त्या घरात दोघी बाया रहातात.
एकीच्या पाठीवर पंख आहेत,
तर दुसरीच्या पायात पैजण.
दोघींना पहाटेची चिकार स्वप्न पडतात,
ती स्वप्नं डोळ्यात घेऊनच त्या उठतात.
पंखवालीला दिसते शुभ्र आकाश, निळे डोंगर,
तर पैंजणवाली बघते सुंदर सजवलेलं नीटस घर.
दोघी आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात,
एकमेकींकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात.
घर बिचारं दमून जातं,
पंखांच्या फडफडाटाला छेद देणारा,
पैजणांचा छुमछुमाट ऐकत रहातं.
दिवस मावळत येतो.
पंख दमतात, पैंजण थकतात,
दोघीजणी एकमेकींना सामोर्या येतात.
पंखवालीला वाटतं,
आपल्या पंखांचा छुमछुम आवाज व्हावा;
तर पैंजणवालीला वाटतो
तिच्या पंखांचा हेवा.
दोघींच गळ्यात गळे घालतात,
एकमेकींना मौनातून समजावून घेतात.
पंखांशेजारी पैंजण मान टाकतात,
तेव्हा दोघींचे डोळे भरून येतात.
त्यांचं घर भिजत रहातं,
त्यांच्या आसवांना नाईलाजानं झेलत रहातं.
प्रतिक्रिया
2 Sep 2016 - 8:08 pm | ज्योति अळवणी
अप्रतिम कविता. खूप आवडली. त्यादोघी सासू-सून असू शकतील. भूतकाळ-वर्तमानकाळ असतील, गृहिणी-बाहेर काम करणारी अशीही कल्पना असेल.... मात्र भावना त्याच.
2 Sep 2016 - 9:33 pm | पद्मावति
अप्रतिम कविता!
2 Sep 2016 - 9:47 pm | शिव कन्या
आवडली.
बाईचेच नव्हे तर एकूणच माणसाच्या स्वप्न आणि वास्तव यात होणार्या ओढाताणीचे यथार्थ चित्रण.
मनोवेधक प्रतिमा!
3 Sep 2016 - 2:49 pm | अमितदादा
कविता आवडली.
2 Sep 2016 - 9:48 pm | अभ्या..
वॉव,
जबरदस्त!
2 Sep 2016 - 9:48 pm | यशोधरा
सुरेख!
2 Sep 2016 - 9:53 pm | जव्हेरगंज
कोणीतरी उलगडून सांगावे यातला गहण अर्थ!
वाचायला छान वाटली. कळली नाही.
2 Sep 2016 - 10:28 pm | अभ्या..
विथ ऑल रिस्पेक्ट टू अंतरा ताई,
हे जव्हेरभाऊसाठी सुलभ जरासे,
.
.
मोडक्या खोपटात राहतेत दोघेजण
एक विके रंगीबेरंगी फुगे
दुसरा रस्त्यावर रांगोळी काढून जगे
दोघाना पहाटेची लैच स्वप्नं पडतात,
तीच नजरंत घेऊन ते उठतेत.
फुगेवाल्याला दिसतात फुललेले चेहरे न फुगलेले रंग
तर रांगोळीवाला रंगातच पाहतो जमीनीवरचे आकार.
दोघे आपापल्या स्वप्नांना न्याहाळत रहातात,
एकमेकाकडे पाठ करून स्वप्नांनाच जवळ करतात.
खोपट बिचारं दमून जातं,
फुगल्या फुग्याच्या आकाराना पाहून
रंगलेली जमीन पाहात रहातं.
दिवस मावळत येतो.
फुगे मलुलतात, रांगोळी विस्कटते,
दोघे एकमेकांनासमोर येतात.
फुगेवाल्याला वाटतं,
आपल्या फुग्यांवर अशीच नक्षी उमटावी
तर रांगोळीवाल्याला वाटते
अलगद रंग हवेत चढावेत.
दोघे एकमेकांना हलकेच थोपटतात
एकमेकांना मौनातून समजावून घेतात.
फुग्याशेजारी रांगोळीचे डबे मान टाकतात,
तेव्हा दोघांचे डोळे भरून येतात.
त्यांचं खोपट भिजत रहातं,
त्यांच्या आसवांना नाईलाजानं झेलत रहातं.
2 Sep 2016 - 10:35 pm | जव्हेरगंज
निशब्द झालो ब्वॉ!
खिक्क!
मीटर म्हणजे मीटर.
लैच...
3 Sep 2016 - 2:06 pm | यशोधरा
खिक्क का? दोन्हीही कविता चांगल्याच आहेत की.
4 Sep 2016 - 4:47 am | रुपी
हो ना.. खरं तर मलाही फारच आवडली ही पण, पण त्या खिक्कमुळे मला काही अर्थ समजला नाहीये का असे वाटले, त्यामुळे इथे प्रतिसाद देणे टाळलेच.
छान हो अभ्या.. भाऊ :)
3 Sep 2016 - 8:01 am | अंतरा आनंद
क्या बात है|
हे खुपच आवडलं.
ही कविता अनाहितात टाकलेली तेव्हा मेन बोर्ड वर टाक असं सांगणार्^यांना शतशः धन्यवाद. नाहीतर एवढं छान रुपांतरण ('विडंबन' या शब्दातला खवटपणा यात नाही )वाचायला नसतं मिळालं.
छान असलें तरी फुगे वा रांगोळी हे त्या माणसाच्या जगण्याचे बाह्य भाग आहेत. कवितेतल्या स्त्रीचं तसं नाही. फुगेवाला फिरून दमल्यावर फुगे खुंटीला टांगून त्या परेशानीतून (सोलापुरचे ना तुम्ही?) मोकळा होऊ शकतो. पण तिला पाठीलाच पंख आहेत. ते दमतात तेव्हा ती सुद्धा दमतेच. त्यांचं थकणं हे तिचं खचणं असतं.
पैंजणांचंही तसंच. आता नाही पण पुर्वी जोडव्यांएवढंच पैजण हे सौभाग्याचं चिन्ह होतं. आपल्या कुठल्या महत्वाकांक्षेपायी घराचं, मुलांचं नुकसान होत असेल तर स्त्रीला वाईट वाटतं ( ठाम असणार्^या अपवाद.) 'नक्की कश्याची किंमत देऊन काय मिळवतोय?' याचा हिशेब सतत चालतच असतो मनात.
3 Sep 2016 - 1:51 pm | अभ्या..
मला असा विचार करताच आला नाही. पुलं चे एक वाक्य आहे बघा, एखादा माणूस आलेपाक का विकतो? तसंय ते. आयुष्य का? कसे? असं नाहीच. आहे तेच आयुष्य. फक्त त्याचे अॅनालिसिस होते त्रुटी जाणवून. सोडता येत नाहीये मूळ. ते जाणवले. बाकी काही नाही.
पैंजन परफेक्ट. पण एक रिअलिस्टिक(पैंजन) आणि एक फॅन्टसी(पंख) असा फरक जाणवला म्हणून दोन्ही उदाहरणे रिअॅलिस्टिक घ्यायचा मी प्रयत्न केला.
आपली कविता अप्रतिमच आहे. मिपाबोर्डावर बळेच चांगले म्हणणार्यापेक्षा मापे निघतील, एखादेवेळेस दुर्लक्ष होईल पण चांगल्याला वाईट कधी म्हणले जात नाही. म्हणू दिले जातही नाही.
धन्यवाद.
3 Sep 2016 - 2:19 pm | यशोधरा
मला तर वाटले की तेच तर म्हणायचे आहे. काहीसे यिन आणि यांगसारखे. एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखे.पंख उभारुन उडू पाहणारीला बेड्या मान्य नाहीत, तिची काही जगावेगळी स्वप्नंही असतील, त्यासाठी वाटेत येणारा कोणताही अडथळा ती पार सुद्धा करेल, कोणताही पाश तिला जुमानायचा नाहीये, पण..
तिचे पैंजण - बेड्या नव्हेत, पैंजणच - तिला मागे खेचतात, तिच्या जबाबदार्यांकडे खेचतात, ज्या तिने आवडीने स्वीकारल्यात, त्या जबाबदार्यांविषयी तिची काहीही तक्रार नाहीये (म्हणून पैंजण, नाहीतर बेड्या म्हटलं असतं का कदचित), त्या तिच्याच आहेत, पण कुठेतरी ह्या दोन विश्वांमध्ये एक किंचितशी दरार आहे - ही दोन विश्वं एकरुप नाही होऊ शकत, एकावेळी सगळंच मिळू शकत नाही, तसं काहीसं.
आणि मग, कुठेतरी अपरिहार्य तडजोड, तडजोडी कराव्या लागण्याने मनाची झालेली तडफड. एकूणच मजओपलेपलेल्या दोन्ही विश्वांची झालेली तडफड, नाईलाज.. असे सारे मांडले आहे, असे मला वाटले.
3 Sep 2016 - 2:19 pm | यशोधरा
मनात जोपासलेल्या*
4 Sep 2016 - 1:24 pm | रातराणी
वा!! आता कळल्यावर कविता अतिशय आवडली! धन्यवाद यशोतै!
2 Sep 2016 - 9:55 pm | पैसा
अतिशय सुंदर लिहिलंय! अगदी थोड्या शब्दात खूप काही सांगून जाणारं! खूप तरल लिहिलंय. वाचता वाचता इनिगोयची अशीच तरल नक्षी आठवली!
3 Sep 2016 - 8:01 am | अंतरा आनंद
'नक्षी' मस्तच.
2 Sep 2016 - 10:46 pm | पगला गजोधर
माफ करा, पण मला कविता उमजली नाही कदाचित.
गेई छंद .... वाली वाटली.
2 Sep 2016 - 10:50 pm | अभ्या..
''गेई छंद'' ह्या शब्दनिर्मीतीची रॉयल्टी माझ्याकडे द्यावी.
2 Sep 2016 - 10:52 pm | पगला गजोधर
वरील वाक्यात प्राइड जाणवते आहे बरे !
2 Sep 2016 - 10:56 pm | अभ्या..
नाही. वसूलीचा अनुभव म्हणा. चालेल मला.
3 Sep 2016 - 8:02 am | अंतरा आनंद
संदर्भ नाही कळला.
3 Sep 2016 - 9:32 am | पगला गजोधर
या सदर संज्ञेचे मिपाजनकत्व व स्वामित्व हक्क, यावर अभ्याभो यांनी दावा केलेला
आहे, सबब त्यांच्या या शाब्दिक मिळकतीवर भाष्य करण्यासाठी, अभ्याभो यांनी स्वत: पुढाकार घ्यावा.
ह घ्या
:)
3 Sep 2016 - 9:41 am | पगला गजोधर
ज्यांना संधर्भ नाही कळला, त्यांनी त्या संज्ञेचा अर्थ (एकूणच) 'आनंदी-आनंद' असा घ्यावा.
.
.
ता.क. 'आनंदी-आनंद' यावर माझी कोणतीही रॉयल्टी नाही ;) सदर संज्ञा प्रताधिकार मुक्त आहे.
सर्वजण याचा हवातसा वापर करू शकतात.
3 Sep 2016 - 2:44 pm | श्रीगुरुजी
मला पण तसंच का वाटतंय?
2 Sep 2016 - 11:24 pm | एस
वेल, मलाही नाही समजली. (स्वगत- दगड झालोय की काय मी? कशी काय नाही समजली)
2 Sep 2016 - 11:33 pm | रातराणी
+1
2 Sep 2016 - 11:29 pm | रेवती
कविता आवडली.
2 Sep 2016 - 11:46 pm | रुपी
छान.. आवडली!
3 Sep 2016 - 6:41 am | चाणक्य
सुरेख उतरली आहे.
3 Sep 2016 - 8:04 am | अंतरा आनंद
वाचून, आवर्जून प्रतिसाद लिहीणार्यांचे धन्यवाद.
3 Sep 2016 - 8:10 am | अंतरा आनंद
लिहीणार्यांना
3 Sep 2016 - 9:11 am | सिरुसेरि
छान..छान . शेवट आनंदी /आशावादी हवा होता असे वाटते .
3 Sep 2016 - 2:12 pm | अजया
कविता फार आवडली.
3 Sep 2016 - 2:43 pm | श्रीगुरुजी
कविता वाचल्यावर यात एक अजून वेगळा अर्थ असावा असं वाटतंय. पण तो अर्थ इथे सांगितला तर खूप धुरळा उडेल. तो अर्थ पगला गजोधर यांनी एका प्रतिसादात सूचित केला आहेच. इतरांना तो उमगलेला दिसत नाही.
असो. कविता चांगली आहे.
3 Sep 2016 - 3:10 pm | एस
कविता परत वाचली. पैताईंमुळे कवितेचा अर्थ समजला. दोन्ही रूपकं प्रचंड ताकदीनं उतरली आहेत. फारच छान लिहिलंय. सुंदर. _/\_
3 Sep 2016 - 3:14 pm | संदीप डांगे
एका स्त्री ची दोन मनांची ओढाताण छान!
3 Sep 2016 - 3:26 pm | नीलमोहर
सुरेख कल्पनाविष्कार..
3 Sep 2016 - 4:01 pm | कविता१९७८
सुंदर कविता .
3 Sep 2016 - 4:02 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली कविता अतिशय आवडली.
अभ्यानी लिहीलेली कविता सुध्दा मस्त आहे.
पैजारबुवा,
4 Sep 2016 - 9:27 am | विशाखा पाटील
सुरेख! कविता आवडली. मनातलं द्वंद्व छान उतरलंय.
4 Sep 2016 - 11:43 am | मिसळलेला काव्यप्रेमी
ताकदीची रचना...
4 Sep 2016 - 10:44 pm | स्वाती दिनेश
अंतराची कविता आवडली होतीच, अभ्याची कविताही आवडली.
स्वाती
5 Sep 2016 - 9:55 am | आतिवास
कविता आवडली.
6 Sep 2016 - 9:09 pm | एक एकटा एकटाच
सुरेख