अनवट किल्ले ९ : जंगलाने गिळलेला, मुडागड ( Mudagad)

दुर्गविहारी's picture
दुर्गविहारी in भटकंती
26 May 2017 - 6:57 pm

पन्हाळा तालुक्याच्या पश्चिमेला , सह्याद्रीच्या एन कण्यावर एक छोटे गाव वसलेले आहे,"पडसाली". गावाच्या आजुबाजूला घनदाट जंगल आहे आणि पश्चिमेला खोल दरीत रत्नागिरी जिल्ह्यातील राजापुर तालुका येतो. पेशव्यांच्या काळात राजापुर, आचरा, देवगड, विजयदुर्ग या बंदरातून करवीरला येणारा माल निरनिराळ्या घाटाने चढविला जाई. त्यापैकी राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून काजिर्डा घाटाने मालाची ने आण केली जाई. यासाठी नानासाहेब पेशव्यानी सन १७४२ ते १७४७ या दरम्यान करवीरकरांच्या प्रदेशाजवळ मुडागड बांधला असावा. नानासाहेब पेशवे व तुळाजी आंग्रे यांच्यात बिनसले होते. वाडीचे सांवत पेशव्याना मदत करीत. त्यामुळे तुळाजी आंग्रेनी सावंत व करवीरकरांच्या प्रदेशावर चढाई करण्यास सुरवात केली. तो उल्लेख पुढील प्रमाणे," पहिले मुडागड स्वामीनी वसविला होता. त्यावर तुळाजी आंग्रेनी गड बांधून वसिगत केली. तेथून स्वार्‍या करून तमाम पनाले ( पन्हाळा) प्रांताची जागा मारली. बहुतच धामधुम केली. प्रलये आरंभिला. त्यावर बावडेवाले ( गगनबावडा) व येसाजी आंग्रे हे सर्व एकत्र होउन च्यार पाचशे स्वार व सात - आठ हजार पायदलानिशी मुडागडास जाउन मुडागड घेतला. आणि राजापुरापासून संगमेश्वर पावतो तमाम मुलुख जालून पस्त केला. सर्व जागा खराब केली".
रामचंद्र बावाजी पेशव्याना मुडागडच्या वेढ्याची व लढाईसंर्दबभात अधिक माहिती देतो,"भगवंतराव व सावंत यांनी मुडागडास वेढा घातला आहे. आंगर्‍याचे उपराला (मदत) येत होता, त्यावरी याणी जाउन सदिडसे माणूस मारिले. दोन च्यारसे हत्यारे आणिली. दारूगोली हि सापडली. मुड्यावरील लोकही अवसान खात आहेत. हे गड घेतील". मूडागडाच्या आश्रयाने चालविलेली धामधुम करवीरकर व सावंतवाडीकर यांनी मिळून थांबविली. पुढे १७३९ च्या एका पत्रात चोरट्याना धरण्यासाठी काजिर्डा घाटात जोत्याजीराव चव्हाण यांचे १० लोक बंदोबस्तासाठी ठेवल्याची नोंद आहे.
मुडागडाला यायचे म्हणजे तीन पर्याय होते.
१ ) रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावी येऊन, काजिर्डा घाट या सोप्या वाटेने पडसालीला चढायचे. या वाटेने साडेतीन ते चार तास लागतात.
२ ) काजिर्डा गावाजवळ असलेल्या मोठ्या शिळेला म्हातारधोंड म्हणतात. या दगडापासून डावीकडची वाट म्हणजे काजिर्डा घाट, तर उअजवी कडची वाट म्हणजे "मुडागडाची पाज". या वाटेने चार तासात मुडागड गाठता येतो. हि वाट खूपच दमविणारी आणि अडचणीची आहे. या दोन्ही वाटेचे पर्याय आज बंद झाले आहेत, कारण काजिर्डा गावाजवळून वाघोटन नदी उगम पावते, जी विजयदुर्गजवळ समुद्राला मिळते, या नदीवर धरण बांधण्यात आल्याने काजिर्डा गाव विस्थापीत झाले आहे आणि या दोन्ही वाटा बंद झाल्या आहेत.
३ ) कोल्हापुरच्या रंकाळ्या स्टँडवरुन पडसाली या गावाला एस.टी. बस आहेत, पडसाली हे गाव मुडागडच्या पायथ्याशी आहे. गावात प्राथमिक शाळा आहे, जिथे मुक्कामाची सोय होउ शकेते, तर गावकर्‍यांकडे विनंती केल्यास जेवणाची व्यवस्था होईल. पण हा भरवशाच्या पर्याय नसल्याने जेवणाची सोय आपणच करावी हे उत्तम.
आदल्या दिवशी शिवगड पाहिल्यानंतर रात्री कोल्हापुरात मुक्काम केला. मुडागडला, म्हणजेच पडसालीला जाण्यासाठी कोल्हापुरच्या रंकाळा स्टँडवरून सकाळी ६.३०,९.१५,२.३० व ३.३० अशा बस आहेत. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शक्य तितक्या सकाळी किल्ला बघणे आवश्यक होते. तसेच गावही बरेच दुर्गम असल्याने संध्याकाळी फार उशीर होणे योग्य नव्हते. माझा हा पहिली गाडी पकडण्याचा निर्णय अतिशय शहाणपणाचा ठरला. कसा ते वाचायला मिळेलच.
आद्ल्या दिवशीच्या शिवगड, दाजीपुर भटकंतीनंतर सोबती दमले होते, पहाटे लवकर उठण्याच्या मुडमधे कोणी नव्हते. पण ट्रेकचा प्लॅन लक्षात घेउन मी आधी आवरून घेतले व सगळ्यांना आवरुन बाहेर काढले. नाष्टा करुन पहाटे ठिक ६.१५ ला आम्ही रंकाळा स्टँडवर हजर होतो. बस आलीच. हि बस सी.बी.एस. हून सुटते. आत मधे गर्दी होती, पण बहुतेक प्रवासी मधेच उतरणार होते. रंकाळ्याला वळसा घालून कळे, बाजारभोगाव मार्गे बस पडसाली फाट्याला वळली. या रस्त्याचा शेवट पडसालीत होतो. बाजारभोगावपासून एक फाटा अणुस्कुरा घाटाकडे जातो. ७.४५ ला पडसालीत एकदाचे पोहचलो. सभोवताली घनदाट जंगल असलेले डोंगराच्या गाभ्यात हे गाव वसलयं. आणि या जंगलाच्या मखरात एखाद्या नीलमण्यासारखे पडसाली धरण आहे. याच कारणाने पडसाली सघ्या कॅम्पिंग डेस्टिनेशन बनले आहे.
md1
गावातूनच मुडागडाचे दर्शन झाले. विशेष म्हणजे बर्‍याच गावकर्‍याना मुडागड माहितीही नाही. गावातील आनंदा राजाराम मोहिते (पाटील), सिध्दु नाहू गावडे, पांडुरंग सर्जेराव पाटील ( सरपंच) हे तिघ येणार्‍या दुर्गभटक्याना मुडागड दाखविण्याचे काम करतात. आम्ही गेलो होतो तेव्हा गावात मोबाईल टॉवर होता परंतु तो अध्याप चालू नव्हता. त्यामुळे या तिघांकडे मोबाईल नव्हते. अन्यथा त्यांचे मोबाईल क्रमांक ईथे दिले असते. कारण मुडागडला जाण्यास गाईड आवश्यक आहे.
md2
पैकी पांडुरंग पाटील हे आमच्या बरोबर येण्यास तयार झाले. हेच गावचे सरपंच आहेत. आमची गँग व पांडुरंग पाटील.
md3
गावातून दक्षीण दिशेने चालण्यास सुरवात करायची. गाव ओलांडले कि ओढा लागतो. हे पाणी पडसाली धरणातून सोडलेले आहे. पुढे कुंभी नदीला हा ओढा मिळतो.
md4
ओढा ओलांडला कि रस्त्याला दोन फाटे फुटतात. पैकी उजवीकडचा रस्ता कार्जिर्डा घाटाकडे जातो. या रस्त्याने आपण रत्नागिरी जिल्ह्यातील काजिर्डा गावी जाई शकतो.
md5
मोकळवनातून थोडे चालल्यानंतर वाट उजवीकडे वळून झाडीत शिरते.
md6
याठिकाणी खूण म्हणुन हि दगडांची रास आहे.
md7
सरंपंचांबरोबर त्यांचे हे भूभूसुध्दा आम्हाला गाईड करत होते. मागच्या बाजुला दिसतो आहे ते पडसाली धरण.
md8
आम्ही यायच्या आदल्यादिवशी पन्हाळ्याचा तहसीलदार सपत्नीक, ईथे याच मार्गाने गेला असल्यामुळे त्याच्या सोयीसाठी वनखात्याने दगडावर असे लाल बाण आखले होते. तहसिलदार बहुधा हौशी असावा, नाहीतर पन्हाळ्याला मस्त ए.सी.त बसायचे सोडून बायकोला बरोबर घेउन या अटंग्या वनात कशाला तडमडला. भेटलो असतो तर बरे झाले असते. असो.
md9
पाडुंरंग वाटेतील अनेक वनस्पती आणि त्यांचे उपचारामधे उपयोग आम्हाला सांगत होते. हि गुडघेदुखीवर उपाय असणारी वनस्पती. बघा कोणाला उपयोग होते आहे का ते?
md10
वाट कधी दाट झाडीतुन जात होती, तर कधी चेहर्‍यापंर्यत येणार्‍या झुडुपातून पुढे सरकत होती. वाटेत काही सडे (खडकाळ मोकळी जागा) लागत होते. काही वाटा डाव्या ,उजव्या हाताला फूटत होत्या, पण आमच्याबरोबर वाटाडया असल्याने रस्ता चुकण्याची भिती नव्हती. अखेर एका वळणावर मुळ वाट डावीकडे वळली तर छोटी पायवाट झाङातून सरळ आत शिरली. डावीकडची वाट कळे आणि नंतर कोल्हापुर- गगनबावडा रस्त्यावरील आसलज गावी जाते. सरळ वाटेने आत गेल्यानंतर सपाटी दिसते, याला "ससेटेंभीचा माळ" म्हणतात. गड डावीकडे दिसत असतो. गडाची उंची समुद्रसपाटीपासून २२९० फुट असली तरी इथे एखाद्या टेकडीसारखाच दिसतो. गडावरची भगवी निशाणे स्पष्ट दिसतात. गडाचा राबता मोडला असल्याने वर जायला एक अशी वाट नाही. थोडी विरळ झाडी बघायची आणी शरीर घुसवत वाट करायची. गाडावर जाण्याआधी आणखी दोन महत्वाची ठिकाणे बघायची आहेत, एक मोठा हत्ती हौद आणि जंगलातील प्राणी दरीकडेला जाउन कड्यावरुन पडु नयेत म्हणून केलेला चर. अर्थात हि दोन्ही ठिकाणे जर गाईड सोबत असेल तरच सापडू शकतात. दुरदृष्टीच्या शाहुमहाराजांनी केलेली हि व्यवस्था मुडागडाच्या भेटीत आवर्जुन पहावी अशी आहे. यानंतर जाउया माथ्यावर .आम्ही जेव्हा अश्याच एका वाटेने निघालो, तेव्हा एका फुरशाने दर्शन दिले. उन्हाळ्याच्य दुपारी आणि पालापाचोळा असलेल्या ठिकाणी ते अपेक्षितच होते.
md11
वर चढताना मधे थोडीशी सपाटी लागली.
md12
बरून सह्याद्रीच्या धारेचे रांगडे रुप दिसत होते. या डोंगरामागे गगनगड आहे.
md13
अखेरीस माथ्यावर पोहचलो. ईथे कोणी फारसे येत नसल्याने माथा पुर्णपणे जंगलाने व्यापलेला आहे.
md14
हे थोडेफार तटबंदीचे अवशेष दिसतात.
md15
वर चढण्यासाठी जसा एकच रस्ता नाही, तसा खाली उतरण्यासाठीही नक्की रस्ता नाही. त्यामुळे झाडांशी हातापायी करत या गचपणातून आम्ही खाली उतरलो, तो थेट कोदेगावाला जाणार्‍या वाटेवर पोहचलो. मॅन व्हर्सेस वाईल्डमधे दाखवितात तसा अनुभव होता हा. किल्ल्यावर बघायला विशेष काही नसले तरी या थ्रिलने मजा आली.
अखेरीस गावात उतरून आलो. पांडुरंगाने कृपा केल्याबध्दल त्याची बिदागी देउन टाकली. दोन वाजताच ओढ्याकाठी पोहचलो. कालपासुन माझे निमुटपणे एकणार्‍या ट्रेकमेटसनी पाणी बघून बंडाचा झेंडा उभारला. उन्हाच्या काहीलीने तगमग झालेली शरीरे थंड करायची होती. गाडी चार वाजता येणार होती, सो मी त्यांना फार खोल न जाता, आंघोळ करण्याची परवानगी दिली. मी ही काठाकाठाने डुंबून घेतले. अखेरीस साडेतीनला सगळ्यांना बाहेर ओढले. मंडळींचे म्हणने शेवटची पाच वाजताची गाडी पकडू असे होते, पण ईतक्या आडवाटेला शेवटच्या गाडीचा भरवसा ठेवायचा नाही, हे अनुभवाने मला माहिती होते.
अखेरीच चार वाजता आलेल्या बसमधे बसलो. तिकीट काढून कंडक्टरशी गप्पा सुरु केल्या. त्याला इथे असा मुडागड नावाचा किल्ला आहे हे माहिती नव्हते, त्याला माझ्याकडच्या माहितीची प्रिंट दिली. तो ही हौशी होता. त्याच्याकडे चक्क सत्ताविस हजाराचा डि.एस.एल.आर. होता. आमच्या या गप्पा चालू होत्या तोपर्यंत अचानक रबर जळल्याचा वास येउ लागला. गाडीत धूर पसरायला लागला. काय होतय ते कळेना. आम्ही ओरडून ड्रायव्हरला गाडी थांबवायला सांगितली.
md16
खाली उतरून पाहिले तो हे भयानक दृष्य दिसले. गाडीचे मागचे चाक चक्क बाहेर आले होते.
md17
चाक बेअरिंग तुटल्याने बाहेर आले होते. ते जर पुर्ण बाहेर आले असते, तर अपघात झाला नसता तरी, या गाडीने प्रवास करणे शक्यच नव्हते. धन्य ते महामंडळ.
md18
थोडी शेरलॉक होम्सगिरी करण्यासाठी मी रस्त्यावर मागे गेलो तर खुप अंतर मागे बेअरींगचे रोलर निसटून पडलेले दिसले.
प्रथम कोल्हापुर आगाराला बसची अडचण कळवून दुसरी बस मागवायचा विचार केला, पण मोबाईलला रेंज नसल्याने तो नाद सोडला. कंडक्टरने आम्हाला रिपोर्ट लिहून दिला आणि याच तिकीटात पुढचा प्रवास करू शकाल असे सांगितले. पण खरा प्रश्न पुढेच होता, कारण शेवटची गाडी कॅन्सल झाल्याचे शुभ वर्तमान कळले. आता काहीही करुन बाजारभोगाव पर्यंत जाणे भाग होते. अशा आणिबाणिच्या वेळी ट्रेकमधे, कुठूनतरी मदत येती, असा माझा अनुभव आहे, यावेळीही तसेच घडले.
md19
एक खाजगी जीपवाला आला. आम्ही आठ जण पाहून त्याने बाजारभोगावला सोडण्याची तयारी दर्शविली. लगेचच कोल्हापुरला जाणारी गाडी मिळाली. आणि भन्नाट ट्रेकचा अनुभव घेउन मी परतलो.
md20
मुडागडाच्या परिसराचा नकाशा.
संदर्भग्रंथः-
१ ) कोल्हापुर जिल्हा गॅझेटीयर
२ ) शिवछत्रपतीच्या दुर्गाचां शोध -सतीश अक्कलकोट
३ ) डोगंरयात्रा- आनंद पाळंदे
४ ) कोल्हापुर जिल्ह्याचे दुर्गवैभव- भगवान चिले
५ ) करवीर रियासत- स.मा.गर्गे
६ ) जलदुर्गांच्या सहवासात - प्र. के. घाणेकर
७ ) www.trekshitiz.com हि वेबसाईट

प्रतिक्रिया

सूड's picture

26 May 2017 - 7:06 pm | सूड

भारीच!!

एक मोठा हत्ती हौद आणि जंगलातील प्राणी दरीकडेला जाउन कड्यावरुन पडु नयेत म्हणून केलेला चर.

याचे फोटो नाहीयेत का?

(रच्याकने, फार फार जळवता आहात राव!)

दुर्गविहारी's picture

28 May 2017 - 11:18 am | दुर्गविहारी

मी गेलो होतो तेव्हा झाडी आणि गचपण खुपच होते. तरीही मी फोटो काढला, पण त्यातून काहीच नीट दिसत नाही. पण हा आंतरजालावरून मिळालेला फोटो डकवितो. यातून हत्ती तलाव कसा आहे याचा अंदाज येईल.
md21

स्पा's picture

26 May 2017 - 8:42 pm | स्पा

एक नंबर

रामपुरी's picture

26 May 2017 - 10:27 pm | रामपुरी

_______/\_______

प्रचेतस's picture

27 May 2017 - 7:12 am | प्रचेतस

अत्यंत तपशीलवार.

लेखमाला अतिशय सुरेख चालू आहे.

सिरुसेरि's picture

27 May 2017 - 11:22 am | सिरुसेरि

थरारक अनुभव आणी फोटो +१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 May 2017 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

केवळ क्लास. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

यशोधरा's picture

27 May 2017 - 9:11 pm | यशोधरा

किती म्हंजे किती भारी!

सर्वच प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. पुढच्या आठवड्यात भेटूया किल्ले गगनगडावर आणि पळसंब्याची पाषाण मंदिरे पहायला.

स्वच्छंदी_मनोज's picture

29 May 2017 - 12:58 pm | स्वच्छंदी_मनोज

एक नंबर.. मस्तच चालून आहे मालीका. हा सर्वच परीसर फिरायचा राहीलाय.

जागु's picture

29 May 2017 - 1:04 pm | जागु

छानच.

वरुण मोहिते's picture

29 May 2017 - 1:11 pm | वरुण मोहिते

भागाच्या प्रतीक्षेत ..

पाटीलभाऊ's picture

29 May 2017 - 2:15 pm | पाटीलभाऊ

सुंदर वर्णन आणि फोटो...

adya82's picture

31 Jan 2022 - 2:26 pm | adya82

Padasali - Kajirda ghat - Kajirda - Mudagad chi Paaj - Mudagad - Padasali asa trek kela... Mudagad chi paaj he vaat ata poorna modali ahe... raan majale ahe... vaat shodhat jaave lagate.. Pandurang Patil yanche vadil guide mhanun amachya barobar ale hote. Te suddha first time ya vaate ne var aale. Ya vaate ne Mudagad var pochayala amhala 5 hrs lagale. Madhe kuthech paani nahi.