तुमच्या उष्ट्यासाठी आलो...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Aug 2008 - 6:36 pm

राम राम मंडळी,

आपल्या अभिजात संगीताच्या दुनियेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्यसाधारण महत्व आहे. किंबहुना ह्या परंपरेशिवाय हे संगीत सुरूच होत नाही, त्याची अभिव्यक्ति केवळ अशक्य आहे.

स्वर, लय, ताल, राग, गायकी, ह्या सगळ्या गोष्टी गुरूकडूनच शिकायला मिळतात, शिकायच्या असतात. गुरुकडे गाण्याची तालीम घेत असताना/घेतल्यावर गुरुचं बोट धरून शिष्यही ह़ळूहळू गाऊ लागतो, गाता होतो. पण गुरुकडून काय शिकायचं असतं बरं?

गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते. उदाहरणार्थ, यमन राग कसा आहे, त्याचं जाणंयेणं कसं आहे, हे गुरू शिकवतो. थोडक्यात सांगायचं तर तो यमन रागाची वाट दाखवतो. 'बाबारे, हे स्वर असे आहेत, असा असा, या या वाटेने पुढे जा, अमूक स्वरावली अशी आहे, तमूक तशी आहे!' रागाच्या या सगळ्या खाणाखुणा, बारकावे, हमरस्ते अन् पाऊलवाटा सगळं काही गुरू दाखवत असतो. परंतु एकदा गुरूकडून या सगळ्याची रीतसर तालीम घेतल्यावर मात्र शिष्याला त्या वाटेवरून एकट्यालाच जायचं असतं/जावं लागतं. गुरूकडून मिळालेल्या तालमीमुळे, गाण्याच्या सततच्या चिंतन-मननामुळे, केलेल्या रियाजामुळे, गुरुने दाखवलेल्या त्या यमनच्या वाटेवरून शिष्य जाऊ लागतो, परंतु त्याचसोबत त्याच वाटेवर राहून स्वत:ची अशी एक वेगळी अभिव्यक्ति तो करू लागतो, स्वत:चे विचार मांडू लागतो, स्वत:चं गाणं गाऊ लागतो!

एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्‍या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!

एखादा गवई (आता आपण शिष्य हा स्वत:च एक गवई झाला आहे असं समजून पुढे जाऊया! :) ) स्वत:च्या गाण्याची अभिव्यक्ति करत असतांना, मध्येच त्याच्या गायकीत - त्याच्या गुरूच्या गायकीची, त्याच्या घराण्याच्या गायकीची आणि घराण्यातील इतर पूर्वजांच्या जागांची (ज्या त्याला त्याच्या गुरुनेच दाखवलेल्या असतात!) आणि त्याने केलेल्या, आपल्या गुरुसमान असणार्‍या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे! मी याला गाण्यातली बहुश्रुतता म्हणेन! आणि मला असं वाटतं की कुठल्याही उत्तम गवयाकडे अशी बहुश्रुतता हवी तरच त्याचं गाणं हे अधिकाधिक समृद्ध होत जातं, समृद्धतेकडे वाटचाल करू लागतं!

याची अनेक म्हणजे अनेक उदाहरणे देता येतील. कुमार गंधर्व! वास्तविक स्वत: एक अत्यंत प्रतिभावन कलावंत. स्वत:च्या वाटेनं जाणारा, स्वत:चं असं एक वेगळं गाणं निर्माण करणारा! परंतु त्यांच्यावरही नारायणराव बालगंधर्वांचा इतका प्रभाव पडला की त्यांनाही कुठेतरी नायारणरावांचं गाणं लोकांना उलगडून दाखवावंसं वाटलं! आणि त्यांनी 'मला उमजलेले बालगंधर्व' या नावाचा एक कार्यक्रमच केला, त्याची ध्वनिफीतही काढली. पण म्हणजे त्यांनी बालगंधर्वांची नक्कल केली का हो? नक्कीच नाही!

बाबूजींचंही उदाहरण देता येईल. त्यांच्या गायकीमध्येही हिराबाई, बालगंधर्व यांचा खूप प्रभाव होता.

मंडळी, आजपर्यंतच्या आयुष्यात मला अनेक दिग्गजांच्या जाहीर तसेच खाजगी मैफली ऐकण्याचा अगदी भरपूर योग आला. कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!

आमच्या भीमण्णांचंही उदाहरण देता येईल. खरंच किती बहुश्रुत आहे अण्णांचं गाणं! सवाईगंधर्वांची तालीम असल्यामुळे त्यांची गायकी तर अण्णांच्या गाण्यात पुरेपूर दिसतेच! सवाईगंधर्वांना आवाजाचा बर्‍याचदा त्रास व्हायचा, कित्येकदा त्यांचा आवाज लागायला वेळ लागायचा. त्यामुळे कदाचित दर मैफलीत आवाजाच्या त्रासामुळे त्यांना जे गाणं दाखवायचं असेल ते गाणं ते दाखवू शकतच असत असं नव्हे! या मुद्द्यावर भाईकाका एकदा असं म्हणाले होते की सवाईंचं गाणं हे खर्‍या अर्थाने भीमसेननेच जगाला दाखवलं, जगापुढे उत्तमरित्या मांडलं!

पण मंडळी, सवाईंचं उदाहरण एक वेळ सोडून द्या, कारण ते तर अण्णांचे प्रत्यक्ष गुरूच होते. परंतु अण्णांच्या गाण्यात किराणा घराण्याचे प्रमूख असलेल्या खुद्द करीमखासाहेबांच्याच गाण्याची इतकी सुंदर सावली दिसते की क्या केहेने! अण्णा गातांना मध्येच कधी पटकन खासाहेबांची एखादी जागा घेतील, खास त्यांच्या ष्टाईलने एखादा सूर ठेवतील की केवळ लाजवाब! आणि हे सगळं अण्णांना मुद्दामून करावं लागत नाही तर या गोष्टी अगदी नकळतपणे आणि तेवढ्याच सहजतेने त्यांच्या गायकीत उतरल्या आहेत. कधी केसरबाईंच्या आवाजाची चांदीच्या बंद्या रुपायासारखी खणखणीत नादमयता अण्णांच्या गाण्यात दिसते, त्यांच्या तानांचे अनेक उत्तमोत्तम पॅटर्नस् अण्णांच्या गायकीत अगदी एकरूप झालेले दिसतात, तर कधी आमिरखासाहेबांसारख्या गवयांचे गवई असलेल्या दिग्गजाच्या आलपीतली गहनता अगदी अवचितपणे अण्णांच्या गाण्यात डोकावते, कधी बडेगुलामअली खासाहेबांच्या अत्यंत लोचदार आलापीला अण्णा सहज स्पर्श करतात, तर कधी एखाद्या अभंगात नारायणराव बालगंधर्वांची एखादी जीवघेणी सुरावट किंवा एखादी झरझर लडिवाळ तान त्यांच्या गाण्यात उतरते! आणि एवढं सगळं करूनदेखील आज अण्णांचं गाणं हे स्वतंत्र आहे, जगाला त्यांच्या स्वत:च्या गाण्याची अशी एक ओळख आहे! मंडळी, मी गाण्यातली बहुश्रुतता म्हणतो ती हीच! अण्णाच नेहमी असं म्हणतात की एखाद्याची नक्कल करणं खूप सोप्प आहे परंतु त्या नकलेचं अस्सलमध्ये रुपांतर करून ते स्वत:च्या गाण्यात समर्थपणे मांडणं मुश्कील आहे!

मंडळी, असाच एकदा अण्णांशी दोन घटका बोलत होतो. माझ्या सुदैवाने अण्णांचाही मूड होता आणि गाण्यातील बहुश्रुतता हा विषय निघाला. मी सहजच त्यांना म्हटलं की "अण्णा, नारायण बालगंधर्वांची गायकी आपल्या अभंगात फार सुंदरतेने दिसते, तर शुद्धकल्याणात करीमखासाहेबांची काही वेळेला अगदी सहीसही याद येते!"

त्यावर अण्णा हसून परंतु विनम्रपणाने इतकंच म्हणाले,

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!"

-- तात्या अभ्यंकर.

संगीतवाङ्मयशिक्षणविचारप्रतिभा

प्रतिक्रिया

प्राजु's picture

13 Aug 2008 - 6:43 pm | प्राजु

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!"

धन्य ते स्वर भास्कर!!
तुम्ही बहुशृतता छान समजावून सांगितली आहे. लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Aug 2008 - 7:01 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

खूप मस्त लिहिलं आहेत तात्या!

आणि शेवटचं भीमसेनांचं वाक्य सगळा लेख सामावून टाकतं.

(गाण्यातलं फारसं न कळणारी) यमी

राघव१'s picture

14 Aug 2008 - 8:17 pm | राघव१

म्हणतो तात्या. सुरेख लेख.
फळांनी डवरलेले झाड आणखी खाली वाकते हे पटले. :)

राघव

आनंदयात्री's picture

13 Aug 2008 - 6:45 pm | आनंदयात्री

वा ! अगदी रंगुन गेलो लेख वाचतांना, उदाहरणे-प्रसंग छान, आवडला सकस लेख. सकस म्हटलो कारण शिकायला मिळाले, गाणे कसे शिकतात/शिकले जाते ते समजले.
धन्यवाद.

मनस्वी's picture

19 Aug 2008 - 6:46 pm | मनस्वी

वा ! अगदी रंगुन गेलो लेख वाचतांना, उदाहरणे-प्रसंग छान
गाणे कसे शिकतात/शिकले जाते ते समजले.

मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Aug 2008 - 7:12 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर...

भिमसेनजींची विनम्रता खरंच भावली. आणि माझी खात्री आहे की ही भावना त्यांच्यात खरंच आतपासून असणार. उगाच ४ लोकात बोलायला नव्हे.

अवांतर: निवृत्तिबुवा आमच्या गोरेगावचे, त्यांचा नातू माझ्या वर्गात. ते बहुतेक कलकत्त्याला असायचे. कधी कधी मुंबईला घरी यायचे. आम्हाला काय कळतंय कोण निवृत्तिबुवा आणि त्यांची योग्यता. वयाने तसे बरेच थकलेले होते ते. इतके साधे पणाने राहत असत. त्यांच्या घरी कधी गेलो तर त्यांचं अस्तित्व जाणवत सुद्धा नसे. कोपर्‍यातला एक तंबोरा मात्र जाणवून द्यायचा की इथे कोणालातरी गाण्याची आवड असावी. बास एवढेच. आमचा मित्र पण थोर. फक्त असं सांगायचा, 'हे माझे आजोबा, कलकत्त्याला असतात, गाणं शिकवतात' :)

नंतर पुढे गाण्यात थोडीफार आवड निर्माण झाल्यावर कळलं की आपण केवढ्या मोठ्या माणसाच्या जवळ जाऊ शकलो असतो. :(

बिपिन.

सखाराम बाइंडर's picture

13 Aug 2008 - 6:58 pm | सखाराम बाइंडर

तात्या

लेख आवडला

सर्किट (पुर्वीचा खरा डॉन)

साती's picture

13 Aug 2008 - 7:05 pm | साती

मला गाण्यातलं फार काही कळत नसलं तरी लेख आवडला.
साती

चकली's picture

13 Aug 2008 - 7:07 pm | चकली

तात्या,

लेख आवडला. छान.

चकली
http://chakali.blogspot.com

नंदा प्रधान's picture

13 Aug 2008 - 7:25 pm | नंदा प्रधान

काय तात्या?

ह्या खेपेला मिपावरील गढूळ वातावरण निवळायला एखादे व्यक्तिचित्र टाकणार नाही ह्याची खात्री होती.. ;-)

चला ह्याखेपेला अभिजात संगीताचे दळणच सही!...

ह.घ्या बरंका?

लेख आवडला हे सांनल!

-नंदा प्रधान

चतुरंग's picture

13 Aug 2008 - 7:34 pm | चतुरंग

शीर्षकावरुन आधी वाटले 'जोहार मायबाप जोहार' ह्या नाट्यगीतावरच लेख आहे की काय?

(अवांतर - सौ. आशाताई खाडिलकरांनी म्हटलेलं नाट्यगीत (भैरवी?) मी फार वर्षांपूर्वी नगरला ऐकल्याचे स्मरते त्यावेळी आर्त स्वरांनी डोळ्यातून पाणी आलेले आठवते! मला जालावर हे गाणे मिळाले नाही कुणाला मिळाले तर जरुर इथे दुवा द्या! पुन्हा ऐकावेसे वाटते आहे.)

चतुरंग

विजुभाऊ's picture

13 Aug 2008 - 7:57 pm | विजुभाऊ

भारतीय संगीत हे मुख्यतः ऐकुनच त्यात वेगळेवेगळे प्रयोग करत सम्पन्न झालेले आहे.
पास्चात्य संगीतासारखे त्यात लेखी नोट्स वगैरे प्रयो अगदी अलीकडचे. बहुतेक गवयी त्यांच्यावर बहुश्रुततेमुळे मोठे झाले.
कुमार आणि वसन्तराव ही अशीच दोन उदाहरणे.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

लिखाळ's picture

13 Aug 2008 - 8:04 pm | लिखाळ

तात्या,
लेख आवडला.
--लिखाळ.

संदीप चित्रे's picture

13 Aug 2008 - 8:15 pm | संदीप चित्रे

तात्या ...
गाण्याबद्दल तुझा लेख असला की अधाशासारखा आधी वाचून काढतो :)
अजून एका सुरेल लेखाबद्दल धन्यवाद :)
------
ता. क. आज तर पापलेटचा फोटो चढवून तू नजरही तृप्त केलीस -- त्याचे धन्यवाद वेगळेच :)

ऋषिकेश's picture

13 Aug 2008 - 10:38 pm | ऋषिकेश

गाण्याबद्दल तुझा लेख असला की अधाशासारखा आधी वाचून काढतो

+१
तात्या, लेख आवडला
-('मिसळ'लेला) ऋषिकेश

पिवळा डांबिस's picture

13 Aug 2008 - 10:10 pm | पिवळा डांबिस

तात्या, उत्तम लेख!
गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.
अगदी खरं आहे. आणि हे गाण्यातच नव्हे तर सगळ्या कलांमध्ये, मी तर त्याहीपुढं जाऊन म्हणेन की सगळ्याच व्यवसायांमध्ये लागू पडतं. जेंव्हा आपल्या आईच्या हाताखाली मराठी स्वयंपाक शिकणारी मुलगी जेंव्हा नंतर सुगरण होऊन पंजाबी आणि बंगाली पाककृती (ज्या खुद्द आईलाही येत नव्हत्या!) यशस्वीपणे करू लागते तेंव्हा त्या आईलाही धन्यता वाटतेच!
"शिष्यादिच्छेत पराजयम्" यासारखं दुसरं सुख कोणतं!

स्वाती दिनेश's picture

14 Aug 2008 - 12:54 pm | स्वाती दिनेश

गुरूकडून गाण्याकडे बघण्याची जी एक नजर असावी लागते ती नजर शिकायची असते, गायकी शिकायची असते. गायकी कशात आहे, कुठे आहे, हे गुरूच शिकवतो. परंतु पुढची वाटचाल मात्र शिष्याला स्वत:च करायची असते.
अगदी खरं आहे. आणि हे गाण्यातच नव्हे तर सगळ्या कलांमध्ये, मी तर त्याहीपुढं जाऊन म्हणेन की सगळ्याच व्यवसायांमध्ये लागू पडतं
असेच माझ्याही मनात आले,सुलेशबाबूंसारखेच.
लेख आवडला हे वेसांनल.
स्वाती

सहज's picture

13 Aug 2008 - 10:15 pm | सहज

पंडितजींचे शेवटचे वाक्य भारी.

अवांतर - हिंदुस्तानी अभिजात संगीतातील सर्वधर्मसमभावाला सलाम

धनंजय's picture

13 Aug 2008 - 10:29 pm | धनंजय

साखरभाताचे उष्टे - वा!

प्रियाली's picture

13 Aug 2008 - 11:45 pm | प्रियाली

दोन्ही वाक्यांशी सहमत

बेसनलाडू's picture

14 Aug 2008 - 9:01 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

यशोधरा's picture

13 Aug 2008 - 10:44 pm | यशोधरा

सुरेख लेख तात्या.

सर्किट_कार्यरत's picture

13 Aug 2008 - 11:55 pm | सर्किट_कार्यरत (not verified)

"अरे त्यात माझं कसलं रे कौतुक? पूर्वीच्या लोकांनीच इतकं भरपूर गाणं करून ठेवलंय की तेच आम्हाला आजपर्यंत पुरतं आहे. आम्ही त्यांचंच उष्ट खातो रे! हो, पण ते उष्ट म्हणजे उकिरड्यावरच्या पत्रावळीवरचं शिळं उष्ट नव्हे बरं का! ते उष्ट आहे चांदीच्या ताटातल्या बदामाच्या शिर्‍याचं, साखरभाताचं! आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!"

क्या बात है !

असे कण वेचणे म्हणजे परप्रकाशित असण्याचे लक्षण नाही, हे आमचे सुरुवातीपासूनचे म्हणणे आहे.

हेच आपण उदाहरणे देऊन स्पष्ट केले आहे.

सुंदर !

- (खरा) सर्किट

मुक्तसुनीत's picture

14 Aug 2008 - 12:09 am | मुक्तसुनीत

+ १ !

शितल's picture

14 Aug 2008 - 2:34 am | शितल

तात्या,
पुन्हा एकदा गाण्याच्या लेखावरची सुंदर मेजवाणी दिलीत. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Aug 2008 - 7:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तात्या,
लेख आवडला. साखरभाताच्या ओळी तर अप्रतिम....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकलव्य's picture

14 Aug 2008 - 7:56 am | एकलव्य

अंगठाबहाद्दर

डॉ.प्रसाद दाढे's picture

14 Aug 2008 - 9:12 am | डॉ.प्रसाद दाढे

खूप छान तात्या

मनीषा's picture

14 Aug 2008 - 11:10 am | मनीषा

"एखादा उत्तम शिष्य हा स्वत:च्या गुरूने दिलेल्या तालमीसोबतच इतरही अनेक जणांकडून, त्यांची गायकी ऐकून त्यातल्या चांगल्या गोष्टी उचलत असतो, अक्षरश: वेचत असतो. आपल्या गुरुची गायकी तर तो शिकत असतोच, त्याबद्दल काही वादच नाही, परंतु आपल्या गुरुसमान असणार्‍या इतरही अनेक दिग्गजांचं गाणं, त्यातली सौंदर्यस्थऴं तो टिपत असतो. आणि या सगळ्याच्या परिपाकातूनच एक चांगला, तैय्यार आणि खानदानी गवई तयार होत असतो, होतो!"

---आपल्या गुरुसमान असणार्‍या इतर दिग्गजांच्या गायकीच्या सततच्या चिंतन-मननाची, अभ्यासाची एक छानशी सावली पडते! मंडळी, माझ्या मते ही सावली म्हणजेच कलेची एक अत्यंत उच्च, प्रतिभावान अशी अभिव्यक्ति आहे. मंडळी, ही नक्कल नव्हे, नक्कीच नव्हे!

अगदी योग्य !!

भारतीय संगीतातील अनेक वैशिष्ठ्यांपैकी एक म्हणजे गुरु-शिष्य परंपरा ..त्यावर नेमके भाष्य केले आहे. खुप छान लिहिले आहे..

(बहुश्रुतता ह शब्द बहुशृतता असा लिहायला पाहिजे असे मला वाटते)

नंदन's picture

14 Aug 2008 - 1:22 pm | नंदन
शिंगाड्या's picture

14 Aug 2008 - 1:58 pm | शिंगाड्या

निरक्षीरविवेकबुध्दी असणारे , पाण्यातुन दुध वेगळ करनारे राजहंसीय व्यक्तीमत्व...
मोतिदार लेख...

धमाल मुलगा's picture

14 Aug 2008 - 3:51 pm | धमाल मुलगा

मस्त वाटलं वाचायला!

कित्येकदा गवई गाता गाता रंगात येऊन, मध्येच एखादी छानशी जागा, सुरावट त्याच्या गायकीत घेऊन मोठ्या कौतुकाने, "हे निवृत्तीबुवांचं बरं का!, हे करिमखासाहेबांचं बरं का!, हे अमक्याचं बरं का!, हे तमक्याचं बरं का!" असं चक्क भर मैफलीमध्येच बोलताना मी ऐकलं आहे. म्हणजे तो गवई निवृत्तीबुवांची किंवा करीखासाहेबांची नक्कल करत असतो का हो? नाही! मी मगाशी 'गाण्यातली बहुश्रुतता' हे जे शब्द वापरले ना, तीच ही बहुश्रुतता!

अगदी अगदी!!!
अर्थात हा अनुभव मला रागदारीच्या मैफिलीत (कधी न गेल्याने) आलेला नसला, तरी गुलाम अलींची ही खास सवय आहे. ती ठाऊक आहे :) एकेक शेर असा असा घोळवतात....सुभान्नल्लाह!

....आम्ही जे काही कण वेचले ते त्या बदामाच्या शिर्‍याचे अन् साखरभाताचेच!"

ग्रेट! साक्षात स्वरभास्कराने असं म्हणावं? ज्याच्याकडे पाहुन ही दुनिया शिकते त्यांनी इतकं विनम्र असावं? क्या बात है!

तात्या हा ही लेख आवडलाच, हे वे.सा.न.ल. :)

मदनबाण's picture

14 Aug 2008 - 6:12 pm | मदनबाण

फारच सुंदर लिहले आहे तुम्ही तात्या..

मदनबाण.....

"First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda

कलंत्री's picture

15 Aug 2008 - 6:17 pm | कलंत्री

तात्या,

असा लेख मराठी वर्तमानपत्रात यायला हवा. आपले काही विचार मूळ म्हणजे काय याची जाणीव करुन देतात.

कृपया विचार करावा.

आपला,

द्वारकानाथ

विसोबा खेचर's picture

18 Aug 2008 - 8:25 am | विसोबा खेचर

प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचकवरांचे मनापासून आभार...

आपला,
(कृतज्ञ) तात्या.

सोम्या गोम्या कापसे's picture

19 Aug 2008 - 6:39 pm | सोम्या गोम्या कापसे

खरं सांगायचं तर आता अश्या लेखनाचा कंटाळा आला आहे. (|: सदर लेखन काही ठिकाणी ठीक व टाईमपास वाटले परंतु बर्‍याच ठिकाणी कंटाळवाणेही वाटले. #o

प्रामाणिक मत, राग नसावा..

सोम्या.