११ नोव्हे १९१८ रोजी सकाळी ११ वाजायला एक मिनिट बाकी असताना हेन्री निकोलस जॉन गुंथर हा अमेरिकन सैनिक जर्मन मशीनगन च्या माऱ्याला बळी पडला. आश्चर्य असे कि तो जन्माने जर्मन-अमेरिकन होता. तो मेल्यानंतर १ मिनिटात सर्व युरोपभर युद्ध विराम लागू झाला. युरोपभराच्या चर्च मधून घंटानाद करून हे वर्तमान सांगितले गेले . लंडनचे बिग बेन घड्याळ १९१६पासून बंद होते त्याने ११.०० वाजता परत एकदा टोल दिले. गेली ४ वर्षे ३ महिने अविरत धडाडत असलेल्या तोफा-बंदुका शांत झाल्या. सर्व युरोपभर शांतता पसरली. अनेकाना ती भेसूर वाटली कारण,.... ती भेसुरच होती.सव्वाचार वर्षे सतत चाललेल्या ह्या नरमेधातून जे वाचले ते स्वत:ला सुदैवी समजत होते कि नाही नक्की सांगता येणार नाही पण त्यानी बरेच काही गमावले होते. शरीराचे अवयव, मानसिक संतुलन, आयुष्यावरचा,सौंदर्य, चेहरा अन सौन्दर्यावरचा विश्वास, जगण्याची अभिलाषा,आणि इतरही बरेच काही. पुन्हा कधीही असे होऊ द्यायचे नाही असे सगळेच जेते म्हणाले. पण फक्त २० वर्षात परत अशाच एका भयानक आवर्तात सगळे ओढले गेले.
यंदा म्हणजे २०१८ साली ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ११वाजता पहिले महायुद्ध संपल्याला १०० वर्षे पूर्ण होताहेत त्यानिमित्त ही लेखमाला
पहिले महायुद्ध!
विसावे शतक हे अनेक अर्थाने अभूतपूर्व होते.मानवी संस्कृतीच्या / सभ्यतेच्या इतिहासात इतक्या मोठ्या घडामोडी, इतकी प्रचंड उलथापालथ ह्याआधीच्या कुठल्याही शतकात क्वचितच झाली असेल. विज्ञान-तंत्रज्ञानाची, कृषीपासून वैद्यकीय आणि इंजिनियरिंग पासून ते अवकाश संशोधन,अशा सर्वच क्षेत्रातली झंझावाती प्रगती आणि त्यानेच निर्माण केलेले असंख्य अक्राळ विक्राळ प्रश्न हे तर ह्या शतकाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागेल.विज्ञानाप्रमाणेच समाजकारणातही नवनव्या संकल्पना, नवे प्रयोग झाले. औद्योगिकरणामुळे नवी समाजव्यवस्था येऊन फक्त मजूर वर्गाचा उदय आणि त्यांच्या समस्या ह्याच गोष्टी विसाव्या शतकात महत्वाच्या ठरल्या नाहीत तर एकूणच औद्योगिकरणाने शेती, व्यापाराबरोबर सत्ता, सत्तासंघर्ष इथपासून ते युद्ध, युद्धतंत्रापर्यंत सगळीकडे आमूलाग्र परिवर्तन घडून आले. अनेक राजघराणी संपली, सरंजामशाहीचा अस्त, साम्यवादाचा उदय, विजय आणि त्याचे पतन, अनेक हुकुमशाह्यांचा उदय आणि अस्त हे देखिल पाहायला मिळाले.(बाय द वे हुकुमशाही जरी राजेशाहीचेच एक “भेस बदला हुआ रूप” असले तरी विसाव्या शतकातल्या बहुतेक हुकुमशहांना समाजवादाचे कातडे पांघरावे लागले हि विशेष उल्लेखनीय बाब.तसेही हुकुमशहा हे विसाव्या शतकातच उदय पावले त्याधी राजे, सरदार, सामंत वर्ग आणि धर्मगुरू त्यांची गादी चालवत.) विसाव्या शतकातच हि परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनली कि इथे अब्राहम लिंकन च्या १९व्य शतकातल्या भाषणातील एक भाग उदधृत करायचा मोह आवरत नाही
The dogmas of the quiet past are inadequate to the stormy present. The occasion is piled high with difficulty, and we must rise -- with the occasion. As our case is new, so we must think anew, and act anew. We must disenthrall ourselves, and then we shall save our country.
-Abrahm Lincoln
Washington, D.C.
December 1, 1862
Speech at Annual Congress meet
भावार्थ
गत-इतिहासातून मिळणारे धडे ‘झंझावाती-वर्तमानातले’ प्रश्न सोडवायला पुरेसे पडत नाहीत.परिस्थिती इतकी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक बनलेली असते कि आपल्याला बऱ्याचदा नवा विचार/ नवे उत्तर, नवी समीकरण शोधावी लागतात. आणि म्हणून गतानुगतिकता सोडून देऊन नव्या- मुक्त विचारांना, संकल्पनांना संधी द्यावीच लागते. त्याशिवाय पर्याय नसतो. जे समाज, देश हे करू शकत नाहीत, त्यांचं नष्टचर्य लवकरच सुरु होतं.
ह्या विसाव्या शतकाने पूर्वार्धातच दोन महायुद्ध पहिली. खरे पाहू जाता पहल्या महायुद्धाचेच extension दुसरे महायुद्ध होते, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कल्पनातीत अशी हानी, संहार त्या पिढीने पहिला, अनुभवला, नव्हे त्यात स्वत: भाग घेऊन तो केला.कोणत्याही प्रकारचे उच्च तत्व राखण्यासाठी किंवा दमनाविरुद्ध म्हणून हे युद्ध सुरु झाले नाही, (अर्थात तसा दावा ह्या युद्धातल्या जेत्यांनी केलाच जसा तो दुसऱ्या महायुद्धाबाबत देखील केला.) तरीदेखील ह्या युद्धात एकूण २४ लहान मोठ्या देशांनी सक्रीय सहभाग घेतला,एक अंटार्क्तीका हे खंड सोडलं तर प्रत्येक खंडातले कुठले न कुठले राष्ट्र ह्या युद्धात सामील झाले. युद्ध संपे पर्यंत चार प्रचंड मोठी साम्राज्य लयाला गेली. युरोपचा आणि जगाचा नकाशा पार बदलून गेला. सुरुवातीला चार साडे चार महिन्यातच ही सगळी धामधूम आटोपून सैनिक परत १९१४चा नाताळ साजरा करायला आपापल्या घरी जातील असे सगळ्यानांच वाटले होते. प्रत्यक्षात साडेचार वर्ष हे युद्ध चालले आणि ह्यात दोन्ही बाजूचे मिळून साधारण १ कोटी ६५ लाख लोक कामी आले तर २ कोटी १२ लाखाच्यावर लोक जखमी झाले. १९१४चा काळ पहिला तर ही आकडेवारी भयानक आहे.ह्या युद्धात भाग घेतलेल्या राष्ट्रांच्या एकूण लोकसंख्येच्या जवळपास २% लोक ह्या युद्धात कामी आले. १९व्या शतकापर्यंत तग धरून असलेली समाज व्यवस्था हादरून गेली...हे युद्ध जमिनीवर, जमीनीखालून, समुद्रावर, समुद्राखालून, आकाशात लढले गेले.प्रचंड प्रमाणावर विषारी वायूचा वापर करून हवा हे देखील जणु एक युद्ध क्षेत्रच बनवले गेले, मशीनगन सारख्या शस्त्राचा वापर आधीही माहिती होता पण चाल करून येणाऱ्या सैनिकाच्या शिस्तबद्ध रांगा तितक्याच शिस्तबद्ध रीतीने मशीनगनच्या साह्याने कापून काढण्याचे तंत्र मात्र इतक्या प्रभावीपणे ह्या आधी वापरले गेले नव्हते.साधारणपणे युद्ध किंवा लढाई झाल्यावर जेत्यांच्या आक्रमणाला आणि क्रौर्याला बळी पडणारी नगरे प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रच बनून गेली आणि सर्वसामान्य जनता आता युद्धात अगदी सुरुवाती पासून भरडली जाऊ लागली.
पण त्याच बरोबर आतापर्यंत गुलामीत असलेले अनेक देश, मानव समूह, समाज स्वतंत्र होऊ लागले. स्वयंशासन, स्वयंनिर्णय, समाजवाद, लोकशाही, साम्यवाद अशा अनेक विचारधारा आतापर्यंत मागास, गुलाम राहिलेल्या समाजात रुंजी घालू लागल्या. विज्ञान-तंत्राज्ञान, उद्योग, उड्डयन, दळणवळण, रेल्वे, व्यापार अशा सर्वच क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली.वैद्यकीय क्षेत्र हे ह्या साडेचार वर्षात आधी कधीच झाले नव्हते इतक्या झपाट्याने विकसित झाले.सेवा शुश्रुषा सर्जरी प्लास्टिकसर्जरी , कृत्रिम अवयव, प्रथमोपचार, वेदनाशामक औषधे , प्रत्यारोपण,मानसोपचार अशा वैद्यकीय क्षेत्रातल्या असंख्य शाखांचा विकास झाला. युद्धाआधीही लोकाना विमान, मोटारी माहिती होत्या रेल्वे गाड्यातर अगदी नित्यपरिचयाच्या झाल्या होत्या पण ह्या युद्धाने त्यांच्या वापराला आणि विकासाला प्रचंड गती दिली.आफ्रिका आशियातल्या अनेक देशाना/ मानव समूहाना स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने काही सकारात्मक बदल ही घडू लागले. स्त्रियांच्या अधिकाराठीचे/ स्वातन्त्र्यासाठीचे, समानतेसाठीचे लढे त्यांचे राजकीय हक्क, नागरीहक्क मिळवण्यासाठीचे संघर्ष आणि त्यात मिळालेले यश (मर्यादित का होईना)हे देखील अंशत: ह्या युद्धाचेच फलित.
वसाहत वाद आणि त्या वसाहतीतून मिळणार्या उर्जेवर इंग्लंड फ्रांससारखे युरोपियदेश आपले उच्चतर मानवी संकृतीचे मळे फुलवत होते. तर इटली जर्मनी सारखे खेळात उशीरा सामील झालेले भिडू आपल्याला ह्या आधीच जुन्या भिडूनी बळकावलेल्या वसाहतीताला हिस्सा कसा लाटता येईल ह्या विवंचनेत होते.खरेतर त्यामुळेच ह्या युद्धाचा वणवा पेटला होता. ह्या युद्धाने प्रचलित साम्राज्यावादाला आणि वसाहतवादाला धक्का बसला.अर्थात साम्राज्यवाद किंवा वसाहत वाद पूर्ण नष्ट झाले नाहीत पण त्यांचे बाह्यस्वरूप इतिहासात प्रथमच बदलले गेले. अमेरिकेसारखा भांडवलवादावर बलवान झालेला मोठा भिडू आता मैदानात आला. त्याने जागतिक सत्तेचे केंद्रच युरोपातून हलवले.तोपर्यंत युरोपातील सत्तेचा समतोल हा युरोपातीलच राष्ट्रात फिरत्या करंडकाप्रमाणे फिरवला जात असे आणि जो ह्यात वरचढ ठरत असे तोच सगळ्या जगाच्या सत्ता सामातोलावर प्रभाव टाकत असे. ह्या युद्धाला महायुद्ध, जागतिक महायुद्ध, सर्व युद्धांचा अंत करणारे युद्ध अशा विशेषणांनी गौरवले गेले. अर्थात तसे काही जरी झाले नाही तरी आधुनिक युद्धाची संहारक क्षमता लक्षात येऊन जगातल्या सर्व राष्ट्रांनी एकत्र येऊन आपसातले तंटे सामोपचाराने मिटवावे म्हणून संयुक्त राष्ट्रसंघा सारख्या संस्थेची उभारणी करण्याची गरज ओळखून त्यादृष्टीने प्रयत्न सुरु झाले. त्यालाही मर्यादितप्रमाणात का होईना पण यश मिळाले.
तर त्या महान घटनेचा हा संक्षिप्त इतिहास.
दिवे मालवू लागले ...
“Lamps are going out all over europe: We shall not see them lit again in our life time.”
सर्व युरोपात दिवे मालवू लागले आहेत आणि मला नाही वाटत कि आपल्या हयातीत ते पुन्हा उजळलेले पहायला मिळणार आहेत...
-सर एडवर्ड ग्रे – ब्रिटनचे परदेश सचिव (तत्कालीन)
परिस्थिती इतकी स्फोटक बनली कशी ?
आपल्या सर्वाना हे माहिती आहे कि पहिल्या महायुद्धाचा भडका उडायला कारण झाले ते म्हणजे ऑस्ट्रियाचा युवराज (म्हणजेच क्राऊन प्रिन्स)आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड आणि त्याची पत्नी सोफी शोटेक ह्यांचा २८ जुन १९१४ रोजी बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे झालेला खून. बोस्निया हा त्यांच्या-ऑस्ट्रियाच्या साम्राज्यात नव्यानेच सामावला गेलेला, मांडलिक बनवला गेलेला (प्र)देश. सर्वसाधारणपणे जे लोक पहिल्या महायुद्धबद्दल थोडेफार काही ऐकून वाचून असतात त्याना ही एवढी माहिती असतेच असते. आणि म्हणूनच सध्या हा फ्रांझ फर्डिनांडच्या खुनाच्या तपशिलाचा भाग बाजूला ठेवून आपण एकंदर युरोपातल्या परिस्थिती पासून सुरुवात करूयात.
१९व्या शतकातल्या घडामोडी आणि जर्मन राष्ट्राची पायाभरणी
ज्याप्रमाणे १८५७च्या बंडाची कारण शोधताना आपल्याला फक्त काडतुसाच्या प्रकरणाशी थांबून चालत नाही तसेच पहिल्या महायुद्धाचे कारण शोधताना आपल्याला इतिहासात कमीतकमी १०० वर्षे तरी मागे जावे लागते.१९व्या शतकातल्या युरोपचा विशेषत: जर्मनीचा एकीकरणापूर्वीच्या इतिहासतर इतका गुंतागुंतीचा आहे कि ब्रिटीश पंतप्रधान लॉर्ड पाल्मरस्टन असे म्हटला होता कि जगात फक्त तीन लोकाना ह्या प्रश्नाची खरोखर माहिती आहे एक म्हणजे प्रिन्स अल्बर्ट ( इंग्लंडच्या राणी विकटोरीयाचा नवरा) पण तो आता हयात नाही, एक जर्मन प्रोफेसर आहे पण तो वेडा झालाय आणि मी, पण आता मी ते सगळे विसरलो आहे.
मुळात १९व्या शतकाचा बराचसा काळ( साधारण ७० वर्षे) जर्मनी हा देशच नव्हता, होता तो प्रशिया आणि त्याच्या प्रभावाखाली असलेली जर्मन भाषक फुटकळ राज्य. इसवीसनाच्या १५व्या शतकापासूनच कधी पोलंड कधी फ्रांस, कधी रशिया, तर कधी ऑस्ट्रियाशी संघर्ष करत करत हा प्रशिया आपले अस्तित्व टिकवून होता. ह्याचे फ्रेडरिक नावाचे इतके राजे होऊन गेले कि प्रशिया मध्ये राजाला समानार्थी शब्द म्हणून फ्रेडरिक म्हणत कि काय असे आपल्याला वाटावे! असो तर ह्या असंख्य फ्रेडेरिकांपैकी अतिशय प्रसिद्ध अशा फ्रेडरिक द ग्रेट( फ्रेडरिक दुसरा ) ह्याने पोलंड, फ्रांस आणि ऑस्ट्रियाचा निर्णायक पराभव करून आपले प्रशियाचे छोटेसे पण शक्तिशाली साम्राज्य( खरेतर राज्य!) स्थापले.साल होते १७७२. इतक्या दीर्घ काल म्हणजे जवळपास २५० वर्षे युद्धरत राहिल्याने हा देश अत्यंत लढाऊ वृत्तीचा आणि आक्रमक थोडक्यात युद्धखोर बनला असल्यास नवल नव्हते. मात्र पुढे जेव्हा फ्रांस मध्ये नेपोलीयनने सत्ता काबीज केली तेव्हा प्रशियाच्या गादीवर होता फ्रेडरिक विलियम दुसरा. हा एक उत्तम प्रशासक होता आणि त्याच्या काळात प्रशियाला स्वातंत्र्य, शांतता, स्थैर्य आणि संपन्नता सर्वकाही लाभली पण हे स्थैर्याचे दिवस लवकरच पालटले. हा फ्रेडरिक काही उत्तम लढवय्या नव्हता आणि नेपोलीयनच्या झंझावातापुढे त्याने हार पत्करली. तसा अख्खा युरोपच नेपोलीयनच्या सामर्थ्यापुढे हतबल झालेला होता.१७९५ साली प्रशियाचा पराभव करत नेपोलियनने ऱ्हाईन नदीच्या आसपासचा जर्मन भाषक असा बराचसा प्रदेश जिंकून घेतला. त्याचा मुलगा फ्रेडरिक विलियम तिसरा जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने सुरुवातीला नमते घेतले पण अखेरीस आपल्या प्रशियन स्वभावाला अनुसरून नेपोलीयनशी युद्ध छेडले. १८०६ साली त्याला हरवून नेपोलीयनने अक्खा प्रशियाच फ्रान्सचा मांडलिक करून घेतला. ह्या आधी युरोपात जर्मन भाषा आणि संस्कृती असलेली प्रशिया आणि ऑस्ट्रिया ही दोन प्रबळ राज्य सोडली तर इतर जवळपास ३०० फुटकळ राज्ये होती. नेपोलीयनने ह्यातली बरीचशी बरखास्त करून, एकमेकात विलय करून त्यांची एकूण ३९ राज्ये केली. एरवी सतत आपसात भांडत असणारी हि छोटी छोटी राज्य नेपोलियनसारख्या सामाईक आणि प्रबळ शत्रू मुळे आपसातले हेवेदावे विसरून एकत्र आली. पुढे १८१५ साली जरी नेपोलीयनचा वाटर्लुच्या युद्धात निर्णायक पराभव् झाला असला तरी ह्या विजयाचे खरे शिल्पकार होते इंग्लंड.ह्या युद्धाने युरोपातला फ्रान्सचा वरचष्मा नष्ट झाला, प्रशिया स्वतंत्र झाला आणि फ्रान्स हा आपला सामाईक शत्रू आहे हे ओळखून प्रशिया आणि हि ३९ जर्मन भाषक राज्ये एकत्र येऊन त्यानी आपला एक जर्मन राज्य संघ बनवला. सुरुवातीला ह्यात ऑस्ट्रियादेखिल सामील झाला होता पण व्यापार, अर्थव्यवस्था, संरक्षण अशा निरनिराळ्या महत्वाच्या धोरणांवर प्रशियाशी न जमल्याने त्यातून तो लवकरच बाहेर पडला. १८४० साली प्रशियाच्या गादिवर आला फ्रेडरिक विलियम चौथा. हा बराच उदारमतवादी होता. हे लक्षात ठेवले पाहिजे कि आता पर्यन्त आपण जी भांडणे लढाया गटतट शहप्रतीशह पाहतोय ती सगळी निरनिराळ्या राजवटीमधली होती. ( kingdom.) देश राष्ट्रवाद वगैरे संकल्पना अजून मूळ धरायच्या होत्या किंवा आज आपल्याला त्या जशा माहिती आहेत त्यास्वरुपात उत्क्रांत व्हायच्या होत्या. खरेतर १८व्या शतकात झालेल्या फ्रेंच राज्य क्रांतीनातर स्वातंत्र्याचे, लोकशाहीचे नवपर्व युरोपात येऊ घातले होते पण नेपोलीयनने सत्ता काबीज करून आणि स्वत:चेच साम्राज्य स्थापन करून त्याला चांगलीच खिळ घातली.
अर्थात म्हणून काही राष्ट्रवाद नष्ट झाला नव्हता. प्रशियाच्या जर्मन भाषा, परंपरा, संस्कृती आणि भौगोलिक संलग्नता ह्यावर आधारलेल्या राज्यसंघाच्या प्रयोगाच्या निमित्ताने तो पुन्हा उफाळून आला. राजेशाही उखडून फेकून द्यायचे अनेक उठाव १८४८ पासून युरोपात – विशेषत: प्रशियात होऊ लागले. जरी हे सगळे उठाव फ्रेडरिक विलियम चौथा ह्याने मोडून काढले असले तरी त्याने उठाव करणाऱ्यांच्या बऱ्याच मागण्या, कल्पना स्वीकारून राज्यतंत्रात बरेच मूलगामी बदल केले. त्याने प्रशियन जनतेला राज्यकारभारात सामावून घेत, त्यांचे मत-मागण्या मांडण्यासाठी संसद आणि संविधानाची निर्मिती करून ते लागू केले. तसेही नेपोलीयानिक युद्धातून(१८०३-१८१५) युरोप मध्ये सामंतशाहीची पीछेहाट होऊन उदारमतवाद आणि त्याहून जास्त प्रमाणात राष्ट्रवाद वाढीला लागला होताच पण सर्वप्रथम त्याला थोडीफार मान्यता, अधिष्ठान प्राप्त झाले ते प्रशियात.(अर्थात इंग्लंडचा अपवाद) अशा परिस्थितीत प्रशियाचा प्रभाव (किंवा थोरलेपण म्हणू फार झाले तर) असलेले आणि जर्मन भाषा संस्कृती चालीरितींवर आधारलेले एकसंध जर्मन राष्ट्र निर्माण करून त्याचा राजा किंवा अध्यक्ष आपण बनावे असा त्याने प्रयत्न केला( सन १८४९) पण इतर जर्मन राज्यांनी त्याचे मोठे पण मान्य करायला नकार दिल्याने तो प्रस्ताव बारगळला. तशात काही वर्षानी म्हणजे १८५७ साली पक्षाघाताचा झटका येऊन विकलांग झाल्याने फ्रेडेरिक विलियम चौथा ह्याने गादी सोडली अन त्याचा भाऊ विलियम किंवा विल्हेल्म पहिला हा गादीवर आला( आणि प्रशियातली राजांची फ्रेडरिक नावाची शृंखलाही तुटली). हा विल्हेल्म मोठा चाणाक्ष आणि धोरणी होता. त्याने लगेच काही गडबड केली नाही पण तो माणसे ओळखण्यात मोठा वाकबगार होता. त्याने प्रशियातील एक उमराव घराण्यातला तरुण, प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क याला प्रशियाचा पंतप्रधान म्हणून नेमला.
जर्मनीचा पोलादी चान्सेलर बिस्मार्क
प्रिन्स ओटो फॉन बिस्मार्क हा अतिशय कणखर वृत्तीचा धोरणी, मुत्सद्दी पण विधीनिषेधशून्य असा संसदपटू/राजकारणी होता. सर्व लहान मोठ्या जर्मन भाषक राज्यांचे अस्तित्व मोडून काढून एक विशाल जर्मन राष्ट्र उभे करायचे हा त्याचा पक्का निश्चय होता. आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करायची इच्छा विल्हेल्मला सुद्धा होती त्यामुळे राजा आणि प्रधानाची एक उत्तम युती तयार झाली (आणि ती सुदैवाने टिकली देखील दीर्घकाळ.) बिस्मार्क ने प्रथम प्रशियात अंतर्गत शांतता प्रस्थापित केली. १८४८पसुन चाललेली बंडाळी अजून पुरती शमली नव्हती आणि समाजवादी, स्वातंत्र्यवादी, राजेशाहीविरोधी असंतोषाचे निखारे अजून धुमसतच होते पण बिस्मार्कने त्यांचे सरसकट दमन न करता त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य करून, त्यांना चुचकारून त्या बदल्यात राजेशाही, सामन्तशांहीला पराकोटीचा असलेला त्यांचा विरोध सोडायला लावला. अंतर्गत सुव्यवस्था आणि शांतता प्रस्थापित केली. एकदा घराची परिस्थिती निर्धोक, शांत, स्थिरस्थावर झाल्यावर त्याने मग जर्मन एकीकरणाची अत्यंत धाडशी आणि दमछाक करणारी मोहीम हाती घेतली. खरेतर हा सगळा इतिहास अतिशय रंजक आहे पण फार विषयांतर नको म्हणून थोडक्यात संपवतो .
वर सांगितल्या प्रमाणे बिस्मार्क कणखर वृत्तीचा, धोरणी पण विधीनिषेध शून्य असा कसलेला संसदपटू / राजकारणी मुत्सद्दी होता. आपले ध्येय साध्य करण्यासाठी त्याला युद्ध छेडणे, भांडण उकरून काढणे. हिंसा हे वर्ज्य नव्हतेच पण त्याची उद्दिष्ट आणि धोरण स्पष्ट असत.(ह्यालाच त्याने लोह-रुधीर धोरण- Blood & iron policy असे गोंडस नाव दिले.) आयुष्यात तो कधीही ह्याबाबत चुकला नाही. जर्मन एकीकरणासाठी त्याने एकूण ३ युद्धे छेडली. पहिले युद्ध डेन्मार्कशी झाले. प्रशियाच्या उत्तर आणि पश्चिमेकडील श्लेसविग आणि होलस्टीन हे जर्मन बहुल प्रांत डेन्मार्कच्या अधीन होते आणि त्याचां ताबा मिळवण्यासठी त्याने डेन्मार्काशी युद्ध केले. ह्याला अर्थातच प्रशियन राज्यसंघाताल्या जर्मन राष्ट्रवादी लोकांचा मोठा पाठींबा लाभला आणि ही मोहिम फत्ते झाल्यावर उत्तर जर्मन राज्यातल्या राष्ट्रीय चळवळी आणि नेत्यांना पाठींबा देऊन उत्तरेकडील सगळी जर्मन भाषक राज्य प्रशियात सामील करून घेतली.
ह्या एकाच युद्धाने प्रशियाचे पारडे जड झाले हे ओळखून ऑस्ट्रिया आता अस्वस्थ झाला आणि त्याने दक्षिणेकडील जर्मन राज्ये स्वत:च्या पंखाखाली घ्यायला सुरुवात केली.ऑस्ट्रियाला नुकत्याच जिंकलेल्या श्लेसविग आणि होलस्टीन ह्या प्रान्तापैकी होलस्टीन प्रांताचा ताबा हवा होता. ही मागणी म्हणजे ‘प्रशिया आणि उत्तरेकडील जर्मन भाषक प्रशियावादी राज्य ह्यात ऑस्ट्रियाची ची पाचर बसावी म्हणून खेळलेली एक चाल आहे’ अशी भुमका उठवून आणि ऑस्ट्रियाला फशी पडून बिस्मार्कने ऑस्ट्रियाशी युद्ध केले. हे करताना फ्रांस तटस्थ राहील ह्याची काळजी घेतलीच पण ऑस्ट्रियाच्या दक्षिणेला असलेला इटलीचा पाठींबा मिळवून वेळ पडल्यास तो आपल्याला मदतही करेल अशी व्यवस्था केली. त्यामुळे ऑस्ट्रियाला इटलीच्या सीमेवर संरक्षणाची तरतूद करावी लागली आणि प्रशियाच्या विरोधात सर्व ताकद पणाला न लावता आल्याने त्यांचा निर्णायक पराभव झाला. ह्यानंतर बिस्मार्कने जर्मन राज्य संघातून ऑस्ट्रियाची बोळवण केली आणि मग अर्थातच राज्यसंघात फक्त प्रशिया हाच एक प्रबळ देश उरला.अर्थात ऑस्ट्रियाचा पराभव झाल्यावरही त्यांच्या अधिपात्याखालाच्या भूमीचे लाचके न तोडता दूर अंतरावरच्या मैत्रीचे संबंधच ठेवल्याने ऑस्ट्रिया आणि ऑस्ट्रियन जनता जी बहुसंख्येने जर्मन भाषकहोती ती जर्मनीची पक्की वैरी बनली नाहीत. अजून प्रशियाच्या कच्छपी न लागलेली जी दक्षिण जर्मन राज्य होती त्याना प्रशियाची सार्थ भीती वाटत होती पण यापेक्षा जास्त भीती त्याना फ्रांसची वाटत होती. ५०-६० वर्षापूर्वीच तर फ्रांसने त्यांचे स्वातंत्र्य हिरावून त्याना मांडलिक बनवले होते आणि १८१५मध्ये जरी नेपोलीयनचा पराभव झालेला असला तरी लगेच काही फ्रांस हे राष्ट्र कमकुवत झालेले नव्हते उलट नेपोलीयनने मिळवलेल्या अनेक विजयांमुळे ते सामर्थ्यवान आणि त्याहूनही अधिक आत्मविश्वासाने भरलेले बनले होते. त्यांच्या जगभर वसाहती होत्या आणि इंग्लंड नंतर क्रमाक दोनची वसाहतवादी सत्ता तेच होते. जर्मन बहुल प्रांत आल्सेस आणि लोरेन हे नेपोलीयनने जिंकून फ्रान्सला जोडले त्यावरचा ताबा अजूनही त्यांनी सोडला नव्हता ही गोष्ट जर्मन लोक विसरले नव्हते.
त्यातून १८५२ साली नेपोलियन तिसरा हा पुन्हा फ्रान्सच्या गादीवर आला आणि त्याने सत्ता काबीज करून दुसरे फ्रेंच साम्राज्य स्थापन केले म्हणजे फ्रांस आता पुन्हा एकदा प्रजासत्ताक न राहता एका राजाची राजवट बनला होता, आणि ह्याचे प्रत्यंतर युरोपला १ वर्षातच तेव्हा आले जेव्हा फ्रांसने रशियाविरुद्ध क्रिमियन युद्धात सक्रीय सहभाग घेतला. असो तर आता साम्राज्यवादी फ्रांस हा पुन्हा एकदा नेपोलीयनप्रमाणे आपला शत्रू म्हणून आपल्या उरावर बसला आहे आणि त्याच्या पासूनच आपल्या अस्तित्वाला खरा धोका आहे हे दक्षिणेकडच्या जर्मन राज्यांवर ठसवण्याकाराता फ्रान्सकडून काही आगळीक होणे जरुरीचे होते. नाहीतर फ्रांस पेक्षा बिस्मार्कच्या म्हणजेच प्रशियाच्याच खऱ्या हेतूचे पितळ उघडे पडले असते. त्यामुळे बिस्मार्क योग्य अशी संधी शोधतच होता जी त्याला लवकरच मिळाली.
क्रमश:
प्रतिक्रिया
30 Jul 2018 - 12:42 am | आनन्दा
वाचतोय..
30 Jul 2018 - 1:21 am | शाम भागवत
वाचतोय. मस्त.
30 Jul 2018 - 1:33 am | गामा पैलवान
आदित्य कोरडे,
मस्त माहिती आहे. धन्यवाद! :-)
आ.न.,
-गा.पै.
30 Jul 2018 - 3:15 am | अर्धवटराव
म्हणुनच त्या संहारकाळाची उजळणी वरचेवर होत राहायला हवी.
पुभाप्र
30 Jul 2018 - 7:21 am | तुषार काळभोर
ही लेखमाला मोसाद लेखमालेप्रमाणे मिपावर एक मैलाचा दगड असणार हे नक्की!
30 Jul 2018 - 9:54 am | टर्मीनेटर
आवडत्या विषयावरची लेख मालिका. मस्त सुरुवात... पुढचा भाग यल्ला यल्ला (लवकर येउद्या).
30 Jul 2018 - 10:18 am | लोनली प्लॅनेट
मी नाही वाचणार
माफ करा पण तुम्ही दोन तीन भाग लिहिता आणि सोडून देता माझी फार निराशा होते
1 Aug 2018 - 6:13 am | आदित्य कोरडे
रागावू नका, मागचे भारत-चीन युद्ध आणि जीनंवरचे लेख अर्धवट राहिले त्याचे करणाच मुळी पहिले महायुद्ध
तशी आधी १-२ पुस्तक वाचली होती आणि त्यावरून हा लेख अगदी छोटा आणो २-३ भागात करायचे ठरवले होते पण जसजसे साहित्य गोळा करत गेलो तसतसे विषयात गुंतत गेलो आणि बाकीचे विषय मागे पडत गेले . ह्या लेखमालेची आताच साधारण ७० एक पाने लिहून झालीयेत रोज थोडे फार लिहितोय. नक्की वाचा साधारण एका आठवड्याला एक भाग टाकत जाईन.
--आदित्य
30 Jul 2018 - 11:44 am | अनन्त अवधुत
पु. भा. प्र. आणि शुभेच्छा!!
1 Aug 2018 - 6:14 am | आदित्य कोरडे
धन्यवाद, साधारणतः दर आठवड्याला एक भाग इथे लिहित जाईन
30 Jul 2018 - 12:15 pm | टवाळ कार्टा
अप्रतिम....और आंदो :)
30 Jul 2018 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर सुरुवात ! विषय रोचक आहे. तुमच्या माहितीपूर्ण लेखनाने मालिका सुंदर होईलच. लवकर लवकर पुढचे भाग टाका.
1 Aug 2018 - 6:15 am | आदित्य कोरडे
धन्यवाद, साधारणतः दर आठवड्याला एक भाग इथे लिहित जाईन
30 Jul 2018 - 4:00 pm | श्वेता२४
पुभाप्र
30 Jul 2018 - 4:13 pm | खिलजि
आवडता विषय , पुन्हा एकदा शाळेतले दिवस आठवले . पुभाप्र
30 Jul 2018 - 5:34 pm | Mak Mohan
खुप सुंदर लेखमालिका.....
परंतु घेतलेला वसा टाकू नये...!!
ही अपेक्षा....
30 Jul 2018 - 6:02 pm | सोमनाथ खांदवे
छान लिहाताय ! असेच लिहीत रहा !!!
जयंत कुलकर्णी काका आणि बोका आझम भाऊ ने इतिहासाची गोडी लावून दिली आता तुम्ही त्यावर कळस चढवा ,
30 Jul 2018 - 6:03 pm | भंकस बाबा
मस्त जमलाय लेख
30 Jul 2018 - 6:28 pm | प्रमोद देर्देकर
अतिशय आवडता विषय लवकर पुढचे भाग येवू देत. अगदी नंतर अटक होवून खटला चालला शिक्षा झाल्या तिथं पर्यंत लिहा म्हंजे आम्हाला फक्त एका क्लिक वर मिळेल .
30 Jul 2018 - 6:34 pm | नाना नगरकर
वाचतोय ....
अभ्यासपुर्ण लेख ... लवकर पुढचे भाग टाका.
30 Jul 2018 - 7:31 pm | कपिलमुनी
पुढील भागाच्या प्रतीक्षेत !
रंजक इतिहास डिटेल मध्ये लिहा . आम्ही अजिबात कंटाळणार नाही.
30 Jul 2018 - 8:55 pm | जेम्स वांड
फारच उत्तम अन सुरस लिहिलेत हो! खूप आवडलं लेखन.
लवकरच अशीच एक ऐतिहासिक (पण ह्या विषयावर नसलेली) लेखमाला लिहायचा विचार होता. थोडी टंगळमंगळ होत होती पण तुम्ही लिहिलेलं पाहून पुनःश्च स्फुरण चढलं, बघुयात कसं जमतं तसं एक सिरीज करूच आम्हीही.
तूर्तास, तुम्हाला उत्तम लेख मेजवानीकरता खूप खूप आभार.
30 Jul 2018 - 10:46 pm | शाम भागवत
व्वा. व्वा. व्वा.
लिहाच.
आम्ही सर्व वाट बघतोय.
ही स्फूर्तीची साखळी अशीच चालू राहीली तर बिरूटेसरांच्या मिपाबाबतच्या खूप काळज्या कमी होतील.
:)
1 Aug 2018 - 8:23 pm | डॉ सुहास म्हात्रे
भले, भले ! होऊन जाऊ द्या !!
31 Jul 2018 - 3:53 am | शब्दबम्बाळ
वाचतोय...
31 Jul 2018 - 10:23 pm | सुखी
छान लेख मालिका....
"एकदा घराची परिस्थिती निर्धोक, शांत, स्थिरस्थावर झाल्यावर त्याने मग जर्मन एकीकरणाची अत्यंत धाडशी आणि दमछाक करणारी मोहीम हाती घेतली. खरेतर हा सगळा इतिहास अतिशय रंजक आहे पण फार विषयांतर नको म्हणून थोडक्यात संपवतो ." या वरही लिहा, वाचायला खूप आवडेल
31 Jul 2018 - 10:44 pm | शाम भागवत
विषयांतर झाले तरी आम्ही वाचू. विषयांतरात सुध्दा एखादे अवांतर झाले तरीही वाचूच. कारण त्यातूनही आम्हाला (जेवायला) माहितीच मिळणार आहे.
31 Jul 2018 - 11:29 pm | डॉ सुहास म्हात्रे
या लेखमालिकेत अस्थानी वाटत असेल तर तो रोचक इतिहास वेगळ्या धाग्यावर / लेखमालेत लिहा अशी आग्रहाची विनंती आहे. वाचायला नक्की आवडेल.
1 Aug 2018 - 7:59 pm | सुधीर कांदळकर
युद्धाच्या सूत्राचे सुरेख विश्लेषण. खाडिलकरांनी तत्कालीन नवाकाळ मध्ये युद्ध सुरू असतांना विविध लढायांचे लेखमालेतून बातम्या देऊन वर्णन केले होते. नंतर त्या लेखांचे संपादित पाचसहा खंड प्रसिद्ध झाले होते. ७०च्या दशकात दादर सार्वजनिक वाचनालयात मला हे खंड वाचायला मिळाले होते. तत्कालीन साधनांच्या मर्यादा ध्यानात घेता ते सरे अचंबित करणारे वाटले होते. त्यात बरेच स्ट्रेटजिक विश्लेषण आहे. लेख वाचतांना ती लेखमाला अणि 'Ascent of Money' हा माहितीपट आठवला. कर्जरोखे ऊर्फ बॉन्ड्स आणि युद्धाचे अर्थशास्त्रीय संबंध या माहितीपटात दाखवलेले आहेत. अर्थशास्त्रात मला गती नसल्यामुळे बरेचसे डोक्यावरून गेले. तरी माहितीपट आवडेल असाच आहे.
आपला आणखी वेगळा दृष्टीकोन: राजकीय विश्लेषण फारच आवडले. धन्यवाद.
11 Aug 2018 - 6:52 am | आदित्य कोरडे
ते खाडिलकरांनी लिहिलेले खंड कुठे मिळतील?
1 Aug 2018 - 9:46 pm | आदित्य कोरडे
धन्यवाद,
पाहतो , ह्याच प्रमाणे प्रपोगंडा हा देखील असाच एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे जो पाहिल्याम्हायुद्धात प्रथमच प्रभावीपणे वापरला गेला
2 Aug 2018 - 3:06 pm | अस्वस्थामा
मस्त सुरुवात हो.. खरं तर आपण दुसर्या महायुद्धाबद्दल इतकं बघतो, वाचतो की त्याआधीचं पहिलं महायुद्ध आणि त्याच्या पार्श्वभूमीबद्दल कधी इतकं काही वाटत नाही. एक कारण असंही असेल की दुसरं महायुद्ध जगावर (भारतासहीत) खूप दूरगामी परिणाम करणारं ठरलं.
पण शोधत गेल्यावर बिस्मार्क आणि जर्मनीची जन्मगाथा पहिल्यांदा जेव्हा वाचली तेव्हा खरं तर खूपच भारी वाटली. अगदी रिलेटेबल अशी. एक कारण असं की भारत जर इंग्रजांच्या ताब्यात नसता तर भारताची निर्मिती प्रक्रिया कदाचित अशाच ट्रान्सफॉर्मेशन मधून गेली असती असं वाटतं.
कोणाला बिस्मार्कबद्दल थोडक्यात जाणून घ्यायचं असेल तर ही अॅनिमेटेड वेबसिरिज इंटरेस्टीग आहे.
https://youtu.be/zc3Y-dU_GjM
3 Aug 2018 - 6:10 am | आदित्य कोरडे
this documentary is also good
https://www.youtube.com/watch?v=TiNgBd0iFO8&t=1s
3 Aug 2018 - 2:47 pm | विराग
ह्या लेखामुळे ५ वर्षांनी मिपा वर परत आलो, पुढील लेख येउद्ये आता
4 Aug 2018 - 12:53 pm | मेघनाद
भारतातील सद्य परिस्थिती बघता वरील विचार हा अतिशय मौल्यवान आहे. जुने विचार आणि आदर्श बाजूला ठेवून नवीन काहीतरी घडवायची नितान्त गरज आहे भारतातले भेसूर प्रश्न सोडवण्यासाठी.
4 Aug 2018 - 6:58 pm | आदित्य कोरडे
बरोबर! म्हणून तर हा इतिहास लिहित आहे.
4 Aug 2018 - 1:28 pm | अभ्या..
मस्तच लिहिता आहात.
पुलेशु
13 Aug 2018 - 3:35 pm | पुंबा
अतिशय रंजक शैलीत लिहिलेली ज्ञानवर्धक लेखमाला आहे ही.
संदर्भसाहित्याचा अंतर्भाव लेखाच्या शेवटी केलात तर बरे होईल.
15 Aug 2018 - 7:29 am | आदित्य कोरडे
1.History of Modern Europe
-by Mahajan V.D.
2.A History of the First World War
-by B. H. Liddell Hart
3.World War 1: A History From Beginning to End (Kindle Edition)
-by Henry Freeman
4.World War One: A Short History
-by Norman Stone
5.The Great War
-by John Terraine
6.World War 1: Soldier Stories: The Untold Soldier Stories on the Battlefields of WWI –(Kindle Edition)
-By Ryan Jenkins
7.The Guns of August (Kindle Edition)
-By Barbara Tuchman
8.पहिले महायुद्ध
-दि वि गोखले
9.World War 1 in photographs- 80th anniversary edition.
-Robin cross
10. Soldier’s War 1914-18
- Peter Liddel
Documentaries
11.The Origins of the World War1-24 lectures Series
12. Apocalypse World War 1- 5 part Documentary series
13. BBC - The First World War-10 part Documentary series
14.Online International Encyclopedia of the First World War1
15. The great war – 4 year series covering week by week events 100 years back with extra episodes on various topics related to world war1
15 Aug 2018 - 10:20 am | शाम भागवत
मी जर या विषयावर कधी बोललो अथवा लिहिले, तर त्यानंतर मी एवढाच उल्लेख करणार.
संदर्भ : आदित्य कोरडे
बात खतम
:)
16 Aug 2018 - 12:32 pm | पुंबा
अतीउत्तम.
अनेक धन्यवाद.
15 Aug 2018 - 10:35 pm | नाखु
सुरुवात
शाळेत इतिहास असल्यानेच नीरसपणे वाचावे लागत असे पण रोचक आणि तपशीलवार आता वाचताना फार वेगळे आणि उत्कंठावर्धक वाटत आहे
पुलेशु
11 Sep 2018 - 11:21 am | नया है वह
मस्तच पुलेशु