उकरपेंडी

मधुरा देशपांडे's picture
मधुरा देशपांडे in पाककृती
29 Apr 2014 - 12:22 am

नाश्त्याला किंवा दुपारच्या वेळी खायला केला जाणारा हा विदर्भातील एक खाद्य प्रकार.

साहित्य:
२ वाट्या कणिक
४-५ कढीपत्त्याची पाने
२-३ हिरव्या मिरच्या किंवा १ चमचा तिखट
१-२ मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून
शेंगदाणे
मीठ चवीनुसार
चिमुटभर साखर
२ मोठे चमचे तेल
मोहरी, हिंग

https://lh5.googleusercontent.com/-gaTXBXc0ofU/U16hLlXMmRI/AAAAAAAAC5A/j3TJQhN5Zac/w866-h577-no/DSC_0243.JPG

कृती:
सर्वप्रथम कणिक नुसती किंचित तेलावर भाजून घ्या. त्यानंतर तेल तापवून त्यात मोहरी, हिंग, कढीपत्ता, हिरवी मिरची, शेंगदाणे आणि कांदा घालून परता. कांदा थोडा लालसर परतला की कणिक घालून पुन्हा हलवत राहा. साधारण ५-७ मिनिटात कणिक व्यवस्थित भाजली गेली की मीठ, साखर घालून अंदाजाने पाणी घाला. यात थोडे दही सुद्धा घालू शकता. किंवा पाण्याऐवजी ताक सुद्धा चालते. थोडी आंबट चव मस्त लागते. झाकण ठेवून एक वाफ काढा. वरून कोथिंबीरीने सजवा. तयार आहे गरमागरम उकरपेंडी.

https://lh4.googleusercontent.com/-rUJet2RSutU/U16hJXg4XlI/AAAAAAAAC40/VODnVNix41w/w866-h577-no/DSC_0246.JPG

याचाच उकड्पेंडी असाही अपभ्रंश आहे.

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

29 Apr 2014 - 12:28 am | राघवेंद्र

आम्ही ज्वारीचे पीठ वापरुन असेच 'ज्वारीच्या पीठचे उप्पीट' बनवितो. ताका मुळे मस्त चव येते.
आता कणिक वापरुन बघितले जाईल.

धन्यवाद !!!

सुहास झेले's picture

29 Apr 2014 - 12:38 am | सुहास झेले

जबरी... मला खूप आवडतो हा प्रकार.... :)

मस्त गं! फोटू आवडला. कांदा घालतात पण शेंगदाणे घालतात हे नवीन समजले. आता नक्की करणार.

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2014 - 1:53 am | सानिकास्वप्निल

मस्तं पाकृ
कणकेची असल्यामुळे नक्की बनवून बघणार :)

अनन्या वर्तक's picture

29 Apr 2014 - 2:46 am | अनन्या वर्तक

पाककृती आणि फोटो अगदी सुरेख. मागे इथे तांदळाच्या पीठाची उकड म्हणून एक पाककृती पहिली होती बनविण्याची पद्धत आणि जीन्नस थोडेफार सारखे वाटत आहेत. मी बनवून पाहीन सोप्पी पद्धती आहे.

पाक्रु इंटरेस्टींग वाटतेय. पण एक बेसिक प्रश्न कणिक म्हणजे काय? नक्की कशाचं पीठ?

सानिकास्वप्निल's picture

29 Apr 2014 - 7:47 am | सानिकास्वप्निल

कणिक म्हणजे गव्हाचे पीठ :)

कपिलमुनी's picture

29 Apr 2014 - 2:35 pm | कपिलमुनी

कणिक म्हणजे गव्हाच्या पीठामधे पाणी घालून ते तिंबून घेतली की कणीक तयार होते..

मधुरा देशपांडे's picture

29 Apr 2014 - 2:55 pm | मधुरा देशपांडे

आम्ही गव्हाच्या पीठालाच कणिक म्हणतो. पाणी घालून तिंबून घेतली तरी किंवा नुसते पीठ असले तरी. प्रांतानुसार शब्दांमधला फरक असेल.

आवडता पदार्थ. नाश्त्याला भरपूर खाल्ला तर संध्याकाळपर्यंत भूक न लागण्याची गॅरेंटी !!

श्रीरंग_जोशी's picture

29 Apr 2014 - 8:36 am | श्रीरंग_जोशी

माझा आणखी एक आवडता पदार्थ.

आमच्याकडे उकरपेंडी शेंगदाणे न घालता केली जाते. खाताना वरून बारीक चिरलेला कांदा व कोथिंबिर घातल्यास अप्रतिम चव लागते.

चित्रगुप्त's picture

29 Apr 2014 - 8:48 am | चित्रगुप्त

अनपेक्षितपणे 'उकरपेंडी' हा अत्यंत आवडीचा पदार्थ इथे बघून फार आनंद झाला. धागाकर्तीला अनेक धन्यवाद.
हा पदार्थ मध्यप्रदेशात, खास करून माळव्यात आवडीने केला जातो (वा जात असे) त्यासाठी (आता दुर्लभ झालेल्या) माळवी गव्हाचा जाडा आटा मुद्दाम दळवून घेतला जातो. ही परंपरा गेली छत्तीस वर्षे दिल्लीत राहूनही आम्ही अजूनही पाळली आहे. या जाड्या आट्याचे गाकर, धपाटे आणि बाट्या पण खूप छान होतात.
उकरपेंडी करताना पाणी वा ताक एकदम न टाकता हळूहळू थोडे थोडे शिंपडत गेले तर गिचका न होता उकरपेंडी मोकळी होते. कणीक पुरेशी भाजली गेली, की घरात खरपूस वास पसरतो. कढईत खाली लागणारी खरवड आवडत असेल, तर मुद्दाम खाली जरा लागू द्यावी. पाणी एक वाटी कणकेला साधारणपणे एक वाटी लागते.
आंबटशौकीनांनी वर लिंबू पिळून घ्यावे, वा लिंबाचे गोड लोणचे घ्यावे.
अहाहा... केलीच पाहिजे आजच उकरपेंडी.

साध्या साध्या पदार्थातच आपला जीव अडकलेला असतो याचे उत्तम उदाहरण.

मधुरा देशपांडे's picture

29 Apr 2014 - 10:59 am | मधुरा देशपांडे

काका, अधिक माहितीकरिता धन्यवाद. हो पूर्वी जाड कणिक दळून मग त्यापासून उकरपेंडी बनवली जायची. आता बहुतांशी रोजच्या पोळ्यांच्या कणकेपासूनच केली जाते.

त्रिवेणी's picture

2 May 2014 - 2:41 pm | त्रिवेणी

मी सुद्धा गहु जाडच दळून आणते. आणि उकड्पेंडी आणि बट्टीसाठी वापरते.
एकटीचा स्वयंपाक असेल तर यावरच जेवण असते. सोबत कैरीचे लोणच मस्ट.

चांगली लागते ही पाककृती .आमच्याकडे मोकळभाजणी करतात अशीच .चकली /थालीपीठाची भाजणी घेतात .शेंगदाणे हवेतच .

अत्रुप्त आत्मा's picture

29 Apr 2014 - 9:08 am | अत्रुप्त आत्मा

फारच छान.....
ह्ये कराया पन सोप्पं वाटतया.
आन् कामाच्या दिसाला तर..सकाळच्याला येक डाव कचकून हानलं,तर दुपारी चार वाजिपरेंत काय टेण्शण न्हाई. लै मस्त बगा.

स्पंदना's picture

29 Apr 2014 - 9:10 am | स्पंदना

झकास !! चावायची गरज नाही.

पैसा's picture

29 Apr 2014 - 9:42 am | पैसा

आम्ही कोकणी लोक तांदुळाच्या पिठाची उकड करतो. साधारण अशीच. आता ही पाकृ सुद्धा करून बघेन!

चित्रगुप्त's picture

29 Apr 2014 - 10:24 am | चित्रगुप्त

'उप्पीट' आणि तांदुळाच्या पिठाची उकड एकच का? ही जरा लवलवीत-चाटण्यासारखी असते ना? आणि त्यात बहुतेक हिंग घालतात ?

पैसा's picture

29 Apr 2014 - 11:07 am | पैसा

उप्पीट रव्याचं असतं.

उकडीची पाककृती सानिकास्वप्नीलने दिली होती. http://www.misalpav.com/node/25093
आमच्याकडे बदल म्हणजे फोडणीत हळदसुद्धा असते आणि वरून कच्चं तेल घालून खातात. चाटण्यासारखी पातळ नसते. उप्पीटसारखी मऊ असते मात्र.

उप्पीट तांदळाच्या रव्याचं आणि उपमा गव्हाच्या रव्याचा असं कुठेसं वाचलेलं होतं. नीटसं आठवत नाही. ह मो मराठेंच्या बालकांड मध्ये ते तांदळाच्या रव्यापासून अगदी उपम्यासारखाच पदार्थ करीत असत त्याला उप्पीट/उफीट संबोधल्याचं आठवतंय.

प्रचेतस's picture

29 Apr 2014 - 3:00 pm | प्रचेतस

उपमा-उप्पीट एकच.
दक्षिणेत उपम्यालाच उप्पीट म्हणतात.

दक्षिणेत म्हणजे कुठे?

म्हणजे कर्णाटक, आंध्र वैग्रे.

आम्ही कोल्हापुरात पण गव्हाचा रवा भाजुन हळद घालुन करतो त्याला उप्पीट म्हणतो.
उपमा हा पांढरा असतो अस मझ मत आहे? (येनी ऑब्जेक्शन?) अन उपम्यात हवे तर ओले वाटाणे, अथवा इतर भाज्या घालता येतात. तसेच उप्पीटाला आलं घालत नाहीत, उपम्याला चालत. हवी असेल तर उपम्याची रेसीपी टाकु शकते. फोटो मागु नका इतकेच.

पैसा's picture

30 Apr 2014 - 9:23 am | पैसा

असा गव्हाचा रवा भाजून कांदा हळद इ फोडणीत घालून आम्ही जो पदार्थ करतो त्याला तिखटमिठाचा शिरा/सांजा म्हणतो. तसेच गोड शिर्‍यात साखरेऐवजी गूळ घातला तर सांजा म्हणतो.

रवा भाजून केलेलं आणि रवा न भाजता डायरेक्ट शिजवलेलं असाही काही फरक आहे. सौधिंडियन लोक रवा भाजत नाहीत बहुतेक.

श्रीरंग_जोशी's picture

30 Apr 2014 - 9:30 am | श्रीरंग_जोशी

सांज्याबद्दलच लिहायला आलो होतो :-).

पैसा's picture

30 Apr 2014 - 9:26 am | पैसा

बालकांड मधे तांदळाच्या रव्याच्या उफीट बद्दल वाचले आहे.

अनिता ठाकूर's picture

29 Apr 2014 - 10:15 am | अनिता ठाकूर

साधे पाणी घालायचे की आधणाचे? ताक तर साधेच घालायचे असेल.

चित्रगुप्त's picture

29 Apr 2014 - 10:29 am | चित्रगुप्त

पाणी साधे वा जरासे कोमट/कोंबट/काटामोड/कुनकुने घालावे.

अत्रन्गि पाउस's picture

30 Apr 2014 - 9:33 am | अत्रन्गि पाउस

खानदेशी शब्दांची रेलचेल बघून वापरून फार मजा येतेय...
बऱ्याच दिवसांनी वापरलेला बघितला हा शब्द

सिफ़र's picture

29 Apr 2014 - 10:54 am | सिफ़र

धन्यवाद!
उकरपेंडी हे नाव बरेच दिवसांनी कानावर पडलं.... प्रकार दर्जेदार आहे.
पाण्याऐवजी ताक घालून नक्की करून खातो.

दिपक.कुवेत's picture

29 Apr 2014 - 11:09 am | दिपक.कुवेत

चविष्ट दिसतोय. एकदा करुन बघायला पाहिजे. तांदळाच्या पिठाची 'उकड' आवडत नाहि त्याला हा पर्याय मस्त आहे.

अरेरे ....

खरे तर तांदूळाच्या पिठाच्या उकडीला ४ गोष्टींची आवश्यकता असते,

१, कच्चा कांदा

२, अति जहाल मिरच्या

३. कच्चे तेल (वरून घ्यायला)

आणि

४. भरपूर मित्र.

आता डोंबिवलीला आलास की, एकदा ह्या उकडीचा कट्टा करू या.

(हा पदार्थ आमच्या मातोश्री फार मस्त करतात.)

अमोल मेंढे's picture

29 Apr 2014 - 11:37 am | अमोल मेंढे

खास करुन ग्रामीण भागात घरोघरी बनवल्या जाणारा पदार्थ..लहानपणापासुन अतिशय आवडता.
यात थोडीसी मसुराची अख्खी दाळ (रात्री भिजत घातलेली)तळुन घातली तर...व्वा व्वा..तोंडाले पानी सुटलं ना बे

सुके खोबरे वरती मुबलक पेरून वर एखादा चमचाभरून तूप...
अहाहा ...

त्रिवेणी's picture

2 May 2014 - 2:46 pm | त्रिवेणी

चमचाभरून तूप...>>>> एखाद टाईमले कच्च तेल टाकीसन खाई दखा.

मुक्त विहारि's picture

29 Apr 2014 - 2:42 pm | मुक्त विहारि

झक्कास.

समीरसूर's picture

29 Apr 2014 - 3:54 pm | समीरसूर

लहानपणी खूप वेळा खाल्ली आहे उकडपेंडी. आमच्याकडे उकडपेंडी किंवा फोडणीचं पीठ देखील म्हणतात. का कुणास ठाऊक पण मला उकडपेंडी वर्तमानपत्राच्या कागदावर घेऊन खायला जास्त आवडते (जशी गरमगरम साबुदाणा खिचडी हिरव्यागार केळीच्या पानावर थोडी जास्तच चविष्ट लागते). आणि सोबत तोंडी लावायला फोडलेलाच कांदा हवा. आणि ताजे दही सोबत असेल तर सोने पे सुहागा! मजा आ जाता है!

- उकडपेंडीसाठी तेल अंमळ जास्त लागते. डायेटवाल्यांसाठी हेड्स-अप.
- कणकेची उकडपेंडी पचायला थोडी जड असते. पोट गच्च भरते. काही थकवणारी कामे करण्याआधी खाल्लीत तर नो प्रॉब्लेम!
- ज्वारीच्या पीठाची उकडपेंडी पचायला हलकी असते.

लहानपणीच्या सुखद दिवसांची आठवण करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद :-)

अनन्न्या's picture

29 Apr 2014 - 4:33 pm | अनन्न्या

फोटो पण छान आलेत गं!

कुंदन's picture

29 Apr 2014 - 5:22 pm | कुंदन

या आठवड्यात करुन बघिन.

मस्त पाककृती आहे मधुरा..
.

सखी's picture

29 Apr 2014 - 9:02 pm | सखी

दिसतेय पाकृ, करुन बघायला पाहीजे, कणकेचा गिचका व्हायला नको, पण चित्रगुप्त यांनी दिलेल्या टीपा उपयोगी पडतील.

Prajakta२१'s picture

29 Apr 2014 - 9:51 pm | Prajakta२१

लहानपणी खायचो पण खूप गोळा गोळा व्हायची म्हणून नन्तर करणे बंदच केले
आत्ता परत करून पाहीन :-)
धन्यवाद

चित्रगुप्त's picture

30 Apr 2014 - 7:36 am | चित्रगुप्त

जास्त तेलाच्या फोडणीत कणीक खरपूस भाजली गेली की थोडे थोडे पाणी शिंपडत उलथन्याने हलवत राहिले तर गिचका होणार नाही. शेवटी झाकण ठेऊन वाफेवर थोडावेळ शिजू द्यावे.

यशोधरा's picture

30 Apr 2014 - 7:49 am | यशोधरा

करकू देखेंगी हां.

मधुरा देशपांडे's picture

30 Apr 2014 - 9:18 am | मधुरा देशपांडे

सर्व प्रतिसादकांचे आभार. चित्रगुप्त काकांच्या विशेष टिप्स साठी त्यांचे विशेष आभार. :)

इरसाल's picture

30 Apr 2014 - 10:27 am | इरसाल

पाकृ छान.
पण आमचं घोडं उकरपेंडी की उकड्पेंडी वर अडलय. ते उकर पेंडी म्हणजे पेंड किंवा ढेप उकरौन काढणारा घोडा समोर येतोय.

कुसुमावती's picture

30 Apr 2014 - 12:04 pm | कुसुमावती

नाव बरेचदा ऐकलं होत पण कधी खाल्ली नव्ह्ती, आता करुन बघेन.

माझी आई करते बर्‍याच वेळा हा पदार्थ. पण तिची उकरपेंडी ब्राऊन असते....आणि वर चिरलेला कच्चा कांदा आणि भरपूर कोथिंबीर.....वाह्ह!!

च्यामारी ह्यो काय प्रकार ? पहिल्यांदाच पाहिल्या / वाचल्या सारखे वाटले !
@मुवि :- नक्की... त्यावेळी मी देखील हजेरी लावण्याचा प्रयत्न करीन. :)

मुक्त विहारि's picture

2 May 2014 - 9:31 pm | मुक्त विहारि

पण आमच्या कडे, तांदळाच्या पिठाची आणि ताक, आले, लसूण घालून करतात.

आणि तसाही मी जूनमध्ये येत आहेच.

पाऊस पडत असतांना का पदार्थ अधिक खूलतो.