न आकळलेलं काही... ३

श्रावण मोडक's picture
श्रावण मोडक in जनातलं, मनातलं
8 Oct 2008 - 3:26 pm

कुमार गंधर्व गेले त्या दिवशीची गोष्ट. दुपार आणि संध्याकाळच्या सीमेवर असताना ती बातमी आली. काही क्षण सुन्न मनस्थितीत गेले. ऑफिस आणि माझी खोली यातलं अंतर वीस पावलांचं. त्यामुळं तडक खोली गाठली. ती कॅसेट काढली आणि ऑफिसात काम करताना शेजारी टेप ठेवून ती लावली. त्या मनस्थितीत कसलंही काम करणं शक्य झालं नाही. सारं काही सहकाऱ्यावर सोपवून मी शांतपणे ती भजनं ऐकून काढण्यात वेळ घालवला. ही भजनं मनात घर करून गेली होती ती त्यांच्या वेगळ्या जातकुळीतल्या गायनानं. जातकुळी वेगळी आहे हे समजलं होतं तेही त्यांनी केलेल्या प्रयोगांविषयी वाचल्यानंच. आधी ते वाचनातून समजलं आणि मग तौलनीक स्वरूपात काही ऐकत गेलो त्यातून आकळत गेलं. पण तेवढंच आकळणं. त्यापलीकडं त्याचं वेगळेपण सांग असं कुणी म्हटलं तर हात टेकलेलेच असायचे. मनात म्हणायचो, माझ्यासारखे कान करा, कदाचित वेगळेपण कळेल. पण हे उघड बोलणं शक्य नव्हतं. त्यापेक्षा आपण अज्ञानी आहोत हे कबूल करून टाकणं सोपं...
त्याच रात्री वीणा सहस्रबुद्धे यांची मैफल होती. ती होईल की नाही अशी धाकधूक होतीच. तरीही सभागृह गाठलं. अपेक्षेप्रमाणे शंभर-सव्वाशेच मंडळी होती. वीणाताई आल्या आणि आम्ही हुश्श केलं.
मैफल सुरू झाली. एक राग झाला. मध्ये एक नाट्यगीत घेतलं त्यांनी. मध्यंतर आणि पुन्हा एक राग. एव्हाना गायन ऐकताना झोप वगैरे प्रश्न राहिले नव्हते. ऐकायचं, नीट ऐकायचं. मध्ये एखादा सूर, तान आत जाते. भिडते. छातीत कळसुद्धा आल्यासारखं वाटतं असं चक्र आता सुरू होतं. त्याच अवस्थेत त्या रात्रीही वीणाताईंचं गायन ऐकत गेलो.
पावणेबाराच्या सुमारास वीणाताई बोलल्या. कुमारांचं निधन झाल्याचं सांगून म्हणाल्या, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मैफल थांबवते. आणि सुरू झालं "उड जायेगा... हंस अकेला...." अनेक श्रोत्यांचे हात डोळ्यांकडे गेले. माझेही. हंस उडताना पाहिलाय का, या एरवीही अनेकदा ते भजन ऐकताना गंमत्या स्वभावातून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर त्या रात्री मिळालं. उडणाऱ्या हंसासोबत कुमारांचे प्रत्यक्ष सूरही त्याच भजनाचा हात धरून त्या दिवशी अनंतात विलीन झाले असावेत. डोळ्यांसमोर तीच प्रतिमा. हंस उडतोय... मध्येच कुमारांचा चेहरा. त्यांची ती 'सह्याद्री'वरची मुलाखत. बोलताना अनेकदा दिसणारं त्यांच्यातलं लहान मूल. आणि कानात बाहेरून वीणाताईंचा तर आत पार्श्वभूमीवर त्या दुपारी आणि आधी अनेकदा ऐकलेल्या कुमारांच्या भजनाचा सूर. अस्वस्थ... केवळ अस्वस्थ.
पु्न्हा मनात प्रश्न... काय नातं आहे कुमारांच्या त्या सुरांशी? इतकं गहिरं काही, की ते गेल्याचं जाणवून असं अस्वस्थ वाटावं... हे काय आहे नेमकं? उत्तर नाहीच. पुन्हा कान फक्त काही ऐकण्याकडंच वळतात.
---
नोकरी नसलेल्या मधल्या काळात स्वयंरोजगाराचा प्रयत्न सुरू होता. प्रशासकीय स्वरूपाच्या एका पुस्तकासंबंधीचं काम करीत होतो. अजब होतं ते सारं. आम्ही एका लॉजमध्ये खोली घेऊन तिथंच या कामाचा संसार थाटला होता. सकाळी अकराच्या सुमारास काम सुरू करायचो ते रात्री बारापर्यंत चालायचं. तेव्हा संगणकावर गाणी हा प्रकार ठाऊकही नव्हता. त्यामुळे सोबत असायचा टेप आणि भारंभार कॅसेट्स. त्या ऐकत काम चालायचं. लक्ष कामाकडं होतं तसं गाण्याकडंही होतं. मंतरलेल्या त्या काळात त्या पुस्तकाच्या लेखकासमवेत खरी साथ दिली ती सुरांनी. इतकी की प्रशासकीय नियम, सेवाशर्ती, न्यायालयीन निकाल असे रुक्ष विषय असूनही त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत उल्लेख झाला तो गायक-वादकांचा. त्यांनी, म्हणजेच त्यांच्या सुरावटींनी दिलेल्या साथीचा. त्यात जसराज होते, परवीन सुलताना होत्या, आणखीही काही मंडळी होती.
का असं वाटलं असावं आम्हाला की त्यांच्या प्रती ऋण व्यक्त करावेत? त्यांच्या सुरांनी दिलेली साथ हे एक कारण होतंच. पण त्याहून महत्त्वाचं ठरलं होतं म्हणजे त्या सुरांच्या साथीत झालेल्या कामाचा तो एकूण अनुभव. हा निष्कर्ष केवळ दोनेक वाक्यातून निघाला होता आणि प्रस्तावनेच्या पहिल्या परिच्छेदात आधी नावं आली या कलाकारांची.
ऐकण्याचा हा असा फायदा? एक सुंदर अनुभव घेण्याचा? तेही जे ऐकतोय त्यातलं काहीही कळत नसताना?
---
माझ्या कादंबरीच्या लेखनाचा काळ. पहिला मसुदा मी अवघ्या पंधरा दिवसात पूर्ण केला होता. पण एका मित्रानं जमिनीवर आणलं. म्हणाला, "सिद्धहस्त नाहीस. थोडा वेळ घे." दीडेक महिन्याचा खंड टाकला आणि पुन्हा त्यावर काम करणं सुरू केलं. आता सारं काही संगणकावरच होतं. सोबतीला सुरावटी असतात. एमपीथ्रीचं वेड लागून त्यातूनही बाहेर आलेला हा काळ होता. हे लेखन करताना सुरावटींचीच साथ होती. कारण हे असलं लेखन म्हणजे जीवघेणं असतं. जीव जाऊ द्यायचा नसेल तर साथ हवीच. ती सुरावटींची.
'सेलेब्रेशन' हा हरिप्रसाद चौरसियांचा अल्बम तेव्हा असाच हाती लागला होता. त्यातलं 'शेफर्ड सॉंग' आणि त्याला जोडून असलेल्या 'क्रेसेंडो' आणि 'फ्री स्पिरीट' या नावाच्या दोन धून. बास्स. आधीच बासरी आणि त्यात हे असं धनगरी/गुराख्याची धून वगैरे. मन राहतंय कशाला थाऱ्यावर. कादंबरीची पार्श्वभूमी आदिवासी जनसमुहांची. त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्या चिरंतनपणे चालत आलेल्या संगीताचा आस्वाद घेण्याची अनेकदा संधी मिळाली होतीच. त्यातल्या पाव्याच्या सुरांचं नातं इथं या 'शेफर्ड सॉंग'शी जमायचं. सूर ऐकण्याचे दोन्ही स्तर वेगळेच. एक त्या तिथं, कुठंतरी कित्येक मैलांचं अंतर चालत कापून ऐकलेला, दुसरा इथं सगळ्या सोयी-सुविधांच्या जगात आधुनिक साधनांच्या साह्यानं ऐकलेला. पहिल्या स्तरावर डोळ्यांपुढं केव्हा तरी येऊन गेलेला तो आदिवासी गुराखी; गुरांचा कळप, त्यापाठोपाठ काखेत काठी धरून मनमुराद, निश्चिंतपणे पावा वाजवत निघालेला. त्याच्या त्या सुरावटीमध्ये काही क्रम वगैरे नसावा, चाल वगैरेही नसावी. किंवा माझ्या कंडीशनींग झालेल्या मनात ते उमटत नसावं. तो सूर बेगुमानपणे उधळून देत चालला होता. त्याच्या मागं एक दरी आणि तिच्यापलीकडं संध्याकाळच्या प्रवासाला लागलेला सूर्य. तांबडाबुंद. मी असतो इथं घरी. वेळ आहे रात्री केव्हा तरी किंवा सकाळ-दुपारची. 'शेफर्ड सॉंग' ऐकू लागलो की हमखास ते दृष्य डोळ्यांसमोर येतं. मग त्यापुढच्या 'क्रेसेंडो' या काहीशा फ्यूजनकडं झुकणाऱ्या सुरावटीनं मन आक्रंदून निघतं. पुढच्या "फ्री स्पिरीट" सुरावटीच्या वेळी म्हणतं, चल तिकडं जाऊ, त्या भागात. नागरी जीवनातील गजबजाटापासून मुक्ती, स्वातंत्र्य देणारं जगणं माझ्यादृष्टीनं तिथं होतं. तीच भावना नेमकी त्या 'फ्री स्पिरीट'मधून कशी येते बाहेर मनाच्या उंबरठ्यापर्यंत?
असं का, पुन्हा प्रश्न. सूर हे त्यावरचं उत्तर हे मान्य. पण म्हणजे काय?
---
प्रश्नांच्या या भेंडोळ्यात सापडलो असतानाच मध्यंतरी एकदा शौनक अभिषेकी यांच्याशी बोलण्याचा योग आला. बोलता-बोलता शास्त्रीय संगीताविषयी जितेंद्र अभिषेकी यांचे विचार त्यांनी सांगितले. "थोडी वैचारिक बैठक असणाराच शास्त्रीय संगीताचा आस्वाद घेऊ शकतो." बुवांचं हे विधान. खरंच असावं, हे मनात पक्कं झालं. एव्हाना त्यांनी 'कट्यार'मध्ये केलेले प्रयोग वगैरे ऐकलं होतं. भैरवीनंच 'कट्यार'चा आरंभ हा तो एक प्रयोग. इतरही आहेत. भैरवीनंच आरंभ करण्याच्या प्रयोगाचा अर्थ कळत नव्हता. भैरवी सकाळच्या आरंभीच्या प्रहरी किंवा पहाट ते सकाळ या सीमेवर गायची किंवा मैफिलीचा समारोप करण्याची रागिणी इतकंच काहीसं ठाऊक होतं. (प्रश्न असायचेच, बौद्धीक कसरतीतून आलेले. रागिणी सकाळची असेल आणि मैफल संध्याकाळी संपणारी असेल तर काय?) पण त्यामुळं 'कट्यार'च्या अनुभूतीत कसा फरक पडतो? पडत असावा. पुढं हे नाटक दोनदा पाहिल्यानंतर एक गोष्ट जाणवली. या नाटकाचा आरंभच मुळात एक मैफल संपतानाचा आहे. तेव्हा सुरवात भैरवीनं करण्यामागचं प्रयोजन बरोबर असणार इतकंच लक्षात आलं. आता हे असं इतरही अनेकांच्या ध्यानी आलं असेलच. पण...
हा पण काही पिच्छा सोडत नाही.
- क्रमशः -

संस्कृतीसंगीतप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिरत भिरभि-या's picture

8 Oct 2008 - 6:28 pm | अभिरत भिरभि-या

तीनही भाग वाचले. लेख आवडले.. काही भाग थोडा अबोध वाटला पण विषयच अमुर्त वा शब्दातीत असल्याने हे साहजिकच होते

सर्व भागांचे एकत्रित दुवे:

भाग १
भाग २
भाग ३
भाग ४

यशोधरा's picture

8 Oct 2008 - 10:12 pm | यशोधरा

वीणाताई काय गातात ना?? :) जीवघेणा आवाज आहे!
कुमारजींचे अनवट प्रयोग आणि त्यांची गायकी... सगळंच शब्दांच्या पलिकडलं आहे ते..

विसोबा खेचर's picture

9 Oct 2008 - 12:14 am | विसोबा खेचर

वीणाताई काय गातात ना?? जीवघेणा आवाज आहे!

चांगल्या गातात, आवाज तर सुरेखच आहे, तानांच्या विविध पॅटर्नसवर अत्यंत प्रभूत्व आहे.

परंतु त्या ग्वाल्हेर गायकीची परंपरा कशी काय सांगतात ते कळत नाही! कारण धीम्या विलंबित एकतालाच्या तुलनेत थोड्याश्या अधिक प्रवाही लयीतले झुमर्‍या-तिलवाड्यातले खास ग्वाल्हेर परंपरेतले ख्याल त्या कधीच गातांना आढळत नाहीत! त्याचप्रमाणे गुरू म्हणून त्या ज्या गजाननबुवांचे नाव सांगतात, त्यांचीही खास ग्वाल्हेरी पेचदार व ओघवती गायकी त्यांच्या गाण्यात मला तरी दिसत नाही!

असो, परंतु तरीही एकंदरीत बया खूप गुणी आहे असेच मी म्हणेन..!

आपला,
(गजाननबुवांनी समृद्ध केलेल्या पारंपारिक ग्वाल्हेर गायकीचा प्रेमी!) तात्या.