Dead Man's Hand - 1

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
2 Apr 2018 - 8:06 pm

पहाटे दोनचा सुमार ....

पश्चिम क्षितिजापर्यंत अथांग पसरलेला अरबी समुद्र ....
भर समुद्रात दूर अंतरावर असलेल्या जहाजांवरचे ठिपक्यांसारखे दिसणारे दिवे ....
किनार्‍यावर आदळणार्‍या लाटांचा आवाज सोडला तर वातावरणात नीरव शांतता ....
अमावस्येची रात्रं असल्याने डोळ्यात बोट घातलं तरी दिसणार नाही असा गडद अंधार ....
रस्त्याच्या कडेल उभी असलेली त्याच अंधारात सहज मिसळून गेलेली काळ्या रंगाची कार ....

"एकदा बाहेर चेक करा, आसपास कोणी दिसत तर नाही..."

कारमध्ये ड्रायव्हरच्या शेजारच्या सीटवर बसलेला माणूस म्हणाला. तो बहुतेक सर्वांचा प्रमुख असावा. मागे बसलेल्यांपैकी एकजण खाली उतरला आणि आजूबाजूला पाहून पाच मिनिटांनी परत आला. काळ्याकुट्टं अंधारात समोर उभा असलेला माणूस दिसणंही अशक्यं असताना त्याने काय पाहिलं होतं कोणास ठाऊक!

"गुड! चला! घ्या बाहेर!"

सर्वजण कारमधून खाली उतरले. मागच्या सीटवरुन अर्धमेल्या अवस्थेतला एक देह त्यांनी बाहेर खेचला. ती सुमारे पंचवीशीची एक तरुणी होती. तिची अवस्था इतकी वाईट होती की तिला धड स्वत:च्या पायावरही उभं राहता येत नव्हतं. एक सणसणीत शिवी हासडून दोघांनी सरळ हातपाय धरुन तिला उचललं आणि अगदी बारीक उजेड देणार्‍या टॉर्चच्या प्रकाशात ते रस्त्याचा उतार उतरुन समुद्रकिनार्‍यावर आले. कारपासून सुमारे दहा मिनिटं चालल्यावर प्रमुखाने त्यांना थांबण्याची सूचना केली. त्यासरशी त्या अर्धमेल्या तरुणीला त्यांनी सरळ वाळूत आदळलं. एकदा चौफेर नजर फिरवून त्याने इतरांना खूण केली आणि तो दोन पावलं मागे झाला. इतरांपैकी दोघांनी तिचे दोन्ही पाय दाबून धरले. एकाने हाताभोवती गुंडाळलेला जाड दोर काढला आणि त्याचा फास तयार करुन तिच्या गळ्यात अडकवला. दुसर्‍याने दोराचं दुसरं टोक हातात धरताच दोघांनी पूर्ण ताकदीनिशी एकाचवेळी दोर ओढला....

आधीच गलितगात्रं झालेल्या त्या दुर्दैवी तरुणीच्या देहात कोणताही प्रतिकार करण्याची ताकद नव्हती. अवघ्या पाच मिनिटांत टाचा घासत एक आचका देत तिने डोळे मिटले.

ती मरण पावल्याची खात्री होताच टॉर्चच्या बारीक प्रकाशात आपली कोणतीही वस्तू तिथे पडलेली नाही याची प्रत्येकाने खात्री करुन घेतली. ज्या दोराने तिचा गळा आवळण्यात आला होता, ती दोर सोडवून घेत एकवार त्यांनी चौफेर नजर फिरवली आणि शक्यं तितक्या घाईघाईने रोडवर उभी असलेली आपली कार गाठली. सर्वजण कारमध्ये बसताच तो परिसर मागे टाकत कार रस्त्याला लागली.

******

"हॅलो! आगाशी पोलिस स्टेशन, सब इन्स्पेक्टर ढाणे बोलतोय..."

"सर, मी ग्रीनलँड रिसॉर्टचा मॅनेजर देवेश सुराणा बोलतो आहे. आमच्या रिसॉर्टच्या पुढे असलेल्या नवापूर बीचवर आमच्या एका कस्टमरला एक डेडबॉडी आढळली आहे. तुम्ही लवकर इथे या सर!"

"डेडबॉडी?" ढाणे काहीसे गडबडलेच. पण लगेच स्वत:ला सावरत म्हणाले, "ठीक आहे! सुराणा, आम्ही तिथे येईपर्यंत कोणीही बॉडीला हात लावू नका. तसंच ज्यांनी बॉडी पाहीली आहे त्यांनाही तिथेच थांबवून ठेवा."

"ओके सर!"

दहा मिनीटांतच इन्स्पेक्टर देवरे, सब् इन्स्पेक्टर ढाणे आणि चार शिपायांसह सायरनचा आवाज करत पोलीस जीप ग्रीनलँड रिसॉर्ट समोर उभी राहिली. पोलिस आलेले पाहताच मॅनेजर पुढे आला.

"सुराणा..?" इन्स्पे. देवरेंनी विचारलं.

"येस सर! मीच तुम्हाला फोन केला होता सर...."

"बोला सुराणा, काय झालं? कुठे आहे बॉडी? कोणी पाहिली?" देवरेंनी प्रश्नांची सरबत्ती केली.

"गुड मॉर्निंग सर!" सुमारे तिशीचा एक तरुण पुढे आला, "मी डॉ. निमेश दोशी आणि ही माझी मिसेस सेजल. आज सकाळी ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही बीचवर चक्कर मारण्यासाठी गेलो असताना आम्हाला त्या मुलीची बॉडी दिसली सर. बिईंग अ डॉक्टर मी पल्स चेक केली, पण तिला मरुन किमान आठ-दहा तस होऊन गेले होते. मग आम्ही इथे परत आलो आणि तुम्हाला इन्फॉर्म केलं."

"ठीक आहे. डॉ. दोशी, तुम्ही आमच्याबरोबर चला आणि आम्हाला बॉडी दाखवा. सुराणा, तुमच्या सगळ्या गेस्ट्सना घेऊन तुम्ही बीचवर या. कदाचित ती मुलगी तुमच्या गेस्ट्सपैकी असण्याची शक्यता आहे. आणखीन एक, जोपर्यंत आमची इन्क्वायरी पूर्ण होत नाही, तो पर्यंत एकही गेस्ट चेकआऊट होता कामा नये. चला दोशी!

निमेश आणि सेजल, देवरे, ढाणे आणि दोन शिपायांसह रिसॉर्टमधून बाहेर पडले. सुराणाला सूचना दिलेली असूनही कोणीही रिसॉर्ट सोडून जावू नये म्हणून आपले दोन शिपाई तिथे थांबवून ठेवण्याची देवर्‍यांनी खबरदारी घेतली होती. रिसॉर्टमधून बाहेर पडून त्यांनी समुद्रकिनारा गाठला आणि पंधरा-वीस मिनीटांची पायपीट केल्यावर अखेर सर्वजण त्या जागी येऊन पोहोचले.

देवरेंनी त्या मृतदेहाचं निरीक्षण करण्यास सुरवात केली. ती सुमारे २४ - २५ वर्षांची तरुणी असावी. निळी जीन्स आणि गुलाबी रंगाचा टॉप तिच्या देहावर होता. पायात हाय हिल्सचे सँडल्स होते. मनगटावर घड्याळ होतं. तिच्या एकंदर पेहरावावरुन ती सधन घरातली असावी असा अंदाज येत होता. पण ही तरुणी होती कोण आणि इथे आली कशी? आणि हिचा मृत्यू इथेच झाला की दुसरीकडे? दुसरीकडे झाला असल्यास हिचा मृतदेह इथे कोणी आणून टाकला?

"डॉ. दोशी, तुम्ही बॉडी पाहिलीत तेव्हा अशीच उताणी पडलेली होती?

"येस! आम्ही गप्पा मारत वॉक घेत असताना अचानक ही मुलगी इथे पडलेली दिसली. आम्ही तिला आवाज दिला, पण अर्थातच तिने काही रिस्पॉन्स दिला नाही. त्यानंतर मी तिची पल्स आणि हार्टबीट्स चेक केले, बट शी वॉज ऑलरेडी डेड!"

"हं..." देवरे विचार करत म्हणाले, "बॉडीजवळ तुम्हाला आणखीन काही आढळलं? एखादी पर्स किंवा बॅग वगैरे?"

"नो सर, बट मी जे पाहिलं त्यावरुन या मुलीचा खून झाला असावा असा माझा अंदाज आहे!"

"कशावरुन?" देवरेंनी निमेशकडे रोखून पाहत प्रश्नं केला.

"तिच्या मानेभोवती काळानिळा डाग आणि गळा आवळल्याच्या खुणा आढळल्या आहेत. तिची पल्स चेक करताना मी ती पाहिली. आणखीन एक म्हणजे या मुलीला टॉर्चर करण्यात आलं असावं कारण तिच्या हातावर चटके दिल्याच्या खुणा आढळल्या आहेत!"

"हरामखोर भोसडीचा! फक्तं हातात सापडू देत, नाही घोडा लावला तर...." देवरेंनी सणसणीत शिवी हासडली, मग एकदम जीभ चावत म्हणाले "सॉरी डॉक्टर! ढाणे, डॉक्टरांचं आणि मॅडमचं स्टेटमेंट लिहून घ्या. डॉक्टर, तुमचा पत्ता आणि फोन नंबर यांच्याकडे लिहून द्या. कदाचित तुम्हाला पुन्हा चौकशीला यावं लागेल."

एव्हाना पोलिस फोटोग्राफर आणि फिंगर प्रिंट एक्स्पर्ट्स तिथे येऊन पोहोचले होते आणि त्यांनी आपलं काम सुरु केलं होतं. त्या मुलीच्या मृतदेहाचे फोटो काढणं, फिंगर प्रिंट्स घेणं वगैरे कामं सुरु असतानाच रिसॉर्टमध्ये उतरलेल्या इतर लोकांसह मॅनेजर सुराणा तिथे पोहोचला. देवरेंनी प्रत्येकाला एकेक करुन त्या मुलीचा मृतदेह दाखवला. त्या दुर्दैवी मुलीचा मृतदेह पाहताना सगळेच हादरलेले होते. सुट्टीसाठी आलेलो असताना अशा प्रसंगाला सामोरं जावं लागेल अशी कोणाला स्वप्नातही शंका आली नसती. इतक्या कमी वयात तिला आलेल्या मृत्यूबद्दल सर्वजण हळहळत होते. रिसॉर्टमधल्या सर्व स्टाफलाही तिचा मृतदेह दाखवण्यात आला, परंतु ती मुलगी कोण होती याबद्दल कोणालाही काहीही कल्पना नव्हती.

आपल्या सहकार्‍यांना आवश्यक त्या सूचना देऊन देवरे रिसॉर्टवर आले. सुराणासह रिसॉर्टच्या सगळ्या स्टाफकडे आणि रिसॉर्टमध्ये उतरलेल्या लोकांकडे त्यांनी तपशीलवार चौकशी केली, परंतु कोणीही त्या तरुणीला ओळखत नव्हतं. देवरेंनी रिसॉर्टच्या वॉचमनलाही धारेवर धरलं, पण आपण त्या तरुणीला किंवा इतर कोणालाही रात्री बीचवर जाताना किंवा बीचकडून येताना पाहिलेलं नाही यावर वॉचमन ठाम होता.

देवरे आपल्या पोलिस स्टेशनमध्ये परतले तेव्हा दुपारचे चार वाजून गेले होते. सब् इन्स्पेक्टर ढाणे त्यांची वाटच पाहत होते. देवरेंच्या सूचनेनुसार त्यांनी नवापूर समुद्रकिनार्‍याच्या परिसरातील इतर रिसॉर्ट्समध्येही त्या तरुणीचा फोटो दाखवून चौकशी केली होती, पण तिला कोणीही ओळखलं नव्हतं. पण नवापूर बीचच्या दुसर्‍या टोकापासून जवळ असलेल्या क्षितीज रिसॉर्टच्या वॉचमनकडून ढाणेंना एक महत्वाची माहिती मिळाली होती. देवरे येताच त्यांना थोडक्यात माहिती देऊन त्यांनी त्या वॉचमनला त्यांच्यासमोर उभं केलं.

"बोल शिवराम! काल रात्री काय झालं?"

"साहेब, रात्री दोनचा सुमार होता. मी गेटजवळ माझ्या चौकीत बसलो होतो. दर्यावरुन येणार्‍या वार्‍यामुळे डोळ्यावर थोडी पेंग येत होती. त्याचवेळी एक कार भरधाव वेगाने दर्याकडे गेली आणि राजोडीच्या बाजूला वळून दिसेनाशी झाली. त्यावेळी मी फारसं लक्षं दिलं नाही साहेब, पण पुन्हा तासाभराने एक कार उलट दिशेने आली सुसाट वेगाने माझ्यासमोरुन गेली. ती बहुतेक आधीचीच गाडी असावी साहेब."

"गाडी कशी होती? कोणत्या रंगाची गाडी होती? तू नंबर पाहिलास?"

"मोठी गाडी होती साहेब. काळ्या रंगाची असावी साहेब, पण नक्की सांगता येणार नाही. दोन्ही वेळेला गाडी इतकी वेगात माझ्यासमोरुन गेली की काही ध्यानात येण्यापूर्वीच ती दिसेनाशी झाली होती. नंबर पाहण्याला वेळच मिळाला नाही."

देवरेंनी शिवरामला आणखीन बरेच प्रश्नं विचारले, पण त्याच्याकडून त्यांना आणखीन काहीच माहिती मिळाली नाही. त्याला पाठवून दिल्यावर देवरेंनी पुन्हा एकदा सर्वांचे जाब-जबाब शांतपणे वाचून काढले, पण त्यातूनही काहीही क्लू मिळत नव्हता. तिचा गळा दाबून तिला मारण्यात आलं होतं हा डॉ. निमेश दोशीने व्यक्तं केलेला अंदाज अर्थातच खरा ठरला होता. तिची हत्या करण्यापूर्वी तिचे हाल करण्यात आले होते असं डॉ. सानपना प्राथमिक तपासणीत आढळलं होतं, पण पोस्टमॉर्टेम रिपोर्ट आल्यानंतरच सर्वकाही स्पष्टं होणार होतं. सर्वात महत्वाचा म्हणजे तिची ओळख पटणं अत्यावश्यक होतं, कारण त्याखेरीज पुढील तपासाची दिशा ठरवता येणार नव्हती.

इन्स्पे. देवरेंच्या समोर आता अनेक प्रश्नं उभे होते....

ही तरुणी कोण होती? कुठे राहणारी होती? वसई - विरार परिसरातली होती का बाहेरुन आली होती?
ही तरुणी नवापूर बीचवर कशी आली? कोणाबरोबर?
स्वत:हून आली होती का खुनाच्या उद्देशाने जबरद्स्तीने तिला इथे आणण्यात आलं होतं?
तिचा खून नेमका कधी करण्यात आला? आणि कुठे?
खून बीचवरच करण्यात आला का इतरत्र खून करुन बॉडी इथे आणून टाकण्यात आली?
खुनामागचं कारण नेमकं काय असावं? प्रेमप्रकरण? प्रॉपर्टीचा वाद? की आणखीन काही?

******

त्या अज्ञात तरुणीचा मृतदेह आढळून आल्याला चार दिवस उलटले होते....

देवरे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी नवापूर समुद्रकिनारा उभा-आडवा चाळून काढला होता. इतकंच नव्हे तर पार चिखल डोंगरी - अर्नाळ्यापासून ते पार भुईगाव पर्यंतच्या परिसरात असलेलं एकूण एक गेस्ट हाऊस, हॉटेल आणि रिसॉर्ट, राहण्याची आणि जेवणाची सोय असलेल्या घरगुती खानावळीही त्यांनी पिंजून काढल्या होत्या. कुठेतरी - कोणीतरी या तरुणीला पाहिलं असेल, तिची ओळख पटवणारा एखादातरी धागा मिळेल अशी देवरेंची अपेक्षा होती , पण त्यांची ही आशा धुळीला मिळाली. कदाचित ही मुलगी ट्रेन किंवा बसने तिथे आली असण्याची शक्यता ध्यानात घेऊन त्यांनी विरार रेल्वे स्टेशन, अर्नाळा एस टी स्टँड इतकंच नव्हे तर प्रायव्हेट बसेस आणि टॅक्सीवाल्यांकडेही चौकशीचं सत्रं आरंभलं होतं, परंतु त्यातूनही काही निष्पन्न झालं नव्हतं. शिवरामने पाहिलेल्या काळ्या गाडीतूनच त्या तरुणीचा मृतदेह बीचवर टाकण्यात आला असावा अशी देवरेंची पक्की खात्री होती, परंतु जंगजंग पछाडूनही त्या गाडीबद्दलही काहीही माहिती मिळत नव्हती. हवेत विरुन जावी तशी ती गाडी अदृष्यं झाली होती.

पोलिस सर्जन डॉ. सानपांच्या पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून तर देवरेंच्या हाती काहीच लागलं नव्हतं, उलट त्यांच्यासमोरच्या अडचणीत भरच पडली होती. पोस्टमॉर्टेम रिपोर्टनुसार त्या तरुणीचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. ज्या दिवशी तिचा मृतदेह आढळला होता त्याच्या आदल्या रात्री किमान एक वाजेपर्यंत जिवंत होती. अत्यंत हालहाल करुन तिचा जीव घेण्यात आला होता. तिच्या हातापायांवर आणि मांड्यांवर सिगारेटचे चटके देण्यात आले होते. तिला जबरदस्तं मारहाण करण्यात आली असावी कारण तिच्या संपूर्ण देहावर किमान पंचवीस ते तीस ठिकाणी फ्रॅक्चर्स दिसून आली होती. तिच्या पोटात अन्नाचा एक कणही आढळला नव्हता. मृत्यूपूर्वी किमान छत्तीस तासांत तिने काहीही खाल्लेलं नव्हतं. सर्वात धक्कादायक म्हणजे या छत्तीस तासांत उपाशीपोटी दोन ते तीन वेळा तिच्यावर अमानुष बलात्कार करण्यात आला होता.

चार दिवसांपासून सतत धावपळ करुन देवरे पार थकून गेले होते, पण तपास इंचभरही पुढे सरकलेला नव्हता. त्यातच वरिष्ठ अधिकारी आणि मिडीयाच्या प्रश्नांच्या सरबत्तीला तोंड द्यावं लागत होतं ते वेगळंच! केवळ 'तपास चालू आहे' या पलिकडे त्यांच्यापाशी काहिही उत्तर नव्हतं. एसीपी साहेबांच्या तोफखान्याला पुन्हा एकदा तोंड देऊन ते आपल्या केबिनमध्ये आले तेव्हा त्यांच्या डोक्याचा पार भुगा झाला होता.

"जयहिंद सर!" देवरेंच्या पाठोपाठ केबिनमध्ये शिरलेल्या सब् इन्स्पे. ढाणेंनी सॅल्यूट ठोकला.

"जयहिंद! बोला ढाणे. काही पत्ता लागला?"

ढाणेंनी काही न बोलता हातातला कागद आणि एक फोटो त्यांच्यासमोर ठेवला. देवरेंनी त्या कागदावर नजर टाकली आणि एका क्षणात त्यांच्या थकवा कुठल्याकुठे पळाला. उच्चभ्रू आणि सधन घरातली ही तरुणी मुंबई - नवी मुंबई किंवा ठाणे या परिसरातलीच असावी अशी त्यांना दाट शक्यता वाटत होती. त्या दृष्टीने प्रयत्नात कसूर राहू नये म्हणून त्या तरुणीचं वर्णन आणि तिच्या मृतदेहाचे फोटो त्यांनी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातल्या सर्व पोलिस स्टेशन्सना पाठवले होते. गेल्या चार दिवसांपासून अखंड सुरु असलेल्या धावपळीत ही गोष्ट ते पार विसरुन गेले होते. अथक परिश्रम करुनही आतापर्यंत त्यांच्या हाती काही लागलं नवह्तं, पण आता मात्रं आशेचा किरण दिसू लागला होता....

मुंबईतल्या घाटकोपर पोलिस स्टेशनवर सुनेहा त्रिवेदी नावाच्या तरुणीची 'मिसिंग' कंप्लेंट नोंदवण्यात आलेली होती. इन्स्पे. देवरेंनी पाठवलेला मेसेज आणि मृतदेहाच्या फोटोंवरुन नवापूर समुद्रकिनार्‍यावर आढळलेला मृतदेह या सुनेहा त्रिवेदीचाच असावा अशी घाटकोपरच्या इन्स्पे. भोसलेंची खात्री पटली होती. सुनेहाच्या बाबतीत नक्की काय झालं आहे याची कोणतीही कल्पना न देता तिचा केवळ अ‍ॅक्सीडेंट झाला आहे असं सांगून इन्स्पे. भोसलेंनी त्यांना आगाशी पोलिस स्टेशनला पाठवलं होतं.

ढाणेंनी समोर ठेवलेल्या सुनेहा त्रिवेदीचा फोटो आणि नवापूर बीचवर सापडलेल्या त्या अज्ञात तरुणीच्या मृतदेहाच्या फोटोचं काळजीपूर्वक निरीक्षण करुन देवरेंनी ते बाजूला ठेवले. समोरच्या ग्लासमधलं पाणी पिऊन एक दीर्घ नि:श्वास सोडला आणि ढाणेंकडे पाहून होकारार्थी मान हलवली. तो मृतदेह सुनेहाचाच होता यात कोणतीच शंका नव्हती.

"आपल्या पेशातलं सर्वात वाईट काम म्हणजे आई-वडिलांना तरुण मुला-मुलीच्या मृत्यूची बातमी देणं! अर्थात आपलाही नाईलाज आहे! बोलवा त्यांना आत!"

काही वेळातच ढाणे एका मध्यमवयीन जोडप्यासह देवरेंच्या केबिनमध्ये आले. त्यांना आपल्यासमोरच्या खुर्चीत बसण्याची खूण करत देवरेंनी एका शिपायाला चहा आणण्याची सूचना दिली आणि ते त्या दोघांकडे वळले.

"बोला साहेब, काय झालं?"

"सर, मी घाटकोपर पोलिस स्टेशनला कंप्लेंट केली होती. माझी मुलगी सुनेहा बेपत्ता आहे. आज घाटकोपर पोलिसांचा मला फोन आला होता. त्यांनी आम्हाला इथे पाठवलं. सुनेहा कशी आहे सर? कुठे आहे?"

"अं... ती हॉस्पिटलमध्ये आहे. तिचा छोटासा अ‍ॅक्सीडेंट झाला आहे!" देवरे सावकाशपणे म्हणाले, "पण सध्या तिला कोणालाही भेटण्यास डॉक्टरांची परमिशन नाही. मला सांगा सुनेहा बेपत्ता झाली होती म्हणजे नेमकं काय झालं होतं?"

"माझं नाव हसमुखलाल त्रिवेदी. घाटकोपरला एलबीएस रोडला माझं स्टेशनरीचं मोठं दुकान आहे. माझा मोठा मुलगा महेश फार्मसिस्ट आहे. त्याचं स्वत:चं मेडीकल शॉप आहे. धाकटी मुलगी सुनेहा नरीमन पॉईंटला एका ऑफीसमध्ये अकौंटंट आहे. एक आठवड्यापूर्वी ती तिच्या कॉलेजच्या ग्रूपबरोबर गोव्याला पिकनिकसाठी म्हणून गेली होती. तिच्या ग्रूपमधल्या एका मुलीचं गोव्याला घर आहे तिथे खास ख्रिसमससाठी म्हणून सर्वजण गेले होते. काल दुपारपर्यंत ते सर्वजण परत येणार होते. पण संध्याकाळी चार वाजता तिची बेस्ट फ्रेंड प्रिया तिची बॅग देण्यासाठी घरी आली. सुनेहा चार दिवसांपूर्वीच मुंबईला आल्याचं तिने सांगितल्यावर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेट केली. साहेब, सुनेहाला आम्ही कधी भेटू शकतो?" त्रिवेदींनी अधीरपणे विचारलं.

"सुनेहा गोव्याला कधी गेली? किती तारखेला?"

"२३ डिसेंबरला सर! त्या दिवशी सकाळी ते सर्वजण इथून निघाले होते. संध्याकाळी सातच्या सुमाराला मला तिचा गोव्याला पोहोचल्याचा मेसेजही आला होता!"

"तिचा ग्रूप काल परत आला, पण सुनेहा त्यांच्याबरोबर नव्हती... मग ती गोव्याहून निघाली कधी?"

"प्रियाकडून आम्हाला कळलं की सुनेहाला २४ तारखेच्या रात्री उशिरा मुंबईहून एक फोन आला होता. त्या फोननंतर ती खूप अपसेट झाली होती आणि
२५ तारखेला सकाळच्या एक्सप्रेसने ती एकटीच मुंबईला येण्यासाठी निघाली."

"तुमचं तिच्याशी शेवटचं बोलणं कधी झालं होतं?"

"२५ तारखेला सकाळी तिचा फोन आला होता!" मिसेस त्रिवेदी म्हणाल्या, "परंतु तेव्हा ती मुंबईला वगैरे येणार असल्याबद्दल काहीही बोलली नाही."

"त्यानंतर तिचा काही मेसेज आला?"

"२७ तारखेला दुपारी तिचा शेवटचा मेसेज आला होता. तिच्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला होता. आपण मजेत असून २९ तारखेला दुपारपर्यंत मुंबईला परत येत असल्याचंही तिने मेसेजमध्ये म्हटलं होतं, म्हणून आम्ही फारशी काळजी केली नाही. अनफॉर्चुनेटली तिच्या कोणत्याही मित्रं-मैत्रिणीचा नंबर आमच्याकडे नव्हता त्यामुळे आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करु शकत नव्हतो. काल प्रियाचा घरी आली तेव्हा सुनेहा चार दिवसांपूर्वीच मुंबईला आल्याचं आम्हाला कळलं."

"२७ तारखेला दुपारी...." सूचक नजरेने ढाणेंकडे पाहत देवरे सावकाशपणे मराहीले, "त्रिवेदी, आम्हाला या प्रियाचा पत्ता लिहून द्या जरा! आम्हाला तिला काही प्रश्नं विचारायचे आहेत."

त्रिवेदींनी एका कागदावर प्रियाचा पत्ता आणि फोन नंबर लिहून दिला. सुनेहा गायब असल्याचं कळल्यावर तिनेच आपला नंबर त्यांच्याजवळ दिला होता. पत्ता लिहीलेला कागद देवरेंनी ढाणेंच्या हाती दिला तसे ते केबिनमधून बाहेर पडले. ते बाहेर पडल्यावर देवरेही उठून उभे राहीले आणि अगदी सहज स्वरात म्हणाले,

"चला त्रिवेदी! हॉस्पिटलमध्ये चक्कर मारुन येऊ!"

******

दुसर्‍या दिवशी दुपारी इन्स्पे. देवरे ढाणेंबरोबर आपल्या केबिनमध्ये बसले होते. चार दिवसांनी का होईना मृत तरुणीची ओळख पटली होती, त्यामुळे आता निश्चितच या प्रकरणाचा उलगडा होईल याची त्यांना खात्री वाटत होती. आदल्या दिवशी देवरे हॉस्पिटलमध्ये गेल्यावर ढाणेंनी प्रियाला फोन करुन तिला आगाशी पोलीस स्टेशनवर येण्याची सूचना दिली होती. सुनेहाच्या बाबतीत नेमका कोणता प्रकार झाला आहे हे मात्रं त्यांनी प्रियाला सांगितलं नव्हतं. हॉस्पिटलमध्ये सुनेहाच्या मृत्यूची बातमी कळल्यावर त्रिवेदी पती-पत्नीच्या शोकाला पारावार उरला नव्हता. हॉस्पिटलची सर्व औपचारीकता पूर्ण करुन देवरेंनी सुनेहाचा मृतदेह त्रिवेदी पती-पत्नीच्या स्वाधीन केला होता आणि पोलिस हर्समधून आपल्या शिपायांसह त्यांना घाटकोपरला पाठवून दिलं होतं. या प्रकरणात आता पुढची स्टेप काय घ्यावी याबद्दल देवरे आणि ढाणेंची चर्चा सुरु होती.

"या सगळ्या प्रकरणाला २३ डिसेंबरपासून सुरवात झालेली आहे. सुनेहा २३ डिसेंबरला संध्याकाळी गोव्याला पोहोचते. २४ तारखेच्या रात्री तिला एक फोन येतो. त्या फोनमुळे ती दुसर्‍या दिवशी - २५ तारखेला सकाळी ट्रेनने मुंबईला येण्यास निघते. आणि थेट २७ च्या सकाळी आपल्याला तिची बॉडी सापडते. पोस्टमॉर्टेम रिपोर्टप्रमाणे २६ तारखेला रात्री एक वाजल्यानंतर तिचा खून करण्यात आला. २५ तारखेला रात्री ती मुंबईला पोहोचली असं गृहीत धरलं तरी तिचा खून करण्यापूर्वी २५ ची रात्रं आणि २६ तारखेला दिवसभर तिला टॉर्चर करुन तिच्यावर रेप करण्यात आला आहे. आता एकूण दोन प्रश्नं उपस्थित होतात ते म्हणजे २४ तारखेला सुनेहाला गोव्याला फोन कोणी केला? आणि २५ तारखेला मुंबईत परतल्यावर ती कोणाला भेटली? या दोन व्यक्ती वेगवेगळ्या आहेत की एकच आहे? माझ्या अंदाजाप्रमाणे ही एकच व्यक्ती असावी!"

"हो सर! सुनेहा आणि त्रिवेदी पती-पत्नी यांच्यातलं संभाषणही ती २५ तारखेला गोव्याहून निघेपर्यंत काही प्रॉब्लेम नव्हता हेच दर्शवतं. त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट झाला तो मात्रं केवळ मेसेजवरच. कारण सुनेहा बोलण्याच्या अवस्थेत नसणार!"

"किंवा तिला बोलू दिलं गेलं नसणार! सर्वात महत्वाची गोष्टं म्हणजे २७ तारखेला सुनेहाची हत्या झाल्यानंतरही दुपारी तिच्या फोनवरुन त्रिवेदींना मेसेज गेला आहे. सुनेहा गायब झाल्याची ताबडतोब बोंबाबोंब होवू नये या हेतूने तिच्या खुन्यानेच हा मेसेज केला असणार. परंतु नंतर...."

"जयहिंद!" हेड कॉन्स्टेबलनी आत येत दोघांना सॅल्यूट ठोकला, "बाहेर एक मुलगी आली आहे साहेब. आपण तिला भेटायला बोलावलं होतं असं तिचं म्हणणं आहे. प्रिया मल्होत्रा. "

"प्रिया आली? व्हेरी गुड! पाठवून द्या तिला आत!"

मिनीटभरातच प्रिया आणि तिचे आई - वडील देवरेंच्या केबिनमध्ये आले. प्रियाच्या चेहर्‍यावरुन तिला सुनेहाच्या मृत्यूचा जबरदस्तं मानसिक धक्का बसल्याचं जाणवत होतं. देवरेंना क्षणभर वाईट वाटलं. पण त्यांचा नाईलाज होता. सुनेहाच्या खुनाचा तपास लावण्याच्या दृष्टीने प्रियाचा जवाब अत्यंत महत्वाचा होता.

"प्रिया... " शक्य तितक्या हळुवारपणे देवरेंनी सुरवात केली, "सुनेहाच्या बाबतीत जे काही झालं त्याबद्दल आपण काहीही करु शकत नाही. तिच्या अशा अचानक मृत्यूमुळे तुला किती शॉक बसला असेल याची आम्ही केवळ कल्पनाच करु शकतो. ती तुझी सर्वात जवळची मैत्रिण होती. तिच्या जाण्याने तू काय गमावलं आहेस याची आम्ही कल्पनाही करु शकत नाही. पण... पण तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला आणि त्याला कोण कारणीभूत आहे हे शोधून काढणं आवश्यक आहे. या कामात आम्हाला तुझी मदत हवी आहे. त्यामुळे त्या दृष्टीने मला थोडीशी माहिती देऊ शकशील?"

"येस सर!"

"गुड! मला सांग, गोव्याला तुम्ही कितीजण गेला होतात?"

"आम्ही सहाजणी होतो सर! आमच्या गृपमधल्या अ‍ॅनाचं गोव्याला घर आहे. तिच्या घरी आम्ही सर्वजण गेलो होतो. अ‍ॅना, रित्वी, वरदा, साक्षी , नेहा.. आय मिन सुनेहा आणि मी. गेल्या फ्रायडेला... २३ डिसेंबर - सकाळी ट्रेनने मुंबईहून निघालो आणि दुपारी पोहोचलो. अ‍ॅनाचे आजोबा आम्हाला घ्यायला स्टेशनवर आले होते."

"स्टेशन... कोणत्या स्टेशनवर उतरलात तुम्ही?'

"मडगाव सर! त्या दिवशी संध्याकाळी आम्ही बीचवर गेलो. दुसरा दिवसभर गोव्यातच भटकत होतो. त्या दिवशी ख्रिसमस इव्ह अस्ल्याने अ‍ॅनाच्या फॅमिलीबरोबर आम्ही चर्चमध्ये गेलो होतो. आम्ही चर्चमध्ये असतानाच नेहाच्या मोबाईलवर एक फोन आला आणि ती फोनवर बोलत बाहेर निघून गेली. पाच-दहा मिनीटांनी ती परत आली तेव्हा तिचा मूड एकदम ऑफ होता."

"फोन? कोणाचा फोन होता?"

"नो आयडीया सर...." प्रिया विचार करत म्हणाली, "पण त्या फोननंतर नेहा खूप टेन्स होती. मी तिला त्याबद्दल विचारलंही, पण तिने काहीच सांगितलं नाही. पण घरी परत आल्यावर मात्रं अत्यंत अर्जंट कारण असल्यामुळे आपण सकाळीच पुन्हा मुंबईला परत जाणार असल्याचं ती म्हणाल्यावर मात्रं आम्हाला सगळ्यांनाच शॉक बसला. आम्ही तिला खूप समजावलं, पण ती कोणाचंही काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती. सकाळी लवकर एकटीच ती ट्रेनने मुंबईला निघून आली. आपली बॅगही तिने बरोबर घेतली नव्हती. रात्री साडेआठ - नऊच्या सुमाराला तिचा मुंबईला पोहोचल्याचा मेसेज मात्रं आला होता."

"त्यानंतर तिचा काही कॉन्टॅक्ट झाला? फोन वगैरे?"

"येस सर! २७ तारखेला संध्याकाळी तिचा मेसेज आला होता. तिच्या मोबाईलचा काहीतरी प्रॉब्लेम झाल्याचं तिने त्यात मेन्शन केलं होतं. त्यामुळे मग मी फारशी काळजी केली नाही. गोव्याहून परत आल्यावर तिची बॅग परत करण्यासाठी मी तिच्या घरी गेले तेव्हा ती मिसिंग असल्याचं कळलं. अ‍ॅन्ड देन वी केम टू नो शी हॅड बिन मर्डर्ड! सो हॉरिबल!"

"हं...." देवरे काही क्षण विचारात पडले. मग एकदम त्यांनी विचारलं, "प्रिया, तू आणि सुनेहा कॉलेजमध्ये एकत्रं होतात राईट? मला सांग, कॉलेजमध्ये तिचं कोणाशी अफेअर होतं? कोणी बॉयफ्रेंड वगैरे?"

"नो सर!"

"नक्की नव्हतं? खरंखरं सांग प्रिया..."

"नो सर!" प्रिया ठामपणे म्हणाली, "नेहा खूप रिझर्व्ह्ड मुलगी होती. ती कोणाशीही फारशी मोकळेपणाने बोलत नसे. मुलांशी मैत्री वगैरे करणं तर ती शक्यतो टाळायची. कॉलेजमध्ये तिला मित्र असे नव्हतेच. खरंतर आमचा ग्रूप सोडला तर इतर मैत्रिणीही नव्हत्या फारशा!"

"ती जिथे जॉब करत होती तिथे?"

"तिच्या ऑफीसमध्ये नाही सर, पण .... "

बोलताबोलता प्रिया एकदम थांबली. देवरे अपेक्षेने तिच्याकडे पाहत होते.

"गेल्या चार - पाच महिन्यांपासून नेहाची समीरशी खूप फ्रेंडशीप वाढली होती. हा समीर तिला एका फेसबुक ग्रूपवर भेटला होता. बरेच दिवस दोघं एकमेकांशी चॅट करत होते. दे डेव्हलप्ड अ व्हेरी हेल्दी रिलेशनशीप. सुमारे दोन महिन्यांनी मग एक दिवस ते दोघं फेस टू फेस भेटले. समीर आयटीमध्ये काम करत होता. तो मूळचा पुण्याचा होता आणि तिला भेटण्यासाठी म्हणून त्या दिवशी मुद्दाम मुंबईला आला होता असं नेहाने नंतर सांगितलं. त्यानंतर त्या दोघांच्या भेटी खूप वाढल्या होत्या. जवळपास दर विकेंडला समीर तिला भेटण्यासाठी पुण्याहून येत होता."

"दर आठवड्याला?" देवरे काहीसे विचारात पडले, "त्या दोघांचं अफेअर सुरु होतं? सुनेहा कधी बोलली त्याबद्दल?"

"नेहा तसं कधी स्पष्टपणे बोलली नाही सर, बट आय थिंक, समीर तिला आवडत होता. आपण त्याची कंपनी खूप एन्जॉय करतो असं एकदा तिनेच सांगितलं होतं. दे मे बी हॅविंग अ‍ॅन अफेअर, पण मी तिला तसं कधी डायरेक्टली विचारलं नाही."

"या समीरला तू कधी पाहिलं होतंस?"

"नो सर! मी त्याला कधीच भेटले नाही. इनफॅक्ट, कधी त्याचा फोटोही पाहिला नाही. त्याच्या फेसबुक प्रोफाईलवरही फोटो नव्हता. एकदा बोलता - बोलता मी नेहाला त्याबद्दल विचारलं तेव्हा त्याला आपले फोटो काढलेले आवडत नाहीत असं ती म्हणाली!"

"फोटो काढलेले आवडत नाहीत?" देवरेंने प्रियाकडे रोखून पाहिलं.

"दॅट्स व्हॉट नेहा सेड सर! नॉट शुअर व्हाय, बट राईट फ्रॉम द स्टार्ट, मला हा समीर एकूणच गडबड वाटला होता सर! नेहाला भेटायला दर विकेंडला तो पुण्याहून मुंबईला यायचा, पण त्याची एकदा ओळख करुन दे असं तिला वारंवार सांगूनही आमच्या ग्रूपपैकी कोणालाही तो कधीच भेटला नाही! अनोळखी लोकांना भेटायला त्याला आवडत नाही असं नेहाकडून कळल्यावर मला त्याच्या इन्टेन्शन्सबद्दल डाऊट आला होता. ऑन वन साईड, फेसबुकवर झालेल्या ओळखीनंतर तो तिला भेटला होता, पण आमच्यापैकी कोणालाही अनोळखी म्हणून भेटायचं टाळत होता. आय स्मेल्ड समथिंग फिशी इन्स्टंटली! नेहाला मी तसं वॉर्नही केलं होतं, वी हॅड अ बिट ऑफ आर्ग्युमेंट, पण शेवटी हा माझा पर्सनल प्रश्नं आहे आणि माझा समीरवर पूर्ण विश्वास आहे असं तिने ऐकवल्यावर मी तो विषय सोडून दिला!"

देवरे काहीच बोलले नाहीत. या सगळ्या प्रकरणाचा त्यांना हळूहळू अंदाज आला होता.

"समीरबद्दल आणखीन काही सांगू शकशील?"

"आय थिंक सर, आम्ही गोव्याला असताना नेहाला आलेला फोन समीरनेच केला असावा! दोघांमध्ये नक्कीच काहीतरी झालं असावं, कारण लाईक आय सेड, नेहा वॉज सो टेन्स आफ्टर द कॉल. मी तिला त्याबद्दल खोदून खोदून विचारलं, बट शी डिड नॉट बज!"

देवरेंनी प्रियाला आणखीन बरेच उलटसुलट प्रश्नं विचारले, परंतु तपासाच्या दृष्टीने उपयुक्तं अशी कोणतीही माहिती त्यांना मिळाली नाही. प्रिया निघून गेल्यावर ढाणेंना पुढील तपासाच्या सूचना देऊन देवरे दुसर्‍या कामाकडे वळले...

******

दोन दिवसांनी सुनेहाच्या मोबाईलचे कॉल रेकॉर्ड्स देवरेंना मिळाले, परंतु त्यातून फारसं काहीच निष्पन्न झालं नाही. सुनेहा गोव्याला असताना तिला आलेल्या फोन नंबरचा शोध घेतला असता तो फोन विलेपार्ले स्टेशनच्या बाहेर असलेल्या पब्लिक बूथवरुन करण्यात आला असल्याचं आढळून आलं. सब् इन्स्पे. ढाणेंनी त्या बूथचालकाची भेट घेतली, पण तो अंध असल्याने त्याच्याकडून काहीच माहिती मिळू शकली नाही. सुनेहा गोव्याहून मुंबईला आल्यावर तिने प्रियाला मेसेज पाठवला तेव्हा तिचा फोन ठाणे स्टेशनवर होता असं स्पष्टं होत होतं, पण त्यानंतर तिचा फोन स्विच ऑफ झाला होता. मात्रं दुसर्‍या दिवशी सकाळी आणि रात्री तिने आपल्या आई-वडीलांना मेसेज केला होता आणि त्यावेळी तिचा फोन बदलापूरच्या हद्दीत असल्याचं दिसून येत होतं! सुनेहाचा मृतदेह आढळ्यावर त्याच दिवशी दुपारी प्रियाला मेसेज करण्यात आला तेव्हा मात्रं तिचा फोन पवई लेकच्या परिसरात होता!

देवरेंनी सुनेहाच्या इतर मैत्रिणी - रित्वी, वरदा, साक्षी आणि अ‍ॅना यांच्याकडेही कसून चौकशी केली होती. त्या सर्वांचं स्टेटमेंट प्रियाच्या स्टेटमेंटशी तंतोतंत जुळत होतं. सुनेहाला गोव्याला आलेला फोन आणि त्यानंतर तिचं तातडीने मुंबईला निघून येणं यामुळे त्या चौघीही प्रियाप्रमाणेच चकीत झालेल्या होत्या. खुद्द त्रिवेदी परिवार, त्यांचे नातेवाईक आणि मित्रपरिवार यांच्यापैकीही प्रत्येकाकडेही देवरेंनी चौकशी केली, पण उपयोग शून्य! सुनेहाच्या ऑफीसमध्ये केलेली चौकशीही अशीच निष्फळ ठरली होती

सुनेहाचा मित्रं असलेला समीर तर हवेत विरुन जावं तसा अदृष्यं झाला होता. जंगजंग पछाडूनही देवरेंना त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नव्हती. सुनेहाच्या मैत्रिणी, तिचे ऑफीसमधले सहकारी इतकंच काय तर तिच्या कुटुंबियांकडेही पोलीसांनी समीरबद्दल चौकशी केली, पण त्यांच्या हाती काही लागलं नाही. इन्स्पे. देवरेंनी सायबर सेलच्या मदतीने समीरच्या फेसबुक प्रोफाईलचा शोध केला तेव्हा पुण्याचा असल्याची बतावणी करणार्‍या समीरचं प्रोफाईल प्रत्यक्षात अंधेरीच्या सातबंगला परिसरातून ऑपरेट करण्यात येत असल्याचं आणि सुनेहाची हत्या झाल्याच्या दुसर्‍याच दिवशी ते डिलीट करण्यात आल्याचं समोर आलं होतं!

वॉचमन शिवरामने पाहिलेल्या काळ्या गाडीचा तर अजिबात पत्ता लागला नव्हता. देवरेंनी आरटीओच्या मदतीने वसई - विरार परिसरात असलेल्या काळ्या रंगाच्या सगळ्या व्हॅन्सची यादी तयार करुन शोध घेतला, परंतु त्यातून काहीच निष्पन्नं झालं नाही. ही गाडी चोरीची असण्याची शक्यता गृहीत धरुन त्या दृष्टीनेही तपास करण्यात आला, परंतु तो देखिल निष्फळच ठरला. जवळपास महिना उलटून गेला तरीही देवरेंचा तपास एक इंचही पुढे सरकलेला नव्हता. केस डेड एन्डला पोहोचली होती.

मिडीयामध्ये या केसच्या तपासात अपयश आल्याबद्दल आगाशी पोलीसांवर टीकेची झोड उठवण्यात आली होती. त्यातच सुनेहाची मैत्रिण प्रिया एका न्यूज चॅनलमध्ये काम करत असल्यामुळे त्या चॅनलवरुन पोलीसांवर बरीच आगपाखड करण्यात आली होती. देवरेंनी त्याकडे सरळ दुर्लक्षं केलं होतं! वेळ मिळेल त्याप्रमाणे अद्यापही ते या प्रकरणाचा मागोवा घेत होते, पण त्यांच्याकडे ही एकच केस नव्हती. दोन - तीन महिने अखंड तपास करुनही हाताला काही न लागल्यावर अखेर केस फाईल करण्यावाचून इलाज नव्हता. अमानुषरित्या बलात्कार करुन सुनेहाची हत्या करणारे अद्यापही उजळ माथ्याने फिरत होते...

******

क्रमश:

कथालेख

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

2 Apr 2018 - 9:16 pm | तुषार काळभोर

खिळवून ठेवणारी कथा...

(सहजपणे सुटतील असं वाटणारे लूपहोल्स खूप हुशारीने कव्हर केलेत. मस्स्त!!)

पद्मावति's picture

2 Apr 2018 - 11:01 pm | पद्मावति

क्लास्स्स!! वाचतेय.

लोथार मथायस's picture

3 Apr 2018 - 3:45 am | लोथार मथायस

वाचतोय पुभाप्र

दुर्गविहारी's picture

3 Apr 2018 - 11:39 am | दुर्गविहारी

वा !!! बर्‍याच दिवसांनी पर्वणी आली राजे. लिहीते झाल्याबद्दल धन्यवाद. पहिला भाग तर अपेक्षेप्रमाणेच मस्त. हा परिसर ट्रेकनिमित्त फिरल्यामुळे डोळ्यासमोर आला.
फक्त एक दोन गोष्टी खटकल्या, त्या सुचवतो. बदल करता येतात का पहा.

मुंबईतल्या घाटकोपर पोलिस स्टेशनवर सुनेहा त्रिवेदी नावाच्या तरुणीची 'मिसिंग' कंप्लेंट नोंदवण्यात आलेली होती. इन्स्पे. देवरेंनी पाठवलेला मेसेज आणि मृतदेहाच्या फोटोंवरुन नवापूर समुद्रकिनार्‍यावर आढळलेला मृतदेह या सुनेहा त्रिवेदीचाच असावा अशी घाटकोपरच्या इन्स्पे. भोसलेंची खात्री पटली होती. सुनेहाच्या बाबतीत नक्की काय झालं आहे याची कोणतीही कल्पना न देता तिचा केवळ अ‍ॅक्सीडेंट झाला आहे असं सांगून इन्स्पे. भोसलेंनी त्यांना आगाशी पोलिस स्टेशनला पाठवलं होतं.

इथे ईन्स्पेक्टर भोसलेंनी नेहाच्या आई वडीलांना आगाशीला नेहा आहे हे सांगितल्याचा उल्लेख नाही.

बाकी मस्त ! पु.ले.शु.

शित्रेउमेश's picture

4 Apr 2018 - 11:06 am | शित्रेउमेश

अप्रतिम... खूप भारी...

पाषाणभेद's picture

26 Apr 2018 - 9:37 am | पाषाणभेद

वाचनपर्वणी आली. वाचतोय!

गुल्लू दादा's picture

19 May 2021 - 1:45 pm | गुल्लू दादा

सुरुवात छान पण तुम्हीच लिहिलेल्या cold blooded मालिकेतील सुरुवात आणि ही सुरुवात बरेच साधर्म्य आढळते. काही काही वाक्य सुद्धा तेच आहेत. बाकी सगळी वाचून कळवतोच.