(मोरपिशी साडी)

बेसनलाडू's picture
बेसनलाडू in जे न देखे रवी...
19 Jul 2008 - 7:00 pm

मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांशी मस्ती करणार्‍या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
उगीच का अत्तर लावतोस?

तुझ्या या मोरपिशी साडीनंच
"अत्तर शिंपडलंय या देखाव्यात''
निर्‍या घट्ट धरून ठेवणारी तुझी बोटं...
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सुगंधाचा कळस!

आहा... !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

बर आहे..., तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम...
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं कोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
न विस्कटता , न कोमेजता!

प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

कविताविडंबनमौजमजाप्रतिसादअनुभवप्रतिक्रियाप्रतिभाविरंगुळा

प्रतिक्रिया

स्वाती फडणीस's picture

19 Jul 2008 - 7:45 pm | स्वाती फडणीस

मेक-अप् च्या अडगळीतल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांची रंगरंगोटी करणार्‍या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
का उगीच अत्तरात न्हातोस?

तुझ्या या मोरपिशी अस्तित्वान
"अत्तर शिंपडलंय या मनात''
नजर खिळवून ठेवणार तुझ असण...
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सोंदर्याचा कळस!

आहा..
डोळे तृप्त झाले तुला साठवून.

बर आहे..., तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम...
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं सोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
न विस्कटता , न चुरगळता!

प्रेरणा: स्वातीताई फडणीसांची हिरवी जिद्द

बेसनलाडू's picture

19 Jul 2008 - 8:10 pm | बेसनलाडू

मेक-अप् च्या अडगळीतल्या डब्यात....
लिप् स्टिक् चा बोटभर तुकडा शोधून,
ओठांची रंगरंगोटी करणार्‍या आरशामधल्या
पाचफुटी फुला....
का उगीच अत्तरत न्हातोस?
अडगळीतल्या डब्यात नाही मी अडगळलेल्या डब्यात म्हटले होते. मेक्-अप् चा डबा अडागळीत? :O बाप रे! पुढची कविता कशी झाली असती मग?:O :D अडगळलेला डबा म्हणजे नीट मांडून न ठेवलेला,सगळे कोंबलेला असा काहीसा अव्यवस्थित (सगळे नीटनेटके असते,तर बोटभर तुकडा असता का तिकडे? अख्खी लिप् स्टिक् नसती? ;) )
ओठांची रंगरंगोटी करण्यात ती मजा नाही जी ओठांशी मस्ती करण्यात आहे. इतरत्र एका प्रतिसादात म्हटल्याप्रमाणे ओठांची रंगरंगोटी म्हणजे सौंदर्यकल्पनेचा वरणभात;तर लिप् स्टिक् लावताना ओठांशी केलेली मस्ती/चाळा ही सौंदर्यकल्पनेची बिर्याणी.
मी उगीच का अत्तर लावतोस म्हटले होते; म्हणजे तू इतकी सुंदर,मोहक,सुगंधी वगैरे आहेस की तुला अत्तर लावायची गरजच नाही.घमघमाट आणि दरवळ मधला सूक्ष्म फरक लक्षात घ्यावा येथे.अत्तरात न्हाणे (घमघमाट) अपेक्षितच नाही,तर तिने जितके अत्तर लावले आहे/ती जितके अत्तर लावते आहे, त्याचीही तिला गरज नाही,असे म्हणायचे आहे. म्हणून उगीच का अत्तर लावतोस म्हटले. त्यातून तिला फूल संबोधल्याने ती स्वतःच सुगंधी आहे(च!).मग तिला ती लावते आहे तितक्या अत्तराचीही गरज नाही.बरोबर?
(पृच्छक)बेसनलाडू
तुझ्या या मोरपिशी अस्तित्वान
"अत्तर शिंपडलंय या मनात''
नजर खिळवून ठेवणार तुझ असण...
आणि तांबूसकाळ्या बटांमागचं..
कानावरचं हसरं पिवळं फुल,
म्हणजे सोंदर्याचा कळस!
नजर खिळवून ठेवणं आणि निर्‍या सांभाळणारी लांबसडक बोटं यांपैकी मला ती बोटं जास्त प्रातिनिधिक वाटतात,ऍज फार ऍज ब्यूटी थ्रू विजिबिलिटी गोज. सौंदर्याऐवजी सुगंधाचा कळस का म्हटले हे पुढच्या प्रतिसादावरून आपसूक समजेल अशी आशावजा खात्री/अपेक्षा आहे.
(खात्रीपूर्वक)बेसनलाडू
आहा..
डोळे तृप्त झाले तुला साठवून.

अहो फुलाला हुंगलं नाही,तर त्याचं सौंदर्य ते काय उपभोगलं?नुसता त्याचा रंग साठवून काय फायदा? सुवास अनुभवायला/उपभोगायला नको का? म्हणून म्हटले की तू जशी दिसते आहेस,ते तुझं दिसणं आणि तुम्ही म्हटलंय ते तिचं असणं याचाच सुगंध वातावरणात दरवळतोय (त्यात च्यायला भर म्हणून ते केसातलं फूल!)मग डोळे तृप्त झाले तुला साठवून मधून उपभोगण्यातला जो गुळमुळीतपणा (मला) जाणवला,तो हुंगून डोळे बंद करण्यातून जाणवत नाही; तेच अपेक्षित आहे मला.
(अपेक्षित)बेसनलाडू
बर आहे..., तू घरात आहेस!,
असाच राहशील कायम...
असंच राहील तुझं चैतन्यमयी हास्य,
तुझं सोवळे पण..
तुझी मोरपिशी साडी!
न विस्कटता , न चुरगळता!
या कडव्यातील सोवळे आणि चुरगळता या सूचना पूर्णपणे मान्य, १००%. झोपेच्या अंमलाखाली सोवळे आणि चुरगळता हे सोपे शब्द आठवले नाहीत :(
(समजूतदार)बेसनलाडू
सूचनांबद्दल धन्यवाद.अशीच साधकबाधक चर्चा/सूचना येथे होवोत हीच माफक अपेक्षा.
(आभारी)बेसनलाडू

धोंडोपंत's picture

20 Jul 2008 - 7:16 am | धोंडोपंत

वा वा बेला,

क्या बात है. उत्तम कविता. खूप आवडली. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

एक अवलोकन-

हे आमचे वैयक्तिक मत आहे. इतरांना ते पटले पाहिजे असा आग्रह नाही.

ज्या व्यक्तिची वृत्तावर पकड असते (उदा. बेसनलाडू) त्याने मुक्तछंदात लिहिलेल्या कवितेतही एक सुप्त आणि गुप्त लय प्रभावीपणे जाणवते.

वृत्तावर पकड असलेल्यांनी लिहिलेला मुक्तछंद हा वृत्ताशी संबंध नसलेल्यांनी लिहिलेल्या मुक्तछंदापेक्षा अधिक भावतो.

हे वैयक्तिक मत आहे. कुणाच्या भावना दुखविण्याचा उद्देश नाही.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

सर्किट's picture

21 Jul 2008 - 6:33 am | सर्किट (not verified)

छंद कळला तरच मग मुक्तछंद कळतो, हे आमचेही वैयक्तिक मत आहे.

आणि बेसन लाडवाच्या अनुदिनीवरील त्याच्या कवितांचा मागोवा घेतल्यास, छंदात गुंतलेला लाडू दिसून येतो.

म्हणूनच त्यांचा मुक्तछंदही "तालबद्ध" नव्हे तर, लयबद्ध वाटतो. ही लय आईच्या हृदयातील ठोक्यांतून नाही उमटत. ती झाली लग्गी. हा शब्दांच्या उच्चारणांतील ठेक्यातून उलगडते.

नव्हे ह्याहीपेक्षा बोल्ड विधान करतो. केशवसुमारांच्या विडंबनाकडे बघितल्यास, लयबद्धतेकडे लक्ष देणे त्यांना शक्य होते अनिरुद्ध अभ्यंकरांमुळे. लय कळण्यासाठी कुणाचे "आ आ ऊ ऊ" मुकाट सहन करण्याची अजीबात गरज नाही. बोली भाषेतून शब्दांच्या उच्चारतून कळणारी ही बाब आहे, लय म्हणजे.

- सर्किट

वरदा's picture

22 Jul 2008 - 12:13 am | वरदा

बेला मस्त आहे हे विडंबन...
"The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

चतुरंग's picture

22 Jul 2008 - 12:17 am | चतुरंग

भलतीच छचोर आहे साली 'मोरपिशी साडी'! ;)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

22 Jul 2008 - 9:11 am | विसोबा खेचर

आहा... !
डोळे कधीच बंद झाले तुला हुंगून.

वा! अतिशय सुरेख लिहिलं आहे!

तात्या.