✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हायकू

श
शरद यांनी
गुरुवार, 10/16/2014 - 10:58  ·  लेख
लेख
हायकू : मराठीत न रुजलेला एवढी आवडते जपानी हायकू, तर कशाला केलीत मराठी बायकू ? महाराष्ट्राबाहेरचे दोन काव्यप्रकार म्हणजे गझल व हायकू. हे काही आपल्या भूमीतील, संस्कृतीतील नव्हेत. पण कलाप्रेमी महाराष्ट्राने जसे कथक, भरतनाट्य बाहेरून आल्यावरही प्रेमाने आपले म्हटले, उत्तर हिंदुस्थानातील शास्त्रीय संगीत आवडीने जोपासले तसे गझलला गळ्यात गोवले. पण हायकू मात्र दुर्लक्षीला गेला. एक श्री. शिरीष पै सोडल्या तर इतरांनी हा प्रकार आवडीने हाताळलाच नाही. असे का झाले ? मला वाटते याला दोन गोष्टी कारणीभूत असाव्यात. पहिली म्हणजे हायकूची जन्मभूमी जपान. जपानी भाषा आपल्याला पूर्णपणे अपरिचित. म्हणजे आपण हायकू वाचणार ते मूल(original) नाहीत, त्यांची इंग्रजी भाषांतरे. जपानी नियम पहिल्यांदीच तोडफोड होऊन समोर येणार व या भ्रष्ट रूपावरून आपण मराठीत प्रयत्न करणार.तुम्ही म्हणाल, गझलबद्दलही हा आक्षेप घेता येईल पण ते तेवढे खरे नाही. मराठी हिंदी या भाषाभगिनी आहेत व उर्दूतील फारशी-अरेबिक शब्द सोडले तर उर्दू-हिंदीच्या साम्यामुळे बाकी मोठा भाग आपल्या आवाक्यातला असतो. हिंदी सिनेमाही आपणाला गझल समजण्यास मदत करतो. इतिहासात आपण बरेच फारसी शब्दही आपल्या मराठीत सामावून घेतले आहेत. या सगळ्याचा गझल आत्मसात करण्यास मोठा हातभार लागला. हायकूबाबत तसे झाले नाही. भाषेची अनभिज्ञता एक मोठा अडसरच ठरला. दुसरे मह्त्वाचे कारण म्हणजे हायकूचे तांत्रिक अंग.जपानी भाषा उच्चारनुसारी असल्याने नियम त्यानुसार बांधले गेले. संपूर्ण हायकू तीन ओळींचा एवढी माहिती सर्वांना असते.पण या तीन ओळीही, (अक्षरवृत्तातील गणांप्रमाणे) तीन ओळीत उच्चारांचे गट पाडून,५ ,७ ,५ अश्या असाव्यात व यमक पहिल्या-दुसर्‍या किंवा दुसर्‍या-तिसर्‍या ओळीत असावे. अल्पाक्षरत्व ही महत्वाची अडचण आहे. जे काही सांगावयाचे ते इतक्या थोड्या जागेत बसवावयाचे आहे की कवीला बर्‍याच विषयांना रजा द्यावी लागते. माझे प्रेयसीवरील प्रेम यावर काही सांगावयाला हायकू हा काव्यप्रकार सोयिस्कर नाही. (असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते !). अर्थात हे सर्व भाषांनाच लागू पडते, अगदी जपानीलाही, म्हणून आणखीन एक बंधन घतले गेले. हायकू हे सरळ व साधे विधान असले पाहिजे. तीन ओळी एका विधानाला पुरेशा व्हावयास पाहिजेत. त्याचबरोबर अचूक शब्दांची निवड अनिवार्य होते. परत या तीन ओळी स्वतंत्र पंक्ती नकोत. एका अनुभवाच्या रचनेकरता केलेली ती एक विभागणी आहे. हे झाले तंत्र. त्यावर प्रभुत्व मिळवणे एक वेळ सोपे होईल पण पुढचा भाग हा अवघड आहे. हायकू हे वाङ्मयीन चित्र असले पाहिजे. चित्रकार चित्र काढतांना रंगाचा उपयोग करतो, काही जागा मोकळ्या सोडतो व त्याच्या मनांत उमटलेले भाव तुमच्यासमोर उभे करावयाचा प्रयत्न करतो. प्रेक्षक रंगसंगती, रेखा, मोकळी जागा सर्वांचा एकत्र विचार करून चित्रकाराच्या भावनेचा शोध घेण्याचा प्रयत्न करता. तसे हायकू वाचतांना व्हावयास पाहिजे. चित्र म्हणजे सिनेमा नव्हे तसेच हायकू म्हणजे काव्य नव्हे, कादंबरी नव्हे. एक क्षण, त्यावेळचे चित्र व त्यामुळे कवीच्या मनात उमटलेल्या उर्मी, या सर्वांना तीन ओळीत बंदिस्त करावयाचे आहे. लक्षात घ्या, एक चित्र असलेच पाहिजे, नुसत्या तरल भावना उपयोगाच्या नाहीत. अवघड आहे, नाही ? मला वाटते एखादे छायाचित्र हा परिणाम घडवून आणण्यास जास्त सफल होऊं शकते. मिपावरील काही छायाचित्रे आठवून पहा. पु.शि.रेग्यांच्या कविता, त्या हायकू नव्हेत, या कल्पनेच्या जवळ पोचतात. मराठीत हायकूची, किंवा जास्त बरोबर म्हणजे हायकूसदृष, रचना करावयाची असेल तर तंत्राची बंधने ढिली केलीच पाहिजेत. तीन ओळी ठेवा. ५,७,५ वगैरे सोडून द्या. वृत्ती जोपासा, तंत्र मुरडून वापरा.आज काही उदाहरणे देत आहे. आपल्या वाचनातील दिलीत तर सगळ्यांनाच आनंद मिळेल. (१) समुद्र दूर गेलेला किनार्‍यावरचे पक्षी स्तब्ध नको या वेळी एकही शब्द शिरीष पै (२) सुकत सुकत पिवळं पान फांदीवरून खाली गळलं एका फुलाला सारं कळलं शिरीष पै (३) तारेवरील फाटका पतंग वार्‍यावर फडफडणारा मी.. आतल्या आत तडफडणारा (४) सकाळच्या कोवळ्या उन्हात लाजरी कळी उमलणारी एक आठवण जागवणारी पुढच्या भागात शिरीष पै यांनी काही जपानी हायकूंची केलेली भाषांतरे शरद
  • हायकू - २

Book traversal links for हायकू

  • हायकू - २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
वाङ्मय
लेखनप्रकार (Writing Type)
आस्वाद

प्रतिक्रिया द्या
15766 वाचन

💬 प्रतिसाद (29)

प्रतिक्रिया

खूप चांगल्या विषयावरचा

खटपट्या
गुरुवार, 10/16/2014 - 11:19 नवीन
खूप चांगल्या विषयावरचा हा खूप चांगला लेख आता मी घेतो एक पेग
  • Log in or register to post comments

सहिच जवाब!

अमित खोजे
गुरुवार, 10/16/2014 - 20:45 नवीन
*lol*
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खटपट्या

अत्यन्त आवडता काव्यप्रकार.

कवितानागेश
गुरुवार, 10/16/2014 - 11:40 नवीन
अत्यन्त आवडता काव्यप्रकार.
  • Log in or register to post comments

पुलंनीही काही विडंबनात्मक

बोका-ए-आझम
गुरुवार, 10/16/2014 - 12:06 नवीन
पुलंनीही काही विडंबनात्मक हायकू लिहिले आहेत, उदाहरणार्थ हायकूसान हायकूसान काय तुझी जादू धावू लागले तुझ्यामागे बंडू, पांडू, म्हादू!
  • Log in or register to post comments

मन हायकू हायकू

मार्मिक गोडसे
गुरुवार, 10/16/2014 - 12:52 नवीन
दाट गवतात केव्हापासून घुसलेल्या फुलपाखराची चिमुकल्या काळजी वाटते बाई मला. उडता उडता फुलपाखरू उंच उडत गेले निळ्या नभात कुठं हरवलं. शिरीष पै. सरळसपाट माळावर सूर्यकिरण चमकले बिचार्‍या निराधार धुक्याने हात डोंगराच्या गळ्यात घातले. ऋचा गोडबोले.
  • Log in or register to post comments

खूप छान!

एस
गुरुवार, 10/16/2014 - 12:55 नवीन
आवडता प्रकार. या विषयावर आधी काही धागे येऊन गेले आहेत. त्यामुळेच हायकू आणि साकुरा यामधील फरक कळाला. तुम्हीही फार छान भर घालाल याची खात्री आहे! पुभाप्र!
  • Log in or register to post comments

बादवे

एस
गुरुवार, 10/16/2014 - 19:25 नवीन
मात्सुओ बाशो यांच्या हायकूंबद्दलही लिहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एस

मी पण एक....

माम्लेदारचा पन्खा
गुरुवार, 10/16/2014 - 12:59 नवीन
जगाचा अफाट पसारा कसा चालत राहिलाय नियंता कुणी पाहिलाय ?
  • Log in or register to post comments

अतिशय सुंदर हायकू ओळख.

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 10/16/2014 - 13:58 नवीन
अतिशय सुंदर हायकू ओळख. :) या निमित्ताने लोकरंग मधे आलेली एक हायकू-विडंबना आठवली . दोन कवियत्रींनी समोरील श्रोत्यांना वीट आणलेला असतो.. बराच वेळ त्यांच "संपतच" नसतं! तेव्हढ्यात खालून एक जण आवाज टाकतो. डावीकड़े एक बाई उजवीकडे एक बाई मधे कुणीच नाही!
  • Log in or register to post comments

एक व्यक्तीमत्व

विजुभाऊ
गुरुवार, 10/16/2014 - 14:04 नवीन
एक व्यक्तीमत्व बारामतीहून आलं अर्थ विश्व व्यापून राहीलं
  • Log in or register to post comments

दारू सिग्रेट आणि

विजुभाऊ
गुरुवार, 10/16/2014 - 14:07 नवीन
दारू सिग्रेट आणि फुटाण्याचा चखणा पृथ्वीचा गोल उलटा फिरला
  • Log in or register to post comments

आम्चं पण एक

इरसाल
गुरुवार, 10/16/2014 - 14:37 नवीन
अगणित अविरत भसाभसा पडताहेत मिपावर जिलब्या तांब्या पाहिलाय कुणी ? (हे सध्या असलेल्या मिपाच्या वाता-वरणावर आमचे ताजे भाष्य)
  • Log in or register to post comments

क्या बात है सर..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 10/16/2014 - 14:41 नवीन
हायकुची ओळख आवडली. आणि- असे म्हणतात की बरेच कवी आपल्या प्रेयसीची आळवणी लांबलचक काव्यात करतात आणि ती जांभया देतादेता चुकून होकार देते व कवीचे लग्नही होऊन जाते ! हे तर लैच आवडलं. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

खूप छान !

मितान
गुरुवार, 10/16/2014 - 19:54 नवीन
खूप चांगली ओळख करून दिलीत या काव्यप्रकाराची. मराठीत शिरीष पै यांची हायकू आणि पुन्हा हायकू नावाची दोन पुस्तकं आहेत. बर्‍याच वर्षांपूर्वी वाचली होती. एकेक हायकू वाचून थरारून गेले होते एवढंच आठवतंय. ते अनुवाद होते की त्यांच्या स्वतःच्या हायकू ते ही आठवत नाही. गेली ४ वर्षं प्रत्येक पुस्तकप्रदर्शनात ती पुस्तकं शोधतेय. पण सापडत नाहीत :(
  • Log in or register to post comments

येथे मिळते आहे का बघा ...

दिपोटी
Fri, 10/17/2014 - 05:04 नवीन
येथे ('रसिक साहित्य'च्या वेबसाईटवर) कदाचित मिळून जाईल ... http://erasik.com/books/MARATHI/information/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87%20%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%82/17514/ - दिपोटी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मितान

खूप छान!

पैसा
गुरुवार, 10/16/2014 - 20:02 नवीन
छान ओळख करून दिलीत. तीन ओळीचं संपूर्ण काव्य इतकंच आतापर्यंत माहीत होतं.
  • Log in or register to post comments

शिरीष पैंची पुस्तकं

अजया
गुरुवार, 10/16/2014 - 20:03 नवीन
शिरीष पैंची पुस्तकं वाचल्यानंतर फार दिवसांनी हायकुबाबत वाचण्यात आलं.तांत्रिक अंगाबद्दल मात्र आत्ताच वाचते आहे.छान लिहिलंय तुम्ही सोपं करुन! इतकं की एखादी हायकु पाडुन पहाविशी वाटायला लागलं आहे!
  • Log in or register to post comments

एकच कां ?

शरद
गुरुवार, 10/16/2014 - 21:15 नवीन
मात्र ती येथे पाठवा लगेच पाठवा शरद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

हायकु जिलब्या!

अजया
Fri, 10/17/2014 - 08:17 नवीन
एक कळी मुकी खुडलेली पायाखाली चिरडलेली.. लाट विरलेली उधाण सरलेलं रितं आभाळ उरलेलं..
  • Log in or register to post comments

छान पण...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/17/2014 - 08:28 नवीन
हायकुत सुरुवातीच्या दोन ओळीत प्रास्ताविक तर तिसर्‍या ओळीत अनपेक्षित कलाटणी मिळाली पाहिजे असे वाटते. म्हणजे मग त्या हायकुत मजा येते. तसं काहीच झालं नाही आठवणींचा पांढरा ढग आला. सरकत सरकत निघून गेला. किंवा. झाडाखालच्या आठवणींनी मनात प्रवेश केला अन झाडावरचा कावळा घान करुन गेला. असं या टाईपचं असं वाटतं. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजया

असा त्रिवेणी हा काव्यप्रकार

कवितानागेश
Fri, 10/17/2014 - 16:29 नवीन
असा त्रिवेणी हा काव्यप्रकार आहे. पहिल्या २ ओळीना तिसरी ऑळ पूर्ण वेगळे परिमाण देते. शरद सराना विनन्ती की याही काव्यप्रकारावर लिहावे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर आणखी मी लिहिलेले आहेत.

विदेश
Fri, 10/17/2014 - 08:23 नवीन
कृपया http://misalpav.com/node/19056 येथे वाचा.
  • Log in or register to post comments

छान ओळख करुन दिली आहे या

सतिश गावडे
Fri, 10/17/2014 - 08:37 नवीन
छान ओळख करुन दिली आहे या काव्य प्रकाराची. माझ्या तीन ओळी: तुझ्या डोळ्यांत आसवे माझे डोळे मात्र कोरडे रोज मरे त्याला कोण रडे
  • Log in or register to post comments

छान.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 10/17/2014 - 08:54 नवीन
आवडेश. धन्यासेठ असं पाहिजे होतं ते.. माझ्या डोळ्यात आसवे तुझे डोळे मात्र कोरडे रोज मरे त्याला कोण रडे. :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतिश गावडे

धन्यवाद सर...

सतिश गावडे
Fri, 10/17/2014 - 09:04 नवीन
बदल अगदी नेमका. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हो सर!

अजया
Fri, 10/17/2014 - 12:18 नवीन
मस्त हो सर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कॉलेज जिवनात असताना मी

प्रमोद देर्देकर
Fri, 10/17/2014 - 09:19 नवीन
कॉलेज जिवनात असताना मी केलेल्या काही हायकु किंवा चारोळ्या म्हाणा त्यापैकी एक.. "काडी काडी करुन तिनं घरटं बांधलं वाराही वाहायचा थांबला, त्यानेही ते जाणलं" अजुन आठवतील तशा लिहिन.
  • Log in or register to post comments

एक नंबर रे पम्या.

सतिश गावडे
Sat, 10/18/2014 - 06:20 नवीन
एक नंबर रे पम्या. तुझी शैली "मी माझा तर माझा कुणाचा"कार सुर्यकांत खोकलेंसारखीच आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

शांताबाई शेळके यांनी काही

क्रेझी
Fri, 10/17/2014 - 10:26 नवीन
शांताबाई शेळके यांनी काही हायकूंची भाषांतरे केली आहेत असा उल्लेख त्यांच्या लेखात वाचल्याचं आठवलं पण विशेष शोध घेतला नाही.कोणाला माहिती असल्यास इथे डकवा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा