फिरून सरला काळ,अजुनही घुटमळते मी वळणापाशी
युगायुगांची फरफट तरिही,अजून आहे मी वनवासी
नवा साज अन् नवे रूप मज,भोग तरीही जुनेच पदरी
आसपासचे नवीन चेहरे,जुनीच तरिही नजर विखारी
नवे ध्येय मज गाठायाचे,जुनी तरी भिँतीँची घुसमट
उंबरठ्याच्या पल्याड अजुनी जुनेच भयकंपाचे सावट
जुनीच प्यादी जुनाच पट, परि नवा खेळ हा आयुष्याशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी
अजून उठती शर शंकांचे मर्यादा मी लंघून जाता
जनलज्जेच्या खेळामध्ये हरलेली मी अगतिक सीता
अन् काळोखी वळवणावरती टपून आहे नवा पारधी
नव्या कुरूंनी विटंबिलेली नव्या युगी मी नवी द्रौपदी
मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशी
युगायुगांची फरफट,तरिही अजून आहे मी वनवासी
मी कान्हाच्या वेणुमधली उषःकालची नवी भुपाळी
मध्यान्हीची मीच सावली वायुलहर मी सायंकाळी
मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया
अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया
सामर्थ्याची मशाल हाती धगधगणारे दुःख उराशी
युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासी
© अदिती जोशी
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2403
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुर्रेख!
_/\_ केवळ अप्रतिम
स्वालिड शब्द!
कविता अत्तिशय आवडली.मी माता
मी माता मी भगिनी भार्या,तरी जगाला नकोनकोशीहे काळजाला घरे पाडणारे !!!मी कान्हाच्या वेणुमधली उषःकालची नवी भुपाळी मध्यान्हीची मीच सावली वायुलहर मी सायंकाळी मीच तुझ्या नात्यांची दोरी मीच तुझी ममतेची छाया अडखळता तुज सावरणारी मीच शांतशी शीतल माया सामर्थ्याची मशाल हाती धगधगणारे दुःख उराशी युगायुगांची फरफट तरिही अजून आहे मी वनवासीहे विशेष आवडलेआभार
सुंदर, ओघवती रचना आहे, कविता आवडली.
धन्यवाद!!
In reply to सुंदर, ओघवती रचना आहे, कविता आवडली. by बहुगुणी
सुरेख रचना!
अगदी मनापासून धन्यवाद!!!