बुलेट ट्रेन (भाग ३) शिन्कान्सेन, बुलेट ट्रेन, नॅरो गेज, स्टॅंडर्ड गेज, ब्रॉड गेज

Anand More's picture
Anand More in जनातलं, मनातलं
26 Sep 2017 - 1:07 pm

भाग २

ज्याला जगभरात बुलेट ट्रेन म्हणतात त्याला जपानमध्ये शिन्कान्सेन म्हणतात. शिन्कान्सेन या जपानी शब्दाचा इंग्रजीत शब्दशः अर्थ होतो New Trunk Line. आपण मराठीत त्याला म्हणूया 'नवी रेल्वे लाईन'. यातलं बाकीचं सगळं नंतर बघूया पण 'नवी' या शब्दात जपानमधल्या या प्रकल्पाचे कारण दडले आहे. ही जर नवी रेल्वे लाईन आहे तर जुनी रेल्वे लाईन असणारंच. आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने जपानी लोकांना नवी रेल्वे लाईन चालू करावीशी वाटले असणार. काय होती ती कारणं? आणि नवी रेल्वे लाईन आल्यावर जपानमधली जुनी रेल्वे लाईन बंद झाली का?

१८५३मध्ये भारतातील पहिली प्रवासी ट्रेन बोरीबंदर ते ठाणे धावली असली तरी भारतातील पहिली ट्रेन मालवाहतूकीसाठी होती. ती धावली मद्रासमध्ये, १८३७ ला. याउलट जपानमध्ये पहिली ट्रेन धावली १८७२ला म्हणजे तसं बघायला गेलं तर भारतापेक्षा जवळपास ३५ वर्ष उशीरा. फरक एव्हढाच की भारतात रेल्वेगाडी धावली ती ब्रिटिशांच्या प्रयत्नाने तर जपानात धावली ती जपान्यांच्या इच्छेने.


Image Source : Internet

भारतात रेल्वे सुरु होण्यामागे ब्रिटिश कंपन्यांची नफ्याची लालसा हे कारण होते तर जपानात रेल्वे धावण्यामागे पेट्रोलचा वापर नसलेले सार्वजनिक वाहतुकीचे साधन सुरु व्हावे ही इच्छा होती. कारण जपानदेखील भारताप्रमाणे पेट्रोलियमवर आधारित इंधनांच्या बाबतीत परदेशांवर अवलंबून होता (अजूनही आहे). आपल्या देशाची अर्थव्यवस्था पेट्रोलियमजन्य इंधनांवर अवलंबून राहू नये म्हणून जपान्यांनी रेल्वेचे जाळे विणायला सुरवात केली.

भारताची भूमी आणि जपानची भूमी यात बराच फरक आहे. भारतात डोंगराळ प्रदेश आहेत आणि सपाट मैदानी प्रदेश देखील आहेत. तुलनेत जपानात मात्र डोंगराळ प्रदेश जास्त आहेत. डोंगराळ प्रदेशात नॅरोगेज किंवा मीटरगेज ट्रेन वापरली जाते. कारण तिचा खर्च कमी असतो आणि डोंगर चढणे-उतरणे नॅरोगेज किंवा मीटरगेज ट्रेनला सोपे जाते. गेज म्हणजे रेल्वेच्या दोन रुळातील अंतर.जगभरात ते वेगवेगळ्या देशात वेगवेगळं आहे. ढोबळमानाने आपण असं म्हणू शकतो की दोन रुळातील अंतर जर ४ फूट ८.५ इंच असेल तर ते झालं स्टॅंडर्ड गेज. त्यापेक्षा कमी असेल तर झालं नॅरोगेज आणि त्यापेक्षा जास्त असेल तर झालं ब्रॉडगेज.


Original Image Source : Wikipedia

ब्रॉडगेज उभारण्याचा आणि ती चालवण्याचा खर्च नॅरोगेजपेक्षा जास्त असतो. जपान्यांना त्यांची रेल्वे स्वतः उभारायची होती ती पण स्वतःच्या पैशातून आणि जास्त करून डोंगराळ मुलखात. म्हणून त्यानी जपानात नॅरोगेज रेल्वेचं जाळं विणलं आणि स्वतःचा खर्च वाचवला. त्यांच्या रेल्वे रुळातील अंतर होतं ३ फूट ६ इंच.

भारतात तर अशी काही अडचण नव्हती. कारण भारतात भारतीय सरकार रेल्वे उभारत नव्हते. वेगवेगळ्या ब्रिटिश कंपन्या रेल्वेचे जाळे उभारत होत्या. पुलंच्या अंतू बर्व्याच्या मुलाच्या आंतरजातीय विवाहाचा उल्लेख करताना अंतू बर्व्याचा मित्र अण्णा साने म्हणतो 'बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय'. यातली बीबीशीआय म्हणजे BBCI म्हणजे बॉंबे बरोडा अँड सेंट्रल इंडिया रेल्वे जी पुढे जाऊन पश्चिम रेल्वे झाली (ही मीटरगेज होती). तर जायपी म्हणजे GIP म्हणजे ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे, जी पुढे जाऊन मध्य रेल्वे झाली. (ही ब्रॉडगेज होती. म्हणून बीबीशीआयला जायपीचा डबा जोडलाय म्हणजे आंतरजातीय विवाह). अशा केवळ दोन नाही तर तब्बल ५९ कंपन्या भारतात रेल्वेमार्गाचे जाळे उभारण्यासाठी ब्रिटनमध्ये स्थापन झाल्या.

या कंपन्या ब्रिटिश जनतेकडून स्टॉक मार्केटमध्ये भाग भांडवल उभारायच्या. ब्रिटिश सरकारने यातल्या अनेक कंपन्यांना कर्ज दिलं होतं. असं तगडं भांडवल असल्यामुळे या कंपन्या हातचं न राखता खर्च करायच्या. खरं पहायला गेलं तर ब्रिटिश सरकारने कर्ज या कंपन्यांना दिलेलं असल्याने त्या कर्जाची परतफेड कंपन्यांनी करणं आवश्यक होतं. पण कर्ज आणि त्यावरचे व्याज यांची परतफेड होणार केव्हा?, तर रेल्वे चालू होऊन त्यावरचे उत्पन्न मिळू लागले की मग त्यानंतर. त्याला वेळ लागणार. तोपर्यंत ब्रिटिश सरकारचा खजिना कोरडा पडायचा. म्हणून मग ब्रिटिश सरकार भारतीयांवरचा कर वाढवायचे. आणि कंपन्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड परस्पर भारतीयांकडून कराच्या रूपाने केली जायची.

गोष्ट इथेच थांबत नाही. रेल्वे उभारण्याचं काम कंपन्यांनी पूर्ण केल्यावर आता या वेगवेगळ्या रेल्वे चालल्यादेखील पाहिजेत. त्यांना स्वतःचा खर्च भागवता आला पाहिजे. आणि ब्रिटिश सरकारने त्यांना दिलेलं कर्ज (जे खरं तर भारतीयांनी वाढीव कराच्या रूपाने आधीच फेडलेलं होतं) आणि त्यावरचं व्याज ब्रिटिश सरकारकडे भरता आलं पाहिजे. इतकं सगळं करून पुन्हा भागधारकांना नफ्याचा लाभांशदेखील देता आला पाहिजे, तोही भरघोस. म्हणून मग ब्रिटिश सरकार या वेगवेगळ्या रेल्वे कंपन्यांना मक्तेदारी द्यायची.त्या रेल्वेच्या तिकिटाचे दर ठरवायला त्या कंपन्यांना पूर्ण मुभा असायची आणि मालवाहतूक जर त्या रेल्वेतून केली तर इतर ब्रिटिश कंपन्यांकडून त्या मालाचा उठाव मिळायचा. मग आपापला माल विकण्यासाठी भारतीय व्यापारी या अतिजलद आणि महाग रेल्वेतून आपापली मालवाहतूक करायचे.

त्यामुळे मुक्त हस्ताने खर्च करून भारतीयांवर प्रचंड कर्ज चढवून नंतर भारतीयांवरचे कर वाढवून ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश कंपन्या गबर होत चालल्या होत्या. भारताचे 'ग्रँड ओल्ड मॅन', ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले भारतीय सभासद दादाभाई नौरोजी यांना देखील रेल्वेच्या उभारणीतील ब्रिटिशांचा कुटील कावा जाणवला. त्यांनी याला नाव दिले 'ड्रेन थियरी' (भारतातून संपत्ती इंग्लंडात वाहून नेण्याची व्यवस्था). ही आहे भारताच्या ब्रॉडगेज रेल्वेच्या जन्माची संक्षिप्त कहाणी. जिने भारतीयांच्या पैशाने ब्रिटनला धनाढ्य केले.

मला आता नक्की संदर्भ आठवत नाही पण कुठल्या तरी एका पुस्तकात, ब्रिटिशांनी भारतात ब्रॉडगेज निवडण्यामागे भारताची शिस्तबद्ध लूट हे एक कारण होते आणि त्याशिवाय अजून एक कारण वाचल्याचे आठवते. रशियामध्ये झारची राजवट होती. रशियन रेल्वेचे गेज होते ५ फूट ३ इंच. मग ब्रिटिश साम्राज्य गिळंकृत करायला झारने रेल्वेने सैन्य पाठवले तर ब्रिटिशांनी उभी केलेली भारतीय रेल्वे वापरून त्यांनी भारतात खोलवर मुसंडी मारू नये म्हणून भारतीय रेल्वेचे गेज ५फूट ६ इंच इतके मोठे ठेवले गेले. हा मुद्दा मी वाचलेला आहे हे नक्की पण कुठल्या पुस्तकात वाचला ते मात्र आठवत नाही. त्यामुळे याबद्दल फार खात्रीलायक सांगता येणार नाही. तरीही इतकं नक्की आहे की भारतात पहिल्यापासून जास्त क्षमता असणारी महागडी ब्रॉडगेज रेल्वे आहे आणि जपानात मात्र कमी क्षमता असणारी नॅरोगेज रेल्वे होती.


Image Source : Wikipedia

ब्रॉडगेज रेल्वे उभारण्याचा आणि चालवण्याचा खर्च जास्त, क्षमता मोठी, आणि वेगही जास्त असतो. म्हणजे जपानने नॅरोगेज रेल्वे चालू करून जपानी रेल्वेचा खर्च कमी झाला हे जरी खरे असले तरी तिची माल आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता कमी होती. त्याहून वाईट म्हणजे तिचा वेगही मंद होता. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानमध्ये झालेल्या नव्या औद्योगिकीकरणाच्या वेळी शहरांची उपनगरे वसू लागली. म्हणजे उद्योग एका ठिकाणी पण त्याचे कामगार मात्र दूर उपनगरात. त्यांचे येण्याजाण्याचे वाहतुकीचे एकमेव साधन म्हणजे अपुऱ्या क्षमतेची, मंदगतीने धावणारी जुनी जपानी नॅरोगेज रेल्वे. यातून जपान्यांना वेगवान रेल्वेची गरज भासू लागली. म्हणून तयार झाली 'नवी रेल्वे लाईन' म्हणजे जपानी भाषेत 'शिन्कान्सेन'.


Image Source : Internet

शिन्कान्सेन वापरते स्टॅंडर्ड गेज. म्हणजे ४ फूट ८.५ इंच. हे अंतर जुन्या ३फूट ६ इंच वाल्या जपानी रेल्वेपेक्षा जास्त आहे. पण भारतातील ५ फूट ६ इंचवाल्या ब्रॉडगेजपेक्षा कमी. मग एक प्रश्न उभा राहतो, की जर रुळातील अंतर कमी असेल तर वेग कमी, रुळातील अंतर वाढलं तर वेग जास्त, हे जर खरं असेल तर भारतीय ब्रॉडगेजचा वेग जपानी शिन्कान्सेनपेक्षा जास्त असायला हवा. कारण भारतीय रेल्वेचं गेज शिन्कान्सेनपेक्षा जास्त आहे. मग भारतीय रेल्वे शिन्कान्सेनपेक्षा हळू कशी काय धावते? कारण रेल्वेमार्गाची अवस्था. सिग्नलयंत्रणेची स्थिती आणि मालवाहतूक व प्रवासी वाहतूक यासाठी एकंच व्यवस्था. या सगळ्यामुळे भारतीय रेल्वे ब्रॉडगेजची असूनही शिन्कान्सेनपेक्षा हळू धावते. आता जेव्हा बुलेट ट्रेनसाठी आपण स्वतंत्र रेल्वेमार्ग तयार करू जो स्टॅण्डर्ड गेजचा असेल. ज्यावर वेगळी सिग्नल यंत्रणा आणि केवळ बुलेट ट्रेन धावतील तेव्हा त्यांचा वेग जास्त असल्यास नवल ते काय?

बुलेट ट्रेनमुळे वाहतुकीचा वेग वाढेल आणि प्रवाश्यांचा वेळ वाचेल यात शंका नाही. किंबहुना तो मुद्दाच नाही. मुद्दा हा आहे, की जपानची औद्योगिक प्रगती होत होती. उपनगरे वाढत चालल्याने उद्योगक्षेत्रे आणि कामगारांची घरे यातील अंतर वाढत चालले होते. जुनी रेल्वे नॅरो गेज होती. तिचा वेग वाढणे अशक्य होते. म्हणून केवळ प्रवासी वाहतुकीसाठी शिन्कान्सेनचा पर्याय जपानने निवडला. असे असले तरी अजूनही शिन्कान्सेनने जपानमध्ये व्यापलेले क्षेत्र जुन्या जपानी रेल्वेपेक्षा कमी आहे. म्हणजे जपानने शिन्कान्सेन का सुरु केली असावी याची कारणे स्पष्ट आहेत. त्यांच्या शिन्कान्सेनसाठी तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी प्रचंड संख्येने तयार होते. आपल्याकडे मुंबई अहमदाबाद मार्गासाठी तिसऱ्या प्रकारचे किती लाभार्थी तळमळत वाट बघत आहेत?

स्टॅंडर्ड गेजवर वेगाने धावणारी शिन्कान्सेन, नॅरो गेजवल्या जपानमध्ये औद्योगिक क्षेत्रात सुरु होणं योग्य होतं आणि आहे. आपलं काय?

म्हणजे, मनमोहन सरकारच्या काळात फिजिबिलिटी स्टडी करणाऱ्या फ्रान्सने, चीनने आणि आता जपानने आपल्याला फसवले आहे का? ज्या रेल्वेची आपल्याला तातडीने गरज नाही ती आपल्या गळ्यात मारली आहे का? हे जग असेच फसवाफसवीवर चालते का? या प्रश्नांची उत्तरे पुढील भागात देतो.

अर्थकारणविचार

प्रतिक्रिया

दीपक११७७'s picture

26 Sep 2017 - 1:30 pm | दीपक११७७

हा भाग पण मस्त झाला

बुलेट पेक्षा भारताने इंग्लंड च्या धर्तीवर इंटरसिटी १२५ गाड्या चालवाव्यात. तसेच Tilt in Train च तंत्रज्ञान वापरुन आहेत त्याच रेल्वे रुळांवर जलदगती गाड्या चालवणे शक्य आहे.
https://en.m.wikipedia.org/wiki/Tilt_Train

अभिजीत अवलिया's picture

26 Sep 2017 - 1:42 pm | अभिजीत अवलिया

लवकर टाका पुढचा भाग.

पाटीलभाऊ's picture

26 Sep 2017 - 2:08 pm | पाटीलभाऊ

सुंदर माहिती...!
पु. भा. प्र.

धर्मराजमुटके's picture

26 Sep 2017 - 2:21 pm | धर्मराजमुटके

तीनही भाग वाचले. छान आहेत. यात 'तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी' हा वर्ग खासकरुन भारतात अगदीच उपद्रवी आहे.
नुकत्याच नव्याने सुरु झालेल्या गाड्यांमधले नळ चोरुन नेण्यापर्यंत, एलसीडी तोडण्यापर्यंत यांची मजल गेलेली आहे. बाकी सगळ्या अडचणींवर तांत्रिक उपाय आहेत पण यांना कसे सुधरवणार याचे उत्तर आजतरी कुणाकडेच नाही.

पगला गजोधर's picture

26 Sep 2017 - 2:34 pm | पगला गजोधर

धर्मराजसाहेब पहिला लेख आपण परत वाचू शकाल का ?
त्यात लेखकाने स्पष्ट लिहिलंय,
लाभार्थीचे त्यांनी ३ गट तयार केलेत , वाचकांना समजावे म्हणून...
तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी म्हणजे "थर्डक्लास बेनेफिशयरी" असा घेऊ नका .....

पगला गजोधर's picture

26 Sep 2017 - 2:38 pm | पगला गजोधर

तिसरे लाभार्थी म्हणजे प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेचे आणि पाण्याचे ग्राहक. हे लाभार्थी प्रकल्पासाठी सगळ्यात महत्वाचे असतात. कारण हे प्रकल्पाच्या खर्चाच्या बाजूला न येता प्रकल्पाच्या उत्पन्नाच्या बाजूला येतात. त्यामुळे सरकारचा प्रयत्न असला पाहिजे की कुठल्याही प्रकल्पाच्या लाभार्थींमध्ये तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी सगळ्यात जास्त असले पाहिजेत. आणि जर प्रकल्प सुरु करताना ते कमी असतील तर त्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. लिहिताना जरी मी यांना तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी म्हणत असलो तरी ते केवळ लेखनाच्या सोयीसाठी. हे तिसऱ्या दर्जाचे लाभार्थी नसून, दर्जाचाच विचार करायचा म्हटला तर तिसऱ्या प्रकारचे लाभार्थी कुठल्याही प्रकल्पासाठी पहिल्या दर्जाचे लाभार्थी ठरतात. कारण तेच प्रकल्पाला स्वावलंबी करत असतात.

धर्मराजमुटके's picture

26 Sep 2017 - 3:31 pm | धर्मराजमुटके

दोन्ही लेख व्यवस्थित वाचलेत हो. तिसर्‍या प्रकारचे लाभार्थी म्हणजे रेल्वेने प्रवास करणार्‍या व्यक्ती मी उल्लेखिलेल्या प्रमाणे वागत नाहीत असे आपणास म्हणायचे आहे काय ?

आनन्दा's picture

26 Sep 2017 - 3:29 pm | आनन्दा

वाचत आहे.

आनन्दा's picture

26 Sep 2017 - 3:31 pm | आनन्दा

विशेषतः तुमचे लेखन अभिनिवेशशून्य, संदर्भासह आणि नेमके असल्यामुळे माझी विचारधारा सो कॉल्ड विरोधी असूनदेखील वाचायला आवडते.
कदाचित पूर्ण लेखमाला वाचल्यावर त्यात परिवर्तन देखील होइल.

बाय द वे, तुमचे लेखन कायप्पा वर टाकायला अनुमती आहे का? अर्थात तुमचे नाव आणि लेखाच्या लिन्क सह.

धन्यवाद. जरूर शेअर करा.

आमो, तुम्ही अगदी मुळापासुन समजणारे सांगतात. एक उत्तम शिक्षक समजावतो तसे.

जयंत कुलकर्णी's picture

26 Sep 2017 - 4:44 pm | जयंत कुलकर्णी

मला वाटते श्री मोदींची पंडीत नेहरूंच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल चालू आहे. ते जगाला राजकारणात खूष करायला निघाले होते आणि हे व्यापारात. यात फक्त एकच फायदा आहे आणि तो म्हणजे कोअर कॉम्पिटन्स थोडाफार तयार होईल तोच. पंडीतजी त्या काळात म्हणजे जेव्हा त्यांना भारतातील राजकारणाची काळजी करण्याचे कारण नव्हते तेव्हा कसे वागत होते आणि आत्त्ता हे साहेब कसे वागत आहेत याचा जरूर अभ्यास करावा... मला वाटते बीजेपीचा आणि सामान्य माणसाचा आता संबंध तुटत चालला आहे.... आपले नशीब म्हणायचे... दुसरे काय..

उपेक्षित's picture

26 Sep 2017 - 5:31 pm | उपेक्षित

अतिशय उत्तम मालिका चालू आहे, नवीन माहिती समजत आहे तुमच्यामुळे.

संग्राम's picture

26 Sep 2017 - 5:35 pm | संग्राम

मिपावर काही मोजके लेखक आहेत जे संदर्भासहीत [ स्पष्टीकरण :-)] लिहतात ...
पुढील भागाच्या प्रतिक्षेत

गामा पैलवान's picture

26 Sep 2017 - 5:45 pm | गामा पैलवान

आनंद मोरे,

भारतातली बुट्रे मानकचौडी (=स्टँडर्ड गेज) आहे हे नवीन आहे. युरोपात अतिजलद रेल्वे बांधली तेंव्हा वेळ पडल्यास या गाड्या पारंपरिक लोहमार्गावर चालवता येण्याजोग्या मुद्दाम बनवल्या होत्या. किंबहुना लंडन, प्यारी, वगैरे ठिकाणी स्थानके पारंपरिक विशालचौडी (=ब्रॉडगेज) प्रकारचीच आहेत. एकदा गाडी बाहेर पडून सुरक्षित अंतरावर गेली की खास अतिजलद रुळांवर येते आणि वेग पकडते. ही सुविधा मुंबई-कर्णावती अ.ज. गाडीस उपलब्ध नाहीसं दिसतंय.

या कारणामुळे फ्रान्सच्या गाड्यांना प्राधान्य द्यायला हवं होतं असं मला वाटतं. शिवाय निपानपेक्षा फ्रान्सचं तंत्रज्ञान आधुनिक आहे.

आ.न.,
-गा.पै.

१०-१५ वर्षापूर्वीपर्यंत लातूर ते कुर्डुवाडी नॅरोगेज (बार्शी लाईट) रुट होता. माझ्या शाळेशेजारुनच जायची ती छोटीशी गाडी. प्रवास पण केलाय. एकच म्हैस वारंवार आडवी यायचा विनोद ह्याच बार्शी लाईट च्या वेगावर प्रसिध्द आहे. युनिगेज प्रोजेक्टमध्ये तो ब्रॉडगेज झाला. बार्शी लाईट ही ब्रिटिश कंपनीने स्थापन केलेली नॅरोगेज ट्रेन कंपनी होती. तिन्हि गेज असलेले मिरज हे भारतातील एकमेव स्टेशन पाहिलेले आहे. पंढरपूरची देवाची गाडी नॅरोगेज, धर्मावरम साउथ सेंट्रल ही मीटरगेज आणि सेंट्रलचा रुट ब्रॉडगेज असे बराच काळ होते.

लोनली प्लॅनेट's picture

26 Sep 2017 - 8:24 pm | लोनली प्लॅनेट

सध्या मिपावर माहितीपूर्ण लेखांची मेजवानी सुरुय आणि यात जर म्हात्रेकाका आणि स्पार्टाकसराव यांच्या लेखनाची जर भर पडली तर ते सोन्याहून पिवळे

आगाऊ म्हादया......'s picture

4 Oct 2017 - 11:24 am | आगाऊ म्हादया......

आत्ता तिसरा वाचून पूर्ण केला, आता पोहोचेन हळू हळू सहाव्या भागापर्यंत