'आसरा'- अर्थहीन....... तुझ्याविना!! (भाग- १)

वेणू's picture
वेणू in जनातलं, मनातलं
31 Mar 2012 - 3:15 pm

.....आणि तिने तानपुरा खाली ठेवला... ठेवताना झालेला झंकार, खोलीच्या चारही भिंतीना धडकून परतला...

आजही तिची माळावरची खोली सुरांनी न्हाऊन निघाली....

तानपुरा खाली ठेवल्याचा 'ओळखीचा' झंकार ऐकताच दाराबाहेर उभी असलेली राधा दार ढकलून आत आली, रोजचे परवलीचे शब्द तिने उच्चारले, "बाईसाहेब, न्याहारी ठेवलीये आणि हळदीचं दुध पण.."
आल्यापावली राधा परतली...

आणि रोखून धरलेले उष्ण अश्रू त्या गव्हाळ गालांवर ओघळले....
तिनं त्या तानपुर्‍यावर मन रितं केलं होतं, पण कुठलसं दु:ख गालांवर ओघळत राहिलं...
डोळ्यांतून वाहणारी भावना अन भरून उरलेली विषण्णता....

हेच का जगण होतं?
असच का जगायचं होतं?
फिरून माझ्या हाती "शून्यच" का?
माझं कुठे चुकलं होतं? १६ वर्षांच्या तपश्चर्येचं हेच फळ?
'निर्णय', माझा निर्णय ??

कित्ती प्रश्न आणि न गवसणारी उत्तरं....

गलबलून आला तिचा उर... जड झाले तिला तिचेच विचार... पुन्हा तानपुरा उचलला गेला.... आणि... 'मी तुझी राधिका, मी तुझी प्रेमिका ...' ती आळवत राहिली....

कंठातून सूर अन डोळ्यांतून पाणी झिरपत राहिलं....

...खालच्या मजल्यावर दिवाणखोली मध्ये उभी असलेली राधा,बावचळली!
.. सकाळच्या रियाजानंतर बंद झालेला तानपुरा, दुसर्‍या दिवशीपर्यंत वाजत नसे....
मग आज हे काय? रियाज संपूनही तानपुर्‍याचा आवाज?
अन किती ते आवाजातलं दु:खं... पण माळावर जाऊन बाईसाहेबांना विचाराची हिम्मत झाली नाही तिला...

राधा बंगल्याबाहेरच्या बागेकडे वळाली....

बंगल्या भोवतालची ती अतिप्रशस्त बाग.... मुख्य प्रवेशद्वारापासून ते बाहेरच्या गेट पर्यंत गेलेली स्वच्छ वाट, मातीचीच, पण छान सडा घातलेली... त्या पाऊलवाटेच्या दुतर्फा सजलेली ती बाग!!
डाव्या बाजूला जाई- जुईच्या नाजूक वेली तर उजव्या बाजूस बाईसाहेबांनी जपलेले विविघ रंगाच्या गुलाबांचे ताटवे त्यातले गुलाबी, केशरी गुलाब तिने अलवार हातानी खुडले...

माळी काका जाई- जुईच्या वेलींना पाणी पाजत होते, राधा पुढ्यात येताच त्यांनी तिला खुडून ठेवलेली नाजूक फुलं दिली.. परडीत फुलं भरून राधेने बंगल्याच्या मागच्या बाजूस जाऊन जास्वंदाची लाल चुटूक फुलं खुडली....

बंगल्यामागे येताच बाईसाहेबांच्या खोलीतून येणारे स्वर पुन्हा तिच्या कानी पडले...अस्वस्थ झाली ती.. पण; यंत्रवत तिची रोजची कामं सुरु होती....

परसदारातून ती बंगल्यातल्या दिवाणखान्यात शिरली.....
वरच्या मजल्यावर जाणाऱ्या सागवानी पायर्यांखाली ते परसदार उघडत असे.... तिथे आल्याबरोबर वरून येणार्‍या स्वरांची तीव्रता अधिकच जाणवली...

उजव्या हाताशी ठेवलेल्या भल्या-मोठ्या शिसवी टेबलावर फुलांची परडी ठेवून ती स्वयंपाक घराकडे वळाली.... सक्काळीच आलेलं दूध तापवायला ठेऊन ती पुन्हा बाहेर आली....

राधा ह्या घराची १५ वर्षांपासूनची सोबतीण.... नवर्‍यासोबत काडीमोड झाल्यानंतर पोटापाण्याची व्यवस्था पाहायला निघालेल्या 'एकल्या' राधेला बाईसाहेबांनी आधार दिला... ह्या घरातली सारी लहान- मोठी कामे करत, स्वयंपाक-घर सांभाळत राधा सुखाचं आयुष्य जगत होती....

फुलांच्या परडीतून जास्वंदाच लालबुंद- टपोरं फुल राधेने निवडलं, अन मुख्य प्रवेशद्वाराच्या वर लावलेल्या "गणरायाच्या' तसबिरीला वहिलं ...

तिला त्या दिवाणखान्याच्या ठेवणीच नेहमीच कौतुक वाटायचं...
त्या दिवाणखान्याची रचना आणि बाईसाहेबांनी जपलेला टापटीपपणा वाखाणण्याजोगाच होता!!

मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या हाताला भारतीय लोड-तक्क्यांची बैठक, त्यावर शुभ्र पांढरी चादर, त्या बैठकीच्या समोर अर्धगोलाकार असा सोफा, त्याला साजेश्या उश्या त्यावर ... भारतीय बैठक आणि सोफ्याच्या मधोमध काचेचं बसकं टेबल... त्यावर लाल-निळ्या रंगाची फुलदाणी!

खोलीच्या उजव्या भिंतीवर टांगलेल्या सुंदर चित्रकृती.... निसर्गाच्या आणि काही ऐतिहासिक प्रसंगांच्या!!

ह्या दिवाणखान्याच्या शेवटच्या डाव्या कोपर्‍यात, माळावर जाणारा जिना- माळावर दोनच खोल्या- दोन्ही स्वतंत्र, एक बाई साहेबांच्या रियाजाची अन दुसरी कायमच बंद असलेली!!

जिन्याच्या बरोबर खाली परसदार, त्या दाराच्या डावीकडे बाईसाहेबांची राहती खोली... आणि दाराच्या उजव्या बाजूला खूपच 'जुनं' पण रेखीव शिसवी टेबल....

दिवाणखान्याच्या उजव्या कोपर्‍यात स्वयंपाकघर, त्याला लागून "पाहुण्यांसाठीची" राखीव खोली...
स्वयंपाकघर पाहताच राधेला दुध तापायला ठेवल्याची आठवण झाली अन लगबगीने ती धावली....
दुधाचं आधण बंद करून, पातेल्यावर झाकण ठेऊन ती बाहेर आली... वरून येणार्‍या बाईसाहेबांच्या आवाजातली धार जरा कमी झाली होती, सोफ्यांच्या जवळ पोहोचून तिनं उश्यांची अभ्रे बदलायला घेतली... बाईसाहेबांना आवडणारे गुलाबी अभ्रे चढवताना तिला राहून-राहून वाटत होतं, आज काहीतरी बिनसलंय नक्की....

स्वत:शीच विचार करती झाली राधा, अस काय लागलंय बाईसाहेबांच्या मनाला की “पंधरा” वर्षांपासून अखंड चालणारा त्यांचा दिनक्रम पार बिघडलंय आज? काल-आणि-आज मध्ये वेगळं काही घडलंय का?
काल घरी 'तो' आगंतुक पाहुणा आलाय.... त्यामुळे तर नसेल?

पण; येणार्‍या- जाणार्‍या वाटसरुना आश्रय देण- हे बाई साहेब गेली १५ वर्षे करतच आहेत! अन त्यामुळेच ह्या बंगल्याचं नावही 'आसरा' ठेवलंय....विशेष काय त्यात?

पण मग, बाईसाहेबानी 'त्याला' माळावरची खोली द्यायला सांगितली!!... ती 'बंद' खोली काल स्वच्छ करण्यात आली...
त्याच्यासाठी??

माळावर फक्त नि फक्त बाईसाहेबांचाच वावर! मला वर जायची अनुमती होती ते निव्वळ त्यांची न्याहारी अन दुध पोहोचतं करण्यापुरती!!

काल-नी-आज मध्ये एवढाच घडलंय! तो घरात आलाय... आसर्‍यापुरता! ... पण मग तो 'आगंतुक' नाहीय्ये का? 'तो' कुणी खास आहे का? बाईसाहेबांच्या ओळखीचा कुणी?

पण त्या तर 'त्याच्याशी' चक्कार शब्दही बोलल्या नाहीत... फक्त 'त्याला' पाहताच चेहरा किंचित आक्रसला त्यांचा... बास! त्यावेगळी काहीच प्रतिक्रिया नाही...

"राधाsss,......."

बाईसाहेबांचा आवाज ऐकताच ती दचकली... विचारांतून जागी झाली...

"राधा, आश्रयासाठी आलेल्या पाहुण्यांना न्याहारी द्यायची पद्धत आहे ह्या घराची, विसरलीस?"
"बाईसाहेब, त्यांची खोली अजूनही बंदच आहे, म्हणून गेले नाही वर.... तुमची न्याहारी आटोपली? टेकडीवर फिरायला निघायचं, रोजच्या सारखं?"

"नाही राधा, आज 'रोज' च्या सारखं काहीही नकोय , तू घरीच थांब, मी नदी काठच्या देवळात जाऊन येत्ये! आणि हो, आज मी न्याहारी पण नाही केली आहे, ते घेऊन जा स्वयंपाक घरात, पाहुण्याची निट सोय बघ...! त्यांच्या न्याहारी साठी काय बनवलं आहेस?"
"उपमा, बनवलाय!"

"उपमा? छे छे.... साजूक तुपातला शिरा करून दे.... मी निघतेय माझं आवरून...."

राधा, स्वत:शीच पुटपुटली, 'शिरा? तुपातला? पाहुण्यांना?'

ह्या घराचा नियम होता, आसर्‍यापुरत्या राहणार्‍या वाटसरूंना न्याहारी साठी 'पोहे किंवा उपमा' अन जेवण मात्र साग्रसंगीत...

पण; तुपातला शिरा पहिल्यांदाच होणार होता...

'तो' आहे तरी कोण?? कुतूहलापोटी तिने माळीकाकांना देखील विचारलं.... पण; ते गप्पच राहिले, माळीकाका ह्या घरात, राधा येण्याधीपासून कामाला होते... पण ते गप्प राहिले तेव्हा तिला आणखीनच खटकलं...

बाईसाहेब स्वतःचं आवरून बाहेर आल्या, राधा 'रोजच्यासारखी' पाहतच राहिली,

ती गव्हाळ कांती, अन् त्यावर खुलून दिसणारी अंजिरी रंगाची तलम साडी, गळ्यात साधीच पण नाजुक मोत्याची माळ अन् कानात बुंदके मोती... कपाळावर रेखीव छोटंसं गंध, चालण्यातलं मार्दव, किती साध्या राहत असत त्या, साधरण ४५ वय असावं त्यांचं पण कश्या सतेज दिसत, त्या तिला नेहमीच आवडत...
एका साध्वीचं जिणं जगणार्‍या, तिच्या बाईसाहेब सार्‍या गावाच्या लाडक्या होत्या, ते त्यांच्या मदत करण्याच्या वृत्तीमुळेच.. त्यांचा भुत़काळ अगम्य होता पण, ह्या बंगल्याच्या त्या 'बाईसाहेब'' होत्या!!

"राधा, फुलांची परडी दे, आणि कुंकवाचा करंडा, आलेच मी जाऊन देवळात....."

त्यांच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात राधा स्वयंपाकघरात शिरली... शिरा बनविण्यासाठी!

बंगल्यातून बाहेर पडताच, माळीकाकांनी बाईसाहेबांना हटकले

"बाई, मी येऊ तुमच्या संगट? बोलायचं हुतं जरा? कालपास्नं म्या संदी शोधत हुतो, जीव लागना बगा माजा, 'त्येला' पाहिल्यापास्नं..."
"माळीकाका, कसला एव्हढा विचार करताय? अहो चालायचंच, तुमची बाई समर्थ आहे सार्‍या प्रसंगाला तोंड द्यायला...."

"व्हय गं माजी बाय, खरं हाय त्ये, पन तुमास्नी दुक्खात पाहवत न्हाय, आन काय म्हुन परत आलाय 'त्यो' ह्या घरात?"
"माहिती नाही काका, बोलले नाही मी अजून पाहुण्यांशी....!"

"पावणां? बाय माजी, कस गं करशील... लई काळ्जी हाय बग मला तुजी.. अग हाकून लाव त्येला तू काऊन घेत्लस घरात?"
"काका, गेली १५ वर्षे ह्या 'आसर्‍याने' सगळ्यांचा पाहुणचार केलाय... आणि 'तो...' तर.....
"बोल, किशुरी.... बोल.. मांज्यापशी मोकळी व्हय माय.. येऊ दे डोळा पानी....."

ती लगबगीने निघून गेली तिथून... तिला काकांसमोर खरचंच रडायचं नव्हतं..!

'किशुरी' शब्दानं ते हेलावली होती, 'बाईसाहेब' हे गोंदण कित्येक वर्षांपासून जपताना, तिचं तारुण्य कधीच प्रौढ झालं होतं.....

(क्रमश:)

कथाप्रतिभा

प्रतिक्रिया

यश राज's picture

31 Mar 2012 - 3:26 pm | यश राज

छान..

पुढ्चा भाग लवकर येवू द्या.

५० फक्त's picture

31 Mar 2012 - 3:30 pm | ५० फक्त

उत्तम सुरुवात,

उत्तम सुरुवात

हेच म्हणतो.

येऊ दे पुढचा भाग लवकर....

प्रभाकर पेठकर's picture

31 Mar 2012 - 4:26 pm | प्रभाकर पेठकर

फार सुंदर आणि उत्कंठावर्धक कथानक. आवडलं. अभिनंदन.

आता पुढील भागांची प्रतिक्षा आहे.

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

2 Apr 2012 - 3:34 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

वाचतोय.

पैसा's picture

31 Mar 2012 - 4:34 pm | पैसा

पुढचे भाग पटापट येऊ द्या!

अन्या दातार's picture

31 Mar 2012 - 5:04 pm | अन्या दातार

वाचतोय. उत्सुकता चाळवणार्‍या ठिकाणी नेऊन भाग संपवलात हे उत्तम.

आत्मशून्य's picture

31 Mar 2012 - 5:31 pm | आत्मशून्य

.आणि मी कॉम्प्युटरचा माउस खाली ठेवला. ठेवण्यापुर्वी केलेला शेवटचा क्लिक, मनाच्या चारही कोपर्‍यांना धडकून परतला. माउस खाली ठेवल्याचा 'ओळखीचा' क्लिक ऐकताच मनाच्या सिमारेषेबाहेर उभे असलेले विचार दार ढकलून आत आले, परवलीचे शब्द त्यातुन खास तुम्हाला प्रतिसादासाठी टंकले गेले, ते म्हणजे "बाईसाहेब, कथानकाबद्दल फार उत्सुकता वाटत आहे. पुभाप्र..."

वेणू's picture

31 Mar 2012 - 5:38 pm | वेणू

आत्मशुन्य :D
आभारी आहे, सर्वांची!

हे लेखन आधी नक्कीच वाचले आहे.

अमितसांगली's picture

31 Mar 2012 - 7:34 pm | अमितसांगली

पुढच्या भागाची उत्सुकता आहे.......

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

31 Mar 2012 - 7:51 pm | निनाद मुक्काम प...

बंगला ,बाग आणि बाईसाहेब अंजिरी रंगाच्या साडीत , सर्व पात्रे डोळ्यासमोर उभी राहिली.

पुढचा भाग लवकर टाका .

तो पर्यंत शीर्षकातून कथेच्या भविष्यातील वाटचालीचा काही क्लू मिळतो का ते शोधत बसतो.

निवेदिता-ताई's picture

31 Mar 2012 - 9:42 pm | निवेदिता-ताई

असेच म्हणते

जाई.'s picture

31 Mar 2012 - 9:28 pm | जाई.

माबोवर वाचली होती
पुर्नवाचनाचा आनंद मिळाला

प्रचेतस's picture

1 Apr 2012 - 9:11 am | प्रचेतस

अप्रतिम.
सहज सुंदर लेखन.

रेशा's picture

2 Apr 2012 - 12:57 pm | रेशा

मस्त पुढील भागाच्या प्रतिक्षेत ..

रुमानी's picture

2 Apr 2012 - 1:05 pm | रुमानी

मस्त.......
पुढील भाग लवकर येउदेत.

सर्वांची आभारी आहे! :)

भाग २ : http://www.misalpav.com/node/21251

मन१'s picture

4 Apr 2012 - 5:29 pm | मन१

पुढं काय झालं?

वेणू's picture

27 Apr 2012 - 4:48 pm | वेणू

- कथेचा दुसरा भाग: http://www.misalpav.com/node/212५१ इथे आहे..
- कथेचा अंतिम भाग: http://www.misalpav.com/node/21५१९ इथे आहे..