जंटलमन्स गेम - १० - स्टीव्ह बकनरच्या लीला

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
30 Dec 2016 - 6:31 am

स्टीव्ह बकनरच्या लीला

१९९२ च्या नोव्हेंबर महिना...

अझरुद्दीनचा भारतीय संघ दक्षिण आफ्रीकेच्या दौर्‍यावर आला होता. दर्बानची पहिली टेस्ट ड्रॉ झाली होती. या टेस्टमध्ये आपल्या पहिल्याच इनिंग्जमध्ये प्रवीण आमरेने सेंच्युरी ठोकली होती, पण ही टेस्ट सर्वात जास्तं लक्षात राहीली ती एका वेगळ्या कारणाने. टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात टीव्ही रिप्ले पाहून निर्णय देणार्‍या थर्ड अंपायचा या टेस्टमध्ये सर्वप्रथम वापर करण्यात आला. दक्षिण आफ्रीकेत थर्ड अंपायरच्या निर्णयासाठी आजच्याप्रमाणेच लाल आणि हिरव्या रंगाची लाईट सिस्टीम त्यावेळीही अस्तित्वात होती, परंतु आजच्या बरोबर उलट लाईट्सचा वापर होत असे. बॅट्समन आऊट असल्यास हिरव्या आणि नॉटआऊट असल्यास लाल लाईट वापरला जात असे. ग्राऊंडवरचा अंपायर सिरील मिचलीच्या रेफरलनंतर रन आऊटचा पहिलावहिला निर्णय देणारा थर्ड अंपायर होता कार्ल लिबनबर्ग आणि थर्ड अंपायरने आऊट दिलेला पहिला बॅट्समन होता सचिन तेंडुलकर! सचिनच्या अनेक रेकॉर्डमधला हा आणखीन एक रेकॉर्ड.

जोहान्सबर्गच्या दुसर्‍या टेस्टमध्ये मनोज प्रभाकरच्या अफलातून स्पेलमुळे दक्षिण आफ्रीकेची अवस्था २६ / ४ अशी झाली होती. जाँटी र्‍होड्स आणि हॅन्सी क्रोनिए यांनी ४७ रन्सची पार्टनरशीप केल्यावर कपिल देवने स्वतःच्याच बॉलवर क्रोनिएचा कॅच घेतला. र्‍दक्षिण आफ्रीकेचे सर्व प्रमुख बॅट्समन आऊट झाले होते. एक र्‍होड्स तेवढा ठामपणे क्रीजवर उभा होता. त्याच्या जोडीला आला ब्रायन मॅकमिलन! दक्षिण आफ्रीका ७३ / ५.

र्‍होड्स आणि मॅकमिलन यांनी सावधपणे खेळत दक्षिण आफ्रीकेला ९० पर्यंत नेलं. त्याचवेळी...

प्रभाकरचा बॉल र्‍होड्सने मिडऑफला ड्राईव्ह केला आणि एक रन काढण्यासाठी तो धावत सुटला. मिडऑफवर असलेल्या जवागल श्रीनाथने बॉल पिकअप् केला आणि अचूकपणे नॉनस्ट्रायकर एन्डला असलेल्या स्टंप्सचा वेध घेतला. र्‍होड्स रनआऊट असल्याबद्दल भारतीय खेळाडूंना कोणतीही शंका नव्हती त्यामुळे त्यांनी जोरदार अपिल केलं..

.. परंतु अंपायरने र्‍होड्स नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला!
निर्णय देण्याच्या दृष्टीने स्वतः अजिबात पोझीशनमध्ये नसताना!

भारतीय खेळाडू अंपायरच्या या निर्णयावर अवाक् झाले! त्यांनी थर्ड अंपायरची मदत घेण्याची मागणी केली, पण अंपायर बधला नाही! भारतीय खेळाडूंचं अपिल त्याने साफ फेटाळून लावलं!

रिप्लेमध्ये र्‍होड्स किमान ८ ते १० इंचांनी आऊट असल्याचं स्पष्टं झालं!
अंपायरच्या या एककल्ली निर्णयाचा उठवत जाँटी र्‍होड्सने ९० रन्स फटकावल्या आणि दक्षिण आफ्रीकेला वाचवलं!

र्‍होड्सवर मेहेरनजर करणारा अंपायर होता स्टीव्ह बकनर!
भारताला आपल्या निर्णयाची त्याने दाखवलेली ही पहिली चुणूक होती.

स्टीफन अँथनी बकनर हा मूळचा जमेकाच्या माँटेगो बे इथला. तरुणपणी फुटबॉल गोलकीपर असलेला बकनर १९८८ मध्ये एल सॅल्वाडोर आणि नेदरलँड्स यांच्यातल्या फुटबॉल वर्ल्डकपच्या क्वालिफायर सामन्यात रेफ्री होता. क्रिकेटमध्ये न येता तो फुटबॉलमध्येच राहीला असता तर क्रिकेटप्रमाणे फुटबॉल मैदानावर दिलेल्या त्याच्या अजब निर्णयांमुळे भडक माथ्याच्या फुटबॉल खेळाडूंनी आणि त्यांच्या कोचनी त्याला भर मैदानावर फाडून खाल्ला असता.

दक्षिण आफ्रीकेतल्या अजब निर्णयानंतर बकनरने पुन्हा भारताला आपली करामत दाखवली ती १९९६ श्रीलंकेतल्या सिंगर वर्ल्ड सिरीजच्या दुसर्‍या वन डे मध्ये! भारताच्या २२६ रन्सचं टार्गेट घेऊन बॅटींगला आलेल्या जयसूर्याने आक्रमक पवित्रा घेत वेंकटेश प्रसादची धुलाई करण्यास सुरवात केली, परंतु प्रत्यक्षात प्रसाद बॉलिंगला येण्यापूर्वीच पहिल्यच ओव्हरमध्ये श्रीनाथच्या बॉलवर एलबीडब्ल्यूचं जोरदार अपिल फेटाळणार्‍या बकनरचाही त्यात सिंहाचा वाटा होता! जयसूर्याने १२० रन्स ठोकत श्रीलंकेला सहजच मॅच जिंकून दिली!

सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाची मनसोक्तं धुलाई करत भारताला जिंकून दिलेल्या शारजातल्या कोका कोला कपची फायनल आठवते? या फायनलच्या डॅमियन फ्लेमिंगच्या बॉलवर सचिनला एलबीड्ब्ल्यू देण्याचा बकनरचा निर्णय असाच अनाकलनीय होता. फ्लेमिंगचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडलेला असून आणि ऑफस्टंपला न लागता स्टंपच्या किमान दोन इंच बाहेरुन जात असतानाही बकनरने सचिनला एलबीडब्ल्यू दिलं होतं! अर्थात त्यापूर्वी सचिनने ऑस्ट्रेलियन बॉलर्सच्या अब्रूची लक्तरं वेशीवर टांगत १३४ रन्स झोडपून काढल्या होत्या!

१९९९ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातली टेस्ट सिरीज १-१ अशी बरोबरीत सुटल्यावर कलकत्त्याच्या ईडन गार्डन्सवर टेस्ट क्रिकेटच्या एशिया कपमध्ये भारत - पाकिस्तान यांच्यात पहिली मॅच होती. या मॅचच्या चौथ्या दिवशी बकनरने पुन्हा एकदा आपला इंगा दाखवला!

पहिल्या इनिंग्जमध्ये २६ / ६ अशा परिस्थितीतून ७० रन्स फटकावणार्‍या मोईन खानने पाकिस्तानचा स्कोर १८५ पर्यंत नेला. भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये १४७ / २ अशा स्कोरवर शोएब अख्तरने दोन बॉलमध्ये यॉर्करवर द्रविड - सचिन यांना बोल्ड केल्यावर स्टेडीयममध्ये सन्नाटा पसरला होता! भारताची पहिली इनिंग्ज २२३ मध्ये आटपल्यावर सईद अन्वरच्या १८८ रन्सच्या जोरावर पाकिस्तानने भारताला चौथ्या इनिंग्जमध्ये २७९ रन्सचं टार्गेट दिलं.

भारताच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये सदगोपन रमेश आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी १०८ रन्सची ओपनिंग पार्टनरशीप रचल्यावर रमेश एलबीड्ब्ल्यू झाला. भारताचा स्कोर १३४ पर्यंत पोहोचल्यावर सकलेन मुश्ताकच्या बॉलवर योहानाने लक्ष्मणचा कॅच घेतल्याचं पाकिस्तानचं अपिल उचलून धरत बकनरने लक्ष्मण आऊट असल्याचा निर्णय दिला!

प्रत्यक्षात बॉल लक्ष्मणच्या बॅटपासून किमान चार इंचांवरुन केवळ पॅडला लागून योहानाच्या हातात गेलेला असताना!

सचिन आणि द्रविड बॅटींग करत असताना शोएब अख्तरचा बॉल सचिनने मिडऑन आणि मिडविकेटच्या गॅपमधून ड्राईव्ह केला. १२ वा खेळाडू असलेल्या नदीम खानने बॉल अडवण्यापूर्वीच सचिन - द्रविडने दोन रन्स पूर्ण केल्या होत्या आणि तिसरी रन काढण्यासाठी सचिन नॉन-स्ट्रायकर एन्डकडे धावत होता. त्या दोघांनाच काय पण शोएब अख्तरलाही सचिनला आरामात तीन रन्स मिळणार याची खात्री असावी, त्यामुळे तो बॉल कलेक्ट करुन रनआऊटसाठी प्रयत्नं करण्याऐवजी स्टंपपासून दोन-तीन पावलं मागे उभा होता.

तिसरी रन पूर्ण करण्यासाठी धावत असलेला सचिन आणि शोएब यांची टक्कर झाली होती!
शोएबशी झालेल्या या टक्करीमुळे क्रीजमध्ये पोहोचलेला सचिन क्रीजच्या बाहेर फेकला गेला होता!
नेमक्या याच वेळी बाऊंड्रीवरुन नदीम खानचा थ्रो नेमका स्टंप्सवर अचूक लागला!
पाकिस्तानी खेळाडूंनी रनआऊटसाठी अपिल केलं!

वास्तविक सचिन क्रीजमध्ये पोहोचल्यावर शोएबला धडकला होता, त्यामुळे पाकिस्तानच्या अपिलला खरंतर फारसा अर्थ नव्हता, पण बॉल स्टंपवर लागला तेव्हा सचिन क्रीजबाहेर होता हा एकच मुद्दा पुन्हा पुन्हा उगाळत वासिम अक्रमने अपिल लावून धरलं!

... आणि स्टीव्ह बकनरने सर्व काही नजरेस्मोर घडलेलं असूनही थर्ड अंपायरला निर्णय देण्याची सूचना केली!

ईडन गार्डन्सवरचे प्रेक्षक आणि खुद्दं सचिन यांना सगळ्यांना अनपेक्षित धक्का देत थर्ड अंपायर केटी फ्रान्सिसने सचिन रनआऊट असल्याचा निर्णय दिला!

ईडन गार्डन्सवरच्या प्रेक्षकांनी पाकिस्तानच्या नावाने शिमगा करण्यास सुरवात केली. ओव्हर पूर्ण झाल्यावर थर्डमॅन बाऊंड्रीवर फिल्डींगला परतलेल्या शोएबने प्रेक्षकांना 'शट अप्' असं सुनावल्यावर प्रेक्षकांच्या संतापाचा कडेलोट झाला आणि मग ईडन गार्डन्सच्या इतिहासातल्या आणखीन एका दंगलीला आणि गोंधळाला सुरवात झाली!

२००० मध्ये बांग्लादेशच्या पहिल्यावहिल्या टेस्टमध्येही बकनरने आपला रंग दाखवला..

बांग्लादेशच्या पहिल्या इनिंग्जमध्ये अमिनुल इस्लाम आणि हबिबूल बशर बॅटींग करत असताना अजित आगरकरचा बॉल बशरने कट् केला आणि दोन रन्स काढल्या. पण दुसरी रन पूर्ण होण्यापूर्वीच बकनर रन काढणार्‍या बशर आणि अमिनुलकडे पाहून नकारात्मक मान हलवत होता! रन पूर्ण होताच दोघांनाही त्याने विकेटच्या मध्ये न धावता बाजूने धावण्याची ताकीद दिली!

दोन ओव्हर्सनंतर अ‍ॅक्शन रिप्ले व्हावा तसाच प्रकार पुन्हा एकदा झाला! याही वेळेला बकनरने अमिनुलला विकेटवर न धावण्याची ताकीद दिली! वास्तविक शॉट खेळल्यावर पहिली दोन पावलं विकेटवर पडणं हे साहजिकच होतं, पण बकनरला ते देखिल मंजूर नव्हतं!

लागोपाठ पाच वेळा बकनरने ताकीद दिल्यावर अमिनुल वैतागला. यातून एक विलक्षण मजेदार दृष्यं पाहण्यास मिळालं...

सुनिल जोशीचा बॉल अमिनुलने कट् केला आणि अक्षरशः क्रीजवरुन बाजूला उडी मारुन तो रन काढण्यासाठी धावत सुटला! हा विचित्रं प्रकार पाहून विकेटकीपर साबा करीम आणि सुनिल जोशीला हसू आवरणं मुश्कील झालं! इतर भारतीय फिल्डर्सनाही हसू आवरेना. या गोंधळातच अमिनुल - बशर यांनी दोन रन्स पूर्ण केल्या!

कॉमेंट्रीबॉक्स मध्ये असलेला इयन चॅपल बकनरवर टीका करताना म्हणाला,
"Umpire Bucknor has done a fairly good job all these years, but with time he is getting too much into the game!"

२००३ मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असताना बकनरने पुन्हा एकदा सचिनला 'हात' दाखवला!

ब्रिस्बेनच्या पहिल्या टेस्टमध्ये जेसन गिलेस्पीचा इनस्विंगर विकेटमधल्या बाऊंसचा अचून अंदाज घेत सचिनने बॅटने न खेळता पॅडवर घेण्याचा निर्णय घेतला. सचिनच्या अपेक्षेपेक्षाही जास्तं उसळलेला हा बॉल त्याच्ता मांडीवरच्या थायपॅडवर लागला. गिलेस्पीने एलबीड्ब्ल्यूसाठी अपिल केलं, परंतु बॉल स्टंप्सच्या वरुन जाणार याची कल्पना आल्यावर तो आपल्या बॉलिंग मार्ककडे निघाला असतानाच...

स्टीव्ह बकनरनची मान होकारार्थी हलली आणि बोट वर झालं!
तब्बल दहा ते पंधरा सेकंदांनी!
सचिन अक्षरशः आSSS वासून पाहत राहीला!
रिप्लेमध्ये बॉल स्टंपच्या वरुन किमान फूटभर अंतरावरुन जाताना दिसत होता!
पुन्हा एकदा स्टीव्ह बकनरने सचिनची विकेट काढली होती!

परंतु एवढ्यावरच बकनरचं समाधान झालं नव्हतं!

सिडनीच्या चौथ्या टेस्टमध्ये सचिन (२४१*) आणि लक्ष्मण (१७८) यांच्या जोरावर भारताने ७०५ रन्स फटकावत चौथ्या इनिंग्जमध्ये मॅच जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला ४४३ रन्सचं टार्गेट दिलं होतं. चौथ्या इनिंग्जच्या पाचव्याच ओव्हरमध्ये जस्टीन लँगर एलबीडब्ल्यू असल्याची आगरकरला इतकी खात्री होती की त्याने अपिल करण्याचेही कष्टं घेतले नाही. अंपायर बकनरने लँगर नॉटआऊट असल्याचा निर्णय दिल्यावर गांगुलीच्या चेहर्‍यावरचे भाव पाहण्यासारखे होते! काही ओव्हर्सनंतर पुन्हा अनिल कुंबळेच्या बॉलवर बकनरने लँगरविरुद्धंचं अपिल फेटाळून लावलं! इरफान पठाणचा इनस्विंगर मिडलस्टंपच्या समोर डॅमियन मार्टीनच्या पॅडवर आदळल्यावरही त्याला नॉटआऊट देत बकनरने भारत मॅच जिंकणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली! इतकंच नव्हे तर मॅच संपल्यावर विकेटकीपर पार्थिव पटेलच्या सतत अपिल करण्यावरुनही त्याने जाहीर नाराजी व्यक्तं केली!

बकनरच्या निर्णयांनी भडकलेल्या सौरव गांगुलीने सिरीजनंतर आयसीसीला दिलेल्या रिपोर्टमध्ये बकनरच्या अंपायरींगवर अत्यंत कडवट शब्दांत टीका केली!

टेस्ट सिरीजनंतर भारत - ऑस्ट्रेलिया - झिंबाब्वे यांच्यातल्या वन डे सिरीजमध्ये पुन्हा एकदा बकनरचे प्रताप दिसून आले.

ब्रिस्बेनच्या भारत - झिंबाब्वे वन डे मॅचमध्ये राहुल द्रविडवर बॉल टँपरींगचा आरोप करण्यात आला होता! द्रविडने आपण चघळत असलेल्या च्युईंगगमचा यासाठी वापर केल्याचं अंपायर्सनी नमूद केलं होतं! भारताचा कोच जॉन राईट, गांगुली आणि द्रविडच्या मते ही नकळत झालेली चूक होती, परंतु मॅच रेफ्री असलेल्या क्लाईव्ह लॉईडने द्रविडला मॅच फीच्या ५०% दंड ठोठावला होता!

भारताची पुढची मॅच ऑस्ट्रेलियाविरुद्धं सिडनीला होती. या मॅचमध्ये द्रविड बॅटींगला येताच बकनरने काय करावं?

द्रविडकडे पाहून छद्मीपणे हसत त्याने आपलं बोट तोंडात घातलं आणि दोन-तीनदा बॉलवरुन फिरवलं!
ज्या कारणावरुन द्रविडवर दंडात्मक कारवाई झाली होती त्याची मुद्दाम आठवण करुन देण्यासाठी!
एका अंपायरकडून या प्रकाराची कोणालाच अपेक्षा नव्हती!

बकनरच्या या पराक्रमाने भडकलेल्या गांगुलीने मॅच रेफ्री लॉईडकडे त्याची तक्रार केली!

बकनरने आपल्यावरील आरोप अर्थातच नाकारले. वर तो म्हणाला,
"It is ridiculous. I would never mimic Dravid. He is one player who is very high on my list."

चोराच्या उलट्या बोंबा!

बकनरने इंग्लंडच्या नासिर हुसेनलाही एकदा असाच धक्का दिला. पाकिस्तान विरुद्धच्या टेस्टमध्ये सकलेन मुश्ताकचा बॉल हुसेनच्या बॅटला लागून पॅडवर गेल्यावरही बकनरने त्याला एलबीडब्ल्यू दिलं होतं!

२००५ मधली ईडन गार्डन्सवरची भारत - पाकिस्तान टेस्ट ही बकनरची शंभरावी टेस्ट! अशी कामगिरी करणारा तो पहिलाच अंपायर असला तरी या टेस्टमध्ये त्याने पुन्हा एकदा सचिनला आपला प्रसाद दिला!

भारताच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये सचिन आणि द्रविडने ९८ रन्सची पार्टनरशीप केली होती. अब्दुल रझाकला बाऊंड्री मारत सचिनने हाफ सेंच्युरीही पूर्ण केली होती. हे दोघंही भारताला मॅचवर पकड मिळवून देणार अशी अपेक्षा असतानाच...

रझाकचा ऑफस्टंपच्या बाहेर पडलेला बॉल सचिनच्या बॅटपासून किमान तीन-चार इंचांवरुन गेला आणि मग स्लिपच्या दिशेने स्विंग झाला. विकेटकीपर कामरान अकमलने पहिल्या स्लिपच्या समोर डाईव्ह मारत कॅच घेतला (चक्कं!) आणि अपिल केलं. रझाकने साशंकपणेच त्याच्या सुरात सूर मिसळला. सचिन बहुधा पुढचा बॉल खेळण्याची मानसिक तयारी करत असावा. रझाक पुन्हा आपल्या बॉलिंग मार्ककडे परत फिरणार इतक्यात...

अचानकपणे बकनरचं बोट वर झालं!
सचिन अवाक् होऊन बकनरकडे पाहत राहीला!
नॉनस्ट्रायकर असलेला द्रविडही आश्चर्याने थक्कं झाला!

सचिन ड्रेसिंगरुममध्ये परतला तेव्हा तो कधी नाही इतका संतापला होता असं खुद्दं सेहवागने नंतर सांगितलं! मॅच संपल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी शंभर टेस्टमध्ये अंपायरींग केल्याबद्द्ल बकनरच्या सन्मानार्थ असलेल्या समारंभाला सचिन हजर राहीला नाही!

२००६ मध्ये बकनरने थेट टीव्ही कंपन्यांनाच धारेवर धरलं!

"TV Companies all over the world are deliberately doctoring images just to show that umpire's decisions are incorrect. It needs to be stopped. Umpire should have ultimate authority and decision making capacity on field!"

२००७ च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये तर अधिकच विचित्रं प्रकार झाला.

रिकी पाँटींगने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावरही पावसामुळे मॅच सुरुच झाली नव्हती. अखेर ३८ ओव्हर्सची मॅच होणार हे निश्चित झाल्यावर अ‍ॅडम गिलख्रिस्टने श्रीलंकेची धुलाई करत १४९ रन्स झोडपून काढल्या! ऑस्ट्रेलियाच्य २८१ रन्सच्या टार्गेटचा पाठलाग करताना जयसूर्या आणि कुमार संगकारा यांनी ११३ रन्सची पार्टनरशीप केली, पण हे दोघे आउट झाल्यावर ऑस्ट्रेलियाने मॅचवर पकड मिळवली. त्यातच पुन्हा आलेल्या पावसाने श्रीलंकेच्या इनिंग्जमधल्या आणखीन दोन ओव्हर्स कमी झाल्या! डकवर्थ - लुईस नियमाप्रमाणे श्रीलंकेसमोर ३६ ओव्हर्समध्ये २६९ रन्सचं टार्गेट होतं. ३३ ओव्हर्सनंतर श्रीलंकेचा संघ या टार्गेटपासून ३७ रन्सनी मागे होता.

ब्रिजटाऊन, बार्बाडोसच्या मैदानावर त्यावेळी फ्लडलाईट्सची व्यवस्था नव्हती. श्रीलंकेच्या ३३ ओव्हर्स पूर्ण झाल्यावर अंपायर अलीम दारने अंधार पडत असल्याने मॅच थांबवण्याची सूचना केली. निरुपायाने श्रीलंकेने हा निर्णय मान्यं केला. श्रीलंकेच्या इनिंग्जमध्ये २० ओव्हर्स पूर्ण झाल्याने ऑस्ट्रेलियाने फायनल जिंकली याबद्द्ल कोणालाच शंका नव्हती, पण बकनरच्या मते मॅच पावसामुळे थांबली नसल्याने उरलेल्या ३ ओव्हर्स खेळणं आवश्यक होतं! बकनरने आपलं हे मत मॅच रेफ्री असलेल्या जेफ क्रोच्या गळी उतरवलं! पाँटींग आणि श्रीलंकेचा कॅप्टन महेला जयवर्धनाने याला मान्यता दिल्यावर जवळपास अंधारात या ३ ओव्हर्स खेळण्यात आल्या आणि एकदाचं ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड कप जिंकल्याचं जाहीर करण्यात आलं!

वास्तविक त्या तीन ओव्हर्स न खेळल्याने काहीही फरक पडत नव्हता, पण बकनरचा हट्टं!
आपलं लाडकं बाळ असलेल्या ऑस्ट्रेलियासाठी काहीही करण्याची त्याची तयारी होती.

बकनरच्या ऑस्ट्रेलियाप्रेमाचा (आणि भारतद्वेषाचा) कडेलोट झाला २००८ च्या सिरीजमध्ये.

सिडनीच्या दुसर्‍या टेस्टमध्ये अंपायर मार्क बेन्सनच्या बरोबरीने बकनरने इतक्या अक्षम्य घोडचुका केल्या की त्याला तोड नाही! बकनरच्या लौकीकाला साजेसे सारे चुकीचे निर्णय ऑस्ट्रेलियाच्या बाजूने आणि भारताच्या विरोधात होते.

ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटींग घेतल्यावर रुद्रप्रताप सिंगने हेडन आणि फिल जेक्स दोघांनाही गुंडाळत ऑस्ट्रेलियाची अवस्था २७ / २ अशी केली होती. रिकी पाँटींग आणि माईक हसी ऑस्ट्रेलियाची इनिंग्ज सावरण्याच्या प्रयत्नात असतानाच सौरव गांगुलीच्या बॉलवर पाँटींगचा लेग ग्लान्स थेट विकेटकीपर महेंद्रसिंग धोणीच्या ग्लोव्ह्जमध्ये गेला होता, परंतु अंपायर बेन्सनने हे अपिल फेटाळून लावलं!

रुद्रप्रताप सिंग आणि हरभजनसिंग यांच्या बॉलिंगवर ऑस्ट्रेलियाची अवस्था १३१ / ६ अशी झाली. अँड्र्यू सायमंड्स आणि ब्रॅड हॉग बॅटींग करत असताना बकनरने आपला इंगा दाखवला!

इशांत शर्माचा आऊटस्विंगर सायमंड्सच्या बॅटची एज घेऊन धोणीच्या हातात ग्लोव्ह्जमध्ये गेला. भारताचे स्लिपमध्ये असलेले सर्व फिल्डर्स, नॉन स्ट्रायकर एन्डला असलेला ब्रॅड हॉग आणि खुद्दं सायमंड्स सर्वांना या एजचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला, पण अंपायर बकनर?

भारतीय खेळाडूंचं जोरदार अपील त्याने फेटाळून लावलं!

३० रन्सवर बॅटींग करत असलेला सायमंड्स बकनरच्या कृपेमुळे वाचला! आणखीन १८ रन्स केल्यावर ४८ वर असताना सायमंड्सवर थर्ड अंपायर असलेल्या ब्रूस ऑक्सेनफर्डने मेहेरनजर केली! अनिल कुंबळेच्या बॉलवर धोणीने सायमंड्स विरुद्ध केलेलं स्टंपिंगचं अपिल सायमंड्स आऊट आहे हे स्पष्टं दिसत असताना आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेल्या मार्क टेलर, मायकेल स्लेटर आणि इयन हिलीने सायमंड्स आऊट असल्याचं मान्यं केलेलं असताना ऑक्सेनफर्डने सायमंड्स नॉट आऊट असल्याचा निर्णय दिला!

बकनर - ऑक्सेनफर्डच्या मेहेरबानीचा फायदा उठवत सायमंड्स १४८ पर्यंत पोहोचल्यावर धोणीने हरभजनच्या बॉलवर पुन्हा एकदा स्टंपिंगसाठी अपिल केलं! बकनरने हे अपिल तर नाकारलंच पण थर्ड अंपायरकडे पाठवण्यासही नकार दिला! रिप्लेमध्ये सायमंड्स आऊट असल्याचं स्पष्टं दिसत असूनही संतापाने धुमसण्यापलीकडे भारतीय खेळाडूंच्या हाती काही उरलं नाही. १९९२ मध्ये जाँटी र्‍होड्सला रनआऊट न देता आणि थर्ड अंपायरचं मत न विचारण्याच्या प्रकाराची बकनरने पुनरावृत्ती केली होती!

भारताच्या पहिल्या इनिंग्जमध्ये ब्रेट लीच्या यॉर्करवर वासिम जाफरची दांडी उडाली, पण हा नोबॉल होता हे अंपायर बेन्सनच्या नजरेतून निसटलं! ऑस्ट्रेलियाच्या दुसर्‍या इनिंग्जमध्येही बेन्सनने माईक हसीला २२ आणि ४६ वर आऊट आहे हे स्पष्टं दिसत असूनही नॉटआऊट दिलं होतं! अशा वेळेस बकनर मागे राहणं शक्यंच नव्हतं! अनिल कुंबळेच्या बॉलवर सायमंड्स एलबीडब्ल्यू आहे हे स्पष्टं दिसत असताना बकनरचा निर्णय होता नॉट आऊट!

परंतु खरा कहर झाला तो भारताच्या दुसर्‍या इनिंग्जमध्ये!

पाचव्या दिवशी मॅच वाचवण्यासाठी संपूर्ण दिवस खेळून काढण्याचं आव्हान भारतापुढे होतं. जाफर, व्हिव्हीएस लक्ष्मण आणि सचिन लवकर परतल्यावर द्रविड - गांगुली सावधपणे ऑस्ट्रेलियन बॉलिंग खेळून काढत होते. हे दोघं आरामात खेळत असतानाच ऑस्ट्रेलियाला विकेटची आवश्यकता असताना बकनर मागे कसा राहील?

सायमंड्सचा बॉल द्रविडच्या पॅडला लागून गिलख्रिस्टच्या ग्लोव्हजमध्ये गेला..
यच्चयावत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी कॅचसाठी अपिल केलं.
...आणि बकनरचं बोट लगेच वर गेलं!

वास्तविक द्रविडची बॅट त्याच्या पॅडच्या आड होती. बॉल बॅटला न लागता पॅडला लागून गेल्याचं स्पष्टं दिसत होतं. परंतु तरीही बकनरने द्रविड आऊट असल्याचा निर्णय दिला होता!

Playig It My Way या आपल्या आत्मचरित्रात या प्रसंगाचं वर्णन करताना सचिन म्हणतो,
"By the fifth day we were batting to save the game. Mind you, there is little doubt in my mind that we would have drawn had it not been for what seemed to us to be mistakes by the umpires and some rather unsportsmanlike conduct by a few of the Australian players. Rahul Dravid was given out caught behind off Symonds for 38 by umpire Bucknor when his bat seemed to be a fair distance away from the ball. The wicketkeeper Adam Gilchrist was standing up to the stumps at the time and was in the best position to see if the ball had touched Rahul's bat. Yet he who prided himself on walking off if he nicked the ball appealed for the caught-behind and to our disbelief we saw the umpire raise the finger. It was a shocking decision. Some of us actually wondered if Rahul had been given out lbw."

द्रविडला एलबीडब्ल्यू दिल्यावर ब्रेट लीच्या बॉलवर मायकेल क्लार्कने गांगुलीचा कॅच पकडल्याचं अपिल केलं. बकनर आणि बेन्सननी थर्ड अंपायरकडे विचारणा न करता ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन रिकी पाँटींगकडे चौकशी केल्यावर गांगुली आऊट असल्याचा निर्णय दिला. रिप्लेमध्ये क्लार्कने कॅच घेण्यापूर्वी बॉलचा जमिनीवर टप्पा पडल्याचं स्पष्टपणे दिसत असूनही!

कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेला सुनिल गावस्कर म्हणाला,
"Why is Mr. Benson asking a person who didn't walk off when he was caught behind at 14, and it couldn't be possible that you are lying when you are batting and true while you are fielding. That is nonsense! Utter nonsense! I am sorry Mr. Benson, you got it all wrong."

मायकेल क्लार्कने शेवटच्या ओव्हरमध्ये ३ विकेट्स घेतल्यावर अखेर ऑस्ट्रेलियाने मॅच जिंकली, पण त्यांना चहुबाजूने टीकेचा सामना करावा लागला.

कॉमेंटेटर हर्षा भोगलेने मॅच संपल्यावर मार्मिक विधान केलं,
"Australia won! But did they deserve it?"

याच मॅचच्या दरम्यान सायमंडस आणि हरभजनसिंग यांच्यादरम्यानच्या वादात हरभजनने आपल्यावर वर्णद्वेषी टीका केल्याचा सायमंड्सने आरोप केला. मॅच रेफ्री माईक प्रॉक्टरने हरभजनसिंगला ३ टेस्टसाठी बॅन केल्याची शिक्षा फर्मावल्यावर आधीच बकनर आणि बेन्सनच्या निर्णयांमुळे संतापलेल्या भारतीय खेळाडूंचं आणि बीसीसीआयच्या अधिकार्‍यांचं माथं भडकलं. या शिक्षेविरुद्ध अपिल करण्याची आणि वेळ पडल्यास ऑस्ट्रेलियाचा दौरा अर्धवट सोडण्याची भारताने तयारी केल्यावर ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाचं धाबं दणाणलं. त्यातच पुढच्या टेस्टमधून बकनरला हटवण्याचीही मागणी भारताने केली होती.

अखेर हरभजनला केवळ दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागलं. त्याचबरोबर त्याला चिथावल्याबद्दल सायमंड्सलाही दंड झाला. सर्वात महत्वाचं...

पर्थच्या तिसर्‍या टेस्टमधून स्टीव्ह बकनरची हकालपट्टी करण्यात आली!

बकनरने अपेक्षेप्रमाणेच बीसीसीआयवर खापर फोडलं.
"It is due to the financial power of BCCI, I have been made a scapegoat!"

क्लाईव्ह लॉईडने बकनरच्या सुरात सूर मिसळला. तो म्हणाला,
"You wonder what confidence this gives umpires. What happens now if Billy Bowden makes a few mistakes?"

इंग्लंडचा सुप्रसिद्धं अंपायर डिकी बर्ड मात्रं म्हणाला,
"He had gone on too long. It is time to stop now!"

ऑस्ट्रेलियाच्या चॅनल नाईनवर एका कार्यक्रमात बोलताना रवी शास्त्री म्हणाला,
"Umpire Bucknor has outlived his shelf life."

२००९ मधली ऑस्ट्रेलिया - दक्षिण आफ्रीका ही बकनरची शेवटची सिरीज होती. या सिरीजमध्ये डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम (डीआरएस) चा वापर करण्यात आला होता. बकनरच्या अनेक घोडचुका आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने जाणारे निर्णय डीआरएसमुळे उघडकीला आले. बकनरने या डीआरएसवरच टीकास्त्रं सोडलं!

"The decision making should be left to on-field umpire only. When on-field umpire needs help, he can refer to third umpire, but the umpire's authority should not be challenged!"

बकनरनंतर भारताच्या राशीला लागलेला आणखीन एक अंपायर म्हणजे कुमार धर्मसेना. सचिनला त्याने किमान ३ वेळा चुकीचा एलबीडब्ल्यू दिलेला आहे. बहुतेकदा बॉलिंग करताना सचिनने केलेल्या धुलाईचा राग अजूनही टिकून असावा!

कथालेख

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

30 Dec 2016 - 7:08 am | चांदणे संदीप

ते सर्व निर्णय पाहत असताना तोंडात एकच शिवी यायची...
...
... भें**!

Sandy

अजया's picture

30 Dec 2016 - 9:43 am | अजया

:-/
काय बेकार चिकीखाऊ #%&** अंपायर होता हा बकनर!

डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम (डीआरएस) मुळे या गैरप्रकारांना आळा बसावा हि आशा .

--बकनरने या डीआरएसवरच टीकास्त्रं सोडलं!

"The decision making should be left to on-field umpire only. When on-field umpire needs help, he can refer to third umpire, but the umpire's authority should not be challenged!" ---

"सर्विस मोटरीच्या टायमाला असला तरास नव्हता" ची आठवण झाली .

किसन शिंदे's picture

30 Dec 2016 - 12:35 pm | किसन शिंदे

मुळात सुरूवातीपासूनचे त्याचे प्रताप ठाऊक असताना आयसीसी त्याला भारताविरूद्धच्या सामन्यांसाठी नेमायचं तरी कसं? आणि बीसीसीआयही यावर काही आक्षेप कशी घेत नव्हती.?

छान, अजून येउद्या क्रिकेट चे लेख...

पैसा's picture

30 Dec 2016 - 1:24 pm | पैसा

क्रिकेट खेळाडू काय न अंपायर काय! बरेचसे नगच!!

गॅरी ट्रुमन's picture

30 Dec 2016 - 2:28 pm | गॅरी ट्रुमन

१९९८ च्या कोकाकोला कपच्या फायनलमध्ये (ज्या सामन्यात सचिनने १३४ धावा काढल्या होत्या) अझरलाही असेच खोटे आऊट देण्यात आले होते. बॉलिंग करत होता डॅमिएन फ्लेमिंग आणि त्याने टाकलेला बॉल लेगसाईडला बर्‍यापैकी बाहेर होता.खरा तर तो बॉल वाईड म्हणून सहज गणला गेला असता. अंपायर तो वाईड बॉल म्हणून देईल अशा अपेक्षेने डॅमिएन फ्लेमिंगने मागे वळून बघितले तर अंपायरने अझर कॉट बिहाईंड असल्याचा अजब निर्णय दिला होता. या निर्णयावर अझरचा सोडाच फ्लेमिंगचाही विश्वास बसला नव्हता. तो अंपायर स्टीव्ह बकनरच होता का की दुसरा होता हे लक्षात नाही.

स्पार्टाकस's picture

30 Dec 2016 - 10:35 pm | स्पार्टाकस

गॅरीभाऊ,

अझर कॉट बिहाईंड असल्याचा निर्णय बकनरनेच दिला होता, फक्तं तो डॅमियन फ्लेमिंगच्या नाही, तर मायकेल कॅस्प्रॉविचच्या बॉलवर.

श्रीगुरुजी's picture

30 Dec 2016 - 2:51 pm | श्रीगुरुजी

नेहमीप्रमाणेच उत्कृष्ट लेख!

फक्त खालील प्रसंग थोडा चुकला आहे.

सचिन आणि द्रविड बॅटींग करत असताना शोएब अख्तरचा बॉल सचिनने मिडऑन आणि मिडविकेटच्या गॅपमधून ड्राईव्ह केला. १२ वा खेळाडू असलेल्या नदीम खानने बॉल अडवण्यापूर्वीच सचिन - द्रविडने दोन रन्स पूर्ण केल्या होत्या आणि तिसरी रन काढण्यासाठी सचिन नॉन-स्ट्रायकर एन्डकडे धावत होता. त्या दोघांनाच काय पण शोएब अख्तरलाही सचिनला आरामात तीन रन्स मिळणार याची खात्री असावी, त्यामुळे तो बॉल कलेक्ट करुन रनआऊटसाठी प्रयत्नं करण्याऐवजी स्टंपपासून दोन-तीन पावलं मागे उभा होता.

तिसरी रन पूर्ण करण्यासाठी धावत असलेला सचिन आणि शोएब यांची टक्कर झाली होती!
शोएबशी झालेल्या या टक्करीमुळे क्रीजमध्ये पोहोचलेला सचिन क्रीजच्या बाहेर फेकला गेला होता!
नेमक्या याच वेळी बाऊंड्रीवरुन नदीम खानचा थ्रो नेमका स्टंप्सवर अचूक लागला!
पाकिस्तानी खेळाडूंनी रनआऊटसाठी अपिल केलं!

वास्तविक सचिन क्रीजमध्ये पोहोचल्यावर शोएबला धडकला होता, त्यामुळे पाकिस्तानच्या अपिलला खरंतर फारसा अर्थ नव्हता, पण बॉल स्टंपवर लागला तेव्हा सचिन क्रीजबाहेर होता हा एकच मुद्दा पुन्हा पुन्हा उगाळत वासिम अक्रमने अपिल लावून धरलं!

... आणि स्टीव्ह बकनरने सर्व काही नजरेस्मोर घडलेलं असूनही थर्ड अंपायरला निर्णय देण्याची सूचना केली!

ईडन गार्डन्सवरचे प्रेक्षक आणि खुद्दं सचिन यांना सगळ्यांना अनपेक्षित धक्का देत थर्ड अंपायर केटी फ्रान्सिसने सचिन रनआऊट असल्याचा निर्णय दिला!

या प्रसंगात सचिनने फटका मारून दोन धावा पळून काढल्या व तो तिसरी धाव घेण्यासाठी पळत असताना शोएब अख्तर त्याच्याकडे पाठ करून दोन्ही पाय फाकवून त्याच्या मार्गात उभा राहिला. थ्रो येत असताना सचिन क्रीजजवळ जवळपास पोहोचलच होता. परंतु अख्तर मार्गात उभा असल्याने सचिनला बॅट लांबवून किंवा अख्तरला वळ्सा घालून क्रीजमध्ये बॅट टेकविणे अवघड होते. त्यामुळे त्याने अख्तरच्या फाकलेल्या दोन पायांमधून बॅट घालून क्रीजमध्ये टेकविली. आपण क्रीजमध्ये बॅट टेकविली म्हणजेच आपली धाव पूर्ण झाली या समजुतीत तो होता. त्याच वेळी वेगात पळत येऊन अख्तरच्या दोन पायांमधून बॅट क्रीजमध्ये टेकविल्यावर अख्तरशी धडक टाळण्यासाठी प्रयत्न करताना त्याची बॅट किंचित उचलली गेली. बॅट उचललेली असतानाच नेमका चेंडू यष्ट्यांवर येऊन आदळला. ज्या क्षणी चेंडू यष्ट्यांवर आदळला अगदी त्याच क्षणी बॅट किंचित हवेत असल्याने त्याला नियमानुसार बाद देण्यात आले. परंतु त्याआधी बॅट यशस्वीपणे क्रीजमध्ये टेकविल्यामुळे खरं तर तिसरी धाव पूर्ण झाली होती व आपण धाव पूर्ण केली या समजुतीतच सचिन होता. खरं तर नियमानुसार तिसरी धाव पूर्ण झालेली होती. परंतु तृतीय पंचांनी ज्या क्षणी चेंडू यष्ट्यांवर आदळून बेल्स जागेवरून हलल्या त्या क्षणी त्याची बॅट क्रीजमध्ये टेकलेली नसून हवेत होती यावरच भिस्त ठेवून तो बाद असल्याचा निर्णय दिला. वास्तविक पाहता त्याची बॅट आधीच क्रीजमध्ये टेकलेली होती व त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या तिसरी धाव देखील पूर्ण झाली होती. तरीसुद्धा त्याच्या नावावर दोनच धावा दिल्या गेल्या, त्याला बाद दिले गेले आणि त्याच्या वाटेत मुद्दाम उभे राहणार्‍या अख्तरच्या करामतीकडे संपूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.

मृत्युन्जय's picture

30 Dec 2016 - 4:10 pm | मृत्युन्जय

गांगुलीला पॉटी ग च्या बोलण्यावरुन औट दिले हे अजुन आठवते. जबर्‍याच खवळलो होतो मी तेव्हा. एकतर आपण ती मॅच हारलो आणि दुसरे म्हणजे गांगुलीला असे आउट दिले? गांगुलीला? अक्षम्य.

मदनबाण's picture

30 Dec 2016 - 8:10 pm | मदनबाण

सुरेख लेखन... जुन्या आठवणी ताज्या झाल्या.

स्टीव्ह बकनर माझ्या लयं डो़क्यात जायचा... त्यांचे चुकीचे निर्णय जाम डोक्यात जाणारे होते.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- twenty one pilots: Heathens (from Suicide Squad: The Album) [OFFICIAL VIDEO]

गामा पैलवान's picture

31 Dec 2016 - 12:21 am | गामा पैलवान

बकवास बकनरने सदोष पंचगिरी केलेल्या सामन्यांचे पुनरावलोकन करून ते सामने अनधिकृत ठरवले गेले पाहिजेत.

-गा.पै.

फारएन्ड's picture

31 Dec 2016 - 4:09 am | फारएन्ड

बहुतेक किस्से आठवतात. बेन्सन वगैरे ला भारताने खूपच चीपली सोडले असे वाटते. बीसीसीआय ने सगळी ताकद वापरून अद्दल घडवायला हवी होती. तरी तिसर्‍या मॅच मधे पर्थ ला त्यांच्याच बालेकिल्ल्यात त्यांचीच धुलाई करून वचपा काढलाच होता.

मला आठवते त्यावरून बकनर हा कायमच गडबडवाले निर्णय देत असे. पण सुरूवातीला त्यात 'बायस' नसे. मात्र नंतर नंतर क्लिअरली भारताविरूद्ध तो देउ लागला. त्याला वेळीच हाकलला असता तर त्या २००३ व २००७ च्या सिरीज चा निर्णय कदाचित वेगळा लागला असता.

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2016 - 10:12 am | बोका-ए-आझम

बकनाॅरला आधीच हटवायला हवा होता. साला निग्गर!

बोका-ए-आझम's picture

31 Dec 2016 - 10:26 am | बोका-ए-आझम

या एका माणसासाठी वर्णद्वेष क्षम्य आहे असं स्पष्ट मत आहे.

नरेश माने's picture

17 Jan 2017 - 1:22 pm | नरेश माने

जो गल्ली क्रिकेटमध्ये अंपायरिंग करण्याच्या सुद्धा लायकीचा नाही असल्या माणसाला आंतरराष्ट्रीय पातळीवर अंपायर म्हणून नेमलेच कसे असा विचार या माणसाचे प्रताप पाहून माझ्या मनात नेहमी यायचा.

स्थितप्रज्ञ's picture

16 Feb 2017 - 7:51 pm | स्थितप्रज्ञ

एखादी ब्लड प्रेशर कमी करणारी गोळी घ्यावी म्हणतो...

टिलू's picture

21 Feb 2017 - 1:48 pm | टिलू

सुंदर लेख...

"सचिन तेंडुलकरने ऑस्ट्रेलियाची मनसोक्तं धुलाई करत भारताला जिंकून दिलेल्या शारजातल्या कोका कोला कपची फायनल आठवते? या फायनलच्या डॅमियन फ्लेमिंगच्या बॉलवर सचिनला एलबीड्ब्ल्यू देण्याचा बकनरचा निर्णय असाच अनाकलनीय होता. फ्लेमिंगचा बॉल लेगस्टंपच्या बाहेर पडलेला असून आणि ऑफस्टंपला न लागता स्टंपच्या किमान दोन इंच बाहेरुन जात असतानाही बकनरने सचिनला एलबीडब्ल्यू दिलं होतं!"

- हा umpire पाकिस्तानी होता - जावेद अख्तर. असं ऐकलं कि या सिरीज मधल्या त्याच्या सुमार कामगिरी नंतर त्याला पुन्हा कधी कुठेच पंच म्हणून उभे केले गेले नाही.