गाऊट : युरिक अ‍ॅसिडचे ‘खडे’ बोल !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
10 Apr 2018 - 10:13 am

आपल्या शरीराच्या कुठल्याही हालचालींमध्ये विविध सांधे महत्वाची भूमिका बजावतात. सांध्यांमध्ये जे अनेक आजार उद्भवतात त्यांना आपण ‘संधिवात’ (arthritis) या सामान्य नावाने ओळखतो. सांध्यांचा दाह होण्याची अनेक कारणे आहेत आणि त्यानुसार या संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. त्यातील काहींमध्ये सांध्यांत विशिष्ट प्रकारचे खडे (crystals) जमा होतात आणि त्यामुळे तिथे दाह होतो. या प्रकारातील सर्वात जास्त आढळणारा आजार म्हणजे ‘गाऊट’. या आजाराचा इतिहास, त्याची कारणमीमांसा, स्वरूप, रुग्णाला होणारा त्रास व त्याचे भवितव्य आणि रोगनिदान या सगळ्यांचा उहापोह या लेखात करायचा आहे.

आजाराचा इतिहास:

गाऊट हा अगदी प्राचीन काळापासून माहित असलेला आजार आहे. वैद्यकशास्त्रात त्याची प्रथम नोंद ख्रिस्तपूर्व २६४० मध्ये इजिप्तमध्ये झालेली आढळते. पुढे ख्रिस्तपूर्व पाचव्या शतकात Hippocrates ने त्याची दखल घेतली. या आजारात पायाच्या अंगठ्याचा सांधा चांगलाच सुजतो आणि रुग्णास असह्य वेदना होतात. त्यामुळे तेव्हा गाऊटला ‘चालणे पंगू करणारा आजार’ असे म्हटले जाई.
तो मुख्यतः बेबंद जीवनशैली असणाऱ्या श्रीमंत लोकांत आढळून येई. त्यांच्या आहारात महागडे मांसाहारी पदार्थ असत आणि त्यांचे मद्यपानही बेफाम असे. त्या काळी संधिवाताचे जणू दोन सामाजिक गटांत विभाजन झाले होते - गाऊट हा श्रीमंतांचा तर rheumatism हा गरीबांचा आजार होता ! किंबहुना गाऊट हा ‘राजा-महाराजांचा आजार’ म्हणूनच ओळखला जाई.

पुढे इसवी सनाच्या पहिल्या शतकात Galenने त्यावर सखोल अभ्यास करून गाऊटचे कारण शोधून काढले. सांध्यांमध्ये जे खडे जमा होतात ते युरिक अ‍ॅसिडचे बनलेले असत. त्यांमुळे सांध्याचा दाह होई. अतिरिक्त मांसाहारामुळे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढते. Galenनेही गाऊटचा संबंध बेबंद जीवनशैली आणि बाहेरख्यालीपणाशी जोडला. तसेच तो बऱ्यापैकी अनुवांशिक असल्याचे मत नोंदवले.

त्यानंतर काळ जसा पुढे सरकत गेला तशी राजेशाही संपुष्टात आली आणि बऱ्याच देशांत लोकशाही नांदू लागली. मग प्रगत देशांतील औद्योगिक क्रांतीमुळे जनसामान्यांच्या जीवनाचा दर्जा सुधारला. त्यांनाही आर्थिक सुबत्ता लाभली. हळूहळू मद्यपान आणि अतिरिक्त मांसाहार हे समाजाच्या बहुतेक स्तरांत झिरपत गेले. परिणामी गाऊट हा आता केवळ श्रीमंतांचा आजार राहिला नाही आणि तो समाजाच्या सर्व आर्थिक स्तरांमध्ये आढळू लागला.

संभाव्य रुग्ण आणि जागतिक प्रसार (prevalance) :
आजच्या घडीला याबाबतच्या काही गोष्टी ठळकपणे दिसून येतात. हा आजार साधारण ५०+ वयोगटात जास्त दिसतो. तो मुख्यतः पुरुषांचा आजार आहे (पुरुष : स्त्री = १० :१). जोपर्यंत स्त्रीची मासिक पाळी चालू असते त्या वयांत तो सहसा तिला होत नाही. स्त्रियांमध्ये तो ६०+ नंतर अधिक दिसतो. गाऊट जगभरात आढळतो पण पाश्चिमात्य जगात भारतापेक्षा सुमारे १० पट अधिक आढळतो. गेल्या दोन दशकांत आजाराचे प्रमाण जगभरात जवळपास दुप्पट झालेले आहे. गेल्या काही वर्षांत भारतातील केरळमध्ये याचे वाढलेले प्रमाण लक्षणीय आहे.

कारणमीमांसा:

गाऊट होण्याचे मूलभूत कारण म्हणजे रक्तातील युरिक अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण. हे अ‍ॅसिड शरीरात कसे तयार होते ते आता पाहूया.
DNA व RNA हे पेशींमधील मूलभूत पदार्थ आपल्या परिचयाचे आहेत. या गुंतागुंतीच्या रेणूंमध्ये Purines हा एक नायट्रोजनयुक्त घटक असतो. दररोज शरीरात पेशींची उलाढाल चालू असते. जेव्हा जुन्या पेशींचा नाश होतो तेव्हा या Purinesचे विघटन होते आणि युरिक अ‍ॅसिड तयार होते.
तसेच आहारातील DNA/RNA पासूनही ते शरीरात तयार होते. पुढे मूत्रपिंडातून त्याचे लघवीत उत्सर्जन होते. त्यामुळे रक्तातील त्याचे प्रमाण अल्प असते ( पुरुष : ३ – ७ mg/dL). हे प्रमाण स्त्रियांमध्ये अजून कमी असते. ते थोडेसुद्धा वाढणे का हितावह नसते ते आता पाहू.

इथे युरिक अ‍ॅसिडचा एक महत्वाचा गुणधर्म लक्षात घेतला पाहिजे. हे संयुग पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते. त्यामुळे रक्तात ते जोपर्यंत ६.८ mg/dL च्या आत असते तोपर्यंतच ते जेमतेम विरघळलेल्या अवस्थेत राहते. जेव्हा ते या प्रमाणाबाहेर वाढते तेव्हा विरघळू न शकल्याने त्याचे खडे निर्माण होतात. मग हे खडे सांधे व मूत्रपिंड यांत साठू लागतात. हाच तो गाऊट.
युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढलेल्या सर्वच लोकांना गाऊट होत नाही. तशा सुमारे एक दशांश जणांना तो होतो. तो दिसून येण्याआधी १० ते २० वर्षे युरिक अ‍ॅसिडची पातळी सतत वाढलेली राहावी लागते.

जीवनशैलीशी संबंध :

१. हा आजार शहरात राहणाऱ्या लोकांत अधिक दिसतो. बुद्धीजीवी लोकांत त्याचे प्रमाण काहीसे जास्त असते.
२. अतिरिक्त मांसाहाराशी त्याचा संबंध आहे. विशिष्ट मासे (anchovies, sardines, इ.), मांसाहारातील यकृत व मूत्रपिंड या पदार्थांमध्ये purines भरपूर असतात.
३. अतिरिक्त मद्यपान हेही आजार होण्यास अनुकूल ठरते.
४. अलीकडे फ्रुक्टोजयुक्त पेये (उदा. high-fructose corn syrup) पिण्याचे वाढलेले प्रमाण हेही युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढवते.

गाऊट आणि अनुषंगिक आजार</strong> :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• उच्च कोलेस्टेरॉल व TG हा मेद
• लठ्ठपणा
याशिवाय गाऊट होण्यात अनुवंशिकतेचा वाटा खूप मोठा आहे.

युरिक अ‍ॅसिडची वाढलेली रक्तपातळी:
शरीरात तयार झालेले बरेचसे युरिक अ‍ॅसिड हे लघवीत उत्सर्जित होते. त्यामुळे निरोगीपणात त्याची रक्तपातळी फक्त ३ – ७ mg/dL चे दरम्यान असते. तिची वरची मर्यादा पुरुषांत ७ तर स्त्रियांमध्ये ६ असते.

ही पातळी वाढण्याच्या कारणांचे दोन गटात विभाजन होईल:
१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे
२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे.
आता दोन्हींचा आढावा घेतो.

१. युरिक अ‍ॅसिडचे उत्सर्जन कमी होणे:
९०% रुग्णांना हा मुद्दा लागू होतो. त्याची कारणे अशी आहेत:
• अनुवंशिकता
• दीर्घकालीन मूत्रपिंड विकार
• अतिरिक्त मद्यपान
• औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात

२. युरिक अ‍ॅसिडचे उत्पादन वाढणे:
१०% रुग्ण यात मोडतात. त्याची विविध कारणे अशी:
• अतिरिक्त मांसाहार
• Purinesचे जनुकीय आजार
• काही कर्करोग : यांमध्ये पेशींची उलाढाल खूप वाढते. तसेच जर त्यांवर उपचार म्हणून केमोथेरपी चालू केली तर त्याने पेशींचा खूप नाश होतो.

गाऊटचा तीव्र झटका (acute attack):
यात बहुतांश रुग्णांचे बाबतीत एकाच सांध्याचा तीव्र दाह होतो आणि तो सांधा म्हणजे पायाच्या अंगठ्याचा. हा सांधा खूप सुजतो आणि प्रचंड दुखतो.
थोड्या रुग्णांचे बाबतीत एकदमच अनेक सांधे सुजतात. त्यामध्ये टाच, गुडघे, हाताची बोटे आणि कोपर यांचा समावश असतो.
या झटक्यानंतर थोड्याच दिवसात संधिवात ओसरतो. नंतर तो काही काळाने पुन्हा उपटतो. अशा तऱ्हेने हे झटके वारंवार येऊ लागतात आणि अधिक तीव्र होतात.

gout attack

दीर्घकालीन गाऊट:
सुमारे १० वर्षांनंतर हे रुग्ण दीर्घकालीन गाऊटची शिकार होतात. तेव्हा अनेक सांधे, स्नायू , कानाची पाळी आणि मूत्रपिंड अशा अनेक ठिकाणी युरिक अ‍ॅसिडचे खडे (tophi) साठतात.
अशा रुग्णांना भविष्यकाळात हृदयविकार होण्याची शक्यता जास्त असते. तसेच त्यांचे आयुष्यमान काहीसे कमी होते.

रोगनिदान चाचण्या:
१. युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी मोजणे: मात्र ही अजिबात निर्णायक ठरत नाही. काही रुग्णांत ती वाढलेली, काहींत नॉर्मल तर काहींत चक्क कमी झालेलीही असू शकते. किंबहुना या पातळीत अचानक झालेल्या चढउतारांमुळे झटका येतो.

२. सांध्यातील वंगण-द्रवाची (synovial fluid) तपासणी : ही खऱ्या अर्थाने रोगनिदान करते. हे द्रव विशिष्ट सूक्ष्मदर्शकाखाली तपासले असता त्यात युरिक अ‍ॅसिडचे सुई सारखे स्फटिक दिसतात.

३. निरनिराळी इमेजिंग तंत्रे : पहिल्या झटक्याचे वेळी यातून काही निष्पन्न होत नाही. दीर्घकालीन गाऊटमध्ये यांचा गरजेनुसार वापर केला जातो.

उपचारांची रूपरेषा:
१. तीव्र झटका असताना वेदनाशामक आणि सूज कमी करणारी औषधे देतात.

२. दीर्घकालीन उपचारात युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी कमी करणारी औषधे देतात. यांचे तीन मुख्य प्रकार आणि कार्य असे असते:
अ) युरिक अ‍ॅसिडचे लघवीतून उत्सर्जन वाढवणे
आ) युरिक अ‍ॅसिडचे पेशींमध्ये उत्पादन कमी करणे.
इ) युरिक अ‍ॅसिडचे विघटन करणे : यासाठी uricase हे एन्झाइम दिले जाते.

पहिल्या दोन गटांत विविध औषधे उपलब्ध आहेत. रुग्णाच्या आजाराची कारणमीमांसा करून त्यापैकी योग्य ते औषध दिले जाते. ही औषधे कायमस्वरूपी घ्यावी लागतात.

३. पथ्यपाणी सांभाळणे: यामध्ये भरपूर पाणी पिणे, मांसाहार अत्यंत मर्यादित ठेवणे, मद्यपान (विशेषतः बिअर) तसेच फ्रुक्टोजयुक्त गोड पेये टाळणे आणि आपले वजन नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश असतो.

तर अशी ही गाऊटची कथा. प्राचीन काळी ‘राजांचा आजार आणि आजारांचा राजा’ असे बिरूद गाऊटने मिरवले आहे.त्या काळी योग्य त्या उपचारांचा शोध लागेपर्यंत हे रुग्ण वेदनांनी अक्षरशः पिडलेले असत. तसेच तसेच त्यांच्या मूत्रपिंडांची वाट लागत असे. परिणामी इतर अवयव सुद्धा अकार्यक्षम होत. आता आधुनिक वैद्यकीय उपचारांनी हा आजार नियंत्रणात ठेवता येतो. मुळात तो होण्यास चयापचय बिघडवणारी आहार-जीवनशैली कारणीभूत ठरते किंवा खतपाणी घालते. ती जर आपण सुधारली तर समाजातील गाऊटचा प्रादुर्भाव कमी होईल.

जाता जाता .....

युरिक अ‍ॅसिड, जैविक उत्क्रांती आणि बुद्धिमत्ता :
आता जरा गाऊट बाजूला ठेऊन युरिक अ‍ॅसिडकडे कुतूहलाने बघूया. त्यासाठी आपल्याला माणूस आणि उत्क्रांतीच्या टप्प्यातील इतर प्राणी यांची तुलना करायची आहे. त्यात माणूस आणि वानर(ape) हे एका बाजूस तर इतर सस्तन प्राणी दुसऱ्या बाजूस असतील. आपण वर लेखात पाहिले की मानवी शरीरात Purinesचे विघटन होऊन युरिक अ‍ॅसिड तयार होते आणि ते पाण्यात मोठ्या मुश्किलीने विरघळते.

मात्र या दुसऱ्या गटातील प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडचे अजून पुढे uricase या एन्झाइमने विघटन होऊन allantoin हा पदार्थ तयार होतो आणि तो पाण्यात सहज विरघळणारा असतो. त्यामुळे त्या प्राण्यांमध्ये युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी नगण्य असते. परिणामी त्यांना गाऊट होत नाही.
उत्क्रांती दरम्यान मानवाने uricase गमावले आणि त्यामुळे युरिक अ‍ॅसिडची रक्तपातळी बऱ्यापैकी राहिली. त्यातून गाऊटची कटकट आपल्या मागे लागली. पण त्याचबरोबर या नाठाळ युरिक अ‍ॅसिडचे काही फायदेही आपल्याला मिळाले. त्यातील प्रमुख २ असे आहेत:

१. युरिक अ‍ॅसिडला ‘antioxidant’ गुणधर्म आहे. याचा फायदा कर्करोग-प्रतिबंधात्मक आणि मज्जातंतूना संरक्षक असा होतो.

२. युरिक अ‍ॅसिड आपल्या मेंदूतील cerebral cortex या सर्वोच्च भागाला उद्दीपित करते. त्यामुळे (प्राण्यांच्या तुलनेत) आपल्या उच्च बुद्धिमत्तेशी युरिक अ‍ॅसिडचा काही प्रमाणात तरी संबंध आहे असे काही वैज्ञानिकांना वाटते.

...
प्राणी ते मानव या जैविक उत्क्रांतीवर नजर टाकता आपल्या लक्षात येते की या दरम्यान मानवाने काही गमावले तर काही कमावले. कमावलेल्या सर्वच गोष्टी ‘वरदान’ आहेत का, याचे उत्तर देणे तसे सोपे नाही. युरिक अ‍ॅसिड हे त्यापैकीच एक रसायन. ते आपल्यासाठी “शाप की वरदान” हा विचारात टाकणारा एक प्रश्न आहे खरा.
****************************************************************************

जीवनमानआरोग्य

प्रतिक्रिया

मार्मिक गोडसे's picture

10 Apr 2018 - 10:28 am | मार्मिक गोडसे

छान माहिती. एक शंका, रक्तात युरीक अॅसिड वाढल्यास किडणीत त्याचे स्टोन होण्याची शक्यता वाढते का?

कुमार१'s picture

10 Apr 2018 - 10:49 am | कुमार१

अर्थातच वाढते. लेखात ते स्पष्ट केलेले आहे.

मार्मिक गोडसे's picture

10 Apr 2018 - 11:22 am | मार्मिक गोडसे

हो , वाचनातून निसटले. धन्यवाद.

लई भारी's picture

10 Apr 2018 - 2:19 pm | लई भारी

अजून एक विषय उत्तम रित्या समजावून सांगितल्याबद्दल धन्यवाद.
>>> • औषधांचे दुष्परिणाम : यात aspirin व काही diuretics येतात
जवळच्या नातेवाईकांच्या बाबतीत हे अनुभवलं आहे. मांसाहार/मद्यपान इत्यादी काहीच नसल्यामुळे युरिक ऍसिड कसं वाढलं असावं असा विचार करत असताना फॅमिली डॉक्टर नी इतर स्पेशालिस्ट नी दिलेल्या गोळ्यांमध्ये काही बदल केले. त्यावेळी त्यांनी 'diuretic' हा शब्द वापरल्याचं आठवतंय.

पाय विशेषतः टाच यामध्ये 'non-specific' दुखणं असल्यावर युरिक ऍसिड बघायला लावून औषध आणि आहार-बदल सुचवला होता(मी आणि इतर १-२ जवळचे लोक).
हे कितपत उपयुक्त असेल विशेषतः जर युरिक ऍसिड ची चाचणी विश्वासार्ह नसेल तर? भाबडी शंका आहे फक्त, अजिबात दोषारोप नाहीत :)

एखाद्याला इतर कारणामुळे 'गाऊट' किंवा युरिक ऍसिड वाढण्याची व्याधी जडली असेल तर मग त्यांच्या संततीला 'आनुवंशिक' धोका संभवतो का? (बहुधा बेसिक मध्येच माती खाल्लीय मी :) )

कुमार१'s picture

10 Apr 2018 - 2:43 pm | कुमार१

लई भारी, लई आभार !

हे कितपत उपयुक्त असेल विशेषतः जर युरिक ऍसिड ची चाचणी विश्वासार्ह नसेल तर? >>>>>
इथे तिचा उपयोग एक ‘चाळणी चाचणी’ म्हणून केला आहे. जर ते वाढलेले निघाले तर निदान होईलच. नाही निघाले तर इतर विचार करता येतो.

एखाद्याला इतर कारणामुळे 'गाऊट' किंवा युरिक ऍसिड वाढण्याची व्याधी जडली असेल तर मग त्यांच्या संततीला 'आनुवंशिक' धोका संभवतो का? >>>>
रूढ कल्पनेप्रमाणे नाही. ‘इतर’ कारण कोणते ते नीट तपासावे लागेल. जर ते त्या व्यक्तीच्या जनुकांशी संबंधित नसेल (उदा. औषधांचे दुष्परिणाम ), तर मग उत्तर ‘नाही’ असेल.

नेहमीप्रमाणे उत्तम माहिती.

व्यायामासोबत सप्लिमेंट म्हणून घेतल्या जाणाऱ्या व्हे प्रोटिन्स मुळे देखील गाऊट संभवतो का ? (ऐकले आहे)

दीपक११७७'s picture

10 Apr 2018 - 3:27 pm | दीपक११७७

नेहमी प्रमाणे अप्रतिम आणि माहिती पुर्ण लेख. धन्यवाद!

शलभ, सागर व दीपक अनेक आभार.

व्हे प्रोटिन्स मुळे देखील गाऊट संभवतो का ? (ऐकले आहे) >>>

माझ्या वाचनानुसार नाही. व्हे प्रोटिन्स हे चीज करतानाचे ‘बाय- प्रोडक्ट’ आहे. गाऊटच्या रुग्णांनी चीज जरूर खावे. त्यामुळे व्हे प्रोटिन्सलाही हरकत नसावी. अर्थात यावर आहारतज्ञाचे मत घ्यावे, हे बरे.
एक मुद्दा स्पष्ट करतो. एखाद्या पदार्थात ‘प्रोटीन’ किती यापेक्षा ‘Purines’ किती हे जाणणे महत्वाचे आहे. ‘Purines’ पासून युरिक A तयार होते, प्रोटीनपासून नाही.

अर्थात खाद्यात प्रोटीन व ‘Purines’ एकत्रच असतात. त्यांचे तुलनात्मक प्रमाण जाणले पाहिजे.

सुधीर कांदळकर's picture

10 Apr 2018 - 7:04 pm | सुधीर कांदळकर

छान, रंजक, उद्बोधक वगैरे.

मस्त, धन्यवाद.

कुमार१'s picture

10 Apr 2018 - 7:39 pm | कुमार१

बऱ्याच दिवसांनी तुमची इथे भेट झाली

manguu@mail.com's picture

10 Apr 2018 - 10:38 pm | manguu@mail.com

छान

पद्मावति's picture

10 Apr 2018 - 10:47 pm | पद्मावति

उत्तम लेखन नेहमीप्रमाणेच.

नेहेमी प्रमाणेच माहितीपूर्ण लिखाण! Allergy करता कारण ठरवताना जसा trial and error पद्धतीचा वापर केला जातो तसे काहीसे इथे "काय खाऊ नये" हे ठरवण्याकरता करावे लागते का?

कुमार१'s picture

11 Apr 2018 - 7:44 am | कुमार१

manguu, पद्मावती व शेखर, आभार !
@ शेखर,

नाही शेखर, तसे नाही म्हणता येणार. “काय खाऊ नये” ची यादी तशी पक्की आहे. ती अशी:
लाल मांस, ठराविक मासे आणि समुद्री अन्न, वाटाणे व बीन्स आणि मद्य.

याबरोबर साखरयुक्त पेये, मीठ आणि गोड फळांचे रस हे अगदी मर्यादितच घ्यावे.

लई भारी's picture

11 Apr 2018 - 2:02 pm | लई भारी

युरिक ऍसिड साठी सरसकट सर्व नॉन-व्हेज आणि कडधान्ये वर्ज्य सांगितली होती आणि डाळ पण कमी.
असं का सांगितलं असावं? गरजेचं आहे का ते?

कुमार१'s picture

11 Apr 2018 - 2:11 pm | कुमार१

द्विदल धान्ये ( beans) नको हे बरोबर.
डाळी, अंडे व चीज जरूर खावे हे मा वै म .
शरीराला चांगले प्रोटीन हवेच

लई भारी's picture

14 Apr 2018 - 9:45 am | लई भारी

एकदा आहार संबंधी लेख येऊ द्या की. म्हणजे तसं प्रत्येक विषयात तुम्ही सांगितलं आहेच, पण तो स्वतंत्र विषय घेता येईल असे वाटते.
उदा. चीज बद्दल बरेच उलट सुलट विचार ऐकायला येतात. तसाच आजकाल इन्सुलिन संदर्भाने काहीतरी एक नवीन मतप्रवाह ऐकण्यात आला की कमीत कमीत वेळा खाणे हितकारक असते. भाताबद्दल पण तेच. बरेचसे डॉक्टर मधुमेह्यांना पूर्ण वर्ज्य सांगतात तर काहींचं म्हणणं तसं काही नाही. वजनवाढीचा भाताशी संबंध आहे का? केटो हा एक वेगळाच मोठा विषय दिसतोय :)

हमारी मांगे मजदूरो की तरह बढती जा रही है! :)

प्रियाभि..'s picture

28 Jul 2019 - 9:19 am | प्रियाभि..

हे काही वैद्यकीय मत नाही पण निरीक्षण म्हणू शकतो. मला वजन वाढण्याचा आणि भाताचा फारसा काही संबंध असेल असं वाटतं नाही. कोकणच्या लोकांचा मुख्य आहार भात हाच आहे पण त्या लोकांमध्ये वजनदार व्यक्ती खूप कमी दिसतील. अर्थात त्यांचे दररोजचे चालणे अफाट असल्यामुळे त्याचा संबंध असू शकतो. भातामुळे (आणि त्यातही नवे तांदूळ असल्यास अधिक) पोट फुगन्याची (सुटण्याची नव्हे) समस्या जाणवते पण ते काही काळापर्यंत (वायू बाहेर पडेपर्यंत). "भाताने काही होत नाही रे" असे आजी म्हणायची हे आता आठवले. तसेच दूध प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो असेही ती म्हणायची हे आता पटायला लागले आहे. लहानपणी भरपूर दूध पिणाऱ्या भावाला त्याच्या शरीरयष्टी वरून चिडवायचे सगळे पण आता तोच सर्वात फिट आहे. खेडेगावात अशी बरीचशी उदाहरणे सापडतील.

कुमार१'s picture

28 Jul 2019 - 10:21 am | कुमार१

मला वजन वाढण्याचा आणि भाताचा फारसा काही संबंध असेल असं वाटतं नाही.
>>>

बरोबर. वजनवाढ, मधुमेह आणि पोळी/भात यावर भरपूर काथ्याकूट झालेला दिसेल. प्रत्येकाच्या अभ्यासानुसार भिन्न मते आढळतील.
माझे मत:

१. प्रमाणित आहार आणि छान व्यायाम असल्यास यावर विचार करू नये.

२. बैठी जीवनशैली असल्यास काही मुद्द्यांचा विचार करावा.

अ) आपल्याकडे बरेच लोक पोळी/भाकरी भरपेट खातात आणि त्यावर ‘समाप्ती’ म्हणून भात. हा प्रकार वजनवाढीस पूरक ठरतो.
आ) मधुमेहाच्या दृष्टीकोनातून : पोळी + भात असे एकावेळेस टाळावे. दोन्हीपैकी एकच खाल्ल्यास चांगले.
इ) पांढऱ्या तांदूळाऐवजी तपकिरी अधिक बरा.

प्रकाश घाटपांडे's picture

11 Apr 2018 - 9:02 am | प्रकाश घाटपांडे

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग हे युरिक अ‍ॅसिडची लेव्हल मेंटेन करण्यासाठी चांगला होतो असे आंतरजालावर अनेक ठिकाणी वाचले आहे. मी ते मध टाकून एक चमचा एक ग्लास मधे अधूनमधुन घेतो. त्याचा काही रोल आहे का?

चित्रगुप्त's picture

30 May 2023 - 2:50 pm | चित्रगुप्त

खूपच उपयुक्त , माहितीपूर्ण लेख आहे.
मला काही वर्षंपूर्वी यूरिक अ‍ॅसिडचा बराच त्रास होता. त्यावेळी ऐकीव माहितीनुसार मी फक्त एकदाच दोन चमचे अ‍ॅ.सा.व्हि. पाण्यात मिसळून घेतले होते, आणि अक्षरशः चमत्कार घडावा तसा परिणाम झाला होता. त्या नंतर अधून मधून यूरिक अ‍ॅसिड चाचणी करून घेत असतो, ती नॉर्मल येते आहे.
हल्ली थोडी शंका येते आहे पण सध्या अमेरिकेत असल्याने भारतात परतल्यावरच चाचणी करवेन. त्यासाठी सध्या चहा घेणे सोडावे असे वाटते आहे. (माझ्या अनुभवाप्रमाणे आपले शरीरच आपल्याला विविध इषारे देत असते, ते समजून घेऊन वागणे उपयोगी ठरते) योगायोग म्हणजे हा प्रतिसाद लिहीत असताना सकाळी सव्वापाच वाजता आजपासून चहा सोडायचे ठरवून मी आले, दालचिनी, वेलदोडा, काळी मिरी, गूळ, दूध आणि पाणी असे उकळवून पीतो आहे.
अ‍ॅ.स.व्हि. बद्दल मी विसरुन गेलो होतो, आता घरात असल्यास तेही एकदा घेईन.

अ‍ॅपल सायडर व्हिनेगर चा उपयोग >>>>

त्याला एक साधारण तब्बेतीस चांगले पेय म्हणता येईल. आजारांमध्ये उपयुक्त किती याबद्दल बरेच दावे केलेले असतात. पण, प्रत्यक्ष हजारो रुग्णांवर त्याच्या ‘क्लिनिकल ट्रायल्स’ झालेल्या नसतात.
त्यामुळे वैद्यकीय मत देता येत नाही.

खूप उपयोगी माहिती एकदम सोप्या शब्दात, धन्यवाद!!!

कुमार१'s picture

12 Apr 2018 - 6:49 am | कुमार१

माझ्या पहिल्या आरोग्य लेखमालेत हिमोग्लोबिन, बिलीरुबीन, युरिआ, इ. ८ पदार्थांवर लेख होते. तेव्हा युरिक A हा विषय मी घेतला नव्हता. तेव्हा मी याबाबतीत संभ्रमात होतो. अनिमिया, कावीळ, मूत्रपिंडविकार, इ. आजार खूप आढळतात. त्याप्रमाणात ‘गाऊट’ कमी आढळतो. तेव्हा तो लोकांना परिचित नसेल असे वाटून मी तो टाळला होता.

पण या धाग्यातील चर्चेने माझा तो समज सपशेल खोटा ठरवला आहे ! इथे सहभागींना तो चांगलाच माहित असल्याचे दिसले. काहींच्या स्वानुभव-कथनाने चर्चेत रंगत आली. एकूणच चयापचय बिघाडाचे आजार सर्वत्र वाढताहेत. ‘गाऊट’ त्यापैकीच एक. त्याचे विवेचन तुम्हाला आवडले आणि उपयुक्त वाटले याचे समाधान आहे

कुमार१'s picture

12 Apr 2018 - 5:24 pm | कुमार१

सर्व वाचकांचे आभार !

गाऊटचे उपचार : Rheumatology

गाऊट हा एक प्रकारचा संधिवात आहे हे आपण जाणतो. दीर्घकालीन गाऊटमध्ये हे दुखणे एका सांध्यापुरते मर्यादित न राहता अन्य इंद्रियांवर सुद्धा परिणाम करते. गाऊटच्या रुग्णांसाठी सल्ला देणारे परंपरागत डॉ हे अस्थिरोगतज्ञ (orthopedic surgeons) आहेत. परंतु वैद्यकातील नवीन प्रगतीनुसार आता हा आजार एका नव्या प्रकारच्या डॉ.नी हाताळायचा आहे.
या नव्या शाखेला Rheumatology म्हणतात आणि त्यातील तज्ञ हा D.M. (Rheumatology) शिकलेला असतो. सध्या भारतात या तज्ञांची संख्या कमी आहे आणि ते जास्त करून महानगरांत दिसतील. पण भविष्यात त्यांची वाढ होईल. याची दखल संबंधित रुग्णांनी घ्यावी.

आता हा बदल कशासाठी, ते सांगतो. अस्थिरोगतज्ञ हा मुळात surgeon असतो. जेव्हा संधिवात हा एखाद-दुसऱ्या सांध्यापुरताच मर्यादित असतो आणि त्याचा अन्य इंद्रियांवर परिणाम झालेला नसतो, असे रुग्ण हे अस्थिरोगतज्ञाने हाताळायचे असतात. याउलट गाऊट सारखे आजार की ज्यात शरीराचे अनेक अवयव व्याधीग्रस्त होतात, ते Rheumatologist च्या अभ्यासात येतात. हा डॉ मुळात ‘फिजिशियन’ असतो. या नव्या अतिविशिष्ट तज्ञांचा लाभ संबंधित रुग्णांनी जरूर घ्यावा.

कानडाऊ योगेशु's picture

12 Apr 2018 - 5:58 pm | कानडाऊ योगेशु

मध्यंतरी सलगपणे ४ तास ड्रायविंग केल्यानंतर उजव्या पायाच्या अंगठ्याला सूज आली होती. सतत ब्रेक/अ‍ॅसिलेटर वापरल्याने तसे झाले असावे असा विचार करुन घरगुती उपाय केले व ३-४ दिवसात सूज उतरली. पण त्यादरम्यान झालेल्या वेदना असह्य होत्या. आता समजले कि हा गाऊट चाच प्रकार होता. परंतु आधीही असे कधी झाले नव्हते व नंतरही झाले नाही. पण आता ह्यापुढे मी काय काळजी घ्यावी ह्याबद्दल मार्गदर्शन मिळाले तर मदत होईल.

प्रकाश घाटपांडे's picture

13 Apr 2018 - 10:25 am | प्रकाश घाटपांडे

बारीक सुया टोचणार्‍या मुंग्या जाणवत होत्या का? मला टाचे पासून सुरवात झाली होती. मा बो वर थोड विस्ताराने लिहिल आहे.

कानडाऊ योगेशु's picture

25 Apr 2018 - 4:56 pm | कानडाऊ योगेशु

नाही सर. प्रथम हवीहवीशी वाटणारी सूज आली. म्हणजे हात फिरवला कि बरे वाटायचे पण नंतर मात्र तिने उग्र रूप धारण केले. जमिनीवर पाय नुसता जरी ठेवला तरी प्रचंड वेदना व्हायच्या. माबो वरची लिन्क द्याल का.स?

कुमार१'s picture

12 Apr 2018 - 7:06 pm | कुमार१

.
@कायो,
आता समजले कि हा गाऊट चाच प्रकार होता >>>>

हे रोगनिदान खात्रीने झाले आहे का? झाले असल्यास काही सूचना:
१. त्याची अनुवंशिकता तपासून घ्या. म्हणजे, तुमच्या प्रथम दर्जाच्या नात्यात कोणाला उच्च युरिक A पातळी आहे का ते बघा. याचा त्यांना भविष्यात उपयोग होतो. प्रतिबंधात्मक काळजी घेता येते.
२. तुम्ही पाणी भरपूर पिणे आणि
३. या लेखात दिलेली आहाराची पथ्ये पाळणे.

कानडाऊ योगेशु's picture

25 Apr 2018 - 4:58 pm | कानडाऊ योगेशु

घरी पालकांपैकी कोणाला असा त्रास झालेला आठवत नाही. पण मी मधुमेही आहे. त्याचा काही संबंध असू शकतो का?

कुमार१'s picture

25 Apr 2018 - 5:19 pm | कुमार१

लेखातील हे बघा:
गाऊट आणि अनुषंगिक आजार/strong> :
साधारणपणे चयापचयाच्या बिघाडातून जे आजार उद्भवतात (metabolic syndrome) त्यांच्या जोडीने गाऊट होण्याची शक्यता बऱ्यापैकी वाढते. हे आजार असे आहेत:
• उच्च रक्तदाब
• मधुमेह

एकदा आहार संबंधी लेख येऊ द्या की. >>>>>

‘आहार’ हा व्यापक, रंजक आणि घोळदार विषय आहे खरा. त्यातले संशोधनही सतत काहीतरी उलटसुलट सांगते. त्यामुळे सल्ला देणे हे डॉक्टरला आणि आचरणात आणणे हे रुग्णाला कठीण होत आहे.

हमारी मांगे मजदूरो की तरह बढती जा रही है! :) >>>>
तुमच्या मागण्यांवर जरूर विचार करणार. मात्र त्यासाठी एक पंचवार्षिक आराखडा तयार करावा लागेल !

लई भारी's picture

16 Apr 2018 - 10:59 am | लई भारी

धन्यवाद!

प्रकाश घाटपांडे's picture

17 Apr 2018 - 9:44 am | प्रकाश घाटपांडे

आहार’ हा व्यापक, रंजक आणि घोळदार विषय आहे खरा. त्यातले संशोधनही सतत काहीतरी उलटसुलट सांगते. त्यामुळे सल्ला देणे हे डॉक्टरला आणि आचरणात आणणे हे रुग्णाला कठीण होत आहे.

अगदी नेमक्या शब्दात सांगितले. रुग्णाला गिनी पिग करुन त्याला निरिक्षणा खाली ठेवून मग सल्ला देणे डॊक्टरला शक्य नसते. शिवाय एक काळी निर्विवाद असणार्‍या गोष्टी आज वादग्रस्त होत असतात. उदा. कोलेस्ट्रॉल व हृदयविकार याचा अतूट संबंध.

आतापर्यंत माझ्या दोन आरोग्य लेखमाला येथे संपन्न झाल्या आहेत. या दरम्यान अनेकांनी भावी लेखनासाठी काही विषय सुचवले आहेत. ,कुठल्याही लेखकासाठी ही एक प्रकारे वाचकांची दाद असते. त्याबद्दल सर्व सूचकांचे आभार !

आता माझी भूमिका विशद करतो. आज आधुनिक वैद्यकातील विशिष्ट + अतिविशिष्ट शाखांची संख्या ५० च्या पुढे गेली आहे. त्यामुळे कुठलाही एक तज्ञ या सर्व शाखांमध्ये लेखन-मुशाफिरी करू शकणार नाही.

मी लेखनासाठी असे विषय निवडतो की ज्यांत मी निव्वळ माहिती बरोबर माझ्या अनुभवाचे बोल लिहू शकतो. त्या विषयात थोडीफार गती असल्याने वाचक-प्रश्नांना आत्मविश्वासाने उत्तरे देऊ शकतो.

त्यामुळे वाचकांनी सुचवलेल्या प्रत्येक विषयावर स्वतंत्र लेख होईलच असे नाही. तरीसुद्धा त्यांच्या काही विशिष्ट शंकांना मी व्यनितून जरूर उत्तरे देईन.
लोभ असावा

लेखनशैली मस्त आहे. कोणत्या वर्गाच्या रोगाचे नाव काय ते उत्क्रांतीबद्दलचे तत्त्वज्ञान!

कुमार१'s picture

25 Apr 2018 - 6:48 pm | कुमार१

आभार! खरंय, तो भाग रंजक आहे.

टर्मीनेटर's picture

28 Jul 2019 - 12:33 pm | टर्मीनेटर

हा लेख कसाकाय वाचनातून निसटला होता हे कळत नाहीये.
नेहमीप्रमाणेच उत्तम माहितीपूर्ण लेख! धन्यवाद.

जॉनविक्क's picture

28 Jul 2019 - 2:09 pm | जॉनविक्क

2013 ते 2016 दरम्यान मी गाऊट व्याधी काय भयंकर त्रास देऊ शकते हे अनुभवले आहे अगदी सूज येऊन पाय फुटेल कि काय अश्या असह्य वेदना, कधी कधी दवाखान्यात पायाची सूज उतरेपर्यंत स्टॅन्डला तंगडे लावून फक्त पडून राहणे इतपत उपचार घ्यावे लागले, वेदनेने बेजार होऊन डोके कामच करणे बंद करते .

फक्त आणि फक्त आहार कमी करणे( ज्याची सुरुवात पोहे खाणे पूर्ण वर्ज्य) यावर हे नियंत्रित झाले व गेली काही वर्षे या आजाराने अजिबात अस्तित्व दाखवलेले नाही :) अर्थात काही महिने गोळ्याही घ्याव्या लागल्या परंतु खरा आराम आहार शैलीतील बदलानेच मिळाला.

लेख अतिशय नेमका आहे.

कुमार१'s picture

28 Jul 2019 - 2:31 pm | कुमार१

अभिप्रायाबद्दल धन्यवाद.

जॉन,
ते पोहे आणि गाऊट हा तुमचा अनुभव विस्मयकारक वाटला. काही स्पष्टीकरण तुम्ही वाचले असल्यास जरूर सांगा. माझ्या वाचनात नाही.

डॉक्टरांनी मला सुरुवात पोहे सोडण्यापासून करायला सांगितली मी रोज सकाळी आणि संध्याकाळी भरपेट पोहे खातो असे सांगितल्यावर मला पोहे पूर्णपणे वर्ज्य करायचा सल्ला दिला गेला.

बाकी,
पायात सूज येऊन वेदनाच अशा होत असत कि अशक्तपणा, कधी कधी चक्करही येत आहे असे वाटे. विश्रांतीसाठी झोपी जावे आणि ठणकणारा पायाने झोप उतरवावी असे हि घडतं होतं. कोणतीही शारीरिक धडपड घडत नसताना अचानक सुजून टम्म फुगणारे पाय बघून मनशांती पूर्ण नाहीशी झाली होती.

पोहे सोडले तसेच संध्याकाळच्या जेवणा ऐवजी कोशिंबीरी खाणे, अथवा भूक फारच असेल तर घरात बनवलेले तांदळाचे शाकाहारी मोमो खाणे यामुळे माझी पचनसंस्था नियमित झाली व हळू हळू त्रासही होणे थांबले.

जालिम लोशन's picture

28 Jul 2019 - 3:34 pm | जालिम लोशन

उद्बोधक लेख

कुमार१'s picture

28 Jul 2019 - 3:38 pm | कुमार१

जालो,धन्यवाद.

जॉन,
तांदळाचे शाकाहारी मोमो >>>
हे काय असते सांगता का ?

जॉनविक्क's picture

28 Jul 2019 - 4:19 pm | जॉनविक्क

शाकाहारी मोमो

म्हणजे व्हेज मोमो. बाहेर हे मैद्याच्या पीठाने बनवलेले मिळतात पण आपण मैद्या ऐवजी तांदळाचे पीठ वापरायचे.

मोमो म्हणजे एक प्रकारचे भाजीपाला वापरून तयार केलेले उकडीचे मोदक होय.

जॉनविक्क's picture

28 Jul 2019 - 4:24 pm | जॉनविक्क

नुसत्या उकडलेल्या भाज्या बरेचदा बेचव वाटतात तसेच जेवण केल्याचे मानसिक समाधानही त्या खाऊन मिळत नाही, अशावेळी व्हेज मोमो हा एक रुचकर ओपशन असतो. शेजवान चटणी सोबत चवदारहि लागतो व आरोग्यदायी सुद्धा.

Veg momo recipe गुगल केल्यास बरेच रिजल्ट येतील

जर पोहे वर्ज तर तांदुळाचे पीठ कसे चालेल?

कुमार१'s picture

30 May 2023 - 12:32 pm | कुमार१

मला देखील आहारतज्ञाकडून जाणून घ्यायला आवडेल.

चाणक्य's picture

28 Jul 2019 - 4:30 pm | चाणक्य

तुमची 'विषय सोपा करून सांगण्याची' हातोटी कमाल आहे. तुमचे लेख म्हणजे पर्वणी असते.

मूकवाचक's picture

30 May 2023 - 1:16 pm | मूकवाचक

+१

कुमार१'s picture

28 Jul 2019 - 4:59 pm | कुमार१

जॉन,
उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद. कधीतरी खाऊन बघेन !

चाणक्य,
धन्यवाद. बरेच दिवसांनी तुमची भेट झाली.

सिरुसेरि's picture

29 May 2023 - 6:53 pm | सिरुसेरि

गाऊट वरील उपचारासंदर्भात तुनळीवर खालील माहिती सापडली .

https://www.youtube.com/watch?v=CzxCa3Rsom4

https://www.youtube.com/shorts/fzI0ttU7poU

कुमार१'s picture

29 May 2023 - 8:10 pm | कुमार१

अच्छा.
सवडीने पाहतो

चौकस२१२'s picture

30 May 2023 - 12:11 pm | चौकस२१२

अतिरिक्त मद्यपान = गाऊट
हे सगळ्याच प्रकारच्या मद्यपानामुळे होते कि तांबड्या वारुणी मुळे जास्त?

कुमार१'s picture

30 May 2023 - 12:30 pm | कुमार१

मुळात तसे समीकरण मानू नये.
दीर्घकाळ अति प्रमाणात केलेले मद्यपान काही रुग्णांमध्ये कारणीभूत ठरते.
मद्यामध्ये क्रम लावायचा झाल्यास तो असा आहे :

beer > hard liquor > तांबडी वारुणी