मराठा लाईट इनफंट्री - भाग - ४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
6 Aug 2010 - 4:04 pm

मराठी लाईट इनफंट्री... भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५

***

parade1

इटली.

मराठा ऑफिसर
मराठा ऑफिसर

३ सप्टेंबर १९४३ : दुसरे महायुध्द सुरू होऊन आता ४ वर्षे उलटली होती. सिसीली मधल्या दोस्तराष्ट्रांच्या ब्रिटिश फौजा मेसिनाची सामुद्रधुनी ओलांडून दक्षिण इटलीतील कॅलब्रियार प्रांतात घुसल्या होत्या. या आक्रमणापुढे इटलीचा पराभव होणार हे स्पष्ट दिसू लागले. इतर फौजां या आर्मीला सामील होऊन या आघाडीवर जर्मन फौजांच्या पराभवाची तयारी सुरु झाली. शेवटी पो नावाच्या दरीत जर्मन सैन्याचा पूर्ण पराभव करण्यात आला.

२४ स्प्टेंबर १९४३ रोजी ८व्या आर्मीला मिळण्यासाठी १ ल्या आणि ५-रॉयल बटॅलियन ने तारांतोमधून प्रस्थान ठेवले. ही ८ वी इंडियन डिव्हीजन मध्य आशीया मधून आठव्या आर्मीला कुमक म्हणून पाठवण्यात आली होती. हे सगळे सांगायचे कारण म्हणजे याच सैन्याबरोबर ४-मराठा रणगाडाविरोधी रेजिमेंट युरोपमधे प्रथमच आली. आपल्याला आठवत असेल ही रेजिमेंट बेळगावात ८ व्या बटॅलियनच्या ५ व्या रेजिमेंटमधून तयार करण्यात आली होती. याच रेजिमेंटचे युरोपमधे इंडियन आर्टिलरीमधे रुपांतर करण्यात आले. याचा तोटा असा झाला की या दोन तुकड्या निरनिराळ्या बटॅलियन्सला जोडण्यात आल्यामुळे यांचे स्वतंत्र अस्तित्व संपले आणि त्यामुळे यांच्या परक्रमाबद्दल इतिहासात फारशी माहिती मिळत नाही. जी मिळाली ती अक्षरश: खणून काढावी लागते कारण याबद्दलची माहीती अनेक रेजिमेंटच्या इतिहासात विखुरली गेली. साहजिकच आहे. त्यांनी ज्या ज्या रेजिमेंटसबरोबर युध्दात भाग घेतला त्यांच्या रेकॉर्डसमधे यांची रेकॉर्डस‍ विरघळून गेली. यातली बरीच माहीती काळाच्या ओघात नष्ट झाली आणि नंतर दुर्दैवाने भारतातूनही ही माहीती खणायचे विषेश प्रयत्न झाले नाहीत.

जमिनीवर उतरल्यावर १-बटॅलियनने सुसंघटीत होऊन या युध्दभूमीची आघाडी सांभाळायची अवघड कामगिरी स्विकारली. मराठे या वेळी प्रथमच युरोपात लढाईला सामोरे गेले ते ट्रिग्नो नदी पार करताना. ही नदी यशस्वीरित्या पार करून त्यांनी रोक्काव्हिव्हारा नावाचे गाव काबीज केले आणि प्रसिध्द सॅन्ग्रो नावाच्या नदीच्या दिशेने कूच केले. या नदीच्या संरक्षणासाठी जर्मन सेनेने चांगलीच तयारी केली होती. एक तर त्यांची सर्व ठाणी उंचावर होती आणि खालचा सगळा टापू त्यांच्या तोफांच्या मार्‍यात येत होता. या त्यांच्या संरक्षण फळीतून हुसकावून लाऊन त्यांना उत्तरेकडे पिटाळायचे असे महत्वाचे पण अत्यंत अवघड व किचकट काम या बटॅलियनकडे होते.

या आक्रमणात १-मराठाकडे आघाडीचे आक्रमण करायचे काम होते. ती कामगिरी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली आणि ते रोमॅग्नोली नावाच्या गावात पोहोचले.
सॅन्ग्रोवरच्या या लढाईत लान्स नाईक हान लकडे यांचा पराक्रम वाचण्या सारखा आहे -
आक्रमण करत असताना एका शेतातल्या घरातून मशिनगनचा जबरद्स्त मारा होत होता. त्या गोळीबारात त्यांच्या तुकडीचे बरेचसे जवान मृत्यूमुखी पडले. दबक्या चालीने लकडे त्या घराच्या खिडकीशी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या ब्रेनगनने त्या खिडकीतून शत्रूवर मारा केला. त्यांच्यावर लगेचच आतून गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. डोक्यात गोळी घुसल्यामुळे ते तिथेच खिडकीखाली जमिनीवर कोसळले. त्यांची काहीच हालचाल नाही हे बघून त्यांचा मृत्यू झाला असे समजून जर्मन सैनिकांनी आपली मशिन-गन त्या खिडकी शेजारी असलेल्या बंकरला असते तशा खिडकीतून बाहेर काढ्ली. या बहाद्दराने आपल्या अगोदरच जळालेल्या हाताने ती मशीनगन बाहेर खेचून काढली आणि तीच मशिनगन उलटी करुन आतल्या सर्व ९ जर्मन सैनिकांचा खातमा केला. मित्रहो, ज्या मशिनगनमधून फायरिंग होत आहे त्याचे बॅरल भयंकर म्हणजे भयंकर तप्त असते. असे म्हणतात जे हे बघत होते त्यांनी काही क्षण युध्द थांबविले. या असामान्य धैर्यासाठी लकडे यांना एक शौर्यपदकही देण्यात आले. यामुळे त्या बटॅलियनचा पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला.

१२ डिसेंबरला मोरो नदी पार करायच्या वेळी मराठ्यांना परत आघाडी संभाळायला लागली. रात्रीच B कंपनीने ती छोटी नदी पार केली पण शत्रूच्या ते लक्षात येताच त्यांच्यावर रणगाड्यांनी तुफानी हल्ला करण्यात आला. या रणगाड्यांशी नुसत्या बंदूकांनी लढणे शक्य नसल्यामूळे त्यांना तात्पुरती माघार घ्यावी लागली. यावेळी माघार घेताना खरंतर सगळ्यांचीच कत्तल व्हायची पण मेजर महंत जे कंपनी कमांडर होते त्यांनी त्यांच्या वायरलेस सेट वरून तोफखान्याची मदत मागितली जी त्यांना लगेचच मिळाली. पण कुठे गोळे टाकायचे हे सांगताना त्यांना स्वत:चेच अक्षांश रेखांश सांगावे लागले. यामुळे बर्‍याच सैनिकांना जिवंतपणे माघार घेता आली पण त्यांना मात्र मरण पत्करावे लागले. या अत्यंत निस्वार्थी निर्णयासाठी त्यांना मरणोत्तर मिलिटरी क्रॉस देण्यात आला.

या पहिल्या माघारीचा अर्थातच मराठ्यांवर काहीच परिणाम झाला नाही. त्यांच्या दुसर्‍या त्वेषाने केलेल्या हल्ल्यात त्यांनी मोरो नदी पार केली. इथे मात्र जर्मनांची संरक्षण फळी फारच मजबूत होती. जर्मनांनी इथे १ल्या मराठ्यांवर तुफानी हल्ला चढवला. परिस्थितीला गंभीर वळण लागले. पण १-मराठा ने या वेळी माघार घ्यायला नकार दिला आणि त्यांनी त्या डोंगराळ भागातून ग्रांदे नावाचे गाव काबीज केले. या हल्ल्या दरम्यान C कंपनीवर जर्मनांच्या रणगाड्यांनी भयंकर हल्ला चढवला. या युध्दात याच मोरो नदी पार करायच्या युध्दात जमादार राजाराम सावंत यांनी जो संगीनीचा हल्ला करून एका जर्मन तुकडीचा हल्ला परतवला आणि नाईक बाबू गायकवाड यांना पदके देण्यात आली.
त्यावेळी व्हेरुका नावाच्या डोंगरावर झालेल्या लढाईचे हे वर्णन –
वेरुकावर मराठे
या डोंगरावरच्या जर्मनांच्या ठाण्यावर हल्ला करण्यासाठी १/५-मराठाने डावी बाजू पकडली. हल्ल्याचे नेत्रृत्व C कंपनीकडे होते. प्रमूख होते मेजर पेटींगेल. या हल्याचे निरीक्षण स्वत: जनरल रसेल हे त्या डोंगराच्या १००० फूट खाली असलेल्या सोंडेवरुन करत होते. नुकसान कमीतकमी व्हावे म्हणून सर्व तुकड्यांना आपापली कामे वाटून देण्यात आली होती अर्थातच प्रत्येक तुकडीचे लक्ष वेगवेगळे होते. हल्ल्याचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळायचे होते. कारण मेजरने कॅनेडियन रणगाड्यांचे संरक्षक कवच मागितले होते. त्यामुळे वेळापत्रकाचे महत्व सर्व जाणून होते. नाहीतर स्वत:च्याच बॉंब खाली मरायची लक्षणे होती. मराठ्यांनी दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी आपली जागा सोडली आणि त्यांनी शत्रूच्या एका मशिनगनच्या बंकरच्या दिशेने कूच केले. कॅनेडियन रणगाड्यांचा आगीचा वर्षाव चालू झाला आणि मराठे १५ यार्डावर पोहचल्यावर थांबला. जसा शेवटचा बॉंबगोळा पडला तसे मराठयांनी त्या बंकरवर चित्यासारखी झडप घातली आणि पहिल्या झटक्यात चार जर्मन सनिकांना यमसदनास पाठवले. ते बघताच उरलेले १५ तातडीने शरण आले.
जर्मन युध्द्कैदी
ठरल्याप्रमाणे इशारा होताच, दुसर्‍या तुकडीने आता पुढे धाव घेतली. पण त्यांना मशिनगनच्या तिखट मार्‍याला तोंड द्यावे लागले कारण त्या पर्यंत कॅनेडियन रणगाड्यांचा मारा पोहोचत नव्हता. हे बघताच नाईक नथू धनवडे यांनी चित्यासारखी चपळ हालचाल करून समोरच्या झुडपात उडी मारली आणि दुसर्‍याच क्षणी ते त्या ठाण्याच्या वरच्या भागात पोहोचले. तेथून त्यांनी त्या ठाण्यावर ती मशिनगन शांत होइपर्यंत हातबॉंबचा वर्षाव केला आणि ते ठाणे काबीज केले. एकट्यानेच केले, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. तिसर्‍या तुकडीने एखाद्या युध्दाचा सरावात भाग घेत असल्यासारखे सफाईदारपणे उरलेले काम पूर्ण केले.
जनरल रसेल जे हा हल्ला बघत होते, त्यांचे उद्‍गार लिहून ठेवलेले आहेत -
“My God ! I wish His Majesty had been here to see it”.
मेजर्जनरल रसेल

हे यश मिळवल्यानंतर एकदोन दिवसाने एक जर्मन सैनिक युध्दकैदी झाला. त्याने घरी जे पत्र लिहीले होते त्यात खालील मजकूर होता...
“सप्टेंबर १३. आज माझा वाढदिवस. मी हा दिवस कधीच विसरणार नाही. आमच्यावर आज (मराठ्यांचा) हल्ला झाला. मी कसाबसा पळून गेलो म्हणून पकडला गेलो नाही. मी माझ्या आजवरच्या आयुष्यात एवढ्या वेगाने कधीच पळालो नसेन. मला घरून दोन पार्सलं आली होती, पण मला सगळेच सोडून पळावे लागले........”

दरम्यान १० वी इंडियन डिव्हीजन मध्या आशीया मधून ईटलीत आणण्यात आली. तारांटो बंदरात ती २८ मार्च १९४४ रोजी उतरली. त्यातच ३री बटॅलियन पण होती. काहीच आठवड्यात ती सुसंघटीत झाली आणि युध्दाला तयार झाली. तिला पाठवण्यात आले ओर्टोनाच्या आघाडीवर. ही आघाडी आपली पहिली बटॅलियन ज्या ठिकाणी होती त्याच्या जवळपासच होती. या दिवसातच ३-मराठाला युरोपिअन युध्दाची चुणूक अनुभावयला मिळाली.

दोस्तराष्ट्रांच्या ५व्या आर्मीला काही महिन्यापासून म्हणजे हिवाळ्यापासून रोमवर आक्रमण करता येत नव्हते कारण जर्मानांनी या रस्त्यावर दोन संरक्षण फळ्या उभ्या केल्या होत्या. एकाचे नाव होते गुस्ताव्ह लाईन आणि त्याच्यामागे होती हिटलर लाईन. रोमकडे जाणारे सर्व मार्ग या दोन संरक्षक फळ्यांनी रोखून धरले होते. एप्रिलच्या अखेरीस दोस्तराष्ट्रांच्या इटलीतल्या सेनेच्या सुप्रीम कमांडर जनरल अलेक्झांडर यांनी गुपचूपपणे ८व्या आर्मीचा मुख्य भाग मधला डोंगराळ भाग पार करून या फौजा गुस्ताव्ह आणि हिटलर लाइन्सचा पाडाव करण्यासाठी योग्य अशा ठिकाणी एकवटल्या. या मधे पहिली बटॅलियन पण सामील होती.

या ठिकाणी मराठ्यांना जर्मन सेनेच्या समोरच आघाडी संभाळायला लागली. मराठ्यांच्या जागा या अत्यंत धोकादायक ठिकाणी होत्या कारण जर्मन सैन्य हे मोनॅस्ट्री टेकडीवर उंच जगेवर होत्या आणि त्याचा त्यांना भरपूर फायदा होत होता, इतका की या सेनेला दिवसा हालचाल करणे सुध्दा शक्य नव्हते. त्यातच भरीस भर म्हणून जर्मन सैन्याने या दोन सैन्याच्या मधे कायमचे धुराचे आवरण तयार केले होते–स्मोक बॉंबने. या कृत्रिम धुक्याच्या आवरणाच्या आडून ते सहज मराठ्यांवर रॉकेटचा व तोफांचा मारा करू शकत होते.

१५ मे रोजी रात्री ९वाजता मराठ्यांनी हल्ला चालू केला आणि सकाळी ८ वाजता त्यांनी रॅपीडो नदी पार करून पलिकडच्या भागात कब्जा मिळवला. त्यातच ५ व्या रॉयल मराठा रेजिमेंटने आपल्या मशिनगन्स सोडून या आक्रमणात भाग घेतला. हे चालू असताना १ली मराठा आणि न्युझीलंडच्या सैनिकांनी पुढे आक्रमण केले आणि हिटलर लाइनच्या शत्रूला तिथेच खिळवून ठेवले. दुसर्‍याच दिवशी हिटलर लाईनचा पाडाव झाला आणि रोमचा मार्ग मोकळा झाला. या युध्दात रॉयल मराठ्याच्या असामान्य शौर्याबद्दल हवालदार कृष्ण यशवंतराव यांना पदक देण्यात आले. त्यांच्या या शौर्याची कहाणी इतिहासात हरवली आहे.

गुरसीनो नावाच्या गावाजवळ ४५ जर्मन सैनिकांना पकडण्यात आले त्यातले १५ एकट्या रामचंद्र यादव नावाच्या सैनिकाने पकडून आणले. ती ही हकिकत सापडत नाही. जर्मनांनी माघार घेताना जे भूसुरूंग पेरुन ठेवले होते ते निकामी करण्याच्या कामगिरीसाठी जमादार तुकाराम परब यांना मिलीटरी क्रॉस प्रदान करण्यात आला.

जूनच्या अखेरीस १०वी इंडियन डिव्हिजन एपेनिन्स नावाच्या डोंगरांगा पार करत असताना ३री बटॅलियन पेट्रीग्नानो भागात पोहोचली. हा भाग रोमच्या दक्षिणेस येतो.
एपिनाईन्सची बर्फाआच्छादित शिखरे
उत्तरेला मार्गक्रमण करत असतानाच त्यांना मोंटोन येथे जर्मनसेनेच्या उत्कृष्ट अशा सेनेशी गाठ पडली. या जर्मन सेनेनेसुध्दा या गावालगतच्या डोंगरावर भक्कम संरक्षणफळी उभी केली होती. यांचा मोठाच अडथळा मराठ्यांसमोर होता. ८जुलैला या घनघोर युध्दाला तोंड फुटले. ६ दिवस रात्रंदिवस हा संग्राम चालला होता. अखेरीस ३-मराठाला ही उंचावरची शत्रूची ठाणी काबीज करण्यात यश आले.

१० जुलैला नाईक यशवंत घाडगे यांनी अमानवी असामान्य असा पराक्रम गाजवला आणि त्यासाठी त्यांना सगळ्यात श्रेष्ठ असा व्हिक्टोरिया क्रॉस बहाल करण्यात आला. त्यात त्यांना मृत्यू स्विकारावा लागला. हाच तो मराठा रेजिमेंट्चा पहिला VC .

ही लेखमाला मला फक्त दोन शुरवीर मराठ्यांनी सर्वोच्च असा व्हिक्टोरिया क्रॉस कसा मिळवला या पुरतीच मर्यादित ठेवायची होती. पण त्याची पार्श्वभूमी लिहीता लिहीता एवढे भाग झाले.

पुढच्या भागात व्हिक्टोरिया क्रॉसबद्दल आणी आपल्या दोन शुरवीर मराठ्यांबद्दल ! ज्यांनी अतुलनीय पराक्रम गाजवून तो मिळवला.

व्हिक्टोरिया क्रॉस जे मिळवतात त्यांना सुप्रीम कमांडरपण सॅल्यूट मारतात....... त्याबद्दल !

भाग ४ समाप्त.
जयंत कुलकर्णी.
पुढे चालू..........

इतिहासलेखमाहिती

प्रतिक्रिया

प्रसन्न केसकर's picture

6 Aug 2010 - 4:19 pm | प्रसन्न केसकर

ओघवत्या भाषेत युद्ध अगदी डोळ्यासमोर उभे केलेत सर!
एमएलआय बाबत अगदी थोडीशीच माहिती होती पण तुमची लेखमाला वाचुन तो झळाळता इतिहास नक्की काय आहे हे कळत आहे.
ही लेखमाला संपल्यावर महार रेजिमेंटबद्दल देखील लिहा अशी विनंती. महार रेजिमेंटच्या इतिहासाबद्दलही ऐकले आहे पण सविस्तर माहिती मिळावी ही इच्छा आहे.
झालंच तर अन्य लष्करी संस्था, जसे व्हीआरडीई, बाबतही लिहिलेत तर अजुनच बरे होईल.

पाषाणभेद's picture

6 Aug 2010 - 5:24 pm | पाषाणभेद

अंगावर रोमांच उभे राहिले. मस्त लेखन.
अवांतर: लेख संपादन करण्याची सुविधा उपलब्ध झालेली नसतांना आपण लेख टाकलात. धन्यवाद.
अतिअवांतर: लेख संपादनाची सुविधा खरोखर चांगली होती. तिला माझी आदरांजली.

जयंत कुलकर्णी's picture

6 Aug 2010 - 8:46 pm | जयंत कुलकर्णी

//अवांतर: लेख संपादन करण्याची सुविधा उपलब्ध झालेली नसतांना आपण लेख टाकलात. धन्यवाद.
अतिअवांतर: लेख संपादनाची सुविधा खरोखर चांगली होती. तिला माझी आदरांजली.//

मी बर्‍याच बाबतीत आशावादी आहे. सुविधा चालू होईल असे वाटते आहे. देर है अंधेर नही !

:-)

पाषाणभेद's picture

8 Aug 2010 - 7:57 pm | पाषाणभेद

आज ७:५४ च्या सुमारास माझ्या 'वाटचाल' या टॅब मध्य तुमचे दोन लेख 'मराठा लाईट इनफंट्री - भाग - ४' अन 'मराठा लाईट इनफंट्री - भाग - १' ' अद्ययावत' आहेत असे दाखवत होते. म्हणजेच तुम्ही ते पुन्हा संपादित केलेले असावेत.

तुम्ही लेख संपादित करू शकत आहात काय? तुम्हास ती "सुविधा" (???) मिळाली आहे काय?

जयंत कुलकर्णी's picture

8 Aug 2010 - 10:36 pm | जयंत कुलकर्णी

:-)

नाही. अजून ती सुविधा मला वाटते कोणालाच मिळालेली नाही. श्री बिपीन कार्यकर्ते यांनी सगळ्या लेखाच्या लिंक्स टाकल्या आहेत त्यामुळे तो अद्ययावत असा दिसत असावा.

त्यासाठी श्री. कार्यकर्ते यांना धन्यवाद !

मीनल's picture

6 Aug 2010 - 6:10 pm | मीनल

हे कधीही वाचले नव्हते. याबद्दल नवेच कळले.
फोटोंमुळे वर्णन अधिक छान झाले आहे.

मृत्युन्जय's picture

6 Aug 2010 - 6:59 pm | मृत्युन्जय

खुपच सुंदर. मराठ्यांनी हे शौर्य हरामखोर इंग्रजांसाठी गाजवले हेच फक्त दु:ख.

लेख मात्र अप्रतिम. सैनिकांच्या शौर्याला सलाम

अर्धवटराव's picture

6 Aug 2010 - 11:33 pm | अर्धवटराव

भारतीयांच्या याच परक्रमावर विश्वास होता म्हणुन स्वा. सावरकरांनी सशस्त्र क्रांतीचे स्वप्न बघितले आणि सुभाषबाबुंनी ते प्रत्यक्षात उतरवले.

मराठ्याविना राष्ट्रगाडा चालेना हेच खरे.

(समर्थांचा मराठा) अर्धवटराव

आमोद शिंदे's picture

7 Aug 2010 - 8:06 am | आमोद शिंदे

(समर्थांचा मराठा) अर्धवटराव

???
समर्थ आणि मराठा ह्या दोघांनाही अर्धवट म्हंटणार्‍या प्रतिसादाचा निषेध!

पुष्करिणी's picture

7 Aug 2010 - 3:57 am | पुष्करिणी

माहितीपूर्ण आणि छान झालाय लेख. यातलं बरच काही माहित नव्हतं .

सहज's picture

7 Aug 2010 - 7:52 am | सहज

छान लेखमाला. वाचतोय.

प्रभो's picture

7 Aug 2010 - 8:07 am | प्रभो

छान माहिती..

सुधीर कांदळकर's picture

14 Dec 2011 - 7:51 pm | सुधीर कांदळकर

युद्धस्य कथा रम्या. खरे तर 'ओ' हेनरी च्या लघुकथाबद्दल आपल्या लेख वाचायला इथे आलो आणि त्यामुळे ही सुरेख लेखमाला वाचायला मिळाली. पुढील भागांची वाट पाहातो. पण 'ओ' हेनरीच्या लघुकथेबद्दलचे लेखन काही सापडले नाही.पूर्वी श्रीमंत असलेला पण महायुद्धानंतरच्या महागाईने डबघाईला आलेला एक प्रेमळ गृहस्थ आपल्या पत्नीला भेटवस्तू म्हणून एक कंगवा देतो आणि ती त्याला खिशातले एक महागडे घडयाळ भेट देते - कसे ते मी इथे उल्लेख करीत नाही, नाहीतर मजा निघून जाईल - तीच गोष्ट का हो? ती अमर लघुकथा मी वाचली आहे. कृपया दुवा पाठवा.

जयंत कुलकर्णी's picture

14 Dec 2011 - 10:47 pm | जयंत कुलकर्णी

कांदळकर साहेब,

O Henry च्या दोन कथा टाकलेल्या आहेत. तिसरी आता The Leaf " लवकरच टाकेन ती जरूर वाचा !

आणि धन्यवाद !