काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात!
तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली!
पण मनात कुठेतरी बुधाविषयी उत्सुकता राहिली असावी कदाचित! त्यामुळेच बर्याच दिवसांनी पुन्हा एकदा त्याला भेटून त्याच्यासोबत माचीचा प्रवास सुरु केला. त्याच्या अधू असूनही निसर्गाची सुंदरता टिपणार्या दृष्टीतून आजूबाजूचा परिसर पाहू लागलो आणि आधी पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागली.
हळूहळू हा आजूबाजूच्या निसर्गावर प्रेम करणारा, जनावरांचीही काळजी वाहणारा बुधा जवळचा वाटू लागला.
माणूस हा समाजप्रिय प्राणी! पण हा प्राणी निसर्गापासून दूर गेला. आपल्या सोयीच, स्वतःला हवं तसं जग बनवून त्यातच राहू लागला. स्वतःचीच सुखं दुःख गोंजारत बसू लागला. म्हातारपणी बुधाचा जीव मात्र त्या जगात गुदमरू लागला, लहानपणीच्या माचीवरच्या सुंदर आठवणींमध्ये तो रमू लागला. आणि एक दिवस, मनाची तयारी करून सगळे काही सोडून तो एकटा आपल्या मूळ ठिकाणी निघाला, कायमचा!
इथून पुढच त्याचं आयुष्य म्हणजेच "माचीवरला बुधा!" गो. नी. दांडेकरांनी लिहिलेली एक अप्रतिम कथा…
बुधाचे माचीवर राहणं, सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीशी त्यानं निर्माण केलेलं नात, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याला सापडलेला आनंद, शेवटी कथेमध्ये येणारा विलक्षण ताण या सगळ्या गोष्टी वाचकाला अंतर्मुख करतात. पण हे सगळ इतक्या सहज होत नाही. हि कहाणी वाचकाला अस्वस्थ करून सोडते.
जे झालं ते तसंच होणं गरजेचं होत का? बुधाचा निर्णय खरच योग्य होता का? या प्रश्नांची उत्तरे काही केल्या मिळत नाहीत…
पण निसर्गाशी समरस होऊन त्यालाच समर्पित झालेल्या बुधाच्या म्हातारपणातला हा प्रवास निश्चितच अनुभवण्यासारखा आहे!
(मिपावर बर्याच लोकांनी हि कादंबरी खूप आधीच वाचली असणार यात शंका नाही! इथे माझे विचार मांडण्याचा थोडासा प्रयत्न केला आहे, काही कमी जास्त झाले असले तर सांभाळून घ्या! :) )
प्रतिक्रिया
6 Aug 2015 - 1:38 am | बहुगुणी
तुम्ही म्हणताय तशी ही कादंबरी खूपच आधी वाचली होती, तेंव्हा बरीचशी विस्मरणात गेली आहे, पुनर्भेट घडवून आणल्याबद्दल आभार! पुन्हा वाचायला हवी. (खरं तर समग्र गोनीदाच पुन्हा वाचायला हवेत...)
26 Aug 2016 - 7:47 pm | भ ट क्या खे ड वा ला
अलिकडेच माचीला गेलो होतो तेव्हा अस मनात आल अत्ता बुधा असता तर माची वरुन ही दुर कूठे तरी गेला असता गो नि दा खरच परत वाचायला हवेत .
या गोनिदां मूळेच भटकायचे वेड लागले .
6 Aug 2015 - 11:10 am | जडभरत
मस्तच! आज तुमच्यामुळे पुन्हा बुधा आठवला. एक अतिशय सुंदर वाचनानुभव आहे ती कादंबरी. गोनिदांची अजून एक कादंबरी आहे, तिचं नाव कुणाला आठवतंय का? एका झाडावर लिहिलेली आहे बघा?
गोनिदांच्या कादंबर्या नेटवर कुठे वाचायला भेटतील.
6 Aug 2015 - 11:33 am | प्रचेतस
'त्या तिथे रूखातळी'
बाकी गोनीदांच्या कादंबर्या नेटवर नाही मिळत. पुस्तके घेऊन वाचा राव. विलक्षण अनुभव देतात ह्या कादंबर्या.
26 Aug 2016 - 3:42 am | धनावडे
हे पुस्तक online नाही मिळत का?
26 Aug 2016 - 6:42 am | प्रचेतस
बुकगंगा.कॉम वर मिळेल की. किंवा erasik वर पण मिळेल.
26 Aug 2016 - 11:53 am | बोका-ए-आझम
जाणण्यास उत्सुक. मराठी पुस्तकं नेटवरून डाऊनलोड करता येत असतील तर फार छान.
26 Aug 2016 - 12:01 pm | प्रचेतस
www.erasik.com
पुण्याच्या रसिक साहित्यचे संस्थळ. पुस्तके विकत घेता येतात. मात्र उतरवता येत नाहीत.
26 Aug 2016 - 9:35 pm | धनावडे
नाही मिळत bookganga वर
26 Aug 2016 - 11:29 pm | प्रचेतस
वाघरु म्हणून सर्च देऊन पाहा.
27 Aug 2016 - 1:32 am | धनावडे
धन्यवाद, सापडल....
6 Aug 2015 - 1:11 pm | धनावडे
बुधा आजच वाचून झाल .
6 Aug 2015 - 1:26 pm | सौंदाळा
बुधा परत वाचणे आले.
बुधापेक्षा 'शितु'चा पंखा - सौंदाळा
8 Aug 2015 - 2:10 pm | शब्दबम्बाळ
शितू नेटवरती मिळतंय का शोधायचा प्रयत्न केला पण आऊट ऑफ प्रिंट म्हणे!
तुम्ही त्यावर एखादा धागा काढून पुस्तक ओळख देऊ शकाल का?
26 Aug 2016 - 5:12 pm | महासंग्राम
गोनीदांची पुस्तके पुन्हा मृण्मयी प्रकाशनानाने प्रकाशीत केली आहेत, त्यांच्या कडे मिळतील
8 Aug 2015 - 8:18 pm | उगा काहितरीच
राहून गेलीए वाचायची ! मिळाल्यास नक्की वाचेन !
8 Aug 2015 - 8:20 pm | पैसा
खूप आवडीचं पुस्तक!
26 Aug 2016 - 7:49 am | यशोधरा
छान लिहिलं आहे!
26 Aug 2016 - 9:54 am | प्रभाकर पेठकर
गेली अनेक वर्षे आखाती प्रदेशात वास्तव्य असल्याकारणाने आणि आता व्यस्तता वाढल्यामुळे खुपच मराठी साहित्य वाचायचे राहून गेले आहे. बुधा, शितू बद्दल ऐकले आहे पण वाचण्याची संधी नाही मिळाली. आता पुढच्या भारतभेटीत ही दोन्ही पुस्तके विकत घ्यायचीच अशी खुणगाठ बांधूंन ठेवली आहे. धन्यवाद.
26 Aug 2016 - 10:15 am | अंतरा आनंद
आवडतं पुस्तक म्हणून एकच नाव घ्यायचं झालं तर मी "माचीवरला बुधा"च सांगेन. केव्हाही उघडावं कुठूनही वाचायला सुरुवात करावी, गोनीदांची लडिवाळ भाषा माचीवरला निसर्ग अगदी अलगद आपल्याभोवती आणून ठेवते.