मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा (भाग २)

Primary tabs

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
26 Jan 2018 - 4:06 pm

यापूर्वीचे कथानक (मोनालिसाच्या गूढ स्मिताची विलक्षण रहस्यकथा भाग १):
https://www.misalpav.com/node/41194
पॅरिस मध्ये ‘मोनालिसा’ चे चित्र बघताना मला ती तिथून सोडवण्याची विनंती करत असल्याचा भास झाला. दुसरे दिवशी रात्री ‘क्लो ल्यूस’ या लिओनार्दोच्या प्राचीन निवासस्थानात खुद्द लिओनार्दो दा विंचीने मी त्याचा ‘लॉरेन्झो’ नामक पट्टशिष्य असल्याचे सांगून मला भूतकाळाच्या सफरीवर पाठवले…
… या भागात ‘लॉरेंझो’ या माझ्या पंधराव्या शतकातील पूर्व- जन्माची हकीगत वाचा:

लोरेंझो गेरार्दिनीची रोजनिशी : ( टोलेडो- स्पेन, ४ सप्टेंबर १४९२ )
मी लोरेंझो गेरार्दिनी .आजपासून मी रोजनिशी लिहिणे सुरु करत आहे. या रोजनिशीत मी रोज काय केले याखेरीज आमच्या कुटुंबाविषयी, आणि इतर विविध माहितीपण लिहून ठेवणार आहे.

आमचे कुटुंब: मी, माझी लहान बहीण एली आणि आमचे आई-बाबा असे आमचे कुटुंब आहे.
.
चित्र १. दहा वर्षांपूर्वी आम्ही फ्लोरेन्सला रहात असताना असे दिसायचो. चित्रकार : Paulo Veronese

मी अगदी लहान असताना माझी आई चित्रकला शिकायची, ते बघून मलापण ती आवड लागली. आता मी रोज चित्रकलेचा सराव करत असतो.
...
एली अगदी लहान असल्यापासून सर्वांची खूप लाडकी आहे. वडील तिला कौतुकाने ‘मोनालिसा’ म्हणतात. ग्रीक-लॅटिनच्याही पूर्वीच्या कोणत्यातरी प्राचीन मेंढपाळांच्या भाषेत मोनालिसा’ या शब्दाचा अर्थ ‘माझे लाडके कोकरू’ आहे, असे ते सांगतात. एलीला अगदी लहानपणापासूनच लिहिण्या - वाचण्याची फार गोडी आहे.
...
चित्र ४. Johann Georg Meyer von Bremen. चित्र ५. Simon Glücklich

...
चित्र ६-७ चित्रकार: Johann Georg Meyer von Bremen

आम्ही सध्या स्पेन मधील 'टोलेडो' गावात रहात आहोत. माझ्या वडिलांना इथल्या एका उमरावाने लॅटीन भाषा शिकण्यासाठी आमंत्रित केल्याने इटलीतील बॉब्ब्बिओ गावाहून आम्ही इथे आलेलो आहोत. खरेतर आम्ही मुळात फ्लॉरेन्सचे. माझे वडील लॅटीन आणि इतर प्राचीन भाषांचे तज्ञ तर आहेतच, शिवाय त्यांना जुने नकाशे, हस्तलिखिते वगैरे गोळा करण्याची, प्राचीन रोमन आणि ग्रीक संस्कृतीविषयी भाषणे द्यायची फार आवड आहे.
...
...
चित्र ८ - ११ आमच्याकडले नकाशे आणि पुस्तके.

हल्ली वेगवेगळ्या प्रांतात तिथल्या स्पॅनिश, जर्मन, फ्रेंच, इटालियन वगैरे भाषा बोलल्या जात असल्या, तरी लिहायला-वाचायला येणारे लोक फार कमी असतात, आणि लिहिणे-वाचणे लॅटिन मधूनच चालते. लॅटिन भाषा येणाराला सर्व ठिकाणी मान असतो आणि राजे-राजवाडे, अमीर उमराव त्यांना आमंत्रित करत असतात. आम्हाला वडील नेहमी ग्रीक पुराणकथा, रोमन साम्राज्य वगैरे विषयी माहिती सांगत असतात, आणि मी चित्रकला चांगल्या प्रकारे शिकून ग्रीक-रोमन विषयांवर भव्य चित्रे रंगवावीत असे त्यांचे - आणि माझे पण - स्वप्न आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------
टोलेडो, ६ सप्टेंबर १४९२
आज सकाळपासून मी एका डोंगरावर टोलेडो गावाचे दुरून दिसणारे दृश्य रंगवत बसलो होतो. रात्री घरी पहुचल्यावर बघतो, तो वडील कसल्यातरी काळजीत चूर झालेले दिसले.

"लोरेंझो, आता माझे काही खरे नाही. इन्क्वीझित्स्योने मध्ये माझाही बळी जाणारसे दिसते आहे. मला त्यांनी पकडून नेले, तर तुम्ही एक क्षणही इथे थांबू नका. पुन्हा आपल्या बॉब्ब्बिओ गावी जा. एली आणि आईची नीट काळजी घे. एलीचे लग्न लवकरच एकाद्या चांगल्या तरुणाशी लावून दे... आणि हो... ही सेरिपी आता तू सांभाळ. ही शेकडो वर्षांपासून आपल्या घराण्याची मूल्यवान ठेव आहे. हिचे पाते जर तुला लालसर दिसू लागले तर तुझ्यावर कठीण प्रसंग ओढवणार आहे असे समज, आणि जेंव्हा तुला काय करावे ते कळेनासे होईल, तेंव्हा ही सेरिपी तुला मार्गदर्शनही करेल” ... असे म्हणून सेरिपी मला देउन त्यांनी आपले सर्व लिखाणाचे कागद एकत्र करून जाळायला सुरुवात केली. मी आतल्या खोलीत येऊन रोजनिशी लिहायला घेतली आहे.
इटलीत सध्या मोठ्या प्रमाणावर प्राचीन रोमन अवशेष, कला, ग्रीक साहित्य वगैरेंचा अभ्यास केला जात आहे, त्यामुळे बायबलखेरीज अन्य विषयांचे ज्ञानही लोकांना होऊ लागले आहे. पाद्री मंडळी सांगत असलेल्या स्वर्ग-नरक याबद्दलच्या कल्पनांपेक्षा मनुष्याचे प्रत्यक्ष जीवन कसे उन्नत करता येईल, याविषयी लोक विचार करू लागलेले आहेत.
...
चित्र १२ नरकयातना Fra Angelico.. चित्र १३ आनंदी जीवन Gerrit van Honthorst

इटलीत वेगाने पसरत असलेले असे सर्व नवनवीन विचार वडिलांनी आपले लिखाण आणि भाषणे यातून टोलेडोत प्रसृत करायला सुरुवात केल्याने इथल्या चर्चची वक्रदृष्टी त्यांच्याकडे वळलेली आहे, पण त्यातून काही मोठे संकट आमच्यावर कोसळेल, असे आत्तापर्यंत तरी वाटलेले नाही.
हे 'इन्क्वीझित्स्योने' फार भयंकर प्रकार आहे. चर्चचे अधिकारी, पाद्री कुणालाही पकडून नेतात, आणि खोटेनाटे आरोप ठेऊन त्याचा अनन्वित छळ करतात. या भयंकर छळामुळे ती व्यक्ती मृत पावताच त्याची सगळी संपत्ती जप्त करतात. घरातील स्त्रियांना जबरदस्ती नन्स बनवतात, असे ऐकले आहे.
.
चित्र १४. 'इन्क्वीझित्स्योने'

बोबिओ, इटली, ३० डिसेंबर , १४९२
गेल्या तीन -चार महिन्यात किती प्रचंड उलथापालथ झाली आहे... सर्वत्र विनाशाचे तांडव... एकामागून एक संकटे... कसाबसा जीव वाचवून सुरक्षित जागी पहुचण्यासाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा... आता कुठे जरा थोडा निवांतपणा मिळालाय, म्हणून पुन्हा रोजनिशी हातात घेतलीय...

... मागे लिहिले, त्याच्या दुसऱ्या दिवशी मी ते चित्र पूर्ण करायला अगदी सकाळीच डोंगरावर येउन बसलो होतो. संध्याकाळी चित्र पूर्ण करून जवळच्या एका धनगराच्या घरात ठेवले, कारण स्पेनमध्ये हल्ली चर्चच्या वर्चस्वामुळे येशू, मेरी आणि बायबलातील प्रसंगांच्या चित्रांखेरीज अन्य प्रकारची चित्रे निषिद्ध मानली जातात. मला निसर्गचित्रण फार आवडत असल्याने दूर शहराबाहेर चित्र काढायला जायचो... तर संध्याकाळी शहराजवळ जसजसा पोहोचू लागलो, तसतसे विचित्र आवाज, करुण किंकाळ्या कानावर येऊ लागल्या. आवाज त्या प्रार्थनामंदिरातून - इग्लेसियातूनच येत होते. मी धावतच जाउन खिडकीतून बघितले, तो अंगावर काटाच आला. आत नाना प्रकारची भयंकर यंत्रे लावलेली होती, आणि त्यांवर लोकांना अडकवून विविध प्रकारे छळ केला जात होता. आणि हे काय? माझे वडीलही त्यात होते? एका टेबलावर हात-पाय बांधून त्यांना ठेवले होते, आणि नाक दाबून त्यांना जबरदस्तीने पाणी पाजले जात होते.
. ..
चित्र १५ - १६ 'इन्क्वीझित्स्योने'
तिथून वडिलांना सोडवणे मला शक्यच नव्हते. मला एकदम घरची आठवण आली. आई आणि एली सुरक्षित आहेत ना? त्यांच्या मदतीला जायला हवे... मी धावतच घराकडे निघालो.
घरी आमचे शेजारी जमलेले होते. सर्वांच्या नजरेत भीती दाटलेली होती. हळुहळु आवाजात कुजबुज चालली होती. आई आणि एली रडत होत्या.
"बाळा, त्यांना पकडून नेले रे त्या दुष्टांनी" आई म्हणाली.
शेजारचे आजोबा मला म्हणाले, तुम्ही रातोरात गाव सोडून सुरक्षित ठिकाणी पोहोचा, कारण सकाळी घरावर मदार येईल. सगळी संपत्ती तर घेउन जातीलच, एली आणि आईला भिक्षुणी बनवण्यासाठी घेऊन जातील. त्यांचे नख सुद्धा नंतर कुणाला बघता येणार नाही, आणि तुझे काय होईल, काहीच सांगता येत नाही...
वेळ अगदी कमी होता. शेजार्‍यांनी भीत- भीतच घोडागाडीची सोय करून दिली. पटापट जमतील तेवढ्या वस्तू घेऊन आम्ही निघालो. त्या घाई-गडबडीतही मी सेरीपी घ्यायला विसरलो नाही. तिचे पाते अगदी लालीलाल झालेले होते, हे बघून माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही.
इग्लेसियाच्या दिशेने जाणे धोक्याचे होते. तिकडून लाल-लाल ज्वाळा आणि धूर दिसत होता, आणि करूण किंकाळ्या ऐकू येत होत्या. बाबांचे काय झाले असेल? या एकाच विचाराने डोके भणाणून गेले होते…

लांबचे वळण घेऊन आम्ही गावाबाहेर पडलो. बरेच अंतर पार केल्यावर आम्ही एका पडझड झालेल्या इमारतीचा आश्रय घेऊन कशीबशी रात्र काढली.
.
चित्र १७. Carl Gustav Carus

पुढे अडीच-तीन महिने काहीश्या धास्तीतच आम्ही प्रवास करत होतो. वाटेत अनेक दृश्ये चित्र काढण्याजोगी दिसत होती, पण मी तश्या मनस्थितीत नव्हतो.
...
चित्र १८. Jacob van Ruisdael.... चित्र १९. Asher B. Durand

.

.
चित्र २०. : Ernest Fritz Petzholdt. चित्र २१. Oswald Achenbach

तीन महिन्यांच्या कठीण प्रवासानंतर प्राचीन रोमन साम्राज्याचे अवशेष जिथे तिथे दिसू लागले. त्यावरून आम्ही इटलीत येऊन पहुचल्याचे लक्षात आले, आणि जरा दिलासा मिळाला.
.
चित्र २२. Rudolf_Wiegmann

...
चित्र २३ - २४ Ferdinand Knab
शेवटी आम्ही आमच्या गावी आम्ही पोचलो. पुन्हा एकदा अगदी बालपणापासून रहात आलो ते घर, शेजारी, सुरक्षित, परिचित वातावरण बरे वाटत होते, पण वडिलांची आठवण पदोपदी यायची. लहानगी एली तर सारखे 'पाद्रे' 'पाद्रे' म्हणत रडायची. आई दु:खात चूर होती. आता मलाच काहीतरी करणे भाग होते. माझ्यावरच सर्व जबाबदारी येऊन पडली होती.
गावातल्या चर्चमध्ये मोठया प्रमाणावर चित्रे रंगवण्याचे काम चालले होते, तिथे मला काम मिळाले. नियतीची लीला, एका चर्चमुळे आमच्या कुटुंबाची वाताहात झाली, तर दुसर्‍यामुळे आम्हाला जगण्याचा आधार मिळाला.
हळू हळू मी कामात रमू लागलो…
.
चित्र २५. चर्चमधील भित्तिचित्रे

...आणि मग एक दिवस माझे नशीब अचानक फ़ळफ़ळले...
आमच्या गावी मिलानचे सुप्रसिध्द चित्रकार आणि संशोधक लिओनार्दो दा विंची यांचे आगमन झाले...
....................(क्रमशः)

कलाइतिहासवाङ्मयकथासमाजप्रवासव्यक्तिचित्रमौजमजारेखाटनप्रकटनविचारआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

26 Jan 2018 - 4:44 pm | प्राची अश्विनी

कथा पकड घेतेय. पुढचा भाग लवकर टाका.

चौकटराजा's picture

26 Jan 2018 - 5:30 pm | चौकटराजा

मी तर या भागातील चित्रे पाहून विस्मयचकित झालो. ! इटाली एकूणच जगाचा कला ,वास्तुसम्राट देश आहेच !

वाह! काय भन्नाट चित्रे आहेत!

ss_sameer's picture

28 Jan 2018 - 10:30 am | ss_sameer

त्रिवार सत्य
सहमत

वावा! पाटीवर अभ्यास करणारी मुलगी - मुलं अशीच अभ्यास करतात. बाकी तंत्र आणि उजेड भारीच. मजा आली.

अरे वा! खूप दिवसांनी आला पुढचा भाग.
चित्रे आणि कथा भन्नाट :)

चौकटराजा's picture

27 Jan 2018 - 8:28 am | चौकटराजा

यात जी बाह्य परिसराची चित्रे आहेत त्यात सरळ बुन्धा व वर मग उंचावर पसरलेल्या फांद्या अशी झाडे खास करून इटाली या देशांत पहायला मिळाली .

चित्रगुप्त's picture

27 Jan 2018 - 10:30 am | चित्रगुप्त

सरळ बुन्धा व वर मग उंचावर पसरलेल्या फांद्या अशी झाडे

ही झाडे स्टोन पाइन वा अंब्रेला पाईन या नावाने ओळखली जातात. सोळाव्या - सतराव्या शतकातील इटालियन चित्रांमधे (Claude Lorrain, Paul Brill वगैरेंची चित्रे बघा) यांचे सुंदर चित्रण आढळते. चित्रकलेच्या दृष्टीने बघितले तर या झाडांच्या चित्रणातून सरळ बुंध्यामुळे पलिकडील लांबरचे दृश्य दाखवता येते, आकाशाचा भगभगीतपणा वरील बाजूच्या फांद्या आणि गडद पर्णसांभारामुळे झाकला जातो, आणि छायाप्रकाशाची गंमत आणखी खुलवता येते. अजूनही रोमच्या प्राचीन अवशेषांची शोभा ही झाडे खूपच खुलवतात.
.

प्रचेतस's picture

27 Jan 2018 - 9:05 am | प्रचेतस

जबरदस्त.

अभिजीत अवलिया's picture

27 Jan 2018 - 11:15 am | अभिजीत अवलिया

मजा येतेय वाचायला. चित्रे तर अप्रतिमच.

राही's picture

27 Jan 2018 - 11:52 am | राही

अप्रतिम. चित्रे आणि कथाही. चित्रे फारच सुंदर.
चित्र क्र. ७ मधली बालिका अगदी जूनियर मॉन लीझा वाटतेय.

सविता००१'s picture

27 Jan 2018 - 12:01 pm | सविता००१

मस्त कथा. चित्रे तर अफलातून आहेत

डॉ सुहास म्हात्रे's picture

27 Jan 2018 - 12:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

कमालीची वास्तवदर्शी असलेली जबरदस्त चित्रे... त्यांच्यात पकडलेला प्रकाशसावल्यांचा खेळ तर एकदम जबरा आहे ! व्यक्तिचित्रे आणि निसर्गचित्रे एकदम तोडीस तोड !

आणि अर्थातच त्या चित्रांना एकत्र गुंफणारी कथाही तितकीच रोचक आहे.

स्मिता.'s picture

27 Jan 2018 - 5:11 pm | स्मिता.

काका, हा भागसुद्धा सुंदर प्रेक्षणीय आहेच आणि कथेनेही पकड घेतलीये. आता जास्त विश्रांती न घेता पुढचे भाग पटापट टाका हा विनंतीवजा आग्रह!

अनिंद्य's picture

27 Jan 2018 - 5:40 pm | अनिंद्य

@ चित्रगुप्त,
कथेची कल्पना सुंदर आहे.
आणि पेन्टिंग्स म्हणजे तर - सगळीच नक्षत्रे लकाकती !
पु भा प्र

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Jan 2018 - 9:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद दिला नाही, लिहिला नाही म्हणजे आपलं लेखन वाचत नाही, असे समजू नये.
आमचं मोजक्या दोनचचार मिपाकरांवर प्रेम आहे, त्यात तूम्ही एक आहात. :)

-दिलीप बिरुटे
(चित्रगुप्त यांच्या चित्रांचा फ्यान)

चित्रगुप्त's picture

28 Jan 2018 - 7:31 am | चित्रगुप्त

प्रतिसाद दिला नाही, लिहिला नाही म्हणजे आपलं लेखन वाचत नाही, असे समजू नये.

याची आठवण करून दिल्याबद्दल आभार.

आमचं मोजक्या दोनचचार मिपाकरांवर प्रेम आहे, त्यात तूम्ही एक आहात. :)

डोळ्यांच्या त्रासामुळे मिपावर येणे कमी करावे लागलेले असून आता जमेल तितके लिहीत राहण्याची प्रेरणा देणारा प्रतिसाद.

दीपक११७७'s picture

28 Jan 2018 - 12:38 am | दीपक११७७

एवढी जबरदस्त चित्रे मी कधीच बघीतली नाहीत. अप्रतिम!
वाचतोय.

दीपक११७७'s picture

28 Jan 2018 - 12:41 am | दीपक११७७

एवढी जबरदस्त चित्रे मी कधीच बघीतली नाहीत. अप्रतिम!
वाचतोय.

बबन ताम्बे's picture

28 Jan 2018 - 1:46 pm | बबन ताम्बे

कथा आणि चित्रे, दोन्हीही गुंग करणारी.
अप्रतिम. पुढील भागाची खूप उत्सुकता.

स्वप्नाचीदुनिया's picture

29 Jan 2018 - 12:25 am | स्वप्नाचीदुनिया

कौतुकाला शब्द नाहित.... सुन्दर

चित्रगुप्त,
नाव सार्थक करायला आपण गुप्त होता आणि एकदम एका कलाकृतीला माध्यम करून तिला पुर्वकर्मातील घटनांतून सादर करण्यात आपला हातखंडा आहे. दा विंची यांचे लॉरेंझो पट्टशिष्य आपल्या रोजनिशीतून जीवनातील विविध घटनांना नोंदवताना त्यांच्या बहीणीची, कोकराच्या निरागसतेचे प्रतीक, मोना लिझाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद... युरोपियन नामवंत चित्रकारीची झलक आणि त्यातील बारकावे सुचवत असताना आता जगत विख्यात "स्मित हास्य पेंटींग" पॅरिसमधील म्युझियमचा सहवास सोडून कुठे जाईल? लाल सेरिपिच्या कट्यारीचा पर्दाफाश केंव्हा होणार याची उत्सुकता ताणली गेली आहे...

श्वेता व्यास's picture

29 Jan 2018 - 1:57 pm | श्वेता व्यास

कथा आणि चित्रांची अप्रतिम गुंफण! या कथेसाठीच जणू ही चित्रे काढली गेली होती असं वाटतंय...

विशाल कुलकर्णी's picture

30 Jan 2018 - 12:37 pm | विशाल कुलकर्णी

वाह !अफलातुनच आहे ही कल्पना !
त्यातून चित्रांची अफाट मेजवानी. वाचतोय..

कथेने मस्त पकड घेतली आहे आणि चित्रांची समांतर कथाही प्रेक्षणीय आहे. शेवटचा ऑर्थोडॉक्स चर्चचा फोटो मात्र कथेच्या पार्श्वभूमीला साजेसा वाटला नाही.

बर्‍याच चित्रकारांची ओळख होत आहे, त्याबद्दल धन्यवाद! आवडलेल्या चित्रांविषयी अधिक माहिती मिळावी यासाठी एक विनंती आहे. चित्रांना नुसते क्रमांक देऊन भागाच्या शेवटी चित्रकार आणि चित्रांच्या नावांची सूची देता आल्यास उत्तम!

चित्रगुप्त's picture

13 Dec 2018 - 7:33 pm | चित्रगुप्त

@ निशाचरः

चित्रांना नुसते क्रमांक देऊन भागाच्या शेवटी चित्रकार आणि चित्रांच्या नावांची सूची देता आल्यास उत्तम!

चित्रांखाली नुस्ते क्रमांक देण्याने दर वेळी खाली जाऊन चित्रकाराचे नाव वाचणे त्रासाचे होईल म्हणून चित्राखालीच ते दिलेले आहे. बर्‍याच चित्रांची नावे उपलब्ध होऊ शकली नाहीत. जिज्ञासूंनी चित्रकाराचे नाव गुगलल्यास त्या त्या चित्रकाराची अनेक चित्रे बघता येतीलच.

ज्योति अळवणी's picture

20 Sep 2018 - 11:21 am | ज्योति अळवणी

सुंदर फुलते आहे कथा. सर्व चित्रे अप्रतिम सुंदर आहेत. आयुष्यात कधी नव्हती पाहिली अशी

दुसर्या भागातही वेग कायम आहे .. अप्रतिम सादरीकरण .. आता तिसरा भाग चालू केलाय .. काय साहेब , कमाल केलीत बुवा ,, सर्व काम बाजूला ठेवून , कामाच्या वेळेत इतके निष्ठेने वाचन बर्याच दिवसांनी आज होत आहे.

विवेकपटाईत's picture

21 Sep 2018 - 11:06 am | विवेकपटाईत

मस्त आवडली.