फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ६

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
30 Jun 2018 - 11:44 pm

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate your love..)

कथा - ६
पाऊस.. (प्रेमाचा साक्षीदार..)

तो तिला जाऊनच देत नव्हता.. त्याने तिचा रस्ता अडवला होता.. ती हतबल होती त्याच्यापुढे.. अशावेळी एखाद्या मुलाने हीरोगिरी दाखवत तिची मदत केली असती..

पण तिच्या शेजारचा मुलगा तरी काय करणार.. तोही हतबल होता त्याच्यापुढे.. कारण त्याचाही रस्ता अडवला होता त्याने.. पावसाने..

ती आणि तो दोघेही बसस्टॉपवर उभे होते.. पाऊस इतका जोरात होता कि त्या दोघांना हवा तो एकांत मिळावा इतकी काळजी त्याने घेतली होती..

संध्याकाळच्या पाच वाजताच दाटलेल्या आभाळाने आणि मुसळधार पावसाने दिवसाला रात्रीची छत्री लवकर उघडायला लावली होती जणू..

नेहमीच्या वर्दळीच्या रस्त्यावर गर्दी होती पण वाहनांची आणि माणसाची नव्हे तर पावसाच्या सरींची.. सर्व गाड्या जाग्यावर थांबल्या होत्या आणि लोकसुद्धा..

आता त्या बसस्टॉपवर फक्त ते तिघेच होते.. तो, ती आणि पाऊस..

आता सुरुवात कोणी करायची..
पाऊसानेच केली.. जोरात वीज चमकून ढगांचा कडकडाट झाला.. ती घाबरली.. ते पाहून त्याला हसू आले.. तिच्या लक्षात आले तो आपल्याला हसतोय.. पण ती त्याला काही बोलली नाही पण तिच्या चेहऱ्यावर भीती मात्र दिसत होती.. पाऊसाची आणि त्या त्रयस्थ मुलाचीही..

तो तिची भीती पाहून- 'सॉरी, मी हसलो तुम्हाला पण खरंच तुम्ही पावसाला अजूनही घाबरता, नाही तसे सर्वच घाबरतात, मीही घाबरायचो, पण लहानपणी..पण आता ह्या वयात..?'

ती- ' हं मला अजून भीती वाटते ती विजेची न ढगांची, पण मला पाऊसात भिजायालाही खूप आवडते'

तो- 'हो ना पाऊस पण किती विचित्र वागतो ना, एकीकडे खुणावतो आणि एकीकडे घाबरवतोसुद्धा..'

ती- 'हे असं आपले अनोळखी माणसावर विश्वास ठेवताना होते.. त्याच्याशी बोलावेसे वाटतेच पण..'

तो- 'पण त्याने आपले बोलणे प्रेम समजू नये बरोबर..'

तिला जाणवले की त्याने बरोबर ओळखले आपल्याला जे बोलायचे होते ते..

ती घरी फोन लावत होती, पण तिच्या मोबाइल नेटवर्कची रेंज नव्हती, म्हणून तिने त्याला फोन मागितला, त्याने दिला पण रेंज त्याच्याही मोबाईल नेटवर्कची नव्हती..

पाऊस मनातल्या मनात हसत होता कारण आज सर्व त्याच्या मनासारखे घडत होते.. प्रेम घडणार होते.. आणि पाऊस पडत होता..

ती- 'पाऊस पण विचित्र वागतो ना.. एकीकडे पेटलेले वणवे विझवतो.. वनातले.. आणि एकीकडे विझलेले वणवे पेटवतो.. हृदयातले..'

तो- ' हो अगदी बरोबर, कधीकधी प्रेमातल्या उत्कट क्षणाचा भागीदार होतो तर कधी प्रेमभंगातील अश्रू लपविण्यास आधार देतो..'

ती- ' मला वाटते प्रेम कसे करावे हे पाऊसकडून शिकावं..'

तो- ' ते कसं काय..?'

ती- ' म्हणजे बघ ना, तो सढळ पडतो कसलीही अपेक्षा ना ठेवता त्याला फक्त देणं ठाऊक आहे, घेणं नाही..'

तो- ' म्हणजे तुझे म्हणणे असे की प्रेमात त्याग महत्वाचा..!'

ती- ' हो कारण त्यागाने प्रेम वाढते..'

तो- ' पण त्यागाने प्रेम कमी होत असेल तर..'

ती- ' ते कसे..?'

तो- ' आता हेच बघ.. आता हा पाऊस असाच बराच वेळ पडत राहिला आणि तुला घरी जाता आले नाही तर.. तुला तो तरीही आवडेल की त्या पावसाचा राग येईल..'

ती- ' हं पटतंय तुझे म्हणणे, पण असे त्यागाने प्रेम कमी का होते..'

तो- ' कारण बहुतांश प्रेमात हा त्याग अपेक्षा ठेवून केला जातो, आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर प्रेम कमी होत जाते..'

ती- ' म्हणजे निरपेक्ष प्रेम असावे, मग पाऊस पण निरपेक्षच पडतो ना..'

तो- ' हो, पण प्रेमात निरपेक्ष त्याग दोन्ही बाजूने पाहिजे तर ते प्रेम टिकते..'

ती- ' हो ना नाहीतर एकतर्फी निरपेक्ष प्रेम म्हणजे आजच्या व्यवहारिक जगातील मुर्खपणाच नाही का..?'

तो- ' प्रेमाची वृत्ती नेहमी समर्पित असावी.. पाऊसासारखी.. नाहीतर तो व्यवहार ठरतो, मग ते प्रेम कसले..?'

पाऊस मात्र तिच्या तोंडून होणाऱ्या त्याच्या कौतुकामुळे आणखी जोरात पडू लागला..

ती- 'तुला काय वाटतं, पाऊस हा प्रेमातला अडसर असतो?'

तो- ' का असं का म्हणते..?'

ती- ' आता बघ ना जर प्रेयसी भिजत असताना पाऊस तिच्याशी सलगी करतो, न प्रियकराला काहीच करता येत नसल्याने तो पाऊसावर जळत असेल..'

तो- ' कदाचित पाऊस त्यांच्या प्रेमाच्या संयमाची परीक्षा घेत असेल असे वागून..'

ती- ' हो ना, पाऊस पण कधी कधी प्रेयसीला अवेळी रस्त्यात गाठून प्रियकरांना संधी उपलब्ध करून देतोच की..' न ती हसते..

तो मनातल्या मनात, ही अप्रत्यक्षपणे आपल्याला सांगत नाही ना की मी तुझी प्रेयसी व्हायला तयार आहे..

तो- ' तुला काय वाटते पाऊस नक्की कोणावर प्रेम करत असेल म्हणून पडतो की..'

ती- ' आता ही ज्याची त्याची कल्पना, पण मला वाटते पाऊस म्हणजे सागराचा दूत, जो सरिताच्या आटलेल्या जलप्रवाहाला बळ देतो, आणि सागर सरिताची भेट घडवून आणतो..'

तो- ' ह्यातून हे कळते तुम्ही हिंमत हारताना प्रेम हे तुम्हाला बळ देणारे असावे..'

ती- ' पाऊसात तसे अनेकजण भेटत असतात, कविकल्पना आहेत, जसे की समुद्रलाटा आणि किनारा, आभाळातील वीज आणि जमिनीवरचे झाड, पाऊस आणि धरती, सागर आणि सरिता..'

तो- ' आणि ह्यांचे प्रेम पाहून वाटतं की खरं प्रेम वाट पाहते.. पुन्हा पाऊस पडण्याची.. ह्यांचे प्रेम पाहून जाणवते की प्रेमावर विश्वास किती असावा, त्यांना माहीत आहे की पुन्हा पाऊस पडणार आहे न पुन्हा आपण भेटणार आहे..'

ती- ' पण शेवटी प्रेमही कधी पाऊस होते, ज्याला आठवता येते पण साठवता येत नाही.. शेवटी पाऊसालाही विरहाचा शाप आहे..'

तो- ' असेलही, पण विरहानेच प्रेम वाढते..'

पाऊसाला जाणवले आपली उपस्थिती प्रभाव पडत होती.. प्रेम भिजणार होतं आज..

ती- ' पाऊसाच्या आशा अवेळी येण्याने तो कधी कधी अल्लड वाटतो जसे अल्लड वयातील प्रेम, कधी होते आणि कधी संपते कळतच नाही, पण भिजवून मात्र जाते..'

तो- ' प्रेमची खरी परीक्षा पाऊसातच होते..'

ती- ' ते कसं..?'

तो- ' जर तुम्हाला पावसात भिजायचं असेल तर विजांना आणि ढगांना घाबरून चालणार नाही, तेच प्रेमात होते.. तुमचे खरे प्रेम तेव्हा कळते, जेव्हा तुम्ही प्रेमासाठी तुम्हाला वाटणारी प्रत्येक भीती पार करता..'

ती- 'आणि संघर्ष करून मिळालेली गोष्ट मग ते प्रेम असो, पावसात भिजल्यासारखाच आनंद देऊन जाते..'

मुसळधार पाऊस पाहून तो म्हणाला-

' तुला काय वाटतं प्रेम मुसळधार पावसासारखं असावे की रिमझिम पावसासारखं..'

ती- ' दोन्हीत फरक काय..?'

तो- ' मुसळधार पाऊस एकदाच जोरात पडतो पण नखशिखांत भिजवून जातो, तसे प्रेम असावे जे जेव्हा कधी भेटेल तेव्हा इतकं तुटून करावं की पुढचा माणूस तुमच्या प्रेमात नखशिखांत भिजला पाहिजे, न त्याच्या गैरहजेरीत तुम्हाला जाणवले पाहिजे त्याच्या प्रेमाची सोबत..'

ती- ' न रिमझिम पावसासारखं प्रेम ते कसं..?'

तो- ' हा पाऊस प्रत्येकवेळी तुम्हाला सोबत करतो, तुम्ही दुखावणार नाही ह्याची काळजी घेतो.. तसेच प्रेमाने तुमची सतत काळजी घेतली पाहिजे न त्या काळजीतून जाणवत राहिले पाहिजे त्यांचे प्रेम..'

ती- ' पाऊस कसाही असो, शेवटी महत्त्वाचे काय त्याचे भिजवणे.. आपल्याला कोणता पाऊस आवडतो, योग्य वेळी पडणारा पाऊस.. तसेच प्रेमाचे आहे, ते कसेही व्यक्त होऊ दे, पण त्याच्या आठवणी गोड झाल्या पाहिजेत..'

तो- ' जसा आजचा पाऊस लक्षात राहील, एक गोड आठवण म्हणून..'

तिने उत्तर दिले नाही पण तिची सैरभर झालेली नजर आणि गालावर उमटलेली लाली व नकळत दाबलेला खालचा ओठ बरेच काही बोलून गेले..

पण त्याच्याही नंतर लक्षात आले आपण काय बोलून गेलो ते..

पण दोष त्याचाही नव्हता, तिचाही नव्हता, तर होता तो त्या पावसाचा ज्याने एवढे गुलाबी वातावरण जे तयार केलं होते..

न पाऊसही मनातल्या मनात खुश होता, त्याला हवा तो दोघाच्या प्रेमाचा अंकुर फुलण्यास सुरुवात तर झाली होती..

तोच दोघांनी एकमेकांकडे पाहत एकाच वेळी विचारले, " तुझे नाव काय..?"

दोघेही हसले न दोघांनी एकाचवेळी स्वतःचे नाव सांगितले..
नाव ऐकताच दोघेही क्षणभर थांबले, आता दोघाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले..

बराच वेळ कोणीही बोलेना..

पाऊसालाही कळून चुकले त्या नावातून दिसणारी त्यांची ओळख पाऊसही पुसू शकत नव्हता..

आता पाऊसालाही ठाऊक नव्हते की नुकताच फुटलेला प्रेमाकुंर त्यांच्या वास्तवाच्या जळजळीत प्रकाशात जाळून खाक होणार की पाऊसाचा ओलावा त्याला जिवंत ठेवणार..

पाऊस पडत होता..
त्याला वाटत होते की तिला आवडेल का आता आपल्याशी बोलायला..
तिला वाटत होते की त्याला आवडेल का आता आपल्याशी बोलायला..

पाऊस आता जरा बिथरला..
पुन्ह विज पडली.. पुन्हा ढगांचा कडकडाट झाला..
पुन्हा जोरात आवाज आला..
पुन्हा ती घाबरली.. आणि पुन्हा तो हसला..

पाऊसाने तसे पाहिलेत अनेक पावसाळे, न पावसातले प्रेम..
पाहिलेय बेफिकीर यौवन, न गोठलेला संवाद..
पाहिलेत पेटलेले वणवे, न विझलेली धग..
पाहिलेय पावसात प्रेम फुलताना, न पावसात कोणीतरी अश्रू लपवताना..
पहिलेय कोणालातरी पाऊस साठवताना, न कोणालातरी पाऊस आठवताना..

पण आता पाऊसालाच समजेना,
आता त्यांच्या प्रेमाचा गुलाबी रंग.. दुसऱ्या रंगाना झाकोळणार..
की आज पाऊसाला व्हावं लागेल..

पाऊस पडूनही पाऊसात न भिजलेल्या.. प्रेमाचा साक्षीदार..

***
राही..©
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख

प्रतिक्रिया

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ५ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42710

फेस्टिव्हल डायरीज..!! : कथा - ७ ची लिंक

https://www.misalpav.com/node/43130

रा.म.पाटील's picture

12 Aug 2018 - 9:50 am | रा.म.पाटील

फेसबुक पेज ची लिंक

https://m.facebook.com/festivdiaries