हायकू - २

शरद's picture
शरद in जनातलं, मनातलं
18 Oct 2014 - 11:23 am

हायकूवरील पहिल्या लेखाला चांगला प्रतिसाद मिळाला व अनेकांनी स्वरचित हायकू दिले म्हणून आता दुसर्‍या भागात हायकूचा जरा खोलात विचार करू..पहिल्या लेखात सांगायचा राहिलेला एक सोपा नियम बघा पहिल्या-तिसर्‍या अथवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत यमक पाहिजे. एकच यमक जुळवावयाचे असल्याने सोपे आहे. मराठीत ५-७-५ ही भानगडच नसल्याने प्रत्येक ओळीतील शब्दसंख्या कमी जास्त होते. हरकत नाही. पण त्या रचनेत "लय" पाहिजेच. स्वत:शीच गुणगुणले तरी लय आहे की काही बदल पाहिजे हे लगेच कळेल. शब्दसंख्या मर्यादित असल्याने त्यांची निवड करतांना जास्त काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक शब्दाच्या जवळच्या अर्थाच्या छटा दाखविणारे अनेक शब्द असतात. अचूक शब्द शोधण्यात थोडा वेळ गेला तरी हरकत नाही. हायकू "पाडावयाचा" नसतो हायकू म्हणजे जिलेबी नव्हे (मिपावरील प्रतिसाद कोण म्हणाले रे ?)
हायकूच्या तीन ओळी म्हणजे कवितेतील स्वतंत्र पंक्ती नव्हेत. एका व एकाच अनुभवाची रचनेसाठी केलेली विभागणी आहे. इथे एक साधे विधान करावयाचे आहे. प्रथम एक शब्दचित्र. शक्य तो निसर्गातलं. व नंतर त्या चित्रामुळे तुमच्या मनांत उमटलेल्या भावलहरी., अंतर्गत अनुभव. दोन्ही भाग महत्वाचे. पण त्याहून महत्वाचे त्यांमधील दुवा. हा समर्पक, तरल तर हवाच आणि एकसंधीपणा टिकवणाराही हवा. चित्र क्षणीक म्हणजे अल्पावधीतील हवे तर भावतरंग वाचणार्‍याच्या मनात दीर्घकाळ गुंजी घालणारे. उदाहरणे पाहू.

आठवून सारे हसू येते
ह्याच गोष्टीसाठी तेव्हा
गदगदून रडले होते.

प्रत्येकाला आयुष्यात असे वाटून जाते; ओळी वाचतांना आपण कवितेशी समरस होतो कारण हा आपलाही अनुभव असतो. पण तरीही हा हायकू नाही. येथे कुठलेही शब्दचित्र नाही.

कवितांचं पुढे काय होतं ?
होड्या केल्या...जळात सोडल्या
कुठं गेल्या... कुणी पाह्यला ?

इथे केलेल्या कागदी होड्या पाण्यात वहात जात आहेत हे चित्र. त्यांचे पुढे काय झाले हे मात्र आपल्याला माहीत नसते. आपली कविता ही आपली जीव लावलेली कहाणी. पण एकदा तिची घडी घालून होडी केली व धारेत सोडली की नंतर तिचे काय झाले याचे उत्तर तुम्हाला मिळतच नाही. जीवापाड प्रेम केलेली व्यक्ती कालौघात नाहिशी व्हावी तसे. हा झाला हायकू.

इतके सगळे सांगितल्यावर तुमची एखादी कविता हायकू नसेलही पण खरे म्हणजे काही फरक पडला नाही. चांगली कविता ही चांगली कविता असतेच. एखादे लेबल लागले नाही म्हणून काय झाले ?

शिरिष पै यांचे काही हायकू देत आहे. काही अनुवादित आणि काही स्वत:चे. बाशो हा एक प्रसिद्ध जपानी हायकू लिहणारा. त्याच्या काही रचनांचे भाषांतर आपण पाहू शकता. आपण आपले व इतरांनी केलेले/अनुवादित हायकू अवष्य द्या. चार वर्षांपूर्वी उपक्रमवर
हायकूवर लेख लिहला होता व त्यावरील प्रतिसादांत अनेक सुरेख हायकू वाचावयास मिळाले. मिपावर येत आहेतच त्यात भर घाला.
स्वरचित :
(१) फुलं तोडताना त्यानं
फांदी खस् दिशी ओढली
चुकून कळीच तोडली

(२) सकाळ झालीय तरी
जळताहेत दिवे रस्त्यावर
जळून जळून रात्रभर

(३) कोणतं पाखरू गातंय् बागेत
वेगान अं धावत गेले
तर गाण्यासकट उडून गेले

(४) कशासाठी हा बुलबुल
रोज रोज बागेत येतो
त्याच गाण्यानं दुखवून जातो
अनुवादित

(५) समुद्रावरती वाट चुकलेल्या
पक्षामागून माझे डोळे राहिले फिरत
एक बेट इव्चलंसं त्याला गवसेपर्यंत --- बाशो

(६) खरोखर सुंदर आहे
खरोखर ! फुलबहार चेरीचा
पण चुकवी नकोस चंद्र रात्रीचा --- सो-इन

(७) जळून गेले माझं घर तेव्हापासून
दृश्य उगवत्या चंद्राचं
आता माला अधिक छान दिसतं --- मासाहिदे

(८) एक तळं..जुनाट...स्तब्ध
एक बेडुक बुडी घेतो त्यात
जराशी खळबळ...पुन्हा शांत ----बाशो.

(८) हा बाशोचा अतिप्रसिद्ध हायकू. जालावर तुम्हाला याचे ८-१० इंग्रजी अनुवाद सापडतील. कोणी मला यातील सौंदर्य उलगडवून सांगेल काय ? मला काय भावलं आणि तुम्हाला काय हेही समजेल.

शरद

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

विलासराव's picture

18 Oct 2014 - 12:48 pm | विलासराव

मस्त आहे हे हायकु प्रकरण.

वेल्लाभट's picture

18 Oct 2014 - 4:28 pm | वेल्लाभट

हं... सहीच.....

आता अजून कळले हो!अाता नाही जिलब्या पडायच्या!!

एस's picture

18 Oct 2014 - 8:37 pm | एस

(८) एक तळं..जुनाट...स्तब्ध
एक बेडुक बुडी घेतो त्यात
जराशी खळबळ...पुन्हा शांत ----बाशो.

हा एक प्रकारचा स्वतःच्या प्रतिभेचा साक्षात्कार आहे. एवढा क्लू सध्या देतो. बाकी या हायकूवर आंतरजालावर बरीच गहन चर्चा (इंग्रजीतून) उपल्ब्ध आहे. सवडीनुसार सविस्तर प्रतिसाद देतो.

सतिश गावडे's picture

18 Oct 2014 - 8:40 pm | सतिश गावडे

छान लेखमाला चालू आहे.

हायकू "पाडावयाचा" नसतो हायकू म्हणजे जिलेबी नव्हे

अरर्र... म्हणजे आत्मूस कधीच हायकू लिहू शकणार नाही. ;)