मराठा लाईट इनफंट्री - भाग - २

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
22 Jul 2010 - 9:44 pm

मराठी लाईट इनफंट्री... भाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५

***

दुसर्‍या महायुध्दातील मराठ्यांचा पराक्रम/शौर्य. भाग- २

या अगोदर या रेजिमेंटची अजून थोडिशी माहिती घेऊयात. अर्थात ही आपल्याला माहीती आहेच कारण महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मुलगा वा मुलगी लहानपणी खेळताना ही घोषणा देतेच.

या रेजिमेंटची युध्दघोषणा आहे -
“छत्रपती शिवाजी महाराज / की जय !
हर हर / महादेव”.
प्रमूख पहिला जयजयकार करतो आणि बाकीचे त्याला जय ! आणि महादेव म्हणून साथ देतात.
असो.

जर्मनी आणि इंग्लंडपासून भारत बराच दूर असला तरी जशी जशी युध्दाची धग वाढू लागली तसे तसे हे अंतर कमी होऊ लागले. सर्वच जगाला या युध्दाने ग्रासले आणि जवळ जवळ सगळ्याच देशांना कुठली ना कुठली तरी बाजू घेणे भाग पडू लागले. भारत तर इंग्लंडचाच भाग असल्यामुळे भारतीय सैन्याला या युध्दात भाग घ्यायलाच लागला. त्यामुळे या नवीन प्रकारच्या युध्दाची भारतीयांना माहीती झाली आणि अर्थातच त्याचा फायदा आपण अजूनही बघतोच आहोत.

भारतीय फौजांना पहिली कामगिरी मिळाली ती इजिप्तचे इटलीच्या सैन्यापासून संरक्षण करणे आणि सुदानच्या पट्यात संरक्षक फळी मजबूत करणे. मुसोलीनीच्या पूर्व आफ्रिकेच्या साम्राज्याला जो सुरूंग लागला त्यात मराठा लाईट इनफन्ट्रीचा मोठा सहभाग होता.

२ बटॅलियन जी एडनमधेच होती तिच्या सोबतीला भारतातून ३री बटॅलियन पाठवण्यात आली. या दोन्ही बटॅलियन्सचे लक्ष होते इटलीची एरिट्रियाची वसाहत. या युध्दात आपली शौर्याच्या परंपरेला जागून या सैन्याने केरेनचा डोंगरी किल्ला काबीज करताना अतुलनीय शौर्य गाजवून आपले नाव इतिहासात नोंदवले. या रक्तरंजीत युध्दाची हकिकत आपण आता बघू.
साल होते १९४० –
हा किल्ला एका डोंगरावर होता आणी त्या डोंगराच्या उतारावर दोन चांगली मोठी टेकाडे होती. एकाचे नाव होते पिनॅकल आणि दुसर्‍याचे पिंपल. हा सगळा डोंगर मोठमोठ्या दगडांनी भरलेला होता आणि त्याच्या आडोश्याने शत्रूला येणार्‍या दोस्तराष्ट्रांच्या सैन्यावर अचूक हल्ला करता येत होता. इटालियन सैन्याकडे भरपूर तोफा आणि त्याचा दारूगोळ्याचा साठा होताच. केरेन काबीज करण्यासाठी ४ थ्या इंडियन डिव्हिजनची नेमणूक करण्यात आली होती. पण आपण ही जी दोन टेकाडे काबीज करण्यासाठी झालेल्या युध्दात, मराठा लाईट इनफंट्रीने भाग घेतला त्याचकडे प्रामुख्याने बघणार आहोत, कारण नाहीतर हा लेख फार मोठा होईल.

300px-Keren_Battlefield_023

१५ मार्च रोजी हायलॅंड लाईट इनफंट्रीने ले. कर्नल पर्सीवल यांच्या आधिपत्याखाली डोलोगोरोडॉक किल्यावरच्या पहिल्या टेकाडावर हल्ला करण्यासाठी कूच केले. त्यांच्या वर लगेचच मशीनगनचा तिखट मारा करण्यात आला. गोळ्यांच्या वर्षावात हे सैनिक त्या टेकाडाच्या पायथ्याला पोहोचले. हा आख्खा दिवस वरून होणार्‍या गोळीबारामुळे या सैनिकांना वर तोंड काढता आले नाही. वरून तळपता सुर्य आणि गोळ्यांचा व तोफगोळ्यांचा वर्षाव यामुळे या सैनिकांची दिवसभर फारच दमछाक झाली. श्वास घेणे सुध्दा अवघड झाले होते. प्यायचे पाणी संपल्यामुळे त्यांच्या हालात अजूनच भर पडली. इटालियन सैनिकांना वरून यांची बारिकशी हालचाल सुध्दा टिपता येत होती. जराशी हालचाल झाली की वरून गोळीबार होत होता. हे बघता दिवसा ढवळ्या पिनॅकल वर हल्ला करणे अशक्य आहे असे ठरवण्यात आले. खरे तर पुढे गेलेल्या सैन्यालाच मागे कसे आणावे हाच मोठा प्रश्न होऊन बसला होता. शेवटी अंधार पडल्यावर HLI ने यशस्वी माघार घेतली.

तो पर्यंत जनरल हिथ आणि मेसर्व्ही यांनी एक दुसरीच योजना आखली. अंधाराचा फायदा घेऊन मधली छोटीशी दरी पार करून पिनॅकलवर हल्ला करायची ती योजना होती आणि या करता आक्रमक ३/५मराठा लाईट इनफंट्रीची निवड करण्यात आली. कमांडर होते कर्नल रीड. कव्हरींग फायर देण्यासाठी तोफखाना होताच पण तो काही काळच चालू ठेवता येतो – आपली स्वत:ची हानी टाळण्यासाठी. हल्ला चालू झाला पण त्या अगोदर एक इंग्लीश आधिकारी जो पहिल्यांदीच मराठ्यांबरोबर लढाईत भाग घेत होता तो काय म्हणाला ते बघूया, त्याच्या शब्दात –
“हे मराठे हिरव्या रंगाची बेरेट घालतात. जेंव्हा ते हेल्मेट घालत नाहीत तेव्हा त्या टोपीवर एक हिरव्या आणि लाल रंगाचा तुरा फडकत असतो. पहिल्यांदा बघितल्यावर हे कसे लढणार असे वाटते खरे, पण यांनी कपडे काढल्यावर त्यांचे पिळदार शरीर आपल्या नजरेस पडते आणि ही शंका दूर होते. हे भारतातल्या दख्खन नावाच्या प्रांतातले सैनिक असून उत्तम कुस्ती करतात. हे अत्यंत शांत वृत्तीचे सैनिक कोणाच्याही वाटे जात नाहीत पण राग आल्यावर यांच्या डोळ्यात रक्त उतरते. डोळे लालबूंद होतात आणि मग आसपासचे सगळे चित्रच बदलू लागते. कितीही थंडी असो किंवा उष्णता असो, हे कुठल्याही हिंदीसेनेपेक्षा जास्त तडफेने युध्द करू शकतात.”

अंधार पडल्यावर मराठा लाईट्ने आपला हल्ला चालू केला. ज्या खडबडीत व दगडाधोंड्यांनी भरलेल्या, मोठमोठे दगड पडलेल्या डोंगराच्या उतारावर जेथे दिवसा ढवळ्यासुध्दा दोन्ही हाताचा आधार ने घेता चढणे मुष्कील होत, तेथे जिद्दीने हे सैनिक चढत होते, केवळ युध्दात शत्रुला पाणी पाजण्यासाठी. हे शब्द माझे नाहीत. वरील आधिकायाचे आहेत. सगळ्यात पुढे होते B कंपनीचे प्रमूख सुभेदार श्रीरंग लावंड. मागे कष्टाने C आणि D कंपन्या मार्ग आक्रमत होत्या. त्यांचे प्रमूख होते – बूमगार्ड्ट आणि सेमूर. इटालियन सैन्याने यांना कडवा प्रतिकार केला. लाल रंगाच्या बॉंबचा अखंड वर्षाव ते खालून येत असलेल्या मराठ्यांवर करत होते. त्या बॉंबच्या आणि मशीनगनच्या आवाजात मराठ्यांच्या युध्दघोषणांचा “शिवाजी महाराज की जय ! हर हर महादेव” आवाज वरच्या टिपेला पोहोचला होता आणि खाली जेथे त्यांचे कर्नल रीड बसले होते त्यांना त्या स्पष्ट ऐकू येत होत्या. मेजर मून, जे त्या वेळी कर्नल रीड बरोबर बसले होते त्यांनी अशी आठवण लिहून ठेवली आहे की कर्नल रीड्ची छाती त्यांच्या फौजेच्या या पराक्रमाने फुगली होती आणि ते मराठ्यांविषयी अखंड बोलत होते. रात्रीतल्या घनघोर युध्दानंतर मराठा लाईटने पिनॅकलच्या पायथ्यापाशी जो छोटीशी सपाट जागा होती ती काबीज केली व तिथे मोर्चे बांधणी केली. सकाळी जेव्हा या मोर्च्यावर मेसर्व्ही गेला तेंव्हा त्याने तोंडात बोटे घातली. त्याच्या सहाय्यकाने लिहून ठेवले आहे की “ज्या रस्त्यावरून मला कुठलेही सामान न घेता चढता येत नव्हते त्या रस्त्याने अंधारात एवढे अवजड सामान घेऊन तोफांच्या मार्‍यात हे रीडचे मराठे कसे चढले असतील ? याची कल्पना करूनच मेसर्व्हीच्या निळ्याशार डोळ्यात पाणी आले.”

पिनॅकल सर झाल्यावर इटालियन सैन्य काही गप्प बसले नव्हते. त्यांनी त्या टेकाडावर प्रतिहल्ले चढवण्यास सुरवात केली. त्यांच्या विरूध्द आता संरंक्षणाचे काम करावे लागले. सगळ्या सैनिकांना एकत्र जमवून कामे वाटून देत पर्यंत पहाटेचे चार वाजले व इटालीयन सैन्याचे हल्ले चालू झाले. त्यांना मागे रेटेतोपर्यंत सकाळ उजाडली आणि काही इटालीयन सैनिकांना मराठ्य़ांनी पकडले. कर्नल रीडला एका युध्दज्वर चढलेल्या मराठी जवानाला धक्का मारून जमिनीवर पाडावे लागले. त्याच्या हातून मशीनगनच सुटत नव्हती.

दुसर्‍या दिवशी हे युध्द संपले आणि मराठा लाईट्ची तेथून सुटका झाली. या युध्दात स्वत:च्या प्राणाची पर्वा न करता, तोफगोळ्यांच्या व मशीनगनच्या गोळ्यांच्या वर्षावात सुभेदार लावंड यांनी जे न डगमगता आपल्या कंपनीच्या पुढे राहून मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांना मिलीटरी क्रॉस बहाल करण्यात आला.

default

पुढच्याच एका दिवसात मुख्य किल्लापण सर करण्यात आला. हा किल्ला हातातून गेल्यामुळे व तो परत न जिंकता आल्यामुळे इटलीची आफ्रिकेमधली सत्ता मोडकळीस आली आणि लवकरच नष्ट झाली. या सगळ्यात मराठा लाईट इनफंट्रीचा फार मोठा सहभाग होता असे तज्ञांचे मत आहे.

जेव्हा युध्द चालू असते, तेव्हा अशा पराक्रमांना तोटा नसतो व कोणालाही त्या बद्दल विशेष वाटत नाही. पण केरेनेच्या युध्दाबद्दल ले. कर्नल करसे यांना ११व्या इंडियन इंनफंट्री ब्रिगेडच्या कमांडर कडून एक पत्र आले

“I wish in particular to thank your Battalion for the great dash it displayed in capturing and holding Flat Top Hill, in spite of very severe casualties. It has been a magnificent effort. Will you please tell your officers and men that I am now more proud than ever to have them in my Brigade.”..............

जयंत कुलकर्णी
भाग दोन समाप्त.
पुढे चालू......

इतिहासकथामाहिती

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

22 Jul 2010 - 9:45 pm | यशोधरा

वाचते आहे..

डॉ.प्रसाद दाढे's picture

22 Jul 2010 - 11:16 pm | डॉ.प्रसाद दाढे

आणखी येऊद्या..
दुसर्‍या महायुद्धात युरोपमध्येसुद्धा भारतीय फौजा होत्या
असे वाचल्याचे स्मरते, त्यात मराठा रेजिमेंट होती का हो?

पुष्करिणी's picture

23 Jul 2010 - 12:12 am | पुष्करिणी

छान लेख, वाचतेय.

मराठा लाइट इंफ्रंटीच्या जवानांना अ‍ॅफेक्शनेटली गणपत म्हणतात असं कुठेतरी वाचलं होतं, ते खरं आहे का?

पुष्करिणी

जयंत कुलकर्णी's picture

24 Jul 2010 - 7:34 pm | जयंत कुलकर्णी

बरोबर आहे.

जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

प्रभो's picture

23 Jul 2010 - 12:33 am | प्रभो

मस्त लेख ....

Pain's picture

23 Jul 2010 - 1:17 am | Pain

छान आहे. आवडला.
दुर्दैवाने त्या वेळी भारतीय लोकांना अधिकाराच्या जागांवर नेमत नसत :(

भारतीय सैन्याचा द्वितीय महयुद्धातील सहभाग कुठल्या पुस्तकांमधे दिला आहे ? मी जी काही वाचली आहेत ती सगळी दोस्त राष्ट्रे वि. अक्ष अशी आहेत.

विदुषक's picture

23 Jul 2010 - 11:53 am | विदुषक

जयंत राव अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात
दुर्दैवाने मराठी माध्यम वर्गात वाढलेल्या सगळ्यांना ( मी पण त्यातच) सैन्य दला बाबत फार कमी माहिती असते

आम्हाला शिवाजी महाराजांचा अभिमान असतो ,पण वर्तमानात आपल्या सैन्य बद्दल फारच कमी आणि खरी माहिती असते

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत ......
मजेदार विदुषक

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jul 2010 - 2:00 pm | बिपिन कार्यकर्ते

मनोरंजक आणि स्फूर्तिदायक. आमच्या एनसीसी मधल्या काही इन्स्ट्रक्टर्सची आठवण आली.

बिपिन कार्यकर्ते

मराठमोळा's picture

23 Jul 2010 - 2:11 pm | मराठमोळा

चांगली लेखमाला आहे. वाचतोय.

(अवांतर: भिकारड्या ईंग्रजांसाठी आपले लोकं खर्ची पडल्याचं दु:ख वाटत आहे.)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

जयंत कुलकर्णी's picture

24 Jul 2010 - 7:41 pm | जयंत कुलकर्णी

जेव्हा भारत स्वतंत्र होईल तेव्हा या युध्दांचा अनुभवांचा त्यांच्या नवीन सैन्याला फायदा होईल म्हणून सावरकरांसारखे द्रष्टे नेते सैन्यात भरती व्हा असे सांगत होते. तो फायदा आपण नंतर अनेक वेळा बघितला आहेच. या युध्दात भाग घेतलेल्या अनेक अधिकार्‍यांनी नंतर स्वतंत्र भारताच्या सैन्याच्या महत्वाच्या पदांवर काम केलेले आहे.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

जिप्सी's picture

23 Jul 2010 - 2:42 pm | जिप्सी

उत्तम माहिती कुलकर्णीसाहेब. पुढच्या भागाची वाट फार बघायला लावू नका.

स्वप्निल..'s picture

23 Jul 2010 - 8:03 pm | स्वप्निल..

मस्त!! हा भाग पण आवडला. पुढचा कधी ?

धमाल मुलगा's picture

23 Jul 2010 - 9:02 pm | धमाल मुलगा

धन्यवाद कुलकर्णीसाहेब!

मराठा लाईट इन्फंट्रीबद्दलची चित्तथरारक माहिती देण्याचा आपण सुरु केलेला धागा अतिशय आवडीने वाचतो आहे. उत्तम माहिती देत आहात. शतशः धन्यवाद.

मागे महार बटालियनच्या अशाच अतुलनिय शौर्यगाथा एका एक्स-आर्मी मित्राकडुन ऐकल्या होत्या त्याची आठवण झाली.

अप्पा जोगळेकर's picture

24 Jul 2010 - 9:31 am | अप्पा जोगळेकर

सही आहे. अजून येउ द्यात. वाचतो आहे. स्फूर्तिदायक लिखाण.
'पहिले महायुद्ध' नावाचे दि.वि.गोखले यांचे पुस्तक आहे. त्यात त्यांनी एका प्रकरणात इंग्लिश सैनिक, जर्मन सैनिक, फ्रेंच सैनिक असे विभाग करुन प्रत्येकाची वैशिष्ट्ये लिहिली आहेत. तुम्हाला सैन्यातला प्रत्यक्ष अनुभव असल्यामुळे तुम्हीसुद्धा मराठी सैनिकांबद्दल लिहिताय तसं इतरही भारतीय सैनिकांबद्दल लिहिलंत तर मजा येईल.

खुपच आवडले. अजुन येवु द्या.

वेताळ

राजे साहेब's picture

24 Jul 2010 - 5:20 pm | राजे साहेब

उत्तम

जयंत कुलकर्णी's picture

24 Jul 2010 - 7:43 pm | जयंत कुलकर्णी

सगळ्या वाचकांना मनापासून धन्यवाद !
आपल्यामुळेच हे लिखाण होत आहे हे निर्विवाद !
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com

अशोक पतिल's picture

25 Jul 2010 - 9:59 am | अशोक पतिल

जयंत कुलकर्णी साहेब , तुमच्या सारखे असेच अनुभव वरचे पुस्तक ( 'दुसरे महायुद्ध' युरोप, जर्मनी च्या भुमी वरचे) लहानपनी वाचले आहे. लेखकाचे नाव आता आठवत नाही ,परन्तु आठवनी जाग्या झाल्या.अतिशय चांगली ,आणि महत्वाची माहिती देता आहात.छान लेख!

आशिष सुर्वे's picture

25 Jul 2010 - 11:08 am | आशिष सुर्वे

छान लेख.
इतिहास हा रोमांचकारक असतोच पण त्याचे वर्णन करणे सोप्पे नसते.
आपण ही कामगिरी अगदी लीलया सांभाळली आहे..
उत्तम लेखन.. अजून येऊद्यात..

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2010 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चांगली लेखमाला. वाचतोय.

-दिलीप बिरुटे

नया है वह's picture

28 Oct 2016 - 2:43 pm | नया है वह

+११११