स्वनातीत (आवाजापेक्षा जास्त म्हणजे सुपर-सॉनिक वेगाने ) उडणारी विमाने ही काही नवीन गोष्ट अजिबात नाही. मात्र, लढाऊ विमानांच्या बाबतीत स्वनातीत वेग ही सामान्य गोष्ट असली तरी व्यापारी तत्त्वावर केल्या गेलेल्या स्वनातीत विमानसेवेच्या (commercial supersonic air-travel) मार्गात सतत मोठमोठे अडथळे येत राहिले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या मनात तर स्वनातीत प्रवास केवळ एक स्वप्न म्हणूनच राहिला आहे.
१९६९ ते २००३ या कालखंडात व्यापारी तत्त्वावर चाललेली पहिली वहिली स्वनातीत काँकॉर्ड विमानसेवा बंद पडून आता १५ वर्षे लोटली आहेत. त्या सेवेला सुरुवातीपासूनच अनेक प्रकारच्या समस्यांनी ग्रासले होते. Mach 2 (आवाजाच्या वेगाच्या दुप्पट, म्हणजे साधारण २,४५० किमी/तास) वेग गाठण्यासाठी, काँकॉर्डची चार टर्बोजेट इंजिने, प्रत्येकी तब्बल ६,७७० गॅलन्स (२५,६२७ लीटर्स) प्रतितास या दराने इंधन गिळंकृत करत असत. त्यामुळे अर्थातच, काँकॉर्डचा प्रवास अतिमहागडा आणि केवळ मोजक्या अतिश्रीमंत मंडळींना परवडणारा होता. आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करताना ते विमान इतका मोठा आवाज (सॉनिक बूम) करत असे की त्यामुळे केवळ ध्वनिप्रदूषणच होत असे असे नाही तर विमानमार्गाखाली असलेल्या जमिनीवरच्या घरांच्या खिडक्या हादरत/फुटत असत. अर्थातच, काँकॉर्डचा मार्ग ठरवताना लोकवस्त्यांना टाळण्यासाठी काँकॉर्डचे स्वनातीत उड्डाण केवळ महासागरांवरून (उदा. न्यू यॉर्क सिटी ते लंडन) शक्य होत असे. त्यामुळे त्या सेवेला व्यापारी फायद्याची समीकरणे सोडविणे जिकिरीचे झाले यात काहीच आश्चर्य नाही. या अवघड पार्श्वभूमीवर, एअर फ्रान्सच्या काँकॉर्ड फ्लाईट क्रमांक ४५९० ला २५ जुलै २००० रोजी झालेल्या दुर्दैवी अपघाताने उंटाची पाठ मोडणार्या शेवटच्या काडीचे काम बजावले. उड्डाण केल्यावर काही क्षणांतच पेट घेऊन ते विमान कोसळले... विमानातील सर्व १०० प्रवासी अधिक ४ कर्मचार्यांचा व जमिनीवरच्या ४ लोकांचा मृत्यू झाला... आणि व्यापारी तत्त्वावर चालणार्या एकुलत्या एका स्वनातीत व्यापारी विमानसेवेने शेवटचा श्वास सोडला.
असे असले तरी, आपले स्वप्न गुंडाळून ठेवेल तर तो माणूस कसला ?! काँकॉर्डमध्ये आलेल्या समस्यांना टाळून किंवा त्यांच्यावर मात करून नवनवी व्यापारी स्वनातीत विमाने बनवणे चालूच आहे. या दिशेने विकसित केलेल्या विमानांतले काही महत्त्वाचे बदल असे आहेत :
अ) (काँकॉर्डमधील चार ऐवजी) कमी इंजिने वापरून इंधनाची गरज कमी करून प्रवासाचा खर्च कमी करणे,
आ) (काँकॉर्डच्या Mach 2 ऐवजी) Mach 1.1 ते Mach 1.6 अश्या कमी वेगाची तडजोड स्वीकारणे,
इ) सॉनिक बूमचा आवाज कमी होऊन जमिनीवरची उड्डाणे शक्य व्हावी यासाठी विमानांच्या रचनेत नाविन्यपूर्ण बदल करणे, इत्यादी.
कामाची निकड म्हणून अतीवेगवान प्रवास आवश्यक असणार्या व्यापारी जगतातील भ्रमणवीरांसाठी आणि अगदी महागडे कुतूहल म्हणून का होईना पण एकदा तरी आवाजाचा वेग ओलांडून काही तास प्रवास करण्याची इच्छा असणार्या लोकांसाठी, या क्षेत्रातील नवीन घडामोडी अत्यंत उत्कंठावर्धक ठरत आहेत. स्वतः तसा प्रवास करण्याची गरज अथवा उत्सुकता नसलेल्या लोकांसाठीही या बातम्या काही कमी रोचक नाहीत. आपण कुठे कधी चंद्र किंवा मंगळावर जाणार आहोत, पण त्यांसंबंधीच्या अचंबित करणार्या बातम्या आपले लक्ष वेधून घेतातच ना ? गेल्या पाच-दहा वर्षांत या क्षेत्रातील चढाओढ अधिकच रंगतदार होऊ लागली आहे.
तर चला, या प्रकारातील काही महत्त्वाच्या प्रतिस्पर्धी विमानांची माहिती घेत घेत थोडेसे भविष्यात डोकावू या !
१. BOOM XB-1: The Nouveau Concorde
बूम टेक्नॉलॉजी (Boom Technology, Denver, Colorado, USA) नावाची अमेरिकन स्टार्टअप कंपनी हे विमान विकसित करत आहे. XB-1 हे स्वतंत्रपणे विकसित केलेले पहिले आणि आजतागायतचे सर्वात वेगवान मुलकी विमान आहे. त्यामुळे, त्याचे विकसनकाम करताना एरोडायनॅमिक्स, वेग, हवेच्या तापमानाचा उड्डाणांवर होणारा परिणाम, स्वनातीत वेगाने उडताना हवा व विमान यांचे एकमेकावर होणारे परिणाम, इत्यादी अनेक महत्त्वाच्या बाबींबद्दलच्या शास्त्रीय ज्ञानात मोलाची भर पडली आहे व भविष्यात पडत राहील. कंपनीच्या मते XB-1 ही केवळ पहिली पायरी आहे. नवनवीन प्रयोग व तंत्रज्ञान विकसित करत राहून, अधिकाधिक उपयोगी स्वनातीत विमाने बनविण्याची या कंपनीची मनीषा आहे.
XB-1चे विशेष असे आहेत :
* लांबी ५१.८ मी; पंखांची रुंदी २४.४ मी
* कमाल वेग : Mach 2.2 किंवा सरासरी २,३३५ किमी/तास वेगाने न्यू यॉर्क सिटी ते लंडन ३ तास १५ मिनिटांत (सद्या या अंतराला ७ ते ८ तास लागतात)
* विनाथांबा उड्डाणाचे कमाल अंतर : ८,३०० किमी
* कमाल प्रवासी संख्या : ५५
* इंजिन्स : तीन
* अंदाजे उपलब्धता : सन २०२३
* किंमत (MSRP उर्फ manufacturer's suggested retail price; excluding options and interior) : US$२० कोटी
* इतर खास वैशिष्ट्ये :
--> विमानाचा सांगाडा, मध्यकणा आणि त्रिकोणी (डेल्टा) पंख यांत वैशिष्ट्यपूर्ण बदल केलेले आहेत. त्यामुळे उड्डाण सुकर होते, इंधन कमी लागते आणि सॉनिक बूमची तीव्रताही कमी होते.
--> मध्यकणा आणि पंख यांचे विमानाच्या नाकापर्यंत एकत्रीकरण केलेले आहेत. यामुळे हवेत झेप घेताना आणि जमिनीवर उतरताना जास्त सुविधा व सुरक्षितता मिळते.
--> अल्युमिनियम आणि कार्बन संयुगांचा (carbon composites) वापर करून विमानाचे वजन कमी करूनही बांधणी अधिक मजबूत बनवली आहे.
--> प्रत्येक इंजिनाला स्वतंत्र इंधन पुरवठा करणारी variable geometry nozzle system असलेली तीन शक्तिमान General Electricची टर्बोजेट इंजिने.
BOOM XB-1: The Nouveau Concorde (जालावरून साभार)
काँकॉर्डचा वारसा सांगणार्या या विमानाला "The Nouveau Concorde" उर्फ "नवे काँकॉर्ड" असेही संबोधले जाते आणि त्याच्या पूर्वजाप्रमाणेच, मोठ्या प्रमाणात स्वनातीत प्रवासी वाहतूक डोळ्यासमोर ठेवून त्याचा विकास केला जात आहे. पहिली दहा XB-1 विमाने Virgin Group चा संस्थापक रिचर्ड ब्रॅन्सन याने स्वतःच्या नावावर राखलेली आहेत. जपान एअरलाईन्सने सन २०१७ मध्ये बूम टेक्नॉलॉजीमध्ये US$१ कोटीची गुंतवणूक करून २० विमानांची (अबंधनकारक) मागणी नोंदवली आहे. नाव गुप्त ठेवलेल्या एका युरोपियन एअरलाईनने १५ विमानांची नोंदणी केली आहे. या दोन एअरलाईन्सच्या मागणीची एकत्र किंमत सहजपणे US$५०० कोटींच्या वर गेली आहे. सन २०१७च्या पॅरिस एअर शो मध्ये इतर अनेक विमानकंपन्यांनी आगाऊ मोठ्या रकमा देऊन ५१ विमानांची नोंदणी केली आहे. कंपनीच्या मते सन २०३५ पर्यंत १००० विमाने सहजपणे विकली जातील. त्या अंदाजाने, दरवर्षी १०० विमाने तयार करण्याचा वेग राखत एकूण १,००० ते २,००० विमाने तयार करण्याच्या दृष्टीने कंपनीचा विस्तार चालू आहे.
न्यू यॉर्क सिटी ते लंडन प्रवासाचे काँकॉर्डचे तिकिट, आजचा महागाईदर लक्षात घेता, US$२०,००० इतके महागडे होते. त्यामानाने XB-1चे तिकिट केवळ US$५,००० इतके कमी असेल. या विमानाच्या तिकिटाची किंमत सर्वसामान्य प्रवाशाला परवडण्याइतकी कमी करणे शक्य नसले तरी ती सद्याच्या (सबसॉनिक) विमानांच्या प्रथमवर्ग तिकिटांपेक्षा कमी करणे शक्य होईल असा कंपनीचा दावा आहे.
या विमानाची एक लष्करी आवृत्ती सुद्धा बनवली जात आहे.
२. SPIKE S-512: The Ferrari of the Skies
स्पाईक एरोस्पेस (Spike Aerospace, Boston, Massachusetts, USA) नावाची अमेरिकन कंपनी हे स्वनातीत वेगाने उडणारे विलासी व्यापारी विमान (luxury business jet) विकसित करत आहे. या विमानाच्या सॉनिक बूमचा आवाज इतका कमी असेल की त्यामुळे मानवी वस्ती असलेल्या जमिनीवरून उडण्यास त्याला प्रतिबंध असणार नाही, असा कंपनीचा दावा आहे.
SPIKE S-512चे विशेष असे आहेत :
* लांबी ३७ मी; पंखांची रुंदी १७.७ मी
* कमाल वेग : Mach 1.8 (सरासरी १,९१३ किमी/तास)
* विनाथांबा उड्डाणाचे कमाल अंतर : ११,४८२ किमी (हे विमान लंडन ते हाँगकाँग हे अंतर एका झेपेत पार करू शकेल)
* कमाल उड्डाण उंची (altitude) : १५,२४० मी
* कमाल प्रवासी संख्या : १२ ते १८
* इंजिन्स : दोन
* अंदाजे उपलब्धता : सन २०२३
* किंमत (MSRP उर्फ manufacturer's suggested retail price; excluding options and interior) : US$१२.५ कोटी
* इतर खास वैशिष्ट्ये
--> विमानाच्या सांगाड्याच्या नावीन्यपूर्ण रचनेमुळे त्याला खिडक्या नाहीत. यामुळे विमानाचा बाह्याकार एकदम गुळगुळीत असून वेगाला अजिबात प्रतिबंध होत नाही.
--> Innovative Multiplex Digital Cabin : एकही खिडकी नसल्याने विमानाच्या भिंतीच्या आतील पृष्ठभागही एकदम गुळगुळीत आहे व त्याचा उपयोग चलतचित्र, लॅपटॉपवरील प्रस्तुती (presentation) किंवा विमानाबाहेरील दृश्याचे पॅनोरामिक चित्रण पाहण्यासाठीच्या पडद्यासारखा करता येतो.
--> आतले फर्निचर मोड्युलर असून ते बसण्याची आसने, विश्रांती घेण्यासाठी कोच/गादी, इत्यादींमध्ये बदलता येते (fully customizable interior configuration).
वरच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनांवर कंपनीचा कॉपीराइट असल्याने त्यांची चित्रे इथे देता येत नाहीत. पण त्या रचना कंपनीच्या संस्थळावर येथे पाहता येतील.
आपल्या वेळेची किंमत दशलक्ष डॉलर्समध्ये मोजणार्या व्यापारी प्रवाशांची सोय आणि गर्भश्रीमंतांची चैन, असे दोन हेतू नजरेसमोर ठेवून बनवलेल्या विमानाची रचना त्याचे, The Ferrari of the Skies, हे नाव सार्थ करते.
SPIKE S-512: The Ferrari of the Skies (जालावरून साभार)
3. AERION AS2 : The Supersonic Workhorse
एरिऑन कॉर्पोरेशन (Aerion Corporation, Reno, Nevada, USA) नावाची अमेरिकन कंपनी, Lockheed Martin या विमानबांधणी व्यवसायातील नावाजलेल्या कंपनीच्या सहकार्याने हे विमान विकसित करत आहे. हे विमान खाजगी व व्यापारी विमानप्रवास नजरेसमोर ठेवून बनवलेले आहे. Flexjet ही खाजगी विमानवाहतूक संस्था एरिऑन कॉर्पोरेशनची भागधारक आहे व तिने २० विमानांची मागणी नोंदवली आहे. General Electric या विमानइंजिनांच्या बांधणीत दादा असलेल्या कंपनीचा पाठिंबा मिळविणारी एरिऑन ही पहिली सुपरसॉनिक विमानकंपनी आहे (व्यापारी विमानबांधणीत ज्यांची मक्तेदारी आहे अश्या Boeing आणि Airbus कंपन्यांच्या विमानांत प्रामुख्याने General Electricची इंजिने असतात).
AERION AS2चे विशेष असे आहेत :
* लांबी ५२ मी; पंखांची रुंदी २३ मी; उंची ६.७ मी
* कमाल वेग : Mach 1.4 (सरासरी १,४८७ किमी/तास)
* विनाथांबा उड्डाणाचे कमाल अंतर : ७,७७८ किमी (Mach 0.95 (सब-सॉनिक) वेगाने उड्डाण केल्यास १०,००० किमी)
* कमाल प्रवासी संख्या : १२
* इंजिन्स : तीन
* अंदाजे उपलब्धता : सन २०२३
* किंमत (MSRP उर्फ manufacturer's suggested retail price; excluding options and interior) : US$१२ कोटी
* इतर खास वैशिष्ट्ये
--> स्वनातीत विमानांचे पंख त्रिकोणी (डेल्टा विंग्ज) असतात. या पारंपरिक कल्पनेला छेद देत या कंपनीने AERION AS2चे पंख सडपातळ, हवेला कमीत कमी प्रतिरोध करणारे आणि मागच्या बाजूला विमानाच्या शेपटीशी एकत्रित केलेले (integrated) आहेत. यामुळे, हवेचा प्रतिरोध ७०% कमी करण्यात यश आले आहे. तसेच कार्बन फायबर कांपोझिट्स वापरून विमानाचे वजन कमी आणि मजबुती जास्त करण्यात कंपनी यशस्वी झाली आहे.
--> हे विमान सब-सॉनिक Mach 0.95 वेगाने कार्यक्षमरीत्या उडू शकते. सब-सॉनिक उड्डाणांत सॉनिक बूम होत नसल्याने हे विमान मानवी वस्तीवरून निर्धोकपणे उड्डाण करू शकते.
AERION AS2 : The Supersonic Workhorse (जालावरून साभार)
एकंदरीत स्वनातीत विमानप्रवासाला नजिकच्या भविष्यात सुगीचे दिवस येतील असेच दिसत आहे. त्यामुळे, इतर अनेक स्पर्धकही त्या गंगेत हात धुऊन घेण्यासाठी लहान मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. त्या सगळ्यांना प्रयत्नांना कितपत यश येईल हे काळच ठरवेल. त्यातली एखादी कंपनी जगावेगळे तंत्रज्ञान विकसित करून, स्वनातीत विमानप्रवास सर्वसामान्य प्रवाश्यांच्या आवाक्यात आणून, व्यापारी विमानप्रवासात क्रांतिकारी बदल घडवून आणेल की काय, हे पाहणे मोठे रोचक ठरेल, यात संशय नाही !
प्रतिक्रिया
29 May 2018 - 12:33 am | manguu@mail.com
छान
29 May 2018 - 3:40 am | चामुंडराय
पहिल्यांदा चुकून स्वप्नातील विमान प्रवास असे वाचले. पुन्हा वाचल्यावर कळले परंतु पुढे धागा वाचल्यावर, तिकिटाचे दर आणि अशा विमांनाची उपलब्धता वाचल्यावर वाटले खरेच स्वप्नातीलच आहे हा विमान प्रवास.
बाकी लेख तुमच्या नेहमीच्या शैली प्रमाणे अभ्यासू आणि माहितीपूर्ण आहे हेवेसांनलगे.
29 May 2018 - 6:25 am | आनंदयात्री
>> एखादी कंपनी जगावेगळे तंत्रज्ञान विकसित करून, स्वनातीत विमानप्रवास सर्वसामान्य प्रवाश्यांच्या आवाक्यात आणून, व्यापारी विमानप्रवासात क्रांतिकारी बदल घडवून आणेल की काय, हे पाहणे मोठे रोचक ठरेल, यात संशय नाही !
स्पेस एक्स त्यांच्या बीएफआर रॉकेटचा वापर करून पृथ्वीवर प्रवासी वाहतूकसेवा सुरु करणार अशी चर्चा मागच्या वर्षी होती. त्यावर पुढे काही वाचण्यात आले नाही पण त्याबाबत हि लिंक अतिशय रोचक माहिती देते - https://www.theverge.com/2017/9/29/16383048/elon-musk-spacex-rocket-tran...
29 May 2018 - 7:44 am | गवि
अतिशय रोचक माहिती. धन्यवाद.
भविष्यातही सुपरसोनिक विमानं ही शेड्युल्ड पॅसेंजर फ्लाईट म्हणून यशस्वी ठरण्याची शक्यता फार कमी आहे. टेक्नॉलॉजी म्हणजे सर्व असं नव्हे. कमर्शियल गणित मुख्य. ते जमणं लॉंग टर्म कठीण आहे, या विमानांबाबतही.
29 May 2018 - 10:12 am | जेम्स वांड
अन त्यांना पूर्ण करायच्या ह्या जिद्दीला सलाम. पण थोडे मन चुकचुकले, ह्या सुपरसॉनिक विमानांत नाही म्हणले तरी प्रचलित जेट लायनर्सपेक्षा जास्तच इंधन जळणार. ओझोनच्या थराला अजून किती भोके पडतील असे वाटते काका? की त्याला काबूत ठेवायला काही खास सोयी डिझाईन मध्ये अंतर्भूत केल्या गेल्यात? जगात सगळ्यात जास्त कार्बन उत्सर्जन करणाऱ्या अमेरिकेने हल्लीच त्याच्याविरुद्ध चालणाऱ्या चळवळीतून हातपाय गुंडाळले आहेत अशी बातमी होती, पुढे काय?
29 May 2018 - 11:28 pm | एस
ही भीती सार्थ आहे. परंतु वायुप्रदूषणास जास्त कारणीभूत ही जगातील कारसारखी ऑटोमोबिल आहेत.
लेख नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि उत्तम. रच्याकने, त्या सोलर विमानाचे पुढे काय झाले? व्यावसायिक वापरासाठी सौरविमान तंत्रज्ञान नजीकच्या भविष्यात अस्तित्त्वात येईल का?
29 May 2018 - 10:32 am | चौकटराजा
अलीकडेच " विमाने " या विषयात रस निर्माण झाल्याने वाचून काढले . विमानांची प्रवासी क्षमता पहाता हे प्रकरण जागतिक दर्जाच्या धानिकासाठी ठीक आहे.
जाता जाता - ए ३८० हे विमान तयार होता असताना प्रतीस्पर्धी बोईंग चे असे म्हणणे होते की "अशा मोठ्या विमानाची गरजच नाही . असे धाडस अंगलट येउ शकेल ! " अर्थात असे झाले नाही . अनेक वैमानिक व प्रवासी यांचे ते लाडके विमान ठरले .
ते १२ प्रवासी वाले विमान तुम्ही , मी, कंजूस काका व चित्रगुप्त या शिणेर शिटीजन व आपल्या बायका यांना पुरेल ! ;))
29 May 2018 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
ते १२ प्रवासी वाले विमान तुम्ही , मी, कंजूस काका व चित्रगुप्त या शिणेर शिटीजन व आपल्या बायका यांना पुरेल ! ;))
त्या विमानातून आपण सगळे जगप्रवास करत आहोत असे स्वप्न पहायला आपल्याला कोण अडवू शकते ?! :)30 May 2018 - 11:25 pm | सुखी
चौरा काका, A ३८० band करायला लागले आहेत, कोण गिराईकच नाहीये त्याला
https://www.bloomberg.com/news/articles/2018-01-15/airbus-stakes-future-...
29 May 2018 - 11:51 am | आनन्दा
रोचक महिती.
29 May 2018 - 12:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
सर्व प्रतिसादकांसाठी धन्यवाद !
29 May 2018 - 12:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
प्रत्यक्ष विमानात बसायला मिळण्याची शक्यता नाहीच तरी सुध्दा असे काही वाचायला मजा येते,
फोटू क्र २ आणि ३ दिसत नाहीयेत तेवढे दुरुस्त करा
पैजारबुवा,
29 May 2018 - 12:47 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
फोटो दिसत होते. परत एकदा "पब्लिक अॅक्सेस + रिफ्रेश" केले आहेत. आता दिसावेत.
29 May 2018 - 1:41 pm | ज्ञानोबाचे पैजार
सेख ऐवजी लेख असे वाचावे
पैजारबुवा,
29 May 2018 - 12:50 pm | नाखु
लिखाण
अलिकडच्या मिपावरील हवाई (सवाई) उड्डाण चर्चा पाहिल्यावर खर्या विमानावरचा लेख जास्त भावतो आणि आवडतोही
जमिनीवरचा नाखु स्वप्न पाहणारा
29 May 2018 - 1:01 pm | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
रोचक माहिती आहे. लेख आवडला. वेग ही अतिशय महागडी वस्तू आहे.
लेखास थोडं गालबोट लागलंय. ते म्हणजे ६७७० गॅलन चे ३०७७७ लिटर होतात.
आ.न.,
-गा.पै.
29 May 2018 - 2:10 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
मी सायंटिफिक कॅलक्युलेटर वापरून रुपांतरण केले आहे (१ गॅलन (US) = ३.७८५४१२ लिटर्स), त्यानुसार लेखातलाआकडा (पूर्णांकापर्यंत राऊंड अप करून) बरोबर आहे.
29 May 2018 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे
आताच तुमचा दुवा बघितला. तेथेही लिटर्समध्ये 25627.24 हाच आकडा दिसत आहे.
तुम्ही इंपिरियल गॅलन्स धरून हिशेब केलेला दिसत आहे.
29 May 2018 - 6:00 pm | गामा पैलवान
डॉक्टर सुहास म्हात्रे,
बरोबर आहे तुमचं निरीक्षण. माझ्या गुग्गुळाचार्यांनी इम्पेरियल ग्यालन धरलं. अमेरिकी ग्यालनने आकडा २५००० लिटर्सच्या जवळपास जातो.
आ.न.,
-गा.पै.
29 May 2018 - 5:39 pm | कुमार१
सगळे स्वप्नातीतच आहे खरे !
29 May 2018 - 6:45 pm | शेखरमोघे
(नेहेमीसारखेच) छान लिखाण -वेगळ्याच विषयावर.
जरी "आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने उड्डाण करताना ते विमान इतका मोठा आवाज (सॉनिक बूम) करत असे की त्यामुळे केवळ ध्वनिप्रदूषणच होत असे असे नाही तर विमानमार्गाखाली असलेल्या जमिनीवरच्या घरांच्या खिडक्या हादरत/फुटत असत. " तरी विमानाचा उड्डाणाच्या आणि उतरण्याच्या वेगाचे आणि मार्गाचे नियन्त्रण केल्याने हा प्रश्ण बराचसा सुटला होता. त्यामुळे इतरही मार्ग (युरोप ते आशिया) विचाराधीन असले तरी त्याचवेळी होत गेलेले अपघात आणि त्यामुळे उच्चभ्रूना concorde प्रवासाची वाटणारी भीति (तसेच अशा अपघातानन्तर होणार्या कोर्ट कचेर्या + नुकसान भरपाई याची विमान कम्पन्याना वाटणारी भीति कारण concordeचे प्रवासी अति-श्रीमन्त असत) यावर मात करणेही concorde ला जड गेले.
29 May 2018 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
मुद्द्यांशी सहमत. इथे काँकॉर्ड फक्त पार्श्वभूमीवर असल्याने खूप तपशील या लेखात टाळले. इथे काँकॉर्डबद्दल अधिक माहिती मिळेल.
29 May 2018 - 11:02 pm | प्रसाद गोडबोले
अप्रतिम !
अतिषय माहीतीपुर्ण लेख !
( मी हिरव्या देशात होतो तेव्हा )
प्रवास करत असताना हिथ्रो अयरपोर्ट वर कॉनकॉर्ड पाहिले होते , ( पण अर्थात पुलं म्हणाले तसे ते एखाद्या लावणी साम्राज्ञीला कोथींबीर निवडतना पाहिल्या सारखे होते ते )पण तेव्हा पासुन एकुणच ह्या सुपर सॉनिक प्रकारा विषयी प्रचंड कुतुहल आहे !
विमान एकदा हवेत गेल्यावर बाहेरील वेगाचा अंदाज येत नाही , त्यामुळे माक स्पीडचा सुध्दा एकदा टेकॉफ घेतल्यानंतर काही विशेष फील राहील का ?
शिवाय एयर ट्रॅवल इन्डस्ट्री कायमच तोट्यात असते , त्यामुळे ह्या अस्सल्या लक्षरी फ्लाईटचा धंदा कितपत चालेल ह्या बद्दल शंकाच आहे !
जरी चालला तरी सर्वसमान्य माणासला परवडणे अशक्यच ! आम्ही आपली सिसेना १७२ ची स्वप्ने पहातो , अगदी ४०-५० ह पर्यंत मिळतंय पण मेन्टेनन्स चं गणित जमवणं अवघड आहे ,असो , हे जरी घेता आले तरी जिंकलो, नाही घेता अलं तरी काही हरकत नाही =)))) :)
( इमेज विकिपेडीया वरुन चोप्य्पस्ते : https://en.wikipedia.org/wiki/Cessna_172)
30 May 2018 - 12:00 pm | जेम्स वांड
राजधानी/शताब्दी रेल्वेत जसे आजकाल अगला स्टेशन वगैरे सांगणारे एलईडी डिस्प्ले असतात तसेच काँकॉर्ड मध्ये विमान किती मॅक स्पीडने प्रवास करते आहे ते दर्शवणारे एलईडी फलक होते (असं एका नॅशनल जियोग्राफिक डॉक्युमेंटरी मध्ये पाहिलेलं आठवतंय)
(कोयना-महालक्ष्मी-महाराष्ट्र एक्सप्रेस जिंदाबाद) वांडो
1 Jun 2018 - 11:54 am | टवाळ कार्टा
40-50 हजार डॉलर काय रे?
1 Jun 2018 - 9:26 pm | प्रसाद गोडबोले
हो. नवीन 172S ह्या मॉडेल किंमत : US$307,500 (2012) इतकी होती विकिपेडीया नुसार, पण सेकन्ड हँड 40-50 हजार डॉलर मध्ये मिळतात .
लुईस कोले एका युट्युबर ने हे विमान विकत घेवुन पृथ्वी प्रदक्षिणा केलेली फन फॉर लुईस ह्या त्याच्या च्यानल वर हे विडिओ आहेत ! ते पाहिल्या पासुन जरा कुतुहल जागृत झालेल म्हणुन माहीती काढली होती :)
जस्ट इमॅजिन - एका सिंगल इंजिन विमानातुन अफाट पॅसिफिक समुद्र क्रॉस करणे काय थ्रिल असेल ! बेक्कार च्यायला !!
6 Jun 2018 - 8:20 pm | Nitin Palkar
मर्सिडीज कारपेक्षा स्वस्त मिळतंय हे विमान ..... विचार करायला हरकत नाही.
6 Jun 2018 - 8:33 pm | गवि
C152 याहून स्वस्त मिळेल. 2 सीटर. बाकी सर्व तसंच.
पण वेळोवेळी करंट ठेवावं लागणारं COA (certificate of airworthiness), पार्किंग चार्जेस, मेंटेनन्स हे भरपूर जास्त महाग पडेल.
2 Jun 2018 - 7:04 am | सुधीर कांदळकर
जमिनीवरून सॉनिक बूम्स न करणार्या कमी वेगाने आणि महासागरावरून स्वनातीत वेगाने असे करताअ येत नाही का?
लेख आवडला हेवेसांनल
2 Jun 2018 - 2:05 pm | डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
सुपरसॉनिक इंजिनांची रचना अशी असते की ती सब-सॉनिक वेगाने उडाली तर त्यांची इंधन कार्यक्षमता (fuel efficiency) खूपच कमी होते. म्हणजे, अगोदरच महागडा असलेला प्रवास अतीमहागडा होतो.
मात्र, AERION AS2 मध्ये या समस्येवर उपाय शोधलेला दिसत आहे. कारण, लेखात लिहिल्याप्रमाणेच... हे विमान सब-सॉनिक Mach 0.95 वेगाने कार्यक्षमरीत्या उडू शकते. सब-सॉनिक उड्डाणांत सॉनिक बूम होत नसल्याने हे विमान मानवी वस्तीवरून निर्धोकपणे उड्डाण करू शकते.
6 Jun 2018 - 8:23 pm | Nitin Palkar
नेहमी प्रमाणेच अतिशय सुंदर आणि रोचक.
20 Jun 2018 - 8:51 pm | राधासुत
लेख सुरुवातीस कुतूहलाने परंतु नंतर शेवटपर्यंत बारकाईने वाचला. एकदा तरी या स्वप्नातीत विमानाने प्रवास करण्याची इच्छा मनी जागी झाली. ताबडतोब बादलीतील यादीमध्ये भर केली. धन्यवाद !