभार त्यांचा घात करणार होता.ह्या भेटीनंतर कैसर लगेचच आपली अर्धवट राहिलेली सुट्टी घालवायला नॉर्वेला निघून गेला. हे एका अर्थाने बरेच होते त्यामुळे जर्मनी आणि ऑस्ट्रिया काही खलबत करत आहेत असा संशय त्यावेळीतरी कुणाला आला नाही.
तर अशाप्रकारे खिशात जर्मनीचा कोरा चेक घेऊन होयास ऑस्ट्रियाला परतला. आता फक्त सर्बियावर हल्ला करणे बाकी होते पण गोष्टी इतक्या सोप्या नव्हत्या.विशेषत: ऑस्ट्रिया सारख्या दहा भिन्न भिन्न भाषक आणि वांशिक गटांचे कडबोळे घेऊन राज्य करणाऱ्या साम्राज्यासाठी.
७ जुलै १९१४ ला परराष्ट्र मंत्री बर्खटोल्डने युद्ध समितीची बैठक बोलावून जर्मानेच्या विनाशर्त पाठीम्ब्याची माहिती दिली आणि बाकीचे सगळे म्हणजे रशिया फ्रांस आणि दस्तुरखुद्द सर्बिया बेसावध असताना त्यांच्या वर तातडीने हल्ला करावा शक्य झाल्यास दोन दिवसातच करावा असे सुचवले. सगळ्याना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या खास करून सरसेनापती कोनराड फॉन हॉटझेनडोर्फला. पण पुन्हा एकदा हंगेरीचा पंतप्रधान इस्पाहन तिशा ह्याने खोडा घातला. तो सर्बियावर कारवाई करायच्या विरोधात होता हे मागे आलेच आहे पण आता झिमरमन, होयास आणि कैसरशी झालेल्या चर्चेतून सर्बिया पादाक्रांत करून त्याचा मोठा लचका तोडून ऑस्ट्रिया गिळणार म्हणजेच ऑस्ट्रियन लोकसंख्येत स्लाव लोकांची भर पडणार हे समजल्यावर तो अजून बिथरला. त्याने मुद्दा मांडला कि जरी अचानक हल्ला केल्याने रशिया फ्रांस काही त्वरेने सर्बियाच्या मदतीला नाही आले तरी इतर बाल्कन देश ह्याने बिथरून सर्बियाला लगेच मदत करू शकतील किंवा सीमांवर गडबड करू शकतात.ट्रान्स सिल्वेनिया हा प्रांत हंगेरियन अंमला खाली होता ( हा तोच प्रांत जो इतिहासात व्लाड द इम्पेलर म्हणजेच काउंट ड्रॅक्युलाचा प्रांत म्हणून प्रसिद्ध आहे)पारंपारिक आणि ऐतिहासिकरित्या हा प्रांत रोमानियाचा भाग असल्याने ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला केला तर रोमानिया लगेच हा प्रांत बळकावण्यासाठी गडबड करेल अशी साधार भीती त्याला वाटत होती. म्हणून मग त्याने लगेच लष्करी कारवाई करण्या आधी सर्बियाला झाल्या प्रकाराबद्दल जाब विचारून त्या अत्याचाराच्या निवारणार्थ काही अटी घालाव्यात / मागण्या कराव्यात आणि जर त्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मग निर्वाणीचा खलिता पाठवून हल्ला करावा. असे सुचवले. म्हणजे जर सर्बियाने मागण्या मान्य केल्या तर तो आपला राजनयिक विजय असेल आणि नाही मान्य केल्या तर ते कारण हल्ला करण्यासाठी पुरेसे असल्याने आंतरारष्ट्रीय व्यासपीठावर ऑस्ट्रियाची बाजू भक्कम होईल असे सुचवले. सर्बियाबरोबर हे असले चर्चा आणि वाद प्रतिवादाचे दळण घालत बसणे मंत्री मंडळात इतर कुणाला मान्य नव्हते पण तिशा अडूनच बसला आणि त्याच्या संमतीशिवाय हल्ला करता येणे शक्य नसल्याने शेवटी अनिच्छेने का होईना त्याच्या म्हणण्याला मान्यता दिली गेली.
इकडे जर्मन सरकारची धारणा झाली होती कि आपला इतका भक्कम आधार असल्यावर आता १-२ दिवसात ऑस्ट्रिया सर्बियावर हल्ला करेल, पण तशी काही हालचाल होताना दिसेना. ऑस्ट्रियाकडून काहीच खबर येईना तेव्हा शेवटी ऑस्ट्रियातल्या जर्मन राजदूताने विचारणा केली कि अजून ऑस्ट्रियाने सर्बियावर हल्ला का केला नाही? तर त्याला सांगितले गेले कि १५ जुलै पर्यंत ऑस्ट्रिया हल्ला करेल. पण हे साफ खोटे होते.
एक तर तिशाने सांगितल्याप्रमाणे सर्बियाला जाब विचारणारा खलिता पाठवायचा म्हणजे तो तयार करायला हवा आणि तो सम्राट तसेच सर्व मंत्री मंडळाकडून मान्य करून घ्यायला हवा, ते करायचे तर ह्या सर्वांची (गुप्त) बैठक बसली पाहिजे आणि ते १९ जुलै पर्यंत शक्य नव्हते. हे कमी म्हणून कि काय आतापर्यंत युद्ध सुरु करा युद्ध सुरु करा म्हणून धोशा लावलेल्या सरसेनापती कोनराडने बॉम्ब टाकला. जुलै- ऑगस्ट ह्या काळात ऑस्ट्रियात सुगी असल्याने बहुतांश सैनिक आपापल्या गावी शेतीची कामे करण्यासाठी सुटीवर असत. त्याना रजा रद्द करून ताबडतोब आपापल्या युनिट मध्ये, रेजिमेंट मध्ये रुजू होणे शक्य नव्हते शिवाय तसे केले असते तर ऑस्ट्रियाच्या हेतूबद्दलही बाहेर शंका आली असती अन ऑस्ट्रियाचे बिंग फुटले असते.(२०व्य शतकाच्या सुरुवातीला अशाप्रकारे सैनिक शेतीचे काम करायला रजेवर जात म्हणजे ऑस्ट्रिया मधली राज्ययंत्रणा कोणत्या युगात वावरत होती पहा.) त्यामुळे २४-२५ जुलै पर्यंत अशी कोणतीही लष्करी कारवाई करता येणे ऑस्ट्रियाला शक्यच नव्हते.
तर सर्बियाला पाठवायच्या निर्वाणीच्या खलित्याचा मसुदा आणि ऑस्ट्रियाच्या मागण्या ठरवण्यासाठी १९ जुलै ला परत एकदा ऑस्ट्रो हंगेरियन मंत्री मंडळाची बैठक जमली. स्वत: बर्खटोल्ड ने त्याचा खर्डा तयार केला होता. आता मंत्री मंडळात आपण एकटेच पडत चाललो आहोत आणि याहून जास्त विरोध करता येणे अशक्य झाले आहे असे पाहून तिशानेहे मान तुकवली आणि सर्बियाला पाठवायचा खलिता तयार झाला. तो दुसऱ्या दिवशीच म्हणजे २० जुलै रोजी सर्बियाताल्या ऑस्ट्रियन राजदूत गीस्लीन्जेन कडे सुपूर्द केला गेला पण त्याला तो सर्बियाकडे कधी सुपूर्द करायचा त्याचे निर्देश येईपर्यंत वाट बघायला सांगितले. ह्या दिरन्गाइचे कारण मात्र वेगळे, खास आणि सयुक्तिक होते.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१५ जुलै ते २३ जुलै फ्रेंच पंतप्रधान रेमंड प्वंकारे आणि राष्ट्राध्यक्ष रेने विवियानी आणि इतर फ्रेंच शिष्ट मंडळ हे रशियाच्या दौऱ्यावर होते. जलमार्गाने प्रवास करत ते २० तारखेला रशियाला पोहोचले होते आणि चार दिवस राजकारणावर आणि रशिया फ्रांस मधल्या मैत्रीकारारावर चर्चा करून २३ तारखेला संध्याकाळी ते परत फ्रान्सला निघणार होते. त्याकाळी जहाजावर असताना संदेश पाठवण्याचे रेडियो तंत्र तितके विकसित झाले नव्हते. जरी हा दौरा खूप आधीच ठरला असला तरी अचानक झालेल्या फ्रांझ च्या खुनासम्बंधी त्यामुळे युरोपात पुढे काय परिस्थिती उद्भवू शकेल आणि त्यावेळी आपण काय करायचे ह्यावर खलबतं होणार हे उघड होते. अशात जर ऑस्ट्रियाने सर्बियाला पाठवलेल्या निर्वाणीच्या खलित्याची बातमी त्यांना समजली असती तर त्यानी नक्कीच ह्यावर चर्चा करून संयुक्तपणे सर्बियाला पाठीम्बा जाहीर केला असता. पण जर हा खलिता मिळाल्याची बातमी शिष्ट मंडळाने रशिया सोडल्यावर मिळाली असती तर कमीत कमी पुढचे ५ दिवस म्हणजे ते फ्रान्सला पोहोचे पर्यंत त्याना काही ठरवणे/करणे शक्य नव्हते असा विचार करून ते फ्रेच शिष्ट मंडळ रशियाहून निघाल्यानंतर साधारण १ तास होई पर्यंत म्हणजे २३ जुलै संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत वाट पहायचे ठरले. अर्थात फ्रेंच आणि रशियन मुत्सद्दी काही दुध खुळे नव्हते, फ्रांझच्या खुनानंतर ऑस्ट्रीया दांडगाई करून सर्बियाला दमात घ्यायचा प्रयत्न करणार हे माहिती असल्याने दौऱ्यावर असतानाच त्यानी रशियातल्या सर्बियन राजदूताला काय वाटेल ते झाले तरी घाबरू नका वेळ पडली तर आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहोत असे आश्वासन दिले होते.
ठरल्याप्रमाणे २३ जुलैला संध्याकाळी ६ वाजता ऑस्ट्रियन राजदूत गीस्लीन्जेन सर्बियन परराष्ट्र मंत्रालयाच्या कचेरीत गेला आणि आपल्याला सर्बियन पंतप्रधान निकोलस पॅसेज ह्याला महत्वाचा आणि तातडीचा खलिता द्यायचा असून त्याकरता त्याची भेट हवी असल्याचे सांगितले.
पण इतक्या लांबलेल्या ह्या राजकीय नाट्याचा पहिला अंक असा सहज संपणार नव्हता. २३ जुलैला ऑस्ट्रियाकडून आपल्याला काहीतरी जाब विचारणारे पत्र मिळणार अशी कुणकुण लागलेली असल्याने सर्बियाचा पंतप्रधान निकोलस पॅसेज आणि इतर महत्वाचे मंत्री आधीच सर्बियात होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराचे कारण करून राजधानी बेलग्रेड मधून निघून गेले होते. आता ऑस्ट्रियाच्या सांगण्याप्रमाणे इतका महत्वाचा खलिता घेण्याकरता त्या तोलामोलाचा अधिकारी व्यक्ती तिथे कुणी नसल्याने काही दिवसांनी परत आपण येऊ शकाल काय अशी उलट विचारणा सर्बियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली त्यावर भडकून गीस्लीन्जेनने तो सीलबंद लखोटा तिथल्या टेबलावर आपटला आणि काय करायचे ते करा असे सांगुन तो तिथून निघून गेला.
ऑस्ट्रियाने त्या खलित्यात मुख्य १० मागण्या केल्या होत्या आणि ४८ तासात उत्तर मागितले होते. परंतु त्या मागण्या सर्बियाने अंशत: किंवा पूर्णत: फेटाळल्या तर ऑस्ट्रिया काय करणार आहे हे स्पष्टपणे नमूद केलेले नव्हते.
आपण नसतानादेखिल ऑस्ट्रियन राजदूताने पत्र दिल्याची बातमी कळल्यावर पंतप्रधान पॅसेज घाई घाईने बेलग्रेडला परतला. त्याने मंत्रीमंडळाची तातडीची बैठक बोलावली. ऑस्ट्रियाने ज्या १० मागण्या केल्या होत्या त्या खालील प्रमाणे होत्या.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

१.सर्बियात ऑस्ट्रिया विरोधी जे मजकूर छापून येत असतात किंवा वृत्तपत्रातून ऑस्ट्रियाची निर्भर्त्सना, निंदा करणारे जे संपादकीय,लेख वगैरे येत असत त्यावर बंदी घालावी.
२.सर्बियातील जहाल राष्ट्रवादी/ दहशतवादी संघटना “नारोद्ना ओद्ब्राना”वर बंदी घालून तिची कार्यालये व इतर समान सुमान, मिळकती जप्त कराव्यात.( फ्रान्झ्च्या खुनात ह्या संघटनेचा हात असल्याचा ऑस्ट्रियाला संशय होता जे अर्थात चुकीचे होते.)
३.शासकीय कार्यालये शाळा कॉलेजेस विद्यापीठे इथे जे काही ऑस्ट्रीयाविरोधी मजकूर छापले जातात , शिकवले जातात ते ताबडतोब बंद करावेत
४.ऑस्ट्रिया ज्यांची नावे सांगेल अशा सर्व लष्करी आणि शासकीय अधिकाऱ्याना सेवेतून ताबडतोब बडतर्फ करावे
५.सर्बियातील ऑस्ट्रिया विरोधी चळवळी आणि कारवाया लगेच थांबवण्यासाठी ऑस्ट्रिया सांगेल त्याप्रमाणे वागून ऑस्ट्रियाला सहकार्य करावे.
६.फ्रांझ च्या खुनाच्या कटाचा सर्बियात तपास करण्यासाठी ऑस्ट्रियाच्या अधिकाऱ्याना ह्या तपासकामी सामील करून घ्यावे.
७. कटातील मुख्य सूत्रधार मेजर ऑस्कर टान्केस्चीझ आणि मिलानो सिगानोवीच ह्यांना ताबडतोब अटक करून ऑस्ट्रियाच्या स्वाधीन करावे.
८.सर्बियातून ऑस्ट्रियात होणारी शस्त्रास्त्रांची तस्करी आणि दहशत वाद्यांची घुसखोरी थांबवावी आणि ह्या कारवायात आधीच जे गुन्तले होते त्याना ऑस्ट्रिया कडे सोपवावे
९. २८ जून च्या खुनानन्तर ऑस्ट्रिया विरोधी लिखाण आणि वक्तव्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे व त्यांच्या ह्या कृत्याचा जाब/स्पष्टीकरण ऑस्ट्रियन सरकारकडे सुपूर्द करावा.
१०.ऑस्ट्रियन सरकारला वरील मागण्या पूर्ण करण्यासठी सर्बिया काय काय उपाय करणार हे लगेच कळवावे.
ह्या मागण्या वाचल्यावर लगेच कळते कि ह्या अत्यंत अपमान जनक आणि सर्बियाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वालाच आव्हान देणाऱ्या मागण्या होत्या. पण त्या मुद्दाम तशा केल्या गेल्या होत्या, हे गृहित धरून कि त्या सर्बिया फेटाळून लावेल आणि मग ऑस्ट्रियाला सर्बियावर हल्ला करायला एक वैध कारण सापडेल.
ह्या मागण्यांबद्दल अन्तिमोत्तर देण्याची मुदत होती ४८ तासांची म्हणजे २५ जुलै १९१४ रोजी संध्याकाळी ६ वाजे पर्यंत, पण तोपर्यंत उत्तर दिले नाहीतर किंवा मागण्या पूर्णत: अथवा अंशात: फेटाळल्या तर ऑस्ट्रिया काय करणार ह्याचा उल्लेख त्यात नव्हता. आंतरराष्ट्रीय संकेताप्रमाणे ह्या निर्वाणीच्या खलित्याची प्रत इंग्लंड फ्रांस रशिया जर्मनी ह्याना ही दिली गेली होती.इतरांच्या प्रतिक्रिया सोडा खुद्द नॉर्वे इथे शाही बोटीवर सुटी घालवत असलेल्या कैसरला जेव्हा ह्या मागण्या समजल्या तेव्हा तो देखील म्हणाला कि बापरे! खूपच कडक मागण्या केल्या आहेत ऑस्ट्रियाने. आता सर्बिया काय करतो हे पाहायचे.
ह्या मागण्याना सर्बियाकडून काय उत्तर आले आणि त्यावर ऑस्ट्रियाने पुढे काय केले ते पुढच्या भागात पाहू ...
क्रमश:
--आदित्य

इतिहासलेख

प्रतिक्रिया

शाम भागवत's picture

30 Aug 2018 - 8:28 am | शाम भागवत

छान चाललिआहे मालिका

उत्तम , पहिल्या महायुद्धातील घटनांचा मागोवा छान घेत आहात .
येऊ द्या पुढचा भाग

बऱ्याच दिवसांनी टाकलात जणू..
किती दिवस वाट बघायची.

असो, आता सावकाश वाचतो

नजदीककुमार जवळकर's picture

31 Aug 2018 - 2:17 pm | नजदीककुमार जवळकर

वाचतोय चालू ठेवा ..रंगतंय मस्त !!

प्रसाद_१९८२'s picture

31 Aug 2018 - 2:38 pm | प्रसाद_१९८२

माहितीपूर्ण लेख !
--
वाचतोय !

प्रमोद देर्देकर's picture

31 Aug 2018 - 3:15 pm | प्रमोद देर्देकर

मस्त . लिहा पटापट

लोनली प्लॅनेट's picture

1 Sep 2018 - 10:50 am | लोनली प्लॅनेट

खूप मस्त मालिका
वाचत आहे

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Sep 2018 - 2:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

वाचत आहे. पुढचे भाग शक्यतो लवकर टाका.

विषयावर लिहायचं तेही रंजकता ठेवून ,आणि सहजसोप्या भाषेत सांगीतले आहे.

पु भा प्र

बाजीप्रभू's picture

2 Sep 2018 - 8:35 am | बाजीप्रभू

सर तुम्ही खूप वाट बघायला लावता... लवकर येउदेत पुढचे भाग.. पुभाशु.