उस्ताद अमीरखाँसाहेब !

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
1 Jan 2011 - 1:53 pm

हा लेख माझ्या आजोबांना म्हणजे कै. केशव चिंतामण कुलकर्णी यांना अर्पण. यांनी मला शास्त्रीय संगीताची ओळख करून दिली तो दिवस मला आजूनही आठवतो. सवाई गंधर्वला मी त्यांच्या मांडीवर मस्त झोपलो होतो. तेव्हा पं भिमसेन जोशी गात होते. पण मी त्या दिवशी बरेच ऐकले हेही तितकेच खरे. मी मला वाटते चवथीत असेन. माझे आजोबा स्वत: उत्तम पखवाज वाजवायचे. दुर्दैवाने मला न ऐकवताच ते गेले.

उस्ताद अमीरखाँसाहेब !

१७ फेब्रुवारीला या घटनेला बरोबर सदतीस वर्षे पूर्ण होतील. याच दिवशी इंदोर आकाशवाणीवर एक वक्ता म्हणाला होता “ तिसर्‍या सप्तकाला पोहोचलेली तान आज तिथेच थांबली आहे”. ज्यांनी अमीरखाँसाहेबांचे गाणे ऐकलेले आहे त्यांना हे शब्द लगेचच पटतील. याच दिवशी खँसाहेबांचा कलकत्याला एका दुर्दैवी अपघातात मृत्यू झाला. १५ ऑगस्ट १९१२ साली जरी महाराष्ट्रातील अकोला गावी त्यांचा जन्म झाला असला तरी त्यांचे बालपण मध्यप्रदेशात, इंदोरमधेच गेले. उण्यापुर्‍या साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“.

अमीर अलीचे पूर्वज हरियानातील कालनौर नावाच्या गावचे. ते तेथून इंदोरला येऊन स्थायिक झाले होते. साहजिकच अमीरअलीचे वडील लहानग्या अमीरला घेऊन अकोल्याहून इंदोरला गेले. इंदोरला त्याकाळी कलाकारांना राजाश्रय होता आणि शहा अमीर हे चांगले बीन व सारंगी वाजवायचे. अमीरखाँसाहेबांचे आपल्या वडिलांवर इतके आदरयुक्त प्रेम होते की त्यांनी पुढील आयुष्यात मुंबईला एक इमारत बांधली आणि त्याला नाव दिले होते “शामीर मंझील”. अमीर अली नऊ वर्षाचे असतानाच त्यांची आई वारली आणि शामीरखाँना त्यांच्या दोन्ही मुलांची आई ही व्हायला लागले. अर्थात तीही जबाबदारी त्यांनी चांगली पेलली. त्या काळच्या कलाकारांच्या घरी जसे वातावरण असायचे तसे यांच्याही घरी होते. शामीरखाँ यांनी अमीर अली आणि त्यांचा भाऊ बशीर या दोघांनाही संगीताचे धडे द्यायला सुरवात केली होती. तसेच त्यांच्या बिरादरीतील इतर श्रेष्ठ कलाकारांकडेही ते त्यांना नियमितपणे गाणे ऐकायला घेऊन जात होते. असेच एकदा ते त्यांच्या एका नातेवाईकाकडे गेले असता एक प्रसंग घडला. लहानग्या अमीरला आणि बशीरला घेऊन ते त्या घरापाशी आले तेव्हा घरातून संगीताचे स्वर ऐकू येते होते. “आत्ता तालीम चालू असणार” ते मनाशी म्हणाले आणि त्यांनी त्या घरात प्रवेश केला. त्याच क्षणी तेथे एकदम शांतता पसरली आणि सगळ्या शिष्यांनी ताबडतोब आपापल्या वह्या मिटल्या. शामीरसाहेबांनी बळेबळेच एका वहीचे पान उघडले त्यात मेरूखंड गायकीची बरीच नोटेशन्स लिहिलेली त्यांना दिसली. तेवढ्यात एका नातेवाईकाने त्यांच्या हातातील ती वही हिसकावून घेतली.
“हे सारंगियांसाठी नाही. मग वाचून काय उपयोग ?”
हे ऐकून अपमानित होऊन शामीरखाँ त्या घराबाहेर पडले ते ठरवूनच की मी माझ्या एका मुलाला मेरूखंड गायकीत तयार करेन. हे बोलण्याइतके सोपे नव्हते कारण ही गायकी फार म्हणजे फार अवघड आहे. काय आहे ही गायकी आणि ती एवढी अवघड का आहे ?.....

मेरूखंड गायकी.
या गायकीचा उल्लेख १४व्या शतकातील सारंगदेवाने लिहिलेल्या संगीतरत्नाकर या ग्रंथात पहिल्यांदा केलेला आढळतो.

या गायकीला अजूनही बर्‍याच नावाने ओळखले जात होते. उदा. मेरखंड, खंडमेरू, सुमेरखंड किंवा मिरखंड इ. इ. हा शब्द दोन शब्दांचा बनलेला आहे हे काही वेगळे सांगायला नको. मेरू + खंड. मेरूचा संस्कृतमधला अर्थ होतो अत्यंत स्थिर किंवा अचल. खंड म्हणजे “भाग” जसे सुपारीची खांड. या स्वरांच्या बाबतीत याचा अर्थ घ्यायचा असेल तर आपण असा घेऊ शकतो - मेरू म्हणजे रागातील एखादा अचल/स्थिर स्वर. आता या रागातील दोन स्वरांच्या अनेक रचना होऊ शकतात. उदा. द्यायचे झाले तर सा आणि रे हे दोन स्वर घेतले तर सा रे आणि रे सा या दोन रचना होऊ शकतात. तीन स्वर असतील तर जागांची अदलाबदल करून सहा वेगवेगळ्या प्रकारच्या रचना होऊ शकतात. सातही स्वर जर स्थिर असतील तर उदा. भैरवीमधे स्वरांच्या जागांची अदलाबदल करून ५०२४ प्रकारच्या रचना होऊ शकतात. ज्या गायकाला मेरूखंड गायकी आत्मसात करायची असते त्याला या सगळ्या रचनांचा अभ्यास करून, पाठ करून आपल्या मेंदूत साठवून ठेवाव्या लागतात. त्या गायकाला हे ही शिकवले जाते की एखाद्या मेहफिलीत अशा काही रचनांचा संच करून, एखाद्या रागात रंग भरून त्या रागाची रंगत कशी वाढवायची. हे सगळे डोक्यात ठेवणे आणि त्याचा योग्य उपयोग रागात करणे ही एक कर्मकठीण गोष्ट आहे. अमीर अलीच्या वडिलांनी वरील अपमानास्पद प्रसंगानंतर ही कला, कला कसली, विद्याच म्हणायला पाहिजे त्याला, त्याच्या त्या कोवळ्या वयात शिकवायला सुरवात केली. त्याचे वय लक्षात घेता त्याला फक्त एकच तासाची तालीम दिली जात असे. त्यानंतर त्याला खेळायला सोडण्यात येत असे. जसे वय वाढले तसे त्याचा हे शिकण्याचा आणि तालमीचा काळ वाढवण्यात आला. काहीच वर्षात तो तीन,चार स्वरांचा मेरूखंड रचनेत वापरायला लागला. स्वरांची ओळख नीट व्हावी म्हणून तालमीचा भर सरगम, अलंकार आणि पलटे यांच्यावर देण्यात आला. नंतर त्याची तालीम ख्याल गायकीकडे वळली. तो काळ अमीर अलीचा आवाज फुटण्याचा होता त्यामुळे त्याच्या वडिलांनी त्याची गाण्याची तालीम तात्पुरती थांबवली आणि ते त्याला सारंगी शिकवू लागले. याचा त्यांना आयुष्यभर फायदा झाला. शुक्रवारच्या नमाज़ानंतर त्यांच्या घरी बरेच बुज़ुर्ग गायक वादक जमायचे आणि मग त्या खाजगी मेहफिलीत रंग भरायचा. जे येत होते त्यांची नावे बघितली तर थक्क व्हायला होते. उस्ताद रज़ब अली खान, उस्ताद नसिरुद्दीन डागर, बीनकार उस्ताद वाहीद खान, उस्ताद अलाह बंदे, उस्ताद ज़फ्रुद्दीन खान, बिनकार उस्ताद मुराद खान, सारंगी नवाज़ उस्ताद बूंदू खान. हे आजच्या सारखे नुसते नावाने उस्ताद किंवा पंडीत नव्हते. आणि त्या काळी अहो रुपम अहो ध्वनी असाही प्रकार नसायचा. गाणारे थोर होते तसेच थोर, गाणे समजणारेही होते. चांगल्या गायकाला लोकमान्यता मिळाल्यावरच अशा पदव्या मिळायच्या. जे स्वत:ला थोर (?) समजायचे त्यांची टर उडवायला समाज कमी करत नसे. ही नावे नीट लक्षात ठेवा. यातील प्रत्येकाने आपले आयुष्य़ संगीतासाठी कुर्बान केले आहे. आपले बाळपण, तारूण्य, संसाराचे वय हे सगळे त्यांनी पणाला लावून ते गाण्याची तालीम करत राहिले. एवढेच नव्हे तर ते आयुष्यभर शिकतच राहिले. तर, अशा थोरामोठ्यांचे गाणे ऐकायला मिळणे हे मोठे भाग्यच अमीर अलीच्या नशिबात होते. या नित्याच्या मेहफिलीतच त्याचे खरे शिक्षण झाले असे म्हणायला हरकत नाही. त्यातच मेरूखंड गायकीचाही त्याचा अभ्यास चालू होताच. वयाच्या बाविसाव्या वर्षी तरूण अमीर अली मुंबईला आला. तो काळ होता साधारणत: १९३४ सालचा. काही खाजगी मेहफिलीत गायल्यानंतर त्याने काही राग ग्रामोफोन कंपनीसाठी म्हटले आणि त्याच्या रेकॉर्डही काढण्यात आल्या. त्या रेकॉर्डस्‌वर “अमीर अली, इंदोर असे लिहिलेले आढळते. या तबकड्यांवर त्यांचे फेटा घातलेला आणि तलवार कट मिशा ठेवलेल्या असा फोटो दिसतो.

काही काळानंतर हे दोन्हीही गायब झाले. केव्हा हे बरोबर सांगता येणार नाही. त्या काळाच्या ओघात गेल्या का त्यांनी त्या मुद्दाम काही कारणाने काढल्या हे समजत नाही. या तबकड्यांवर त्यांचा उल्लेख “संगीत शिरोमणी” संगीत रत्न” असा केलेला आढळतो. हे अर्थात त्या तबकड्यांचा खप वाढावा म्हणून लिहिलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण त्याचे गाणे त्या वेळीही चांगलेच होते.

या रेकॉर्डस्‌बद्दल सिंगबंधूतले पंडित तेजपाल सिंग यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे “ या तबकडीवरचे गाणे आगळे वेगळे आहे. या गाण्यावर अमन अली, इंदोर यांची छाप आहे. पांढर्‍या तीनमधे हा राग आळवला आहे. स्थायी आणि अंतरा सुरवातीला दोनदा म्हटला आहे. जोरदार ताना उस्ताद रज़ब अली खॉंसाहेबांसारख्या वाटतात.” ज्यांचे गाणे त्यांनी ऐकले त्याचा हा परिणाम असावा.

१९३५ साली हा गायकांच्या व रसिकांच्या दृष्टीने सुवर्णकाळच होता असे म्हणायला हरकत नाही. पाच,सहा कंपन्यांनी मोठमोठ्या गायकांच्या गाण्याच्या तबकड्या काढण्याचा सपाटा लावला होता. यावर श्री. केशवराव भोळे शुध्द सारंग या नावाने बर्‍याच मासिकातून लिहायचे. पण आश्चर्य म्हणजे यात कुठेही अमन अली या गायकाचे नाव नव्हते. का बरं झाले असावे असे ? त्यांच्या रेकॉर्डस्‌ खपत नव्हत्या, का त्यांच्या पुरेशा मैफिली झाल्या नव्हत्या ? कदाचित मेरूखंड गायकी ही समजायला फार क्लिष्ट असावी व सामान्य माणसाला त्यातल्या तांत्रिक बाबी झेपत नसाव्यात. कारण काहीही असो, त्या खपल्या नाहीत हे मात्र खरं. अमीर अली परत इंदोरला आला. १९३७ साली त्याचे वडील वारले आणि घराला आता त्यांच्या आधाराची अत्यंत गरज होतीच. त्याने एक नवा प्रयोग करायचा ठरवला. गाण्याची पध्दत बदलली पण मेरूखंडच्या भोवती. मेहफिलीत साधारणत: राग पहिल्यांदा अतीविलंबित, नंतर मध्यलयात व शेवटी द्रुतलयीत ताना घेत म्हटला जातो. तरूण अमीर अलीने या तिन्हीसाठी गुरू शोधण्याचे ठरवले. त्यांना ते मिळाले पण उलट्या क्रमाने.

उस्ताद रज़ब अली खान तर अमीरला लहानपणापासून ओळखत होते. त्याला ते “बेटा अमीर” या नावानेच हाक मारायचे. रज़ब अलींचे गुरूही मोठ्या तोलामोलाचे होते. खुद्द त्यांचे वडील मुगल खान. त्यानंतर त्यांनी बंदे अली खान यांच्याकडून बीन शिकली. सारंगी तर त्यांच्या रक्तातच होती. शेवटी त्यांनी जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लादियाखॉं यांच्याकडे तालीम घेतली. या सगळ्यांचा संस्कार त्याच्या गायकीवर झाला. रज़ब अलीखॉ ज्यांना लोक “रज़ब गाते गज़हब” असे म्हणायचे, सांगायचे, मी तरूणपणी कसा गात असेन हे जर तुम्हाला ऐकायचे असेल तर अमीरचे गाणे ऐका.

त्यांचे पुढचे गुरू होते उस्ताद अमन अली खान. हे होते भेंडी घराण्याचे. हे मध्यलय आणि मेरूखंड गायकीसाठी भारतात प्रसिध्द होते. हे जरी इंदोरचे होते, तरी रहायचे मुंबईच्या भेंडीबज़ार या भागात. ब्रिटीशांच्या काळात या भागात ब्रिटीश अधिकार्‍यांचे हवेशीर बंगले होते. तेथे एक मोठा बाजार होता. त्याच्या मागच्या भागाला म्हणायचे “Behind Bazar”. त्याचे झाले भेंडीबाजार. या भागात पुढे जी गायकी निर्माण झाली तेच भेंडीबाजार घराणे. अमन अली कधीच अतीविलंबित किंवा द्रुत लयीत गात नसत. त्यांची आवडीची लय होती मध्यम. त्यांना कर्नाटकी संगीताची पण आवड होती. राग हंसध्वनी हा त्यांचा अत्यंत आवडता राग. अमीर अलीला त्यांनी बरीच वर्षे तालीम दिली. पुढे स्वत: अमीरखॉंसाहेब मेहफिलीत त्यांची आठवण म्हणून हा राग गायचे. याच रागात त्यांनी एक फारसी भाषेत असलेला तराणा गायला त्याने त्यांना जगभर प्रसिध्दी मिळवून दिली. त्याचे शब्द होते – इत्तिहादेस्ता मियान ने मानो तो...

विलंबित / अतीविलंबितसाठी त्यांनी उस्ताद अब्दूल वाहीद खान यांची तालीम घेतली. हे उस्ताद अब्दूल करीम खान यांचे चुलत भाऊ आणि श्रीमती हिराबाई बडोदेकर यांचे गुरू होते. त्यांना “बहीरे वाहीद खान असेही म्हणायचे कारण त्यांना फार कमी ऐकू यायचे. ते एक पोचलेले बीनकार पण होते. राग सजवणे आणि त्याची हळूवार, प्रत्येक स्वराची काळजी घेत त्या रागाचे सादरीकरण करणारे हे एकमेव होते. गंमत म्हणजे जरी अमीर अली या उस्तादांना क्वचितच भेटत असे तरी तो अप्रत्यक्षपणे त्यांच्याकडेच शिकत असे. त्यांचे रेडिओवरचे गाणे ऐकून. रेडिओचे त्या वेळचे महत्व यातून कळते. असो. उस्ताद अब्दूल वहीद हे झुमरा तालात गायचे. हा ताल डोलायला लावणारा असल्यामुळे त्यांना फार आवडायचा. अमीर अलीनेही याच तालात गायला सुरवात केली. अमीर अलीला एका खाजगी मेहफिलीत गायची संधी मिळाली ज्यात उस्ताद अब्दूल वहीदही हजर होते. त्यांनी अमीर अलीच्या गाण्याचे फर कौतुक केले.

अशाप्रकारे संगीत शिक्षणाबरोबर इंदोर मधे विद्यापिठामधे अभ्यासही चालू होताच. थोड्याच काळात प्रो. अमीर अली म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्याच सुमारास त्यांनी फेटा आणि मिशांचा त्याग केला असावा. हे मोठे क्रांतीकारक पाऊल होते कारण त्या काळात सर्व गायक फेटा घालूनच गाण्याच्या मेहफिलीत यायचे. अमीर अलीच्या गाण्यात आता वर लिहिलेल्या तीनही गायकींचा सुरेख आणि सुरेल संगम झाला होता आणि त्यातूनच मला वाटते इंदोर घराण्याचा जन्म झाला असावा. अर्थात या सगळ्या गायनाचा पाया होता “मेरुखंड गायकी”

हळूहळू ते उस्ताद अमीरखॉंसाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले. सर्व प्रकारच्या रसिकांना त्यांच्या गायनात काही ना काहीतरी आवडीचे मिळायचेच त्यामुळे त्यांच्या मेहफिलीत रंग भरू लागला. शांत, गंभीर स्वर, शुध्द मुद्रा, शुध्द वाणी, अतीविलंबित लय, लयदार गाण्यात मधेच अर्थपूर्ण विरामाच्या जागा, अवघड सरगम, वेगवान पण गमकयुक्त ताना, सुरेल, तीन सप्तकातून फिरणार्‍या दमदार, दाणेदार ताना ही त्यांच्या गायनाची वैशिष्ठ्ये मानली जाऊ लागली. त्यांच्या गायनात फारसी रचनांचा बराच वापर असायचा. साथीला सहा तारांचा तंबोरा आणि मधे मधे न कडमडणार्‍या तबल्याची साथ. ( हे फार अवघड आहे. आजही आपण जर त्यांचे गाणे ऐकलेत तर तबल्याची साथ कशी असावी हे ऐकायला मिळेल.). सहा फूट उंचीचा हा गायक गाण्यासाठी रंगमंचावर अवतरला की एखादा योगी पुरूष आला असे वाटायचे. त्यांच्या गाण्यातही अध्यात्म पुरेपूर उतरलेले वाटायचे. गाताना डोळे मिटलेले आणि सगळ्या बंदिशी अध्यात्म्याचा पाया असलेल्या, त्यामुळे मैफिलीला एक प्रकारचा वेगळाच माहौल असायचा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक राग संपल्यानंतर ते लगेचच दुसरा राग सुरू करायचे, त्यामुळे मेहफिल एकसंध वाटायची. मेहफिलीत साहेबांनी कधीच ठुमरी आणि भैरवी म्हटली नाही. त्याबद्दल विचारल्यावर ते हसून म्हणायचे, “अरे माझे गाणे अजून संपलेले नाही”

ज्यांच्यामुळे आज खॉंसाहेबांचे गायन आपल्याला तबकडीवर उपलब्ध आहे ते एच्‌ एम्‌ व्हीचे श्री. जोशी त्यांच्या आठवणीत लिहितात –
अमीरखॉसाहेबांचे गाण्याच्या रेकॉर्ड काढण्यासाठी त्यांची परवानगी घेण्यासाठी त्यांच्या घरी जाणे आवश्यक होते. ते ज्या वस्तीत रहात होते त्या वस्तीत जायचे माझ्या जिवावर आले होते. कोणी मला तेथे पाहिले तर काय होईल या एकाच शंकेने मला घेरले होते. मी एका थोर गायकाला भेटायला जातोय हे माहीत नसेल तर लोक काहीही अर्थ काढू शकतात. मी जर त्यावेळी समाज काय म्हणेल हा विचार करून तेथे त्या वस्तीत गेलो नसतो तर आज आपण एका स्वर्गीय गाण्याला कायमचे मुकलो असतो. पण माझ्यातील कर्तव्य भावनेने माझ्या भीतीवर मात केली आणि मी खाली मान घालून त्यांच्या घरी गेलो. घरात शिरल्यावर मात्र मी त्या तणावातून मुक्त झालो आणि त्यांच्याशी चांगले दोन तास संगीतावर गप्पा मारल्या. त्यानंतर मी बर्‍याच वेळा त्यांच्याकडे गेलो. संगीतावरची आमची मते एकामेकांना ऐकवू लागलो. या भेटींमुळे मला एक फायदा झाला आणि तो म्हणजे त्यांच्या आवडी निवडीचा मला अंदाज आला आणि त्यांचाही माझ्यावरचा विश्वास वाढला. अशा काही मुलाखतींनंतर त्यानी एक दिवस मला त्यांचे गाणे रेकॉर्ड करायला परवानगी दिली. मी आनंदाने घरी परतलो. पण पुढे झाले भलतेच. आज करू, उद्या करू असे म्हणत त्यांनी बरीच टाळाटाळ केली शेवटी मी एक दिवस वैतागून त्यांना म्हटले “ एवढा काळ मी परमेश्वराची प्रार्थना केली असती तर कदाचित तो ही प्रसन्न झाला असता” हे ऐकल्यावर मात्र ते म्हणाले “ माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी, सांगाल त्या वेळेला मी रेकॉर्डिंगसाठी हजर राहीन”. पुढे मानधनाचाही प्रश्न निघाला पण त्याचाही एवढा त्रास झाला नाही. आणि खरोखरच ठरलेल्या दिवशी आणि वेळेला ते रेकॉर्डींगसाठी आले. तीच ती मारव्याची जगप्रसिध्द तबकडी. खॉंसाहेबांचाही मारवा फार लाडका होता. आता त्यांचा पहिल्या रेकॉर्डच्या वेळेचा वाईट अनुभव मागे पडून त्यांना या माध्यमाविषयी खात्री वाटू लागली होती, त्यामुळेच पुढे त्यांच्या गायनाच्या अनेक तबकड्या निघाल्या.

या मारव्याची एक आठवण मी माझ्या उराशी जपली आहे.(एका प्रतिक्रियेत मी ती दिलेलीही आहे) एकदा मी एकटाच हरिश्चंद्र गडावर कोकणकड्यावर बसलो होतो. त्या कोकण कड्याची खोली छातीत धडकी भरवत होती. समोर सूर्य अस्ताला जात होता. त्याची उबदार किरणे अंगावर घेत मी माझा टेप लावला आणि हा मारवा ऐकला. जसा जसा अंधार पडायला लागला तशा त्या दरीतल्या डोंगराच्या सावल्या अजूनच गडद होऊ लागल्या. त्या सगळ्या निसर्गाची खोली त्या अंधाराबरोबर वाढता वाढता एवढी वाढली की मारव्याची खोली जास्त की या निसर्गाची, हे मला समजेना. शेवटी डोळ्यातून पाणी आले नी मी माझ्या तंबूत शिरलो. हा अनुभव नंतर मी अनेक वेळा घेतला आहे.

अमीरखॉसाहेबांनी चित्रपटांसाठीसुध्दा काही गाणी म्हटली.
पहिला सिनेमा होता क्षुधित पाषाण. हा एक बंगाली सिनेमा होता. बैजू बावरामधील शेवटच्या जुगलबंदीसाठी तानसेनसाठी अमीरखॉंसाहेबांचा आवाज तर ठरला पण बैजूसाठी कोणाचा हे काही ठरेना. कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले. आज परिस्थिती अशी आहे की मिया तानसेनचे काम कोणी केले होते हे कोणी सांगू शकत नाही पण अमीरखॉसाहेबांनी ते गाणे गायले होते हे कोणीही विसरू शकत नाही. मित्रहो गाण्याची ताकद ही अशी आहे. या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीरखॉसाहेबांनीच म्हटले होते. अजून दोन चित्रपटातील गाणी रसिकांच्या मनातून जाऊच शकत नाहीत. एक म्हणजे झनक झनक पायल बाजे आणि दुसरा गुंज उठी शहनाई.

अमीरखॉंसाहेबांचे अजून एक महत्वाचे काम म्हणजे त्यांनी तराणा या गायन प्रकाराबद्दल केलेले संशोधन. बिहार संगीत विद्यालयाने त्यांना या अभ्यासासाठी शिष्यवृत्ती दिली होती. त्यांचा हा प्रबंध त्या विद्यालयाकडे आहे का नाही हे माहीत नाही. बहुदा नसेलच. पण या अभ्यासानंतर ते बर्याधच मेहफिलीत तराणा न चुकता गायचे हे मात्र खरं.
असे म्हणतात की १३व्या शतकात अमीर खुस्रो नावाचा जो कवी, संगीतकार होऊन गेला तो हज़रत निज़ामुद्दीन अवलियाचा परमशिष्य होता. निज़ामुद्दीन स्वर्गवासी झाल्यावर अमीर खुस्रो गुरूच्या कबरीच्या सेवेत रहायला गेले आणि त्यांनी उरलेले आयुष्य तेथेच व्यतीत केले. त्या वास्तव्याच्या काळात त्यांनी तराणा या प्रकाराला जन्म दिला आणि अनेक तराणे रचले. तेथेच त्यांनी आपली जीवनयात्राही संपवली. तराण्यामधे खुस्रोंनी थोड्याच शब्दांची योजना केली, पण हे शब्द जलद गतीने आलटून पालटून म्हणावे लागत. या शब्दांना अर्थ होता आणि ते फारसीमधून आले होते. ते शब्द आणि त्यांचा अर्थ होता –
दर : आतील. आतले, आत.
दारा :दर-आ : आत या.
दर्तन : दर-तन : शरीराच्या आत.
तननदारा : तन – आ- दारा: शरीराच्या आत या/ये
तोम : त्वं-अहं- मी म्हणजे तूच आहे.
नादिरदानी – नादिर-दानि (दानाई) : नादिर म्हणजे सर्वात श्रेष्ठ. दानाई म्हणजे सगळं समजणारा (परमेश्वर)
तनदारदानी – तन-दार-दानि – शरीरात प्रवेश करणारा ज्ञानी.

तराण्याची सगळ्यात प्राथमिक रचना ही आहे – दारा दारा दर्तन दारात दर्तन दर्तन ( ये ! ये माझ्या शरीरात प्रवेश कर) अल्लासाठी अनेक शब्दांचे प्रयोजन करण्यात आलेले आहे. उदा. या ला ला ला लोम किंवा ये याली, येल याला, यलाले इ.इ. हे शब्द वापरून सुफी संत स्वरात त्यांच्या प्रार्थना करतात. हा तराणा मनाच्या समाधी अवस्थेत म्हणतात. त्यावेळी बहुतेक ते स्वत:भोवती गिरक्या घेत फिरत असतात. त्या अवस्थेलाच महत्व असल्यामुळे या शब्दांकडे कोणीच लक्ष दिले नाही व त्याचा अर्थही काळाच्या ओघात नष्ट झाला. नंतरच्या काळात अमीरखॉसाहेब म्हणतात की तराण्याला करमणुकीचे साधन म्हणून वापरायला सुरवात झाली तेव्हा गायकांनी त्यात तबला, पखवाज, मृदुंगाचे बोल टाकायला सुरवात केली पण तराण्यातला भक्तिभाव पूर्णपणे नष्ट झाला.

त्यांचा हंसध्वनी रागातला तराणा ते त्याच भावनेने म्हणत. त्याचे बोल होते इत्तिहादेस्ता मियाने मानो तो, मानो तो निस्ता मियान ने मानो तो.
इत्तिहाद म्हणजे एक होणे. थोडक्यात याचा अर्थ असा सांगता येईल. “तू (परमेश्वर ) आणि मी असे एकात्म पावलो आहोत की आता मी आणि तू असे वेगळे काही राहिलेच नाही.”

सरोदवादक अमज़दअलीखॉ यांनी त्यांची एक आठवण सांगितली आहे ती त्याच्याच शब्दात –
ते साल होते १९७१. कलकत्यात तानसेन समारोह नावाचा एक संगीत समारोह भरायचा. अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा या समारोहात मला आमंत्रण होते. एक बुजुर्ग गायक श्री. शैलेनबाबू याचे आयोजन करायचे. हा समारोह संध्याकाळी चालू होऊन रात्रभर चालायचा आणि दुसर्‍यादिवशी सकाळी संपायचा, (आपल्या गंधर्व महोत्सवाप्रमाणेच.) परंपरेने बुजुर्ग कलाकराच्या गायनाने याचा समारोप व्हायचा. त्या दिवशी माझी फ्लाईट उशिरा पोहोचली आणि मी त्या हॉलमधे पोहोचेपर्यंत उस्ताद अमीरखॉसाहेबांचे गाणे सुरू झाले होते. शैलेनबाबू या प्रकाराने अतिशय अस्वस्थ झाले होते. मी जेव्हा त्यांना सांगितले की मी खॉसाहेबांनंतर गाऊ शकणार नाही तेव्हा ते थोडेसे चिडलेच. बरोबर आहे. प्रेक्षकांनी तिकिटे अगोदरच काढलेली होती. त्यांनी माझी बरीच समजूत काढायचा प्रयत्न केला, पण मी ठामपणे नकारच दिल्यामुळे त्यांचे काही चालेना. हे सगळे चालले असतानाच खॉसाहेबांचे गायन संपले आणि ते निघाले होते. शैलेनबाबूंनी त्यांना गाठले आणि त्यांना माझ्या नकाराबद्दल सांगितले. ते ऐकल्यावर त्यांनी माझ्याकडे बघून मला जवळ जवळ आज्ञाच केली. म्हणाले “ माझ्यानंतर तू नाही वाजवणार तर कोण वाजवणार? जा. वाजव !”
पहाटेचे पाच वाजले होते. मी तसाच स्टेजवर गेलो आणि सुरवात करणार तर काय पुढच्याच रांगेत खॉसाहेब बसले होते. मी नम्रपणे त्यांना म्हटले “ खॉसाहेब आपण गायल्यानंतर आता मला काय वाजवायचे हेच सुचत नाही आहे. कृपया आपण शांतपणे घरी जा आणि आराम करा.”
त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.”

अमीरखॉसाहेब हे एक कलकत्यातील बडे प्रस्थ होते. एक काळ असा होता की त्या शहरातील एकही मेहफिल त्यांच्याशिवाय व्हायची नाही. एवढेच काय त्यांना भारत सरकारने पद्मभूषण, राष्ट्रपती पारितोषिक, स्वरविलास असे अनेक मानसन्मान मिळाले पण या अत्यंत साध्या माणसाचे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. कोणीही कधीही त्यांच्याकडे जाऊ शकत असे. खर्‍या अर्थाने ते सुशिक्षित व सुफी संत होते. त्यांनी अमेरीकेत न्युयॉर्क विद्यापिठाही काही काळ संगीत शिकवले.

त्यांची गायकी आता अमरनाथ, कानन, श्रीकांत बाकरे, सिंग बंधू, कंकणा बॅनर्जी पूर्बी मुखर्जी अशा त्यांच्या शागिर्दांमुळे अस्तित्वात आहे.

आमीरखॉसाहेबांचे आयुष्य तसे खडतरच गेले. पण त्यांच्या गायकीमधील प्रामाणिक भाव, वेदना, उत्कटता या त्यांच्या आयुष्याच्याच देणग्या होत्या, त्यामुळे त्यातही थोडे डोकवायला लागेल. ज्या काळात ते गायक म्हणून स्वत:ला प्रस्थापित करायची धडपड करत होते त्या काळात कलाकारांचा राजाश्रय निसटून चालला होता. सामान्य माणसाची ऐपत फुकट संगिताच्या मेहफिलींना हजेरी लावून संगीताची मजा लुटणे एवढीच होती. त्यामुळे पैशाची वानवाच होती. काही काळ तर त्यांनी एखाद्या फकीरासारखा काढला. मुंबईमधे असताना ते त्यांच्या मामाकडे मोहम्मद खान यांच्याकडे अरबलेनमधे रहायचे. इथे त्यांची गाठ पडली रज़बाअलींचे पुतणे अमानत अली यांच्याशी. अमानत अलींनी त्यांची गाठ प्रो. देवधरांशी घालून दिली. प्रो. देवधरांसाठी त्यांनी बर्‍याच मैफिली केल्या. १९३६ साली त्यांच्या वडिलांनी त्यांना मध्यप्रदेशातील रायगड संस्थानच्या महाराज चक्रधरसिंग यांच्या कडे रुजू व्हायला सांगितले. हे महाराज त्यांच्या पदरी असलेल्या कलाकारांना वेगवेगळ्या गावात भरणार्‍या मेहफिलींना स्वखर्चाने पाठवायचे. त्या प्रथेप्रमाणे या वर्षी त्यांनी अमीरखॉसाहेबांना मिर्झापूर संस्थानाला पाठवले. त्या संगीताच्या संमेलनात मोठमोठ्या गायकांनी/ वादकांनी हजेरी लावली होती. फैयाज़खॉसाहेब, इनायतखॉसाहेब विलायतखॉंचे वडील), पं, ओंकारनाथ ठाकूर, केसरबाई केरकर ही त्यातली काही नावे. अमीरखॉसाहेबांनी त्या मेहफिलीत मेरूखंड पध्दतीने गायला सुरवात केली मात्र, प्रेक्षकांनी त्यांची हुर्यो उडवली. नियोजकांनी त्यांना ठुमरी गाण्याची विनंती केली पण त्यांनी ती धुडकावली आणि ते त्या स्टेजवरून खाली उतरले. त्यांनी लगेचच ते संस्थान सोडले आणि ते इंदोरला गेले. १९३७ साली त्यांचे अब्बाजान गेले. १९४१ पर्यंत ते मुंबईत होते आणि मग दिल्लीला गेले. दिल्लीला त्यांना उस्ताद अब्दूल वहीदखॉं यांची एक शिष्या मुन्नीबाई हिला शिकवायचे होते. दिल्लीला ते सादिक बिल्डींग, जी. बी रोड येथे रहात होते. त्यानंतर ते कलकत्याला काही कोठेवालींच्या वस्तीत रहात होते. स्वातंत्र्य मिळायच्या जरा अगोदर त्यांनी लाहोरला एक मेहफिल केली व त्यानंतर ते परत मुंबईला परतले. मुंबईला ते वल्लभभाई रोड्वर पिला हाऊस या भागात रहात होते. ही वस्ती नाचणार्‍या, मुजरा करणार्‍या बायकांची होती. पण इथे बरेच मोठमोठे गायक रहात असायचे, उदा. बडे गुलाम अली, थिरकवॉ इ.इ. कारण येथे त्यांना या मुलींच्या भरपूर शिकवण्या मिळायच्या. नंतर थोडेफार पैसे मिळायला लागल्यावर ते पेडर रोड वर वसंत बिल्डिंगमधे रहायला गेले.
खॉंसाहेबांचे पहिले लग्न झाले ते उस्ताद विलायत खॉसाहेबांच्या बहिणीशी. हिचे नाव होते झीनत. ते तिला “शरिफन” या नावाने हाक मारायचे. आर्थिक अडचणींमुळे हे लग्न काही फार टिकले नाही. हिच्यापासून त्यांना एक मुलगी झाली तिचे नाव आहे फाहमिदा. ही मंबईमधली प्रसिध्द होमिओपाथीची डॉक्टर होती. या लग्नानंतर त्यांनी त्यांची शिष्या मुन्नीबेगम हिच्याशी लग्न केले. हे लग्न बराच काळ टिकले. खॉसाहेब हिला खलिफन म्हणून हाक मारायचे. मुन्निबेगम या स्वभावाने प्रेमळ असल्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांमधे लोकप्रिय होत्या. यांच्या पासून एक मुलगा झाला त्याचे नाव ईक्रम. हा इंजिनिअर झाला आणि कॅनडाला स्थाईक झाला. याच काळात खॉसाहेबांनी अजून एक लग्न केले ते ठुमरी गायिका मुश्तारीबेगमच्या मुलीशी. हिचे नाव होते रईसाबेगम. .हे सहन न होऊन मुन्नीबाईंनी घर सोडले आणि त्या परत कधीच दिसल्या नाहीत. रईसाबेगम पासून त्यांना एक एक मुलगा झाला त्याचे नाव आहे शाहबाज़खान. याला टिपू सुलतान या सिरीयलमधे तुम्ही हैदरलीच्या भूमिकेत कदाचित पाहिलेही असेल. दुर्दैवाने संगीताची त्यांची गादी त्यांच्या घराण्यात पुढे कोणीही चालवली नाही. धाकटे भाऊ मात्र इंदोर रेडिओ स्टेशनवर सांरगी वाजवायचे आणि तेथूनच निवृत्त झाले.

फेब्रूवारी १३, १९७४ रोजी अमीरखॉसाहेब कलकत्यात आपल्या मित्राकडे जेवून परत निघाले असता त्यांच्या मोटारीला समोरून दुसर्‍या एका मोटारीने जोरदार धडक मारली. ती एवढी भयंकर होती की दोन्ही मोटारींनी दोन पलट्या मारल्या. खॉंसाहेब दरवाजात बसले होते. ते दरवाजा तुटून बाहेर फेकले गेले आणि बाहेर फूट्पाथवर असलेल्या खांबावर आदळले. तेथेच जागेवर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

संध्याकाळच्या मारव्याची अखेर ही अशी झाली....

पण तो आपण इथे ऐकु शकता -

जयंत कुलकर्णी.
ऋणनिर्देश : श्री. चांदवणकर यांचा लेख,
श्रीमती सुशीला मिश्रा यांचा लेख.
श्री. अमजदअली खान व श्री जोशी यांनी सांगितलेल्या आठवणी.

कलासंगीतसंस्कृतीविचारलेखसंदर्भमाहितीआस्वादसमीक्षाप्रतिभा

प्रतिक्रिया

अतिशय सुंदर व माहितीपुर्ण लेख, श्री. जयंत कुलकर्णी आपल्याला अतिशय धन्यवाद. आपल्या लेखाने २०११ ची सुरुवात अतिशय सुंदर झाली आहे.

हर्षद.

इन्द्र्राज पवार's picture

1 Jan 2011 - 2:52 pm | इन्द्र्राज पवार

नूतन वर्षाची सुरूवातच अशा सुंदर आणि अत्यंत माहितीपूर्ण लेखाने व्हावी यासारखा अन्य आनंद नाही. या क्षेत्रातील जाणकार म्हणतातच की, शास्त्रीय संगीतातील दोन महान गायक...ज्यांचा श्वास म्हणजे गाणे होते. तो घेत असताना त्यानी गाण्यालाच मोठे केले, गाण्यामुळेच आणि गाण्यासाठीच जगले व अकाली देवाला प्यारे झाले असे दोन तारे म्हणजे बेगम अख्तर आणि अमीर खाँ साहेब ! मोटार आणि मृत्यु हा एक विलक्षण योगायोग....दोन श्रेष्ठ गायकांच्याबाबतीत.

श्री.जयंत कुलकर्णी यांचे या लेखाबद्दल मनःपूर्वक आभार.

इन्द्रा

विंजिनेर's picture

1 Jan 2011 - 3:20 pm | विंजिनेर

इन्द्रा सारखेच म्हणतो. नवीन वर्षाची सुरुवात चांगल्या, कष्ट घेऊन लिहिलेल्या कसदार लेखाने झालीये. वर्षभर काहीतरी चांगलेच वाचायला मिळणार :)
कुलकर्णीसाहेब, आभार.

यशोधरा's picture

1 Jan 2011 - 7:30 pm | यशोधरा

फार फार सुरेख लेख.
मारव्याच्या दुव्याबद्दल खूप आभार..

स्वाती२'s picture

1 Jan 2011 - 7:43 pm | स्वाती२

+१
सहमत!

तिमा's picture

1 Jan 2011 - 8:46 pm | तिमा

जयंतराव,
लेख फारच माहितीपूर्ण व खाँसाहेबांना न्याय देणारा वाटला. मेरुखंड गायकीची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती.
उस्ताद व पंडित याबाबतची आपली कॉमेंटही खास आवडली. १००+ सहमत.

रमताराम's picture

1 Jan 2011 - 10:02 pm | रमताराम

एका अवलिया उस्तादाची सुरेख ओळख. वाचनखूण साठवली आहे. सहस्र धन्यवाद.

वाहीदा's picture

1 Jan 2011 - 10:57 pm | वाहीदा

मारव्याची "सुरमयी शाम" मस्त !
रताराम, यांनी वाचनखूण कशी काय साठविली?? . नविन मिपा मध्ये हा ऑपष्न कुठे आहे ??
फक्त * 178 वाचने * मुद्रणसुलभ आवृत्ती हेच दिसत आहे

रमताराम's picture

2 Jan 2011 - 7:42 pm | रमताराम

एक्स्प्लोररच्या (वा फायरफॉक्स जो ब्राउजर असेल त्याच्या) फेवरिट्स मधे साठवता येईल. :)

धनंजय's picture

2 Jan 2011 - 12:31 am | धनंजय

ओघवता, माहितीपूर्ण लेख.

अनेकानेक धन्यवाद.

श्रावण मोडक's picture

3 Jan 2011 - 12:56 pm | श्रावण मोडक

+१

चिंतामणी's picture

2 Jan 2011 - 1:10 am | चिंतामणी

तीच ती मारव्याची जगप्रसिध्द तबकडी. खॉंसाहेबांचाही मारवा फार लाडका होता.

उस्ताद अमीरखॉंसाहेब म्हणले की सर्वप्रथम या मारव्याचीच आठवण होते.

माझ्यामते त्यानी गाइलेला दरबारी कानडासुद्धा फारच उच्च दर्जाचा आहे.

जयंत कुलकर्णी's picture

2 Jan 2011 - 7:47 am | जयंत कुलकर्णी

दरबारी, मान्य !

इतरांनी (ज्यानी कोणी) ऐकला नसेल तर येथे टाकत आहे.

जयंत कुलकर्णी

आवडाबाई's picture

2 Jan 2011 - 9:48 am | आवडाबाई

उत्तम लेख !!

उ. आमिर खान ह्यांचं नाव अनेक थोरामोठ्यांकडून नेहेमीच ऐकलंय. गाणं आज प्रथमच ऐकतेय. (जालावर डाउनलोड करून घ्यायला कुठे मिळेल काय?)

वर्षभर काहीतरी चांगलेच वाचायला मिळणार - विंजिनेर
असेच वाटते !!

पुढले लिखाणही लवकर येउ द्या.

सुबक ठेंगणी's picture

2 Jan 2011 - 8:18 pm | सुबक ठेंगणी

तराण्याच्या बोलांचा अर्थ वाचल्यावर लगेच माहित असलेले सगळे तराणे आठवून पाहिले. धुसरसा का होईना पण अर्थ लागल्यावर फार बरं वाटलं. :)

भारी समर्थ's picture

2 Jan 2011 - 11:22 pm | भारी समर्थ

.

भारी समर्थ

जयंत कुलकर्णी's picture

3 Jan 2011 - 12:50 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद. पण हे दोन्ही राग ऐकायला विसरु नका.

विसोबा खेचर's picture

3 Jan 2011 - 12:54 pm | विसोबा खेचर

जयंतराव,

आत्ताच हा लेख पाहिला/चाळला..

सवडीने वाचतो व प्रतिसाद देतो..

तात्या.

विसोबा खेचर's picture

13 Jan 2011 - 2:49 pm | विसोबा खेचर

उण्यापुर्‍या साठ वर्षाच्या आयुष्यातील चाळीस वर्षे त्यांनी शास्त्रीय संगीतात घालवली आणि एका गायकीला जन्म दिला. त्या घराण्याचे नाव झाले “इंदोर घराणे“.

विलंबित / अतीविलंबितसाठी त्यांनी उस्ताद अब्दूल वाहीद खान यांची तालीम घेतली. हे उस्ताद अब्दूल करीम खान यांचे चुलत भाऊ आणि श्रीमती हिराबाई बडोदेकर यांचे गुरू होते.

आणि त्यातूनच मला वाटते इंदोर घराण्याचा जन्म झाला असावा. अर्थात या सगळ्या गायनाचा पाया होता “मेरुखंड गायकी”

इंदौर गायकी असे म्हणतात खरे परंतु खासाहेबांवर किराण्याचेच अधिकाधिक संस्कार झाले होते..

ब्रिटीशांच्या काळात या भागात ब्रिटीश अधिकार्‍यांचे हवेशीर बंगले होते. तेथे एक मोठा बाजार होता. त्याच्या मागच्या भागाला म्हणायचे “Behind Bazar”. त्याचे झाले भेंडीबाजार.

आज मात्र या भेंडिबाजाराची/नळबाजाराची अत्यंत बकाल अवस्था आहे, हे दुर्दैव. गोल देऊळ तेवढं या भागाची थोडी शोभा राखून आहे. बाकी राहिले ते मात्र गुलालवाडीतले चौरसिया पानवाले. मजा येते यांच्याकडे पान खातांना..! :)

उस्ताद अब्दूल वहीद हे झुमरा तालात गायचे. हा ताल डोलायला लावणारा असल्यामुळे त्यांना फार आवडायचा. अमीर अलीनेही याच तालात गायला सुरवात केली.

वास्तविक झुमराला ओघवती लय अपेक्षित आहे, जी प्रामुख्याने ग्वाल्हेर गायकीत दिसते. पण ठाय लयीत देखील खासाहेब झुमर्‍याच्या समेवर फार सुंदर, लयदार यायचे. खासाहेबांची गायकी इतकी ठाय की कुमार त्यांना 'अंडरग्राऊंडवाले..' असं म्हणत..!

हळूहळू ते उस्ताद अमीरखॉंसाहेब या नावाने ओळखले जाऊ लागले. सर्व प्रकारच्या रसिकांना त्यांच्या गायनात काही ना काहीतरी आवडीचे मिळायचेच त्यामुळे त्यांच्या मेहफिलीत रंग भरू लागला. शांत, गंभीर स्वर, शुध्द मुद्रा, शुध्द वाणी, अतीविलंबित लय, लयदार गाण्यात मधेच अर्थपूर्ण विरामाच्या जागा, अवघड सरगम, वेगवान पण गमकयुक्त ताना, सुरेल, तीन सप्तकातून फिरणार्‍या दमदार, दाणेदार ताना ही त्यांच्या गायनाची वैशिष्ठ्ये मानली जाऊ लागली. त्यांच्या गायनात फारसी रचनांचा बराच वापर असायचा. साथीला सहा तारांचा तंबोरा आणि मधे मधे न कडमडणार्‍या तबल्याची साथ. ( हे फार अवघड आहे. आजही आपण जर त्यांचे गाणे ऐकलेत तर तबल्याची साथ कशी असावी हे ऐकायला मिळेल.). सहा फूट उंचीचा हा गायक गाण्यासाठी रंगमंचावर अवतरला की एखादा योगी पुरूष आला असे वाटायचे. त्यांच्या गाण्यातही अध्यात्म पुरेपूर उतरलेले वाटायचे. गाताना डोळे मिटलेले आणि सगळ्या बंदिशी अध्यात्म्याचा पाया असलेल्या, त्यामुळे मैफिलीला एक प्रकारचा वेगळाच माहौल असायचा. सगळ्यात महत्वाचे म्हणजे एक राग संपल्यानंतर ते लगेचच दुसरा राग सुरू करायचे, त्यामुळे मेहफिल एकसंध वाटायची. मेहफिलीत साहेबांनी कधीच ठुमरी आणि भैरवी म्हटली नाही. त्याबद्दल विचारल्यावर ते हसून म्हणायचे, “अरे माझे गाणे अजून संपलेले नाही”

जयंतराव, अतिशय सुरेख परिच्छेद...!

आमचे अण्णाही आमिरखांना गुरुस्थानी मानायचे. ते गाण्याकरता रंगमंचावर आले की अदबीने त्यांना तंबोरे लावून द्यायचे व त्यांचं गाणं ऐकायला रंगमंचावरच बसायचे..

कोणी म्हणाले पं. ओंकारनाथ ठाकूरांचा आवाज घ्या. पण अमीरखॉसाहेबांनी डि. व्हि. पलूसकरांचा आवाज त्या आवाजाच्या निर्मळतेमुळे सुचवला आणि ते अजरामर गाणे ’आज गावत मन मेरो झुमके” निर्माण झाले.

ओंकारनाथ.. हम्म. नो कॉमेन्टस्..! आमच्या बापुरावांचं गाणं मात्र कुणीही प्रेम करावं असंच होतं. अत्यंत निर्मळ आणि सात्विक..!

या चित्रपटाचे टायटल सॉंग पण अमीरखॉसाहेबांनीच म्हटले होते.

हो, माझ्या आठवणीप्रमाणे तो पुरियाधनाश्री आहे का? चूभूदेघे, पण आता नक्की काहीच आठवत नाही..'तोरी जयजयकार..' अशी काहीशी बंदिश होती का?

दर : आतील. आतले, आत.
दारा :दर-आ : आत या.
दर्तन : दर-तन : शरीराच्या आत.
तननदारा : तन – आ- दारा: शरीराच्या आत या/ये
तोम : त्वं-अहं- मी म्हणजे तूच आहे.
नादिरदानी – नादिर-दानि (दानाई) : नादिर म्हणजे सर्वात श्रेष्ठ. दानाई म्हणजे सगळं समजणारा (परमेश्वर)
तनदारदानी – तन-दार-दानि – शरीरात प्रवेश करणारा ज्ञानी.

खूप मोलाची माहिती..!

त्यांनी नम्रपणे नकार दिला आणि मला सुरवात करायला सांगितले. मला अजून आठवतंय मी कोमल रिषभ असावरीने ती पहाटेची मेहफिल चालू केली. परमेश्वराच्या कृपेने ती माझ्या अनेक मेहफिलीत सगळ्यात अविस्मरणीय ठरली. त्या पहाटे मला खॉसाहेबांनी जगातील सगळ्यात मोठे बक्षीस दिले होते.”

सुरेख..!

जयंतराव, आज जरा सवड मिळाली हा लेख वाचायला. एका नितांतसुंदर लेखाबद्दल आपले शतश: आभार..

आपली परवानगी असेल तर हा लेख मी आपला नामोल्लेख करून माझ्या ब्लॉगवर टाकू का?

तात्या.

जयंत कुलकर्णी's picture

13 Jan 2011 - 4:34 pm | जयंत कुलकर्णी

लेखापेक्षा व्यक्तिमत्व व त्यांचे गाणे थोर असल्यामुळे या लेखाला तशी काही किंमत नाही. आपण व अजून कोणाला हे कुठेही टाकायचे असेल तर जरूर टाकावा. फक्त एकच अट आहे ती म्ह्णजे माझ्या आजोबांच्या संदर्भात जो पहिला परिच्छेद आहे त्या सकट टाकावा. हा हट्ट का आहे, याच्यावर व त्यांच्या पखवाज वादनावर मी नंतर कधितरी लिहेन.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jan 2011 - 3:53 pm | बिपिन कार्यकर्ते

एका महान कलाकारावरचा अप्रतिम लेख. खूपच आवडला.

निनाद's picture

14 Jan 2011 - 4:30 am | निनाद

आमीरखां माझेही आवडते गायक आहेत. त्यांच्या विषयी मी काही बोलावे इतकी माझी योग्यता नाही. मी एक निव्वळ कानसेन!
तुमच्या लेखामुळे मात्र खूप आनंद झाला.
त्यांचा मारवा सुरेखच.
पण मला द्रुत तीन तालातला 'गुरू बीन ग्यान' हा खयाल फार आवडतो.
तसेच त्यांचा द्रुत तीन तालातलाच 'जोगीया मेरे घर आयो' हा खयालही आवडता आहे.

लेख वाचून फार छान वाटले. अजून लिहा.