..नातंच काही और असतं!

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
23 Sep 2008 - 3:32 pm

मागे नागपूरला असतांना उन्हाळ्यात एकदा भर दुपारी अमरावतीला जाण्यासाठी प्रवास करावा लागला. मधे रस्त्यात एके ठिकाणी पळस फुलल्यामुळे लालेलाल झालेली झाडांची रांग लागली! इकडे कडक उन्हामुळे जीव हैराण झालेला होता. पाण्यालासुद्धा तहान लागावी अशी वेळ होती ती!! सगळ्या बाजूंनी धरणी साद घालतेय पावसासाठी असे वाटत होते.
अन् त्याच दिवशी संध्याकाळी पाऊस पडला वळवाचा.. जोरदार! त्या पावसानंतर इतके छान वाटले की वर्णन नाही करता येणार.
त्यावेळेस स्फुरलेल्या ह्या काही ओळी.. नंतर कधी समर्पक अशी भर घालता आली नाही त्यात!

निसर्गाचा खेळ सारा..
कधी मोठा अजब वाटतो!
पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!!
..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं!

सतत जवळ असलेलं आभाळ
धरतीहून दुरच दिसतं..
पण, तापल्या धरतीला शांतवण्यासाठी
आभाळाला बरसावं लागतं..
जणू आभाळाच्या अवस्थेचं प्रतिबिंब धरतीवर उमटतं..
..आभाळाचं धरतीशी नातंच काही और असतं!

धरतीच्या कुशीत
आभाळाच्या पांघरूणात
मनातली द्वंद्वही शांत होतात..
..आई-वडीलांच्या मायेचं नातंच काही और असतं!!

मुमुक्षु

कवितामुक्तकप्रकटनविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

23 Sep 2008 - 10:51 pm | विसोबा खेचर

वा मुमुक्षुराव!

ही कवितादेखील सुंदर...!

पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
पानांचं दु:ख जणू फुलांतून व्यक्त होतं!!
..त्याचं सगळ्यांशी, नातंच काही और असतं!

क्या बात है!

तात्या.

धनंजय's picture

24 Sep 2008 - 1:16 am | धनंजय

आवडली.

बेसनलाडू's picture

24 Sep 2008 - 4:39 am | बेसनलाडू

खास वाटली. कविता आवडली.
(वाचक)बेसनलाडू

सुनील's picture

24 Sep 2008 - 9:00 am | सुनील

कविता आवडली.

पानं गाळून पळसाची रक्तवर्णी फुलं फुलवतो..
लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल. त्याची आठवण आली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

राघव's picture

24 Sep 2008 - 12:16 pm | राघव

सगळ्यांचे मनापासून आभार. :)
कविता बर्‍याच अगोदर लिहिलेली असल्यामुळे काल दुसरे कडवे आठवतांना गफलत झाली.
घरी जाऊन कविता परत बघितली वहीत तेव्हा समजले. म्हणून दुसर्‍या कडव्यात किंचित बदल केलेला आहे आता.

लहानपणी आमच्या घरासमोरच एक तांबड्या गुलमोहराचे झाड होते. उन्हाळ्यात त्याच्यावरही हिरवे पान चुकुनही दिसत नसे, सगळे कसे लाल लाल.
खरंय गुलमोहराचेही झाड असंच दिसतं.

मुमुक्षु