शाश्वत - १
शाश्वत - २
शाश्वत - ३
स्थिर झालेल्या त्याच्या मनावर हळूच एक विचाराचा तरंग उमटलेला त्याला दिसला, "खरंच अंधारामुळे काही दिसत नाही आहे की मी अंध झालोय? ".
तो विचार विरतो न विरतो तोच पाठोपाठ दुसरा विचारतरंग उमटला, "काय फरक आहे? नुसते निर्दोष डोळे म्हणजे दृष्टी नव्हे. दृष्टी प्रकाशावर अवलंबून आहे. श्वास प्राणवायूवर अवलंबून आहे आणि शरीर अन्नावर. तुझे शरीर या सृष्टीतील उपलब्ध घटक वापरून क्रिया करण्यासाठी निर्माण झाले आहे. या सृष्टीबाहेर तुझी ज्ञानेंद्रिये कुचकामी आहेतच पण या सृष्टीतल्याही काही गोष्टी तुझ्या आकलनापलीकडे आहेत".
क्षण दोन क्षण पुन्हा स्थिरतेत गेल्यावर पुन्हा त्याच्यातील द्वैताचा संवाद चालू झाला.
"तू कोण? "
"मी म्हणजे तूच. पण तू कोण हे तुला कळाले तर मी कोण हेही तुला आणखी चांगले समजेल".
"ते कसे समजेल? "
"ते ज्ञान तुझ्यातच आहे. किंबहुना तू त्या ज्ञानाचाच भाग आहेस. "
पुन्हा काही काळ शांतता. जणू काही तो स्वत:च्याच डोळ्यात पाहून स्वत:च्याच मनाचा थांग शोधत असल्यासारखी.
"जर ते ज्ञान माझ्यातच आहे तर माझ्या ज्ञानेंद्रियाना का समजू शकत नाही? "
"कारण तुझी ज्ञानेंद्रिये त्यासाठी निर्माण झालेली नाहीत. "
"मग कशासाठी निर्माण झाली आहेत? काय प्रयोजन आहे माझ्या शरीराचं? माझ्या जिवंतपणाचं? "
"काहीच प्रयोजन नाही. ती कोणी मुद्दाम निर्माण केलेली नाहीत. आणि ज्याला तू जिवंतपणा म्हणतो ती केवळ एक अवस्था आहे. अनेक विकृतींपैकी एक. "
"विकृती? जिवंतपणा ही एक विकृती आहे? "
"होय. केवळ तू ज्याला जिवंतपणा म्हणतो तिच नव्हे तर या विश्वातला प्रत्येक कण ही एक विकृती आहे. तू मेला तरी ती विकृती संपणार नाही. तुला ज्या प्रकाशामुळे दिसतं तो प्रकाश म्हणजे एक विकृती आहे. जी हवा तू श्वासातून घेतोस ती हवा एक विकृती आहे. इतकंच काय ज्या पृथ्वीवर तू उभा आहेस ती पृथ्वी एक विकृती आहे. सूर्य, चंद्र, आकाशगंगा एवढंच नव्हे त्यांच्या दरम्यान असलेली पोकळीसुद्धा एक विकृती आहे. थोडक्यात हे विश्व म्हणजेच एक विकृती आहे. "
"मग प्रकृती काय आहे? "
"शून्य. प्रत्येक गोष्ट शून्यातून निर्माण होते आणि शून्यातच तिचा अंत होतो. ज्याप्रमाणे तुझ्या मनात एखादी इच्छा निर्माण होते आणि त्या इच्छेप्रमाणे तू वागला की ती इच्छा पूर्ण होते तसंच प्रत्येक गोष्ट शून्यातून निर्माण होते आणि पूर्ण होते. तुझी वासना शमली की तू म्हणतोस ती पूर्ण झाली. प्रत्यक्षात ती शून्य होते. शून्य म्हणजेच पूर्ण. "
"म्हणजे मी मेलो म्हणजे शून्य होणार? "
"तुझा जिवंतपणा शून्य होणार. तू आणि तुझा जिवंतपणा यात फरक आहे. जिवंतपणा ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि मृत्यू ही दुसरी. मघाशी मी म्हणालो ना की तू मेला म्हणजे विकृती संपली असं नाही. तुझ्या शरीरातील द्रव्ये वेगळ्या प्रकारच्या रासायनिक क्रिया करीत राहणारच. "
"म्हणजे ती नष्ट होणार नाहीत. तशीच या विश्वातली एकूण उर्जा अक्षय आहे असं माझ्या एका गुरुंनी मला शिकवल्याचं मला आठवतंय. "
"ते सत्य आहे पण सापेक्ष सत्य आहे. ते सत्य या विश्वाच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. आणि जरी या या विश्वातली उर्जा अक्षय असली तरी या विश्वातल्या सर्व उर्जा-प्रतिउर्जांची, बलाबलांची आणि द्रव्य-प्रतिद्रव्याची बेरीज केलीस तर काय मिळेल? शून्य. मी म्हणालो ना की सर्व गोष्टी शून्यातून निर्माण होतात आणि शून्यात विलीन होतात. हे विश्व त्याला अपवाद नाही. "
"म्हणजे काही काळाने हे विश्व शून्यात विलीन होणार? आणि अस्तित्वहीन होणार? "
"होय. काही काळाने हे विश्वच काय खुद्द काळही शून्यात विलीन होणार. या विश्वातला कण न कण शून्यात विलीन होणार. "
"आणि त्यानंतर? "
"त्यानंतर, त्याआधी या सर्व कल्पना विश्वाच्या अस्तित्वाशी निगडीत आहेत. विश्व नसेल तेव्हा काळही नसेल. फक्त अनादी अनंत असे शून्यत्व असेल. "
"मग हे सर्व निर्माण कसे झाले? "
"म्हणूनच ती विकृती आहे. आणि ही विश्वरुपी विकृती कशी निर्माण झाली हे कोणालाच कधीच कळणार नाही कारण तिथेच काळाचा जन्म झाला आणि या विश्वातल्या प्रत्येक कणाचं अस्तित्व त्या नंतरचं आहे. "
"मग शून्याचं काय झालं? "
"शून्य आहेच. हे सर्व शून्य तर आहे. हे सगळं शून्यातून निर्माण झालं म्हणजे शून्यातून बाहेर पडलं असं नाही. हे सगळं अजून शून्यातच आहे आणि सगळ्यात शून्य व्यापून राहिलं आहे. तुला वाटत असेल की दुरून तू शून्याकडे पाहू शकशील तर तो भ्रम आहे कारण शून्याच्या बाहेर असणे ही संकल्पनाच अस्तित्वात नाही. शून्य हेच पूर्ण आहे. पूर्ण हेच शून्य आहे. "
शून्य हेच पूर्ण आहे. पूर्ण हेच शून्य आहे या वाक्यांचे तरंग त्याच्या मनात लहरत जाउ लागले आणि इतकावेळ स्थिर असणार्या त्या डोहात जणू भोवरा निर्माण झाला. त्याच्या पुर्वायुष्याचा चित्रपट त्याच्या मन:चक्षूंपुढून झरझर सरकू लागला. अनेक प्रसंगांचे तुकडे, कधी काळी ऐकलेली वाक्ये, त्याच्या गुरुंची प्रवचने वगैरे सगळ्याची सरमिसळ होउन मोठा कोलाहल झाला. तो तटस्थपणे तो सरकणारा चित्रपट पाहत राहिला आणि मग एकदम एका बिंदूपाशी येउन तो पट थांबला. एका औदुंबराच्या झाडाखाली बसलेला एक वृद्ध शिक्षक आणि त्याच्यासमोर बसलेली चार-पाच मुले त्याला दिसू लागली. त्यातच तो ही एक होता. बालपणातील पाठशाळेचा परिसर त्याने लगेच ओळखला आणि तो रोमांचित होउन ते चित्र निरखून पाहू लागला.
सर्व मुले मांडी घालून ताठ बसली होती आणि त्यांनी हात जोडले होते. क्षण दोन क्षण शांततेत गेल्यावर गुरुंनी प्रार्थना म्हणायला सुरुवात केली.
"ॐ पूर्णमद: पूर्णमिदं पूर्णात्पूर्णमुदच्यते|
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते|
अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं|
तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नम:||
ॐ शांती: शांती: शांती:||"
ती प्रार्थना ऐकून जणू त्याच्या मनाचा सगळा भार उतरला. मन आणि शरीर पिसासारखं हलकं झालं. डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. तो हळूहळू भानावर आला. स्वत:च्या शरीराची, हातात धरलेल्या खिडकीच्या कवाडांची त्याला जाणीव झाली. अजूनही समोर काहीच दिसत नव्हते पण त्याला आता त्याची फिकीर नव्हती. इतकावेळ उघडे असल्याने वार्याने त्याचे डोळे चुरचुरत होते. दोन क्षण डोळे बंद करून तो उभा राहिला आणि मग हळुवारपणे त्याने डोळे उघडले. मग शांतपणे एक एक पाय उचलून त्याने खिडकीच्या सज्जात ठेवला आणि वाकून तो खिडकीत बसला. एकवार चारी बाजूना असणाऱ्या त्या अंधाररुपी पोकळीकडे त्याने पाहिले आणि मग एकदम हात पसरून स्वत:ला खालच्या खोल जाणार्या दरीत झोकून दिले.
त्याला दर्शन देण्यासाठी तिथे मूर्तिमंत साकार झालेल्या शाश्वत अशा शून्यात त्याने स्वत:ला अर्पण केले. तो आता पूर्णत्वाच्या दिशेने निघाला होता.
(समाप्त.)
प्रतिक्रिया
13 Nov 2010 - 9:16 am | क्रेमर
कथा आवडली. पूर्ण वाचाविशी वाटली. वातावरणनिर्मिती उत्तमच.
भोई, विष्णुदास यांचे कथेत प्रयोजन काय ते मात्र उमगले नाही (थोडेफारच उमगले). माझ्यापुरता जाणीवपूर्वक शून्याला कवटाळणार्या नायकात व अजाणतेपणी शून्यात विलीन झालेल्या जीवांत काही फरक दाखवण्याचा निरंजन यांचा हेतू असावा, असा समज मी करून घेतला. परंतु विष्णुदास व भोई यांचे अनुभवविश्व अपरिचित राहील्याने प्रश्नचिन्हे अनेकली.
16 Nov 2010 - 7:55 am | नगरीनिरंजन
कथानायक, विष्णुदास आणि भोई या तीन प्रवृत्ती आहेत. कथानायकाला ज्ञानाचीच फक्त तळमळ आहे तर विष्णुदास अहंकारी असून आणखी एक कर्तृत्व म्हणून त्याला हा शोध घ्यायचा आहे. काहीही समजण्याची त्याला तळमळ नाही आणि तो जिवंत परत गेला असता तरी फक्त आपण त्या रिकाम्या मंदिरात राहून आलो याशिवाय त्याला दुसरे काही जाणवले नसते. भोई ही आणखी एक प्रवृती, कोणताही प्रश्न न पडता आयुष्यात जे घडेल त्याला सामोरे जाणारे सुखी जीव, जे घडतंय तेच त्यांचं अनुभवविश्व. त्यात असलेला वा नसलेला अर्थ शोधायची त्यांना उर्मी नाही आणि असा काही अर्थ असावा अशी इच्छा करण्याएवढा विचारही नाही. यात चांगलं वाईट असं काही नाही. डोक्यातल्या रासायनिक क्रियांप्रमाणे ज्याचे त्याचे विचार पण त्या विचारांचा अंत मात्र कळत नकळत एकच.
साधारण वर्षभरापुर्वी मनोगतावर ही कथा लिहीली होती तेव्हा काही लोकांनी नायकाच्या जीवन संपवण्यावर आक्षेप घेतले पण बाकीची पात्रं तिथे आल्यामुळे नायकाआधीच मेली त्याचं एकालाही काहीच वाटलं नाही. :-)
13 Nov 2010 - 9:29 am | utkarsh shah
वाचताना गुंग झालो होतो. खरच छान आणि अतिशय सुंदर लेखन केलय तुम्ही.
13 Nov 2010 - 11:28 am | जाई अस्सल कोल्हापुरी
...वाचताना भान हरपले होते....जी. एं.च्या लिखाणाची आठ्वण नकळत झाली!
...आणि शाश्वत ४ वाचुन संपले तेव्हा डोळे नकळत भरुन आले होते... का माहिती नाही...
पण गळा भरुन आला होता!
अतिशय वेगळ...भिडणार लेखन...
13 Nov 2010 - 11:42 am | सुप्रिया
कथा आवडली. शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारी आहे.
13 Nov 2010 - 1:44 pm | प्रशु
अतिशय ओघावत्या भाषेत लिहिलेली कथा आणी शेवट केवळ अप्रतिम.... समाधी कि आत्महत्या ह्या वादाचा निकाल लावलात...
13 Nov 2010 - 3:29 pm | पारा
कथा आवडली. वातावरण निर्मिती आणि आपली ओघवती शैली मनाला स्पर्शून गेली. मात्र चवथा भाग वगळता कथावस्तू तेवढा परिणाम करू शकली नाही असं वाटतं. मात्र लिहित राहा, छान लिहिता ! :)
13 Nov 2010 - 5:38 pm | यशोधरा
सुरेख.
13 Nov 2010 - 6:28 pm | अवलिया
मस्त लेखन
13 Nov 2010 - 7:13 pm | sneharani
मस्त झालीय कथा!
13 Nov 2010 - 7:23 pm | रणजित चितळे
विचार करायला लावणारी सुंदर गोष्ट - खरे म्हणजे ही गोष्ट नव्हे लेखकाने सत्य वदित केले आहे
ह्या ओळिंवरुन मला मी लिहीलेल्या एका लेखा बद्दल आठवण झाली. दहा वर्षापुर्वी
अशा शिर्षकाचा एक लेख लिहीला होता. बघु कधी टंकलिखीत करीन तो.
13 Nov 2010 - 7:56 pm | अरुण मनोहर
वर्णन शैली खिळवून ठेवणारी आहे. नगरी निरंजन चे अभिनंदन.
युजी कृष्णमुर्ती हेच तर वेगवेगळ्या प्रकाराने सांगत होते.
13 Nov 2010 - 9:01 pm | विलासराव
चारही भाग आत्त्ताच सलग वाचुन काढले.
16 Nov 2010 - 8:08 am | नगरीनिरंजन
क्रेमर, उत्कर्ष, सुप्रिया, प्रशु, छिद्रान्वेषी,यशोधरा, अवलिया, स्नेहाराणी, रणजित चितळे, अरुन मनोहर आणि विलासराव,
आपण सर्वांनी केलेल्या कौतुकाबद्दल मनापासून आभार.
जाईताई,
आपण अगदी मन लावून कथा वाचल्याबद्दल आपले विशेष आभार आणि आपल्याला एक वेगळी अनुभूति मिळाली याबद्दल आनंद!