आजकाल व्यवस्थितपणाचा रोग खूप पसरू लागला आहे. एका सर्वेक्षणानुसार जगातील बरेच (***) टक्के लोक आजकाल व्यवस्थित होऊ लागले आहेत. कित्येक लोकांना तर कळतही नाही कधी आपण व्यवस्थित झालो आणि कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो व पुन्हा अव्यवस्थित होणे फार अवघड होऊन बसते. ही खालची प्रश्नावली तुमची आत्ताची लेव्हल कळण्यासाठी उपयोगी पडेल.
खालील प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरांमधे तुमचे उत्तर "अ" असेल तर प्रत्येकी १००० गुण, "ब" असेल तर प्रत्येकी १०० गुण व "क" असेल तर प्रत्येकी १ गुण धरा व शेवटी बेरीज करा.
प्रश्नावली सोडवण्याआधी: हे पान प्रिंट करा व नीट ठेवून द्या. उद्या याच वेळेस ते पान सापडले नाही तर तुम्ही ही प्रश्नावली सोडवण्याची गरज नाही, फक्त आपला अव्यवस्थितपणा नीट सांभाळा. अधिक माहितीसाठी तुमच्या "अव्यवस्थितपणा सल्लागारा" शी संपर्क करा.
आता प्रश्नावली:
१. लग्न, पूजा किंवा 'एथनिक' कार्यक्रमासाठी तुम्ही निघायच्या तयारीत आहात. झब्बा किंवा त्यातून डोके घालायचा कोणताही शर्ट इस्त्री करून आलेला आहे. त्याची डोके जाण्यासाठी आवश्यक असणारी बटने तुम्ही कधी काढता?
अ. घडी उलगडायच्या सर्वात आधी.
ब. घडी उलगडून त्याची इस्त्री नीट चेक करतो, एखादा चिकटलेला धाग्याचा तुकडा काढून टाकतो व मग बटने काढतो.
क. तो घालताना डोक्यात अडकला की हात वर करून बटने शोधतो.
२. तुमच्या घरात हुकमी चालणारी पेन्स व सगळीकडे सहज दिसणारी एकूण पेन्स याचे गुणोत्तर काय आहे?
अ. शंभरः फोन शेजारी, कॅलेंडर वर व्यवस्थित चालणारी पेन्स नेहमी नीट ठेवलेली असतात. न चालणारी पेन्स लगेच पुन्हा चालू करतो किंवा टाकून देतो.
ब. शून्यः एकही पेन चालत नाही.
क. शून्य ते शंभरः बरीच चालू आहेत पण चालणारे नेमक्या वेळेला सापडत नाही. "पॉश" दिसणार्या पेनांमधे रीफिल नसते. मागचे बटन पुश करून चालू/बंद होणारी बॉलपेन्स प्राचीन काळापासून एकाच स्थितीत आहेत - ते बटन कायमचे दाबलेल्या अवस्थेत आहे किंवा खाली/वर कोणत्याही अवस्थेत केले काहीच फरक पडत नाही. टोपणवाली पेन्स व ती टोपणे "लंबी जुदाई" मोड मधे आहेत.
३. तुमच्या किल्ल्या सहसा कोठे असतात?
अ. भिंतीवर एक किल्लीच्याच आकाराचा किल्ली होल्डर आहे, त्यावर. कीचेन च्या रिंगांमधून किल्ल्या बाहेर येऊ पाहात नाहीत ना हे रोज चेक करतो.
ब. एक फॅन्सी बाउल आहे त्यात. कधीकधी इकडेतिकडेही असतात.
क. घरात आल्यावर पहिली जागा दिसेल तेथे, किंवा जेथून किल्ली स्वतःहून खाली पडत नाही अशा कोणत्याही जागी, बाहेर असताना ज्या हातात जड गोष्ट धरलेली आहे त्याबाजूच्या खिशात इतर दहा गोष्टींच्या खाली असतात, व बाहेर काढताना त्यातील किमान दोन गोष्टी खाली पडतात.
४. तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
ब. फोन आल्यावर किंवा करताना 'टॉक' बटन दाबायच्या आधी कानावर लावतो.
क. फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.
५. तुम्ही गाडी केव्हा धुता?
अ. मी दर रविवारी सकाळी साडेसात वाजता (आपोआप, गजर न लावता) उठून बाहेर गाडी धुतो. माझ्या गाडी धुण्याच्या वेळेप्रमाणे आजूबाजूचे लोक घड्याळे लावतात, व पक्षी/खारी वगैरे पाणी प्यायला आधीच जमा होतात.
ब. दर तीन चार महिन्यांनी, गाडी ओळखू येईनाशी होते तेव्हा, किंवा धुळीत "वॉश मी" वगैरे लोक लिहून जातात तेव्हा.
क. दर पावसाळ्यात आपोआप धुतली जाते.
६. तुमचे रिमोट्स कोठे असतात?
अ. टीव्हीच्या कपाटात प्रत्येक रिमोट साठी स्वतंत्र योग्य आकाराचा कप्पा केलेला आहे व त्यावर कोणत्या रिमोटसाठी ते लिहीलेले आहे. वापरून झाल्यावर प्रत्येक रिमोट त्याच्या कप्प्यात ठेवतो. कोचवर बसलेलो असताना आवाज वाढवायचा असेल्/चॅनेल बदलायचे असेल तर उठून रिमोट काढतो, वापरतो व परत ठेवून देतो. दर सहा महिन्यांनी बॅटरी बदलतो व रिमोट परत कप्प्यात ठेवून त्या बॅटरीज इ-वेस्ट सेंटर मधे देऊन येतो.
ब. बहुतेक वेळेस कॉफी टेबलवर. कधीकधी शोधावे लागतात.
क. जो रिमोट हवा आहे तो नेमका कोचाच्या उशांखाली, कोचाच्या खाली, खेळण्यांमधे किंवा "इकडे कोणी ठेवला?" विचारण्यासारख्या अनेक ठिकाणी असतो. शोधायच्या नादात ५-१० मिनीटे सहज जातात. कधीकधी तर तेव्हा सापडतच नाही पण नंतर दुसरे काहीतरी शोधताना सापडतो. त्यावेळेस नको असलेले रिमोट्स अगदी समोर ठेवण्याच्या बाबतीत मात्र मी एकदम टापटीप आहे.
७. तुमच्या मित्रांचे/ओळखीच्यांचे फोन नंबर कसे लक्षात ठेवता?
अ. मला सगळे पाठ आहेत.
ब. मी आजवर आलेला वा केलेला प्रत्येक फोन नंबर माझ्या सेल फोन मधे कॉन्टॅक्ट्स मधे आहे.
क. जेव्हा गरज पडेल तेव्हा आधी मागितल्यावर आलेल्या मेल मधून शोधतो (आधी जीमेल, मग याहूमेल या क्रमाने), अगम्य नावाच्या फाईल्स उघडून त्यात लिहीलेला आहे का पाहतो. पोस्ट-इट नोट्स, बिलांच्या मागच्या बाजू वगैरे ठिकाणांहून मिळवतो. नंबर बरोबर नाव लिहीलेले नसल्यास 'असाच काहीतरी नंबर होता' एवढा आत्मविश्वास आल्याशिवाय तो ट्राय करत नाही.
८. बर्याच कारणांनी तुमच्याकडे आलेल्या पावत्यांचे तुम्ही काय करता?
अ. माझ्या नोंदवहीत कोणती पावती किती दिवस ठेवायची याचा चार्ट आहे. रोज रात्री एकदा त्यादिवशीच्या पावत्या त्याप्रमाणे लावतो, व योग्य दिवशी फाडून/श्रेडर मधे घालून टाकतो.
ब. इतर बिलांबरोबर असतात. अधूनमधून फाडतो.
क. पँटच्या मागच्या खिशात "जाणार्या पावत्या दिसतात पण येणार्या दिसत नाहीत". पॅण्ट धुवून परत आल्यावर कागदाचे बोळे तेथून खाली पडतात. त्यातील एक दोन कधीकधी उलगडून ते बसचे तिकीट होते, की रेस्टॉरंटची पावती, की सिनेमाचे तिकीट हे शोधण्याचा प्रयत्न करतो. "अरे ही परवा आपण शोधत होतो ती पावती" हा खूप कॉमन संवाद आहे.
९. इतरांच्या तुमच्याकडे किंवा तुमच्या इतरांकडे विसरलेल्या गोष्टी
अ. माझ्याबाबतीत असे कधी होतच नाही. इतरांनी आमच्याकडे येताना बरोबर आणलेल्या गोष्टी आयफोनच्या कीबोर्डच्या दाबलेल्या बटनांप्रमाणे मला इतर गोष्टींच्या मानाने कायम ठळक व मोठ्या दिसतात. विसरण्याचा प्रश्नच नाही.
ब. पुन्हा आठवेल तेव्हा.
क. सहसा ती गोष्ट द्यायला म्हणून जायचे ठरवतो व तीच गोष्ट न्यायची विसरतो. माझ्या विसरलेल्या गोष्टी शिफ्टिंग्/मूव्हिंग करताना वेगळ्या काढून मित्र नेण्यासाठी फोन करतात.
आता उत्तरांची बेरीज करून एकूण गुण पाहा:
गुणः ५००० व जास्तः आपल्या चरणकमलांवर पाणी घालून ते तीर्थ विकायला ठेवा. जोरात खपेल. 'दिल चाह्ता है' मधल्या सुबोधचा रोल तुम्हाला न देता त्या दुसर्या कोणाला कसा दिला याची कागदपत्रे काही वर्षांनी खुली होतील तेव्हा आधीच त्यावर पुस्तक लिहा.
गुणः ५०० पेक्षा जास्त पण १००० पेक्षा कमी: तसा प्रॉब्लेम नाही पण दर सहा महिन्यांनी ही प्रश्नावली चेक करा.
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन! तुम्हीही अधूनमधून ही प्रश्नावली चेक करायला हरकत नाही पण तुम्हाला वेळच्या वेळी ही सापडणे अशक्य आहे. तेव्हा नाद सोडून द्या.
(***) ते सर्वेक्षण छापून आणले होते पण लेख लिहीताना सापडले नाही.
प्रतिक्रिया
10 Nov 2012 - 12:46 am | कवितानागेश
च्यायला.
७ नम्बरचा प्रश्न वाचायचा विसरुन जाते.
मग ९/९ मार्क! ;)
10 Nov 2012 - 1:28 am | रेवती
४४०० मार्क मिळालेत परिक्षेत. प्रश्न ६ व ९ यांचे अगदी बरोबर पर्याय उपलब्ध नाहीत म्हणून आसपासचे दिलेत.
10 Nov 2012 - 1:43 am | बहुगुणी
Thankfully, माझी बहुतेक (*) उत्तरं 'ब' वर्गात मोडतात, त्यामुळे ४००० च मार्क्स :-) (वाचलो!)
(*) ब्लूटूथ हैच नही अपने पास! त्यामुळे त्या प्रश्नाला उत्तर नाही.
बाकी लेखनाची खुसखुषीत भाषा आवडलीच!
10 Nov 2012 - 2:59 am | रामपुरी
९ गुण मिळवून भरून पावलो. फक्त पहिल्या प्रश्नात मुळात इस्त्रीच करत नसल्याने फक्त वरची एकच गुंडी (जी आधीच्या वेळॅस सदरा हँगरवर बसावा म्हणून लावलेली असते) शोधून काढावी लागते.
10 Nov 2012 - 6:22 am | गवि
खदाखदा हसत , डोळ्यात पाणी आणि ठसका अशा पार्श्वभूमीवर प्रश्नावल्या भरणं अशक्यच बुवा.
10 Nov 2012 - 6:55 am | रेवती
म्हणजे काय? हा चेष्टेचा धागा आहे का?
हरे राम! मी मारे शिरेसली उत्तरं शोधली.
10 Nov 2012 - 8:01 am | अन्या दातार
सगळेच पर्याय क्र. १ अतिभिकार आहेत. कोण लिहिलेत ते??
10 Nov 2012 - 9:17 pm | आनंदी गोपाळ
फारएन्ड असं काहीतरी नांव आहे लेखकांचं. तुमच्याकडे दिसत नाहिये का?
10 Nov 2012 - 8:08 am | ५० फक्त
धागा वाचनखुण साठवला आहे, पिडिएफ करुन दोन मेल आयडिवरुन बाकीच्या सहा मेल आयडिना मेल करुन ठेवला आहे, कारण
गुणः १० पेक्षा कमी: अभिनंदन!
10 Nov 2012 - 10:49 am | शिल्पा ब
मी लाख व्यवस्थीत आहे पण लेक अन नवरा सगळा पसारा करुन ठेवतात अन एक्कही वस्तु जागेवर सापडत नाही.
10 Nov 2012 - 10:55 am | संजय क्षीरसागर
छान निरिक्षणं आहेत
10 Nov 2012 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
काही टीप्स उपयोगाच्या आहेत. :)
बाकी,
तुम्ही सेल फोनवर बोलताना ब्लू टूथ कधी कानाला लावता?
अ. ते नेहमी कानावरच असते. आंघोळ करताना शॉवर कॅप त्यावर घालतो.
खपल्या गेलो आहे. :)
-दिलीप बिरुटे
10 Nov 2012 - 3:36 pm | सोत्रि
हे अशक्य आहे अगदी, साफ खपल्या गेले आहे :)
- (हसून हसून खपल्या गेलेला) सोकाजी
11 Nov 2012 - 12:36 am | बॅटमॅन
खपल्या जायला जखमा आणि कसल्या झाल्या हो तुम्हांला सोत्रिअण्णा ;)
(छिद्रान्वेषी) बॅटमॅन.
10 Nov 2012 - 12:09 pm | इरसाल
अतिशय सुव्यवस्थित ह्या प्रकारात मोडतो.
द्वैत स्थितीत गुणमापन करावयास गेलो तर ९००० हजार ही गुण्संख्या पुरेशी नाही हे नमुद करु इच्छितो. ५ एस चा परिणाम म्हणावा लागेल रिट्रीव्हल वेळ १० सेकंदापेक्षा कमी आहे.
10 Nov 2012 - 12:20 pm | संजय क्षीरसागर
कोणते आहेत?
म्हणजे काय?
10 Nov 2012 - 12:29 pm | इरसाल
५ एस हे
http://en.wikipedia.org/wiki/5S_%28methodology%29
आणी मिपावर काही मंडळी स्वतःला देवादिकांच्या पलिकडले(अद्वैत) समजतात म्हणुन मी द्वैतात आहे असे नमुद केलेय.
10 Nov 2012 - 12:58 pm | संजय क्षीरसागर
मी एकच एस वापरतो : सिंप्लिसिटी!
आणि जगणं तर सगळं द्वैतातच आहे. अद्वैताबद्दल म्हणाल तर तिथे मेथडॉलिजी नाही, कारण ती स्थिती आहे.
10 Nov 2012 - 12:33 pm | sagarpdy
५०० ते १०००
या प्रकारचे लोकं कान कधी धुतात हो ?
10 Nov 2012 - 12:40 pm | सहज
जबरी निरीक्षण!
10 Nov 2012 - 12:43 pm | खटासि खट
५०२७
10 Nov 2012 - 12:48 pm | sagarpdy
गणित नाय जमले बुवा !
11 Nov 2012 - 12:04 am | खटासि खट
पुन्हा करून पहा.
10 Nov 2012 - 2:40 pm | सस्नेह
हा हा हा !
निव्वळ खुसखुशीत !
मार्क मोजायच्या भानगडीत न पडलेलं बरं (!), अशी कंडिशन आहे...
10 Nov 2012 - 3:03 pm | पैसा
मला एकदा ९ तर एकदा ९००० मिळू शकतात. कारण घरातल्या गोष्टी जागच्या जागी [दोन्ही प्रकारात] ठेवण्यात घरातल्या सगळ्यांचाच हातभार असतो. त्यामुळे मै कहां हूं?
10 Nov 2012 - 6:00 pm | किसन शिंदे
भारी प्रश्नावली.
बायकोला दाखवली तर म्हणेल रोजच्या रोज वाच! :D
10 Nov 2012 - 6:15 pm | श्री गावसेना प्रमुख
१२०६फोन उचलून १०-१२ वेळा 'हॅलो' म्हणून काहीच ऐकू आले नाही, "च्यायला, सिग्नल नसताना फोन कशाला करतात कोणास ठाऊक" वगैरे करून झाल्यावर मग ब्लू टूथ कनेक्टेड असल्याने फोन मधून काहीच ऐकू येणार नाही हे लक्षात आल्यावर.
करीत र्हायच.
हे छान कारण आहे, असे बर्याच वेळेला घडलय,नुसतच
10 Nov 2012 - 7:48 pm | सुहास..
???
फार्याला अचानक काय झाले ब्वा ? ;)
11 Nov 2012 - 8:23 am | मदनबाण
मला वाटतं मी व्यवस्थितपणे अव्यवस्थित आहे ! ;)
11 Nov 2012 - 1:29 pm | चिगो
बहूतेक प्रश्नांत १च मार्क.. ७व्यात शंकेस जागा आहे. (पर्याय ब) बाकी अव्यवस्थित जगण्यात आपलं व्यवस्थित चाललं आहे.. ;-)
5 Sep 2017 - 11:41 am | राघव
अरेच्चा ! हा लेख कसा काय सुटला.. ;-)
मस्त प्रश्नावली!
बायकोनं सांगीतलं की याचं प्रिंट काढून डेस्कटॉप वर लावून ठेव व दर तासाला वाचत जा!! :D