'आसरा'- अर्थहीन....... तुझ्याविना!! (भाग- २)

वेणू's picture
वेणू in जनातलं, मनातलं
4 Apr 2012 - 5:20 pm

- कथेचा पहिला भाग: http://www.misalpav.com/node/21209 इथे आहे..

-------------------------------------------------------------------------------

.....भराभर पाऊलं उचलत ती निघाली... छातीशी पदर घट्ट आवळून... जणू सांडल्या असत्या भावना रस्ताभर.. हातातले पत्र अजूनच चुरगाळत!!

पापणीतले पाणी परतवत...रस्ता कापत ती देवळाच्या आवाराशी येऊन थांबली!
तिथे पोहोचताच, संथ नदीवरून आलेल्या हवेच्या झोताने जरासं हलकं वाटल्यासारखं झालं तिला..

देवळाच्या अगदी पायरीशीच बसली ती!

गर्द झाडाच्या साउलीत वसलेलं ते देऊळ!
समोर वाहती नदी, काठावरची लहान-मोठी झाडं, गार वार्‍याची येणारी सततची झुळूक....चित्त जरा शांत झालं तिचं...

कधी नव्हे ते आज, 'आसर्‍यात' घुसमटली होती ती..

देवळामागे उभ्या असलेल्या निलगीरीच्या झाडांची सळसळ ऐकत ती शांत बसून होती.

देवळात येणारे- जाणारे, तिला 'एकटीला' अशी पायरीशी पाहून स्तब्ध झाले होते, तिला ओळख दाखविणारा नमस्कार करून ते आत दर्शनाला जात!

शांत वातावरणात घंटेचा नाद मंगलमय वाटत होता, मंदिरात दरवळणारा धूप अन् फुलांचा संमिश्र सुवास, तिला कुरवाळत होता!

आज 'एकटेपणाची' भावना तिला बोचत होती, तिचा भूतकाळ तिला खुपत होता!!

१६ वर्षांपूर्वीच्या काळात ती अलगदच शिरली! अंतर्मुख होत, स्वतःशीच बोलत...

नव-नवेली नवरीचा साज!...

हातभर चुडा... हिरवीकंच साडी.. गडद रंगलेली मेहंदी... नाजूक पण उठावदार मंगळसूत्र... केसांचा गच्च अंबाडा अन त्यावर जाई-जुईचा गजरा...!!!

दादांनी माप ओलांडायला सांगितलं नि मला बंगल्यात घेतलं,
गावच्या सरपंचाच्या इभ्रतीला शोभेल ह्या थाटात त्यांनी त्यांच्या सुनेला घरात आणलं...!

माझ्यासारख्या पोरक्या पोरीला त्यांनी सूनेपेक्षा जास्त लेकीसारखाच जीव लावला!

आई-बाबा तर कधी मला आठवलेच नाहीत, आठवलं ते फक्त 'पोरकेपण'!
काका- काकूंकडेच लहानाची मोठी झाले, कजाग काकूंच्या हाताखाली मोठं होताना संगीताचे धडे गिरवले!
काका एक अत्यंत उच्च दर्जाचे शास्त्रीय संगीत गायक होते, त्यांच्या गायकीत सारे रस उतरत असत!

काकांच्या सोबत कार्यक्रम करता- करता मी ही गायला लागले, आधी काकांची साथ म्हणून, नंतर स्वतंत्र गायिका म्हणून!

माझी शैक्षणिक प्रगती आणि गायिका म्हणून मिळणारे नाव, काकूला दिवसेंदिवस खुपू लागले, घरातली पडेल ती कामं करूनही ह्या ना त्या कारणांवरून तिचा आवाज चढत असे... अपमानाशिवाय काही मिळत नसे... माझ्या ह्या घरात येण्याचा आणि तिच्या पोटच्या मूलीला देवाज्ञा होण्याचा काहितरी विचित्र संबध लावून आजन्म मला कोसत होती!

"हिला उजवून टाका एकदाची आणि मुक्त व्हा" असे ती सारखी काकांना ऐकवे.

त्यातच एके दिवशी अचानक 'राजीव' घरी आले.....!

"किशोरींचे घर हेच का?"

"होsss, य्या आत, ह्याच घरात तुकडे मोडते त्ती!"

काकूच्या चढल्या आवाजाने मी आणि काका बाहेर आलो, काकांनी काकूला घरात पाठवलं,

"या, बसा, कोण आपण?" काका विचारते झाले!

"मी राजीव, चंदनपूरच्या सरपंचांचा मुलगा, जरा बोलायचं होतं, तुम्ही किशोरीचे वडील का?"

"तिच्या वडिलांसारखाच, बोला, कुठे कार्यक्रम आहे काय? निमंत्रणाला आलात?"

बिनधास्त खळाळून हसत राजीव म्हणाला...

"नाही, नाही! आज दुपारच्या किशोरींच्या आणि तुमच्या कार्यक्रमाला उपस्थित होतो, दुर्गापूरात.....! पत्ता काढत घरी आलो आहे तुमच्या, किशोरींचा हात मागायला, त्यांना माझी धर्मपत्नी करू इच्छितो, ह्या सूरसम्राज्ञीला आमच्या बंगल्याची 'राणी' करू इच्छितो....."

आम्ही अवाक्क!

"अहो, राजीवसाहेब, पण......"

"हो काका, तुम्हाला वाटेल, ह्या सार्‍या गोष्टी वडीलधार्‍यांनी करायला हव्यात, पण काय करता, मी हा असा 'लहरी'... मनात आलं, ठरवलं आणि कृतीत आणलं, असा स्वभाव...... होकार हवाय तुमचा"

बापरे.....
मी प्रचंड चकित झले, केव्हढा तो आत्मविश्वास? तो निर्धार, ती बोलण्यातली तडफ, तो प्रामाणिकपणा- की मी हा आहे- असा आहे!!

दिसण्यातला रूबाब तर अवर्णनीयच.....

हे सारं पाहून वाटलं की... जणू काही
माझ्या मनी दडपून टाकलेलं स्वप्नच आज कोषातून अलगद बाहेर पडलं... फुलपाखरू झालं.... पाखराच रुपांतर हलकेच 'राजीव' मधे झालं... काही क्षणात कित्येक रंग दिसले...प्रसन्न आस्त्तित्त्व, विचार करत बोलण्याची लकब, निखळ हास्य आणि......मग त्याचे चमकदार डोळे माझ्यावर पडताच मी एकदम
भानावर आले...

काका तर स्तब्धच!!!!!

पोरीचा 'उद्धार' करणाराच जणू चालत घरी आलाय असं वाटलं असावं त्यांना!!

सरपंचांचा मुलगा स्वतःहून घरी येतो काय, पोरीचा हात मागतो काय? इतक्या मोठ्या घरची सून होईल पोर माझी.... विचारानेच गहिवरले काका माझे!

"राजीवसाहेब, पण ह्या पोरीला द्यायला माझ्याजवळ काही नाही, चांगलं शिक्षण देऊ शकलो फक्त! आमची 'ही' कितीही विरोधात होती- तरी प्रसंगी पोटाला चिमटा काढून हिला मी शिकवलंय आणि माझ्या गायनाची विद्या सढळ हातानी दिलीये तिला मी....बास.. इतकेच आहे गाठीशी"

"काका, आज त्या गायकीच्या ताकदीनेच तर मला खेचून आणलंय इथे...
तुमचा होकार गृहीत धरतोय
दादा येतीलच पुढील बोलणी करायला.......

येतो मी! किशोरी, तुम्हाला घेऊन जायलाच येईन आता...."

बापरे, क्षणांत नव्हत्याच "होतं" झालं होतं...! आनंदाला पारावर उरला नाही..

आणि कालचक्र गतिमान झाले.....

वेळ बदलली, की सुखही येते नांदायला, असा अनुभव तो!

दादा आले,
बोलणी झाली,
मुहूर्त ठरले..... जागा ठरली...
"फक्त मूलगी द्या- तिला आम्ही जपू" आश्वसक शब्दांची देवाण- घेवाण झाली....

काका धन्य झाले... भरून पावले... पोरीचं भाग्य बदलणार ह्या विचारात समाधानी दिसत होते..

"दादा"
चंदनपुराचं एक मानलेलं 'बडं' प्रस्थ!
शिस्तप्रिय, न्यायप्रिय, जनप्रिय असे!

त्यांची सून होण्याचं भाग्य मला लाभलं!

त्यांच्या प्रतिष्ठेला शोभेल असं माझं लग्न झालं.....
माझी काकू, आशीर्वाद देण्यापूरतीही आली नाही मंडपात... काकांनीच कन्यादन केलं!

गहिवरल्या डोळ्यांनी निरोप देताना काका एवढंच म्हणाले, "बाळा, तुझ्या वडिलांच्या जागी असुनही फारसं करु शकलो नाही तुझ्यासाठी, पण तुझं गाणं थांबवू नकोस, सरस्वती आहे तुझ्या गळ्यात.... माझ्या घराने तुला दु:ख- उमाळ्यांशिवाय काही दिलं नाही... दिल्या घरी सुखी रहा, इकडे परतू नकोस, आठवण आली की कळव मी येतोच तुला भेटायला....."

आयुष्य बदलतं म्हणतात लग्नानंतर पण; माझ्यासाठी तर एक नवं पर्व सुरू झालं होतं!

एका लहानग्या घरातून महालात प्रवेशले मी...

दादा आशीर्वाद देताना म्हणाले, "सुनबाई, तुझ्या रुपात मालकिण आली ह्या ऐशर्याला...."
'ही' गेल्यापासून पोरकं होतं हे घर आणि राजीवही... सांभाळ सारी सत्ता आता, मी निर्धास्त झालोय...!!"

खरंच, दादांनी काय नाही दिलं मला....?
आधी तर माळावरची खोली- माझ्या रियाजासाठी, 'एक स्वतंत्र खोली!' फार मोठी भेट होती ती...

घरात चाकर माणसांचा राबता...

मला माझ्या भाग्यावर, राजीवच्या हास्यावर, दादांच्या असण्यावर, बंगल्याच्या आस्तित्त्वावर कशा म्हणून कशावर विश्वास बसत नव्हता...! सारं खरं आहे का? हे सारं माझं आहे का? हेच उमजत नव्हतं, कित्येक दिवस...!!

हळू-हळू सरावले, नव्या आयुष्याला.... मालकिण बनून वावरू लागले... रुबाबात वावरताना मनात काकांची आठवण मात्र सतत ताजी असायची...
जसे जसे दिवस सरू लागले, सगळयांचे स्वभाव समजू लागले, ह्यांचा स्वभाव मात्र जास्तच खटकू लागला...

लग्नानंतर मी माझा रियाज अन गावोगावची कार्यक्रमं मात्र सुरू ठेवली ते दादांची हरकत नव्हती म्हणूनच.. कारण 'हे' कधी माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत... आग्रह केला की अंगावर ओरडून म्हणायचे, "तुझी तू जा ना.... मी अडवलय? माझ्या का मागे लागतेस? माझे पुष्कळ व्याप आहेत माझ्यामागे..."

ते फारच आनंदात असले की मला घेऊन, सांयकाळी टेकडीवर फिरयला जात, गावच्या टेकडीवर! मग भरभरुन बोलत असत... त्यांच्या बालपणाबद्दल, आईच्या अवेळी जाण्याबद्दल, दादांच्या स्वभावबद्दल..!!

ह्यातून समजत गेलं की,

दादा फारच जास्त शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाचे होते आणि आई मात्र फार प्रेमळ व इतरांना मदत करण्याच्या प्रवृत्तीच्या होत्या... पैसा कमाविणे व मोजका खर्च ह्यावर दादांचा भर होता तर सढळ हस्ते दान हा आईंचा खाक्या...

कुठल्याश्या आजारपणात एकाएकी आईंचे देहावसान झाल्यापासून राजीव अगदी लहानपणीच एकटे पडले.. फारसे मित्रही नव्हते त्यांना कधी... एकटं राहणे, एकटेच अभ्यास करणे, खेळण्यात फारशी नसलेली आवड आणि घरातला दादांचा काटेकोर स्वभाव ह्याने 'लहरी' स्वभाव झाला ह्यांचा....

शालेय शिक्षण चंदनपुरात घेऊन, शहरी जाऊन पदवीचे शिक्षण पूर्ण करून येताच, दादांनी ह्यांना घरच्या शेतीकडे लक्ष द्यायला सांगितलं, स्वतःचा व्यवसाय सुरू करायची इच्छा व कुवत असतानाही दादांनी त्यांना विरोध केला... आणि "घरची शेती असताना, नवा व्यवसाय थाटायचा नाही, माझ्याकडून दमडी मिळणार नाही" असा दादांचा सूर होता!

ह्या एकांगी वागण्याने तर, दादा आणि राजीव मधे हवाही ठरत नसे! दोघे फारसे बोलत नसत एकमेकांशी .. दोघांचही आप-आपल्यापुरतं विश्व होतं!! दादा दिवसभर ग्रामपंचायतीच्या कामात मग्न तर हे शेतीच्या!!

दादा घरातले कर्ते..! त्या पदामुळे नकळत जरासे हेकेखोर- म्हणजे, 'मी म्हणेन ती पूर्व', असे काहीसे! त्यांचा शब्द पडू दिलेला त्यांना पटत नसे... अणि त्यांच्या ह्याच वागण्यामुळे दिवसेंदिवस बंडखोर होत गेलेले राजीव... दादांच्या विरूद्ध स्वतःचं असं एक वेगळं मत, सतत मांडत राहणारे, राजीव!!

ह्या सगळ्यांचा परिणाम, म्हणजे माझं लग्न..!!!

दादांना संधीच न देता सरळ स्वत:चं लग्न ठरवून गावात घोषणा करणारे राजीवसाहेब आणि स्वतःची गावातली प्रतिमा ढळू नये 'निव्वळ', म्हणून होकार देणारे दादा..... ह्यांनी ठरवलं आणि पर्याय नाही म्हणून दादांनी पैका ओतला.........बास!!

कित्येकदा घुसमटत असे जीव, 'एकत्र खाली मान घालून जेवणे'... सासरी जे, तेच माहेरी ही!

माणसा-माणसातली "दरी" अशी का वाढत जाते? 'गरज' बांधून ठेवते एकमेकांना? 'आस्तित्त्वाचं' महत्त्व शुन्य?

स्वतःचा व्यवसाय सुरू करायला पुरेसे पैसे नाहीत म्हणून...
हे घर दादांचं आहे- राजीव त्यांचा वारस आहे म्हणून..
आणि मी ह्या घराची सून आहे म्हणून...
आम्ही तिघे एकत्र!!

त्रास त्रास व्हायचा, एवढ्या मोठ्या घरात बोलणं मोजकचं, हसणं तर त्याहून मोजकं!
ह्या दोघांना एकत्र आणायचा केलेला प्रत्येक प्रयत्न माझ्या आणि राजीवमधील भांडणात परिवर्तित होत असे
..... "जे सुख पदरात टाकलंय ते उपभोग आणि गप्प रहा" असा नेहमीचा शेवट....!

निव्वळ एकाच वर्षात, आम्ही दोघे एकमेकांना परके झालो, घरतल्या गढूळ वातावरणामुळे....

आणि ह्या सार्‍याचं पर्यावसान नको त्या गोष्टीत घडलं..............!

(क्रमशः)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

तिमा's picture

4 Apr 2012 - 6:22 pm | तिमा

अजून उत्सुकता वाढेल असे लिखाण आहे. तेवढं शुद्धलेखनाचं काटेकोरपणे बघा, सबमिट करण्याआधी.

रेवती's picture

4 Apr 2012 - 7:24 pm | रेवती

वाचतिये.

मी-सौरभ's picture

4 Apr 2012 - 7:25 pm | मी-सौरभ

पु.ले.शु.

पैसा's picture

4 Apr 2012 - 7:26 pm | पैसा

वाचतेय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Apr 2012 - 8:26 pm | निनाद मुक्काम प...

@आणि ह्या सार्‍याचं पर्यावसान नको त्या गोष्टीत घडलं..............!

(क्रमशः)

लबाड आहात

आता वाट पाहणे हे ओघाने आलेच

सानिकास्वप्निल's picture

5 Apr 2012 - 5:01 am | सानिकास्वप्निल

उत्सुकता वाढलिये
वाचत आहे :)

प्रास's picture

5 Apr 2012 - 1:16 pm | प्रास

सहमत.

अगदी हेच बोल्तो.....

धनुअमिता's picture

18 Apr 2012 - 4:01 pm | धनुअमिता

वाचत आहे.

पुढील भाग लवकर येऊ देत.

वेणू's picture

27 Apr 2012 - 4:50 pm | वेणू

कथेचा पहिला भाग: http://www.misalpav.com/node/21209 इथे आहे..
- कथेचा अंतिम भाग : http://www.misalpav.com/node/21519