उष्टावण.....

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
30 Nov 2009 - 9:05 am

आजकाल हे रोजचेच झाले होते. दुपारचे चार वाजले नाहीत तोच पोटात भूक दंगा करू लागे. डब्यातल्या दोन पोळ्या कधीच्याच जिरून गेलेल्या. खाली कँटिनमध्येही चहा-कॉफी शिवाय काही मिळत नसे. तश्या आठ-दहा बरण्याही असत. चिवडा, चकल्या, पापड्य़ा, बिस्किटं असे उगाच चावायला काहीतरी. पण बरेचदा त्या बरण्यांच्या तळाशी गळलेले तेल त्यांच्या कालावधीची लांबी दाखवत असे. ते पाहिले की सुधाला मळमळायलाच लागे. बरे बाहेर जाऊन काहीतरी खावे तर सेक्शनमध्ये बोंब. अरे कुठे गेल्यात रे? बराच वेळ झाला. काय ऑफिस आहे का टाईमपास? आँ....... दहा मिनिटांच्यावर जर कोण कुठे गेले तर अर्धी सी.एल कापा म्हणजे चट ताळ्यावर येतील सगळे. साहेब दर दोन दिवसांनी कोणाला तरी झापडायचे खरे. पण कधीही कोणाचीही सीएल गेल्याचे आठवत नाही बाँ.

साहेबांचे जाऊ दे, एक वेळ त्यांना अडचण सांगता येईल. ते मनाने चांगले आहेत, साहेब असल्याने थोडा वचक ठेवावाच लागतो त्यांना. नाहीतर गुंडेरावासारखे लोक तर विकून खातील की. डायरेक्ट पगारालाच गडी हजर होईल. वर म्हणेल कोणाचा बाप माझे काय बी वाकडे करू शकत नाही. मरो ते.......इकडे प्राण कंठाशी आलेत अगदी. पाणी तरी किती पिऊ. शिवाय सारखं पाणी पिऊन बाथरुमला जावे लागते तो एक डोक्याला ताप झालाय. वाजले बाई एकदाचे सव्वापाच. चला आवरावे आणि निघावे पटदिशी म्हणजे पाच चाळीस बोरिवली तरी मिळेलच.

" अग अगं, जरा दमानं घे पोरी. आता येवढे जोरात धावताना पाय घसरून कुठे पडली-झडलीस तर केवढा कहार होऊन बसेल. येक गाडी ग्येली तरी दुसरी येतीया मागनं...... हा दम खा वाईच." सुधाने पार ब्रिजवरून धावत येऊन कशीबशी गाडी पकडली होती. ते पाहून एक आजीबाई तिला समजावत होती. " आज्जे उद्यापासून नाही पळणार, अग खरेच सांगतेय. आत्ताच बघ ना केवढा श्वास लागलाय मला." आजीला असे म्हणत सुधा त्या खच्चून भरलेल्या गाडीत उभ्या उभ्या तरी पाठ टेकता येते का ते शोधू लागली. पाच-दहा मिनिटाने जरा जीव शांत झाला तो लागलीच भुकेने उचल खाल्ली. हो रे बाळा, आता अगदी थोडाचवेळ. तासाभरात घरी पोचलो ना की लगेच तुला खाऊ देईन हं. असे म्हणत ती पोटावरून हात फिरवू लागली. पण तसे होणार नव्हते. घरी जाऊन जेवण दिसेतो आठ नक्कीच.

तोच मागून आवाज आला, " अग मी किती वेळा तुला सांगितले. दोन जीवांची आहेस गं तू. कोणी खायला दिले तर खायचे वगैरे विसर आता. कोणी तुझ्याकडे लक्ष देवो न देवो तुला बाळाकडे व स्वत:कडे लक्ष द्यायला हवे. उद्या बाळाचे नीट पोषण नाही झाले आणि काहीतरी गोंधळ झाला तर जन्माचे नुकसान होईल. भूक लागली की जे मिळेल ते खावे. काही होत नाही. घरचे नाही देत तर दारचे-मोलाने तरी वाढतीलच ना? कोण काय म्हणेल याचा विचार तू करू नकोस. कळतेय का तुला मी काय सांगतेय ते? " सुधाला वाटले की जणू काही ही बाई तिलाच सांगते आहे सारे. स्टेशनवर उतरले की तो वड्याच्या फोडणीचा वास अगदी आतड्यांनपर्यंत पोहचे. असे वाटे बकाबका तीन-चार वडे खावेत. पण कुठले तेल व कसे केले असतील म्हणून ती कसेबसे पाय ओढत पुढे सरके.

आजही असाच जीव मारत ती स्टेशनबाहेर पडली. रस्त्यात भाजीबाजार लागे. आधी कधीही फारश्या लक्ष न गेलेल्या सगळ्या खाऊच्या गाड्या तिला हाका मारून मारून बोलावू लागत. बाळालाही कसे बरोबर कळते कोण जाणे ते लागलीच रेटे मारू लागे. गेले काही दिवस एका इडली-डोसावाल्याच्या गाडीवरचे वास सुधाला वेड लावत होते. एका दिवस तिने मनाचा हिय्या करून त्याच्या दिशेने पावले वळवलीही होती. तोच समोरून बिल्डिंगमधल्या काळेकाकूंनी हाकारले. " अगोबाई! सुधा का? अग बरेच पोट दिसतेय की गं. सहावा का? जप हो. तिकडे कुठे निघाली होतीस? अग असे बाहेरचे अन्न खाऊ नको बाई. कसले मेले पाणी वापरतात व काय काय घालतात. सासूबाई करून ठेवत असतीलच की काहीतरी गरम गरम. जा हो घरी जा. " असे तिला सांगून स्वत: मात्र त्याच्या गाडीवरच खायला गेल्या.

जीव अगदी कंठाशी आला होता. पाच मिनिटातच ती गाडीपाशी पोचली. नकळत पावले रेंगाळू लागली. बाळही सारखे ढुशा मारत होते. आज एकदा तरी खाऊच या असे म्हणत ती भरभर जवळ गेली. आणि एकदम तिथेच थबकली. नुकतेच दोघेतिघे खाऊन गेले होते. त्यांच्या उष्ट्या बश्या एका बादलीत पोऱ्या बुचकळत होता. त्या बादलीतल्या पाण्याचा रंग पाहिला आणि सुधाला वाटले आता उलटीच होईल. तशीच ती मागे फिरली. दहा पावले जेमतेम चालली असेल तोच मागून आवाज आला, " ताई, अहो ताई. ऐका ना जरा. " कोण बोलावते आहे म्हणून मागे वळली तर तो इडलीवाला अण्णा हाकारत होता. " ताई, गेले पाच-सहा दिवस मी रोज पाहतो तुम्हाला. पेटसे हो ना? खूप भूक लागते ना शामच्या टायमाला? आज तुम्ही येतायेता थांबलात. मला आले ध्यानात. ताई थोडा भरवसा ठेवा या भावावर आणि या इकडे. " असे म्हणत हाताला धरून नेल्यासारखे तो इडलीवाला अण्णा सुधाला घेऊन गेला.

बाळही जोरदार हालचाल करून चल चल म्हणू लागले. सुधा भारावल्यासारखी गेली त्याच्यामागोमाग. अण्णाने खुर्ची देऊन तिला बसवले. मग एका पिशवीतून स्वच्छ घासलेली चकचकीत ताटली-वाटी-चमचा व पेला काढला. तिच्यासमोर इडली पात्रातून वाफाळणारी इडली काढली. एका वेगळ्या डब्यातून सांबार काढले. इडली त्यावर मोठ्ठा बटरचा गोळा आणि वाटीत सांबार ओतून तिला खायला दिले. त्या लुसलुशीत इडल्या आणि सांबारच्या वासाने सुधाच्या डोळ्यातून आसवे ओघळू लागली. ताई आरामशीर खा मी गिऱ्हाईक पाहतो जरा असे म्हणून त्याने तिला तिच्या तंद्रीत मग्न राहू दिले. पंचेद्रिये एकवटून सुधा खाऊ लागली. चार इडल्या पोटात गेल्या तशी सुधा निवली. शांत झाली. बाळ एकदम खूश झाले होते. " अण्णा, पोट भरले माझे. तू इतक्या प्रेमाने खायला दिलेस फार फार आनंद झाला. माझ्या पोटालाच नाही तर माझ्या मनालाही शांती मिळाली. " असे म्हणून सुधा पैसे देऊ लागली.

" अय्यो.....पापं. ताई, मी परमुलखातला माणूस. पोटापाण्याकरता आलो इथे. ना आई-बाप जवळ ना बहीण-भाऊ. माझी बहीण असती तर घेतले असते का मी पैसे? मग का माझ्या हातून पाप घडवतेस? आता बच्चा होईतो रोज तू या भावाच्या हातचे खाऊनच पुढे जाशील. अजिबात काळजी करू नकोस. एकदम स्वच्छ व रोज वेगवेगळा खाऊ देईन हा या माझ्या भाचराला. येशील ना ताई? " सुधाला काही बोलवेना.......घशातून आवाजच निघेना. डोळे पुसत हो नक्की येईन असे म्हणत सुधा निघाली. पुढे हा रोजचाच परिपाठ झाला. अण्णा रोज काहीतरी वेगळे खिलवी. सुधा तृप्त होत असे. नववा लागला. एक दिवस सुधा अण्णाला म्हणाली, " आता पंधरा दिवसात मी आईकडे जाईन. जाण्याआधी तुम्हाला सांगूनच जाईन. पण अचानक काही झाले आणि मला येता नाही आले तरी काळजी करू नका. गेले तीन महीने या बहिणीचे खूप लाड पुरवलेत तुम्ही. लोक म्हणतात देव दिसत नाही. वेडेच आहेत. माझ्या बाळाला विचारा तो सांगेल आम्हाला देव दिसलाय."

दोनच दिवसात डॉक्टरकडे चेकअपसाठी आई व सुधा गेल्या तर त्या म्हणे, " अग बरे झाले आलीस. ऍडमिटच हो लागली. आज फार तर उद्या पहाटे होशीलच बाळंतीण." मग एकदम धावपळ झाली. ऑफिसमध्ये फोन करून सांगितले, नवऱ्याला व घरच्यांना कल्पना दिली. आई तिला हॉस्पिटलामध्ये सोडून सगळी सोय करायला घरी धावली. पहाटे तिनाला सुधाने चांगल्या आठ पाउंडाच्या परीला जन्म दिला. बाळीने काही त्रास दिला नाही. दमलेल्या सुधाला सकाळी स्पेशल रूममध्ये हालवले व परीला आणून तिच्या मांडीवर ठेवले. डॉक्टरीणबाई आईला म्हणत होत्या, " बाळ अगदी निकोप आहे बरं का. नीट खाल्ले प्याले की मग कसे छान वाढ होते....." पुढचे काही सुधाला ऐकू आले नाही तिला दिसत होता अण्णा. तिने परीला हृदयाशी कवटाळले व हळूच परीला म्हणाली, " अग मामा वाट पाहत असेल ना? त्याला कळवायला हवे. "

पाहता पाहता तीन महिने लोटले. परीने चांगले बाळसे धरले होते. भोकऱ्या डोळ्यांनी सगळीकडे टुकटुक पाहत बसे. एकदोन वेळा आईने इडली केली होती तेव्हा परी अगदी त्यावर ओणवी पडून पडून हात मारायचा प्रयत्न करीत होती. सुधाला वाटले जणू परीला तो गंध व रूप कळलेय, ओळखीचे वाटतेय. परीला घेऊन सुधा सासरी परतली. दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी, " आई, आलेच हं का जरा परीला बागेत फिरवून. " असे म्हणून सुधा खाली उतरली ती थेट अण्णासमोर जाऊन उभी राहिली.

अण्णाच्या गाडीपाशी खूप गर्दी होती. पाच मिनिटाने अण्णाचे लक्ष गेले, " हां बोलो जी, तुमको क्या माँगता......... ताई तू? सच में तुम हो? और बच्चेको भी लायी हो? अय्यो........ये ये. ए तंबी खुर्ची लाव रे. मेरी ताई आयी है. " अण्णाचा आनंद डोळ्यात मावत नव्हता. खाणारे काही लोकही थबकून पाहू लागले. सुधाने परीला अण्णाच्या हातात दिले. आधी तो नक्को नक्को ताई, माझे हात गंदे आहेत असे म्हणत होता. पण सुधाने बळजबरीने परीला दिलेच त्याच्या हातात. मोठ्ठे बोळके पसरून परी अण्णाकडे पाहून हसत होती. सुधा उठली अन नुकत्याच काढलेल्या पात्रातल्या एका इडलीचा उल्लूसा कण तिने परीला चाटवला. " अण्णा परीचे उष्टावण केले बघ. तो मान तुझाच होता. तीपण बघ कशी ओळख पटल्यासारखी चुटुचूटू आवाज करतेय आणि तुझ्याकडे पाहून हसतेय. अण्णा, अरे कोण कुठला तू. ना ओळखीचा ना नात्याचा पण या बहिणीसाठी खूप केलेस रे......." तिला मध्येच अडवत बोटांनी चूप चूप म्हणत अण्णा परीची नजर उतरवत राहिला.......

कथासमाजजीवनमानविचार

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

30 Nov 2009 - 9:12 am | मदनबाण

अण्णा लयं भारी माणुस... :)
तुम्ही मस्त लिहता हे काय वेगळं सांगायला हवं ? :)

मदनबाण.....

Love is life. And if you miss love, you miss life.
Leo Buscaglia

राधा१'s picture

30 Nov 2009 - 9:41 am | राधा१

फारच छान आहे कथा..आवडली...!!

sujay's picture

30 Nov 2009 - 9:42 am | sujay

क्लास्स !!
तुम्ही सगळेच लेख फार सुंदर लिहीता.

सुजय

लवंगी's picture

30 Nov 2009 - 9:45 am | लवंगी

सुंदर लिहिता .. एकदम सहजपणे..

महेश काळे's picture

30 Nov 2009 - 9:57 am | महेश काळे

नमस्कार !
खुपच सुरेख लेख आहे..

काळे डॉट महेश ..

पर्नल नेने मराठे's picture

30 Nov 2009 - 10:17 am | पर्नल नेने मराठे

सुरेख!!! सकाळीच छान वाचायला मिळाले....
चुचु

खादाड's picture

30 Nov 2009 - 12:18 pm | खादाड

=D> फारच छान !

सहज's picture

30 Nov 2009 - 12:40 pm | सहज

हा ही लेख छान!!

नेहमी आनंदी's picture

30 Nov 2009 - 1:25 pm | नेहमी आनंदी

भावली कथा.

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Nov 2009 - 3:14 pm | बिपिन कार्यकर्ते

मिपावरील अजून एक सदस्यनाम आवडत्या लेखकांच्या यादीत समाविष्ट केले आहे. लेखन शैली आवडली.

बिपिन कार्यकर्ते

विंजिनेर's picture

1 Dec 2009 - 7:00 am | विंजिनेर

असेच म्हणतो

विजुभाऊ's picture

2 Dec 2009 - 5:14 pm | विजुभाऊ

बिपीन काकाशी सहकमत.
किती सोप्या शब्दात इतके मस्त भाव व्यक्त केले आहेत

टारझन's picture

30 Nov 2009 - 3:28 pm | टारझन

ग्रेट !!!

चतुरंग's picture

30 Nov 2009 - 4:17 pm | चतुरंग

उष्टावण नजरेसमोर आले आणि डोळे भरुन आले!
सुंदर लेखन.

चतुरंग

रेवती's picture

30 Nov 2009 - 4:34 pm | रेवती

मस्त कथा!
अगदी आपल्या आजूबाजूलाच घडणारी असावी अशी आहे.

रेवती

स्वाती२'s picture

30 Nov 2009 - 5:03 pm | स्वाती२

खूप आवडली कथा. कोण कुठला अण्णा, त्याला तिची अवस्था कळते पण सासरच्यांना कळू नये हे पाहून वाईट वाटले. या कथेच्या निमित्ताने पुन्हा त्याच जुन्या प्रश्नाने डोके वर काढले.

अजय भागवत's picture

30 Nov 2009 - 7:22 pm | अजय भागवत

ग्रेट...माणूसकीचे दर्शन झाले की, डोळे पाणावतात.- आणि ते ताकदीने घडवले आहेत तुम्ही.

प्रभो's picture

30 Nov 2009 - 7:28 pm | प्रभो

मस्त ..आवडली

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!

संग्राम's picture

30 Nov 2009 - 7:40 pm | संग्राम

खूपच छान ...

मीनल's picture

30 Nov 2009 - 7:40 pm | मीनल

उत्तम लेखन.
प्रत्येक प्रसंग समोर दिसला आणि स्वतः अनुभवतोय अस वाटल..

मीनल.

sneharani's picture

1 Dec 2009 - 1:21 pm | sneharani

कथा छान झालीये...
सूंदर..!

गणपा's picture

1 Dec 2009 - 3:01 pm | गणपा

खुप सुरेख लिहिलयस भानस..

मिपावरील अजून एक सदस्यनाम आवडत्या लेखकांच्या यादीत समाविष्ट केले आहे.

बिका सारखच म्हणतो..

-माझी खादाडी.

श्रावण मोडक's picture

1 Dec 2009 - 3:43 pm | श्रावण मोडक

छान.

मेघवेडा's picture

1 Dec 2009 - 5:00 pm | मेघवेडा

मस्त .. आवडली..

क्रान्ति's picture

1 Dec 2009 - 10:48 pm | क्रान्ति

कथा आवडली भाग्यश्री आणि त्यापेक्षाही जास्त तुझी सहज लेखनशैली मनात घर करून गेली. :)

क्रान्ति
अग्निसखा

दशानन's picture

2 Dec 2009 - 9:39 am | दशानन

:)

छान लिहले आहे आवडले.
अण्णा तर जबरा माणूस वाटला.

*****

मराठी माणसावर मराठी माणसाकडूनच महाजालावर जोपर्यंत अन्याय होत आहे तो पर्यंत मी चचणार नाही

भानस's picture

2 Dec 2009 - 10:10 am | भानस

सर्व प्रतिसादकर्त्यांचे मनःपूर्वक आभार. आपल्या आवर्जून दिलेल्या प्रतिसादांनी अतिशय आनंद झाला व हुरूप वाढला. :)

उत्तम लिखाणाच्या वाचनाची खात्री असते, जमेल तेंव्हा जमेल तितकं लिहित रहा, आम्ही आधाशासारखे वाचत राहू.

जानकी, आभार मानायला अमंळ जास्तच उशीर झालाय खरा, क्षमस्व! खूप आभारी आहे. :)

विसोबा खेचर's picture

3 Dec 2009 - 8:54 am | विसोबा खेचर

सुंदर लेखनशैली...

खूप खूप धन्यवाद, विसोबा खेचर! :) ( उशीराने.. क्षमस्व! )

पिवळा डांबिस's picture

3 Dec 2009 - 10:05 am | पिवळा डांबिस

मस्त लिखाण...
आवडलं...

पिवळा डांबिस, ( उशीराने ) आभार्स व क्षमस्व! :)

इरसाल's picture

21 Aug 2012 - 1:06 pm | इरसाल

शेवट मनाला भावुक करुन गेला.
डोळ्यात पाणी तरळले.

इरसाल, कथा आवडल्याचे वाचून आनंद झाला. खूप आभार्स!( उशीराने-क्षमस्व! )

किसन शिंदे's picture

21 Aug 2012 - 3:12 pm | किसन शिंदे

खरंचच वाचण्यासारखी आहे हि कथा.

किसन शिंदे's picture

21 Aug 2012 - 3:12 pm | किसन शिंदे

खरंचच वाचण्यासारखी आहे हि कथा.

किसन शिंदे, अनेक आभार्स! उशीराबद्दल क्षमस्व!:)

मिपावरच्या सुरेख कथांच्या काळातली ही एक दिसतेय.

भानस's picture

15 Jul 2014 - 10:12 pm | भानस

सूड, धन्यवाद! :)

यशोधरा's picture

15 Jul 2014 - 8:56 pm | यशोधरा

आई गं! कसली गोड :) माणूसकीवर पुन्हा एकदा विश्वास ठेवायला हरकत नाही, असे वाटायला लावणारी.

मधुरा देशपांडे's picture

15 Jul 2014 - 9:10 pm | मधुरा देशपांडे

असेच म्हणते.

भानस's picture

15 Jul 2014 - 10:15 pm | भानस

अनेक आभार्स, यशोधरा! :)

छान कथा शेवट नजरेसमोर आला.

बबन ताम्बे's picture

16 Jul 2014 - 12:08 pm | बबन ताम्बे

आवडली.