फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी
युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी
नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी
आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी
नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट
उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट
जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी
अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता
जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता
अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी
नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी
मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी
मी कान्हाच्या वेणुमधली उषःकालची नवी भुपाळी
मध्यान्हीची मीच सावली वायुलहर मी सायंकाळी
मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया
अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया
सामर्थ्याची मशाल हाती धगधगणारे दुःख उराशी
युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी
© अदिती जोशी
प्रतिक्रिया
21 Oct 2013 - 12:20 am | यशोधरा
सुर्रेख!
21 Oct 2013 - 6:32 am | वेल्लाभट
केवळा अप्रतिम लिहीली आहे कविता.... १००% भावपूर्ण, १००% अर्थपूर्ण. क्या बात है.... क्या ब्ब्बात है...
पुन्हा पुन्हा वाचतोय...
21 Oct 2013 - 6:45 am | अत्रुप्त आत्मा
स्वालिड शब्द!
लै मंजे लैच झ्याक!
21 Oct 2013 - 8:47 am | इन्दुसुता
कविता अत्तिशय आवडली.
मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी
हे काळजाला घरे पाडणारे !!!
मी कान्हाच्या वेणुमधली उषःकालची नवी भुपाळी
मध्यान्हीची मीच सावली वायुलहर मी सायंकाळी
मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया
अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया
सामर्थ्याची मशाल हाती धगधगणारे दुःख उराशी
युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी
हे विशेष आवडले
21 Oct 2013 - 9:50 am | आनंदमयी
अगदी मनापासून धन्यवाद!!
23 Oct 2013 - 1:20 am | बहुगुणी
तुमच्या कवितांचा चाहता होण्याकडे वाटचाल चालू आहे!
फक्त, अखेरीला:
"मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया
अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया
सामर्थ्याची मशाल हाती ..."
इतकी सगळी सकारात्मक, स्व-सामर्थ्याची जाणीव झालीये असं वाटायला लावणारी भावना असतांना, शेवटी पुन्हा एकदा "युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी" असा अगतिक शेवट नको होता असं वाटून गेलं. अर्थात्, कवयित्री म्हणून तुमचं रचनेचं स्वातंत्र्य अबाधितच आहे.....
युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी
23 Oct 2013 - 12:38 pm | आनंदमयी
धन्यवाद!! आपणास माझी कविता आवडली हे वाचून खूप आनंद झाला...!
शेवटच्या अंतर्यात असणारी सकारात्मकता ही स्त्रीच्या अंगी शाश्वत असणार्या गुणांचे प्रतिबिंब आहे. परंतू तरीसुध्दा त्या गुणांची कदर न करता तिच्यावर अन्यायच केला जातोय हेही सत्य आहे आणि हे चित्र अद्यापही बदलेलं नाही. स्त्री कितीही सामर्थ्यवान असली तरी तिच्या नशीबी अजूनही सीतेसारखा,द्रौपदीसारखा वनवासच आहे... शेवटच्या ओळींमधून हेच प्रतीत करण्याचा प्रयत्न केलाय! आपली सुचनासुध्दा यापुढे लक्षात ठेवेन... :) पुन्हा एकदा अगदी मनापासून धन्यवाद :) :D
6 Jan 2014 - 7:35 am | इनिगोय
सुरेख रचना!
6 Jan 2014 - 11:02 am | आनंदमयी
अगदी मनापासून
धन्यवाद!!!