नवीन वसाहत

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in जे न देखे रवी...
16 Nov 2009 - 12:27 pm

ताजी खबर, ताजी खबर
भुतीण पारावरून ओरडली
लगबगीने सरसर सरसर
पारंबी धरून खाली आली
-
रात्र काळी, सळसळ झावळी
समंध भारी, मुंजे किरकीरी
जखिणी, हडळी आणि भुतावळी
झाडांवर जमली सारी बिरादरी
-
कशाला उगाच मारतेस बोंबा
उलटे झुलते वेताळ विचारते
जरा थांबा, खाली घ्या टांगा
सांगते सारे, भुतीण फिस्कारते
-
आपला सगळा मोहल्ला चालला
येथून दुसरीकडे जागा देतील
संपला जुना सहवास इथला
कबरीतून काढून भांड्यात ठेवतील
-
बिरादरी भुमीवर वसाहत बांधून
जागा भरणार, माणसे रहाणार
हाडे खोदून, थोडीशी निवडून,
एकावर एका बॉक्समधे ठेवणार ***१
-
मज्जा ने मज्जा, केकाटला मुंजा
नवीन घर, हायराईज रिसॉर्टवर
ए तुला नाही भेजा, म्हणाला कुब्जा
तूच मर, मला नको डब्ब्याचे घर
-
एयर कंडीशन कंडो जंक्शन ***२
असेल, पण खुराडेच खरोखरी
लॅन्डेड प्रॉपर्टी, बगीचा सोडून
डब्ब्यांच्या घरी कशाला गुदमरी?
-
बकवास नको, समंध पिसाळला
तुमचे मत कोणी विचारले का तुम्हाला?
पुढल्या अमावस्येला बिरादरीला
पॅक करून धाडतील कंडोत रहायला
-
मिळतील हेल मनी, कागदी मोटारी व हनी, **३
इथे दोन हप्ते उरले, मजा करू जानी
चिंता भविष्याची कधी केली भुतांनी?
सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी
सोडा ही झाडे, कंडोत राहू सुखानी

***१- कबरस्थान हटवून त्याजागी फ्लॅटस होणार. नवीन वातानुकुलीत इमारतीत कबरीतील हाडांचे अस्थीकलश, पोस्टबॉक्स सारखे एकावर एक रचून ठेवणार.
***२ कंडो- कंडोमिनीयम
***३-चायनीज संस्कृतीत पितरांना कागदाच्या नोटा, कागदाचे बंगले, गाडया वगैरे जाळून अर्पण करतात.

हास्यकविताविनोदजीवनमान