विजापुरचा अजब किस्सा

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
19 Mar 2010 - 10:24 pm

हा किस्सा विजापूरला घडलेला. वडीलांचे व्यवसायाच्या कामाअंतर्गत तिथल्या एका शेतकर्‍याने शेतजमीन सर्वेक्षणासाठी बोलावल्याने विजापूरला जायचे नक्की झालेले. आम्हाला शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या होत्या. मग ठरले की सकुटुंब सपरिवार विजापूरला जायचे, वडील त्यांचे काम आटोपतील आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर विजापूर-दर्शन करू.

ठरल्याप्रमाणे आम्ही चौघे लाल डब्ब्यातून विजापूरला रवाना झालो. तिथल्याच एका बर्‍यापैकी लॉजमध्ये उतरलो. वडीलांची विजापुरात त्यांचे शेतकरी ग्राहक सोडले तर फार कोणाशीच ओळख नव्हती. त्यांचे काम अंदाजाप्रमाणे एका दिवसात आटोपले. आता कल्ला!! मग काय, आमची विजापूर-भ्रमन्ती सुरु झाली. कधी पायी, कधी सायकल-रीक्षा (की रीक्षा?) यांनी तेथील प्रेक्षणीय स्थळे पालथी घालायला सुरुवात केली. सोबत आईसक्रीम डायट! अहाहा!!

तर असेच फिरत फिरत आम्ही गोल घुमटापाशी आलो. तेथील आवाज घुमण्याची अद्भुतता अनुभवून झाली. मग तेथील थडगी पाहून झाली. मला तर कधी एकदा तिथून निघतोय असे झाले होते!
त्यानंतर जोड घुमट पाहिला. तिथून निघत होतो.... दुपारचे ऊन चांगलेच होरपळत होते. घशाला कोरड जाणवत होती. आता रीक्षात बसायचे आणि थेट लॉज गाठायचे असा प्लॅन चाललेला असतानाच एक खणखणीत आवाजातील हाक ऐकू आली, ''कुलकर्णी साब, ओ कुलकर्णी साब.....''

वडीलांनी लक्ष दिले नाही. थोड्या अंतरावर इतरही प्रवासी रेंगाळत उभे होते. त्यांना वाटले, त्यापैकीच कोणाला तरी हाळी दिली असेल.

ह्या खेपेस हाक स्पष्ट व खणखणीत होती....'' ओ कुलकर्णी साब....थोडा रुकिये |'' नकळत वडीलांची व त्यासोबत आमची पावलेही थबकली. आमच्यासमोर एक उंचापुरा, हिरवी कफनी घातलेला, हातात मोरपीसाचा झाडू घेतलेला, डोक्याला हिरव्या रंगाचे फडके गुंडाळलेला फकीर उभा होता. सुरमा घातलेले त्याचे डोळे भेदक होते. वडीलांना वाटले, ह्याला काही पैसे वगैरे हवे असतील, म्हणून त्यांनी खिशात हात घातला. त्याबरोबर त्या फकीराने त्यांना थांबायची खूण केली. ''हमें आपसे कुछ नही चाहिए|'' (मग कशाला थांबवलं?)
जणू आमच्या मनातला प्रश्न ओळखून तो फकीरबाबा वडीलांना म्हणाला, '' आपका पूरा नाम फलाना फलाना है, आप पूनासे आये है |'' (बरोबर आहे बाबा तुझं, आता मुद्द्यावर येशील का? आणि तुला ही माहिती कोणी दिली?)
आमच्या चेहर्‍यावर जणू प्रश्नचिन्हे कोरली गेली होती. आपले बोलणे तसेच पुढे चालू ठेवून तो बाबा उद्गारला, '' लेकिन आप असल में पूनाके नही है | आपका मूल ग्राम फलाना फलाना है | आपके पिताजीका पूरा नाम फलाना फलाना था, दादाजीका नाम फलाना फलाना था |'' आता आम्ही केवळ भोवळ येऊन खाली पडायचेच शिल्लक राहिलो होतो. ह्या बाब्याला आपलं नाव, गाव, व्यवसाय, पूर्वजांची नावं हे सगळं कोठून समजलं? कोणी सांगितलं? ही असली कसली थट्टा?
पण खरी भोवंडायची वेळ नंतरच येणार होती!!
आमच्या गोंधळलेल्या चेहर्‍यांकडे बघत त्या फकिराने एकदम वडीलांच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाला, ''हम यह सब जानते है क्योंकि बहुत साल पहले आपके दादा-परदादाजीसे पहले, आपके पुरखोंमेंसे एक बडे नेक और पाक इन्सान अपने संगीत- गुरुके खातिर, मरनेसे पहले अपने पूरे परिवारके साथ मुस्सलमान धरमको अपनाए थे | उन सबकी कबरें यहां है, आए, उन्हे मिले |'' त्याने आपल्या हाताने आम्हाला त्याच्याबरोबर चलायची खूण केली.
आता थरथरायची आमची पाळी होती. कोण कुठला फकीर, अचानक उगवतो काय, काहीच्याबाही बरळतो काय, आणि आता तर आम्हाला कोठेतरी चलण्याची जवळपास आज्ञाच करतो!!
त्याने नेलेल्या ठिकाणी बाहेर स्पष्ट शब्दांत स्त्रियांनी प्रवेश करायला मनाई आहे असे लिहिले होते. आई व आम्ही दोघी बहिणी तिथेच घुटमळलो. तसे तो फकीर आमच्याकडे वळून म्हणाला, ''आप भी आईए, यह सब तो आपकेही लोग है | झिझकना मत, बेखौफ आना |'' अरे बाबा, तू असं काय म्हणून राहिला? तुला कळतंय का तू काय बोलतो आहेस ते? इति आम्ही, अर्थात मनातल्या मनात.
जोड घुमटाच्या जवळच असलेला हा भाग जवळपास निर्जन होता. समोर तंबूवजा कनात दिसत होती. हिरव्यागार रंगाची. नक्षीदार वेलबुट्टी, भरजरी काम केलेले पडदे आजूबाजूला सोडलेले. आत शिरल्यावर ऊद, धूपाचा दर्ग्याजवळ येणारा सुवास चारी अंगांनी वेढत होता. भर उन्हातही इथे एक प्रकारचा गारवा भरून राहिला होता. मोरपीसाच्या चवर्‍या की पंखे घेऊन अजून दोन -तीन फकिरासारखी दिसणारी माणसे तेथील काही कबरी (की पीर)वर चवर्‍या ढाळत होती. आम्हाला पाहून कोणीही आश्चर्य दाखवले नाही, की खास स्वागतही केले नाही. आपापल्या जागाही सोडल्या नाहीत. हुश्श!
आम्हाला भेटलेला फकिरबाबा तोवर कोपर्‍यात असलेल्या एका कबरींच्या समूहाकडे आम्हाला घेऊन गेला होता. तिथे गेल्यावर थबकून त्या कबरींकडे अंगुलीनिर्देश करून त्याने सांगितले की हेच आहेत तुमचे पूर्वज.
त्याही पुढे जाऊन प्रत्येक कबरीपाशी जाऊन त्याने ती कबर कोणाची आहे हे सांगितले. त्यांचे आधीचे नाव व धर्म बदलल्यावर घेतलेले नावही सांगितले. सर्वात शेवटी त्या परिवारातील कुटुंबप्रमुखाच्या थडग्यापाशी येऊन तो थांबला आणि नाट्यमय सुरात म्हणाला, ''यह आपका कबसे इंतजार कर रहे है |''
हे राम!!!!!! एव्हाना आम्हाला अगदी पिक्चरच्या सेटवर गेल्यासारखं वाटायला लागलेलं! भांबावून जाणं का काय असतं म्हणतात ना, ते अगदी सहीच्या सही अनुभवलं तिथं.
वडीलांनी समयसूचकता दाखवून त्या कबरीला प्रणाम केला, चक्क साष्टांग प्रणिपातच घातला म्हणेनात! त्यांच्या वागण्याचा अर्थ ओळखून आम्हीही वाकलो व यथोचित नमस्कार केले. नंतर त्या फकीरबाबालाही दंडवत घातला. त्याने मोठ्या तोंडाने आशीर्वाद दिले. आम्हाला सोडायला परत कनातीच्या दारापर्यंत आला.
वडीलांनी पुन्हा एकदा त्याला काहीतरी पैसे द्यावेत म्हणून खिशात हात घातल्यावर त्याने पुन्हा एकदा ठाम नकार दिला. ''फिरसे आना |'' आम्ही हात हालवून निरोप घेत असताना तो जोरात उद्गारला.
जवळपास पळत पळतच आम्ही रीक्षा स्टँड गाठला. तिथून थेट लॉज! घडलेल्या प्रकाराविषयी कोणीच बोलत नव्हते. आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने! ह्या अकल्पित माहितीला खरे-खोटे पडताळायला कोणी जुन्या पिढीची माणसेही उरली नव्हती, ना कागदपत्रे! गांधीजींच्या खुनानंतर आमच्या मूळ गावी उडालेल्या दंगलींत सर्व ब्राह्मणवस्ती पेटवून देण्यात आली होती, त्यात ती कागदपत्रेही नष्ट झाली होती.

अजूनही आम्हाला जे घडले, जी माहिती मिळाली ती सत्य की असत्य की आभास की अजून काही, ह्याबद्दल खात्री नाही. पण मिळालेला अनुभव मात्र जाम थरारक होता, जो या जन्मात विसरणे शक्य नाही!!

(वरील संवाद मी माझ्या तुटपुंज्या हिंदीच्या तोकड्या आधाराने लिहायचा प्रयत्न केलाय. तेव्हा चु.भू.दे.घे.)

-- अरुंधती कुलकर्णी

http://iravatik.blogspot.com/

वावरप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

II विकास II's picture

19 Mar 2010 - 10:37 pm | II विकास II

खरोखर अजब आहे किस्सा.

शुचि's picture

19 Mar 2010 - 10:52 pm | शुचि

अरुंधती सर्वात प्रथम हा किस्सा मनमोकळेपणाने सांगीतल्याबद्दल तुमचे आभार.
फारच रोचक आणि थरारक तसेच भावनांना हात घालणारा अनुभव आहे.

मी तर म्हणेन तो फकीर मनकवडा (माइंड रीडर) होता. पूर्वजांबद्दल खरही असेल नव्हे असेलच असेल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
जितनी दिल की गहराई हो उतना गहरा है प्याला, जितनी मन की मादकता हो उतनी मादक है हाला,
जितनी उर की भावुकता हो उतना सुन्दर साकी है,जितना ही जो रसिक, उसे है उतनी रसमय मधुशाला।।

शाहरुख's picture

19 Mar 2010 - 11:15 pm | शाहरुख

कुल !!

टिउ's picture

19 Mar 2010 - 11:40 pm | टिउ

नाडी वाचली असेल फकीराने... :)

बाकी असल्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही, त्यामुळे नो कमेंट्स!!!

II विकास II's picture

20 Mar 2010 - 12:10 am | II विकास II

>>नाडी वाचली असेल फकीराने
असु शकेल
लेखिकेने नाडी बघितली आहे का?

अरुंधती's picture

19 Mar 2010 - 11:50 pm | अरुंधती

काय राव, अशी थट्टा नका करु! :-) तिथं काय त त प प झाली होती ने नाही कळणार बरं! पळता भुई थोडी का काय म्हणतात ना, त्यातली गत! आज तो अनुभव आठवला की मजा वाटते, पण तेव्हा तंतरलीच होती चांगली!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

20 Mar 2010 - 12:51 am | विसोबा खेचर

किस्सा अजब आहे खरा..
लेखनशैलीही छान..

अरुंधतीदेवी, येऊ द्यात अजूनही असेच काही किस्से! :)

अण्णांवरच्या भक्तिपायी मी एकदा गदगला गेलो होतो, तेव्हाच विजापूरही पाहून झाले..

तात्या.

गोगोल's picture

20 Mar 2010 - 5:53 am | गोगोल

साधारण किती सालचा किस्सा आहे हा?

अरुंधती's picture

20 Mar 2010 - 10:37 am | अरुंधती

धन्यवाद! :-)
माझ्या अंदाजाने साधारण १९८४-८५ सालचा किस्सा आहे हा!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

मीनल's picture

20 Mar 2010 - 6:12 am | मीनल

मला त्या फकिराची कमाल वाटते. त्याला इतकी आधीच्या माणसांची नावे कशी माहित?

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

अरुंधती's picture

20 Mar 2010 - 10:48 am | अरुंधती

हो ना मीनल, काही कोडी उलगडत नाहीत आपण कितीही डोके खाजवले तरी! हे बहुधा त्यातलंच कोडं आहे. किती विचार केला तरी बुध्दीला पटेल असे समाधानकारक स्पष्टीकरण नाही देता येत इथे!!

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

सुनील's picture

20 Mar 2010 - 6:48 am | सुनील

अजब किस्सा!

लहानपणी एकदा नाशिकला गेलो असता, एका भटजींच्या घरी आजोबा-पणजोबांचे हस्ताक्षर पाहून असाच गदगदलो होतो. पण हा किस्सा तर अफाटच!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रकाश घाटपांडे's picture

20 Mar 2010 - 11:01 am | प्रकाश घाटपांडे

आईने वडीलांना फक्त त्यांचा खिसा चाचपून पैशाचे पाकिट वगैरे सुरक्षित आहे ना हे पहायला सांगितले. सर्वकाही जिथल्या तिथे होते. जागेवर नव्हती ती आमची मने!

आई व्यवहारी दिसते.
त्याकाळी धर्मांतरे ही जीवन स्वास्थ्यासाठी व्ह्यायची. बळजबरीने असो स्वखुशीने असो . एका पत्रकाराने अंतुलेंचे पुर्वज हे कोकणस्थ ब्राह्मण असल्याचे वंशावळीतुन सांगितले होते. त्यावर अंतुले म्हणाले काय फरक पडतो माझ्या कैक पिढ्या इथल्याच मातीतल्या आहेत. (ऐकीव / वाचीव किस्सा) हल्ली काही कुलवृत्तांतांचे संकलन होउ लागले आहे. त्यावरुन काही माहिती मिळते. आपल्याला आजोबांच्या मागील पिढीबाबत काही माहित नसते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

प्रमोद देव's picture

20 Mar 2010 - 11:19 am | प्रमोद देव

अरुंधतीतै,राग मानू नका,एक प्रश्न आला मनात!
जर तुमचे पूर्वज(धर्मांतरीत) मुसलमान होते...असे मानले तर तुम्ही कसे हिंदू?...म्हणजे त्यापैकी नंतरच्या कोणत्या पिढीने पुन्हा हिंदू धर्मात येणे केले?

अरुंधती's picture

20 Mar 2010 - 11:52 am | अरुंधती

देवसाहेब, तुमचा प्रश्न स्वाभाविक आहे. लक्षात घ्या, हे आमच्या (वडीलांच्या) मागच्या चौथ्या - पाचव्या पिढीतील लोक होते, रक्ताचे नाते असले तरी त्यांच्या संपूर्ण परिवाराने [नवरा, बायको व मुले] मुस्लिम धर्म स्वीकारला होता -- पण ते आमच्या भावकीमधले [ म्हणजे चुलत-चुलत, कझिन्स ऑफ कझिन्स] होते. त्यामुळे ते जरी मुस्लिम झाले असले तरी त्यांचे इतर बंधू-भगिनी हिंदूच होते. ह्या सर्व हिंदू भाईबंधांची वंशावळपण मग हिंदूच!
मुस्लिम धर्म स्वीकारलेल्या गृहस्थांचे संगीत गुरु मुस्लिम होते. आणि त्यांच्या सन्मानार्थ, स्मरणार्थ किंवा एक समर्पणाची भावना म्हणून, जो माझ्या गुरुचा धर्म तोच माझा धर्म ह्या भावनेने त्यांनी हा धर्म स्वीकारला असावा असे वाटते.
त्यांचा मृत्यू कसा व का झाला, एकाच ठिकाणी सर्व परिवाराला का पुरले, सगळ्यांचे मृत्यू एकाच वेळी झाले किंवा कसे, ह्या गोष्टींबाबत आत्तातरी कळायला जास्त मार्ग नाही. हयात नातेवाईकांना ह्याबाबत सुतराम कल्पनाही नाही. अन्य कोणाकडे ह्या संदर्भातील कागदपत्रे, उल्लेख, नोंदी वगैरे मिळाले तरच तपास लागू शकेल. धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

20 Mar 2010 - 11:30 am | टारझन

कमाल आहे :)
फिकीराला मिसळपाव वर लिहीण्यास उद्युक्त केलं पाहिजे :)

- (फकीर) टारझन

वेताळ's picture

20 Mar 2010 - 12:33 pm | वेताळ

कमाल है भाई.....
ऐसा भी होता है?
वेताळ

समंजस's picture

20 Mar 2010 - 1:28 pm | समंजस

आश्चर्यकारक अनुभव म्हणायचा तर :O
त्या फकिरा कडेच इतर प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात :?
परत तिथे जाण्याचा तुम्ही प्रयत्न केला का ?

अरुंधती's picture

20 Mar 2010 - 1:41 pm | अरुंधती

माझा तेवढा उत्साह नाही, पण चुलतभावाने हे ऐकले तेव्हापासून त्याच्या डोक्यात पुढची छाननी करण्याचा किडा वळवळतोय! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

समंजस's picture

20 Mar 2010 - 2:02 pm | समंजस

माहिती काढायला प्रयत्न करण्यात काही वावगं नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

20 Mar 2010 - 2:48 pm | परिकथेतील राजकुमार

एक वेगळाच अनुभव.
छान रंगवला आहेत आलेला अनुभव.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

मदनबाण's picture

21 Mar 2010 - 5:16 am | मदनबाण

मानो या ना मानो...पण काही गोष्टी खरचं अगम्य असतात...

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy