हायकू

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
16 Oct 2014 - 10:58 am

हायकू : मराठीत न रुजलेला

एवढी आवडते जपानी हायकू,
तर कशाला केलीत मराठी बायकू ?

महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार आवडीने हाताळलाच नाही. असे का झाले ?

मला वाटते याला दोन गोष्टी कारणीभूत असाव्यात. पहिली म्हणजे हायकूची जन्मभूमी जपान. जपानी भाषा आपल्याला पूर्णपणे अपरिचित. म्हणजे आपण हायकू वाचणार ते मूल(original) नाहीत, त्यांची इंग्रजी भाषांतरे. जपानी नियम पहिल्यांदीच तोडफोड होऊन समोर येणार व या भ्रष्ट रूपावरून आपण मराठीत प्रयत्न करणार.तुम्ही म्हणाल, गझलबद्दलही हा आक्षेप घेता येईल पण ते तेवढे खरे नाही. मराठी हिंदी या भाषाभगिनी आहेत व उर्दूतील फारशी-अरेबिक शब्द सोडले तर उर्दू-हिंदीच्या साम्यामुळे बाकी मोठा भाग आपल्या आवाक्यातला असतो. हिंदी सिनेमाही आपणाला गझल समजण्यास मदत करतो. इतिहासात आपण बरेच फारसी शब्दही आपल्या मराठीत सामावून घेतले आहेत. या सगळ्याचा गझल आत्मसात करण्यास मोठा हातभार लागला. हायकूबाबत तसे झाले नाही. भाषेची अनभिज्ञता एक मोठा अडसरच ठरला.

दुसरे मह्त्वाचे कारण म्हणजे हायकूचे तांत्रिक अंग.जपानी भाषा उच्चारनुसारी असल्याने नियम त्यानुसार बांधले गेले. संपूर्ण हायकू तीन ओळींचा एवढी माहिती सर्वांना असते.पण या तीन ओळीही, (अक्षरवृत्तातील गणांप्रमाणे) तीन ओळीत उच्चारांचे गट पाडून,५ ,७ ,५ अश्या असाव्यात व यमक पहिल्या-दुसर्‍या किंवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत असावे. अल्पाक्षरत्व ही महत्वाची अडचण आहे. जे काही सांगावयाचे ते इतक्या थोड्या जागेत बसवावयाचे आहे की कवीला बर्‍याच विषयांना रजा द्यावी लागते. माझे प्रेयसीवरील प्रेम यावर काही सांगावयाला हायकू हा काव्यप्रकार सोयिस्कर नाही. (असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते !). अर्थात हे सर्व भाषांनाच लागू पडते, अगदी जपानीलाही, म्हणून आणखीन एक बंधन घतले गेले. हायकू हे सरळ व साधे विधान असले पाहिजे. तीन ओळी एका विधानाला पुरेशा व्हावयास पाहिजेत. त्याचबरोबर अचूक शब्दांची निवड अनिवार्य होते. परत या तीन ओळी स्वतंत्र पंक्ती नकोत. एका अनुभवाच्या रचनेकरता केलेली ती एक विभागणी आहे.

हे झाले तंत्र. त्यावर प्रभुत्व मिळवणे एक वेळ सोपे होईल पण पुढचा भाग हा अवघड आहे. हायकू हे वाङ्मयीन चित्र असले पाहिजे. चित्रकार चित्र काढतांना रंगाचा उपयोग करतो, काही जागा मोकळ्या सोडतो व त्याच्या मनांत उमटलेले भाव तुमच्यासमोर उभे करावयाचा प्रयत्न करतो. प्रेक्षक रंगसंगती, रेखा, मोकळी जागा सर्वांचा एकत्र विचार करून चित्रकाराच्या भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करता. तसे हायकू वाचतांना व्हावयास पाहिजे. चित्र म्हणजे सिनेमा नव्हे तसेच हायकू म्हणजे काव्य नव्हे, कादंबरी नव्हे. एक क्षण, त्यावेळचे चित्र व त्यामुळे कवीच्या मनात उमटलेल्या उर्मी, या सर्वांना तीन ओळीत बंदिस्त करावयाचे आहे. लक्षात घ्या, एक चित्र असलेच पाहिजे, नुसत्या तरल भावना उपयोगाच्या नाहीत. अवघड आहे, नाही ? मला वाटते एखादे छायाचित्र हा परिणाम घडवून आणण्यास जास्त सफल होऊं शकते. मिपावरील काही छायाचित्रे आठवून पहा. पु.शि.रेग्यांच्या कविता, त्या हायकू नव्हेत, या कल्पनेच्या जवळ पोचतात.

मराठीत हायकूची, किंवा जास्त बरोबर म्हणजे हायकूसदृष, रचना करावयाची असेल तर तंत्राची बंधने ढिली केलीच पाहिजेत. तीन ओळी ठेवा. ५,७,५ वगैरे सोडून द्या. वृत्ती जोपासा, तंत्र मुरडून वापरा.आज काही उदाहरणे देत आहे. आपल्या वाचनातील दिलीत तर सगळ्यांनाच आनंद मिळेल.

(१) समुद्र दूर गेलेला
किनार्‍यावरचे पक्षी स्तब्ध
नको या वेळी एकही शब्द
शिरीष पै

(२) सुकत सुकत पिवळं पान
फांदीवरून खाली गळलं
एका फुलाला सारं कळलं
शिरीष पै

(३) तारेवरील फाटका पतंग
वार्‍यावर फडफडणारा
मी.. आतल्या आत तडफडणारा

(४) सकाळच्या कोवळ्या उन्हात
लाजरी कळी उमलणारी
एक आठवण जागवणारी

पुढच्या भागात शिरीष पै यांनी काही जपानी हायकूंची केलेली भाषांतरे

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

खटपट्या's picture

16 Oct 2014 - 11:19 am | खटपट्या

खूप चांगल्या विषयावरचा
हा खूप चांगला लेख
आता मी घेतो एक पेग

अमित खोजे's picture

16 Oct 2014 - 8:45 pm | अमित खोजे

*lol*

कवितानागेश's picture

16 Oct 2014 - 11:40 am | कवितानागेश

अत्यन्त आवडता काव्यप्रकार.

बोका-ए-आझम's picture

16 Oct 2014 - 12:06 pm | बोका-ए-आझम

पुलंनीही काही विडंबनात्मक हायकू लिहिले आहेत, उदाहरणार्थ
हायकूसान हायकूसान
काय तुझी जादू
धावू लागले तुझ्यामागे बंडू, पांडू, म्हादू!

मार्मिक गोडसे's picture

16 Oct 2014 - 12:52 pm | मार्मिक गोडसे

दाट गवतात केव्हापासून घुसलेल्या
फुलपाखराची चिमुकल्या
काळजी वाटते बाई मला.

उडता उडता फुलपाखरू
उंच उडत गेले
निळ्या नभात कुठं हरवलं.
शिरीष पै.

सरळसपाट माळावर सूर्यकिरण चमकले
बिचार्‍या निराधार धुक्याने
हात डोंगराच्या गळ्यात घातले.
ऋचा गोडबोले.

एस's picture

16 Oct 2014 - 12:55 pm | एस

आवडता प्रकार. या विषयावर आधी काही धागे येऊन गेले आहेत. त्यामुळेच हायकू आणि साकुरा यामधील फरक कळाला. तुम्हीही फार छान भर घालाल याची खात्री आहे! पुभाप्र!

एस's picture

16 Oct 2014 - 7:25 pm | एस

मात्सुओ बाशो यांच्या हायकूंबद्दलही लिहा.

माम्लेदारचा पन्खा's picture

16 Oct 2014 - 12:59 pm | माम्लेदारचा पन्खा

जगाचा अफाट पसारा
कसा चालत राहिलाय
नियंता कुणी पाहिलाय ?

अत्रुप्त आत्मा's picture

16 Oct 2014 - 1:58 pm | अत्रुप्त आत्मा

अतिशय सुंदर हायकू ओळख. :)

या निमित्ताने लोकरंग मधे आलेली एक हायकू-विडंबना आठवली . दोन कवियत्रींनी समोरील श्रोत्यांना वीट आणलेला असतो.. बराच वेळ त्यांच "संपतच" नसतं!
तेव्हढ्यात खालून एक जण आवाज टाकतो.

डावीकड़े एक बाई
उजवीकडे एक बाई
मधे कुणीच नाही!

विजुभाऊ's picture

16 Oct 2014 - 2:04 pm | विजुभाऊ

एक व्यक्तीमत्व
बारामतीहून आलं
अर्थ विश्व व्यापून राहीलं

विजुभाऊ's picture

16 Oct 2014 - 2:07 pm | विजुभाऊ

दारू सिग्रेट आणि
फुटाण्याचा चखणा
पृथ्वीचा गोल उलटा फिरला

इरसाल's picture

16 Oct 2014 - 2:37 pm | इरसाल

अगणित अविरत भसाभसा
पडताहेत मिपावर जिलब्या
तांब्या पाहिलाय कुणी ?

(हे सध्या असलेल्या मिपाच्या वाता-वरणावर आमचे ताजे भाष्य)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Oct 2014 - 2:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायकुची ओळख आवडली. आणि-

असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते !

हे तर लैच आवडलं. :)

-दिलीप बिरुटे

मितान's picture

16 Oct 2014 - 7:54 pm | मितान

खूप चांगली ओळख करून दिलीत या काव्यप्रकाराची.

मराठीत शिरीष पै यांची हायकू आणि पुन्हा हायकू नावाची दोन पुस्तकं आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी वाचली होती. एकेक हायकू वाचून थरारून गेले होते एवढंच आठवतंय. ते अनुवाद होते की त्यांच्या स्वतःच्या हायकू ते ही आठवत नाही. गेली ४ वर्षं प्रत्येक पुस्तकप्रदर्शनात ती पुस्तकं शोधतेय. पण सापडत नाहीत :(

दिपोटी's picture

17 Oct 2014 - 5:04 am | दिपोटी

येथे ('रसिक साहित्य'च्या वेबसाईटवर) कदाचित मिळून जाईल ...

http://erasik.com/books/MARATHI/information/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%...

- दिपोटी

पैसा's picture

16 Oct 2014 - 8:02 pm | पैसा

छान ओळख करून दिलीत. तीन ओळीचं संपूर्ण काव्य इतकंच आतापर्यंत माहीत होतं.

अजया's picture

16 Oct 2014 - 8:03 pm | अजया

शिरीष पैंची पुस्तकं वाचल्यानंतर फार दिवसांनी हायकुबाबत वाचण्यात आलं.तांत्रिक अंगाबद्दल मात्र आत्ताच वाचते आहे.छान लिहिलंय तुम्ही सोपं करुन! इतकं की एखादी हायकु पाडुन पहाविशी वाटायला लागलं आहे!

शरद's picture

16 Oct 2014 - 9:15 pm | शरद

मात्र ती येथे पाठवा लगेच पाठवा
शरद

अजया's picture

17 Oct 2014 - 8:17 am | अजया

एक कळी
मुकी खुडलेली
पायाखाली चिरडलेली..

लाट विरलेली
उधाण सरलेलं
रितं आभाळ उरलेलं..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2014 - 8:28 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हायकुत सुरुवातीच्या दोन ओळीत प्रास्ताविक तर तिसर्‍या ओळीत अनपेक्षित कलाटणी मिळाली पाहिजे असे वाटते.
म्हणजे मग त्या हायकुत मजा येते.

तसं काहीच झालं नाही
आठवणींचा पांढरा ढग आला.

सरकत सरकत निघून गेला.

किंवा.

झाडाखालच्या आठवणींनी
मनात प्रवेश केला अन

झाडावरचा कावळा घान करुन गेला.

असं या टाईपचं असं वाटतं.

-दिलीप बिरुटे

कवितानागेश's picture

17 Oct 2014 - 4:29 pm | कवितानागेश

असा त्रिवेणी हा काव्यप्रकार आहे. पहिल्या २ ओळीना तिसरी ऑळ पूर्ण वेगळे परिमाण देते. शरद सराना विनन्ती की याही काव्यप्रकारावर लिहावे

कृपया http://misalpav.com/node/19056 येथे वाचा.

सतिश गावडे's picture

17 Oct 2014 - 8:37 am | सतिश गावडे

छान ओळख करुन दिली आहे या काव्य प्रकाराची.

माझ्या तीन ओळी:

तुझ्या डोळ्यांत आसवे
माझे डोळे मात्र कोरडे
रोज मरे त्याला कोण रडे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Oct 2014 - 8:54 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आवडेश. धन्यासेठ असं पाहिजे होतं ते..

माझ्या डोळ्यात आसवे
तुझे डोळे मात्र कोरडे

रोज मरे त्याला कोण रडे.

:)

-दिलीप बिरुटे

सतिश गावडे's picture

17 Oct 2014 - 9:04 am | सतिश गावडे

बदल अगदी नेमका. :)

अजया's picture

17 Oct 2014 - 12:18 pm | अजया

मस्त हो सर!

प्रमोद देर्देकर's picture

17 Oct 2014 - 9:19 am | प्रमोद देर्देकर

कॉलेज जिवनात असताना मी केलेल्या काही हायकु किंवा चारोळ्या म्हाणा त्यापैकी एक..

"काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं
वाराही वाहायचा थांबला,
त्यानेही ते जाणलं"

अजुन आठवतील तशा लिहिन.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 6:20 am | सतिश गावडे

एक नंबर रे पम्या.
तुझी शैली "मी माझा तर माझा कुणाचा"कार सुर्यकांत खोकलेंसारखीच आहे. ;)

क्रेझी's picture

17 Oct 2014 - 10:26 am | क्रेझी

शांताबाई शेळके यांनी काही हायकूंची भाषांतरे केली आहेत असा उल्लेख त्यांच्या लेखात वाचल्याचं आठवलं पण विशेष शोध घेतला नाही.कोणाला माहिती असल्यास इथे डकवा.