सर्व मिपाकरांना विनंती, वारंवार सूचना देऊनही 'चालू घडामोडी' आणि इतरही काही धाग्यांत व्यक्तिगत पातळीवर केली जाणारी टीका दिसून येते. पक्षांचे प्रमुख, पक्ष यांच्यावर केल्या जाणा-या टिकाही संयमित असाव्यात अशी अपेक्षा आहे, नव्या कायद्यांमुळे संकेतस्थळावरील सर्वांचा वावर कायद्यातील नियमाबरोबर, सार्वजनिक संस्थळावरील सभ्यतेचे किमान निकष पाळणारा असावे असे मिपा व्यवस्थापनाचे मत आहे, यापुढे असे आढळून येत राहिल्यास कोणतेही स्पष्टीकरण न देता असे प्रतिसाद, धागे सरसकट अप्रकाशित केल्या जातील किंवा खाते निष्कासित करण्यासारखी कठोर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे.

- मिपा व्यवस्थापन


माझं कोकणातलं गांव :- भाग - १

Primary tabs

प्रमोद देर्देकर's picture
प्रमोद देर्देकर in जनातलं, मनातलं
12 Feb 2014 - 1:03 pm

झुकझुक झुकझुक अगीन गाडी,धुरांच्या रेषा हवेत काढी
पळती झाडे पाहुया, मामाला गावाच्या जावूया ||

हे गाणं लागलं की कि मनाला खरं तर काकाच्या गावापेक्षा मामाचं गावं (म्हणजे आजोळ) सगळ्यांना जास्त प्रिय असतो हे पटायला लागतं. पण मला मात्र दोन्ही गावे तेवढीच आवडतात. काकाचे गाव म्हणजे आमचेच घर सगळ्यात जास्त आवडते.
मला एकुण ८ मामा व एक मावशी (रा. दापोली)त्यापैकी चार गावाकडे राहिले, तर चार कळव्याला माझ्या आई बरोबर रहायला आले, जसजसे लग्न जमत गेले तेव्हा स्वःताहाचे बिर्‍हाड करित गेले. मग त्यांची समवयस्क मुले, मामा, मामी, आणि आम्ही सगळे गावाला कधी जायचे ह्याचे बेत ठरवण्यासाठी आमच्याकडे जमत असत. आम्ही लहान थोर मिळुन सगळेजण १९ जण होतो.(सन १९९५ पर्यंत सगळे उत्सव/ सण आम्ही एकत्र जमुन साजरे करित असु पण आता जमाना बदलला आहे. मामे भावु/ बहिणी,(सख्खी बहिण सुद्धा) सगळ्यांची लग्न होवुन आपापल्या संसारात रममाण झाली आहेत. त्यातुन टी.व्ही ने सगळ्यांनाच एकमेकांपासुन तोडलंय.)

तर लहानपणी मे महिन्याची सुट्टी लागली की सर्व मामा आमच्याकडे येवुन गावाला कधी जायचे याचे बेत आखत असत. मामाच्या गावाला जायच्या ८/१० दिवस आधी आम्ही वडिलांच्या (ता.गुहागर) गावी जावुन तिथली मजा लुटुन मग लाँचने दाभोळ खाडी पार करुन , दापोलीला आजोळी जात असू. (मामाचे गाव तिवरे. दापोली पासुन फक्त ६ किमी अंतर).
या मामाच्या घरात आता कळव्याचे मामा, मामी त्यांची मुले, आम्ही ५ जण आणि गावाकडची मामा मंडळी असे सगळे मिळुन २२ जण जमत असु. धमाल नुसती.

एकदा का एस्टी ने पनवेल सोडलं की गवताच्या हिरवळीचा, भाताच्या पेंडीचा एक वेगळा वास नाकात भरुन राहयचा. गावला गेल्यावर यंव करु तेंव करु याचे मनसुबे महाड येईपर्यंत पेंगुळलेल्या मनाने घेतले जायचे.
मग महाडला कंडक्टर "गाडी जेवणासाठी १५ मि.थांबेल बरंका , फक्त १५ मि.थांबेल " अशी आरोळी द्यायचा की आम्ही गाडीतच पोटपुजा आटपुन घ्यायचो. बाकी लाल डाब्याची गाडीची स्थानके (यस्टी स्टँड) म्हणजे लाऊड स्पीकरवरुन होणारी कर्ण कर्कश्य उदघोषणा, आSलेSपाक, चिक्की, कापुन ठेवलेले कलिंगडाचे, काकडीचे काप ,ऊसाचा रस इत्यादी पदार्थांचे ठणाणा करणारे विक्रेते, पाठीकडल्या बाजुला असलेलं गॅरेज, बाजुलाच उभ्या असलेल्या भंगारातल्या गाड्या, वातावरणात भरुन राहिलेला मुतारीचा वास, त्यात कँटिन मधले कळकटलेलं वातावरण त्यामुळे खाली उतरावेसे वाटायचे नाही. पण ठाण्यापासुन ४/५ तास बसुन पाय आखडलेले असायचे तेव्हा थोडं फिरणं व्हावं म्हणुन वडिलांबरोबर खाली जाणं व्हायचे. (गेली काही वर्षे या लाल डब्यानं जाणं झालंच नाही).

मग पुढे कशेडीच्या घाटात दुरवर दिसणारा रस्ता आणि गाड्यांचा माग काढत मन पुन्हा ताजंतवानं व्हायचं. पुन्हा गावाकडे धांव घ्यायचं. आता मात्र ही लहानपणीची मजाच गेली. कारण लहान होतो तेव्हा आईवडिलांबरोबर आम्ही फक्त मे महिन्यात जात असु तेही वर्षातुन एकदा जायचो म्हणुन असेल कदाचित पण आता तर काय बारा महिने केव्हाही ये जा चालु असते , ती सुद्धा दोन्ही बाजुंनी. त्यातुन दर आठवड्याला मोबाईलवर होणारे संभाषण होय.

दोन गाड्या बदलुन स.५ वा. घर सोडलेला माणुस संध्या. ७ वा. गावात पोहचायचा. पण स्टॉपवर उतरलं की दिवसभरचा शिणवटा पळायचा. लाल धुराळा उडवित गाडी पुढिल गावा कडे निघायाची, मग तो धुराळा खाली बसला की निसर्गाचे पहिले दर्शन तिथेच व्ह्यायचे. मागील गावाहुंन आलेला नी पुढल्या गावाला नागमोडी जाणारा लालभडक रस्ता, दुतर्फा असलेली लाल धुळवडीने माखलेली करवंदाची जाळी, खाली १०० फूट खोल असलेली दाभोळची खाडी, खाडी किनारी वसलेली मच्छीमार लोकांची वस्ती, खाडीत असलेलेया मच्छीमार लोकांच्या झेंडा फडकवणार्‍या नौका, ट्रॉलर, पडाव आणि त्यांच्या इंजिनाची लयबद्ध घरघर, समोर पलिकडच्या तीरावरचे हिरवे, पिवळे गवत असलेले डोंगर, त्यांची खाडीतली पुढे आलेली पक्ती(लाँच धक्क्यला लागावी म्हणुन केलेली जेटी); तर विरुद्ध बाजुला गावाची शेती आणि त्या पुढे गावची ७ वी पर्यंतची कौलारु शाळा, आणि पुढे नागमोडी वळणाने गावच्या विठ्ठलाच्या देवळाला वळसा मारत गावात जाणारा चढता रस्ता.

हाश हुश करत बॅगा सांभाळत पुढल्या अंगणात पोहचलो की हाताहली कामं टाकुन सगळेजण धावत स्वागताला यायचे सामान उचलुन घरात न्यायचे, लगेच गुळाचा खडा आणि पितळेचा पाण्याचा तांब्या पुढे यायचा (हे पाणी दगडाच्या द्रोणीतले म्हणुन ठंडगार असायचे ), पायला वाकुन नमस्कार, दोन्हीकडची ख्याली कुशाली, मधेच पाठीवर धपाटे सगळं कसं क्षणार्धात अकृत्रीमपणे घडुन यायचं.

आजोबा, आजी, काकू (हिला मी मात्र "कुका" म्हणतो कारण माझं "पम्या" असे बारसं तिनेच केलंय म्हणुन), आत्या, काकुची मुले, (काका बहुतेक करुन सुपारीच्या बागेत शिंपणं करायला गेलेले असायचे) एवढ्या सगळ्यात आता आमची भर पडलेली असायची.

नव्याचे जुने होवुन गेलो की हात पाय धुवुन आम्ही घरभर हुंदडायला मोकळे. गोठातल्या म्हशीला चारा घालणे, पाणी पाजणे हे पहिलं कांम. पण ते सगळं लांबुन पण आत्या, चुलत बहिण यापैकी कोणी जवळ असलं तर जनावराच्यां पाठीवरुन हात फिरवायची हौस भागवुन घ्यायची. कळत नसुनही तिथल्या गड्याला ही तानी आहे की पाडसी असे प्रश्न विचारायचे.

आमचं घर ऐसपैस ११ उंबरं (यांत घरातले दरवाजे पण आले) असलेले, चार दिशेला अंगण घराच्या समोर सुपारीची बाग, घराजवळ मोठा पाण्याचा हौद, त्यात सुपारीच्याच झाडापासुन बनवलेल्या पन्हळीतुन लांबच्या पर्‍यातुन वाहुन आणलेले पाणी (पर्‍या म्हणजे खुप मोठे दगड/धोंडे असलेली दोन डोंगराच्या मधल्या बेचक्यांत वाहणारी नदी किंवा ओढा ज्याला मे महिन्यात कमी पाणी असते तर पावसाळ्यात ती दुथडी भरुन वाहत असते), सुपारीच्या बागेला कुंपण म्हणुन उभे केलेले निवडुंगाचे रोपण, हौदाभोवती असलेल्या पाणथळ जागी स्वयंभु उगवलेली लव्हाळी, कासाळु(याचे सांडगे करतात), अळु(काळा दांडा असेल तर अळुवड्या, फदफतं यासाठी), हौदाच्या दोन्ही बाजुंनी उभी असलेली केळीची फोकं, तर मग पुढे हेच पाणी वळचणीला जात मोगरा, अनंत, कणेरी,चाफा, गुलाब, गोकर्ण, जास्वंद अशा अनेक फुलझाडांना फुलवत खळ्यात येत असे.
काका खळ्यात टोमॅटो, भेंडी, पडवळ,घोसाळी,काकडी, वांगी, मिरची, भुईमुगच्या शेंगा, पावटा असे काही बाही लावत असे. घराभोवताली असलेली इतर आंबा, फणस, माड ही झाडे तर मे महिन्याच्या उन्हात घराला सावली देणारी आच्छादनंच होय.

घरात माणसांचा गडी माणसंचा राबता फार असायचा. आम्ही ब्राम्हण, त्यात आजोबा फौजदार होते. शेती संरक्षणासाठी सरकारने एक डबल बारी बंदुक दिलेली होती. दोन काका (वडिलांचे २ लहान भावु, ३ नं. चा भावु पोलियोमुळे एका पायाने अधु होता), एक काकू , ३ आत्या, २ चुलतभावु, २ चुलत बहिणी, आजोबा, आजी सगळे मिळुन १५ जण होतो.

आता रात्रीचे ८ वाजायाला आले की बाहेर चांगलाच अंधार झालेला असायचा, मग बाहेर फिरणं बंद. कारण एकच गुडुप आंधार, काजवे चमकायचे , हौदाच्या खालच्या तळाकडिल दगडां मधुन बेडकांचे डरांव डरांव आरोळ्या, रातकिड्याचे किर्र किर्र आवाज , मध्येच जोराचा वारा आला कि आंबा, फणस, पिंपळ यांच्या झाडांच्या पानांची सळसळ, खुप घाबरायचो तेव्हा. पण आत्ता त्याचे हसु येते.

मग पेट्रोमॅक्सचे दिवे लागायचे(गावात वीज १९८० साली आली).मग सगळी बच्चे कंपनी मिळुन त्या दिव्याभोवती हुल्लडबाजी करत असायची, भिंतीवर आमच्या सावल्या पडलेल्या असायच्या. मग एका सुरात सगळे जण पर्वचं म्हाणायला देव घरात जमायचे रामरक्षा, मारुती स्तोत्र वगैरे झालेली सुरवात करायचो ते शेवट मोरया मोरया मी बाळ तान्हे... ने व्हायचा. कोणाला किती पाठ आहे यामध्ये चढाओढ लागायची. नंतर रात्री ८ वाजता केळीच्या पानावर गरम गरम मऊ भात, वाटी भर दही, भाकरी, बिरडं नाही तर आपल्याच खळ्यातली टोमॅटो, भेंडी, पडवळ (वाल घालुन केलेली) भाजी असायची.

सगळ्यांची जेवणे झाली की आम्ही लहान मुलं पत्ते (झब्बु,नॉट अ‍ॅट होम, मेंढीकॉट,चॅलेंज, ५ ३ २ काहीही), सारीपाट, असे खेळ खेळायचो, तर मोठी मंडळी ओटीवर गप्पांचा फड जमवत असत. आत्ता पर्यंत आमच्या घरी कामाला असाणारे (बागकांम, म्हशीची देखभाल इ.साठी)कुलवाडी गडी सगळ्या वाडीत "मुंबैस्न भावु (माझ्या वडिलांना भावु म्हणतात)आलाय बरंका बायका, पोरंस्नी घेवुन आलाय!" असा प्रचार केव्हाच केलेला असायचा की त्या घरातेली वडिलांच्या वयाची माणसं आमच्या घरी विचारपुस करायला यायची. त्यातली एक जण तर खुपच म्हातारी होती. आली की बिचारी आम्हा सगळ्यांच्या तोंडावरुन आपले सुरकुतले हात फिरवायची आणि मग बोटं मोडायची. आमच्या सकट आई वडिलांच्या गालाचे हाताने गालगुच्चे घ्यायची. आम्ही गालातल्या गालात खुदुखुदू हसत असू. पण "मुंबैतले चाकरमानी बरा अस्सा ना!" असे म्हणायची. ते कोकणी माणसाचे निर्व्याज प्रेम होतं.

रात्री ९ वजले की काकुची आम्हा मुलांनी झोपावे म्हणुन एक घोषणा व्हायची "सकाळी धराणावरच्या बागेतल्या शिंपणाला कोणाला जायचे आहे ?"

"मीS मीS मीS" आम्ही सगळे एक सुरात ओरडायचो.

"मग चला लवकर झोपा पाहु, नाहीतर काका लवकर ऊठुन जातील हो तुम्हाला न घेताच."

मग सगळी मुलं पळत अंथरुणात झोपायला जायाची. धरणावरच्या बागेत जाताना काय काय पहायला मिळणार या धुंदित केव्हा तरी गाढ झोप लागायाची.

(बागेत हमखास सगळे पक्षी, कोकिळा, चंडोल, मोर, कौंडर असायचे. एकदा तर काकाला पाणंदीतुन पाट साफ करत जाताना बिबिट्या वाघ आडवा आला होता. वाघ,साप,विंचु गावची रामभोळची गुहा असे अजुन बरेच किस्से आहेत पण त्याविषयी पुढिल लेखात जसं जमेल तसे.)

-- क्रमांश --

तळटीप :- मी आज पासुन "माझं कोकणातलं गांव " या सदरात जसं आठवेल तसं, जसं जमेल तसं माझ्या कोकणतील गुहागर तालुक्यातील वडिलांच्या गावाकडचे व दापोली तालुक्यातील आईच्या गावाकडचे वर्णन,अनुभव,किस्से , छायाचित्रांसहित कथन करणार आहे. या मध्ये कोणताही प्रसंग काल्पनिक नसणार आहे. पण कोणताही प्रसंग स्मरणशक्तीने दाद न दिल्यास मागे पुढे होवु शकतो तेव्हा चु.भु.दे.घे.

वावरकथालेखअनुभव

प्रतिक्रिया

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2014 - 1:22 pm | llपुण्याचे पेशवेll

मस्तं. म्हणजे एकूण रत्नांग्रिकरच म्हणायचे. छान. लिव्हा लिव्हा. वाचतोय.

सौंदाळा's picture

12 Feb 2014 - 1:42 pm | सौंदाळा

सुंदर. कोकणातल्या वाडीत गेल्यासारखे वाटले.
मस्तच लिहिले आहे.
पुभाप्र (फोटोंची पण वाट बघतोय)

कंजूस's picture

12 Feb 2014 - 1:50 pm | कंजूस

भावलं .
वाट पाहातो फोटो आणि इतर किश्शांची .
आमचं कोकणात कोणीच नव्हतं त्यामुळे लहानपणी कोणी वर्णन केलं की फार वाईट वाटायचं .
आमचा मामा तासगावचा (सांगली जवळचे) .त्यामुळे फणस ,काजू ,पपनस ,आंबे ,लालमाती ,चिरे ,समुद्र खाडी ,डोंगर ,धबधबे यांची जागा काळी माती ,माळ ,ऊस ,शेंगा ,कवठ ,बोरे यांनी घेतली होती .

श्री ना पेंडसे ,जयवंत दळवी वाचून कोकणाची हौस भागवली .
मोठेपणी कोकण पाहिलं पण
लहानपणची मजा कशी येणार ?
चला आता तुमच्याबरोबर तर पार करू .

मुक्त विहारि's picture

12 Feb 2014 - 1:58 pm | मुक्त विहारि

पम्याभाऊ लगे रहो

यसवायजी's picture

12 Feb 2014 - 2:08 pm | यसवायजी

छान. पु.ले.शु.

पैसा's picture

12 Feb 2014 - 2:27 pm | पैसा

लिहा पटापट!

प्रमोद देर्देकर's picture

12 Feb 2014 - 2:55 pm | प्रमोद देर्देकर

@ सौंदाळा - मुक्त विहारि - यसवायजी:- खुप खुप धन्यवाद
पहिले वाटलं होतं की कोणाला आवडतंय की नाही. पण आता पुन्हा हुरुप आलाय.

@ पैसातै :- बोटाची पेरं दुखली की तै , त्यातुन बॉसला सांभाळावं लागतंय. सालं टंकनाचा जाम कंटाळा येतो, त्यातुन प्रुफ रिडिंगचाच तर जास्तच येतो. बरं पण प्रत्येक परिच्छेदाला समास कसा काय सोडायचा ते सांगाशील काय ?

पैसा's picture

13 Feb 2014 - 9:29 am | पैसा

बरं पण प्रत्येक परिच्छेदाला समास कसा काय सोडायचा ते सांगाशील काय ?

हे मात्र मला पण अजून कधी जमलं नाही. आपण परिच्छेदाच्या सुरुवातीला जागा सोडली तर 'पूर्वपरीक्षण' मधे बरोबर दिसतं पण 'प्रकाशित' केलं की ते परत ओळीच्या सुरुवातीला येतं. गणपाला कदाचित माहित असेल. किंवा मग सगळ्यांनाच काही संशोधन करायला पाहिजे!

पियुशा's picture

13 Feb 2014 - 9:38 am | पियुशा

मस्त !

अजया's picture

12 Feb 2014 - 2:57 pm | अजया

मस्त लिहिलय! पु.ले.प्र.

सानिकास्वप्निल's picture

12 Feb 2014 - 2:59 pm | सानिकास्वप्निल

मजा येत आहे वाचायला :)
पुढचा भाग लवकर येऊ द्या

सॉलिड झाला आहे हा भाग... गावाच्या सगळ्या आठवणी जश्या च्या तश्या डोळ्यासमोर आल्या... संपुर्ण लेखच मस्त झाला आहे...

बरीच वाक्ये कोट करायची होती पण हे अगदी नेमके वर्णन...

हाश हुश करत बॅगा सांभाळत पुढल्या अंगणात पोहचलो की हाताहली कामं टाकुन सगळेजण धावत स्वागताला यायचे सामान उचलुन घरात न्यायचे, लगेच गुळाचा खडा आणि पितळेचा पाण्याचा तांब्या पुढे यायचा (हे पाणी दगडाच्या द्रोणीतले म्हणुन ठंडगार असायचे ), पायला वाकुन नमस्कार, दोन्हीकडची ख्याली कुशाली, मधेच पाठीवर धपाटे सगळं कसं क्षणार्धात अकृत्रीमपणे घडुन यायचं.

पण हे पण तितकेच खरे

मामे भावु/ बहिणी,(सख्खी बहिण सुद्धा) सगळ्यांची लग्न होवुन आपापल्या संसारात रममाण झाली आहेत. त्यातुन टी.व्ही ने सगळ्यांनाच एकमेकांपासुन तोडलंय.

पु.भा.प्र.

प्यारे१'s picture

12 Feb 2014 - 3:22 pm | प्यारे१

सुंदर नॉस्टाल्जिक लिखाण....

कोकणातल्या मातीचा सुगंध इथवर आला.

कुसुमावती's picture

12 Feb 2014 - 3:50 pm | कुसुमावती

तुम्ही अगदी मामाच्या गावाची आठवण करुन दिलीत. माझ्या मामाचं गाव कणेरी,राजापुर(जि. रत्नागिरी)तालुक्यातलं. आम्ही सगळी मावस-मामे भावंड दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी जायचो. भरपुर आंबे,फणस खायचो. बरेच वर्ष झाली मामाच्या घरी जावुन, या वर्षी जायला पाहिजे.

लॉरी टांगटूंगकर's picture

12 Feb 2014 - 3:55 pm | लॉरी टांगटूंगकर

आवडतंय लिहीत राहा. पुभाप्र.

आदूबाळ's picture

12 Feb 2014 - 3:55 pm | आदूबाळ

प्रमोदराव, लिहीत रहा!

बाकी लाल डाब्याची गाडीची स्थानके (यस्टी स्टँड) म्हणजे लाऊड स्पीकरवरुन होणारी कर्ण कर्कश्य उदघोषणा, आSलेSपाक, चिक्की, कापुन ठेवलेले कलिंगडाचे, काकडीचे काप ,ऊसाचा रस इत्यादी पदार्थांचे ठणाणा करणारे विक्रेते, पाठीकडल्या बाजुला असलेलं गॅरेज, बाजुलाच उभ्या असलेल्या भंगारातल्या गाड्या, वातावरणात भरुन राहिलेला मुतारीचा वास, त्यात कँटिन मधले कळकटलेलं वातावरण त्यामुळे खाली उतरावेसे वाटायचे नाही.

याच कारणासाठी प्रत्येक स्टँडावर उतरावंसं वाटतं...

सौंदाळा's picture

12 Feb 2014 - 4:02 pm | सौंदाळा

+१

अनन्न्या's picture

12 Feb 2014 - 4:01 pm | अनन्न्या

मस्त लेख!

रेवती's picture

12 Feb 2014 - 4:20 pm | रेवती

भारी लिहिताय.

प्रमोद देर्देकर's picture

12 Feb 2014 - 4:44 pm | प्रमोद देर्देकर

शिद, कुसमावती, अजया, मन्द्या, सानिकास्वप्निल, अदुबाळ, अनन्या, रेवतीतै, प्यारे सगळ्यांना धन्स .

वाटलं नव्हतं एवढं आवडेलसं.

वाचणारे, प्रतिसाद देणारे, आणि वाचुनही प्रतिसाद न देणारे सगळ्यांना धन्यवाद!
मुक्त विहारि's picture

13 Feb 2014 - 9:07 am | मुक्त विहारि

ही जमात जरा जगावेगळी आहे...

जावू दे,

अशा लोकांकडे खरा मिपाकर जास्त लक्ष देत नाही.

एक-दोनच प्रतिसाद यावेत पण असे यावेत की ज्यात लेखनाचे (लेखन कर्त्याचे नाही) खरोखर मुल्य मापन असावे.

आणि

तसे ते तुमच्या लेखाला मिळाले पण आहेत.

(लेखनाला जास्त महत्व देणारा, खरा मिपाकर) मुवि.

आदिजोशी's picture

12 Feb 2014 - 5:20 pm | आदिजोशी

दापोली आणि परिसर म्हणजे आमचा जीव की प्राण. आमचं गाव मुंबईला असलं तरी आत्याचं सासर दपोलीला असल्याने तिथे येणं जाणं व्हायचं. मुंबईला परत येऊच नये असं वाटायचं. तुम्ही लिहिलेल्या सगळ्या गमती जमती आणि अजूनही बरंच काही मनसोक्त अनुभवलं आहे. परवाच कोकणात जाऊन आलो, आठवणी ताज्या झाल्या.
पुढचे भाग भराभर लिहा आणि भरपूर लिहा :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Feb 2014 - 5:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लिहिताय. बालपणीच्या आठवणी जाग्या झाल्या ! पुभाप्र.

सुबोध खरे's picture

12 Feb 2014 - 6:46 pm | सुबोध खरे

वा प्रमोदराव, एकदम लहानपणा कडेच घेऊन गेलात. सकाळी पाच वाजताची ठाणे चिपळूण ( किंवा सहा ची ठाणे गुहागर) एस टी आठवली. कशेडी खवटी चा घाट पहिली कित्येक वर्षे आईच्या मांडीवर डोके ठेवून आवळा सूपारी चघळत काढला आहे. त्यातून मध्येच दिसणारा एक फलक शिवरायांची पवित्र भूमी प्रतापगड चे दर्शन तो पहायला उठत असू. त्यातून आमचे गाव म्हणजे श्री क्षेत्र परशुराम त्यामुळे सकाळी साडे अकरा ला परशुराम तिठ्यावर उतरत असू.मग एक किमी चालून घरी पोहोचत असू.मोठे चौसोपी घर मागे पुढे अंगण पडवी ओटी माजघर स्वयंपाकघर बाळंतीणीची खोली मोठा सोपा मागे आंब्याचे आणि फणसाचे झाड. आज ते घर मुंबई च्या सुखसॉइंचे आहे ( घरात फरशा, गॅस, टाइल्स लावलेले न्हाणिघर इ.) पण लहानपणची आठवण काही औरच असते हे खरे.परत गावात फिरताना कुणाचा रे तू ? म्हणजे बापाचे (चंदूचा का तू ?) किंवा आजोबांचे नाव सांगितले ( पीलुकाकांचा नातू का तू ?) की त्याना कळत असे. या आणि अशा अनेक आठवणी जाग्या झाल्या.
बाकी तुमच्या लेखणीत दम आहे हो !
लिहिते रहा

सकाळी पाच वाजताची ठाणे चिपळूण ( किंवा सहा ची ठाणे गुहागर) एस टी आठवली.
अगदी असेच वाटले. फरक एवढाच की आम्ही शक्यतो रात्रीची पुणे कणकवली व्हाया कोल्हापूर एसटी पकडायचो व कणकवलीहून आचरा!

खटपट्या's picture

13 Feb 2014 - 3:11 am | खटपट्या

पम्या, भुताच्या गोष्टी राहिल्या बहुतेक!!!!
पुढच्या भागात येतील अशी अपेक्षा....

प्रमोद देर्देकर's picture

13 Feb 2014 - 9:10 am | प्रमोद देर्देकर

@ सुबोध खरे साहेब "त्यातून मध्येच दिसणारा एक फलक शिवरायांची पवित्र भूमी प्रतापगड चे दर्शन तो पहायला उठत असू
होय आम्ही हा फलक पहात असु पोलादपुर सोडल्यानंतर कशेडीचा उतरणीचा तपासणी नाका येण्या अगोदर घाटात हा फलक आहे. तेव्हा जमेल तसे मान बाहेर काढुन ते बेलाग कडे बघण्याचा आमचा आटापिटा असायचा.
तुम्ही परशुराम घाटावरचे म्हणजे आता तिथे लोटे येथे बरेच केमीकल्स कंपन्या झाल्यात त्या तिथले. कंपन्यांमुळे शहरीकरण झपाट्याने वाढले आहे. खरी मजा तर आतल्या गावात आहे. कधी सवड मिळाली तर जावे. मला सांगाल तर मी माझ्या गावाला घेवुन जाईन. बाकी वडिलांचे, आजोबांचे नाव सांगुन ओळख देणे याच्याशी १००% सहमत माझ्या ही बाबतीत हेच होतं

@ खरे साहेब & @ रेवतीतै :- आम्ही स. ५ ची ठाणॅ तिवरे पकडुन दु. २ वा. चिपळुणला जायचो व तिथुन दु. ४.३० च्या गुहागर पांगारी गाडीने विसापुरला आमच्या गावी जायचो. सगळा मधला वेळा स्टँड वर काढावा लागत असे. हीच गाडी रात्रीची वस्ती करुन सकाळी पुन्हा तालुक्याला येत असे. आता दर १ तासाला गावात गाडी जाते. दिवस बदलत चालले आहे.
@ खटपट्या:- भुते मामाच्या गावाला जास्त होती. त्यामुळे त्याला अजुन बराच वेळ आहे. येईल सावकाश वर्णन येईल आत्ताच माझ्या मानगुटी वर बसु नकोस.

चालेल....

एक उन्हाळी कट्टा तुमच्या गावाला पण करू.

मस्त आंबे-बिंबे खावू.कोकमाचे सरबत पिवू आणि नारळाच्या झाडाखाली झोपू.

खर्च आपापला असल्याने, चिंता नसावी.

psajid's picture

13 Feb 2014 - 12:16 pm | psajid

आवडलंय ! कोकणाविषयी खूप आपलेपणा मनात आहे. फणसागत बाहेरून कडक आतून मायाळू माणसे, आपुलकीची शिवी सुद्धा हळवं बनवून जाते. वर्षातील एक ट्रीप हमखास कोकणात काढतो !

बाबा पाटील's picture

13 Feb 2014 - 2:02 pm | बाबा पाटील

२००४ ला पहिल्यांदा कोकणात गेलो, त्यानंतर किती वेळा ....गणतीच नाही.आजही पुण्यातल्या गणगणीचा वैताग आला की माझी लेक आणी मी दोघेच उठतो आणी दिवेआगारला जातो.तिथे एक आज्जी आजोबा आहेत्,हक्काने त्यांच्याकडे राहतो.कोकनी माया खरच कधी आटत नाही.

अनिरुद्ध प's picture

13 Feb 2014 - 6:35 pm | अनिरुद्ध प

आवडला पु भा प्र.

स्वच्छंदी_मनोज's picture

14 Feb 2014 - 6:10 pm | स्वच्छंदी_मनोज

प्रमोदजी... एकदम नॉस्टल्जीक लिखाण...सर्व वर्णन कमी अधीक फरकाने माझ्या बाबतीत लागू, फक्त एस्टीचा प्रवास सोडून.. बालपणा पासून उच्च शिक्षणापर्यंत सर्व काळ कोकणातच राहील्यामुळे (तुमच्यासारखेच जि. रत्नागिरी :))तुम्ही सांगीतलेले सर्व अनेक वर्ष अनुभवलेले आहे :)

उडन खटोला's picture

15 Feb 2014 - 6:33 pm | उडन खटोला

फार छान्

प्रमोद देर्देकर's picture

17 Feb 2014 - 11:57 am | प्रमोद देर्देकर

@psajid -,बाबा पाटील, स्वच्छंदी_मनोज ,उडन खटोला
सर्वांच्या अभिप्रायाबद्दल धन्स.
पण पुर्वीचे कोकण आता राहिलं नाहिये. जेव्हा खरोखरचं एकच ए.स्टी. वस्तीला शेवटच्या गावात जात असे जी दुसर्या दिवशी पुन्हा तालुक्याला परतंत असे . म्हणजे एकदा का तुम्ही आंत मध्ये गेलात की बाहेरील जगाशी संपर्क तुटलेला. पण अजुनही काही गावातनं डोली करुन आजारी माणसांस, बाळंतणीस, मुख्य रस्त्याला आणावे लागते. तिथुन पुढे टमटम, रिक्षा असा प्रवास .

मदनबाण's picture

17 Feb 2014 - 12:07 pm | मदनबाण

मस्त !
खुप वर्षांपूर्वी आंबेटात गेले होतो ते सर्व आठवल ! अननसाची छोटीशी लागवड. लाकडी पन्हाळ्यांतुन लांबुन आणलेलं पाणी, संध्याकाळी नदीच्या जवळ असणार्‍या शेतात फिरणार्‍या कोल्ह्यांचे चमकणारे डोळे. इं.
पुढच्या भागाची वाट पाहतो.

सिरुसेरि's picture

1 Jul 2020 - 3:09 pm | सिरुसेरि

सुरेख कोकण दर्शन . रविन्द्र पिंगे यांच्या लेखनाची आठवण झाली .

चौथा कोनाडा's picture

1 Jul 2020 - 5:44 pm | चौथा कोनाडा

सुंदर लेखन, प्रत्यक्ष कोकणात गेल्यासारखे वाटले.

तो धुराळा खाली बसला की निसर्गाचे पहिले दर्शन तिथेच व्ह्यायचे. मागील गावाहुंन आलेला नी पुढल्या गावाला नागमोडी जाणारा लालभडक रस्ता, दुतर्फा असलेली लाल धुळवडीने माखलेली करवंदाची जाळी, खाली १०० फूट खोल असलेली दाभोळची खाडी, खाडी किनारी वसलेली मच्छीमार लोकांची वस्ती, खाडीत असलेलेया मच्छीमार लोकांच्या झेंडा फडकवणार्‍या नौका, ट्रॉलर, पडाव आणि त्यांच्या इंजिनाची लयबद्ध घरघर, समोर पलिकडच्या तीरावरचे हिरवे, पिवळे गवत असलेले डोंगर, त्यांची खाडीतली पुढे आलेली पक्ती(लाँच धक्क्यला लागावी म्हणुन केलेली जेटी); तर विरुद्ध बाजुला गावाची शेती आणि त्या पुढे गावची ७ वी पर्यंतची कौलारु शाळा, आणि पुढे नागमोडी वळणाने गावच्या विठ्ठलाच्या देवळाला वळसा मारत गावात जाणारा चढता रस्ता.

व्वा, किती चित्रदर्शी वर्णन !