अनवट किल्ले ११: वळणदार तटबंदीचा भुदरगड (Bhudargad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
10 Jun 2017 - 9:47 pm

कोल्हापूर जिल्ह्याच्या उत्तरेला पन्हाळा, विशाळगड असे महत्त्वाचे किल्ले आहेत. तर दक्षिण बाजूला रांगणा, सामानगड असे किल्ले आहेत. या दरम्यान होणार्‍या वाहतुकीवर आणि लष्करी हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एका बळकट ठाण्याची नितांत आवश्यकता होती. यासाठीच पन्हाळ्याच्या शिलाहार दुसर्‍या भोज राजाने एका सपाट पठारावर या दुर्गाची निर्मिती केली. शिलाहार राजा भोज (दुसरा) याने बांधला होता. त्यानंतर अदिलशाहीत बरीच वर्षे काढल्यानंतर १६६७ मध्ये स्वराज्यात आला. थोरल्या महाराजांनी गडाची पुनर्बांधणी केली व एक प्रबळ लष्करी ठाणे बनविले. दुर्दैवाने हा गड पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेला. १६७२ मध्ये शिवाजी महाराजांनी तो पुन्हा जिंकून घेतला. जिंजीवरुन परत येताना छत्रपती राजाराम महाराज या गडावर काही काळ वास्तव्यास होते. ९ मार्च १६९१ च्या पत्रानुसार भुदरगड मराठ्यांनी सोडून दिला. काही वर्षानी तो पुन्हा स्वराज्यात दाखल झाला.

अठरावे शतक सरताना परशुरामभाऊ पटवर्धनांनी हा किल्ला ताब्यात घेतला. त्यानंतर १० वर्षांनी करवीरकर छत्रपतींनी हा किल्ला जिंकून घेतला. १८४४ साली कोल्हापूर संस्थानात झालेल्या बंडात ह्या गडावरील शिंबदीने भाग घेतला होता. बाबाजी आयेरकर हा शूर गडकरी त्यावेळी होता, त्याला सुभाना निकम याने आपल्या ३०० साथीदारांसह उत्तम साथ दिली होती. त्यांचा बीमोड करण्यासाठी जनरल डिलामोटीने ससैन्य कूच केले. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भुदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. परत असे बंडाचे प्रयत्न होऊ नयेत म्हणून इंग्रजांनी यावेळी डागलेल्या तोफांनी गडाचा मुख्य दरवाजा व तटबंदीचा भाग जमीनदोस्त झाला होता.

भुदरगडाला जायचे म्हणजे दोन पर्याय आहेत.

१) गारगोटीहून गडावरच्या पेठ शिवापुर गावी जायला सकाळी साडे नऊ, दुपारी साडेअकरा व संध्याकाळी पाच अशा तीन गाड्या आहेत. पेठ शिवापूर जवळपास भुदरगडावर वसलेले आहे.

२ ) स्वत:चे वाहन असल्यास गारगोटी - पुष्पनगर - शिंदेवाडी मार्गे राणेवाडी मार्गे पेठशिवापूर - भुदरगड गाठता येते. पाटगावला जाणार्‍या गाड्या पुष्पनगरला थांबतात. रांगणा किल्ला बघून भुदरगडही करायचा असल्यास हा रस्ता सोयीचा.

रंगपंचमीचा दिवस म्हणजे हक्काची सुट्टी. आज रंग खेळायचा मूड नव्हता आणि घरात लोळत पडणे कोणत्याही ट्रेकर्ससाठी अब्राम्हण्यच. सो ऐनवेळी ट्रेक प्लॅन करायचा तर फार लांब जाणे शक्य नव्हते. फार चढाई नाही आणि फार लांबही नाही आणि बरेच दिवस विनाकारण राहून गेलेला भुदरगड नक्की केला. रंगपंचमीमुळे गाडीवरुन जाणे अशक्य होते अर्थात एस.टी. ला पर्याय नव्हता. कोल्हापूरहून गारगोटी स्टँड गाठले तर पहिली गाडी सकाळी आठ वाजता निघून गेल्याचे चौकशी या पाटीखाली बसणार्‍या इसमाने नम्रपणे सांगितले. पुढची बस थेट एक वाजता होती. शेवटी गडहिंग्लजला जाणार्‍या गाडीने पाल या गावी उतरलो. गावातून थोडे पुढे गेलो, तो रंग खेळणार्‍या पोरांनी अडविले. मी सरकारी कर्मचारी असून कामाची पहाणी करायला आलो आहे असे त्यांना दटावताच पोरे निमूट बाजूला झाली.

त्यांचे हिरमुसलेले चेहरे बघून कॅमेरा काढला व एक स्नॅप घेतला. हुर्र करून सगळी पळाली. पाल गावातून पेठ शिवापूरला जायचे दोन पर्याय आहेत. डांबरी सडकेवरुन चालत तासा-दीडतासात शिवापूरला पोहचू शकतो किंवा पाल गावासमोरच दिसणार्‍या टेकडी वरून शॉर्टकटने त्याच डांबरी सड्केवर पोहचू शकतो. पण एकटाच असल्याने झाडीतून जाण्याची रिस्क नको यासाठी रस्त्यावरून "चल अकेला! चल अकेला!!" करत निघालो. एवढ्यात मनवले गावाकडे जाणारा एक एम.एटी. स्वार आला. हात केल्याबरोबर त्याने शिवापूर फाट्यावर सोडले. इथून घाट रस्ता वळणे घेत घेत, वर चढतो. दुतर्फा गर्द झाडी असल्याने चालण्याचा शीण जाणवत नव्हता.

bhr1

अखेरीस एका वळणावर गडाच्या तटबंदीचे दर्शन झाले.

bhr2

गड डाव्या हाताला ठेवून थोडे अंतर चालल्यानंतर निरनिराळ्या वृक्षांच्या गर्द सावलीत वसलेले पेठ शिवापूर हे इटुकले गाव सामोरे आले. इथे सोमवारी बाजार भरतो.

bhr3

इथून एक रस्ता राणेवाडी मार्गे पुष्पनगरला जातो, तर डावीकडची डांबरी सडक थेट गडावर जाते. स्वतःची गाडी असेल तर ती थेट गडमाथ्यावर जाते. शिवाय माथा बर्‍यापैकी सपाट असल्याने गडावर फिरूही शकते. या फाट्याच्या आधी डावीकडे एक जुने महादेव मंदिर आणि गजपृष्ठावर धारण केलेली दीपमाळ दिसते. डांबरी सडक एक छानसे वळण घेऊन गडमाथ्यावर पोहचवते. इथे आपण समुद्रसपाटीपासुन ९७८ मी. उंचीवर असतो.

bhr3

गडमाथ्यावर पोहचल्याबरोबर प्रचंड सपाटी सामोरी येते. आणि अर्थात लक्ष वेधून घेते ते भैरवनाथाचे हे अनोखे बांधणीचे मंदिर.

bhr4

मंदिर परिसरात गडाचा नकाशा आणि माहिती देणारा फलक कागलच्या लोकराज्यमंचने लावला आहे. मंदिरात प्रवेश करताक्षणी शरीरात गारवा पसरला. मंदिराचे छत गजपृष्ठाकार म्हणजे हत्तीच्या पाठीसारखे आहे.

bhr5

मुळ मंदिर हेमाडपंथी आहे. गाभार्‍यात भैरवनाथाची मूर्ती आहे. भैरवनाथाच्या हातातली शस्त्रे न्याहाळली, देखणे अलंकारही पहाण्याजोगे. आजुबाजूच्या परिसरातील गावकर्‍यांचे हे कुलदैवत, त्यामुळे बरीच भक्तमंडळी दर्शनाला आली होती. त्यांच्या पाऊसपाण्याच्या गप्पा ऐकायला मजा आली, विशेषत: तो खास कोल्हापुरी टोन. दर रविवारी इथे भरपूर भक्तगण जमतात, पण माघात कृष्ण एकादशी ते दशमी अशी इथे मोठी यात्रा असते तेव्हा पुन्हा या असे आंमत्रण द्यायला हे साधेभोळे लोक विसरले नाहीत. सह्याद्रीत भटकताना नेहमी येणारा अनुभव. इ.स. १६७२ मधे मराठ्यांनी जेव्हा हा किल्ला मोघलांकडून जिंकून घेतला, तेव्हा त्यांनी मोघल सरदाराला तर मारलेच , पण त्याची निशाणे भैरवनाथाला दिली जी गाभार्‍यात आपणाला पाहण्यास मिळतात.

bhr6

मंदिरातून बाहेर आल्यानंतर दीपमाळा व पालखीचा चौथरा दिसतो. समोरच निशाण बुरूज आहे, त्यावर भगवा डौलाने फडकताना दिसतो.

bhr7

इथे काही जाती दिसतात.

bhr8

तसेच एक ब्रिटिश बांधणीची तोफ आहे. गावकर्‍यांनी ती जांभ्याच्या चिर्‍यात व्यवस्थित बांधून ठेवली आहे.

bhr10

त्यावर हे चिन्ह सांगून जाते की ती कोण्या इंग्रजाने ओतली आहे.

bhr11

आता गडफेरीला सुरूवात करूया. भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला जांभ्या दगडात बांधलेला वाडा दिसतो, त्याला कचेरी म्हणतात. आतमध्ये एक चौथरा आहे, ती आहे गडाची सदर. इथूनच पूर्वी गडाचा कारभार चालत असे. मागे बघता कमानींनी अलंकृत भैरवनाथाचे मंदिर सुंदर दिसत होते.

bhr12

जवळच करवीरकर छत्रपतींनी बांधलेले पुरातन शिवमंदिर आहे. गाभार्‍यात शिवपिंडी तर आहेच, पण बाहेर सह्याद्रीच्या शिवाचा अर्धपुतळा आहे. जर भुदरगडावर मुक्कामची वेळ आली तर हे मंदिर पथारी पसरायला बेस्ट.

bhr13

इथून पुढे सरळ गेले की समोर भव्य तलाव दिसतो. क्वचितच एखाद्या गडावर इतका मोठा तलाव असेल. एका बाजूला बांध घालून हा तलाव धरणासारखा उभारलेला आहे. आजूबाजूची पांढरी माती धुपून पाण्यात मिसळत असल्याने पाण्याच्या रंग दुधी झाला आहे. म्हणून याला "दूधसागर" म्हणतात. तलावाशेजारीच भग्नावस्थेतील भवानी मंदिर आहे. आत मधे शस्त्रसज्ज , देखणी भवानी मातेची मूर्ती आहे. मंदिराचे चिरे आजूबाजूला विखुरले आहेत. रोहिड्याच्या मंदिराप्रमाणे एखाद्या संस्थेने मंदिर पुन्हा उभारून गतवैभव मिळवता येईल.

bhr14

उत्तर टोकाकडे निघाल्यानंतर तलावाकाठी बर्‍याच समाध्या दिसतात.

bhr18

एक छोटा तलाव या बाजूला आहे. शिवाय हे मंदिर आहे. मूळ मंदिर गुहेत असून हा सभामंडप आहे. इथले शिल्पकाम पहाण्यासारखे आहे. आतमधे अनेक मूर्त्या आहेत.

bhr15

इथली तटबंदी बहुधा इंग्रजांच्या मार्‍यातून वाचली असावी. जिन्यावरून चढून तटावरून फेरी मारावी. या बाजूला एक पामचे झाड आहे. खालच्या बाजूला कोणतेही शहरी ताणतणाव नसणारे, निवांतपणे पडलेले शिवापूर दिसते. उत्तरेला लांबवर दूधगंगा व वेदगंगा नद्यांची खोरी दिसतात.

bhr16

तर मागे किल्ल्याच्या पठाराचा पसारा दिसतो.

bhr17

गडाला दोन दरवाजे असावेत हे महाराजांचे दुर्गशास्त्र, त्याप्रमाणे या गडालाही दोन दरवाजे आहेत. पण सध्या हा दरवाजा बुजलेल्या अवस्थेत आहे. जवळच महादेवाचे सुंदर बांधणीचे मंदिर आहे.

bhr18

या वाटेने खाली उतरल्यास जखीणपेठ गावी जाउ शकतो. इथे एक दुर्गविशेष आहे. पायर्‍याच्या वाटेने खाली उतरल्यास एक मोठी शिळा कोरून पहारेकर्‍यांसाठी खोली कोरलेली दिसते, स्थानिक गावकरी तिला "पोखर धोंडी" म्हणतात. जिज्ञासूंनी ती आवर्जून पहावी.

bhr19

यानंतर पुढे येते जखूबाईचे गुहा मंदिर. जमीन कोरून काढलेले हे भुयारच आहे. जमिनीवर असणार्‍या नंदीमुळे ते लांबूनच ओळखता येते. भुयारातल्या दहा कोरीव पायर्‍या उतरल्या की जखूबाईची शेंदूरचर्चित मूर्ती दिसते. आजूबाजूला आणखी काही प्राचीन मूर्त्या आहेत.

bhr20

तटावर चढून पाहिल्यास हे घनदाट जंगल नजरेला सुखावते. सतत येणारी पक्ष्यांची शीळ भटकंती सुरेल करते.

bhr23

इथून एकसलग खणखणीत तटबंदी असून जागोजागी जिने आहेत, तसेच शौचकूपही आहेत. तटावरूनच भैरवनाथ मंदिराच्या दिशेने निघायचे की ही दुहेरी तटबंदी दिसते, बहुधा गडाची ही नाजूक बाजू हेरून शिवाजी महाराजांच्या ताब्यात हा गड असताना ही तटबंदी उभारली असावी. काहीशी राजगडासारखीच वाटते.

गडफेरी आटपून परत भैरवनाथ मंदिरात येऊन टेकलो. थोडी विश्रांती घेतली. परत शिवापूरकडे निघालो. रंगपंचमीच्या सुट्टीच्या निमित्ताने काही शहरी मंडळी मित्रपरिवारासह पिकनिकला आली होती आणि चुलीवरच्या जेवणाचा बेत चालू होता. गावाकडे उतरताना या उत्तर बाजूलाच दरवाजा असला पाहिजे पण इंग्रजांच्या अखेरच्या हल्ल्यात त्याची पाडापाड झाली असावी. असो.

bhr24

लवकर बस नसल्याने पायगाडीवरूनच राणेवाडीमार्गे पुष्पनगरला उतरलो. गावातून गड असा दिसत होता.

थोड्यावेळाने पाटगावहून आलेली गाडी मिळाली आणि एक मस्त भटकंती संपली. गावातूनच गडाचा निरोप घेतला.

गेल्याच वर्षी म्हणजे ३ जून २०१६ रोजी याच किल्ल्याने एक दुर्दैवी प्रसंग पाहिला. कोल्हापुरचे वाहतूक पोलिस श्री. पाटील आपल्या पत्नी व मुलीसह या गडावर सहलीसाठी गेले असता, मोबाईल वापरताना नेमकी वीज पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. विशेषता मे महिन्यात आकाशात विजा चमकत असताना काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा अशा दुर्घटना घडतात. असाच अनुभव माझा मित्र विकास कडूसकर याला आला. लोणावळ्याजवळच्या नागफणी इथे रॅपलिंग व व्हॅली क्रॉसिंग यासाठी विकास व त्याचे मित्र याच काळात गेले असताना अचानक विजांचा वर्षाव झाला. पण सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. असाच वैराटगडावरचा अनुभवही माझ्या वाचनात आला होता. हल्ली दुर्गसंवर्धन करताना बर्‍याचदा अपघात होऊ नये म्हणुन रेलिंग लावली जातात, पण वळिवाच्या काळात याच धातूच्या रेलिंगकडे वीज आकर्षित होऊन दुर्घटना होऊ शकते. तेव्हा सर्वांनीच याबाबतीत काळजी घ्यावी.

bhr26

भुदरगडाचा नकाशा

bhr26

भुदरगड परिसराचा नकाशा.

संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापूर जिल्हा गॅझेटियर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गांचा शोध - सतीश अक्कलकोट
३ ) डोंगरयात्रा - आनंद पाळंदे
४ ) कोल्हापूर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) साद सह्याद्रीची ! भटकंती किल्ल्यांची !! - प्र. के. घाणेकर
७ ) www.trekshitiz.com ही वेबसाईट
८ ) सांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो ट्रेकर्स

प्रतिक्रिया

घनदाट जंगल खरेच नेत्रसुखद दिसते आहे. पुभाप्र!

सुरेख! आमच्यापर्यंत तपशीलवर माहिती पोचवत असल्याबद्दल अनेक आभार!

यशोधरा's picture

11 Jun 2017 - 12:04 am | यशोधरा

* तपशीलवार.

अजून एक लिहाय्चे राहिले म्हंजे हे पुस्तकरुपाने छापा. काहीच नाही तर एकत्र करुन पीडीएफ बनवून इ-पुस्तक तरी बनवाच.

राघवेंद्र's picture

11 Jun 2017 - 10:18 am | राघवेंद्र

मोदक भाऊ आहेत ना पीडीएफ बनवायला.
बाकी मस्त चालू आहे मालिका!!!!

यशोधरा ताई, तुम्ही पहिल्या धाग्यापासून प्रतिक्रीया देता आहात ,त्याबध्द्दल मनापासून धन्यवाद. पुस्तकरुपाने हे छापायचे असेच पहिल्यापासून माझ्या डोक्यात होते. मी बरेचसे लेख लिहीलेही होते. पण सध्या मराठी पुस्तकांच्या किंमती प्रचंड झाल्या आहेत. त्यात नकाशे आणि फोटो आले कि किंमत खुपच वाढते. सध्या ट्रेकिंगची क्रेझ अगदी ग्रामीण भागातही वाढते आहे. पुस्तकाची किंमत सर्वानाच परवडते असे नाही. त्यासाठी सर्वाना सहज उपलब्ध होईल असे माध्यम म्हणजे ईंटरनेट. म्हणुनच माझे लेखन मी मि.पा. वर करायचे ठरविले आणि आता सलग लिहीण्याचा आंनंदही घेतो आहे. जितके शक्य आहे तितके दिवस लिहीनच. पि.डी.एफ. ची कल्पना मात्र स्वागतार्ह आहे. मी स्वता ट्रेक क्षिती़जच्या साईट वरच्या माहितीची पि.डी.एफ. केलेली आहे, जी सध्या व्हॉटस अ‍ॅपवरून सगळी कडे फिरते आहे. माझ्या लिखाणाचीही अशी पि.डी.एफ. केली तर हि माहिती ईंटरनेट नसतानाही उपलब्ध होउ शकेल. मि. पा. वर लिखाण असल्याने कोणीही गुगल केले तरी त्याला विनासायास अपडेटेड माहिती मिळू शकेल अशी आशा वाटते.

किल्ल्यांच्या बाबतीत खरोखरंच समृद्ध प्रदेश आहे हा.

प्रसाद_१९८२'s picture

11 Jun 2017 - 11:04 am | प्रसाद_१९८२

अतिशय वाचनीय, ट्रेक वृतांत.

मनिमौ's picture

11 Jun 2017 - 5:28 pm | मनिमौ

नक्की मनावर घ्या. खूप माहितीपूर्ण चालली आहे लेखमाला

कोल्हापूर जिल्हातील अनमोल रत्न तुम्ही शोधत फिरत आहातच, त्यासोबत आमची पण भ्रमंती सुरू आहे.. लेखन खूप भावले आहे मनाला.

स्वच्छंदी_मनोज's picture

12 Jun 2017 - 12:14 pm | स्वच्छंदी_मनोज

हाही भाग मस्तच. सुंदर आणि माहीतीने भरलेली अशी चालू आहे लेखमाला.
लवकरच पुढचा भाग टाका.

सूड's picture

13 Jun 2017 - 10:07 pm | सूड

सुंदर, ही माहिती पुस्तकस्वरुपात कराच!!

वृत्तात खूप सुंंदर,पैकिच्या पैकी गुण.
काही कसरच ठेवली नाहीत.भैरवगड ची समग्र माहीतीबद्दल धन्यवाद.
ठरलंंआम्ही जाणारचंं.

प्रीत-मोहर's picture

14 Jun 2017 - 10:27 am | प्रीत-मोहर

सुरेख!!

टर्बोचार्जड फिलॉसॉफर's picture

14 Jun 2017 - 10:47 am | टर्बोचार्जड फिलॉसॉफर

खुप छान,इनो घेत आहे.

अनन्त्_यात्री's picture

14 Jun 2017 - 10:49 am | अनन्त्_यात्री

प्रकाशचित्रे व नकाशेही छान!

सानझरी's picture

14 Jun 2017 - 11:00 am | सानझरी

मस्त लेख आणि सुंदर फोटो!!

सर्वच प्रतिसादकांचे आभार. या आठवड्यात कामाच्या गडबडीने पुढचा धागा पोस्ट करायला जमेल असे वाटत नाही. तरी शक्य तितक्या लवकर पुढचा लेख, "रांगणा उर्फ प्रसिध्दगड" टाकतो.

अभिजीत अवलिया's picture

17 Jun 2017 - 9:54 pm | अभिजीत अवलिया

माहितीपूर्ण लेखमाला ...