ले गई दिल 'दुनिया' जापानकी.. २०

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
10 May 2011 - 11:27 am

याआधी: ले गई दिल 'दुनिया' जापानकी..१९
जापानी किस्से

जपानमध्ये राहत असताना काही वेळा भाषिक गमती घडत तर काही वेळा जपान्यांच्या सौहार्दाचा अनुभव मिळे. आमच्या राहत्या जागेपासून कचेरीत जाण्यासाठी सान नो मिया स्टेशनापर्यंत चालत जाऊन मग मॅगनेटिक ट्रेनने पोर्टलंड या कृत्रिम बेटावर जावे लागत असे. ट्रेनने जाताना आपले पास/तिकिट पंच केले की प्लॅटफॉर्मकडे जाणारे दार उघडते आणि आपण आत प्रवेश करु शकतो. पासावर आपल्याकडे कसं पूर्वी फक्त नांव आणि सही असायची ना तसेच येथेही लिहावे लागते. फोटो ,ओळखपत्र असे काही नसते. कोबेत येऊन अगदी आठवडा सुध्दा झाला असेल,नसेल.. पास पंच करुन खिशात ठेवताना एक दिवस आमच्या एका प्रदीप मिश्रा ह्या मित्राचा पास खाली पडला आणि ते काही त्याच्या लक्षात आले नाही. तो कचेरीत गेला आणि परत यायच्यावेळी तिकिट पंच करायची वेळ आली त्यावेळी ह्या महाशयांच्या पास हरवल्याचे लक्षात आले. तो आणि बाकीच्या तिघांचेही चेहरे उतरले. ४००० कि ५००० येन मोजून तो पास काढलेला होता. त्यात तिथे जाऊन आठवडाच झालेला होता. साइटवरच्या स्थानिक मंडळींशी ओळखी जेमतेम झाल्या होत्या, पगार व्हायला अजून वेळ होता, तोपर्यंत बरोबर आणलेले डॉलर्स मोडून जपून खर्च करणे भाग होते. त्यात जपान अतिशय महाग आणि भाषेचा प्रश्न तर पदोपदी ठेचकाळवत होता. आता मशिनमधून तिकिट तरी काढूया आजच्या दिवसाचे आणि मग उद्या बँकेतून येन ट्रान्स्फर करवून परत पास काढू असे त्याला दिनेशने समजावले आणि ते दोघे तिकिटमशिनपाशी आले. तेथे निशिवाकीसान होता, आज बायकोसाठी कार घरी ठेवल्यामुळे तो ट्रेनने जाणार होता. ह्या दोघातिघांचे सचिंत चेहरे पाहून त्याने काय झाले त्याची विचारणा केली आणि सान नो मिया स्टेशनात पासाची चौकशी करायचा सल्लाही दिला. "पासाची काय चौकशी करायची? काउंटर वर जाऊन काढायचा ना, तिथे आहे एक जण इंग्लिश समजणारा," इति दिनेश. पास काढायची चौकशी नाही तर तो पडलेला पास सापडला आहे का ही चौकशी करा असे निशिवाकीसान सांगत आहे हे समजल्यावर हे दोघं त्याच्याकडे काय परग्रहावरुन आल्यासारखा बोलतो आहे असे पाहू लागले. भाषेचा प्रश्न होताच कारण ह्या साहेबांचे इंग्लिशही जेमेतेमेच होते. शेवटी स्वत:ला तिथे यायचे नसताना हा भला माणूस सान नो मियाला उतरला आणि स्वतः प्रदीपच्या पासाची चौकशी केली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा पास स्टेशनमास्तराकडे सुरक्षित होता आणि प्रदीपची ओळख पटवून दुसर्‍या मिनिटाला त्याने पास परत केला.

हरिप्रसाद हा एक हैदराबादी सहकारी , व्हेन देअर इज ब्रेड आय अ‍ॅम डेड .. म्हणणारा. सांबार,भात,रस्सम भाताशिवाय पान न हलणारा! कोबेमध्ये थाइ तांदूळ मिळत असे, तो ह्या बाबाला आवडत नसे म्हणून शेवटी ह्या पठ्ठ्याने टोकिओहून बासमती तांदूळ मागवला. याची बायको एकदा घरातच पाय घसरुन पडली आणि फ्रॅक्चर झाले. डॉक्टरांकडे जायला तर हवे, तिथेही इंग्लिशची ऐशीतैशीच होती. निशिवाकीसान आणि फुजितासानने मदत केली आणि तिला अ‍ॅडमिट केले. पुढचे सगळे सोपस्कार झाले. तिचे प्लास्टरही काढून झाले. डाक्टराचे बिल देऊन झाले,सगळे झाले. आता ह्याची रिएंबर्समेंट इनश्युरन्स कंपनीकडे मागायची वेळ आली. फुजितासानने त्याला डॉक्टरच्या बिलांच्या मूळ प्रती कव्हरिंग लेटर बरोबर कंपनीला पोस्ट करुन फोटोकॉपीज स्वत: जवळ ठेवायला सांगितले तर हे महाशय तिच्याशीच वाद घालायला लागले की कंपनीला कसे समजेल की ही बिले खरीच आहेत? समजा मी डॉक्टरकडून खोटे बिल तयार करुन क्लेम मागितला तर?
आता डॉक्टर खोटे बिल कशाला देईल? ह्या फुजिताबाईंच्या प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे होते पण ते तिला सांगण्यासारखे नसल्याने हरिभाऊंना तेथेच थांबवले.

हॉस्पिटलचा अजून एक अनुभव म्हणजे सुधीर देशमुख कोबेला आला आणि आठच दिवसात तापाने फणफणला ,त्याचा ताप मलेरियावर गेला असल्याचे निदान झाले. जपानमध्ये मलेरियाला हद्दपारच केलेले आहे त्यामुळे डॉक्टरही बुचकळ्यातच पडले. भारतातून येतानाच तो मलेरिया घेऊन आला असावा. त्याला दवाखान्यात दाखल केले . एका पूर्ण मजल्यावर फक्त त्यालाच आयसोलेट करुन ठेवले आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांची मलेरियाचा रोगी पाहण्यासाठी रीघ लागली.

आमच्या तुटपुंज्या जपानीमुळे तर गमतीच गमती होत. आमचा दूध,तेल,बटर इतकेच काय पावांचाही नेहेमीचा ब्रँड ठरलेला असे. एकदा ब्रेडमधून मासे निघाल्यानंतर आम्ही प्रयोगांच्या फंदात न पडता रोजसाठीच्या वस्तू ठराविक ठिकाणाहूनच खरेदी करत होतो.आमचे ब्रजेन बाबू इंदौरचे, एकदा त्याला रबडी खायची लहर आली. तो दाइ याइ तून नेहमीपेक्षा डब्बल येन मोजून महागाचे दूध घेऊन आला. महाग दूध म्हणजे दाट दूध ,जास्त फॅट वाले दूध असं त्याचं लॉजिक काही चुकीचं नव्हतं. पण दूध आटवायला ठेवले तर ते फाटायलाच लागले. वैतागून गॅस बंद करून त्याने दिनेशला फोन लावला. आमच्यातल्या अविनाशला (डिक्शनरीच्या सहाय्याने का होईना) थोडेफार जपानी लिहिता वाचता येत होते. ब्रजेन आमच्या घरापासून अगदी जवळच १० मिनिटाच्या अंतरावर राहत होता.त्यामुळे लगेचच आम्ही ब्रजेनच्या घरी गेलो. दुधाच्या खोक्यावरची चित्रलिपी वाचून अविनाशने ते मिल्क नसून बटरमिल्क असल्याचा शोध लावला!

एकदा असेच खरेदीसाठी मी आणि दिनेश बाहेर पडलो होतो. एका दुकानात लावलेल्या जीन्स पाहून माझ्या बहिणीसाठी जीन्स घ्यावी असा आम्ही विचार केला. आता मी अंमळ गुटगुटीत आहे आणि माझी बहिण एकदम सडसडीत, त्याला मी काय करणार? तिच्या वेस्ट साईजची जीन्स मी ढिगार्‍यातून शोधून काढली की तिथला सेल्समन टेप माझ्याभोवती गुंडाळे, माझ्या हातातल्या जीन्सचा साइज दाखवे आणि मोठ्या साइजची जीन्स आणून देई. असे ३,४ दा झाले. दिनेशने त्याला येत असलेल्या जपानीत समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग नाही. शेवटी दिनेशने त्याच्याकडे कागद आणि पेन मागितले. दोन मुलींची चित्रे काढली. एक बारीक आणि दुसरी जाड. जाड चित्रावर एक बोट ठेवले आणि दुसरे माझ्याकडे दाखवले. बारीक चित्रावर इंडिया असे लिहिले आणि ह्या मुलीसाठी जीन्स हवी आहे असे सुचवण्याचा प्रयत्न केला. हीच गोष्ट त्याने ३,४ दा समजावून सांगितली तेव्हा तरी बाबाला काही समजेले की नाही कोण जाणे? कारण आम्ही निवडलेली जीन्स पॅक करताना मला ही जीन्स कशी होणार नाही आणि त्यातलाच दुसरा मोठा साइज देतो असे परत परत तो सांगत राहिला. शेवटी वैतागून म्हणाला, ही जीन्स तुला होणार नाही हे शेवटचं सांगतो, घरी घेऊन गेल्यानंतर परत करायला आलीस तर बदलून देणार नाही. एकदाचे कसेबसे त्याच्या तावडीतूनआम्हाला हवी असलेली जीन्स सोडवून घेऊन तेथून निघालो.

अशा गाभुळलेल्या चिंचांसारख्या आंबटगोड गमतीजमती अनुभवत आम्ही कोबेमध्ये राहत होतो.

प्रवासलेख

प्रतिक्रिया

सामान्य वाचक's picture

10 May 2011 - 12:42 pm | सामान्य वाचक

वेळ मिळाला का लि़खाणाला?

येऊ द्यात आण़खी.

मुलूखावेगळी's picture

10 May 2011 - 1:42 pm | मुलूखावेगळी

छान किस्से ग
अवांतर-
हे हरीप्रसाद, मिपावरील तर नव्हेत ना ;)

स्वाती दिनेश's picture

11 May 2011 - 8:41 pm | स्वाती दिनेश

नाही ग, मिपावरचे हरिप्रसाद वेगळे, ते वायले हे वायले.. ते हे नव्हेत ;)
स्वाती

सहज's picture

10 May 2011 - 3:26 pm | सहज

मस्त किस्से!!

मजेदार किस्से आहेत.
मलोरियाचा किस्सा वाचून गुंड्याभाऊच्या दुखण्याची आठवण झाली.
जीन्सचा किस्सा तर ग्रेटच आहे.

मृत्युन्जय's picture

10 May 2011 - 6:03 pm | मृत्युन्जय

छान लिहिले आहे. आता पहिले १९ भाग वाचणे आले.

श्रावण मोडक's picture

10 May 2011 - 7:11 pm | श्रावण मोडक

बिल्ली बोलू... आपलं लिहू लागली. ;)

नगरीनिरंजन's picture

10 May 2011 - 9:47 pm | नगरीनिरंजन

२० ते ८ पर्यंत भाग उलट्या क्रमाने एका दमात वाचून काढले. आमचा तुम्हाला टोपीपडेल सलाम!
तोक्योत काढलेल्या दोन महिन्यांचा पुनःप्रत्यय आला आणि उर्वरित जपान पाहण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.

यशोधरा's picture

10 May 2011 - 10:06 pm | यशोधरा

बर्‍याच दिवसांनी लिहिलेस स्वातीताई. :) छान, वाचतेय गं. आता पटपट पुढचे भाग टाक.

प्राजु's picture

10 May 2011 - 10:33 pm | प्राजु

आफ्टर ह्युऽऽऽऽऽऽज ब्रेक , स्वातीताई'ज ब्यॅक!
मस्त लेख.

वा बरेच दिवसांनी स्वयंपाक घरातुन मोकळीक मिळाली वाटते.
किस्से बाकी एक से बढकर एक आहेत.

पाषाणभेद's picture

11 May 2011 - 12:24 am | पाषाणभेद

हॉस्पिटलचा किस्सा तर अफलातून आहे.
एकुणच जापनीज लोक फार काटेकोर असतात.
शिन्चॅन सिरीज सारखा मनमोकळेपणापण असतो का तेथे?

विसोबा खेचर's picture

11 May 2011 - 9:38 am | विसोबा खेचर

मस्त.. :)