कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
27 Aug 2018 - 9:13 am

( खनिजांचा खजिना : लेखांक ४ )

आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो.

कॅल्शियम
हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.
कॅल्शियमचे आहारातील स्त्रोत व प्रमाण, शरीरातील चयापचय व कार्य, त्याची रक्तपातळी आणि संबंधित आजार या सर्वांचा आढावा या लेखात घेतला आहे.

आहारातील स्त्रोत
हे चार गटांत विभागता येतील:
१. दूध, दही ,चीज, इ.
२. हिरव्या पालेभाज्या
३. सोयाबीन्स व इतर द्विदल धान्ये, कठीण कवचाची फळे (nuts).
४. तसेच कॅल्शियमने ‘संपन्न’ केलेली काही धान्ये आणि सोयाबीन्स बाजारात मिळतात.

अशा विविध स्त्रोतांतल्या कॅल्शियमचे आतड्यांत शोषण मात्र कमीजास्त प्रमाणात असते हे लक्षात घ्यावे. प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते. एकूण स्त्रोतांपैकी दुग्धजन्य पदार्थांतील शोषण चांगले होते. पण इतर स्त्रोतांतील कॅल्शियमच्या शोषणात मात्र काही अडथळे असतात.

प्रथम पालेभाज्यांचे बघू. पालक आणि काही इतरांतले कॅल्शियम हे oxalates शी संयुगित असते. त्यामुळे त्याचे शोषण खूप कमी होते. ब्रोकोली व कोबीतील कॅल्शियमचे शोषण तुलनेने बरे होते.

तर द्विदल धान्ये आणि nuts मधील कॅल्शियम हे phytatesशी संयुगित असते. त्यानेही शोषणाला अडथळा होतो.
कॅल्शियमचे शोषण हे वाढत्या वयानुसारही कमी होत जाते. बालके आणि मुलांत ते आहारातील प्रमाणाच्या तब्बल ६०% असते तर म्हातारपणी ते बरेच कमी होते. उत्तम शोषण होण्यासाठी आहारात त्याच्या जोडीने ‘ड’ जीवनसत्व असणे जरुरीचे असते. ‘ड’ आणि कॅल्शियम यांचा परस्परसंबंध जाणण्यासाठी वाचकांनी माझा ‘ड’ वरील स्वतंत्र लेख इथे वाचावा: https://www.misalpav.com/node/42796.

प्रौढ व्यक्तीत कॅल्शियमची आहारातील रोजची गरज १ ग्रॅम इतकी आहे. म्हातारपणी हे प्रमाण १.२ ग्रॅम करावे लागते.

शरीरातील कार्य:
१. त्याचे सर्वात महत्वाचे काम म्हणजे हाडांना व दातांना बळकट करणे. हाडांच्या प्रथिनयुक्त गाभ्यावरती मिश्र खनिजांचा थर चढवला जातो. या मिश्रणात कॅल्शियमबरोबर फॉस्फरस, सोडियम, मॅग्नेशियम, कार्बोनेट व फ़्लुओराइडचा समावेश असतो. यामुळेच हाडे व दात बळकट होतात.

इथे हे लक्षात घ्यावे की हा थर कायमस्वरूपी नसतो. रोज त्यातील काही भाग खरवडून रक्तात येतो आणि त्याचे जागी रक्तातून आलेल्या खनिजांचा नवा थर चढवला जातो. म्हणजेच रोज आपली हाडे ही अंशतः ‘कात’ टाकत असतात. प्रौढांच्या दातांमध्ये मात्र ही प्रक्रिया होत नाही हे लक्षात घ्यावे.

२. स्नायूंचे आकुंचन: या मूलभूत क्रियेमध्ये तो मध्यवर्ती नियंत्रकाची भूमिका बजावतो.

३. रक्त गोठण्याची क्रिया: जखमेनंतर रक्तस्त्राव थांबण्याची जी गुंतागुंतीची क्रिया असते त्यात त्याचाही वाटा महत्वाचा असतो.

४. याव्यतिरिक्त पेशींच्या मूलभूत क्रिया, एन्झाइम्सचे उत्तेजन आणि काही हॉर्मोन्सच्या कार्यात तो मोलाची मदत करतो.

कॅल्शियमची रक्तपातळी
ही पातळी ९-११ mg/dL इतकी असते. कॅल्शियमची शरीरातील अनेक महत्वाची कार्ये बघता ती कायम स्थिर ठेवावी लागते. त्यासाठी दोन हॉर्मोन्सचे योगदान खूप महत्वाचे असते:

१. पॅराथायरॉइड हॉर्मोन (PTH) : मानेतील थायरॉइड ग्रंथीच्या बाजूस ४ छोट्या पॅराथायरॉइड ग्रंथी असतात त्यांत हे तयार होते. ते हाडातील कॅल्शियम रक्तात आणण्यास मदत करते.

२. ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप (Calcitriol) हे हॉर्मोन असते आणि ते मूत्रपिंडात तयार होते. ते आहारातील कॅल्शियमचे शोषण वाढवते आणि रक्तातील कॅल्शियमला हाडात जाण्यास मदत करते.
निरोगीपणात वरील दोन्ही हॉर्मोन्सचा सुरेख समतोल साधला जातो जेणेकरून कॅल्शियम हाडांत व रक्तात योग्य प्रमाणात राहते. आहारात कॅल्शियम व ‘ड’ ची दीर्घकाल कमतरता झाल्यास मात्र हाडांतील कॅल्शियम खूप खरवडले जाऊन रक्तपातळी टिकवली जाते पण त्याचबरोबर हाडे कमकुवत होतात. मुलांत या आजाराला मुडदूस म्हणतात.

कॅल्शियमची पातळी विविध आजारांत कमी व जास्त होऊ शकते. आता त्याचा आढावा घेऊ.

कॅल्शियम रक्तपातळी कमतरता
ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता : यात आहारातील कॅल्शियमचे शोषण होत नाही.
२. PTH ची कमतरता
३. दीर्घकालीन मूत्रपिंड विकार : यात ‘ड’ जीवनसत्वाचे कार्यकारी रूप तयार होत नाही.

या कमतरतेचे रुग्णावर परिणाम असे होतात:
हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका, मानसिक स्थितीतील बदल आणि हृदयकार्यावर विपरीत परिणाम.

कॅल्शियम रक्तपातळी अधिक्य
ही मुख्यतः खालील आजारांत आढळते:
१. PTH चे अधिक्य
२. विविध कर्करोग : यांत PTH सारखे एक प्रथिन तयार होते आणि ते हाडांना पोखरून काढते. मग त्यांतील भरपूर कॅल्शियम रक्तात उतरतो.

अधिक्याचे परिणाम:
चेतासंस्थेचे बिघाड व मानसिक दौर्बल्य
मळमळणे, बद्धकोष्ठता
मूतखडे होणे
हृदयकार्यावर विपरीत परिणाम.

फॉस्फरस

कॅल्शियमचा जोडीदार असलेले हे खनिज. शरीरातील खनिजसाठ्यांमध्ये त्याचे स्थान कॅल्शियमच्या खालोखाल म्हणजेच दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचा सर्वाधिक साठा अर्थातच हाडांत आहे. अल्प प्रमाणात ते रक्तात असते आणि तेथील त्याचे प्रमाण हे कॅल्शियमच्या सुमारे निम्म्याने असते.
पेशींतले फॉस्फरस हे उर्जा देणाऱ्या संयुगांच्या स्वरुपात असते. पेशीत तयार होणारी उर्जा ही ATP या ‘चलना’त साठवली जाते. त्यातील ‘P’ म्हणजे फॉस्फेट होय. तसेच DNA व RNA या मूलभूत रेणूंचाही फॉस्फरस हा घटक असतो.

त्याचे आहारातील चांगले स्त्रोत म्हणजे दूध आणि मांस. ज्या पदार्थांतून कॅल्शियम व प्रथिन उत्तम मिळते त्यांतून फॉस्फरसही आपोआप उपलब्ध होते. आहारातील कॅल्शियम :फॉस्फरसचे प्रमाण १.५ : १ या गुणोत्तरात असावे.

फॉस्फरसची रक्तपातळी
ही 2.5 to 4.5 mg/dL इतकी असते. मुलांत ती प्रौढापेक्षा अधिक असते कारण हे वाढीचे वय असते.
ही पातळी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे दीर्घकालीन मूत्रपिंड विकार. ती पातळी दीर्घकाळ जास्त राहिल्यास त्याचा कॅल्शियमशी अधिक प्रमाणात संयोग होतो. परिणामी त्या दोघांचे मिळून तयार होणारे ‘खडे’ शरीराच्या मउ भागांतही साठू लागतात.

तर पातळी कमी होण्याचे मुख्य कारण म्हणजे ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता.
**************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

कुमार१'s picture

27 Aug 2018 - 10:05 am | कुमार१

मा. सा सं
यांना विनंती

टर्मीनेटर's picture

27 Aug 2018 - 2:35 pm | टर्मीनेटर

हातापायात मुंग्या येणे, स्नायूंच्या अकुंचानाचा झटका

चार-पाच महिन्यांपूर्वी ह्या दोन्ही गोष्टी माझ्या मावस भावाला (वय वर्षे ३५) झाल्या होत्या. अगदी अँजिओग्राफी पर्यंत सगळ्या तपासण्या करून झाल्या. आता त्याला कॅल्शियम आणि व्हिटामिन डी च्या गोळ्या चालू आहेत आणि आरामही पडला आहे. आठवड्यातून २ वेळा मांसाहार केल्यास गोळ्या घेण्याची गरज नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे, परंतु तो शुद्ध शाकाहारी असल्याने गोळ्या घेऊनच उपचार सुरु आहेत.
तुमच्या ह्या लेखाची लिंक त्याला पाठवली आहे. छान माहितीसाठी धन्यवाद.

सुबोध खरे's picture

28 Aug 2018 - 11:06 am | सुबोध खरे

आठवड्यातून २ वेळा मांसाहार केल्यास गोळ्या घेण्याची गरज नाही असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे, परंतु तो शुद्ध शाकाहारी असल्याने गोळ्या घेऊनच उपचार सुरु आहेत.
जर रुग्ण (व्हेगन नसेल) दूध दही ताक चीज व्यवस्थितपणे घेत असेल तर मांसाहाराची मुळीच गरज नाही.
त्या डॉक्टरांचा सल्ला एकांगी वाटतो.

टर्मीनेटर's picture

28 Aug 2018 - 11:20 am | टर्मीनेटर

रुग्ण व्हेगन नाहीये पण एक चहा सोडला तर दुध आणि ईतर दुग्धजन्य पदार्थ अजिबात खात-पीत नाही. त्यापेक्षा गोळ्या घेणे त्याला सोयीस्कर वाटतंय.

कुमार१'s picture

27 Aug 2018 - 2:44 pm | कुमार१

टर्मि, आभार.
मावस भावाला माझ्या शुभेच्छा !

दुर्गविहारी's picture

27 Aug 2018 - 8:04 pm | दुर्गविहारी

चांगली माहिती दिलीत. धन्यवाद.

अनिंद्य's picture

28 Aug 2018 - 10:58 am | अनिंद्य

@ कुमार१,

नेहेमीप्रमाणे उत्तम माहितीनी भरलेला लेख.

काही प्रकारच्या कर्करोगात रुग्णाच्या रक्तात कॅल्शिअम पातळीचे आधिक्य आणि त्यामुळे त्यांना 'बोन मॅरो' दुसऱ्याचे द्यावे लागते असे काही आहे काय ? नीटसे समजले नाही.

पु भा प्र,

अनिंद्य

कुमार१'s picture

28 Aug 2018 - 11:47 am | कुमार१

कॅल्शिअम पातळीचे आधिक्य आणि त्यामुळे त्यांना 'बोन मॅरो' दुसऱ्याचे द्यावे लागते >>>>
नाही, असा काही संबंध नाही. कुठल्याही कर्करोगात ते आधिक्य होते.
'बोन मॅरो'प्रत्यारोपण हा उपचार आहे , आजारानुसार. त्याचा इथे संबंध नाही.

अनिंद्य's picture

28 Aug 2018 - 1:00 pm | अनिंद्य

असे हवेत डॉक्टर - ताबडतोब शंकासमाधान.

आभार !

अनुप ढेरे's picture

28 Aug 2018 - 12:29 pm | अनुप ढेरे

बोंबील माशांमध्ये फॉस्फरस भरपुर असतो असं ऐकलं आहे.

शिद's picture

28 Aug 2018 - 9:31 pm | शिद

बोंबील, मांदेळी, इ. माशांमध्ये फॉस्फरस भरपुर प्रमाणात उपलब्ध असतं.

आमच्या गावी वनार्यांवर* सुकायला घातलेले बोंबील रात्री काळोखात त्यातील असलेल्या फॉस्फरसमुळे चमकत असतात. अमावस्येच्या काळोख्या रात्री तर समुद्र किनार्यावरील हजारो वनार्या सुकत घातलेल्या मच्छींमुळे एखाद्या रोषणाईप्रमाणं लुकलूकत असतात व त्यामुळे किनारी मंदसा प्रकाशदेखील पसरला असतो.

*वनारी - बोंबील, मांदेळी, इ. मच्छी सुकवण्यासाठी खालच्या फोटोत दाखवलेल्याप्रमाणं उभ्या-आडव्या बांबूनी बनवलेला स्टँड.

Vanari

कुमार१'s picture

28 Aug 2018 - 9:59 pm | कुमार१

फोटो व माहिती.
हाच तो phosphorescence !

कुमार१'s picture

28 Aug 2018 - 12:49 pm | कुमार१

त्या माश्यातून Ca, P व प्रोटीन्स असे सर्व मस्त मिळते.
त्याला Bombay Duck असेही मजेशीर नाव आहे

दुर्गविहारी's picture

28 Aug 2018 - 7:25 pm | दुर्गविहारी

अजित आगरकरला त्याच्या ऑस्ट्रेलियाविरुध्द केलेल्या बॅटिंगमधील दिव्य परफॉर्मन्स बध्दल बॉम्बे डक हे टोपणनाव पडले होते. त्याची आठवण झाली. ;-)

कुमार१'s picture

28 Aug 2018 - 7:57 pm | कुमार१

हा, हा ! ‘डक’ हा शून्यावर बाद होणाऱ्यासाठी खास ब्रिटीशांचा Cricket slang आहे .

ट्रम्प's picture

28 Aug 2018 - 8:28 pm | ट्रम्प

मला त्या कॅल्शियम च्या गोळ्यांच्या उपयोगाबद्दल पूर्वी पासून जरा शंका आहे . कॅल्शियम च्या गोळ्या डॉक्टर रेफर करतात पण त्या गोळ्या मधील कॅल्शियम शरीर कितपत शोषून घेते ?आणि त्याचे योग्य परिणाम शरीरावर होत असतील का ? . म्हणजे झीज झालेल्या हाडे त्या गोळ्यांनी कशी काय व्यवस्थित होतात ?

कुमार१'s picture

28 Aug 2018 - 8:55 pm | कुमार१

ट्रम्प, शंकानिरसन

शोषण साधारण २०%असेल, म्हातारपणी अजून कमी.
पण उपयोग होतो. कसा ते बघा. हाडांची खरवड आणि नवीन Ca चा थर चढवणे या दोन्ही क्रिया नेहमी चालू असतात. जर का Ca-कमतरता दीर्घकाळ झाली तर मग यांत असमतोल होतो, कारण खरवड होतच राहते.

त्यावर उपाय म्हणजे गोळ्या देणे. बरोबर ‘ड’ पण आवश्यक.

जयंत कुलकर्णी's picture

29 Aug 2018 - 8:48 am | जयंत कुलकर्णी

अत्यंत उपयुक्त माहिती आपण देत आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

उगा काहितरीच's picture

29 Aug 2018 - 10:56 am | उगा काहितरीच

नेहमीप्रमाणेच चांगला लेख

कुमार१'s picture

29 Aug 2018 - 12:47 pm | कुमार१

अनुक्रमणिका केल्याबद्दल आभार
सर्व नवीन प्रतिसादकांचेही आभार.

सुरुवातीपासून वाचतो , काही भाग राहिले आहेत . एक प्रश्न पण पडला आहे . जर त्या भागाशी निगडीत असेल तर व्यनि करून आपले मत घेईन म्हणतोय . चालेल का आपल्याला डॉक्टर साहेब ? बाकी शुभेच्छा पुढील मालिकेसाठी अर्थात बहुपयोगी समाजकार्यासाठी .

कुमार१'s picture

29 Aug 2018 - 2:16 pm | कुमार१

अहो, जरूर चालेल.
वाचकांच्या शंकांचे कधीही स्वागत आहे !

नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण लेख

नाखु's picture

29 Aug 2018 - 10:20 pm | नाखु

तर हाडांची प्रास्परिटीत फॉस्पारस चा दखलपात्र वाटा आहे.

किरकोळ शंका.
विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?तसेच त्यात क जीवन सत्व असते काय, नियमित सेवनाने (अर्थात घरगुती विडा) काही अपाय होतो का?

नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला

नाखु's picture

29 Aug 2018 - 10:20 pm | नाखु

तर हाडांची प्रास्परिटीत फॉस्पारस चा दखलपात्र वाटा आहे.

किरकोळ शंका.
विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?तसेच त्यात क जीवन सत्व असते काय, नियमित सेवनाने (अर्थात घरगुती विडा) काही अपाय होतो का?

नितवाचक नाखु वाचकांची पत्रेवाला

सुधीर कांदळकर's picture

30 Aug 2018 - 6:53 am | सुधीर कांदळकर

माझ्यासाठी हा लेख फारच उपयुक्त आहे. वय वर्षे ६६. दहावर्षापूर्वी फ्रॅक्चर झाल्यावर एम एस अस्थिव्यंग तज्ञांनी सहा महिने कॅल्शियम आणि डी३ लिहून दिले होते. म्हणून तेव्हापासून सौम्य उन्हात भरपूर भटकतो. आता तर शेतात उभा असतो. क्रॅम्प्स भरपूर येतात. अ‍ॅक्टीव्हावर मागे बसले की विशिष्ट कोन वाढल्यास पायात क्रॅम्प येतेच. हे टाळतो आणि फार डोके चालवत नाही. अर्थातच डायग्नॉसिस करणे हे डॉक्टरांचे काम आहे. हे कॅलशियम कमतरतेमुळेच असेल का?

काही वर्षापूर्वी एमबीबीएस डॉक्टरांनी अतिशय सौम्य थ्रोम्बो फ्लीबायटीसचे निदान केले होते. डोंगराळ उतरणीवर चुकून पाय जोरात आपटले गेले तर मांडीत आतील बाजूस वेदना होतात आणि स्पर्शाला गुठळ्या जाणवतात. परंतु दिवसातून दोनतीन वेळा थ्रोम्बोफॉब लावल्यास आणि आराम केल्यास सावकाश नाहीशा होतात. उतार पडत असल्यामुळे पूर्वीचे निदान बरोबर आहे असे मानायला हरकत नसावी. थ्रोम्बॉसिस कॅल्शियम कमतरतेमुळेच देखील उद्भवू शकतो का?

असो एका छान, उपयुक्त लेखासाठी धन्यवाद.

कुमार१'s picture

30 Aug 2018 - 8:47 am | कुमार१

निशाचर, नाखु व सुधीर,
अभिप्राय व उत्साहवर्धना बद्दल आभार !

विड्याची पाने यात उपरोक्त सर्व असतं काय?
>>>>

कॅल्शियम व ‘क’ असते पण फॉस्फरस नसावे. निव्वळ पाने जास्त खाल्ल्यास बिघडत नाही पण, त्यातून सुपारी व अन्य irritants जास्त खाल्ल्याने तोंडाच्या पातळ अस्तराला इजा होते.

थ्रोम्बॉसिस कॅल्शियम कमतरतेमुळेच देखील उद्भवू शकतो का?>>>>

नाही. दीर्घकाळ अंथरुणाला खिळून राहिल्यानंतरची ही समस्या आहे . त्याने रक्त गुठळ्या होतात.

नाखु's picture

30 Aug 2018 - 9:28 am | नाखु

आता विडा विना कातसुपारीचा रंगेल!!

नाखु

कुमार१'s picture

30 Aug 2018 - 9:46 am | कुमार१

आणि मग…
नाखु पानवाला खुशीत येईल ☺️

कुमार१'s picture

3 Sep 2018 - 9:10 am | कुमार१

आता वळू यात दातांच्या बळकटी कडे. या संदर्भातला पुढचा लेख इथे :

https://www.misalpav.com/node/43243

मराठी कथालेखक's picture

3 Sep 2018 - 5:01 pm | मराठी कथालेखक

होमिओपथी उपचारांत दिल्या जाणार्‍या कॅल्केरिया फॉस (Calcarea phosphorica ?) या चघळायच्या गोळ्यांबद्दल काही सांगू शकाल का ? अ‍ॅलोपथीतील कॅल्शिअमच्या गोळ्यांच्या तुलनेत या कशा आहेत ?

सुबोध खरे's picture

5 Sep 2018 - 8:05 pm | सुबोध खरे

सामान्य पणे मिळणाऱ्या कल्केरिया फॉस ६ X या औषधाच्या एक ग्राम गोळीत साधारण १०० नॅनो ग्राम कॅल्शियम फॉस्फेट असेल त्यामुळे त्याचा परिणाम काय आणि कसा होतो हे आधुनिक औषधशास्त्राच्या औषधाशी किंवा आधुनिक रसायनशास्त्राच्या तत्वाशी संबंध असत नाही. साधे खायच्या पानाला आपण लावतो तो चुना साधारण ५०० मिग्रॅ असेल. म्हणजे त्यात या औषधाच्या ५००० पॅट कॅल्शियम असेल.
त्याचा प्रभाव कसा होतो आधुनिक शास्त्राच्या गृहितकाप्रमाणे सिद्ध करणे अशक्य आहे. ( उदा. पाण्यात जितके कमी मीठ टाकाल तितका त्याचा प्रभाव जास्त असतो असे होमियोपॅथीचे तत्व आहे)
तो तत्वाचा आणि विश्वासाचा प्रश्न आहे.

कुमार१'s picture

3 Sep 2018 - 5:52 pm | कुमार१

Calcarea phosphorica यात सूक्ष्म प्रमाणात Ca &P असते. आजारानुसार तज्ज्ञांच्या सल्ल्याने ते घ्यावे.

बाजारातील कॅल्शियम च्या गोळ्यांत प्रकार आहेत : कॅल्शियम फॉस्फेट, सायट्रेट, इ.
उपचार पद्धतीनुसार मात्रा वेगळी असेल

उपयुक्त माहिती साठी धन्यवाद !
काही शंका.
१. कॅल्शियम आहार/औषधातून एका वेळी जास्तीत जास्त कितीसे शरीरात शोषले जाते ?
२. कॅल्शियम ची गोळी जेवणाबरोबर / जेवणानंतर घेतली तरच शरीरात शोषली जाते की नुसती घेतली तरी अॅबसॉर्ब होते ?

कुमार१'s picture

3 Sep 2018 - 9:59 pm | कुमार१

१.
प्रौढांमध्ये आहारातील त्याच्या एकूण प्रमाणाच्या सुमारे २०%च शोषले जाते.
२. नुसती शोषली जाईल पण त्याने जठर आम् ल खूप वाढेल
३. आहारातील इतर घटकांचा शोषणावर होणारा परिणाम लेखात दिला आहे

खूप माहितीपूर्ण लेख.
कॅल्शियम आणि इन्सुलिनचा काही संबंध असतो का?

कुमार१'s picture

8 Nov 2018 - 10:23 pm | कुमार१

स्वादुपिंडाच्या विशिष्ट पेशींत इन्सुलिन साठवलेले असते. तिथून ते बाहेर स्त्रवण्यास Ca मदत करते.

मानवासाठी प्रौढावस्थेत दूध पिणे आवश्यक आहे का? हा तसा वादग्रस्त प्रश्न आहे. त्यावर सतत वैज्ञानिक काथ्याकूट होत असतो.

अलीकडील संशोधनातून चर्चेत आलेले काही मुद्दे :

१. प्रौढावस्थेत वाढ पूर्ण झालेली असते. त्यामुळे रोज जेवढे कॅल्शियम खाल्ले जाईल, तेवढेच उत्सर्जित झाले पाहिजे.( शून्य समतोल पातळी).

२. सधन देशांत लोक भरपूर दुग्धजन्य पदार्थ खातात तर गरीब देशांत बरेच कमी खाल्ले जाते. इथे एक रोचक मुद्दा लिहितो. जेव्हा गरजेपेक्षा जास्त कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा शरीरातील त्याचे शोषणही बऱ्यापैकी कमी होते. या उलट जेव्हा अपुरे कॅल्शियम खाल्ले जाते, तेव्हा तुलनात्मक शोषण अधिक होते.

३. गरीब देशांत दूध जरी कमी प्याले तरी २-३ धान्ये मोठ्या प्रमाणात खाल्ली जातात. त्यातून कॅल्शियमची गरज बऱ्यापैकी भागते.
४. अलीकडे दुधातून आपल्या पोटात जाणारी रसायने आणि हॉर्मोन्स हाही कटकटीचा विषय झालेला आहे.

५. हे सर्व पाहता प्रौढांसाठी दूध हे कॅल्शियमसाठी आवश्यक नाही. कॅल्शियमचे अन्य स्त्रोत ठीक राहतील.

६. सारांश: ज्यांना दूध आवडते त्यांनी प्या; ज्यांना आवडत नाही, त्यांना त्याचा आग्रह नको !

कुमार१'s picture

21 Oct 2020 - 12:16 pm | कुमार१

दीर्घकालीन अस्थिरोगाच्या वेदना दरसाल हवामान बदला दरम्यान वाढतात का, हा एक कुतुहलाचा व संशोधनाचा विषय आहे. काही रुग्णांचा असा अनुभव असतो, तर काहींचा नसतो. यासंदर्भात अनेक अभ्यास झालेले आहे. त्यामध्ये वातावरणातील खालील घटकांच्या बदलांची दखल घेण्यात आली :

• तापमान
• वातावरणातील दाब
• सापेक्ष आर्द्रता आणि
• पाऊस

आतापर्यंत झालेल्या अभ्यासातून असे दिसले आहे. काही रुग्णांच्या गटांमध्ये वरील चार घटकांपैकी एखादा घटक आणि वेदना यांचा संबंध दिसला आहे. अन्य काही अभ्यासात तसा संबंध दिसलेला नाही.

यासंदर्भात दोन गृहीतके मांडण्यात आली आहेत :
१. सांध्यामधील विशिष्ट चेतातंतू हे अशा रुग्णांमध्ये अधिक संवेदनशील असतात. जेव्हा वातावरणातील दाब बऱ्यापैकी बदलतो तेव्हा ते उत्तेजित होतात आणि वेदना वाढते.

२. काही सांध्यांच्याबाबतीत (खुबा) हवामान बदलामुळे त्यांची अस्थिरता वाढते.

३. याला अजून एक पदर आहे. तो म्हणजे रुग्णाची मानसिकता. एकदा का रुग्णाला हवामान बदलाने त्रास वाढल्याचे लक्षात आले, की मग त्याच्या मनात ते पक्के बसते आणि प्रत्येक हवामान बदलाच्या वेळेला तो अधिक साशंक होत राहतो.

एकंदरीत पाहता आतापर्यंतच्या अभ्यासातून यासंदर्भात ठोस निष्कर्ष काढता येत नाही, हे खरे.