नागीण आणि काही कविता.

रामदास's picture
रामदास in जे न देखे रवी...
26 Sep 2008 - 7:26 pm

कॉलेजच्या दिवसात लिहीलेल्या या कविता आहेत.माझ्या कॉलेज मध्ये दिलीप मालवणकर नावाचा एक चळवळ्या मुलगा होता. त्यानी एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशीत केला होता. त्या संग्रहातल्या या माझ्या कविता आहेत. प्रकाशन दिनांक ८-११-१९८०.

नागिण
मनात आहे जपली मी पण
निवडुंगाची हिरवी जाळी
त्यात पोसली आहे सुंदर
एक विषारी नागिण काळी.

लागताच चाहूल कुणाची
जाळीमध्ये ती सरसरते
तिच्या विषारी फुत्काराने
उन कोवळे जळून जाते

अन् ग्रीष्माच्या शांत दुपारी
ऊन विखारी रखरखते
असह्य होउन जीव स्वताचा
निवडुंगाला डंख मारते.

चांदरात्री ती नाचनाचते
पाचोळ्याचे बांधून पैंजण
रात्र संपते ,कैफ विसरूनी
पुन्हा विषारी बनते नागिण.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ दुसरी कविता
ज्या वळणावर वळत गेलो.
व्यापत त्या वळणाला
अंधार सरपटत आला.
पूर्वेकडे धावत सुटलो....
तर ती आधीच ,
पश्चीमेला मिळालेली.
पृथ्वी अशी गोल आहे
आम्ही आता वाचण्याची
आशा फोल आहे.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ तिसरी कविता

मी रानातून चालतोय्
दहीवर झेलत पापण्यांवर.
पानांवर लिहीलेलं
हिरवं भविष्य वाचत.

पिवळी पानं उचलून
उराशी घेत,
त्यांच्या आठवणी रक्तानी
ह्रदयावर गोंदत.

सांडलेले पराग वेचत
पाखरांच्या हुंकारांना
आकार देत.

उन आठ्या घालून बघतय्
मी चालतो आहे माझ्याच ताठ्यात
माणसाच्या....
मातीत मिळण्यापूर्वी
मी पावलं मिरवीत
मी रानातून चाललोय.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ चौथी कविता.

मनात जपावं काहीतरी
मोरपिसांच्या खुणांनी
जपावं क्षणाक्षणाचं
--कणाकणानी.
पापणीच्या आतला अशृ
मनाच्या मखमालीत ठेवावा
-----उर दाटला तरी
डोळा कोरडा ठेवावा.

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

पाचवी कविता.

सैन्या गावात शिरले तेव्हा
बाजारपेठ ओस होती
दाराआड घराघराच्या
ठिणगी फुलत होती.

पायांनी पाचोळा उडवत
घोडी उभी अस्वस्थ
घराबाहेर.
घराबाहेर आले सगळे
विझून.
हुकूमासरशी टाचा घासत.

घरातली ठिणगी
चुलीतच जळत राहिली.

अजून म्हातार्‍या कोंडाळ्यातून
फुलत असते ठिणगी.
धुमसणार्‍या चिलमीतून.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कविताप्रतिभा

प्रतिक्रिया

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 7:33 pm | लिखाळ

त्यात पोसली आहे सुंदर
एक विषारी नागिण काळी.
वाहवा.. छप्पर फाडके ! नागीण कवीता आवडली.

कविता वेगवेळ्या टाका बुवा ! सर्व कवितांना तब्येतीत वाचता येईल आणि आस्वाद घेता येईल.
..लिखाळ.

मेघना भुस्कुटे's picture

26 Sep 2008 - 7:46 pm | मेघना भुस्कुटे

अगदी असेच म्हणते. पहिली सोडून इतर कवितांवर अन्याय होतो अशानं.
बाकी काय बोलावे... दंडवत हेच खरे. :)

लिखाळ's picture

26 Sep 2008 - 7:37 pm | लिखाळ

पृथ्वी अशी गोल आहे
आम्ही आता वाचण्याची
आशा फोल आहे.

वा ! मस्त कल्पना !
--लिखाळ.

पाचवी कवीता आवडली.. छान आहे.
--लिखाळ.

सुनील's picture

26 Sep 2008 - 8:03 pm | सुनील

छान कविता. जवळपास २८ वर्षांनंतर बाहेर काढता आहात ह्या कविता!!

मनात जपावं काहीतरी
मोरपिसांच्या खुणांनी
जपावं क्षणाक्षणाचं
--कणाकणानी.
पापणीच्या आतला अशृ
मनाच्या मखमालीत ठेवावा
-----उर दाटला तरी
डोळा कोरडा ठेवावा.

ही विशेष आवडली.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्राजु's picture

26 Sep 2008 - 8:49 pm | प्राजु

नागिण क्लास....
पूर्वेकडे धावत सुटलो ती पश्चिमेला मिळाली.... मस्त आहे कल्पना.
सुरेख..

शेवटची कविता नीटशी नाही समजली..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

26 Sep 2008 - 8:50 pm | झकासराव

प्रकाशन दिनांक ८-११-१९८०.>>>
माझ्या जन्माच्या एक महिना आधीच की... :)
कविता वाचेन. बघु. काहि समजले तर.
तस मी कधी कविता वाचत नाहीत कारण मला कधी फारशा कळतच नाहीत.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

स्वाती दिनेश's picture

26 Sep 2008 - 9:06 pm | स्वाती दिनेश

नागिण आवडलीच,पण लिखाळने म्हटल्याप्रमाणे सगळ्या कविता एकत्र प्रकाशित न करता वेगवेगळ्या केल्या असत्या तर जास्त छान झाले असते.
स्वाती

धनंजय's picture

26 Sep 2008 - 9:10 pm | धनंजय

बाकीच्या कवितांवर अन्याय होतो आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2008 - 9:11 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

बाकीच्या कवितांवर अन्याय होतो

नंदन's picture

26 Sep 2008 - 9:31 pm | नंदन

आहे. पहिल्या दोन कविता अतिशय आवडल्या. क्रमशः येथे चालले असते :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सर्किट's picture

26 Sep 2008 - 9:49 pm | सर्किट (not verified)

संग्रहात प्रकाशित झाल्याने जालकवीसंमेलनात ह्या कविता घेऊ शकत नाही. परंतु आपल्या अप्रकाशित कविता आम्हाला पाठवाव्या, ही आग्रहाची विनंती. दुवा खाली बघा.

-- सर्किट
(जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

शितल's picture

27 Sep 2008 - 1:41 am | शितल

नागीण आणि बाकीच्या कविता आवडल्या. :)

विजुभाऊ's picture

27 Sep 2008 - 4:59 pm | विजुभाऊ

रामदासभौ चक्क कवितांची फैर?
नागीण वरुन कुसुमाग्रजांची "अही नकुल" आठवली
"ओतीत विखारी आग देख नकुल आला रे नकुल आला "
काय मस्त ऍक्षन आहे त्या कवितेत.आख्खी लढत उभी रहात नजरेसमोर

डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत

विसोबा खेचर's picture

27 Sep 2008 - 5:22 pm | विसोबा खेचर

रामदासदादा,

लै भारी कविता आहेत!

तात्या.

मृदुला's picture

28 Sep 2008 - 3:35 am | मृदुला

नागीण उत्तम!
मात्र "ऊन विखारी रखरखते" मध्ये अडखळले. ऊन विखारी जे रखरखते किंवा असे काही करून दोन मात्रा वाढवल्या तर बरे.

"तर ती आधीच , पश्चिमेला मिळालेली." आवडले.

पाचव्या कवितेतील कल्पना आवडली.