अनवट किल्ले १९:वारणेचे वाघ, बहादुरवाडी( Bahadurwadi ) , विलासगड, मल्लिकार्जुन( Vilasgad, Mallikarjun )

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
22 Sep 2017 - 11:31 am

कोल्हापुर व सांगली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी वारणा नदी, हिच सीमा मानुन मराठा साम्राज्याचे दोन भाग झाले. याच वारणेच्या खोर्‍यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारख्या वाघाच्या काळजाचा माणुस जन्मला. याच परिसरात एक प्राचीन गड विलासगड किंवा मल्लिकार्जुन व मराठाकालीन भुईकोट बहादुरवाडी वसलेले आहेत. या धाग्यात त्यांचीच माहिती घ्यायची आहे.
बहादुरवाडी या भुईकोटासंदर्भात दोन कथा वाचायला मिळतात. आधी त्या पाहु आणि मग भुईकोटाची सैर करु
पहिली कथा अशी आहे कि, सुमारे ३५० वर्षापुर्वी आदिलशाहीचा ४०००० सुवर्णहोनांचा खजिना विजापुरकडे चालला होता. खजिन्याच्या संरक्षणासाठी सैन्य असुनही तो खजिना चोरांनी लुटून नेला.या घट्नेची चौकशी करण्यासाठी आदिलशहाने अंमलदार पाठविला. त्याने हि चोरी जिथे झाली त्या जागेच्या मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीच हि जागा आपली आहे हे कबुल करेना, कारण तसे झाले असते तर सरकारी खजिन्याची रक्कम भरुन द्यावी लागली असती. अखेरीस महिपतराव घोरपडे यांनी हि जागा त्यांच्या मालकीची केल्यास चोरीची रक्कम सरकारात भरण्यास तयार असल्याचे सांगितले. तसेही माळरानच द्यायचे असल्याने आदिलशहाची परवानगी मिळाली आणि सव्वा नउ चावर ( १२० बिघा ) माळरानाची देशमुखी घोरपडे यांच्या नावावर झाली.महिपतरावानी बादशहाला चाळीस हजार सुवर्णहोन दिले आणि या माळरानावर गाव वसविले. वाडा बांधुन स्वता तिथे वस्ती केली आणि कोटाभोवती खंदक काढला. नव्या गावाचे नामकरण झाले "बहादुरबिंडा". महिपतरावांना कुस्ती, कसरती, आखाडे याची आवड होती म्हणुन "बहादुरबिंडा सवाई आखाडा" अशी लावणी कलगीतुरे वाल्याने केली. पुढे या गावाचे नाव बहादुरवाडी झाले.
तर ब्रिटीशकालीन गॅझेटियरच्या मताप्रमाणे हा भुईकोट माधवराव पेशव्यांनी कोल्हापुरकर भोसलेंच्या आक्रमणापासुन सातारा गादी व कोल्हापुर गादी यांच्या सीमेवर म्हणजे वारणा नदीकाठी संरक्षणासाठी बांधला आणि तो मिरजकर पटवर्धनांच्या ताब्यात दिला. त्यांनी मुधोळकर रामचंद्रराव महिपतराव घोरपडे यांना तेथे नियुक्त केले.करवीर रियासतीच्या एका पत्रात करवीरकर छत्रपतींनी बहादुरगड पाडून टाकण्याची आज्ञा दिली होती.
बहादुरवाडी गाव कोल्हापुरच्या ईशान्येला ७० कि.मी. वर तर ईस्लामपुरच्या आग्नेयेला ३५ कि.मी. वर आहे. ईथे जायचे झाले तर पुणे -बेंगळुरू महामार्गावर पुण्यावरुन कोल्हापुरच्या दिशेने जाताना, पेठ गाव ओलांडल्यानंतर डावीकडे मल्लिकार्जुन किंवा विलासगडाचा डोंगर दिसु लागतो. तो ओलांडल्यानंतर तांदुळवाडी हे गाव लागते. यानंतर डाव्या हाताला बहादुरवाडी गावाचा फलक दिसतो. इथुन डांबरी सडक थेट बहादुरवाडी गावापर्यंत गेली आहे. गावाच्या शेवटी भुईकोट उभा आहे.
bdr15
बहादुरवाडी-विलासगड परिसराचा नकाशा
bdr1
लांबुनच भुईकोटाचे बुलंद बुरुज दिसतात.
bdr2
दरवाज्यात गणेश मुर्ती आहे.
bdr3
ईथल्या गणपती मंदिरासाठी पत्र्याचे शेड उभारुन गावकर्‍यांनी कोटाच्या महाद्वाराचे सौंदर्य घालविले आहे.
bdr4
बहुतेकदा किल्ल्याच्या दरवाज्यात शौर्याचे प्रतिक असणार्‍या बजरंगबलीचे वास्तव्य असते, पण इथे कदाचित गणेशभक्त थोरल्या माधवराव पेशव्यांमुळे असेल, पण गजाननाचे मंदिर दिसते.
कोटाला एकुण तीन तटबंद्या आहेत. पैकी बाहेरच्या तटबंदीला बारा बुरुज आहेत. आतली तटबंदी गोलाकार असुन तीला नउ बुरुज आहेत. सर्वात आतली आयताकॄती आहे. तीला कोपर्‍याला चार व मधोमध चार असे आठ बुरुज आहेत.
bdr5
महाद्वाराच्या वरच्या बाजुला येणार्‍या शत्रुवर जंग्या रोखल्या आहेत.
bdr6
बाहेरुन महाद्वार सुस्थितीत असले तरी आतमधे पडझड झाली आहे.
bdr7
पहारेकर्‍यांसाठीच्या देवड्याही अजुन तग धरुन आहेत.
bdr8
आतल्या तटबंदीमधे ह्या बहुधा घोडेपागा असाव्यात.
bdr9
त्याच्यावर आणि बुरुजावरही मोठ्या प्रमाणात असणार्‍या जंग्या हे बदलत्या युध्दशैलीचे प्रतिक म्हणायला हव्यात.
bdr10
दोन तटबंदीमधे फार अंतर न सोडता येणार्‍या जाणार्‍याचा वावर मर्यादित राहिल याची काळजी घेतली आहे.
bdr11
आतल्या ईनामदाराच्या वाड्यामधे मात्र गवत माजलय.
bdr12
याखेरीज ईथल्या शिबंदीला पाण्याची व्यवस्था हवीच, यासाठी सुमारे पन्नास फुट खोल विहीर खोदली होती. आता मात्र ती बरीचशी बुजली आहे. या कोटाजवळच वेतोबाचे छोटेसे मंदिर पहाण्यास मिळते.
bdr13
खंदकही हळुहळु बुजत चाललेत. एकदंरीतच उत्तर मराठेकालीन बांधणीच्या या कोटाची गावकर्‍याना फारशी कदर नाही असे जाणवले.
bdr14
काहीशा निराश मनस्थितीत पुन्हा हायवेवर जाण्यास निघालो, तो उत्तरेकडे म्हणजे उजव्या हाताला लांबवर मल्लिकार्जुन उर्फ विलासगड दिसला. चला जाउ या विलासगडावर.
जाता जाता आधी विलासगडाच्या ईतिहासात डोकावुया. गडावरची कोरलेली लेणी पहाता हा गड निसंशय प्राचीन. कदाचित हा आधी धार्मिकस्थळ असेल पण नंतर आजुबाजुच्या परिसरातील उठावदार डोंगर म्हणुन त्याचे निरीक्षणाच्या किल्ल्यात रुपांतर झाले असेल असे वाटते. शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड कधी आला ते सांगता येणार नाही. सन १६७०-७१ च्या सुमारास हा बेवसावु गड ताब्यात घेउन महाराजांनी त्याची पुनर्बांधणी केली. मोघल व छत्रपती शाहु यांच्यात सन १७१७-१८ मधील करारानुसार दिलेले सुभे व त्यातील किल्ल्यांच्या यादीमधे विलासगडाचा उल्लेख अढळतो, "३ पनाला ( सुभा) - पनाला, पावन, विलासगड". यानंतर बराच काळ विलासगडावर वावर संपला होता. १८ ऑगस्ट १७९८ रोजीच्या पत्रात, " करवीरकर महाराज यांचा मुक्काम बत्तीस शिराले याजकडे गेल्याची बातमी आहे. परंतु किला मलिकार्जुन डोंगरावर येथे किला बांधायासी मोहुर्त केला म्हणुन एकिण्यात आले आहे". म्हणजे सन १७१७-१८ मधे विलासगड ओस पडला होता. मात्र बहुधा याच्यावर बांधकामे झाली नसावीत.
महामार्गाला खेटून असल्याने विलासगडावर जाणे एकदम सोयीचे आहे. पुणे-बेंगलोर हायवेने कामेरी गाव ओलांडल्यानंतर येडेनिपाणी फाट्याला वळायचे. येडेनिपाणी गावातून एक रस्ता गोठखिंडकडे जातो. या रस्त्यावर येडेनिपाणी गावापासून साधारण दीड किलोमीटर अंतरावर मुख्य रस्त्याला उजवीकडे एक फाटा फुटतो. येथेच “श्रीशैल्य मल्लिकार्जुनकडे” असा बोर्ड लावलेला दिसतो. या फाट्यावर उजवीकडे वळले की समोरील डोंगरात दगडी तटबंदी असलेले मल्लिकार्जुन मंदिर दिसू लागते. येडेनिपाणी पासून गडपायथा साधारण ३ किलोमीटर आहे. सांगली-आष्टा- गोटखिंडी असेही इथे येता येईल.
vls1
विलासगडचा नकाशा
vls2
आजुबाजुच्या परिसरात हा डोंगर किल्ल्यापेक्षा "मल्लिकार्जुनाचा डोंगर" म्हणुनच परिचीत आहे. गडावरील मल्लिकार्जुन देवस्थानाचा 'क वर्ग' पर्यटन क्षेत्रांत समावेश झाल्यामुळे येडेनिपाणी गावाच्या मागच्या बाजूने एक डांबरी सडक पार गडाच्या पायथ्यापर्यंत गेली आहे. रस्ता संपला कि गडमाथ्यावर जाण्यासाठी सुरवातीला बांधीव सिमेंटच्या पायऱ्या आहेत. भाविकांच्या सोयीसाठी पायऱ्यांच्या बाजूने लोखंडी रेलिंग देखील लावलेले आहे.
vls3
या सिमेंटच्या नवीन पायऱ्या संपल्या की सुरु होतो तो चक्क खडकात खोदून तयार केलेल्या एकसंध पायऱ्यांचा मार्ग. या खडकातील एकसंध पायऱ्या पाहून मन थक्क होतं आणि इथेच या डोंगराच्या प्राचीनत्वाची साक्ष मिळते. पायऱ्यांची हि नागमोडी वाट साधारण अर्धा ते पाऊण तासात आपल्याला गडाच्या थोडे खाली असणाऱ्या मल्लिकार्जुन मंदिराच्या परिसरात घेऊन जाते.
vls4
मल्लिकार्जुन मंदिराच्या आवाराला संपूर्ण दगडी तटबंदी केलेली दिसते आणि याच तटबंदीत मंदिराचे भव्य प्रवेशद्वार देखील आहे.
vls5
दरवाज्यातून आत गेल्यावर डाव्या हाताला एक ओसरी असून त्यावर पत्र्याचे छत घातलेले आहे. ओसरीला लागून डोंगरकड्यालगत काही ओवऱ्या बांधलेल्या असून गडावरील मुक्कामासाठी ही योग्य जागा आहे.
vls6
मंदिरापाशी पोहोचल्यावर प्रथम उजव्या बाजूस मंदिरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या दोन कमानी असणारी हि ईमारत दिसते. हिची बांधणी हिंदु स्थापत्यशैलीतील वाटते मात्र आतमधे काहीच नाही. हि वास्तू अगदी डोंगरकड्याला लागून बांधलेली आहे. ह्याच वाटेवर पुढे गडावरील एकमेव असे पिण्याच्या पाण्याचे गंगा टाके आहे. हे सर्व अवशेष पाहून पुन्हा मंदिराकडे परत यावे.
vls7
मंदिराच्या मुख्य दरवाज्यासमोर एक छोटे मंदिर आहे. या मंदिरामधे श्री विष्णूची एक सुबक अशी पाषाणातील मूर्ती आहे. या मंदिराला लागूनच उजव्या हातास एक मोठी ओवरी दिसते.
vls8
या ओवरीला एक दरवाजा असून दरवाज्यामधून आत गेल्यावर कळते कि येथे दोन प्रचंड मोठाल्या लेण्या खोदलेल्या आहेत. या लेण्यांचा भार तोलुन धरण्यासाठी दोन खांब आहेत. त्यापैकी एका खांबावर थोडे जुने नक्षीकाम आढळते.
vls9
या ओवऱ्यांना लागुनच मल्लिकार्जुनाचे मुख्य मंदिर आहे.
vls10

vls11
मुख्य मंदिराचा दर्शनी भाग यादवकालिन बांधणीचा मंड्प दिसतो. हे मंदिर म्हणजे एक मोठे लेणेच असून यामध्ये चक्क सहा कोरीव खांब आहेत. या मोठ्या लेण्यामध्ये आत एक छोटा विहार असून तेथे शिवलिंगाची स्थापना केलेली आहे.हे मल्लिकर्जुनाचे मुख्य स्थान येथील उजव्या बाजूच्या गुहा दालनात असून तेथे एक शिवलिंग आहे.
vls12
या शिवलिंगाच्या समोरील गुहेत वाकड्या तोंडाचा नंदी आहे,पार्वती देवीने थोबाडीत मारल्याने नंदीचे तोंड वाकडे झाल्याचे येथील पुजारी सांगतात.
vls13
लेण्यात अजून इतरही दोन तीन छोटे विहार असून ईथे भीमाशंकर,उमाशंकर,सोरटीसोमनाथ,कार्तिकस्वामी यांची मंदिरे आहेत.
लेण्यांमधे खांबांजवळ काही कोरीव मुर्त्या ठेवलेल्या आहेत. मुख्य मंदिराचे हे सर्व कोरीवकाम पाहून मंदिर प्रांगणात परत यावे.
vls14
मंदिराच्या प्रांगणामध्ये मुख्य लेण्याशेजारी छोटी अर्धवट खोदलेली लेणी आहेत. या लेण्यात पुजाऱ्यांचे बरेचसे समान ठेवलेले आढळते.
vls15
मंदिराच्या आवारात या व्यतिरिक्त एक मोठी दीपमाळ, तुळशी वृंदावन व एक स्तंभ देखील आहे. मंदिर परिसर खूप स्वच्छ ठेवलेला असला तरी रंगरंगोटीमुळे अनेक जुने कोरीवकाम आता नष्ट होण्याचा मार्गावर आहे.
मल्लिकार्जुन मंदिराचे हे सर्व अवशेष पाहून मंदिराच्या डाव्या बाजूने गड माथ्यावर जाणारी वाट धरावी. या वाटेवर पुढे गडाच्या माथ्यावर जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत.
vls16
याच पायऱ्यांच्या जवळ चुन्याच्या घाण्याचे एक चाक अर्धे जमिनीत गाडलेले दिसते. येथेच पुढे उजव्या हातास अर्धवट खोदलेल्या दोन लेण्या देखील दिसतात. आता येथून फक्त दहाच मिनिटात आपण गडमाथ्यावर पोहोचतो.
vls17
गडमाथ्यावर समोरच एक पांढऱ्या रंगाची जुनी तर त्याच्या अगदी शेजारी एक नवीन रंगवलेली मशीद दिसते. हा आहे आदिलशाही काळातील काझाकबीर चान्द्साहेब दर्गा. ईथे विठ्ठल रुक्मिणीच्या व इतर काही मूर्त्या ठेवलेल्या आहेत.
vls18
या दर्ग्या शेजारीच चौथऱ्यावर एक भग्न मंदिर आहे. मंदिरावर कृष्ण मंदिर असे लिहलेले आहे मात्र जुन्या मशिदीमध्ये असणाऱ्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती बहुदा या जुन्या मंदिरातल्या असाव्यात असे वाटते.
vls19
या श्रीकृष्ण मंदिराच्या चौथऱ्यात एक मोठा खड्डा आहे व या खड्ड्यात उतरण्यासाठी एका ठिकाणी पायऱ्या देखील आहेत. या खड्डयामध्ये डाव्या व उजव्या बाजूला कोनाडे असून पूर्वी याचा उपयोग बहुदा मंदिराचे साहित्य ठेवण्यासाठी अथवा धान्यकोठार म्हणून केला जात असावा.
यानंतर आपला मोहरा नवीन मशिदीकडे वळवायचा.
vls20
आपण मशिदीजवळ पोहोचतो तोच एक दगडी बांधीव वास्तू आपली नजर तिकडे चटकन आकर्षित करते. गडाचे गडपण दाखवणारी इतिहासकाळातील ही एकमेव वास्तू आज गडावर उभी आहे. त्यामुळे आपली पावले नकळतच तिकडे वळतात.
vls21
या वास्तूच्या दोन्ही दरवाज्याच्या कमानी अजूनही शाबूत आहेत. आत दगडी जोती देखील दिसतात. हा बहुधा किल्लेदाराचा वाडा असावा.
vls22
या ऐतिहासिक वस्तूच्या जवळच पाण्याचे एक नैसर्गिक तळे आहे. तळ्यापासून तसेच पुढे चालत गेलो कि आपण गडाच्या एका टोकावर पोहोचतो.
vls23
या टोकावरून थोडे खाली एक सपाट पठार दिसते. हि गडावरची घोडे बांधण्याची जागा म्हणजेच घोडेतळ असे गडावरील राहणारे लोक सांगतात. गडमाथ्यावर दोन-तीन घरांची छोटी वस्ती असून हे लोक खूप पूर्वी पासून गडावर वास्तव्यास आहेत.
गडमाथ्यावर या व्यतिरिक्त कोणतेही अवशेष नाहीत. मात्र गडाच्या कोणत्याही बाजूस उभे राहिल्यास लांब पर्यंतचा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. गडावरून दक्षिणेला वारणा नदीचा परिसर दिसतो तर नैऋत्येला जोतिबा-पन्हाळा दिसतात. उत्तरेला मच्छिंद्रगड तसेच कराडजवळील आगाशिवाचा डोंगर दिसतो.
या परिसरात मोरांना अभय असल्याने गडावर मुक्कामासाठी गेल्यास सकाळी लवकर अथवा संध्याकाळी मोरांची केकावली ऐकू येते. मल्लिकार्जुनाचे मंदिर व गडमाथा फिरण्यासाठी पायथ्यापासून तीन तासाचा कालावधी लागतो. या गडफेरीत आपल्याला कोठेही तटबंदी व बुरुज आढळत नाहीत. मल्लिकार्जुनाचे भव्य मंदिर मुक्कामासाठी योग्य असून जेवणाची व्यवस्था मात्र आपण स्वतः करावी. पिण्याचे पाणी वर्षभर गडावरील गंगा टाक्यात उपलब्ध असते.
(तळ टिपः- बहादुरवाडी कोटाचे सर्व फोटो मी काढालेले आहेत, तर विलासगडाचे आंतरजालावरुन साभार)
तुम्ही माझे आत्तापर्यंतचे सर्व लिखाण माझ्या ब्लॉगवर एकत्र वाचु शकता.
ब्लॉगचा पत्ता:
भटकंती गड-कोटांची

संदर्भ ग्रंथः-
१) सांगली जिल्हा गॅझेटियर
२) शोध शिवछत्रपतींच्या दुर्गांचा:- सतिश अक्कलकोट
३ ) www.sahyadripratishthan.com
४ ) किल्ल्यांच्या दंतकथा:- महेश तेंडुलकर
५ ) श्री. विनीत दाते यांचा ब्लॉग

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

22 Sep 2017 - 1:27 pm | कपिलमुनी

पुभाप्र !

आपल्या भटकंतीस शुभेच्छा

+११.. पुढील भटकंतीस शुभेच्छा..!!

वरुण मोहिते's picture

22 Sep 2017 - 7:57 pm | वरुण मोहिते

सांगून आता थकलो .. आता फक्त लेखमालिकेची वाट पाहतो आणि फोटो पाहतो:))

तुमच्या अत्यंत सविस्तर लिहिलेल्या लेखांमुळे गड-किल्ल्यांकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळते आहे. आधी अनेकदा केलेले किल्लेदेखील तुमच्या लेखांतून नावेच भासतात.

कोल्हापूर भागातले किल्ले फारसे केलेले नाहीत. पण तुमच्या लेखांतून ते प्रत्यक्ष पाहिल्याचे समाधान मिळते. लिहीत रहा.

सिरुसेरि's picture

23 Sep 2017 - 1:32 pm | सिरुसेरि

खुप छान फोटो आणी वर्णन

चौथा कोनाडा's picture

23 Sep 2017 - 1:36 pm | चौथा कोनाडा

सुंदर !

दुर्गविहारी's picture

24 Sep 2017 - 8:41 pm | दुर्गविहारी

सर्वच प्रतिसादकांचे मनापासून आभार. मि.पा.वर नियमितपणे लिहायला सुरवात केल्यापासून हा पंचवीसावा धागा. एका आठवड्याचा अपवाद वगळता, दर आठवड्याला एक धागा लिहीला. हा रौप्यमहोत्सवी धागा, त्यानिमित्ताने मि.पा. प्रशासनाचे, संपादक मंडळाचे, प्रतिसादकांचे आणि असंख्य वाचकांचे आभार.

दोसत १९७४'s picture

24 Sep 2017 - 9:06 pm | दोसत १९७४

खूप छान माहिती देताय तुम्ही!
अवांतर (कर्नाळा पक्षी अभयारण्यात कर्नाळा किल्ला आहे. त्याचीही माहिती मिपावर टाकाना)

पैसा's picture

24 Sep 2017 - 11:03 pm | पैसा

या मालिकेमुळे विसरल्या गेलेल्या अनेक किल्ल्यांची आठवण जागती ठेवायला मदत होईल.

प्रचेतस's picture

25 Sep 2017 - 6:36 am | प्रचेतस

ह्या दोन किल्ल्यांबद्दल अल्पसे ऐकले होते, तुमच्या लेखनामुळे ह्यांची तपशीलवार ओळख झाली.

नेहमीप्रमाणेच सुंदर!!