अर्थसंकल्प २०१७-१८

मिल्टन's picture
मिल्टन in काथ्याकूट
31 Jan 2017 - 9:54 am
गाभा: 

नमस्कार मंडळी,

उद्या म्हणजे १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री अरूण जेटली २०१७-१८ साठीचा अर्थसंकल्प सादर करतील. त्यापूर्वी आज म्हणजे ३१ जानेवारीला आर्थिक वर्ष २०१६-१७ साठीचा "इकॉनॉमिक सर्व्हे" सादर केला जाईल.

हा धागा अर्थसंकल्पासाठीच्या चर्चेसाठी आहे. खरे तर उद्या रजा घेऊन अर्थसंकल्प टिव्हीवर बघायचा होता आणि जसेजसे नवीन प्रस्ताव भाषणात येतील त्याप्रमाणे ते मिपावर पोस्ट करायचे होते. पण ते शक्य होणार नाही. तरीही ऑफिसमध्ये शक्य झाले तर लाईव्ह स्ट्रिमिंगवर भाषण बघायचा प्रयत्न असेल. किमान विविध वेबसाईट्स ट्रॅक करून नवीन काय होते याकडे लक्ष ठेवणारच आहे. नेमकी त्यावेळी कुठली मिटिंग वगैरे निघू नको दे हिच भगवंताचरणी प्रार्थना!! तसेच इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जर मुद्दामून लिहावे असे विशेष काही असेल तर त्याविषयी आजच लिहिणार आहे.

हा धागा मुख्यत्वे अर्थसंकल्पामागच्या अर्थकारणाबद्दल असणार आहे. यामागच्या राजकारणावरील चर्चा शक्य तितकी टाळूया ही विनंती. जर अर्थसंकल्पामागच्या राजकारणावर चर्चा करायचीच असेल तर त्यासाठी दुसरा धागा काढल्यास ते चांगले होईल.

धन्यवाद
मिल्टन

प्रतिक्रिया

अनुप ढेरे's picture

31 Jan 2017 - 10:25 am | अनुप ढेरे

फार काही पाथ ब्रेकिंग नसणारे असं वाटतय. ३१ डिसेंबरवाल्या स्कीम्सना पैसे दिले जातील. टॅक्स स्लॅब साधारण ५०के ने वाढतील बहुधा. बाकी जैसे थेच.

खेडूत's picture

31 Jan 2017 - 11:27 am | खेडूत

अरे वा!
मघाशीच विचारणार होतो अर्थसंकल्प धागा कधी म्हणून!
बाकी यावेळी निवडणुकीमुळे फुकट्या लोकांचा अर्थसंकल्प असेल असं वाटतं.
करदात्यांसाठी फारसा आशादायक असणार नाही असे वाटते. ३१ डिसेंबरचे भाषण म्हणजे ट्रेलरच तर होते!

मिल्टन's picture

31 Jan 2017 - 4:46 pm | मिल्टन

अर्थमंत्र्यांनी आज इकॉनॉमिक सर्व्हे सादर केला. या सर्व्हेतील महत्वाचे मुद्दे आणि शक्य तिथे माझे मत इथे लिहित आहे.

१. २०१६-१७ मध्ये जीडीपीच्या वाढीचा दर ६.५% असेल. हाच दर २०१५-१६ मध्ये ७.६% होता. नोटबंदीचा जीडीपी वाढीच्या दरावर ०.५% इतका परिणाम झाला आहे असे हा सर्व्हे म्हणतो. आणि जीडीपी वाढीचा दर २०१७-१८ मध्ये ६.७५% ते ७.२५% पर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला आहे.

नोटबंदीमुळे असंघटीत क्षेत्राला आणि रोखीवर व्यवहार होत असलेल्या क्षेत्रांना त्रास झाला असे म्हटले आहे. तसेच नोटबंदीमुळे अनिश्चितता वाढली आणि त्यामुळे लोकांनी आणि उद्योगांनी आपले खर्चाचे निर्णय पुढे ढकलले असेही म्हटले. थोडक्यात तात्पुरती 'डिफ्लेशन' ची परिस्थिती निर्माण झाली असेही या सर्व्हेमध्ये म्हटले आहे. तसेच एप्रिलपर्यंत नोटबंदीमुळे निर्माण झालेली परिस्थिती १००% पूर्ववत होईल (म्हणजे नुसत्या नोटांची उपलब्धता नव्हे तर नोटबंदीमुळे ज्या उद्योगांमध्ये परिणाम झाले होते तिथेही सगळे काही पूर्ववत होईल) असे म्हटले आहे.

या सर्व्हेमध्ये २०१७-१८ या आर्थिक वर्षात जीडीपी वाढीच्या दरावर नोटबंदी, तेलाची वाढती किंमत आणि जागतिक व्यापारामधील धोके-- खुलेपणाविरूध्द वातावरण इत्यादी हे तीन मुद्दे 'रिस्क फॅक्टर्स' म्हणून मांडले आहेत.

२. कृषीक्षेत्रामध्ये २०१६-१७ मध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत ४.१% ने वाढ झाली. २०१५-१६ मध्ये हीच वाढ त्यापूर्वीच्या वर्षाच्या तुलनेत १.२% होती. अर्थातच यावर्षी पाऊस चांगला झाला त्याचा हा परिणाम आहे.

३. होलसेल महागाईचा दर ऋणमधून धन झाला आहे ही चांगली गोष्ट आहे. डिसेंबर २०१६ मध्ये संपलेल्या तिमाहीत हा दर ३.४% होता. तर २०१६-१७ मध्ये सी.पी.आय महागाईचा दर ५% च्या आसपास म्हणजे नियंत्रणात होता.

1

४. फिस्कल डेफिसिट नियंत्रणात ठेवण्यावर मोदी सरकारचा भर राहिला आहे. ही गोष्ट चांगली आहे. २०१३-१४ मध्ये जीडीपीच्या ४.५% पासून २०१६-१७ मध्ये फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ३.५% असेल असे या सर्व्हेत म्हटले आहे.

1

५. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेमधून मोठ्या प्रमाणावर कर सरकारी तिजोरीत जमा होईल (विंडफॉल) अशी सरकारची अपेक्षा आहे. अजूनतरी सरकारचा याविषयीचा अंदाज किती हे स्पष्ट झालेले नाही. असा एकरकमी विंडफॉल त्याच वर्षाच्या फिस्कल डेफिसिटच्या आकडेमोडीत धरला जातो. याविषयी काही स्पष्ट संकेत आणले तर बरे होईल असे वाटते. मे २०१० मध्येही ३-जी स्पेक्ट्रमचा लिलाव प्रणव मुखर्जी अर्थमंत्री असताना झाला होता आणि सरकारला लाखभर कोटी रूपये मिळाले होते.हा विंडफॉलही २०१०-११ मध्ये आकडेवारीसाठी धरला होता आणि त्यामुळे फिस्कल डेफिसिट कमी दिसले.

तसेच Fiscal Responsbility and Budget Management Act मध्ये बदल केले जातील असे म्हटले आहे. हे बदल नक्की कोणत्या प्रकारचे असतील हे बघायला हवे. हा कायदा वाजपेयी सरकारने २००२-०३ मध्ये आणला.त्याप्रमाणे फिस्कल डेफिसिट मर्यादेत आणण्यावर भर दिला गेला होता. २००७-०८ पर्यंत त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली. पण नंतर आर्थिक संकट आणि इतर काही कारणांनी ती व्यवस्थित होऊ शकली नाही. एकूणच अर्थशास्त्राप्रमाणे "फिस्कल डेफिसिट कमी ठेवा" अशा ओपन एन्डेड ध्येयांपेक्षा कडक नियम बनवून ते पाळले तर त्याचा परिणाम अधिक चांगला होतो. डिसेंबर २०१४ मध्ये भारत सरकार आणि रिझर्व्ह बँकेत "इन्फ्लेशन टारगेटींग" बाबत करार झाला आणि असे नियम मोनेटरी पॉलिसीमध्ये आणले गेले. तसेच नियम फिस्कल पॉलिसीमध्येही आणले तर ते चांगले होईल.

६. करंट अकाऊंट डेफिसिट आणि परकीय चलनाची गंगाजळी या दोन्ही गोष्टींबाबत परिस्थिती चांगली आहे असे हा सर्व्हे म्हणतो. २०१६-१७ मध्ये करंट अकाऊंट डेफिसिट जीडीपीच्या ०.३०% इतके कमी असेल असे हा सर्व्हे म्हणत आहे.

1

याव्यतिरिक्त सर्व्हेमधील एका अत्यंत महत्वाच्या गोष्टीविषयी स्वतंत्र प्रतिसादात लिहित आहे.

मिल्टन's picture

31 Jan 2017 - 5:29 pm | मिल्टन

विविध सरकारी सबसिड्यांना बंद करून त्याऐवजी एक UBI (Universal Basic Income) नागरिकांना देण्याच्या दृष्टीने वाटचाल करावी असे हा सर्व्हे म्हणत आहे. हा प्रकार अजिबात institutionalize करू नये असे माझे मत आहे. प्रत्येक नागरिकाला दरवर्षी किती रक्कम द्यायचा प्रस्ताव आहे याची कल्पना नाही. जेवढी केवढी रक्कम असेल तितकी-- पण याविषयी माझे आक्षेप पुढीलप्रमाणे:

१. सबसिड्या पूर्ण काढता आल्या तर अती उत्तम. जो जी वस्तू/सेवा वापरतो त्याने त्याची किंमत पूर्ण भरावी अशी परिस्थिती आली तर फारच चांगले. पण अर्थातच भारतासारख्या गरीब देशात असे करणे शक्य होणार नाही. म्हणून सबसिड्या आहेत. आता या सबसिड्या कोणाला मिळायला हव्यात? तर अर्थातच ज्यांना गरज आहे त्यांनाच. पण होते असे की सबसिड्या देताना खरोखरच गरज कोणाला आहे आणि कोणाला नाही हे प्रत्येक वेळी बघता येणे शक्य नसते. त्यामुळे त्या सरसकट सगळ्यांनाच दिल्या जातात. उदाहरणार्थ पेट्रोलियम पदार्थांवरील सबसिडी सर्वांनाच मिळते आणि सर्वांनाच पेट्रोल अन्यथा भरावी लागली असती त्यापेक्षा कमी किंमत देऊन मिळते. तसेच डिझेल हे रेल्वे आणि बससाठी वापरले जाते म्हणून डिझेलवर पेट्रोलपेक्षा जास्त सबसिडी असते (अमेरिकेत डिझेल पेट्रोलपेक्षा महाग असते पण आपल्याकडे ते पेट्रोलपेक्षा स्वस्त असते). पण ही सबसिडी सगळ्यांनाच मिळते-- ए.सी. एस.यु.व्ही चालविणार्‍यांना सुध्दा. अशाप्रकारे सबसिड्यांचा दुरूपयोग होतो.

हा दुरूपयोग कमीतकमी व्हावा या उद्देशाने Direct Benefit Transfer ची कल्पना आली. म्हणजे गॅस सिलेंडर बाजारभावाने विकत घ्यायचा आणि सबसिडीचे पैसे बँक अकाऊंटमध्ये जमा होणार.यातील पुढील टप्पा म्हणजे अमुकएक रकमेपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्यांना असे पैसे मिळणार नाहीत म्हणजे त्यांना बाजारभावानेच सिलेंडर घ्यावे लागतील. सध्या हा प्रकार स्वखुषीने सबसिडी सोडण्यापर्यंतच मर्यादित आहे. पण भविष्यात अधिक उत्पन्न असलेल्यांना असे पैसे मिळणार नाहीत अशा प्रकारचे बदल घडण्याच्या दृष्टीने वाटचाल चालू आहे असे म्हणायला हरकत नसावी.

आता सगळ्या सबसिड्या काढून जर असे सरसकट सगळ्यांना पैसे दिले तर त्यात खरोखर गरज असलेल्यांनाच फायदा मिळावा आणि गरज नसलेल्यांना तो मिळू नये या उद्देशालाच हरताळ पोहोचेल. एक उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रातील एका जिल्ह्याच्या ठिकाणी माझ्या नातेवाईकांचा मंगल कार्यालयाचा व्यवसाय आहे. त्यांचा मुलगा शाळेत असतानाची ही गोष्ट. त्याकाळी मिड-डे मील ऐवजी सर्व विद्यार्थ्यांना धान्य द्यायला सुरवात केली गेली होती (१९९९ च्या सुमारास). त्याप्रमाणे त्याला दर पंधरा दिवसांनी शाळेतून एखाद किलो तांदूळ मिळत असत. असे मदत करायची त्याला गरज होती का? अजिबात नाही. ते तांदूळ शेवटी घरच्या मंगल कार्यालयात अक्षता म्हणून वापरले जायचे. त्याप्रकारेच सगळ्या नागरिकांना सरसकट पैसे दिले तर त्यातून ज्यांना खरोखरच गरज आहे अशांनाच सबसिडी दिली गेली पाहिजे या उद्देशाला हरताळ फासला जाईल.

२. या प्रकारात नक्की किती पैसे दिले जाणार आहेत याविषयी स्पष्टता नाही. पण भविष्यात निवडणुका जिंकायला सत्ताधारी पक्ष Universal Basic Income मध्ये वाढ करेल आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे? जर का असे फुकटात मिळणारे पैसे बर्‍यापैकी असतील तर अनेकांना ती रक्कम काम करण्यापासून परावृत्त करू शकेल. जर काही न करता पैसे मिळणार असतील तर कष्ट का करा अशी मनोवृत्ती बनू शकेल. तसेच या प्रकारामुळे महागाई वाढून महागाईचा जास्त दर हे अर्थव्यवस्थेचे एक कायमस्वरूपी लक्षण बनेल. तसेच ज्या प्रकारेच एकदा सुरू केलेले आरक्षण बंद करता येत नाही त्याचप्रकारे एकदा सुरू केलेले Universal Basic Income बंद करता येणार नाही.

३. यातून डबल सबसिडायझेशन अजिबात होणार नाही याची काळजी कशी घेतली जाणार याविषयी स्पष्टता नाही.

एकूणच या प्रकारामुळे ज्यांना खरोखरच आधाराची आणि मदतीची गरज आहे त्यांना तितक्या प्रमाणावर फायदा होईल का आणि ज्यांना अजिबात गरज नाही त्यांना किती फायदा होणार हे तपासून बघणे अत्यंत गरजेचे आहे.

हा प्रकार येऊ नये असे वाटते.

हा प्रकार येऊ नये असे वाटते.

तुमच्या प्रतिसादातल्या मुद्द्यांशी सहमत आहे. टोटल बैल प्रकार आहे.

अनुप ढेरे's picture

31 Jan 2017 - 11:33 pm | अनुप ढेरे

हा प्रकार टार्गेटेड करायचा प्रयत्न केला तर कोणाला द्यायचं कोणाला नाही हे प्रश्न पुन्हा येणारच. आत्ता जी व्यवस्था सबसीडीचे इंटेंडेड बेनिफिशियरी नीट ठरवू शकत नाहीये तीच युबीआयचे बेनिफिशरी कसे बरोब्बर ठरवू शकेल? सो केलं तर प्रत्येकाला असच करायला हवं राईट?

अनरँडम's picture

1 Feb 2017 - 1:00 am | अनरँडम

आता सगळ्या सबसिड्या काढून जर असे सरसकट सगळ्यांना पैसे दिले तर त्यात खरोखर गरज असलेल्यांनाच फायदा मिळावा आणि गरज नसलेल्यांना तो मिळू नये या उद्देशालाच हरताळ पोहोचेल.

हे उत्पन्न एका मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांनाच मिळण्याची शक्यता अधिक वाटते. सरसकट सगळ्यांना पैसे दिले जाण्याची शक्यता कमी वाटते.

पण भविष्यात निवडणुका जिंकायला सत्ताधारी पक्ष Universal Basic Income मध्ये वाढ करेल आणि त्यावर नियंत्रण कसे ठेवायचे?

अशा प्रकारच्या विपरीत प्रकारांना चालना (perverse incentives) मिळू नये म्हणून एखाद्या स्वतंत्र आयोगाच्या माध्यमातून ही योजना चालवता येईल.

तसेच या प्रकारामुळे महागाई वाढून महागाईचा जास्त दर हे अर्थव्यवस्थेचे एक कायमस्वरूपी लक्षण बनेल.

जर सरकारी तुटीतून यासाठीचा पैसा उभा केला गेला तरच महागाईचा दर वाढेल. या योजनेसाठीचा पैसा उभा करण्याविषयी सर्वेक्षणात काही सूतोवाच केलेले आहे का?

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 10:21 am | मिल्टन

हे उत्पन्न एका मर्यादेपेक्षा कमी उत्पन्न असणार्‍यांनाच मिळण्याची शक्यता अधिक वाटते.

तसे असेल तर ते 'युनिव्हर्सल' इनकम राहणार नाही. आणि समजा अमुक एका उत्पन्नापेक्षा (समजा वर्षाला एक लाख रूपये) कमी उत्पन्न असलेल्यांना हे उत्पन्न द्यायचे असे ठरविले तर त्यात इतर अडचणी निर्माण होतील. म्हणजे एक लाखापेक्षा कमी उत्पन्न मिळविणारे लोक करदाते नसल्यामुळे त्यांचे उत्पन्न नक्की किती हे कसे मोजायचे तसेच त्या मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनीही आपले उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे असे दावे करायला सुरवात केली तर त्यावर उपाय काय असेल? कर कमी भरावा लागावा म्हणून ऑफिसांमधूनही उत्पन्नाचा काही भाग 'रिएंबर्समेन्ट' या स्वरूपाचा दाखवला जातो आणि तेवढे उत्पन्न फॉर्म १६ वरही दिसत नाही. अशा प्रकारच्या पळवाटा अधिक प्रमाणावर व्हायची शक्यता जास्त.

समजा उत्पन्नाची एक मर्यादा ठेवली---समजा १ लाख रूपये आणि त्याखालच्या सर्वांना हे उत्पन्न दिले तरी त्यात आणखी एक मुद्दा म्हणजे १.०५ लाख उत्पन्न असलेल्याला अजिबात युबीआय मिळणार नाही. ५ हजार रूपये वर्षाला उत्पन्न जास्त मिळून लोक फार श्रीमंत होणार आहेत अशातला अजिबात भाग नाही. तसेच १ लाख रूपये उत्पन्न असलेल्या सर्वांनाच सबसिड्यांची गरज सारखीच असेल असे नक्कीच नाही. उदाहरणार्थ शेतीशी संबंधित असलेले मजूर आणि इतर व्यवसायांशी (समजा बांधकाम) यांच्या गरजा सारख्या असतीलच असे नाही. त्यामुळे युबीआयमधून काहींना गरज आहे त्यापेक्षा जास्त पैसे दिले जाणे आणि काहींना गरजेपेक्षा कमी पैसे दिले जाणे हे प्रकार होऊन असमतोल वाढणारच नाही याविषयी नक्की काय काळजी घेतली जाणार आहे हे समजले नाही. त्यापेक्षा गरज लागेल त्यांनाच आणि गरज लागेल तितक्या प्रमाणातच सबसिडी दिली जावी यासाठी 'डायरेक्ट ट्रान्स्फर' हा अधिक योग्य मार्ग वाटतो.

अशा प्रकारच्या विपरीत प्रकारांना चालना (perverse incentives) मिळू नये म्हणून एखाद्या स्वतंत्र आयोगाच्या माध्यमातून ही योजना चालवता येईल.

पण त्या स्वतंत्र आयोगावरही सरकारने नियुक्त केलेले (पक्षी सत्ताधारी पक्षाच्या मर्जीतले) लोक असतील तर तो आयोग कितपत स्वतंत्र राहिल?

जर सरकारी तुटीतून यासाठीचा पैसा उभा केला गेला तरच महागाईचा दर वाढेल. या योजनेसाठीचा पैसा उभा करण्याविषयी सर्वेक्षणात काही सूतोवाच केलेले आहे का?

याविषयी सर्वेक्षणात काही म्हटलेले आढळले नाही.

अर्थातच हे सगळे आतापर्यंतचे हवेतले इमले झाले. अरूण जेटली प्रत्यक्षात याविषयी अर्थसंकल्पात काही तरतूद करतात का हे बघायचे.

अनरँडम's picture

1 Feb 2017 - 11:03 pm | अनरँडम

तसे असेल तर ते 'युनिव्हर्सल' इनकम राहणार नाही.

खरे आहे पण खुद्द सर्वेक्षणच या उत्पन्नाच्या युनिवर्सॅलिटीबद्दल साशंक आहे. सर्वेक्षणाच्या पृष्ठ १९१ वर याबद्दल काही भाष्य आहे. सर्वेक्षणातून

In that light and keeping in mind fiscal costs, the notion of transferring even some money to the well-off may be difficult.It is, therefore, important to consider ideas that could exclude the obviously rich i.e., approaching targeting from an exclusion of the non-deserving perspective
than the current inclusion of the deserving perspective

आयोगाची स्वतंत्रता जपता येणे शक्य आहे. (आपल्याकडे निवडणूक आयोग वगैरे बर्‍यापैकी स्वतंत्र आहेत.) सध्या मध्यमवर्गाला दिल्या जाणार्‍या सबसिड्या काढून तो पैसा UBI साठी वापरता येण्याची शक्यता आणि तसे करण्यासंबंधीतल्या अडचणी यावर सर्वेक्षणात काही चर्चा केलेली दिसते. असो.

मी स्वतः 'UBI'बाबत काही ठाम मत बनवलेले नाही आणि बनू शकेल किंवा कसे याविषयी साशंक आहे. तुम्ही 'नकोच' अशी एकदम ठाम भुमिका घेतल्याने मी काही मत मांडले.

मिल्टन's picture

3 Feb 2017 - 10:30 am | मिल्टन

आपल्याकडे निवडणूक आयोग वगैरे बर्‍यापैकी स्वतंत्र आहेत.

हो. पण त्याचे एक कारण निवडणुक आयोगाला राज्यघटनेच्या अंमलबजावणीच्या सुरवातीपासूनच घटनात्मक आणि स्वतंत्र दर्जा दिला गेला होता हे एक असू शकते. देश स्वतंत्र झाल्यावर सुरवातीच्या आदर्शांनी भरलेल्या वातावरणात ही स्वायत्तता जपणे अधिक सोपे गेले असेल. तसेच पंडित नेहरूंसारखे नेते आणि सुकुमार सेन सारखे मुख्य निवडणुक आयुक्त मिळाले त्यामुळे एक चांगली परंपरा प्रस्थापित झाली. त्यातही आणीबाणीत बदनाम झालेले नवीन चावला मुख्य निवडणुक आयुक्तपदी आले तेव्हाही आयोगाच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिलेच. नंतरच्या काळात निर्माण झालेल्या संस्थांपैकी (सी.बी.आय, व्हिजिलिअन्स कमिशन इत्यादी) नक्की किती पूर्णपणे स्वतंत्र आहेत? रिझर्व्ह बँकही कितपत स्वतंत्र आहे? रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर बेनेगल रामाराव यांचा एका बैठकीत अर्थमंत्री टी.टी.कृष्णम्माचारी यांनी काहीतरी बोलून सर्वांसमोर अपमान केला. त्याच बैठकीत पंडित नेहरूही हजर होते.नेहरूही त्याविषयी काही बोलले नाहीत म्हणून रामारावांनी राजीनामा दिला. एस.जगन्नाथन यांनी संजय गांधींच्या मारूतीला सरकारी बँकांनी दिलेल्या कर्जाविषयी प्रश्नचिन्ह उभे केले म्हणून त्यांची उचलबांगडी झाली. आर.एन.मलहोत्रांना चंद्रशेखर सरकारमधील अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी जाहिरपणे जा असे सांगितले नाही पण त्यांनी त्याविषयी पुरेसे संकेत दिले आणि ते संकेत ओळखून मलहोत्रांनी राजीनामा दिला. मनमोहनसिंगांची रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदावरून उचलबांगडी राजीव गांधी सरकारमध्ये वि.प्र.सिंग अर्थमंत्री असताना झाली. आताही नोटबंदीच्या प्रकारात उर्जीत पटेल यांना बाजूला ठेऊनच हा निर्णय झाला असे म्हणायला जागा आहे. तेव्हा सांगायचा मुद्दा म्हणजे आपल्याकडे कुठलीही संस्था पूर्णपणे स्वतंत्र राहणे कठिणच आहे. अर्थातच हा आपल्या सिस्टिममधला दोष आहे.हे कोणती नवी संस्था स्थापू नयेच (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) यासाठीचे कारण होऊ शकणार नाही.

समजा असा स्वतंत्र आयोग निर्माण झाला आणि तो खरोखरच स्वतंत्र राहिला तर सत्ताधारी पक्षाला मनमानी करून यु.बी.आय वाढवता येणार नाही असे गृहित धरले तरी माझ्या यु.बी.आय विरूध्दच्या आक्षेपांपैकी तो एकच मुद्दा झाला. इतर मुद्दे राहतातच आहेत. एक उदाहरण द्यायचे झाले तर सध्या सरकार १२ गॅस सिलेंडरपर्यंत सबसिडी देते. काही लोक वर्षाला २ सिलेंडर वापरत असतील तर काही वर्षाला १२ सिलेंडर वापरत असतील. सध्या सरकार डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर मधून जेवढे वापरले जातील तितक्या सिलेंडरवर सबसिडी देते. आता समजा सरसकट सगळ्यांना सरासरी म्हणून ६ सिलेंडरइतकी रक्कम यु.बी.आय म्हणून दिली तर त्यातून २ सिलेंडर वापरणार्‍यांना जास्त रक्कम मिळेल आणि १२ सिलेंडर वापरणार्‍यांना कमी रक्कम मिळेल. त्यातून ज्यांना गरज आहे त्यांनाच टारगेटेड सबसिडी द्यायच्या प्रयत्नांनाच हरताळ फासला जाईल हा मुख्य मुद्दा आहे.

दुसरे म्हणजे सिलेंडरचे किंवा रॉकेलसारख्या पेट्रोलिअम पदार्थांचे उदाहरण घेतले तर त्या पदार्थांच्या किंमतीत अगदी जोरदार चढउतार होऊ शकतात. २००८ मध्ये क्रूड तेल १५० डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचले होते तेच लेहमन कोसळल्यानंतर ८० पर्यंत खाली आले. २०१४ मध्ये शेल ऑईलची बूम आल्यावर ४० पर्यंत खाली गेले तर आता ६० च्या आसपास आहे. म्हणजे प्रत्येक वेळी बाजारभाव वेगळे असतील. यु.बी.आय मध्ये वर्षातून कितीवेळा बदल करणार? त्यातून यु.बी.आय हे downward sticky (शब्दप्रयोग श्रेयः जॉन मेनार्ड केन्स :) ) असतील ही शक्यता सर्वात जास्त. म्हणजे क्रूड तेल १५० वरून ४० वर खाली आले म्हणून यु.बी.आय मध्ये ६०% ची कपात केली तर त्यातून राजकीय किंमत चुकवावी लागेल म्हणून सत्ताधारी पक्ष यु.बी.आय कमी करेल का? त्यातून लोकांना 'मनी इल्युजन' असते. म्हणजे ज्याप्रमाणे लोकांची अपेक्षा असते की किंमती वाढत असताना आपले पगार वाढावेत त्याच न्यायाने किंमती कमी होत असताना जर पगार कमी झाले (किंवा तेवढेच राहिले) तर त्याविषयी तक्रार होता कामा नये. पण अर्थातच 'मनी इल्यूजन' मुळे हे शक्य होत नाही.

या सगळ्या कारणांमुळे माझा यु.बी.आय ला विरोध आहे. त्यापेक्षा डायरेक्ट बेनेफिट ट्रान्स्फर कधीही चांगले.

फेदरवेट साहेब's picture

1 Feb 2017 - 8:06 am | फेदरवेट साहेब

सबसिडी काढा फक्त जो सबसिडीचा लाभधारक नसेल त्याला इतर स्थानिक कर अन बाकी डिझेल पेट्रोलचे भाव वाढवणारी डबुली सुद्धा भरायला नको लागतील. अशी सोय हवी (जी होणार नाही)

सव्यसाची's picture

31 Jan 2017 - 7:30 pm | सव्यसाची

हा अर्थसंकल्प बऱ्याच कारणांसाठी ऐतिहासिक आहे.
१. रेल्वे अर्थसंकल्प यावर्षी सादर होणार नसल्याने त्या विभागासंबंधी नेमके काय उल्लेख येतात हे पाहणे रोचक ठरेल. नवीन मार्ग आणि गाड्या यासाठी रेल्वे मंत्रालय काही पत्रकार परिषद वगैरे घेणार कि वर्षभरात ज्या त्या वेळी घोषणा करणार? तसेच रेल्वे मध्ये भाडेवाढ गेले बरीच वर्षे नाही. ती करायची असेल अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कि प्रेस रिलीज मधून?

२. अर्थसंकल्प १ महिना आधी आला आहे. (या पूर्वी तो २८ फेब्रुवारी किंवा २९ फेब्रुवारी ला असे). या मागचा उद्देश बजेट १ एप्रिल च्या आधी पारित व्हावे व नव्या घोषणा आणि कर १ एप्रिल पासूनच लागू व्हावेत. तसेच जो पैसा वेगवेगळ्या मंत्रालयाना दिला गेला आहे त्याचा वापरही १ एप्रिल पासूनच सुरु व्हावा. (पूर्वी हि प्रक्रिया १ जून पासून सुरू होत असे.)
वित्तीय वर्ष जानेवारी ते डिसेम्बर करावे असाही अहवाल आला आहे. तसे झाल्यास ( आणि तो अहवाल याच वर्षीपासून अमलात आल्यास ) हे वित्तीय वर्ष ९ महिन्यांचे असेल.

३. प्लॅन आणि नॉन प्लॅन : हा फरक आता अर्थसंकल्पामध्ये असणार नाही.

४. जीएसटी : याचवर्षी जीएसटी अमलात येणे हे बंधनकारक (?) असून त्याचा परिणाम हि या बजेट मध्ये दिसून येईल.

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 1:19 am | संदीप डांगे

तसेच रेल्वे मध्ये भाडेवाढ गेले बरीच वर्षे नाही.

शेवटची भाडेवाढ कधी झाली होती?

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 10:25 am | मिल्टन

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद सव्यसाची.

२०१६-१७ मध्ये जीडीपीच्या वाढीचा दर ६.५% असेल. हाच दर २०१५-१६ मध्ये ७.६% होता. नोटबंदीचा जीडीपी वाढीच्या दरावर ०.५% इतका परिणाम झाला आहे असे हा सर्व्हे म्हणतो.

म्हणजे एकदमच 'बॅक ऑफ द आन्वलप' ढोबळ हिशोब करता राष्ट्रीय उत्पन्नावर ६५,००० कोटी रुपये इतका परिणाम झाला. (हा आकडा अंदाजे आहे. भारताचे वार्षिक राष्ट्रीय उत्पन्न साधारण २ ट्रिलियन डॉलर्स पकडले. रुपयाचा दर ६५ ठरवला. आणि त्या रकमेचा अर्धा टक्का काढला.) हे सर्वेक्षण सरकारी आहे त्यामुळे आकडे बरेच घासून पुसलेले असणार.

अर्थमंत्री अरूण जेटली अर्थसंकल्प सादर करायला सुरवात करत आहेत.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 11:15 am | मिल्टन

अरूण जेटलींनी भारतीय अर्थव्यवस्थेसाठी खालील मुद्दे २०१७-१८ मध्ये महत्वाचे असतील असे म्हटले आहे:

१. अमेरिकेत २०१७ मध्ये दोनदा व्याजाचे दर वाढणे
२. तेलाच्या आणि इतर कमोडिटीच्या वाढत्या किंमती.
३. फ्री ट्रेडविरूध्द वाढता विरोध

महागाईचा दर नियंत्रणात आहे आणि करंट अकाऊंट डेफिसिटही नियंत्रणात आहे असे अर्थमंत्री म्हणत आहेत. तसेच २० जानेवरीला ३६१ बिलिअन डॉलरची परकीय चलनाची गंगाजळी आहे असे म्हणत आहेत. ती १२ महिन्यांची आयात भागवू शकेल.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 11:23 am | मिल्टन

आतापर्यंत नवे काही नाही. आतापर्यंत सर्व काही अपेक्षित लाईन्सवरच आहे.

अनुप ढेरे's picture

1 Feb 2017 - 11:25 am | अनुप ढेरे

Transform Energize Clean (TECIndia)

कायच्याकै अ‍ॅक्रॉनिम काढतात राव हे!

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 11:25 am | मिल्टन

अरूण जेटली अर्थसंकल्पामध्ये १० थीम असतील असे म्हणत आहेत. त्यावरून हा अर्थसंकल्प काहीसा 'पॉप्युलिस्ट' असेल असे वाटत आहे.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 11:36 am | मिल्टन

मनरेगावरील अ‍ॅलॉटमेन्ट ३८५०० कोटींवरून ४८००० कोटी रूपये करायची घोषणा जेटलींनी केली आहे. आणि ही अ‍ॅलॉटमेन्ट आतापर्यंतची सर्वाधिक असेल असेही जेटली म्हणत आहेत. सुरवातीच्या काळात मनरेगाला सरकार विरोध करत होते.त्याच योजनेवर खर्च वाढविणे हे मला पटलेले नाही.

अनुप ढेरे's picture

1 Feb 2017 - 11:43 am | अनुप ढेरे

सहमत आहे.

१. महत्वाच्या शिक्षणसंस्थांना स्वायत्तता दिली जाईल. युजीसी अ‍ॅक्रेडिटेशन पध्दत अजून स्ट्रीमलाईन करणार.
२. स्वयम या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाईन ट्रेनिंग वाढविले जाणार.

नशीबाने नवी आय.आय.एम, आय.आय.टी आणि एम्स चालू करायची घोषणा झाली नाही.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 11:48 am | मिल्टन

झारखंड आणि गुजरातमध्ये नव्या एम्स सुरू करणार. नव्या आय.आय.टी आणि आय.आय.एम चालू करून तो ब्रॅन्ड बर्‍यापैकी डायलुट केला गेला आहे. दुर्दैवाने तसेच एम्सविषयीही चालू आहे असे म्हणायचे का?

स्वस्त घरबांधणीला 'इन्फ्रास्ट्रक्चर' चा दर्जा दिला जाणार आहे. यामुळे स्वस्त घरबांधणीला कर्ज द्यायला रिझर्व्ह बँकेचे 'इन्फ्रास्ट्रक्चर' विषयीचे नियम लागू होतील. या क्षेत्रासाठी ही चांगली गोष्ट आहे.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 11:56 am | मिल्टन

जेटली आता रेल्वेविषयी बोलत आहेत.

१. ३५०० किमीचे नवे रेल्वेमार्ग टाकणार.
२. दोन वर्षात सर्व अनमॅन्ड लेव्हल क्रॉसिंग बंद करणार.
३. आय.आर.सी.टी.सी वर ऑनलाईन रिझर्व्हेशनसाठीचा सर्व्हिस चार्ज बंद करण्यात येत आहे.

अजूनतरी नव्या रेल्वे गाड्यांची घोषणा नाही.

रेल्वे, रस्ते या वाहतूक क्षेत्रासाठी २ लाख ४० हजार कोटींची तरतूद. यापूर्वी हा आकडा किती होता हे तपासून बघायला हवे.

ओरिसा आणि राजस्थानमध्ये पेट्रोलियमचे स्ट्रॅटेजिक रिझर्व्ह सुरू करणार. ही चांगली गोष्ट आहे.

चिनार's picture

1 Feb 2017 - 12:02 pm | चिनार

म्हन्जे काय ?

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:04 pm | मिल्टन

भाषण संपल्यावर लिहितो.

अनुप ढेरे's picture

1 Feb 2017 - 12:08 pm | अनुप ढेरे

तेल साठवून ठेवायची क्षमता. जेव्हा किंमत कमी असेल तेव्हा जास्तं घेऊन साठवून ठेवायचं. २०१४ मध्ये हे तयार असतं तर फायदा झाला असता बराच.

हे वाचा.

http://www.thehindu.com/business/Economy/cheap-oil-and-strategic-reserve...

UPAच्या कॅपमधलं अजून एक फेदर.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:03 pm | मिल्टन

९०% एफ.डी.आय डायरेक्टली मंजूर होणार. Foreign Investment Promotion Board रद्द करणार. ही खूपच महत्वाची घोषणा आहे.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:07 pm | मिल्टन

रेल्वेशी संबंधित IRCTC, IRFC या कंपन्यांमध्ये डिसएन्व्हेस्टमेन्ट होऊन त्या कंपन्या शेअर मार्केटमध्ये लीस्ट होणार.

ऑईल आणि गॅस कंपन्यांमध्ये इंटिग्रेटेड कंपनी सुरू करणार. सध्या अपस्ट्रीम-डाऊनस्ट्रीम कंपन्या वेगळ्या आहेत. हा प्रकार महत्वाकांक्षी प्रकार वाटत आहे.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:09 pm | मिल्टन

मुद्राकोषासाठी २.४४ लाख कोटी. यात अनुसुचित जाती-जमाती, महिला तसेच ग्रामीण भागात कर्ज देताना प्राधान्य देणार. योजना चांगली आहे पण यातून कर्ज देताना ड्यू डिलिजन्स व्यवस्थित व्हावा ही अपेक्षा. अन्यथा १९७० च्या दशकात विविध बँका 'लोन मेळावे' भरवायचे आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर नुकसान व्हायचे त्याची पुनरावृत्ती व्हायची.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:16 pm | मिल्टन

विजय मल्ल्यांसारखे कर्ज बुडवून देशातून पळून जाणार्‍यांची प्रॉपर्टी जप्त करण्यासाठी नवा कायदा करणार.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:22 pm | मिल्टन

२०१७-१८ मध्ये फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ३.२% आणि पुढच्या वर्षी ३% वर आणणार. हे जेटलींना करता आले तर फारच उत्तम होईल.

आता करविषयक तरतुदी सुरू होत आहेत.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 12:44 pm | मिल्टन

१. घरासाठी लॉन्ग टर्म कॅपिटल टॅक्ससाठी कालावधी ३ वर्षांवरून २ वर्षांवर
२. कॉर्पोरेट टॅक्स--एम.एस.एम.ई कंपन्यांना (५० कोटींपर्यंतची उलाढाल असलेल्या) कर ३०% वरून २५% पर्यंत कमी करण्यात आला आहे. एकूण ९६% कंपन्यांना याचा फायदा होईल. सरकारला यातून ७२०० कोटींचा महसूल गमावावा लागेल.
३. एल.एन.जी वरील कस्टम ड्युटी ५% वरून २.५% वर
४. ३ लाखावरील कोणताही व्यवहार कॅशमध्ये होऊ शकणार नाही. याविषयी कायद्यामध्ये बदल करण्यात येईल.
५. कॅशलेस इकॉनॉमीसाठी पी.ओ.एस मॅन्युफॅक्चरींगवर करसवलती देण्यात येणार आहेत.
६. राजकीय पक्षांना २००० पेक्षा जास्त देणग्या कॅशमध्ये घेता येणार नाहीत.

१. २.५ लाख ते ५ लाखः आयकर ५% (आताच्या १०% वरून)
२. इतर आयकर स्लॅब मध्ये बदल नाही
३. ५० लाख ते १ कोटी उत्पन्नावर १०% सरचार्ज

अजून तरी इतर कोणत्याही करसवलतींची घोषणा नाही.

खेडूत's picture

1 Feb 2017 - 12:58 pm | खेडूत

वैयक्तिक आयकराच्या ५-२५ लाखाचे दर तसेच असणार का?

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 1:02 pm | मिल्टन

२.५ ते ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर ५% कर आणि इतर स्लॅबमध्ये काहीही बदल नाही. त्यामुळे ५ लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना १२,५०० रूपयांची करसवलत मिळेल.

हो, नंतर समजले .धन्यवाद. :)
घर घेऊन दोन वर्षांत विकले तर कॅपिटल गेन टॅक्स लागणार नाही का? पूर्वी ही मर्यादा तीन वर्षे होती.

नागेश कुलकर्णी's picture

1 Feb 2017 - 2:30 pm | नागेश कुलकर्णी

म्हणजे समजा मी ५००००/- टॅक्स भरत असेन तर आता १२५०० कमी होऊन ३७५०० भरावा लागेल?
माझा टॅक्स कितीही असला तरी फिक्स १२५०० च सवलत मिळणार कि कसे ?

सर्व ट्याक्स भरणार्‍यांना ही सवलत. (पन्नास लाखावर असेल तर नाही. ५०लाख -१ करोड ला मोठा बांबू आहे. १०% सर्चार्ज)

सध्या २.५ ते ५ लाखापर्यंत करपात्र उत्पन्नावर १०% कर आहे, म्हणजे रु. २५०००, तो निम्मा केल्याने पुढील वर्षासाठी रु. १२५०० झालाय.
या अर्थाने. तुम्ही आता ५०००० भरतअसाल तर सध्याच्या स्लॅबप्रमाणेच (वरील बदलानुसार १२५०० कमी होऊन) हिशेब होईल.

नागेश कुलकर्णी's picture

1 Feb 2017 - 3:00 pm | नागेश कुलकर्णी

खेडूतजी एक छोटे उदाहरण घेऊ
समजा माझी मिळकत १०००००० आहे. म्हणजे मी ५००००० स्लॅब मध्ये बसत नाही.
नवीन तरतुदीनुसार मला साधारण ३००००० (करमुक्त) + १५०००० (80C ) चा फायदा मिळेल.
माझे करपात्र उत्पन्न ५५०००० होईल यावर मला २०% टॅक्स भरावा लागेल.
ह्या मध्ये कोठेही १२५०० येत नाहीत, मुळात मी ५००००० च्या स्लॅब मध्ये नसल्यामुळे मला तो फायदा कसा मिळेल?

इथे जास्त सविस्तर उदाहरणे दिली आहेत, बहुधा समजायला सोपी आहेत. माझ्या मूळ समजूतीपेक्षा हे थोडे वेगळे आहे..

नागेश कुलकर्णी's picture

1 Feb 2017 - 3:31 pm | नागेश कुलकर्णी

म्हणजे १२५०० हा फिक्स फॅक्टर आहे.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Feb 2017 - 3:25 pm | हतोळकरांचा प्रसाद

मला वाटते ते असे असावे -

तुमचे १०,००,००० चे खालीलप्रमाणे स्लॅब पडतील (कंसात त्यासलाब ला लागणार कर)

१. ०-२,५०,००० - ०% (रु. ०)
२. २,५०,००० - ५,००,००० - ५% (रु. १२५००) - आधी या स्लॅबला तुम्हाला १०% ने २५००० भरावे लागायचे. शिवाय ८०CC चे म्हणाल तर ८०CC हे ऐच्छिक आहे. यात फक्त पीएफ चे पैसे सगळ्यांचे करमुक्त होतील पण बाकी तुमची तशी काही गुंतवणूक असेल तरच. म्हणजे समजा तुमचा पीएफ वर्षाला ५०,००० जात असेल आणि तुमच्या २५,००० च्या विमा पॉलिसीज असतील तर या स्लॅबचे तुमचे कारासाठीचे उत्पन्न २,५०,००० - ७५,००० = १,७५,००० असेल. आणि म्हणून या स्लॅबचा कर ५%ने ८७५०रु. एवढा असेल. (जो आधी १७,५०० असला असता). म्हणजे एकूण तुमचे ८७५० वाचले.
३. ५,००,०००-१०,००,००० - २०% (रु. ५०,०००) - इथे काही बदल झालेला नाही.

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Feb 2017 - 3:27 pm | हतोळकरांचा प्रसाद

तिसऱ्यासाठी कर १, ००, ००० असा वाचावा.

२,५०,००० मर्यादा वाढवून आता ३,००,००० केली आहे

हतोळकरांचा प्रसाद's picture

1 Feb 2017 - 4:23 pm | हतोळकरांचा प्रसाद

हे कुठे वाचायला मिळाले नाही. नक्की झाला आहे का बदल?

नागेश कुलकर्णी's picture

1 Feb 2017 - 4:36 pm | नागेश कुलकर्णी

आता 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नासाठी यापूर्वी असलेला 10 टक्के टॅक्स आता 5 टक्क्यांवर आणला आहे. इतकंच नाही तर 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) दिल्यामुळे आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही.

त्यानंतरच्या 3 ते 5 लाख या उत्पन्नावर तुम्हाला 5 टक्के कर लागेल. म्हणजे वरच्या 2 लाखांवर तुम्हाला 5 टक्के म्हणजे 10 हजार रुपये टॅक्स भरावा

सविस्तर येथे वाचता येईल.

माझ्या माहितीप्रमाणे सेक्शन 87A अंतर्गत मिळणारी 2500 रुपयांची कराची वजावट आहे ही. ज्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख वा त्यापेक्षा कमी आहे त्यांना त्यावर द्याव्या लागणाऱ्या करातुन 2500 रुपये वजावट मिळते. म्हणजे कर 25000 रुपये असेल तर वजावट धरुन तो 22500 होतो. 2500 म्हणजे 50000 च्या 5% असल्यामुळे एकुण करमुक्त उत्पन्न 300000 रुपये होते. पण ही तीन लाखांची मर्यादा केवळ ज्यांचे करपात्र उत्पन्न पाच लाख वा त्यापेक्षा कमी आहे त्यांनाच, त्यावरील ईतरांना करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 250000 रुपयेच आहे.

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 1:01 pm | मिल्टन

अर्थमंत्र्यांचे भाषण संपले आहे. थोड्या वेळात सगळे भाषण परिशिष्टांसह संकेतस्थळावर उपलब्ध होईल. ते बघून रात्रीपर्यंत सविस्तर प्रतिसाद लिहितो.

आतापर्यंत तरी अर्थसंकल्पात फार भव्यदिव्य असे काही वाटले नाही हे पहिले इम्प्रेशन आहे.

आदूबाळ's picture

1 Feb 2017 - 1:25 pm | आदूबाळ

काय पावशेर बजेट होतं...

या अर्थसंकल्पाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे अर्थसंकल्पाला महत्त्व नसणे. प्रगत देशात असेच असते. नैतर आपल्याकडे लोक इलेक्शनचा रिझल्ट वा क्रिकेटची मॅच असल्यासारखा अर्थसंकल्प असावा असे अपेक्षितात.

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 3:17 pm | श्रीगुरुजी

माझा थोडासा गोंधळ झाला आहे. एकीकडे सांगताहेत की ३ लाखापर्यंतचे उत्पन्न करमुक्त. दुसरीकडे सांगताहेत की २.५ लाख ते ५.० लाख उत्पन्नावर १०% ऐवजी ५% आयकर. तर मग २.५ लाखापेक्षा जास्त व ३ लाखापेक्षा कमी असलेल्यांना आयकर भरावा लागणार का नाही?

सेवा कर १६% वरून १८% नेला जाईल, बँकिंग व्यवहारावर कर लावला जाईल असे अंदाज व्यक्त केले जात होते. परंतु अर्थसंकल्पात तशी घोषणा झाल्याचे दिसत नाही.

एकंदरीत बराचसा मिळमिळीत अर्थसंकल्प आहे.

असंका's picture

1 Feb 2017 - 10:34 pm | असंका

87A Income Tax Act... Rebate.

I think 3.00lacs is wrong calculation. It should be 3.50 lacs. But haven't read anything yet. Just a random thought.
Sorry for english.

श्रीगुरुजी's picture

1 Feb 2017 - 3:23 pm | श्रीगुरुजी

३ लाखांवरील रकमेच्या रोख व्यवहारांवर बंदी आणणार आहेत. परंतु ३ लाखांवरील व्यवहार एकत्र न करता प्रत्येक व्यवहार २ लाख ९९ हजार पेक्षा जास्त होणार नाही याची काळजी घेऊन पळवाट काढली जाऊ शकते.

महाराष्ट्र सरकारातील बरेच अधिकारी ही पळवाट स्विकारत आहेत आणी हे मुख्यमंत्र्यांनीदेखील मान्य केले. त्यावर कारवाई करू म्हणाले. काय करतात काय माहित.

चौकटराजा's picture

1 Feb 2017 - 6:46 pm | चौकटराजा

श्रीमंतावर अधिभार लादून गरीबाना करसवलत हा प्रकार तेंव्हाच बरोबर ठरेल जेंव्हा सांप्रतचा करबुडवा पूर्णपणे करदाता म्हणून जबरदस्तीने अर्थव्यवस्थेत ओढला जाईल.
काही जण पोलिसाममोरून बिनदिक्कत सिंग्नल ओलांडताहेत व काही कायदा पाळणारे पोलिसांच्या तडाख्यात सापडताहेत अशासारखेच हे आहे.

या द्रूष्टीने हा लेख फार रोचक आहे.
http://indianexpress.com/article/business/budget/union-budget-2017-demon...
संगठित आणि असंगठित क्षेत्रात किती लोक सेवेत आहेत, किती रिटेर्न भरतात, कितीची भरतात, कंपन्या किती आहेत, किती रिटर्न भरतात, किती नफा दाखवतात, किती दाखवतात.... इ इ इ
====
देशाच्या चरित्राचे स्टॅटिस्तिक्स आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

1 Feb 2017 - 9:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

(कायप्पावरून साभार)

मिल्टन's picture

1 Feb 2017 - 10:15 pm | मिल्टन

अरूण जेटलींनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात माझ्या दृष्टीने सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 'फिस्कल कॉन्सॉलिडेशन'. महागाई कमी व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. पण महागाई कमी करण्याच्या दृष्टीने सरकारच्या नियंत्रणात असलेली सगळ्यात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे फिस्कल डेफिसिट. वाजपेयी सरकारने Fiscal Responsibility and Budget Management Act (FRBM) पास करून सरकारचे फिस्कल डेफिसिट नियंत्रणात ठेवण्यासाठी कायदेशीर तरतूद केली होती हे मूळ लेखात म्हटले आहेच. वाजपेयी सरकारच्या काळात महागाईचा दर नियंत्रणात होता त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सरकारने फिस्कल डेफिसिट नियंत्रणात ठेवले होते. अरूण जेटलींनीही या दृष्टीने महत्वाची पावले उचलली आहेत.जुलै २०१४ च्या पहिल्या अर्थसंकल्पात फिस्कल डेफिसिट जीडीपीच्या ४.१% पर्यंत नियंत्रणात ठेवण्याचे ध्येय ठेवले होते. ते २०१७-१८ मध्ये जीडीपीच्या ३.२% इतके आणि पुढच्या वर्षी ३% इतके कमी करायचे अरूण जेटलींनी जाहिर केले आहे. माझ्या मते अर्थसंकल्पातील ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. मागच्या वर्षी सरकारने बाजारातून ४.२५ लाख कोटी कर्जाऊ उचलले होते. तर यावर्षी एकूण कर्जाऊ रक्कम ३.४८ लाख कोटी इतकीच मर्यादित ठेवायचे या अर्थसंकल्पात म्हटले आहे. ही पावले महागाई कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाची असतील.

तसेच राज्य सरकारांना केंद्र सरकारकडून करातील अधिक वाटा द्यायचा हे सरकारने सुरवातीपासूनच जाहिर केले होते. जी.एस.टी मुळे त्यात आणखी भर पडणार आहे. मागच्या वर्षीच्या ३.६० लाख कोटींवरून यावर्षी हा आकडा ४.११ लाख कोटी असणार आहे.

या कारणांमुळे सरकारला करातून मिळणार्‍या महसुलात कपात होऊ देणे परवडणार्‍यातले नव्हते असे दिसते. एकीकडे जवळपास सर्व मंत्रालयांसाठीच्या खर्चाच्या तरतुदींमध्ये वाढ करण्यात येणार आहे. दुसरीकडे फिस्कल डेफिसिट मर्यादेत ठेवायचे असेल तर करातून मिळणार्‍या महसुलात कपात होऊन चालणार नाही. जेटलींनी भाषणात भारतीय समाजात करचुकवेपणा मोठ्या प्रमाणावर चालतो हे स्पष्टपणे म्हटले. तरीही गेल्या दोन वर्षात करसंकलनात चांगलीच वृध्दी झाली आहे हे चांगले लक्षण आहे. २०१५-१६ मध्ये ४ लाख ५५ हजार कोटींवरून कॉर्पोरेट टॅक्स ४ लाख ९४ हजार कोटी झाला. म्हणजे कॉर्पोरेट टॅक्समध्ये सुमारे ८% ने वाढ झाली. व्यक्तिगत आयकरामध्ये झालेली वाढ अधिक आहे. २०१५-१६ मध्ये २ लाख ८० हजार कोटींवरून २०१६-१७ मध्ये ३ लाख ४५ हजार कोटी म्हणजे सुमारे २३% ने वाढ होत आहे. हे सगळे आकडे इथे बघायला मिळतील. २०१७-१८ मध्ये याच वेगाने करसंकलन वाढेल अशी अर्थसंकल्पात अपेक्षा व्यक्त केली आहे. फिस्कल डेफिसिट मर्यादेत ठेवण्यासाठी व्यक्तिगत आयकरामध्ये जेवढी नॉमिनल सूट दिली त्यापेक्षा जास्त देणे कदाचित शक्य होणार नव्हते. २०१७-१८ मध्ये जर करसंकलन अधिक वाढले तर कदाचित पुढच्या वर्षी अधिक करसवलती मिळतील असे दिसते. नोटबंदीच्या कठोर निर्णयानंतर सरकार याबाबतीत गंभीर आहे हा संदेश नक्कीच समाजात गेला आहे. त्यातून गरीब कल्याण जनेसाला आय.डी.एस पेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नसावी. अर्थातच नक्की आकडे समजायला अजून काही महिने जावे लागतील आणि त्यामुळे या वर्षी करसवलत देणे शक्य झाले नसावे.

युपीए सरकारने शेतकर्‍यांचे कर्ज माफ करायचा निर्णय घेतला होता. नोटबंदीमुळे जनतेतला असंतोष दूर करायला सरकार असे काहीतरी करेल असे वाटले होते. पण असा डायरेक्ट पॉप्युलिस्ट निर्णय घेतला नाही हे चांगलेच झाले. शेतकर्‍यांना एकूण १० लाख कोटींचे क्रेडीट उपलब्ध करून देणार असे जेटली म्हणाले. यापूर्वी हा आकडा किती होता हे मला माहित नाही त्यामुळे त्याविषयी भाष्य करत नाही. पण मुद्राकोषातून हाच पॉप्युलीस्ट प्रकार थोड्या छुप्या प्रकारे चालेल असे मला वाटते. मागच्या वर्षी मुद्रा कर्जांसाठी १.२२ लाख कोटींचे उद्दिष्ट होते. तर ते या वर्षी दुप्पट करून २.४४ लाख कोटी करण्यात येणार आहे.आणि यासाठी अनुसुचित जाती/जमाती, महिला, दुर्बल वर्ग इत्यादींना प्राधान्य देण्यात येणार आहे आणि ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. अशा प्रकारची कर्जे दिली जाण्यात काहीच गैर नाही. अशा लहान उद्योजकांना प्रोत्साहन दिले पाहिजे. पण हा आकडा बघता योग्य ते ड्यू डिलिजन्स कर्जे देताना होईल का याबाबत मात्र मला शंका वाटते. २.४४ लाख कोटींपैकी ५% कर्जे जरी बुडली तरी किंगफिशरला दिलेल्या आणि बुडलेल्या कर्जाइतका हा आकडा होईल. यातून मोठ्या प्रमाणावर लोकांपर्यंत पोहोचता येईल. जर ही योजना यशस्वी झाली तर सरकार याचे श्रेय घेऊ शकेल आणि यशस्वी झाली नाही तरी हा प्रकार पॉप्युलीस्ट असेलच. १९७० च्या दशकात कर्जमेळावे हा प्रकार चालायचा त्याचा हा प्रकार म्हणजे दुसरा अवतार झाला नाही म्हणजे मिळवली.

इतर मुद्द्यांविषयी उद्या लिहितो.

अनुप ढेरे's picture

3 Feb 2017 - 9:57 am | अनुप ढेरे

फिस्कल कॉन्सॉलिडेशन

हे लोक छान खेळपट्टी बनवून देणार आणि फुडलं सरकार काँग्रेसच आलं की आहेच मग करमाफी वगैरे...

आजच्या अर्थसंकल्पातील सर्वात लक्षवेधी आणि सर्वात महत्त्वाची आणि सर्वात अभिनंदनीय बाब जर कोणती असेल तर ती म्हणजे प्लॅन आणि नॉन प्लॅन हा खर्चांतला भेद नष्ट करणे. भारताच्या विकासाच्या आड येणारी ही फार मोठी साडेसाती होती हे या क्षेत्रातल्या लोकांना माहित असेल.

सतिश गावडे's picture

2 Feb 2017 - 9:49 am | सतिश गावडे

उत्पन्नाच्या स्रोताच्या जागी कर कापल्यानंतर वरील रकमेवरील कर वाचवण्यासाठी नोकरदार लोक ज्या नाना खटपटी आणि लटपटी करतात त्यावरून व्यावसायिक लोक किती सहजतेने कर चुकवू शकतात याची कल्पना येते.

नोकरदारांना उत्पन्नावर कर, कर दिल्यानंतर उरलेल्या उत्पन्नातून काही खरेदी केले तर त्यावर कर, कर दिल्यानंतर उरलेले उत्पन्न कुठे गुंतवले तर त्यावर मिळणारे व्याजावर कर असा सगळा आंनदी आनंद आहे.

या उलट करचुकव्या व्यावसायिकांचे. जर सारे व्यवहार ट्रॅक झाले आणि कर विभागाने सतर्कता दाखवली तरच हे सापडणार.

माझ्या पाहण्यातील एक उदाहरण. अठरा रुपये वडापाव, सकाळी दुकानासमोर वडापाव घ्यायला रांग. सारा व्यवहार रोखीने. या दुकानाचा मालक कर भरत असेल का असा प्रश्न नेहमी पडतो.

हतोळकरांचा प्रसाद's picture

2 Feb 2017 - 10:26 am | हतोळकरांचा प्रसाद

माझ्या पाहण्यातील एक उदाहरण. अठरा रुपये वडापाव, सकाळी दुकानासमोर वडापाव घ्यायला रांग. सारा व्यवहार रोखीने. या दुकानाचा मालक कर भरत असेल का असा प्रश्न नेहमी पडतो.

हे दिसायला छोटे दिसणारे रस्त्याच्या बाजूचे खाद्य दुकानवाले बहुतेक वेळेस नाहीच भरत कर. आणि म्हणूनच हे लोक सध्या आयकर विभागाच्या टार्गेटवर आहेत - संदर्भ खालील बातमी. पण आयकारवाल्यानी कुठून कुठून सुरुवात करायची हाच प्रश्न आहे. अगदी इथेही एका चर्चेत एका सन्माननीय सदस्यांनी वडापाववाल्याना टार्गेट करण्यावर आक्षेप घेतल्याचे आठवते.

http://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/income-tax-depar...

खर्चामधे दोन लोकांची पगार आणि सामानाची किंमत, भाडे, भांड्यांचे पैसे, पाण्याचे पैसे, गाडीचे पैसे, प्रवासाचे पैसे, फोनचे पैसे, वाया गेलेल्या अन्नाचे पैसे, नॅपकिन, इ इ सर्व पकडावे लागेल. (पगार हा अनस्किल्ड लोकांचा मानला तर जवळजवळ १६०००/-- प्रतिमाह प्रतिव्यक्ति असेल. पण हा आपण पुढे उत्पन्नात अ‍ॅड करू कर लावताना.)
==========
आता,
विक्रीचे तास = १२
एका घाण्याचे मिनिट = १०
एका घाण्यातले वडे = २०
वड्याची किंमत = १८
तर वर्षात = १२*६०/१०*२०*१८*३६५ = ९५,००,००० इतका रेवेन्यू झाला. एस एम इ चे लाभ याला दिले तर ९६*६% = ५.७ लाख इतका टॅक्सेबल नफा मानला जाईल.
यावर टॅक्स स्लॅब असतील (नक्की कल्पना नाही.). पण नाहीत मानला तरी ५.७*२५% = १.४ लाख प्रतिवर्श कर भरायला पाहिजे. स्लॅब असतील तर नगण्य.

अभिजीत अवलिया's picture

2 Feb 2017 - 10:43 am | अभिजीत अवलिया

+१.
जास्तीत जास्त लोक कराच्या जाळ्यात यावेत ह्यासाठी काहीतरी मार्ग काढतील असे वाटले होते. बाकी काही एकवेळ नीट नाही केले तरी रस्ते / महामार्ग विकासावर भाजपा सरकारचा विशेष जोर असतो हे कौतुकास्पद आहे.

गौतमीपुत्र सातकर्णि's picture

2 Feb 2017 - 1:21 pm | गौतमीपुत्र सातकर्णि

अर्थसंकल्पाची स॑क्षिप्त माहिती व अर्थम॑त्र्याच॑ भाषण(Hindi and English) pdf स्वरुपात येथे मिळेल.

दीपक११७७'s picture

2 Feb 2017 - 7:22 pm | दीपक११७७

प्रतिक्रिया वाचुन बरीच माहिती मिळाली.
खुप आभार मिल्टन जी!

सुबोध खरे's picture

2 Feb 2017 - 8:43 pm | सुबोध खरे

निवडणुका तोंडावर असताना सुद्धा सवंग लोकप्रियतेचे निर्णय घेतले नाहीत याबद्दल श्री मोदी आणि श्री जेटली यांचे अभिनंदनच करावे लागेल.

अनुप ढेरे's picture

2 Feb 2017 - 10:00 pm | अनुप ढेरे

काही लोक मजेशीर असतात. डाळ ९० वरून १४०वर गेल्यावर "महागाईने कंबरडे मोडले हो आमचे!" ओरडणारे "शी: देऊन देऊन बारा हजाराची सवलत... एव्ढ्याने काय होणारे" म्हणताना ऐकले.

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 12:30 pm | सुबोध खरे

http://www.newindianexpress.com/states/karnataka/2016/dec/15/tur-dal-pri...
याबद्दल अशा लोकांचे म्हणणे आता काय आहे हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

सुबोध खरे's picture

3 Feb 2017 - 12:32 pm | सुबोध खरे

Sources in the APMC said red gram was tendered from a minimum price of `3,808 per quintal to a maximum of `4,555 on Wednesday. The model price was `2,289 per quintal. Meanwhile in Ballari, the retail price of red gram was between `3,000 and `4,816 per quintal.

मिल्टन's picture

2 Feb 2017 - 10:42 pm | मिल्टन

२०२२ पर्यंत सगळ्यांना घर मिळावे असे महत्वाकांक्षी ध्येय सरकारचे आहे. अर्थातच हे पूर्ण होणे कठिण आहे. पण त्यासाठी लहान घरांसाठी कर्जांवरील व्याजावर सवलतीची घोषणा पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरच्या भाषणात केली होती. कालच्या अर्थसंकल्पात अरूण जेटलींनी या क्षेत्राला इन्फ्रास्ट्रकचरचा दर्जा दिला. त्यामुळे या क्षेत्राला दिल्या जाणार्‍या कर्जांना रिझर्व्ह बँकेच्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राच्या नियमांप्रमाणे कर्ज देता येतील. इतर कर्जांमध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला दिल्या जाणार्‍या कर्जांमध्ये रिस्ट्रक्चरींग वगैरेंचे नियम वेगळे आहेत. त्याचा फायदा या क्षेत्राला मिळू शकेल.

सरकारने इन्फ्रास्ट्रकचर क्षेत्रावर बराच भर दिला आहे आणि ते या अर्थसंकल्पातही दिसून येत आहे. रेल्वे, रस्ते आणि जहाजवाहतूक क्षेत्रांसाठी अर्थसंकल्पात २ लाख ४१ हजार कोटींची तरतूद आहे. महामार्गांसाठी मागच्या वर्षी जवळपास ५८ हजार कोटींची तरतूद होती.ती वाढवून या वर्षी जवळपास ६५ हजार कोटी करण्यात आली आहे. २०१४-१५ पासून तीन वर्षात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत १ लाख २० हजार किलोमीटर्सचे रस्ते बांधायचे ध्येय आहे. या पायाभूत सोयींवर लक्ष दिले जात आहे ही नक्कीच चांगली गोष्ट आहे. शेवटी चांगले रस्ते म्हणजे देशाच्या धमन्या असतात. या चांगल्या पावलांचे परिणाम यापुढच्या काळात दिसायला लागतील.

लघु उद्योगांवरील कॉर्पोरेट कर ३०% वरून २५% वर खाली आणायची घोषणा या अर्थसंकल्पात आहे. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीची क्षमता आहे. नोटबंदीमध्ये हे क्षेत्र नक्कीच भरडून निघाले होते.तेव्हा या क्षेत्राला दिलासा देणारा हा निर्णय आहे. दुसरे म्हणजे मोठ्या उद्योगांचे सप्लायर्स अनेकदा अशा लघु उद्योगांपैकी असतात.तेव्हा लघु उद्योगांना सवलत मिळाली तर त्यापैकी थोडा वाटा मोठ्या उद्योगांना मिळेल (कच्चा माल स्वस्तात मिळून) आणि त्याचा फायदा थोड्या प्रमाणात तरी लोकांना होईल अशी अपेक्षा आहे.

फॉरेन इन्व्हेस्टमेन्ट प्रोमोशन बोर्ड (एफ.आय.पी.बी) रद्द करण्याची घोषणा या अर्थसंकल्पात आहे. आता ९०% एफ.डी.आय 'ऑटोमॅटिक क्लिअरन्स' पध्दतीने होत असल्यामुळे या बोर्डाची गरज नाही असे जेटली म्हणाले. उरलेल्या १०% साठी काहीतरी यंत्रणा करण्यात येईलच. एकेकाळी एफ.आय.पी.बी कडून अनेक प्रस्ताव क्लिअर व्हायला वेळ लागत असे असे वाचल्याचे आठवते. त्या तुलनेत सध्याची परिस्थिती नक्कीच चांगली आहे.

एकूणच या अर्थसंकल्पात भव्यदिव्य काही नसले तरी असे काही चांगले निर्णय घेतले गेले आहेत. करांचा बोजा सामान्य नागरिकांसाठी कमी केला आहे. ५ लाखापर्यंत उत्पन्न असणार्‍यांसाठी १०% वरून ५% वर कर आणणे म्हणजे त्यांच्यासाठी कराचा बोजा अर्धा झाला असा त्याचा अर्थ झाला. आणि अर्थातच इतरांनाही १२ हजार ५०० रूपयांची करसवलत मिळणार आहे. सेवाकरात वृध्दी केली जाईल असा अंदाज होता. सध्याच्या १४% सेवाकरावरून जी.एस.टी मुळे अपेक्षित असलेल्या १८% दराजवळ सेवाकर नेला जाईल असा अंदाज होता. तसे काही झालेले नाही. पण त्यातून होणार असे आहे की जी.एस.टी अंमलात आल्यानंतर सुरवातीला 'जोर का झटका' लागेल. यावेळी हा सेवाकर थोडा वाढवला असता तर तोच 'जोर का झटका' थोडा 'धीरेसे' लागला असता. त्याचवेळी अगदी उघडपणे पॉप्युलिस्ट असा निर्णयही घेतलेला नाही. विशेषत: राज्यांमधील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना. याचे श्रेय नक्कीच द्यायला हवे. तसेच यु.बी.आय वर जेटली एक शब्दही बोलले नाहीत हे पण चांगलेच आहे.

या अर्थसंकल्पामधील मला अजिबात न आवडलेला निर्णय म्हणजे मनरेगासाठी वाढीव तरतूद करणे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर सुरवातीला मनरेगावर भरपूर टिका केली गेली होती. पण त्याच योजनेला वाढीव तरतूद देणे हे काही फारसे पटलेले नाही.

माझा अंदाज असा की पुढील वर्षी सरकार अधिक करसवलती देईल. याचे कारण २०१९ च्या निवडणुकांच्या पूर्वी तो शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प असेल. युपीए सरकारने २००८ मध्ये शेतकर्‍यांची कर्जे माफ केली होती आणि एक पॉप्युलीस्ट निर्णय घेतला होता. मोदी सरकार त्याप्रकारचा नसला तरी अन्य कोणता पॉप्युलीस्ट निर्णय घेईलच असे वाटते.

सुरवातीला अगदीच बोअरींग अर्थसंकल्प आहे असे वाटले होते. पण फिस्कल कॉन्सॉलिडेशन, पायाभूत क्षेत्रांवर दिलेला भर आणि टारगेटेड करसवलती यामुळे या अर्थसंकल्पाला मी तरी तितके वाईट म्हणणार नाही.

पैसा's picture

2 Feb 2017 - 10:54 pm | पैसा

प्रतिसाद आवडला. प्रथमदर्शनी हेच वाटले होते.

अनरँडम's picture

3 Feb 2017 - 12:17 am | अनरँडम

या अर्थसंकल्पामधील मला अजिबात न आवडलेला निर्णय म्हणजे मनरेगासाठी वाढीव तरतूद करणे. मोदी सरकार सत्तेवर आल्यावर सुरवातीला मनरेगावर भरपूर टिका केली गेली होती. पण त्याच योजनेला वाढीव तरतूद देणे हे काही फारसे पटलेले नाही.

माझा थोडा गोंधळ होत आहे. तुमच्या शब्दांतून पुढील पर्यायांपैकी एक काहीतरी म्हणायचे आहे असे दिसते.

१. मनरेगा ही योजनाच फारशी फलदायी नसल्याने वाढीव तरतूद पटलेली नाही.
२. मनरेगा योजना चांगली आहे पण वाढीव तरतूद अनावश्यक वाटल्याने पटली नाही.
३. सरकारने आधी ज्या योजनेवर टिका केली, त्याच योजनेला वाढीव तरतूद देणे हे (इर्रेस्पेक्टिव ऑफ मनरेगा) पटले नाही.

बर्‍याचदा लोकांचे (मी धरून) सरकारी योजनांच्या परिणामकारकतेविषयी काही मत तयार झालेले असते. माहिती आणि डेटा पाहून मगच अशा योजनांच्या परिणामकारकतेबद्द्ल मत तयार करावे या उद्देशाने मुद्दा क्र. १ आणि २ वर विस्तृत चर्चा होऊ शकते.

मिल्टन's picture

3 Feb 2017 - 10:49 am | मिल्टन

मनरेगा ग्रामीण भागातील रोजगार हमी योजना आहे. मी कुठल्याही गावांमध्ये जाऊन परिस्थिती बघितली नाही आणि माझे मत जे काही वाचले आहे त्यावरच अवलंबून आहे. अर्थातच ज्या बाजूची मते अधिक वाचनात येतात त्या बाजूकडे आपले मत झुकायची शक्यता सर्वात जास्त.

मी जे काही वाचले आहे त्यावरून मनरेगामधून ग्रामीण भागात खर्च झाला आहे पण तितक्या प्रमाणावर कायमस्वरूपी अ‍ॅसेट निर्मिती झालेली नाही. म्हणजे रस्ते बांधले पण एका पावसाळ्यात ते वाहून गेले वगैरे. त्यामुळे मनरेगाचा परिणाम महागाई वाढविण्यात झाला.ज्या राज्यात मनरेगाची अंमलबजावणी सर्वात जास्त झाली त्या राज्यांमध्ये महागाई जास्त वाढली अशा स्वरूपाचे लेख ई.पी.डब्ल्यू सारख्या डावीकडे झुकणार्‍या नियतकालिकांमध्येही आले होते असे वाचल्याचे आठवते. दुसरे म्हणजे मनरेगामधून दररोज मिळणार्‍या मजुरीची रक्कम मजुरांना अन्यत्र मिळणार्‍या मजुरीपेक्षा जास्त असल्यामुळे शेती, बांधकाम इत्यादी इतर क्षेत्रांसाठी मजुरांचा तुटवडा होऊ लागला. अर्थातच यामागे मजुरांची पूर्वी होणारी पिळवणूक थांबली की मनरेगामधून 'कॉमिपिटिटिव्ह मार्केट' मध्ये जेवढी मजुरी मिळेल त्यापेक्षा त्यांना जास्त मजुरी दिली जात आहे हे मला माहित नाही. शक्य आहे की समाजवादी/डाव्या लेखकांचे लेख वाचल्यास याविषयीचे मनातील चित्र उलटे उभे राहिल. तरीही मनरेगाचा एक फायदा म्हणजे 'मनी इल्यूजन' मुळे का होईना हातात पैसा खेळायला लागल्यामुळे काही प्रमाणात नक्षलवादी भागांमध्ये तरूण नक्षलवादाकडे झुकायचे प्रमाण कमी झाले असेही वाचले आहे.

काहीही असले तरी कुठल्याही योजनेत त्रुटी आहेत म्हणून ती योजना बंद करायचे कारण होऊ शकत नाही.योजनेत त्रुटी असतील तर त्या दूर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला हवीत. मनरेगावर २०१४ पासून मोदी सरकारने टिका केली होती. त्यावेळी वाटले होते की या योजनेवरील खर्च कमी केला जाईल.पण मोदी एकदा लोकसभेत मनरेगा म्हणजे 'काँग्रेसच्या अपयशाचे मॉन्युमेन्ट' म्हणून चालूच राहिल असे म्हणाले. विरोधी पक्षाच्या अपयशाचे मॉन्युमेन्ट म्हणून करदात्यांचे पैसे खर्च करायची काहीच गरज नाही ना.

तेव्हा माझा विरोध तिसर्‍या कारणामुळे जास्त आहे.

मराठी_माणूस's picture

3 Feb 2017 - 10:22 am | मराठी_माणूस

महामार्गांसाठी मागच्या वर्षी जवळपास ५८ हजार कोटींची तरतूद होती.ती वाढवून या वर्षी जवळपास ६५ हजार कोटी करण्यात आली आहे.

मागील वर्षीच्या तरतुदीमधुन कीती खर्च केला आणि कीती रस्ते बांधले ही माहीती समजु शकेल का ?

याविषयी सरफेस ट्रान्स्पपोर्ट मंत्रालयाच्या किंवा एन.एच.ए.आय च्या वेबसाईटवर माहिती मिळू शकेल. पण बरेच महामार्ग पीपीपी मॉडेलमध्ये बांधले जातात आणि अशा महामार्गांचे काम दोन-अडीच वर्षे पर्यंत चालते त्यामुळे मागच्या वर्षीच्या तरतुदीमधून किती रस्त्यांवर काम चालू झाले हे शोधून काढायला थोडे कष्ट पडतील हे नक्की. तरीही मागच्या वर्षीच्या तरतुदींमधून महामार्ग तरी पूर्ण बांधून झाले असायची शक्यता कमी. ग्रामसडक योजनेतील रस्ते बांधून पूर्ण झाले असायची शक्यता सर्वात जास्त.

इतर कर्जांमध्ये आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राला दिल्या जाणार्‍या कर्जांमध्ये रिस्ट्रक्चरींग वगैरेंचे नियम वेगळे आहेत. त्याचा फायदा या क्षेत्राला मिळू शकेल.

हाउसिंग सेक्टरला रिस्ट्रक्चरचरिंग ची गरज नसते.

मिल्टन's picture

6 Feb 2017 - 10:45 am | मिल्टन

हो बरोबर. रिस्ट्रक्चरींगची गृहबांधणी क्षेत्राला गरज नसते पण कमर्शिअल रिअल इस्टेटला असते. इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचे रिझर्व्ह बँकेचे इतर प्रकारच्या कर्जांपेक्षाचे नियम वेगळे आहेत आणि त्यात रिस्ट्रक्चरींग हा एक मुद्दा आहे. तो या क्षेत्राला लागू होणार नाही. पण इतर मुद्दे लागू होतील.

अनुप ढेरे's picture

3 Feb 2017 - 9:55 am | अनुप ढेरे

दुसर्‍या घराच्या व्याजावर पूर्ण वजावट मिळायची. ती आता जास्तीत जास्तं २ लाख मिळेल.

मिल्टन's picture

3 Feb 2017 - 11:31 am | मिल्टन

दुसर्‍या घराच्या व्याजावर पूर्ण वजावट मिळायची. ती आता जास्तीत जास्तं २ लाख मिळेल.

हो हा एक महत्वाचा निर्णय आहे. पहिल्या घरावर जास्तीत जास्त दोन लाख आणि दुसर्‍या घरावर पूर्ण वजावट मिळणे हा थोडा विचित्र प्रकारच होता. उलटे असते तर समजू शकतो. या निर्णयामुळे ही त्रुटी दूर झाली आहे हे चांगले झाले. ज्यांनी जास्त करसवलत मिळेल म्हणून कर्जावर दुसरी घरे घेऊन ठेवली होती अशा मंडळींना आता अडचण होईल.

अनुप ढेरे's picture

3 Feb 2017 - 12:24 pm | अनुप ढेरे

दुसर्‍या घरावर पूर्ण वजावट मिळणे हा थोडा विचित्र प्रकारच होता.

अ‍ॅक्चुअली आधीचचं लॉजिकल होतं. दुसरं घर घेऊन भाड्यानी देणं हा व्यवसाय म्हणता येईल. सो ज्याप्रमाणे व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या व्याजाला पूर्ण वजावट मिळते (कर व्याजानंतरच्या फायद्यावर लागतो) तशीच इथे मिळायची.

मिल्टन's picture

3 Feb 2017 - 12:54 pm | मिल्टन

हो बरोबर आहे. पण बहुतांश लोकांसाठी पहिले घर आणि त्यावरील कर्ज हा बोजा मोठा असतो. समजा पहिल्या घरावर पूर्ण वजावट दिली तर हे लोक पहिल्या घराच्या कर्जावरील व्याजावर पूर्ण वजावट घेऊन म्हणजे अधिक पैसे वाचवून पाहिजे असेल तर दुसरे घर लवकर घेऊ शकतील आणि त्यातून अर्थव्यवस्थेला अधिक चालना मिळेल या अर्थाने म्हटले.

हतोळकरांचा प्रसाद's picture

3 Feb 2017 - 1:17 pm | हतोळकरांचा प्रसाद

साधारणपणे ३५ लाख कर्जावर सुरवातीचे ५ एक वर्षे दरवर्षी ४ लाख व्याज बसत असेल. म्हणजे ४ ऐवजी २ लाखच सवलत मिळाली तर २ लाख जास्तीचे करप्राप्त उत्पन्न ठरेल. समजा हे २ लाख ५-१० लाखाच्या स्लॅब मध्ये गेले तर २०% कर बसेल म्हणजे ४०,००० रु. तर मला असा प्रश्न पडतो कि हे दुसरे घर घेणारे वर्षाला ४०,००० रु. वाचावेत म्हणून घर घेत असतील कि भाडे + घराचे एप्रिसिएशन आणि जाणारा ईएमआय याकडे बघून घेत असावेत?

मार्मिक गोडसे's picture

3 Feb 2017 - 10:19 am | मार्मिक गोडसे

त्याचवेळी अगदी उघडपणे पॉप्युलिस्ट असा निर्णयही घेतलेला नाही. विशेषत: राज्यांमधील निवडणुका तोंडावर आलेल्या असताना. याचे श्रेय नक्कीच द्यायला हवे.

सहमत. १ फेब्रुवारीला बजेट मांडण्याचा सरकारचा निर्णय प्रामाणिक होता हे दिसून येते.
मनरेगाबाबत अनरँडम यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर लेखकाच्या मताच्या प्रतिक्षेत.

नोटबंदी च्या निर्णयाच्या पार्श्व भूमीवर . पुढील वर्षी असा निर्णय घेणं योग्य ठरेल किंवा एखादी योजना जाहीरही होईल .कारण २०१९ ला निवडणूक आहेत त्यामुळे २०१८ चा अर्थसंकल्प अधिक महत्वाचा आहे . रस्ते बांधणी आणि पायाभूत सुविधांसाठीच्या योजना निश्चितच आशादायी आहेत . मनरेगा योजना अनेक लोकांपर्यंत पोचली आहे त्यामुळे निवडणुकीतील विधानांचा आणि अर्थसंकल्पाचा संबंध जोडू नये . चांगल्या योजनेसाठी वाढीव तरतूद आवश्यक होती . एकंदरीत काही नवीन काही जुने पण त्यातल्या त्यात संतुलित अर्थसंकल्प .

पूर्ण अर्थसंकल्पात नमामि गंगे योजनेविषयी काही तरतूद आढळली नाही. या प्रकल्पासाठी काही वेगळी तरतूद आहे का ? असल्यास त्यासाठी फंड रेझिंग कुठून होतंय?

मला अर्थव्यवस्थेतील शष्प काळात नाही पण नोटबंदीनंतर सरकारजवळ बऱ्यापैकी रोख उपलब्ध होईल. त्याआधारे काही प्रकल्प सुरु करता येतील का असा माझा भाबडा प्रश्न आहे.

रच्याकने..वाजपेयींच्या महत्वाकांक्षी नद्या जोडणी प्रकल्पाचे पुढे काय झाले ? हे सरकार त्याविषयी विचार करते आहे का ?

मिल्टन's picture

3 Feb 2017 - 12:15 pm | मिल्टन

पूर्ण अर्थसंकल्पात नमामि गंगे योजनेविषयी काही तरतूद आढळली नाही. या प्रकल्पासाठी काही वेगळी तरतूद आहे का ? असल्यास त्यासाठी फंड रेझिंग कुठून होतंय?

मागच्या अर्थसंकल्पात यासाठी काही तरतूद होती असे आठवते. यावेळी ती नाही. याचा अर्थ नमामि गंगे ही योजना ज्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते (बहुदा वॉटर रिसोर्सेस अ‍ॅन्ड रिव्हर डेव्हलपमेन्ट) त्या मंत्रालयाला जितके पैसे दिले गेले आहेत त्यातून त्या मंत्रालयाने इतर सगळ्या योजनांबरोबर या योजनेसाठी खर्च करायचा. जर का नमामि गंगेसाठी म्हणून काही ठराविक रक्कम दिली गेली असती तर तेवढी रक्कम त्या मंत्रालयाला नमामि गंगेसाठीच वापरावी लागली असती आणि इतर योजना/प्रकल्पांसाठी वापरता आली नसती.

यासाठी फंड रेझिंग सरकारचा जो एकूण महसूल आहे (कॉर्पोरेट आणि वैयक्तिक आयकर, सेवाकर, सीमाशुल्क इत्यादी) त्यातून किंवा जेवढे पैसे कर्जाऊ घेतले आहेत त्यातून होते. आणि त्यात सर्व मंत्रालयांसाठी पैसे अ‍ॅलॉट होतात.

नोटबंदीनंतर सरकारजवळ बऱ्यापैकी रोख उपलब्ध होईल. त्याआधारे काही प्रकल्प सुरु करता येतील का असा माझा भाबडा प्रश्न आहे.

याविषयी कल्पना नाही.

वाजपेयींच्या महत्वाकांक्षी नद्या जोडणी प्रकल्पाचे पुढे काय झाले ? हे सरकार त्याविषयी विचार करते आहे का ?

हा प्रकल्प अजूनही सर्वेक्षणे आणि अभ्यास याच स्टेजमध्ये आहे. या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेला खर्च लक्षात घेता यावर फार काही काम पुढील काही वर्षात होईल असे वाटत नाही. आणि नर्मदेवरील एका सरदार सरोवर धरणाला इतकी वर्षे लागली, इतकी आंदोलने झाली, इतके लोक विस्थापित झाले, इतका विरोध झाला त्यावरून हा महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या पणतवंडांच्या काळात पूर्णत्वाला जायचीच शक्यता (गेलाच तर) जास्त. (पु.लंच्या म्हैसमधील-- एका कोंबडीस अडीच तास आणि इथे अखंड म्हैस आहे तर किती वेळ लागेल--मांडा त्रैराशिक वरून प्रेरणा घेतली आहे).

अनुप ढेरे's picture

3 Feb 2017 - 12:19 pm | अनुप ढेरे

नद्या जोडणी प्रकल्पाचे पुढे काय झाले ?

एकत्रीत हा प्रकल्प करतो असं म्हटलं तर बराच आरडा ओरडा होईल. पण एक एक प्रक्लप राबवायचा विचार आहे असं वाटतय. उत्तर प्रदेशातल्या बुंदेलखंडामध्ये केन बेटवा लिंक प्रकल्प चालू आहे. बुंदेलखंडात गेल्या वर्षी भीषण दुष्काळ होता.

http://www.thehindu.com/news/national/other-states/Ken-Betwa-river-linki...

अनुप ढेरे's picture

3 Feb 2017 - 12:25 pm | अनुप ढेरे

नमामि गंगे, स्मार्ट सिटी याचा उल्लेख दिसला नाही. स्वतःच्याच फ्लॅगशिप स्कीमांबद्दल एवढी उदासीनता समजेना...

मिल्टन's picture

3 Feb 2017 - 11:57 am | मिल्टन

काही राहिलेले मुद्दे---

१. विजय मल्ल्याप्रमाणे कर्ज बुडवून पळून गेलेल्यांची मालमत्ता जप्त करण्यासाठी कायदा करण्यात येणार. हा निर्णय अर्थसंकल्पाबरोबर जाहिर केला म्हणून अर्थसंकल्पाचा भाग असे म्हणायचे. अन्यथा हा निर्णय इतर कधीही जाहिर करता आला असता. किंगफिशरला काही कर्जे विजय मल्ल्याच्या पर्सनल गॅरंटीवर मिळाली होती. अर्थातच जर किंगफिशरला कर्ज फेडता आले नाही तर निदान तेवढी कर्जे फेडायची जबाबदारी विजय मल्ल्याची होती. पण समजा विजय मल्ल्याची पर्सनल गॅरंटी नसती तर किंगफिशरने बुडविलेली कर्जे फेडायला विजय मल्ल्या बांधील नव्हता.कारण विजय मल्ल्या आणि किंगफिशर या दोन वेगळ्या एन्टीटी आहेत/होत्या.

त्यामुळे हा प्रस्ताव पर्सनल गॅरंटीवर कंपनीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता पळून जाणार्‍या मर्यादित गोष्टीसाठी लागू होईल असे प्रथमदर्शनी वाटते. भविष्यात जर कुणा बड्या उद्योगपतीने स्वतःची गॅरंटी दिली नाही तर पळून जाणार्‍यांना काहीही करता येणार नाही.

२. घरावरील लॉन्ग टर्म कॅपिटल गेन टॅक्ससाठी पूर्वी कालावधी ३ वर्षे होता तो आता २ वर्षे करण्यात आला आहे. तसेच इंडेक्सेशनसाठी बेस वर्ष १९८१ वरून २००१ करण्यात आले आहे. १९८१ मध्ये हा इंडेक्स १०० तर २०१६-१७ साठी ११२५ होता. समजा १९८१ मध्ये कोणी घर ५० हजारात घेतले आणि २०१६-१७ मध्ये ते १ कोटीला विकले तर एकूण कॅपिटल गेन १ कोटी वजा ५० हजार गुणिले ११२५ भागिले १०० = ९४ लाख ३७ हजार ५०० इतका झाला असता आणि त्यावर कर भरायला लागला असता. बेस वर्ष १९८१ घेतल्यामुळे जवळपास सगळी घराची किंमत ही कॅपिटल गेन म्हणून गणली जात होती. बेस वर्ष २००१ केल्यामुळे करपात्र कॅपिटल गेन कमी होईल अशी अपेक्षा आहे. जर सगळे आकडे त्याच गुणोत्तरात बदलणार असतील तर कॅपिटल गेन कमी कसा होईल हे मलातरी समजलेले नाही. हे नक्की कसे होईल याविषयी मिपावरील सी.एंपैकी कोणी लिहिले तर चांगले होईल.

विविध वर्षांमध्ये आयकराच्या स्लॅबमध्ये नक्की कसे बदल झाले याविषयी बर्‍याचदा आपल्याला कुतुहल असते. याविषयी गुगलमध्ये "income tax slabs in india 1948" (किंवा अन्य दुसरे वर्ष) असे लिहिले तर पहिलाच रिझल्ट--- द टिमवर्क ही वेबसाईट मिळेल. त्यावर चांगली माहिती आहे. यावरून कळते की आर्थिक वर्ष १९७९-८० मध्ये आयकराच्या तब्बल ९ स्लॅब होत्या आणि करमुक्त उत्पन्न वर्षाला ८ हजार रूपये (म्हणजे महिन्याला ६६७ रूपये) होते. त्यामानाने आताच्या तीन स्लॅब हा सुटसुटीत प्रकार आहे.

अजून एक नवीन पाऊल म्हणजे लाँग टर्म कॅपिटल गेन्सजे टॅक्स फ्री होते ते आता फक्त सिक्युरिटी ट्रांझॅक्षन टॅक्स दिलेला असल्यासच टॅक्स फ्री राहतील.( IPO, FPO सोडून)

ही ट्रिक अनेक वर्ष लोक पैसा काळ्याचा पांढरा करायला वापरत होते. सर्क्युलर ट्रेडिंगने काही पेनी स्टॉक्सची किंमत कायच्या काय वाढवून मग त्यातून टॅक्स फ्री पैसा मिळवत होते. त्यावर उपाय म्हणून हा नियम आणला आहे.

http://www.livemint.com/Politics/ndOTZifQg9LBIDfV0UNFxK/Budget-2017-Plug...

मनरेगा वरती सरकार ने वाढवलेली तरतूद अजिबात आश्चर्य कारक वाटली नाही. मुळात ह्या योजनेला पांढरा हत्ती ठरवून कॉंग्रेस चे उपयश म्हणून चालू ठेवण्याचा मानस बोलून दाखवणाऱ्या मोदींना आपले शब्द गिळावे लागतायत, गेल्या दोन वर्षात काही जाहीर कार्यक्रमात मोदींनी आणि जेटली नि ह्या योजनेवरील वाढलेली तरतूद सरकार च यश म्हणून प्रस्तृत केली आहे. मुळात जेंव्हा UPA १ नि हि योजना सुरु केली तेंवा २००९ पर्यंत त्याचे बरेच चांगले आणि काही वाईट परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसून आलेले.
ग्रामीण भारतातील लोकांच मजुरी दर वाढणे, पैसे खर्च करण्याची क्षमता वाढणे, गरीब-दलित-महिला यांना या योजनेत मोठ्या प्रमाणात सामावून घेण्यात येणे, २००६-२००९ या काळात काही भागात दुष्काळ पडून हि सामाजिक असंतोष कमी राहणे, शहरातील स्थलांतरात घट होणे इत्यादी सुपरिणाम दिसून आले. तसेच याचे काही दुष्परिणाम हि होते. ग्रामीण भागातील मजुरी वाढल्यामुळे शेतमजूर न मिळणे, महागाई काही प्रमाणात वाढणे, मजुरी कागदपत्री वापरून मशीन ने कामे करणे, भ्रष्टचार, यातून होणार्या कामांचा निच्च दर्जा इत्यादी इत्यादी.
याच योजनेने कॉंग्रेस चे तारू २००९ च्या निवडणुकीत तारले. मात्र २००९ नंतर या योजनेतील दुष्परिणाम दिसू लागले, याचे मुख्यत कारण सरकारचा ह्या योजनेवरील उडालेले लक्ष. योजनेतील वाढणारा भ्रष्टाचार पाहून बहुतांश अर्थतज्ञ यांनी हि योजना बंद करण्याचा सल्ला दिला. शरद पवारांनी सुधा या योजने मुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्याना मजूर तुटवडा होऊ लागला आहे हे निदर्शनास आणून दिल, मात्र हि योजना बंद न करता बदल सुचवले.
मोदी नि २०१४ साली लोकसभेत ह्या योजनेची मस्करी केली, मात्र कमी झालेला मान्सून, शेती ची उलटी प्रगती, ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्न आणि त्यातून तयार होणारा असंतोष पाहता सरकार ला लवकरच नांग्या टाकाव्या लागल्या. मोदी सरकार च एका बाबतीत मात्र कौतुक केल पाहिजे कि ह्या योजनेत दोन महत्वाचे क्रांतिकारक बदल घडवून आणले ज्याने या योजनेची परिणामकता कित्येक पटीने वाढवली
१. गेल्या ३ वर्षात ह्या योजनेत जवळ जवळ १० कोटी मजुरांना सामावून घेण्यात आल आहे यातील बहुतांशी लोकांची खाती बँकेत किंवा post ऑफिस मध्ये उघडण्यात आली, त्यात जनधन योजनेचा हि समावेश आहे. तसेच ६०-८० % लोकांची खाती आधार कार्ड शी संलग्न करण्यात आली. जेणेकरून पैसे हे सरळ मजुराचा खात्यावर जमा होतील आणि भ्रष्टाचार कमी होवून परिणामकता वाढेल.
२. यातून होणार्या कामांचा दर्जा सुधारण्यासाठी रस्त्यांची कामे कमी करून शेत तळी, शेत बांध बंधीस्ती, जलसंधारण अशी कामे हाती घेण्यात आली जेणेकरून ग्रामीण भागातील मजुरांना त्यांना काही अंशी माहित असेलेल्या क्षेत्रात उत्तम काम करून घेता येयील. जेटलींच भाषणात सुद्धा ह्याच प्रकारचा कामांचा उल्लेख होता.

मोदी सरकारच्या दोन वर्षाच्या काळात बहुतांश भागात दुष्काळ सदृश परस्थिती असताना सुधा सामाजिक असंतोष कंट्रोल मध्ये राहिला कारण मोदी सरकारच ह्या योजनेवरील वाढत लक्ष, आणि वाढता खर्च. अर्थात ह्या योजनेत बरेच कच्चे दुवे तसेच दुष्परिणाम आहेत जसे ते सर्व योजनेत असतात, ते दूर करून हि योजना यशस्वी पणे राबवता येयील atleast तोपर्यंत तरी जोपर्यंत ह्या योजनेला दुसरा पर्याय उपलब्द होत नाही. बर्याच अर्थतज्ञ नि या योजनेवर टीका करून हि बंद करण्याचा किंवा स्केल down करण्याचा सल्ला हि दिलाय, परंतु ग्रामीण अर्थव्यवस्थेची सध्याची स्थिती पाहता हे शक्य दिसत नाही आर्थिकदृष्ट हि आणि राजकीयदृष्ट्या हि.

MGNREGA 2.0: Modi to spend a record Rs 60,000 crore on what was UPA flagship scheme

10 years of MGNREGA: How the Modi government was forced to adopt the scheme

Now Modi govt praises MGNREGA, 'living monument of UPA’s failure'

सविस्तर प्रतिसादाबद्दल धन्यवाद अमितदादा.

एकूणच योजनेत त्रुटी आहेत म्हणून योजना बंद करायची म्हटली तर भारतात सगळ्याच योजना बंद कराव्या लागतील. तेव्हा योजनेत त्रुटी असेल तर ती दूर कशी करता येईल हे बघण्याकडे सरकारचा कल हवा. तसे होत असेल तर मनरेगावरील टिका ही निवडणुकपूर्व राजकीय टिका होती पण ती योजना खरोखरच बंद करायचा सरकारचा उद्देश नव्हता असे म्हणायला हवे.

अभिजीत अवलिया's picture

8 Feb 2017 - 10:33 am | अभिजीत अवलिया

सहमत.

रविकिरण फडके's picture

4 Feb 2017 - 8:51 pm | रविकिरण फडके

माझ्या असे ऐकण्यात आले की ही योजना - जी मोदींनी वाजतगाजत जाहीर केली होती - बासनात गुंडाळून ठेवण्यात आलेली आहे. ज्या जपानी कंपनीला ह्याविषयक सल्लागार नेमले होते त्यांनी काहीही प्रगती होत नाही ह्या कारणास्तव आपले अंग प्रकल्पातून काढून घेतले आहे. परंतु अधिक माहिती मिळू शकली नाही.
कुणाला काही authentic माहिती असल्यास लिहावे. कारण सरकार/ मोदी आता त्याबद्दल बोलत नाहीत.

माझ्या माहितीप्रमाणे हा प्रकल्प प्रचंड मोठा आहे. म्हणजे साधारण १-१.५ लाख कोटी. गंगेच्या पूर्ण प्रवाहावर ५८ जल शुद्धीकरण प्रकल्प बांधण्याचे प्रपोजल होते असे ऐकून आहे. चेन्नई स्थित VA Tech WABAG या कंपनीला याबाबत काहीतरी काम मिळाले आहे. ही माझी जुनी कंपनी. अर्थात ५८ प्रकल्प बांधणे हे कोण्या एका कंपनीच्या आवाक्यातले काम नव्हे. पण यांनतर कोणतंही टेंडर मार्केट मध्ये आल्याचे ऐकिवात नाही. ह्याच क्षेत्रात असल्यामुळे थोडेफार अपडेट्स असतात.

असो. हा प्रकल्प सुरु झाल्यास कितीतरी अलाईड उद्योगांना चालना मिळेल. हा प्रकल्प सुरु व्हावा अशी मनापासून इच्छा आहे.

पुंबा's picture

8 Feb 2017 - 11:38 am | पुंबा

++१११