दगडफोड्याचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)
मंडळी, लावणी म्हटली की ती शृंगाराची असावी/असते असा आपला समज. पण लावणी ही त्या पलिकडे जावून आध्यात्मिक किंवा सामाजिक पद्धतीचीही असू शकते. खालील लावणीत आपली नेहमीची हिरवीन थोडं वेगळं बोलतेय. ती काय म्हणते ते बघा तर खरं:
दगडफोड्याचं गाणं (मेहनतीची लावणी: घावावर घाव घाला)
काम करोनी म्हेनत घ्येवूनी आपन वाढवू सौंसारा
गरज तुमची चिल्यापिल्यांना तशीच गरज आहे मला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||धृ||
जांभ्याचा खडक आहे कातळ मजबूतीला भारी
अंदाज घेवूनी उभं र्हावूनी विचार करू नका काही
ताकदीनं फोडूनी त्याला ढिगावर ढिग ह्यो झाला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||१||
पथ्थर काळा मुरमाड माती पहार घेवूनी हाती
मजबूतीनं ठोका त्याला दणक्यानं ठिकर्या उडती
घामानं छाती भिजली अंगरखा झाला ओला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||२||
फावडं ओढा माती भरा जागा धरून कुदळ मारा
धुरळा उडतो मोठा दांडगा पहार लागता खडकाला
माती जाईल डोळ्यामधी लावून घ्या आता त्याला
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||३||
शिसवी शरीरातात ताकद भारी मर्दाचा ह्यो तोरा
मरवणूक माझी झाली सच्यासंगती इथं येता
येळेचा विचार करूनी घराचाबी ईचार कवातरी करा
नजर देवूनी धनी तुमी आता घावावर घाव घाला ||४||
- तुमचाच,
दगडफोड्या (पाषाणभेद)
०२/०४/२०१०
प्रतिक्रिया
3 Apr 2010 - 9:48 am | पाषाणभेद
मंडळी, लावनी म्हटली की पांढरपेशा समाज त्याकडे वेगळ्या नजरेने बघतो. पण शहरातल्या नाट्यगृहातली लावण्यांना होणारी गर्दी वेगळाच विचार करायला लावते.
माझ्या इतर लावण्यांना प्रतिसाद आले नसते तर काहीच वाटले नसते. पण या लावणीला एकतरी प्रतिसाद हवा होता. या लावणीत काय 'वंगाळ' आहे ते सांगा.
केवळ शिर्षकात लावणी आहे म्हणून तुम्ही नाक तर मुरडत नाही ना? तरी मी वरती ही लावणी वेगळ्या प्रकृतीची आहे असे लिहीलेले होते. असो.
लिहीणार्याने लिहीत जावे, प्रतिसाद देणार्याने देत जावे.

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
3 Apr 2010 - 2:32 pm | प्रमोद देव
दफोशेठ,प्रयत्न खरंच चांगला आहे.
4 Apr 2010 - 7:16 am | sur_nair
प्रयत्न खरच चांगला आहे. पण प्रश्न असा पडतो कि अशी लावणी सादर कुठे करायची? माझा समज होता कि लावणी हा शब्दच 'लावण्य' या शब्दावरून आला आहे. त्यामुळेच बहुतेक सर्व शृंगारिक प्रकृतीच्या असतात. अध्यात्मिक लावणी मी समजू शकतो (दे रे कान्हा - पिंजरा) पण ती सुद्धा शृंगार रसाचा आधार घेते. अर्थात आमचा लावणीशी संबंध फक्त सिनेमातील लावणी यातूनच आहे त्यामुळे कदाचित त्याबद्दलचे ज्ञान तोकडे असेल
4 Apr 2010 - 12:05 pm | राजेश घासकडवी
पुन्हा पुन्हा वाचून बघितल्यानंतर मला तुम्ही या गाण्यात लावणी प्रकाराच्या मर्यादा ताणल्या, विस्तारल्या असं वाटतं - पण नक्की खात्री नाही. याला कारण माझं लावणी विषयीचं ज्ञान हे सिनेमातल्या लावणीतनंच आहे. मी प्रत्यक्ष लावणी कधी पाह्यलेली नाही. पण जे माहीत आहे त्यावरून मुख्यत्वे
- स्त्री पुरुषासाठी ती म्हणते.
- त्यात पौरुषाचा महिमा (पुरुषाचा इगो सुखावणं) हा भाग असतो.
- तीत शृंगारिक भाग असतो, द्वयर्थी काव्यातून, किंवा उघडपणे तो येतो.
- स्त्रीची स्वत:ला अर्पण करण्याची, पुरुषासाठी नटण्याची, तयार होण्याची भावना त्यात असते (पदरावरती जरतारीचा, मोर नाचरा हवा)
- काही वेळा ती भावना इतकी तरल असते की तो शृंगार की परमेश्वराची आराधना याबाबत संभ्रम निर्माण होतो. (दे रे कान्हा)
तुमच्या लावणीत यातली काही अंगं आहेत. पण द्वयर्थ किंवा शृंगारिकता दिसत नाही. (ठरवलं असतं तर घावावर घाव घालणे, खणणे, वगैरेतून खूप ठसठशीत द्वयर्थी प्रतीकं वापरता आली असती..) पण आत्तापर्यंत मी कधी या अंगाची लावणी ऐकली , वाचली नाही. त्यामुळे हे लावणीच्या मर्यादा विस्तारणारं काव्य आहे असं वाटतं.
'आणि राजाराणी सुखाने संसार करू लागले' असं म्हणून सर्वसाधारण लावणीतल्या हिरो-हिरविनीची गोष्ट संपल्यानंतर जी गोष्ट सुरू होतो तीविषयक आहे असं वाटलं.
राजेश
4 Apr 2010 - 4:24 pm | पाषाणभेद
राजेशजी. आधीच्या लावण्या ह्या तुम्ही सांगितलेले मुद्दे धरून होत्या. वरील लावणीचा प्रयत्न जाणीवपुर्वक होता.
माझे लावणीबाबतचे ज्ञानही तुमच्याइतकेच आहे. मी अजूनपर्यंत तमाशा पाहिलेला नाही. लहान असतांना मामाबरोबर एका तमाशाला (झोपून) गेलो होतो इतकेच. तरी थोडा विचार करता बैठकीच्या लावणी ही थोडी सभ्यतेच्या अंगाने जाते. त्याचप्रकारे वरील लावणीही जात असावी. पठ्ठेबापूराव यांची 'मुंबईची लावणी' वानगीदाखल ठरावी.
अर्थात या लावणीला कोणत्या वर्गात टाकावे हा प्रश्नच आहे.
माझ्या मनात येथे द्वयर्थी शब्द योजूनापुर्वक वापरणे येथे अपेक्षीत नव्हते. जे शब्द तसे वाटतात ते त्या प्रसंगाची गरज म्हणून आलेले आहेत.
ह्या हिरवीणीला तिचा नायक हा सावळ्या अंगाचा असूनही मर्द वाटतो. ती त्याचे दुरून निरीक्षण करते आहे. त्याच्या अंगाकडे, छातीकडे, हाताकडे तिचे लक्ष आहे. डोळ्यात दगडाची कपची उडू नये म्हणून ती काळजी करते अन डोळा बंद करण्यास ती सांगते. मन लावून काम करण्यास ती सांगते.
कामात तो मग्न असतांना घरादाराचाही त्याला विसर पडतो अन ती त्याच्या संग मिळत नाही म्हणून व्याकूळ होते.
तुम्ही म्हणता तसा काही लावणी फक्त शृंगारापुरती मर्यादित निश्चितच नाही. आताच्या चित्रपटांनी त्याला मर्यादा आणल्या हे निश्चितच.
या क्षेत्रात अजूनही गुणीजन आलेत तर मराठमोळ्या लावणीची वेगळी ओळख निर्माण होईल.
(पण त्याचा अभ्यास करणे हे आपले काम नाही. आपण आनंद येईपर्यंत लिहीत जावे बास.)
माझ्या पहिल्या प्रतिसादात या लावणीला काहीच प्रतिसाद न आल्याची मी तक्रार याच कारणासाठी केली होती. त्याची पुर्तता आपल्या प्रतिसादाने भरून निघाली आहे.
आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रीया मला फारच अनमोल वाटतात. (येथीलच नव्हे तर इतरत्र आलेल्यासुद्धा)
धन्यवाद.

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
4 Apr 2010 - 5:41 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शाहीर ही लावणी काय जमली नाय पाहा ! आता लावणीवर चर्चा सुरुच केली आहे तर आमचेबी दोन शब्द...!
लावणी लौकिक, पौराणिक, आध्यात्मिक असते यात शंकाच नाही. लावणीचे अभ्यासक म.वा.धोंडांनी असे म्हटले होते की, ग्राम्यता, शृंगार व गेयता ही लावणीची खास वैशिष्टे.
आता आपल्या रचनेत शृंगार काय दिसत नाही. दुसरा काही द्वयर्थी शोध घ्यायचा प्रयत्न केला तर थोडेफार हाती लागेल असे वाटते. पण आपल्या रचनेचा तो उद्देशही दिसत नाही. कष्टक-याचे गीत वाटावे त्याप्रमाणे आपली वरील रचना वाटते. लावणीचा 'टच' अजिबात सापडत नाही.'कारभारी दमानं' च्या अंगाने जर आपली रचना समजून घेतली तर मग 'धनी तुमी आता घावावर घाव घाला' याचा काही अर्थ लागू शकतो. पण तो प्रयत्न बळजबरीचा ठरेल. लावणी ही पुरुषवर्गासाठीच लिहायची आहे, असे समजून लिहा. मग झकास मजा येईल.
लावणी वाचल्याबरोबर त्याचा एक अर्थ आपल्या मनात सहज उलगडत जातो.
'लटपट लटपट तुझ चालणे मोठे नखर्याचे
बोलणे मंजुळ मैनेचे'' असं वाचल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर नखरेल स्त्रीचं चित्र डोळ्यासमोर येते. अशी काही सहज रचना असावी असे वाटते.
बैठकीच्या लावणी ही थोडी सभ्यतेच्या अंगाने जाते.
लावणी कोणतीही सभ्यता असभ्यता पाळत नाही असे माझे वयक्तीक मत आहे. मग ती लावणी बैठकीची असो, फडाची असो, सवाल-जवाब असो किंवा अन्य कोणत्याही प्रकाराची असो.
पाहा सुरेखा पुणेकरांची बैठकीच्या लावणीची ही झलक...! :)
शाहीर बाकी काय इचार करु नका. झकास लावणी लिव्हा...!
-दिलीप बिरुटे
4 Apr 2010 - 7:36 pm | पाषाणभेद
चर्चेबद्दल अन प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
बाकी साहित्यावरच्या अभ्यासामुळे आपला मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहेच.
प्रस्तूत लावणीत हिरवीणीला तिचा नायक हा एक मर्दासारखा भासतो. ती त्याचे गुणगाण करते त्याची काळजी करते. म्हटले तर द्वैअर्थी शब्द वापरते. ( ते शब्द दोन अर्थी आहे की नाही हे वाचकावरच ठेवले आहे. प्रसंगाची गरज म्हणून आलेले आहेत हे मी सांगीतले म्हणून लक्षात आले आहे.)
वर सांगितल्याप्रमाणे शाहिर पठ्ठे बापुरावांची मुंबई वरील लावणीत काहीच आक्षेपार्ह नाही. अन मसालाही नाही. तरीही ती लावणी म्हणूनच तिची ओळख आहे.
>> लावणी ही पुरुषवर्गासाठीच लिहायची आहे, असे समजून लिहा. >>
आपली सुचना एकदम मान्य. प्रयत्न करतो तसा. तरीही राहून राहून वाटते की या हिरवीणीचा नायक तर पुरूषच आहे ना? ती फक्त त्याच्यासाठीच गाते आहे. समूहासाठी नाही.
बाकी तुम्ही सांगितल्याप्रमाणे लावणी ही नखरेल हवीच. सुचना मान्य करून मी तसा प्रयत्न करेन.
बाकी मी पास की नापास ते सांगा. :-)

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३