चायनीज खाद्यंती

आनंद घारे's picture
आनंद घारे in जनातलं, मनातलं
18 Aug 2008 - 10:35 pm

मी मुंबईला येण्यापूर्वीपासून फोर्ट विभागात कांही चायनीज रेस्टॉरेंट्स होती. आमच्या ऑफीसच्या गेटामधून बाहेर पडताच कांही पावले अंतरावर 'मँडारिन' की 'नानकिंग' अशा नांवाची दोन तीन खाद्यगृहे होती. चारी दिशांनी बांक दिलेल्या इंग्रजी अक्षरात लिहिलेल्या त्यांच्या ठळक, थोड्या भडकच, पाट्या मोठ्या आकर्षक होत्या. दरवाजातून दिसणारे इंटिरियर, आंतले फर्निचर आणि वेटर्सचे कपडे लक्ष वेधून घेत. पण लहानपणापासून चिनी लोकांच्या खाण्याबद्दल जे कांही ऐकले होते त्यावरून इथे कदाचित विंचवाच्या नांगीची चटणी, झुरळांची कोशिंबीर आणि सापाचे काप असले पदार्थ 'लिंगचांगफू' किंवा 'हानछाऊशुई' असल्या अजब नांवाने मिळत असतील असे वाटे. त्यामुळे हॉटेलच्या समोरून जातांना ते कितीही खुणावत असले तरी आंत पाय ठेवण्याची इच्छा होत नसे. ताज आणि ओबेरॉयसारख्या मोठ्या हॉटेलांमध्ये सेमिनार, कॉन्फरन्स वगैरेंच्या निमित्याने कधी तरी जाणे होत असे. एकदा चंव तरी घेऊन पहावी म्हणून तिथल्या खाद्यंतीतले चायनीज पदार्थ चाखून पाहिले आणि ते इतके आवडले की पोटभर खाऊन घेतले. त्यांची आवड दिवसेदिवस वाढतच गेली आणि अजून ती टिकून आहे.

धीर चेपल्यानंतर मित्रांच्यासोबत चायनीज हॉटेलांना भेट द्यायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे त्या ठिकाणांचे मेनूकार्ड पूर्णपणे इंग्रजीतच असायचे आणि त्यात आक्षेपार्ह वाटणारा कोणताच जिन्नस दिसत नव्हता. ती हॉटेले जरी चिनी लोकांनी चालवली असली तरी तिथे येणारे सगळे ग्राहक हिंदुस्थानीच होते, त्यामुळे इथले लोक जे खाऊ शकतील असेच पदार्थ तिथे ठेवले जाणार हे उघड होते. यापूर्वी मी शेकडो मक्याची कणसे भाजून आणि तूपमीठ लावून खाल्ली होती, त्यांच्या किसाच्या गोळ्यांचे तळलेले वडे किंवा तो फोडणीला घालून तयार केलेले उपम्यासारखे पदार्थ खाल्ले होते, पण मक्याचे लुसलुशीत कोवळे दाणे वाफवून किती चविष्ट लागतात हे मला माहीत नव्हते. घरात टोमॅटोचे सार कधी केले गेले तर आम्ही जेवणाबरोबरच त्याचे भुरके मारीत असू, पुरणाच्या पोळीच्या सोबतीने कटाची आमटी व्हायचीच आणि आजारी पडल्यावर भाताची पेज प्यायला देत. या सगळ्या पेय पदार्थांना इंग्रजीत 'सूप' म्हणतात आणि पाश्चात्य लोक ते जेवणापूर्वी पितात हे मात्र तेंव्हा माहीत नव्हते. मुंबईला आल्यावर एक दोन वेळा उडप्याकडचे सूप पिऊन पाहिले, पण ते एकादी चटणी किंवा सॉस गरम पाण्यात मिसळून ढवळून दिल्यासारखे लागले, त्यामुळे फारसे पसंत पडले नाही. पण चायनीज पध्दतीचे स्वीट कॉर्न सूप पिऊन मात्र तिथल्या तिथे 'कलिजा खलास झाला'. पुढे मी अनंत प्रकारची 'क्लीअर' आणि 'थिक' सूप्स चाखून पाहिली, त्यात 'लेंटिल', ' तिरंगा', 'लंगफंग', 'क्रॅब' वगैरे प्रकारही आले. पण माझ्या मते तरी ' चिकन कॉर्न सूप' हाच सर्व 'सूप' प्रजातींचा निर्विवाद बादशहा आहे.

मसालेभात, बिर्याणी, पुलाव, खिचडी आदि प्रकारात मोडणारा चायनीज फ्राईड राइस दिसायलाही वेगळा असतो आणि चवीलाही. आपला मसालेभात साहजीकच मसालेदार असणार, हैदराबादी बिर्याणीही चांगली झणझणीत असते, पुलाव थोडा सौम्य असतो आणि मुगाची खिचडी तर 'आजारी स्पेशल' समजली जाते. चांगली शिजलेली पण सुटी सुटी शिते असलेला चायनीज फ्राईड राईस मुळातच चविष्ट पण बेताचा तिखट असतो आणि त्यात आपल्याला हव्या त्या चटण्या व सॉस मिसळून त्याचे पाहिजे तसे संस्करण करता येते. शिवाय त्यासोबत मांचूरियाची ग्रेव्ही असली म्हणजे आहाहा ! ! ! क्या बात है? नूडल्सची गुंतागुंतीची भेंडोळी सोडवावीत का कापावीत या संभ्रमात पडून ती खातांना आधी आधी थोडी पंचाईत होत असे. त्याचे तंत्र जमायला लागल्यानंतर ती आवडायला लागली.

या सगळ्या चायनीज पदार्थात भोपळा मिरची, पातीचे कांदे, फरसबी, गाजर वगैरे एरवी वेगवेगळे खाण्यात येणारे पदार्थ एकत्र असतात आणि त्यातून निराळीच चंव निर्माण होते. कांही पदार्थात बांबूचे कोंब, बेबी कॉर्न, लसणीची हिरवी पाती यासारखे नवखे पदार्थही असतात. मुख्य म्हणजे पुलंच्या भाषेत सांगायचे झाले तर "सर्वात मका" असतो. तो कधी दाण्यांच्या रूपात असेल तर कधी त्याचे मैद्यासारखे गुळगुळीत पीठ ग्रेव्हीला लावलेले असेल किंवा त्या पिठात बुडवून तळलेले गोळे असतील. जोडीला सोया सॉससारख्या वेगळ्या चवी असतात. तेलाचा वापर माफक प्रमाणात केलेला असतो. कदाचित आले आणि लसूण या पाचक गोष्टी
त्यात सढळ हाताने मिसळलेल्या असल्यामुळे ते पदार्थ पचायला हलके पडत असतीलही. निदान अशी समजूत तरी असते. या सगळ्या गुणांमुळे चायनीज खाणे जगभर सगळीकडे दिवसेदिवस लोकप्रिय होत गेले. मुंबईतल्या फोर्टमधल्या खास हॉटेलांतून लवकरच ते उपनगरांमधल्या सर्वसामान्य उपाहारगृहांमध्ये आले आणि आता तर रस्त्यांच्या कडेला असलेल्या वडापावाच्या स्टॉल्समध्ये व हांतगाड्यांवर चायनीज खाद्यपदार्थ मिळू लागले आहेत. अगदी लहान गांवातल्या पत्र्याच्या शेडमधल्या हॉटेलातल्या मेनूकार्डावर चायनीज विभाग असलेले मी पाहिले आहे. 'मॅगी टू मिनिट नूडल्सने' त्यांना घराघरात पोचवले आणि आता जागोजागी
चायनीज पदार्थ करायला शिकवणारे क्लासेसही दिसतात. सगळेच खाद्यजग असे 'चायनीजमय' झाले असल्यामुळे निष्णात किंवा शिष्ट खवय्ये लोक आता 'थाई' आणि 'मेक्सिकन' 'क्युझिन'चे कौतुक करू लागले आहेत.

पण आपल्या भारतीय हॉटेलात मिळणा-या चायनीज पदार्थांचे बरेचसे भारतीयीकरण झालेले असते. त्यातल्या जिरे, मिरे, लवंग, वेलदोडे, कोथिंबीर, पुदिना वगैरे मसाल्यांचा चंवी ओळखून येतात आणि लोकांना त्या आवडतात. चीनला जाण्याची संधी कांही मला मिळाली नाही, पण पश्चिमेकडे मात्र बहुतेक ठिकाणच्या चायनीज हॉटेलांत चिनी वंशाचे वाटणारे नकटे चपटे लोकच काम करतांना दिसतात. आता सगळीकडे 'इंडियन फूड' सुध्दा मिळते, पण त्याच्या खानावळी एकाद्या गल्लीबोळात आडबाजूला असतात. चायनीज रेस्तराँ मात्र शहरांच्या मध्यवर्ती भागांत मोक्याच्या नाक्यांवर झोकाने विराजमान दिसतात. तिथे मिळणा-या अन्नाची चंव वेगळीच असते. आपण जन्मात कधी न पाहिलेली पाने, फुले आणि बिया व त्यांचे अर्क त्यात घातलेले असतात. त्यातल्या भाज्या आणि मांसाचे तुकडे व्हिनेगारसारख्या द्रवात भिजवून ठेवत असतील. एकादा पदार्थ खाल्ल्यानंतर नक्की त्यात काय होते ते ओळखण्याएवढा मी त्यातला तज्ञ नाही, पण पूर्वी खाल्लेल्या पदार्थापेक्षा त्यात कांही तरी वेगळे असे आहे इतपत समजून येते. या आगळ्या चंवी कधी खूप आवडतात तर कधी नाही. पण मिळमिळीत कॉंटिनेंटल पदार्थांपेक्षा त्या नक्कीच उजव्या असतात.

मौजमजालेख

प्रतिक्रिया

प्राजु's picture

19 Aug 2008 - 12:26 am | प्राजु

छान लिहिले आहे. मुख्य म्हणजे मलाही चायनीज फुड खूप आवडते. हक्का नुडल्स, हॉट न सोर सूप, शेजवान राईस, शेजवान नुडल्स, मंच्युरियन.. खूप आवडते.
हा लेख वाचला आणि लवकरात लवकर चायनीज जेवण खाण्याची इच्छा झाली.
अभिनंदन. मस्त लेख.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चकली's picture

19 Aug 2008 - 2:30 am | चकली

लेख आवडला.
चकली
http://chakali.blogspot.com

मुशाफिर's picture

19 Aug 2008 - 2:46 am | मुशाफिर

आनंदघन,
हा लेख वाचून लवकरात लवकर चायनिज खायला माझी रसना चाळवली आहे. :)

>>हक्का नुडल्स, हॉट न सोर सूप, शेजवान राईस, शेजवान नुडल्स, मंच्युरियन..
प्राजु, वेगवेगळ्या चायनिज पदार्थान्ची आठवण करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

(चायनिज खाद्यपदार्थान्चा शौकिन)
मुशाफिर

ईश्वरी's picture

19 Aug 2008 - 6:29 am | ईश्वरी

चायनीज खाद्यसफर छान घडवलीत. धन्यवाद.
ईश्वरी

अनिल हटेला's picture

19 Aug 2008 - 7:54 am | अनिल हटेला

आनंदघन !!

छान लिहीलये ...

भारतात असताना मी देखील २-३ वेळा चायनीज फूड खाललये ...

पण चायना मध्ये आल्यावर कळाल की जे भारतात मिळते ते भारतीय पद्धतीच चायनीज असते...

कारण इकडे सीटी बदलली तरी थोडासा पदार्थाचा लूक बदलतो...

म्हणजे नाव तेच असत् आणी मटेरियल सुद्धा तेच,

पन थोड बनवण्यात चेंज...

असो...

चीन मध्ये येउन फक्त आपल्याला सूट होइन तेच खातोये..

पर्‍सनली सिचुअन फूड मला आवडत.
कारण आपण जस कोल्हापूरी झटका म्हणतो.
तसा हा मस्त स्पायसी फूड असत...

असो.....

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसोबा खेचर's picture

19 Aug 2008 - 2:47 pm | विसोबा खेचर

लिहिलंय छान, मलाही कधी कधी चिनी खाणं आवडत! :)

आनंद घारे's picture

19 Aug 2008 - 4:50 pm | आनंद घारे

या लेखासाठी तयार केलेले हे चित्र पहा.
chiinese hotel and food