ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. ५(अ)

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
28 Oct 2007 - 1:58 pm

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..५

जादूनगरी (पुढे चालू)

ज्युरासिक पार्कमध्ये चिंब भिजून आम्ही पुढच्या शो कडे गेलो."इट्स अ वाईल्ड वाईल्ड वाईल्ड वर्ल्ड!" नावावरूनच स्टंटबाजी भरपूर असणार,याची कल्पना आलीच म्हणा!समोरच मोठ्ठा सेट होता.बँक, सलून,घर,विहिर,फाँसी का फँदा अशा अनेक गोष्टी इंडिकेट केलेल्या होत्या.प्रायोगिक रंगभूमीच्या नेपथ्यासारखा काहीसा प्रकार दिसत होता.समोर नाटक सुरू झालं,भाषा अर्थात समजत नव्हतीच पण अभिनयातून,समोरील दृश्यातून हळूहळू कथानक उलगडू लागलं,एका बँक दरोड्याची गोष्ट होती ती!दोघंजण बँक लुटतात आणि मग मारामारी,हाणाहाणी इ.इ.. शेवटी दुष्टांचे निर्दालन आणि सुष्टांचा विजय!कथानकात काही नाविन्य नव्हते,होते ते सादरीकरणात!आपण त्या बँक दरोड्याचे साक्षीदारच बनून जातो .प्रत्येक ठिकाणी हे जाणवले की आपण तो खेळ नुसता पाहत नाही,तर त्याचेच एक भाग बनून जातो आणि तो थरार प्रत्यक्ष अनुभवतो.

स्टेज २२ या ठिकाणी चक्क इंग्रजी आणि जपानी दोन्ही भाषांमध्ये सिनेमातली ड्रेपरी,नेपथ्यासाठी लागणाऱया वस्तूंचा वापर कसकसा करतात याची माहिती एक जण देत होता.इथे जाणवलेली गोष्ट म्हणजे स्टंटशो सुरू होण्याआधी त्याची माहिती तुम्ही रांगेत उभे असताना मॉनिटरवरून दाखवली जाते. काही ठिकाणी रक्तदाबाचा त्रास असणारे,हृदयविकार असणारे यांना नम्रपणे प्रवेश नाकारलाही जातो.

आता आम्ही "टर्मिनेटर टू डी "साठी रांगेत उभे राहिलो.समोर दिसणार्‍या सज्जातून नाजूक आरडाओरडा करत एक ललना प्रेक्षकांशी जपानीत संवाद साधत हशा पिकवित होती.आम्ही मख्ख! आणि आत कधी सोडतेस बाई? अशा कपाळावर आठ्या!शेवटी एकदाचे आत जाऊन खुर्च्यांवर बसलो.तर ही बया आली की आतसुध्दा!परत आपली तिची बडबड आणि प्रेक्षक संवाद सुरू झाला.हा ३डी शो आहे की हिच्या भाषणबाजीचा कार्यक्रम?एवढ्यात आमच्या डाव्या,उजव्या बाजूंनी तीन तीन महाकाय,बंदूकधारी प्रकट झाले आणि स्वैर गोळीबारच चालू झाला.ती जपानी बाला आणि तिचे साथीदार तिथून लुप्तच झाले आणि समोरच्या पडद्यावरच दिसायला लागले की एकदम!पडदा असं आपलं म्हणायचं, इतका महाकाय पडदा होता तो की प्रेक्षक आणि पडदा असं काही अंतर उरलच नाही.एकदम सगळीकडून धूर यायला लागला,बंदूकीच्या फैरीवर फैरी तर झडतच होत्या.आमच्या खुर्च्यांसकट आम्ही पाण्यातच गेलो की!मोठेमोठे मासे,ऑक्टोपस आमच्या दिशेने चाल करून येऊ लागले तसे आपल्या डोळ्यांवरचे चष्मे कितिक जणांनी काढून टाकले.पाण्यातून आम्ही एकदम परत जमिनीवर आलो,भन्नाट वेगाने मोटरबाईक घेऊन दोन तरुण आपल्याच दिशेने येऊ लागले.आले,आले, आता आदळणारच आपल्यावर! कडाकड आवाज होऊन इमारती कोलमडू लागल्या.अवकाशात युएफओ तबकड्या भिरभिरू लागल्या आणि आता एकदम बर्फाळ प्रदेश दिसायला लागला.आमच्या इथेही गारवा जाणवायला लागला,पाऊस पडायला लागला आणि थेंब टपोरे’ आपल्या अंगावर!एकदम हादरे बसायला लागले, भूकंपच झाला जणू! खुर्चीतल्या खुर्चीत हादरून आपण काय झालं ते पाहिपर्यंत आपण खुर्चीसकट आदळून खाली येतो.अतिशय रोमांचकारी अनुभव घेत बाहेर आलो तर काय?

गाण्याच्या तालावर सारे थिरकत होते.रस्त्याच्या दोबाजूला गर्दी उसळली होती आणि एकेका रथातून ज्युरासिक पार्क मधले डायनॅसोर्स,जॉज मधले शार्क्स,ऑक्टोपस येत होते.लाखो दिलोंकी धडकन मेरेलिन मन्रो होती आणि ००नाना म्हणजे००७ बाँडही होता(जपानीत नाना= सात).हॉलिवूडच्या ताऱ्यांच्या त्या सोंगाना पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली होती,सारे जण त्या परेड बरोबर नाचत,गात पुढे चालले होते.गर्दी असली तरी गोंधळ,धक्काबुक्की मात्र अजिबात नव्हती."ओ भाऊ,व्हा की जरा बाजूला,आम्हालाही पाहू द्यात की परेड.. "असले प्रेमळ संवादही नव्हते.

वॉटरवर्ल्ड मध्ये पाण्यातली स्टंटबाजी पहायची आणि अनुभवायची होती.पाण्यात एक नाटुकलं सुरू होतं.तरुण तरुणी बोटीतून गुजगोष्टी करीत चाललेले असतात,तोच काही चाचे येतात,हल्ला करतात,हाणामारीला सुरूवात होते.उंचावरून उड्या मारणे, दोरीवरून खाली चढणे,उतरणे,एकदम वॉटरस्कूटरवर उडी मारणे,या बोटीतून त्या बोटीत जाणे वगैरे वगैरे..अचानक एक हेलिकॉप्टरही घिरट्या घालायला लागते आणि त्यातून दोरीने काही लोक खाली येतात.डोके बाजूला ठेवून आपण सिनेमात जे जे पाहतो ते ते इथे चालू होते,आपल्या समोर,काही फूटांवर! नाटकाची संहिता नेहमीचीच,घासून गुळगुळीत झालेली!गुंड आणि सज्जन असे दोन गट आणि त्यांची लढाई! अंती सज्जनांचा जय आणि दुर्जनांचा नाश!कोणत्याही हिंदी चित्रपटात खपून जाईल अशी स्टोरीलाईन! पण सगळी मजा होती सादरीकरणामध्ये! त्यातच तर नाटकाचा खरा जीव होता.अस्सल वाटावे असे एकाहून एक स्टंटस,जबरदस्त सकस सादरीकरण आणि त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड! नकळत आपण त्या सगळ्या नाटकाचाच एक भाग बनतो.

ऍनिमल ऍक्टर म्हणजे तर मिनी सर्कसच होती.कुत्रा,मांजर,माकड,घार,ससाणा,पोपट,कबुतरे यांचा खेळ होता तो.मांजर स्टेजवर आलं आणि एका टोपलीत बसलं,ती टोपली एका कप्पीला लावली होती.कुत्र्याने ती दोरी कप्पीने ओढली आणि मांजरीची टोपली वर उचलली गेली.तिथे असलेल्या पाटीचे मग मनीबाईंनी अनावरण केले.पाटी होती ’ ऍनिमल ऍक्टर्स!नंतर एक जपानी युवती आली आणि जपानीत जे काही बडबडली त्यातलं एक अक्षरही समजले नाही.आमच्या पुढेच बसलेल्या एका ललनेने आपल्या उजव्या हातात १००० येनची नोट धरली आणि एक पोपट उडत येऊन चक्क तिच्या हातावर बसला.चोचीत ती नोट पकडून उडाला की भुर्रकन स्टेजवरच्या युवतीकडे.मग झाले कबुतरं,घारी,ससाणे यांचे विभ्रम! माझे लक्ष त्या खेळातून उडाले. गेली की रे त्या बाईची १००० येनची नोट! माझे मध्यमवर्गीय मन म्हणू लागले.आता माकडाच्या माकडचेष्टा झाल्या पण लक्षात राहिलं ते त्याने त्याचा खेळ संपल्यावर टोपी काढून तीन तीनदा कमरेत वाकून केलेले जपानी अभिवादन!अरिगातो गोझायमास! आणि त्या खचाखच भरलेल्या स्टेडियम मध्ये थोड्या वेळाने आला की तो पोपट आमच्या पुढच्या बाईकडे आणि दिली की तिला तिची नोट परत! लोक आता टाळ्या वाजवायला सुध्दा विसरले.

अनेक नवनवीन कुतुहलं साद घालत होती,अजून काही पाहूया,अनुभवूया असं मन म्हणत होतं.दमलेले पाय त्याला साथ द्यायला अगदी तय्यार होते,पण 'वक्त की पाबंदी 'होतीच.नाईलाजाने मागे वळूनवळून पाहत आम्ही बसच्या दिशेने निघालो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

28 Oct 2007 - 6:13 pm | प्रमोद देव

हुश्श ! मी पण दमलो. जबरी निवेदन आणि सुंदर छायाचित्रांनी बहार आणली.

सहज's picture

28 Oct 2007 - 7:38 pm | सहज

हा भाग देखील तितकाच थ्रीलींग हे सांगायला नकोच.

हे असे जेव्हा पहीले अनुभव असतात ना (काही बघीतले, खाल्ले, अनुभवले), तेव्हा असे इतर कूणाला वाटते का हो, की आई-बाबा, भावंड, नातेवाईक, मित्रगण आत्ता बरोबर पाहिजे होते, किंवा ते आले की आता त्यांना इथे नक्की घेऊन येऊया. अमुक व्यक्तिला हे खूप आवडेल. माझे असे होते बॉ.

धनंजय's picture

28 Oct 2007 - 8:40 pm | धनंजय

आवडले. अगदी जिवंत.

राजे's picture

28 Oct 2007 - 8:46 pm | राजे (not verified)

मस्तच.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

बेसनलाडू's picture

29 Oct 2007 - 3:57 am | बेसनलाडू

खूप छान. मजा येते आहे वाचायला. येऊ द्या पुढचे!
(वाचक)बेसनलाडू

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 8:53 am | विसोबा खेचर

वा! ऍनिमल ऍक्टर सहीच वाटले!

अनेक नवनवीन कुतुहलं साद घालत होती,अजून काही पाहूया,अनुभवूया असं मन म्हणत होतं.

स्वाती, तुझ्या समृद्ध प्रवासविश्वाचे आणि त्याचा भरभरून आस्वाद घेण्याचे कौतूक वाटते...

तात्या.

प्राजु's picture

30 Oct 2007 - 12:27 am | प्राजु

स्वाती,
तुझे वर्णन वाचून खरोखर अनुभवत असल्यासारखे वाटते.
खूपच छान.
येऊदे अजूनही.

- प्राजु.

गुंडोपंत's picture

2 Nov 2007 - 5:38 pm | गुंडोपंत

वा स्वाती,
प्रत्येक लेख छानच उतरला आहे.
वाचायला खुप मजा वाटते आहे... परत परत वाचले तरी परत वाचावेसे वाटते आहे.

खुप आवडला हा भागही... प्रतिसाद द्यायला उशीर झाला... पण भाग खुप आवडला..

भाग्यवान आहात! इतके विवीध अनुभव घेवू शकलात!

आपला
गुंडोपंत

स्वाती राजेश's picture

2 Nov 2007 - 4:12 pm | स्वाती राजेश

स्वाती खरेच सुन्दर लिहिले आहेस. मी आज सकाळी एकदम सर्व भाग वाचले.अगदी जपान ट्रिप केल्यासारखे वाटते.

अशीच पुढ्ची ट्रिप सुन्दर होऊ दे.

स्वाती दिनेश's picture

3 Nov 2007 - 12:12 pm | स्वाती दिनेश

अत्त्यानंदजी,सहजराव,धनंजय,राजे,बे.ला,तात्या,प्राजु,गुंडोपंत,स्वाती राजेश
लेख आवडला हे आवर्जून सांगितलेत, मनापासून धन्यवाद.
स्वाती