कॅम्पिंग करायला आम्ही सदैव उत्साही असतो. आम्ही म्हणजे मी नवरा आणि आमची अडीच वर्षाची लेक आणि कधी कधी काही मित्रमंडळी. उन्हाळ्यात तर दर दोन चार वीकेंड नंतर आम्ही कॅम्पिंगला जात असतो. या उन्हाळ्यात आत्तापर्यंत तीन वेळा कार कॅम्पिंग झालं. कार कॅम्पिंग मधे राहण्या खाण्याच्या सगळ्या गोष्टी रहाण्याच्या ठिकाणापर्यंत आम्ही कार मधुन नेतो. पूर्वी बर्याच वेळा आळस करून फक्त मॅगी आणि रेडिमेड उपमा पाकिटेच घेऊन जायचो. आता पोरीसाठी नव-नवीन प्रयोग करायला लागलो आहे.
यावर्षी एकावेळी आम्ही पास्ता करण्यासाठी लागणारं सगळं सामान घेऊन गेलो. पास्ता, पास्ता सॉस, रंगी बेरंगी ढोबळ्या/ढबू मिरच्या (ग्रीन, यलो, रेड पेपर), कांदा, ऑलिव ऑइल, आणि इटालियन हर्ब्ज अजून काय हवं यम्मी पास्ता साठी?
पास्ता:
याच ट्रीप मध्ये सोबत आलेल्या मैत्रिणीने पनीर मॅरिनेट करून ग्रील करायला आणलं होत शिवाय बटाटे आणि पास्त्याच्या सामानातल्या उरलेल्या ढबू मिरच्याही होत्याचं. काही वेळा घरातूनच चिरमुरे, फरसाण, चिंचेचा कोळ नेऊन भेळ सुद्धा केली आहे. कालच्याच कॅम्पिंग मध्ये मैत्रीण म्हणाली मक्याची कणसं घेऊन जाऊ आणि कॅम्पफायर मध्ये भाजून खाऊ. पण पोहचल्यावर कळालं ती कणसं घरीच विसरून आली. आता पुढच्या कॅम्पिंगच्या यादीत ही अजून एक गोष्ट जमा झाली.
कॅम्पफायर:
काही वेळा आम्ही अंडी, फ्रोझन किंवा रेडी टू ईट अश्या भाज्या, पराठे, भाताचे वेग वेगळे प्रकारही नेतो. खास कॅम्पिंगसाठी उपयोगी येणारा असा छानसा छोटासा स्टोव आणि त्याच्यासोबत वापरायचा भांड्यांचा सेट या सगळ्या गोष्टींसाठी आम्हाला फारच उपयोगी पडतो.
सध्या मुलीला आवडणारी वेगवेगळी फळे आणि मुख्य म्हणजे दूध हेही सोबत घेऊन जात असतो. दूध आइस पॅक मध्ये घालून नेलं तर सकाळ पर्यंत खराब होत नाही. अश्या कॅम्पिंग साठी एक वेगळा कूलरही मिळतो ज्यात अशा ऊष्ण हवामानात खराब होणार्या गोष्टी ठेवता येतात. हम्म. आम्ही अजून का बरं नाही घेतला तो कुलर? पुढच्या कॅम्पिंगसाठी ही खरेदी केलीच पाहिजे असं वाटायला लागलंय.
हे झालं थोडं कार कॅम्पिंग आणि त्यातल्या खाण्याबद्दल!
पूर्वी म्हणजे बाळ होण्याआधी आम्ही साधारण सगळ्या मोठ्या सुट्ट्या (लॉंग विकेंड) बॅकपॅकिंग आणि हायकिंग करण्यातच घालवत असू. बॅकपॅकिंग मध्ये सगळ्यात महत्वाच्या गोष्टी म्हणजे तुम्ही किती लांब चालून जाणार, किती दिवस राहणार आणि किती वजन पाठीवर उचलणार. मी आत्तापर्यंत जास्तीत जास्त अवघड म्हणजे एक १० मैलांचा ट्रेक केला आहे. आम्ही जिथे गेलो तिथे २ दिवस कॅम्पिंग केलं होतं आणि एकूण पाचजण गेलो होतो. जास्त लोकं असलेले मला नेहमीचं आवडतं म्हणजे तेवढाचं आपल्या वाट्याला कमी सामान येतं.
हवासू कॅनियन हाइक :
बॅक पॅकिंग प्रकारात शक्यतो कोरडे पदार्थ नेणे जास्त सोईस्कर असते. या ट्रेकच्या वेळी आम्ही सहज हाताला खाता येतील अशा हलक्या पण उर्जा देणार्या गोष्टी म्हणून खजूर, मनुके, काजू, बदाम, एक दोन सॅन्डविच बॅग मधे घालून नेल्या होत्या. सोबतीला लिमलेटच्या गोळ्या आणि मँगो बाईट असल्या सटर फ़टर गोष्टीही होत्या. भरपूर पाणी साधारण प्रत्येकी २ लिटर सोबत होत कारण आमच्या पूर्ण पायपिटीत मध्ये कुठेच पाणी मिळणार नव्हतं. इतर वेळी वाहत्या झर्यातून वगैरे पाणी घेताना नेहमी आयोडीनच्या गोळ्या त्यात टाकूनच मग ते पाणी पितो. या ट्रेक साठी आधी तीन चार महिने जिम मध्ये चांगली तयारी केल्यामुळे इच्छित स्थळी जास्त काही अडचण न येता पोहोचलो.
फोटो हवासू कॅनियन कॅम्पसाइट :
आता मुख्य खाणे म्हणजे कॅम्पसाईट वरचे होते. बरोबरची मित्र मंडळी मोठ्या शहरातून आल्यामुळे त्यांनी कोणा काकूं कडून ठेपले, तिखट मिठाचे पराठेही करून आणले होते. ते दोन दिवस टिकले. सोबतीला चिप्स आणि सालसा, आयत्या चहाची पाकिटे आणि वेगवेगळी सूप्ससुद्धा होतीच.
बर्याचदा चालून दमल्यामुळे फार काही करण्याचा उत्साह कमीच असतो. पूर्वी अशा कॅम्पिंग मध्ये मॅगी खूप वेळा खाल्ली आहे. ब्रेड-चीज, ब्रेड- जॅम, ब्रेड आणि चटण्या किंवा छोटी केचप पाकिटेही बर्याचदा घेऊन गेलो आहे. सामानाच्या गर्दीमुळे ब्रेड अगदी लोळागोळा होऊन जातो आणि मग खाण्याची इच्छाच होत नाही. पण एवढ्या लांब दमून भागून गेल्यावर कडकडून भूक लागलेली असल्यामुळे कसाही असला तरी हा ब्रेड खाल्ला जातोचं. एका ट्रेकला रेडी टू ईट भाताची पाकिटे घेऊन गेलो होतो. एक पाकीट दोन लोकांसाठी असा त्यावर अगदी ठळक अक्षरांत लिहील होतं. पण कसलं काय एक पाकीट नवर्याला सुद्धा पुरलं नाही. त्यापेक्षा डाळ - तांदूळ घेऊन जाऊन मस्त खिचडी केली असती असं वाटून गेलं. मग सकाळ - संध्याकाळचं मिळून एकदाच जेवण केलं. आणि नेहमी कॅंम्पिंगला गेल्यावर थोडं जास्तीच खायला न्यायला हवं हा धडा ही शिकलो.
सध्या तरी मुलीला घेऊन अशा पद्धतीचे कॅम्पिंग करणे अवघडच आहे. आता छोकरी थोडी मोठी झाली की पुन्हा जोमाने बॅक पॅकिंग सुरु करणार. म्हणून आत्ता कार कॅम्पिंगचा मनमुराद आनंद घेणं सुरु आहे.
कॅम्पिंग ही तशी फार काही अवघड गोष्ट नाही पण कधी केला नाही म्हणून, माहिती नाही म्हणून किंवा कसली तरी भितीआ मनात ठेवून बरेच मित्र मंडळी तर करण्याचे टाळतात. त्याची गोडी सगळ्यांना लागावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नशील असतो. या लिखाणातून निदान कॅम्पिंगच्या वेळी खाण्याचे फार काही हाल होणार नाहीत असे वाटून एका व्यक्तीने जरी कॅम्पिंग करायची प्रेरणा घेतली तरी या लिखाणाचे सार्थक झाले असे वाटेल.
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 11:51 am | अजया
मजा येत असेल असे कॅम्पिंग करुन तिथेच बनवून खाण्यात.छान लेख.
16 Oct 2015 - 11:59 am | पिलीयन रायडर
अशा काही गोष्टी मिळतात हे सुद्धा मला आजच समजलं. मी नक्की करणार कॅम्पिंग!
माहितीपुर्ण आणि इंट्रेस्टींग लेख!
16 Oct 2015 - 11:13 pm | इडली डोसा
पिरा नक्की कर कँपिंग माझी मुलगी खुप मजा करते. तुमच्या छोट्याला पण आवडेल.
16 Oct 2015 - 4:37 pm | प्रीत-मोहर
उपयुक्त माहिती . याचा पुरेपूर वापर केला जाईल. या आधी आम्ही खाणं घरीच करुन नेत असु. आणि मग ते खराब होण्याआधी खायच असे. तर मूड नसताना खाव लागे
16 Oct 2015 - 5:59 pm | वेल्लाभट
मी अमेरिकेतल्या योसेमिटी मधे घेतला होता हा अण्भव. खत्तरनाक मजा आली होती.
तिथे आम्हाला खाणं ठेवण्यासाठी एक लोखंडी कपाट दिलं होतं छोटं ज्याला लॉक होतं. का? कारण अस्वलांचा वावर होता त्या जंगलात. ती खाण्याच्या वासाला येतात.
16 Oct 2015 - 11:11 pm | इडली डोसा
काही ठिकाणी उंच पोल असतो त्याला खाण्याची पिशवी लट्कवण्यासाठी एक हुक दिलेला असतो. रात्री टेंट मधे जाण्याआधी सगळे खायचे सामान पिशवीत भरुन या पोलला लटकवायचे असते. जिथे अस्वलांचा वावर नाही अश्या ठिकाणीसुद्धा ही सोय दुसर्या छोट्या (खार, मोठे उंदीर -रकुन्स) प्राण्यांचा त्रास होउ नये आणि त्या प्राण्यांना आपल्या खाण्यची सवय लागु नये म्हणुन असते. शिवाय कचरापेटीला सुद्धा अशी वेगळ्याप्रकारे उघडायची सोय असते.
20 Oct 2015 - 5:04 pm | वेल्लाभट
आय सी....
16 Oct 2015 - 7:36 pm | सानिकास्वप्निल
खूप छान माहिती दिली आहे कॅम्पिंगला काय खाणे घेऊन जावे याची. संधी मिळताच नक्की ट्राय करेन हे सर्व.
फोटो पण छान आहेत.
लिहित रहा :)
16 Oct 2015 - 11:16 pm | इडली डोसा
अजुन लिहिण्याचा प्लॅन आहे कँपिंग बद्दल. विशेषतः कँपिंगसाठी लागणार्या साहित्याबद्दल लवकरच लिहुन टाकते इथे माहिती.
17 Oct 2015 - 1:18 am | स्रुजा
लिही लिही, नक्की लिही. ही सुद्धा माहिती खुप च उपयोगी आहे. मी तशी "ग्लँपिंग" करणार्यांपैकी आहे पण तुझे वरचे फोटो बघुन आता करुन बघायचा विचार बळावत चालला आहे. सगळाच आढावा अगदी छान घेतलास.
17 Oct 2015 - 6:48 pm | एस
मस्त माहिती. अमेरिकादी देशांत कॅम्पिंग व हायकिंग जसे बरेच सर्वसामान्य आहे तसे भारतात नाही. तरी इकडे जरा जास्त दिवसांच्या सहली आखण्यासाठी ह्या लेखातील माहितीचा उपयोग होईल.
19 Oct 2015 - 9:15 pm | इडली डोसा
भारतात ट्रेकर्ससाठी इथल्या कँपिंग साहित्याचा चांगला वापर होउ शकतो. पण बा़कि देशांमधे जेवढे फॅमिलीसह कँपिंग हाय्किंग होते तेवढे भारतात होत नाही हे खरे.
18 Oct 2015 - 4:15 am | मधुरा देशपांडे
छान माहिती इडो. कॅम्पिंगचा अनुभव नाहीये, पण बाहेर भटकंतीला जातानाही उपयुक्त आहेत टिप्स.
18 Oct 2015 - 8:06 pm | पैसा
मस्त, अगदी वेगळाच प्रकार! आपल्या इथे वेगवेगळ्या कारणांनी कँपिंग हा प्रकार शक्य नाही. मात्र एस म्हणतात तसे बर्याच दिवसांच्या लांबच्या सहलींसाठी हे सगळे खूप उपयुक्त ठरेल. सोबत लहान मूल असेल त्यांना तर फारच!
19 Oct 2015 - 9:17 pm | इडली डोसा
पैसाताई भारतात शक्य नाही असे नाही. अपुरी माहिती किंवा या प्रकारबद्दल अगदिच अज्ञान असल्यामुळे कँपिंग कमी होत असावं असं वाटतं.
19 Oct 2015 - 9:51 am | गिरकी
आता कँपिंगला जाणे आले :)
19 Oct 2015 - 11:55 am | पद्मावति
हा लेख वाचून आता कॅम्पिंग करावसं वाटतंय. सुंदर लेख. तुझ्या कॅम्पिंग च्या अनुभवांवर लेख येऊ दे. खूप आवडेल वाचायला.
19 Oct 2015 - 12:14 pm | मांत्रिक
अगदी भन्नाट व्यक्तिमत्व आहात ताई! कॅम्पिंग वगैरे सर्व अगदी रोमांचकारी अनुभव असणार. एखादा विशेष लेख कॅम्पिंगवरती लिहा अशी विनंती.
19 Oct 2015 - 9:20 pm | इडली डोसा
नक्की लिहिणार लेख. आणि भन्नाट वगेरे काही नाही अगदी सर्वसामन्य आहे मी.
19 Oct 2015 - 5:31 pm | इशा१२३
मस्त वर्णन इडो. कॅम्पिंग कधी केल नाहिये.आता करावस वाटतय.
20 Oct 2015 - 2:43 am | श्रीरंग_जोशी
कॅम्पिंग थोडंफार केलंय पण एवढे प्रयोग केले नसल्याने माझ्यासाठी ही सर्व माहिती फारच उपयुक्त आहे.
या लेखनासाठी धन्यवाद.
21 Oct 2015 - 10:02 am | उदय
प्रत्येक कँपसाईटवर फायरप्लेस (चूल) असते. जाताना सोबत कोळसे नेले तर मस्तपैकी चिकन फ्राय करता येते. शाकाहारी लोकांसाठी बटाटे किंवा कणसे भाजता येतात. बहुतेक कँपग्राऊंडवर लाकडांचे ओंडके विकत मिळतात, ते वापरून रात्री कँपफायर करता येते. तेव्हा मार्शमेलो किंचित भाजून ते चॉकलेट्च्या तुकड्यावर ठेवायचे आणि २ ग्रॅहॅम क्रॅकरमध्ये ते टाकून सँडविच बनवून मुलांना दिले की त्यांना आवडते. कँपिंग ट्रीपमध्ये सकाळी नाश्त्यासाठी आम्ही नेहमी चहा आणि पोहे करतो.
22 Oct 2015 - 12:17 am | इडली डोसा
मार्शमेलो आमच्याकडे कोणालाच आवडत नाही म्हणुन त्याचा उल्लेख करायचा रहिला. यादीत भर टाकल्याबद्दल धन्यवाद.
22 Oct 2015 - 2:20 pm | Mrunalini
मस्त झालाय लेख. कॅम्पिंगचा काहि अनुभव नाही पण लेख आवडला.
26 Oct 2015 - 4:51 pm | अनन्न्या
याचा अनुभव नाही पण माहिती आणि फोटो परफेक्ट जमलेय! एकेक लेख सावकाशीने वाचतेय रोज!
27 Oct 2015 - 9:59 pm | अदि
कित्ती मज्जा येत असेल ना!!
27 Oct 2015 - 10:09 pm | स्वाती दिनेश
लेख छान झाला आहे,
स्वाती
29 Oct 2015 - 5:05 pm | कविता१९७८
मी पदयात्रेत जाते तेव्हा आचारी असतात जेवणासाठी , चालुन चालुन इतकी भुक लागलेली असते की जेवण कसेही असो खाल्ले जाते. तरीही स्वतः बनवुन खाण्याची लज्जत काही औरच !!
30 Oct 2015 - 8:04 am | इडली डोसा
पुन्हा एकदा आभार.
4 Nov 2015 - 6:35 am | Maharani
माहिती फारच उपयुक्त....
19 Nov 2015 - 12:26 pm | विभावरी
छान माहिती आहे .