फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ७

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
6 Aug 2018 - 12:02 am

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate your love..)

कथा - ७
वारी.. प्रेमाचे रिंगण..

ती बावरली होती.. तिच्यासाठी हा अनुभव नवाच होता शहरात.. पण तोच तिला तो दिसला आणि तिला बरे वाटले..

पुढे तो एकटाच चालत होता.. हा आपल्या ऑफिसमधला तर नाही ना.. ती विचार करतच होती की हाक तरी कशी मारायची.. तोच त्याने मागे वळून पाहिले.. तो तोच होता ह्याची तीला खात्री पटली.. तोही तिच्याकडे पाहून हसला.. चला कोणीतरी सोबतीला भेटले नाहीतरी एवढं अंतर चालणे तेही एकट्याने.. तिला जीवावरच आले होते.. आता कसे त्याच्याबरोबर गप्पा मारत सहज अंतर संपून जाईल..

ऑफिस सुटल्यावर ती रूमवर चालली होती आणि त्याच दिवशी पंढरपूरला चाललेल्या पालखीचा शहरात मुक्काम होता.. आणि त्यामुळे सर्व रस्ते बंद आणि गाड्याही बंद होत्या.. बराच वेळ गाडीची वाट पाहून तिने शेवटी चालत जायचे ठरवले..

वारी.. पालखी.. देवाशी संबंध जोडणारे शब्द.. पण भाषेची गंमत पहा.. वाऱ्या म्हटले की येरझाऱ्या होतो.. पालखी शब्द पण 'तुझी पालखी उचलली' असा उपहासात्मक वापरला जातो..

बाजूने जाणारे वारकरी पाहून तिला हे सहज सुचले आणि तिला स्वतःलाच हसू आले.. हे कोणालातरी सांगावे असे तिला वाटत होते, पण तितकेच आपुलकीने ऐकायला आजूबाजूला कोणीच नव्हते.. शेवटी तो भेटला हे सांगायला..

त्यावर तो म्हणाला - 'हो ना अगदी विचित्र आहे हे, अशीच अजून एक विचित्र गोष्ट म्हणजे लग्न ठरविताना आपण देवाला भागीदार करतो, मग घटस्फोट घेताना त्याला साक्षीदार का नाही करत..'

ती हसत म्हणाली- 'हं.. पटतंय हे, कदाचित असे तर नसेल की तुटलेल्या गोष्टी देवापुढे नेत नाहीत म्हणून..?'

तो- 'मुळातच माणूस देवापुढे हात पसरतो तेव्हा आतून तुटलेलाच असतो ना..'

त्याच्या ह्या हजरजबाबीपणाचे तिला कौतुक वाटू लागले..

ती- ' तुझा मुद्दा बरोबर आहे पण माणूस कधी कधी एवढा का तुटत असेल, असे काय गमावतो तो, की ज्याच्यापुढे जगणं पण गौण वाटून जाते..'

तो- ' कदाचित कोणाच्या नजरेतील त्याचे महत्त्व संपले की.. जसे एकतर्फी प्रेमात होते..'

ती- ' पण कधी कधी लग्न झाल्यावर पण काहीजण अंगावरची लग्नाची हळद उतरण्याआधीच आत्महत्या करताहेत.. मुलींबरोबर मुलेही आत्महत्या करताहेत..'

तो- ' ते कदाचित अपेक्षांच्या दबावाखाली येऊन किंवा मनाविरुद्ध लग्न झाल्याने असेल..'

ती- ' पण त्यावेळी आत्महत्या करणारा माणूस दुसऱ्याचे आयुष्य उद्धवस्त करून जातो ना.. निदान आत्महत्या करायला लागणारे धाडस लग्नाआधी स्पष्ट बोलायला दाखवले तर जास्त बरं होईल नाही का..?'

तो- ' हे खरे आहे पण आपल्याकडे अजूनही लग्न दबावतंत्राचा वापर करून किंवा भावनाविवश करून केली जातात.. आणि ह्या गोष्टी का वापरल्या जातात कारण पुढची व्यक्ती आपल्या प्रतिष्ठेची नसते.. '

ती बाजूला चाललेल्या वारकऱ्यांकडे पाहून म्हणते - ' आता ह्यांनाच बघ, हे प्रत्येक जण वेगळ्या परिस्थितीतून आले आहेत पण सर्वांचा देव एकच.. तो विठ्ठल.. तिथे होणारी ह्यांची एकी प्रत्येक ठिकाणी का होत नाही.. खरंच विचित्र आहे ना हे पण..'

तो- ' आणि देव तुमच्या अपेक्षा पूर्ण करत नसला तरी तुम्ही त्याच्यावर नाराज होत नाही.. पुन्हा पुढच्या वारीला जाताच ना.. मग समोरच्या माणसाकडून अपेक्षा पूर्ण झाली नाही तर मात्र तिथे समजूतदारपणा नाही असे का?'

ती- ' पण काहीजण अध्यात्माचा एवढा अतिरेक करतात की त्याचा त्रास त्याच्या जवळच्या माणसांना होतो.. कधीकधी ही देवाची जास्त भक्ती संसाराची विरक्ती ठरू पाहते..'

तो- ' खरंतर प्रेमसुद्धा एक प्रकारे भक्तीच आहे.. फक्त देवाला निमुटपणे सारे सहन करता येऊ शकते.. आता ते आपल्याला जमेलच असे नाही.. नाहीतर आपण सर्वच देव झालो असतो..'

ती - ' तुला असे म्हणायचे आहे का चांगला भक्त चांगला प्रेमी होऊ शकतो, म्हणूनच की काय कृष्णावरील मिराच्या भक्तीला प्रेमाचे नाव दिले गेले..!'

तो- ' असे नाही सांगता येणार कारण कृष्णाबरोबर राधाचेही नाव जोडले जातेच की.. '

वारकरी अभंग गात होते, टाळ आणि मृदुंग वाजत होते,
पण हे सारे शिस्तीत घडत होते, ती बारकाईने पाहत होते, त्या वारकऱ्यांत सर्वचजण होते, आबालवृद्धापासून महिलांपर्यंत..

ती- ' ह्या वारकऱ्यांचे विशेष वाटते, एवढा उत्साह कुठून येतो त्यांच्यात.. पाऊस वारा कशाचीच पर्वा नाही.. अन होणाऱ्या वेदनाचाही चेहऱ्यावर लवलेशही नाही..'

तो- ' हो ना, फक्त आनंद घेत प्रवास करणे एवढेच माहीत असते त्यांना.. कदाचित त्यांची भक्तीच त्यांना वेदनेचा विसर पडत असेल.. प्रेमही असेच असावे जिथे वेदनेचा विसर पडावा..'

ती- ' वारकऱ्यांची अवस्था जणू प्रेमात पडलेल्या प्रेमींसारखी असते, वारकऱ्यांना ओढ असते ती विठ्ठल भेटीची जशी प्रेमिकांना ओढ असते एकमेकांच्या प्रेमाची..'

तो- ' प्रेम आणि वारी एका बाबतीत सारखीच, सर्व काही विसरायला लावते, आपआपला विठ्ठल मिळेपर्यंत..'

एक महिला वारकरी त्यांच्यासमोर आली, दोघांना टिळा लावला आणि आशीर्वाद देऊन गेली, ' तुमचा संसार सुखाचा होवो..', दोघेही क्षणभर चपापले आणि नंतर स्वतःला सावरत ती म्हणाली..
' मला एक विशेष ह्या गोष्टीचे वाटतेय, की वारीची एवढी जुनी परंपरा अजूनही कशी काय टिकून राहिली असेल..?'

तो- ' शेवटी म्हणतात ना प्रेम हे चिरंतन आहे, आणि भक्ती हे प्रेमाचेच दुसरे रूप आहे.. फरक फक्त एवढाच आहे की खूपवेळा भक्ती ही अगतिक होऊन केली जाते आणि उलट प्रेमात माणूस अगतिक होतो..'

ती- ' तुला काय वाटते पुढची येणारी पिढी ही परंपरा टिकवू शकेल..?'

तो- ' परंपरा नक्की टिकेल पण थोडेसे स्वरूप बदललेले असेल वारीचे.. जसे प्रेमाचे बदलत आहे..'

ती- ' पण जे काही असेल त्या काळानुसार उत्तम असेल..'

तो- ' आशा ठेवूयात..'

तोच तिचा फोन वाजतो, पलिकडून तिची मैत्रीण बोलत असते, तिने जोडीला कोण आहे विचारताच तिने सांगितले की मित्र आहे ऑफिसचा, त्यावर तीची मैत्रीण काय म्हणाली कुणास ठाऊक, पण तिने नंतर बोलू असे म्हणत फोन ठेवला, पण तिच्या गालावर पडलेली ती खळी आणि ओठावरचे हसू काहीतरी खुणावत होते, न त्यालाही ते कळले असेल असे तिला वाटले, म्हणूनच तो काही विचारणार तोच विषय बदलत ती त्याला म्हणाली

ती- ' वारीत जी रिंगण होतात त्यात हे वारकरी एवढे चालून दमल्यावरही एवढे उत्साहात खेळ कसे काय खेळतात आणि धावतातही..'

तो- ' खरंतर एक विश्रांती म्हणून रिंगण आखले जाते, आणि ते रिंगण सुटताना एक उमेद देऊन जाते, पुढच्या प्रवासाची.. विठ्ठलभेटीची..'

ती- ' प्रेमही असे अनेक रिंगणात फिरत असते, अपेक्षांच्या, प्रतिष्ठेच्या, मान अपमानाच्या, पण ते तिथेच संपले नाही पाहिजे, ते रिंगण सोडवून नवीन उमेद घेऊन बाहेर पडेल ते खरे प्रेम..'

तो- ' त्यासाठी प्रेम हे भक्तीच्या पातळीवर गेले पाहिजे.. आणि ती भक्ती अगतिक होऊन नको, तर स्वेच्छेने व्हावे.. जशी ह्या विठ्ठलाची आराधना ह्या वारकऱ्याकडून होते..'

ती- ' पण वारीतही परतीचा प्रवास आहेच की.. म्हणजे ताटातूट आहेच की..'

तो- ' पण पुन्हा भेटण्याची ओढपण आहेच की.. फक्त ती टिकून राहिली पाहिजे.. भक्तीतही आणि प्रेमातही..'

दोघांचे विचार एकेक रिंगण सोडवत होते, प्रेमाच्या वारीतले..
तो- ' तुला आवडेल का असे वारीला जायला..?'
ती- ' हो आवडेल की, फक्त सोबतीला तू..' इथे ती थोडीशी बोलायचं थांबली पण स्वतःला सावरत मिश्किल हसत म्हणाली ' तुझ्यासारख्या विचारांची माणसे पाहिजेत, म्हणजे गप्पा मारत प्रवास कधी संपतो कळतच नाही ना..'
हा तिचा इशारा तर नाही ना.. तो विचार करू लागला..

तोच रिमझिम पाऊस सुरू झाला.. त्याने छत्री आणली नव्हती, तिने त्याला स्वतःच्या छत्रीत बोलावले, शेवटी तिच्या छत्रीत जाण्याशिवाय त्याला पर्याय नव्हता.. विठ्ठलनामाचा जयघोष टिपेला पोहचत होता, वारकऱ्यांचा उत्साह वाढत होता, पावसाची पर्वा नव्हती.. सारे वातावरण धुंद झाले होते.. भक्तिमय आणि प्रेममयही..

त्याला तिचे विचार आवडू लागले कदाचित तीच आवडू लागली होती.. पण तो तिला प्रेमासाठी विचारू शकत नव्हता.. कारण त्याच्या जिवलग मित्राला ती आवडत होती.. आणि तिला आपले प्रेम व्यक्त करणे म्हणजे मैत्रीशी प्रतारणाच.. तो द्विधा मनस्थितीत होता.. त्याचे प्रेम मैत्रीच्या रिंगणात फिरू लागले..

वारीचे रिंगण सुटेलही.. पण तो सोडवू शकेल का..? त्याच्या मैत्रीचे आणि.. प्रेमाचे रिंगण..

***
राही..©
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख

प्रतिक्रिया

ट्रम्प's picture

6 Aug 2018 - 1:08 pm | ट्रम्प

" सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा. "

लेख वाचण्यासाठी पूर्वपरवानगी ची अट न ठेवल्या बद्दल धन्यवाद .

रा.म.पाटील's picture

12 Aug 2018 - 9:58 am | रा.म.पाटील

वाचायला परवानगी ठेवली तर लेखक कसा जगणार.. त्यामुळे बिनधास्त वाचा आणि प्रतिक्रिया ही कळवा.. आपले स्वागत आहे..

आणि परवानगीची अट ही काही वाईट अनुभवातून ठेवावी लागते..

रा.म.पाटील's picture

12 Aug 2018 - 9:51 am | रा.म.पाटील

फेसबुक पेज ची लिंक

https://m.facebook.com/festivdiaries

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ६ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42923

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ८ ची लिंक

https://www.misalpav.com/node/43209#comment-1009000